विनीत मोडक
एके दिवशी संध्याकाळी निवांत घरी बसलो होतो. नव्या वर्षाचा उपक्रम ठरवला होता कि निवांत वेळी उगीच परत परत फेसबुक आणि whatsapp बघत बसायचे नाही, जी कामे बरेच दिवस करायची राहून गेली आहेत ती लवकरात लवकर संपवण्याचा निर्धारही केला होता. सकाळपासून आत्तापर्यंत पहिला फेसबुकचा उपक्रम तरी अमलात आणला गेला होता. तेवढ्यात आठवलं कि अरे बरेच दिवसांपासून मला वरचा माळा साफ करायचा आहे. आज करू उद्या करू असे म्हणत म्हणत ६ महिने होऊन गेलेत. आता हे काम आजच करावे असा बेत होता. अर्थात हि योजना प्रत्यक्षात अमलात आणणे तितकेच कठीण आहे हे हळू हळू माझ्या लक्षात येऊ लागले.
ठरवल्याप्रमाणे माळा साफ करायला घेतला. माळ्यावरून एक एक गोष्टी काढत होतो, काही गोष्टी फारच जुन्या होत्या आणि तेवढ्यात एका जुन्या वहीकडे लक्ष गेलं. वही चाळताना लक्षात आल कि अरे हि तर कॉलेज चालू झाल तेव्हाची म्हणजे ११ वी वाणिज्य शाखेची वही. का कोण जाणे माहित नाही, पण शाळेत प्रत्येक विषयाला वेगळी वही वापरणारे आम्ही मित्र कॉलेजला सर्व विषयांना एकच वही का वापरायचो हे कुणालाच माहित नव्हते. वही चाळताना असं लक्षात आलं कि एकूण वाणिज्य शाखेत टाइम पास हा माझा मुख्य विषय असून accounting, कॉस्टिंग असे विषय दुय्यम दर्जाचे असावेत इतपत असंबद्ध लिखाण त्या वहीत मला सापडले.
वहीच्या सुरुवातीला इकॉनॉमिकस ची व्याख्या, वेगवेगळे सिद्धांत लिहिलेले होते आणि अचानक फाइनल अकाउन्टींग मधली कधीही न टाली झालेली गणितही होती, मधेच कुठेतरी वडिलांनी दिलेला पॉकेटमनी आणि त्यात चालवलेला खर्च ह्याच्याही काही नोंदी दिसत होत्या. आज मागे वळून बघताना आमच्या शिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानावसे वाटतात कि तेव्हा त्यांनी आमच्या वह्या तपासल्या नाहीत आणि आमची हि गोपनीय माहिती म्हणजे privacy टिकवून ठेवली.
पुढली पाने चाळू लागलो तर नंतर देव आनंदची गाणी आणि त्याच्या गाजलेल्या सर्व पिक्चर्समधली गाणी, गीतकार, संगीतकार अशी सर्व माहितीचा कागद चिकटवला होता आणि अचानक एके काळच्या मला हि सर्व माहिती पुरवणार्या मित्राची विनीत मोडकची आठवण झाली. आपल्या काही मित्रांची आपली नक्की ओळख कधी होते हे सांगणे जितके कठीण तितकेच आपले त्यांच्याबरोबरचे संबंध कधी विरून जातात हे हि सांगणे तितकेच कठीण. काळाच्या ओघात कधीतरी, कोठेतरी हे मित्रांबरोबरचे मार्ग ठरवून किंवा बऱ्याच वेळेला न ठरवून कसे वेगळे होतात ह्याचे उत्तर कोणाकडेच नसते. आपले हे मित्र काही काळच आपल्या आयुष्यात येतात परंतु नंतर अनेक प्रसंगी त्यांची आठवण मात्र पदो पदी आणि दीर्घ काळ होत असते.
विनीतची आणि माझी तशी ओळख शाळेत नक्की कधी कुठल्या इयत्तेत झाली हे आता आठवत नाही. विनीत दिसायला गोरा पान, घारे डोळे, अंगानी बारीक होता. त्याच्या घरात वातावरण एकदम मध्यमवर्गीय, सुसंस्कृत आणि घरात गेल्यावर दिवाणखान्यात भरपूर पुस्तके होती. धुळीला त्यांच्या घरी पुस्तकांवर बसायला अजिबात परवानगीच नव्हती म्हणा न. त्याच्या घरातील पुस्तके एखाद्या ग्रंथालयात रचावीत अशी मांडणी केलेली असायची. विनीतला वाचायची जबरदस्त आवड आणि त्याहून हि खरी आवड हि वाचलेली माहिती कुठल्यातरी कागदांवर टिपून काढणे. विनीतच्या घरची बैठक हि संघातील विचारसरणीची होती आणि त्यामुळेच कि काय मराठी, हिंदी आणि ह्या दोन भाषांची जननी म्हणजे संस्कृत अशा तीनही भाषांवर त्याचे प्रभुत्व होते.
विनीत तसा मितभाषी होता आणि त्यामुळे इतरांपेक्षा नक्कीच वेगळा होता. तो एक तर बऱ्याच वेळेला स्वतःच्यातच गर्क असायचा. तो जे काय वाचायचा त्याची टिपणे काढत बसायचा. वर्गात काय शिकवतायत ह्या पुस्तकीय ज्ञानापेक्षा सभोवताली एकूण काय चालल आहे ह्याकडे त्याचे जास्त लक्ष असे. त्याला एकूणच परीक्षार्थी ञान घेण्यात काहीच स्वारस्य नसायचे पण सामान्य ञानाच्या त्याच्या कक्षा इतक्या रुंदावल्या होत्या कि आम्हा मित्रांना त्याचे फार अप्रूप वाटे.
त्याला माध्यमिक शाळेत असतानाच पुणे-मुंबई प्रवासात ओळीने कुठली स्टेशन्स लागतात हि अचूक माहिती होती, बरं माझ्या माहितीप्रमाणे ह्याचे कोणीही नातेवाईक मुंबईच सोडा पण शिवाजी नगरच्या पुढेही राहणारे नव्हते. पुढे नोकरीला लागल्यानंतर मी हा पुणे-मुंबई प्रवास पुढे काही वेळा केला परंतु दिवाडकरांचे वडे मिळतात म्हणून कर्जत स्टेशन तेवढ माझ्या लक्षात रहायचं आणि पुढे द्रुतगती मार्ग चालू झाल्यावर तर ट्रेनशी तसाही संबंध तुटलाच त्यामुळे एकूण किती स्टेशन्स आणि त्यांची नावे कधी पुढे लक्षात राहिलीच नाहीत.
शाळेतला एक प्रसंग आठवतोय. वर्गात भूगोलाचा तास चालू होता. आम्ही मुले जमेल तसे आणि परीक्षेत मार्क मिळतील इतपतच लक्ष देत होतो. मी विनीतच्या शेजारी बसलो होतो आणि तो नेहमीप्रमाणे नुकतेच जे काही वाचनात आले असेल त्याची आठवुन टिपणे काढत बसला होता. किंबहुना त्यात तो इतका रंगून गेला कि हा काय लिहित आहे हे बघायला मी हि त्याच्या वहीत डोकावलो. थोड्या वेळानी आमच्या वर्गात भयाण शांतता पसरली आणि आमच्या लक्षात आल कि गेली काही मिनिटे आमचे सर आमचे लक्ष कुठे आहे असे ओरडून विचारत होते. हे आमचे सर अत्यंत रागीट होते आणि त्यांच्या आवाजात इतकी जरब होती कि त्यांनी भूगोल शिकवताना विषयातील चंद्र, सुर्य, तारे, ग्रह डोळ्यासमोर उभे राहणार नाहीत परंतु त्या सरांनी मुलांना मारायला सुरुवात केली कि नक्कीच ब्रह्मांड का काय ते उभे राहायला लागे. इकडे आमचे सर आम्हाला ‘पुढे या’ अस विचारत होते आणि त्यांचा पारा नेहमीप्रमाणे अत्यंत चढला होता. मी आता चांगलाच घाबरलो होतो विनीत मात्र अत्यंत निर्विकार नजरेनी सरांकडे पाहत होता.
आम्ही पुढे गेल्यावर सर आमच्याकडे बघून उपरोधिक स्वरात म्हणाले कि आता आपल्या वर्गाला हे जे हुशार विद्यार्थी लाभले आहेत ते आता आपल्याला सुर्यमाला आणि त्यातील फिरणारे ग्रहांबद्दल माहिती देतील. नवीन नियमांप्रमाणे जेवढे ते ग्रह सांगू शकणार नाही तितक्या त्यांना पट्या खाव्या लागतील. का कोण जाणे पण आमच्या या सरांचे मुलांना मारण्याचे रोज नवीन नियम असत आणि त्या नियमांबद्दल जाब विचारण्याचे धाडस कुणाचे असणार? आम्ही दोघेही पुढे गेलो. विनीत फळ्याच्या जवळ गेला आणि मधोमध सुर्य काढून सबंध सूर्यमाला काढून दाखविली. मंगळ, गुरु, बुध, प्लुटो असे सर्व ग्रह दाखवले. एक रंगीत खडू घेऊन शनीच्या कडाही रंगवल्या. आता हा प्रत्येक ग्रहाचे सूर्यापासूनचे प्रकाश वर्षातले अंतरहि सांगतो कि काय असा विचार माझ्या मनाला चाटून गेला. सरांना नक्की काय बोलावे कळेना. आमच्या नशिबानी तास लवकरच संपला परंतु सरांनीही जाता जाता त्याला शाबासकी दिली.
त्याचे कौतुक केले तरी त्याचे त्याला काही सोयर सुतक नसायचे. अर्थात दर वेळी शाबासकी मिळायचीच असेही नाही. कधी कधी असेही प्रसंग उभे राहतात कि जिथे आपले म्हणणे बरोबर असते पण समोरच्याची चूक जर आपण शोधून काढली आणि ती सर्वांसमोर उघड बोलून दाखवली तर कौतुक होईलच असे नाही कारण शेवटी शाबासकी, कौतुक, टीका, शिक्षा हे माणसाच्या स्वभावाशी म्हणजेच मनाशी निगडीत विषय आहेत. आता पुढचाच प्रसंग बघा.
आमच्या वर्गात इतिहासाचा तास चालू होता. आमचे इतिहासाचे सर तल्लीन होऊन आम्हाला दुसऱ्या महायुद्धाबद्दल सांगत होते. बोलताना ते इतके तल्लीन होत कि ते मोठाले हातवारे करू लागत. प्रत्येक दोन वाक्यामागे त्यांना ‘काय विचारू नका’ असे म्हणण्याची सवय होती. साधारण आशय असा होता कि दुसऱ्या महायुद्धात युरोपातील एक एक करून कसे बहुसंख्य देश सामील झाले. हे सांगतांना आमचे सर म्हणाले कि ‘बघा अशी काय भयंकर परिस्थिती निर्माण होत होती. एक एक देश ह्या युद्धात सामील झाले, काय विचारू नका? एक एक देश घाबरून जात होता कि आता आपली वेळ कधी येणार युद्धात उतरण्याची? जसे कि इंग्लंड, फ्रान्स, बेल्जिअम, थायलंड, काही विचारू नका? अचानक विनितने हात वरती केला आणि तो म्हणाला सर तुम्ही विचारू नका म्हणालात पण एकच विचारतो कि सर तुम्ही थायलंड म्हणालात, तुम्हाला पोलंड म्हणायचं होत का? हे अचानक पोलंडचे थायलंड झाल्यामुळे सर्व मुले एकदम फिदीफिदी हसली. वास्तविक काही मुलांना तसे हि थायलंड काय किंवा पोलंड हे देश कुठे अस्तित्वात आहेत आणि ते एकाच खंडात आहेत कि वेगळ्या वेगळ्या खंडात हे माहित नव्हते. पण एक हसला म्हणून दुसरा अस होत होत हास्याचा संमिश्र आवाज ऐकू आल्यावर आमचे सरही वैतागले. सरांना आपली चूक उमगली होती परंतु कितीही म्हटलं तरी आमचे ते शिक्षक होते त्यामुळे त्यांच्या वयाचा, अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत सर म्हणाले,” कि थायलंड असेल अथवा पोलंड असेल पण युद्ध झाले हे निश्चित, काय विचारू नका? कळलं का, बस खाली.
असेच एक एक इयत्ता आम्ही पुढे जात होतो. आता दहावीनंतर पुढे काय करावे अशी चर्चा प्रत्येकाच्या घरी कानी पडू लागली होती. ठराविक वयात आपल्या सर्वांनाच सैन्याचे आकर्षण असते. आम्ही सर्वच मित्र आपल्या वकुबिप्रमाणे एकूण सैन्यात hierarchy कशी, पुढे कशी बढती मिळते अशा गोष्टींबद्दल बोलत बसलो होतो. सगळ्यांचे बोलणं ऐकल्यावर विनितने राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून बाहेर पडणाऱ्या छात्र, स्नातकांपासून वरिष्ठ अधिकारांच्या जागा आणि एकूण संख्या अशी सर्वच माहिती दिली. विशेष म्हणजे कुठलीही माहिती सांगताना तो कधीही मला जास्त कळत किंवा मी म्हणतो तेच खरं असा कधीच अविर्भाव चेहऱ्यावर दाखवायचा नाही. सामान्यतः पुढे असं दिसून आलं कि आपण कधी एखादा कुणाला प्रश्न किंवा माहिती विचारली कि 'अरे हे तुला माहित नाही'? असा पहिला प्रतिप्रश्न उत्तर म्हणून आपल्याला मिळतो.
शाळेनंतर नशिबाने आमच्या ग्रुपमधील आम्ही बरीचशी मुले परत एकाच कॉलेजात आलो. पूर्वी म्हणजे नव्वद सालच्या आसपास जमाना हा कसेट्सचा होता त्यामुळे आवडत्या गाण्यांची यादी केली जायची आणि मग त्याची कॅसेट केली जायची. बरेच दिवस जुन्या गाण्यांची कॅसेट बनवायच डोक्यात होतं, सुरुवात देव आनंदनी करावी असा मनात आलं. कुठली गाणी निवडावीत असा मनात विचार घोळत होता. अर्थातच जेव्हा हे विनीतला कळले तेव्हा तो मला दोन दिवस थांब एवढाच म्हणाला.
बरोबर दोन दिवसांनी ४ फुल स्केप कागद भरतील इतकी सविस्तर माहिती त्याने त्याच्या सुवाच्य अक्षरात मला लिहून दिली. कागदावर त्याने देव आनंदच्या पिक्चरचे नाव, गीतकार, संगीतकार, गायक अशी इथ्यंभूत माहिती दिली होती. मी चक्रावलोच. मला नेहमी प्रश्न हा पडायचा कि ह्याला हे सर्व करायला वेळ कसा मिळतो आणि महत्वाचे म्हणजे इतकी माहिती तो गोळा कधी करतो.
कधी कधी असा मनात विचार यायचा कि मला काय किंवा माझ्या मित्रमंडळीना निसर्गानी एकसारखाच वेळ दिला आहे. पण मग विनीत कशी काय माहिती गोळा करतो आणि हातच न राखून इतरांबरोबर ती माहिती वाटतो हे न उलगडणारे कोडेच होते.
विनीतला बहुतेक निसर्गानी म्हणा किंवा देवानी किंवा आज पर्यंत खरे ज्याचे उत्तर कुठेही मिळालेले नाही अशा त्या शक्तीने एकपाठी असण्याची आणि तीव्र स्मरणशक्तीची देणगी दिली असावी. विनीत म्हणजे त्या काळातला आमचा चालता बोलता ज्ञानकोश होता.
कॉलेजात आल्यावर विनीत शाखेत जाऊ लागला आणि आता एकूण त्याच्या बोलण्यात, वागण्यात आम्हाला अजून बदल जाणवू लागला. हळू हळू दिवस सरू लागले तसे प्रचारक व्हावे का याचा विचार त्याच्या मनात घोळू लागला. शाखा, संघ असे शब्द आमच्या ऐकिवात होते. आमचा शाखेत जायचा प्रश्नच नव्हता कारण कुठल्याही गोष्टीशी बांधिलकी न दाखवण्याची आणि कुठल्याच बाबतीत सक्रिय भाग न घेत टीका करायची पांढरपेशी वृत्ती आमच्यात तेव्हा जागी होऊ लागली होती.
हळू हळू कॉलेज संपण्याच्या मार्गावर जवळ आले होते तेव्हा आता पुढे काय करणार असा प्रश्न आम्हा सर्वच मित्रांना पडला होता. विनीतने मात्र स्वतःचा प्रश्न सोडवून टाकला होता. विनीत गेली १/२ वर्ष म्हणायचा कि मी काही काळ प्रचारक म्हणून मेघालयात जाणार आहे. तिथे सध्या स्वयंसेवकांची गरज आहे तेव्हा माझे नक्की झाले आहे.
पुढे graduate झाल्यावर खरच एके दिवशी तो प्रचारक म्हणून मेघालयात निघून गेला. आम्ही सर्वच मित्र आपापल्या कामात व्यस्त होत गेलो. एक एक करत संसारात रमून गेलो. आज विनीत कुठे आहे, काय करतो कुणालाच कल्पना नाही.
आता माझ्या मुलीला गोष्टी वाचून दाखवतो तेव्हा तिला अधिक माहिती देण्याकरिता सर्च इंजिनचा वापर करतो किंवा काही पुस्तके चाळली जातात आणि तेव्हा मात्र विनीत मोडक सारख्या चालत्या बोलत्या ज्ञानकोशाची आठवण झाल्याशिवाय होत नाही.
मस्त च
मस्त च
वा ! फारच सुंदर !! लेख
वा ! फारच सुंदर !! लेख वाचताना त्यात गुंगून गेले.
छान लिहिलेय. अशा माणसाला
छान लिहिलेय.
अशा माणसाला शोधून काढावे... थ्री इडीयट्स सारखे.
मस्त लिहिलंय...
मस्त लिहिलंय...
वा ! छान लिहिलय विनीत मोडक
वा ! छान लिहिलय
विनीत मोडक नावाचा माझाही एक मित्र आहे
क्षणभर त्याच्यावरच लिहिलय का अस वाटुन गेल
वाह, खूपच सुरेख लिहिलंय ....
वाह, खूपच सुरेख लिहिलंय ....
फार छान लिहिलय.
फार छान लिहिलय.
छान लिहिलेय. मोडक आडनावाचा
छान लिहिलेय.
मोडक आडनावाचा माझाही एक मित्र होता. चौथीत असताना. मी त्याला मोडकं म्हणायचो. खूप अवली होता, त्यामुळे त्या वयात आपला खास, दुर्दैवानी पाचवीनंतर शाळा सोडून गेला. थंक्स टू फेसबूक व्हॉट्सप, पुन्हा संपर्कात आलाय..
मस्त लिहिलंय...
मस्त लिहिलंय...
आवडले लिखाण
आवडले लिखाण
खुपच सुंदर. आवडला.
खुपच सुंदर. आवडला.
मस्त.. आवडलं !!
मस्त.. आवडलं !!
छान!
छान!