भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६
आज दुपारी:
भिडे गुरुजी देवळातली सकाळची 'शिफ्ट' संपवून घरी जायला निघाले होते. संध्याकाळी एका यजमानांकडे सत्यनारायण करायचा होता. तेवढ्यात एक बाई समोर आल्या--
"गुरुजी मला नवस करायचा होता…त्याला काही विधी वगैरे असतो का?"
"बाई…ते दुसरे गुरुजी येतीलच इतक्यात…तुम्ही थांबलात तर ते सांगतील तुम्हाला सगळं"
पण समोरची बाई त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त घाईत वाटत होती.
"अ…अजून एक विचारायचं होतं- फार वेळ नाही घेणार तुमचा--"
"बोला"
तिने एक कागद पुढे केला-
'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ।।'
"हा महामृत्युंजय मंत्र आहे! याचं काय?"
"याचा जप केल्याने माणूस आजारातून खरंच बरा होतो का?"
भिडे गुरुजी जरा चक्रावले--
"बाई, तुम्ही जरा बसा इथे--काय नाव काय तुमचं?"
"मी मेरी.…मेरी फर्नांडीस"
"हे मृत्युंजय मंत्र, नवस वगैरे कुणासाठी?" एव्हाना भिडेंचं कुतुहूल चाळवलं होतं.
"माझ्या पुतण्यासाठी…म्हणजे माझा मानलेला मुलगाच आहे तो….अभिषेक कुरतडकर त्याचं नाव"
काही वर्षांपूर्वी:
आयुष्याच्या एखाद्या वळणावर कुणीतरी भेटतं. सुरुवातीला काहीच विशेष वाटत नाही…'सगळ्यांसारखंच यांच्याशी ओळख झाली' अशी आपली धारणा असते! पण कधीतरी अचानक जाणवतं की 'त्यांच्या' आणि आपल्या आयुष्याचे मार्ग सारखे तरी आहेत किंवा खूपच वेळा एकमेकांना छेदतायत- कधी भल्या अर्थाने तर कधी वाईट अर्थाने! कधी कधी काही ओळखी-पाळखी अशा होतात की आपण आपले मार्ग सोडून त्यांच्या वाटेने चालायला लगतो.
अभिषेक रोज नवनवीन चेहऱ्यांना भेटत होता. काहींच्यात मिसळत होता तर काही लोक त्याला अजिबात आवडत नव्हते. यातच एक दिवस त्याची ओळख मेरी आंटीशी झाली. कॉलेज सुरु झाल्यावर आठवडाभरात 'आय' कार्ड्स इशु झाली. ती गळ्यात अडकवून कॉलेजमध्ये शिरायचं. एक बेरकी रखवालदार येणाऱ्या-जाणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवून असायचा. कॉलेजच्या आसपास होणाऱ्या मारामाऱ्या, छेडछाड प्रकरणं कमी व्हावीत हा हेतू! नवीन कार्ड असताना एक-दोन दिवस कौतुक, गंमत वाटली. मग त्याचा कंटाळा यायला लागला. कॉलेजच्या गेटमधून आत जाताना घालायचं आणि बाहेर आलं की लगेच काढून टाकायचं. तीन-चार आठवड्यांनी एक दिवस विनोदचं 'आय' कार्ड् हरवलं. रखवालदार आत जाऊ देईना.
"अरे कुठे टाकलंस?" अभिने त्याला विचारलं.
"अरे मी काल बॅगेत टाकलं होतं मला नीट आठवतंय…या वरच्या चेनच्या कप्यात!"
"छान…म्हणजे आता या गर्दीत कुणीतरी चेन उघडून तुझा आयडी घेतला आणि आता तो कॉलेजमध्ये घुसणार…" अभि थट्टेने म्हणाला.
"अ…शक्य आहे" विनोद कसानुसा चेहरा करत म्हणाला.
"अरे शक्य आहे काय?आता काय करायचं ते ठरव आधी…ऑलरेडी उशीर झालाय…केमिस्ट्रीचा पहिला पिरेड सुरु झालाही असेल…"
"जाऊ देत…आत्ता सिनियर कॉलेज सुटलंय आणि आपल्या पब्लिकची गर्दी आहे…थोड्या वेळाने जरा गर्दी कमी झाली की त्या रखवालदाराला रिक्वेस्ट करू…मग सोडेल तो आत!"
"पण मग तोपर्यंत काय करायचं??"
"तोपर्यंत चहा घेऊ किंवा वडापाव खाऊ…इथे ते कोपऱ्यावर रोबोस किचन आहे ना तिथे चहा भारी असतो…दादा सांगत होता मला"
"तुझा दादा या कॉलेजला आहे?"
"नाही रे…त्याची गल्फ्रेंड आहे इथे…तिला भेटायला येतच असतो तो"
"वाह…चला तर मग…"
रोबोस किचन कॉर्नरला होतं. दोघे रोबोस किचनमध्ये शिरले. पुढे एक लहान काउन्टर आणि मागे एक लहान खोलीत किचन. काउन्टरच्या बाजूला भिंतीला एक लहान खिडकी होती त्यातून प्लेट्स-कप्स आता-बाहेर व्हायचे. काउन्टरला एक चाळीशीची बाई उभी होती. तिने साडी नेसलेली होती पण कपाळावर कुंकू नव्हतं. गळ्यात एक चेन होती आणि हातात एक-दोन बांगड्या. मागे एका तिशीतल्या माणसाचा आणि मदर मेरीचा फोटो होता. तशी तिथे बरीच मुलं दिसत होती पण सगळी डिग्री कॉलेजची- ज्युनियरचं कुणी नव्हतं त्यामुळे अभी आणि विनोद दाराशी घुटमळले. त्या बाईचं त्यांच्याकडे लक्ष गेलं-
"काय रे? कसला विचार करताय?"
"अ…काही नाही आंटी…आमच्या ओळखीचं कुणी आहे का ते बघत होतो" विनोदने उत्तर दिलं.
"ज्युनीयरचे दिसताय…आणि नसलं ओळखीचं म्हणून काय झालं…ओळखी करून घ्यायच्या…"
"अ…हो…हो…चल रे अभि…आंटी दोन चहा हवेत"
"हो देते की…बसा…काही खाणारात का? वडे गरमागरम आहेत"
"चालेल…दोन वडापाव द्या"
विनोद आणि अभिषेक आत जाउन बसले.
"घ्या…दोन वडा-पाव…चहा देतेच" मेरी आंटीने दोन मिनिटात चहा आणून ठेवला.
"थँक यु" अभि म्हणाला.
"मग- कसं वाटतंय कॉलेज? आवडतंय का? की शाळाच छान होती?" तिने थांबून चौकशी केली.
"चांगलं आहे…म्हणजे जसं शाळेत असताना वाटायचं तेवढं भारी नाहीये पण आता लेक्चर बुडवून इथे यायला मिळतंय ते शाळेत नसतं करता आलं--" विनोद म्हणाला.
"अरे बापरे…तुम्ही दोघं चेहऱ्यावरून अभ्यासू दिसता आणि आत्तापासूनच बंक मारायला सुरुवात?"
"नाही हो…याचं आयकार्ड हरवलंय…मग आत जायला अडवतील म्हणून थांबलो…जरा गर्दी कमी झाली की जाऊ आता"
निघताना विनोद आणि अभिने पैसे दिले.
"आंटी मस्त होता चहा आणि वडापाव"
"आवडला ना…? मग झालं तर! येत राहा असेच…लेक्चर बंक करून येऊ नका म्हणजे झालं…" तिने हसत म्हटलं.
"हो नक्की"
"तुमची नावं विचारायचीच राहिली…--"
"अ…हा विनोद आणि मी अभि!"
"अभि? म्हणजे नेमकं काय? अभिषेक? अभिजित? अभिराम?"
"अभिषेक! पण सगळे मला अभिच म्हणतात…तुम्ही??"
"मी मेरी आंटी…आणि सगळे मला फक्त आंटीच म्हणतात"
"आंटी एक विचारु?"
"विचार की…"
"तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला मेरी 'काकू' म्हणू?"
"काकू? का रे बाबा?"
"असंच…तुम्हाला बघून काकू म्हणावसं वाटतं…"
"म्हण मग…माझी काहीच हरकत नाही! तसंही मला काकू हाक मारणारा तू काही पहिला नसणारेस"
"ग्रेट…मग झालं तर!"
त्या दिवसापासून मेरी काकुकडे अभिषेकचं नेहमीचं येणं-जाणं सुरु झालं.
दिवसामागून दिवस जात होते. अभिषेकला झूलॉजी सोडून सायन्स अजिबात आवडलं नव्हतं. पण मन मारून तो अभ्यास करत होता. वडिलांचा विक्षिप्तपणा अजिबात कमी होत नव्हता. आता त्यांनी अभिषेकने इंजिनिअरिंग करावं म्हणून त्याच्या मागे लागायला सुरुवात केली होती. 'आपल्या नशिबी कसं खर्डेघाशी करण्याचं आयुष्य आलं आणि आपल्या मुलांनी मोठं होऊन भव्य-दिव्य काहीतरी करावं अशी आपली इच्छा आहे' हे तो सांगायची एकही संधी सोडायचा नाही. या सगळ्यात अभिचा बंडखोरपणा सुप्तपणे वाढत होता. आईला ते जाणवत होतं पण त्या बंडखोरपणाचा स्फोट होऊ नये अशी तिला वाटत रहायचं.
क्रमशः
छान चालु आहे. पुढचा भाग पण
छान चालु आहे. पुढचा भाग पण येऊ द्या लवकर..
छान!! जरा मोठे भाग टाका
छान!!
जरा मोठे भाग टाका
मृत्योर्मुक्षीय मामृतात् >>>
मृत्योर्मुक्षीय मामृतात् >>> मृत्युर्मोक्षी यमामृतात्
CHAN AAHE PAN JARA MOTHE BHAG
CHAN AAHE PAN JARA MOTHE BHAG TAKA.
चैर , कथा खूपच छान आहे, i &
चैर , कथा खूपच छान आहे, i & me मधल द्वंद्व तुम्ही खूपच समर्पक रित्या मांडत आहात .पु.ले.शु
छान .. पण खूपच लहान भाग!
छान .. पण खूपच लहान भाग!