ऋणानुबंध

Submitted by नितीनचंद्र on 21 June, 2014 - 09:00

प्रस्तावना

२५ वी कथा मायबोली वाचकांच्या समोर ठेवताना आनंद आहे. आठवी किंवा नववीत असताना सर्वात प्रथम एक कविता रचल्याचे आठवते. ही कवीता किमान कॉपी करुन ठेवण्याची अक्कल नसल्यामुळे ती एका मासीकात छापायला दिली आणि गायब झाली. दुसरी एक कविता एका मासीकात आली.

मला कथा लिहता येतील याची खात्री माझ्या अप्रकाशीत लेखनात दडलेली होती. असा एखादा फोरम माझे लेखन फारश्या कष्टा शिवाय आणि प्रतिक्षेशिवाय प्रसिध्द करेल हे मायबोलीच्या कलादालनात येई पर्यत कल्पनेत नव्हते.

एखादी कथा लिहता येते त्यावर प्रतिक्रिया येतात. दोन चार वर्षांनी आपलीच कथा वाचकांच्या प्रतिक्रियेसोबत पुन्हा आपल्याला वाचता येते आवश्यक वाटल्यास सुधारता येते यासारखा आनंद नाही.

ज्या मायबोलीकरांच्या कल्पनेत हे माध्यम आले आणि ज्या मायबोलीकर तंत्रज्ञांच्या कष्टाने साकार झाले त्या सर्वांना धन्यवाद.

प्रस्तावना लिहीण्याचा प्रघात मायबोलीवर नाही पण मला मोह आवरत नाही.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ही कथा वाचण्याआधी जर आधीच्या तीन कथा वाचल्या तर संदर्भ लागेल.

अघटीत -- १ http://www.maayboli.com/node/18721
अघटीत -- २ http://www.maayboli.com/node/49213
अघटीत -- ३ http://www.maayboli.com/node/49231

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

"यार अनिल हे मृतात्मे कायम त्रासच देतात का ?" महेशने अनिलला विचारले. " म्हणजे आता तुच पहा माझा पहिला अनुभव वाईटच होता आणि तुझा कितवा होता माहित नाही पण तोही वाईटच. काय मिळवल या आत्म्यांनी आपल्याला त्रास देउन ?

त्याच अस आहे महेश की आत्मा कुणाचा आहे आणि त्याचा मृत्यु कशा परिस्थीतीत झाला त्यावर त्याचे मृत्युनंतरचे जीवन अवलंबुन आहे.

महेशचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता. "यार काही टिपल नाही. जरा समजेल अस सांग ना."

"कस आहे" अस म्हणुन अनिलने जरा मोठ्ठा श्वास घेतला. एक दिर्घ श्वास घेत शब्दांची जुळवा जुळव तो मनातल्या मनात करु लागला.

एखादा माणुस सज्जन असतो. आयुष्यभरात त्याने कुणालाच त्रास दिलेला नसतो. आयुष्याच्या शेवटी त्याला असा काळ मिळतो जेव्हा आपण केलेल्या कामाचा त्याला म्हातारपणी आढावा घेता येतो. काही चांगल केल असेल तर आनंद मिळतो. पण हातुन वाईट घडल असेल तर मात्र पश्चात्तापाला सुध्दा वेळ मिळतो. एखादा सज्जन माणुस आपण काही वाईट केल असेल तर त्याची जिवंतपणीच मनातल्या मनात क्षमा मागतो. एखादा हिम्मतवाला सज्जन ज्या व्यक्तीला त्याच्यामुळे त्रास झाला आहे त्याव्यक्तीला बोलावण धाडुन क्षमा मागतो. या कृतीने त्याच्या मनाचा भार हलका होतो. मग मृत्युनंतर असा आत्मा वेगाने पित्रुलोकात जातो आणि पुढिल जन्म येईपर्यंत मृत्युनंतरचे जीवन तिथे जगतो.

काही माणसांना मात्र अशी संधीच मिळत नाही. अचानकपणे त्यांचा मरण येते आणि काही इच्छा राहुन जातात. आपण अनुभवलेल्या दोन्ही गोष्टीत या दोन्ही माणसांचे मरण म्हातारपणी आलेले नाही. दग्या फ़टक्याने, परिस्थीतीने काही इच्छा बाकी असताना झाले आहे. त्यांच्या मनाची मरणानंतरही सुड घेण्याची इच्छा किंवा एखादी अपुरी इच्छा राहिल्याने ते तसे वागतात. त्यांना पित्रु लोक न मिळाल्याने ते इथेच भटकत रहातात.

अरे अनिल, तो दारुतुन विष पिलेला बाजी लोके बाबाच्या माध्यमातुन सखारामच्या मागे लागला हे समजल पण तुझ्या अनुभवात तो बाबा तुमच्या मागे का लागला ? तुम्ही काय त्याच वाईट केल होत ?

त्याच काय आहे महेश, त्या आत्म्याला आम्ही त्याच्या जागेत गेलो हे आवडल नसाव. त्यांच्या जीवनात यामुळे बाधा येते म्हणुन ते घाबरवतात माणसांना. बाकी काही नाही. आमचच बघ ना. मला आणि माझ्या मित्राला त्या बाबाने नुसती भिती दाखवली. आम्ही भितीने पळालो. आम्हीच काय, अश्या घटना पुन्हा पुन्हा घडल्या म्हणजे त्याजागी गंमत म्हणुन सुध्दा कोणी जाणार नाही. आणि त्या बाबाच्या जीवनात बाधा येणार नाही.

"अनिल तुला एखाद्या सज्जन माणसाचे मरण झालेले माहित आहे का ज्याने मेल्यानंतर सुध्दा फ़क्त चांगलच काम केल "

हो ! माहित आहे ना. आपल्याच ऑफ़िसला एक संजय होता, आता त्याची बदली झाली. त्याच्या मानलेल्या काकांची खरी गोष्ट आहे ही"

जसा तु तसा मला संजय होता. अगदी मनातल बोलणारा. एकदम धाडसी आणि तुझ्यासारखी रुटीनमधे नसलेली काम करणारा. सगळ्या वसुलीच्या केसेस त्याच्याकडे असत. घरावर / कारखान्यावर जप्तीची किंवा लिलावाची नोटिस बेलीफ़ला घेऊन जाऊन बजाऊन येणे यासारखी काम तो चुटकी सरशी करायचा. कोणत्याही कर्जदाराने कितीही धमक्या दिल्या तरी घाबरायचा नाही. संजयचा बाप पोलीस होता. पोलिस लाईनमधे संजय लहानाचा मोठा झालेला. असल्या गोष्टी त्याच्यासाठी किरकोळ होत्या.

माझे आणि संजयचे दोघांचे त्यावेळेला लग्न झालेले नव्हते. मी जरा बरा पण संजय बेफ़ाम होता. आठवड्यात एक गुरुवार सोडला तर जवळ जवळ रोजच दारु प्यायचा. त्यावेळेला नुकतीच त्याने स्कुटर घेतली होती. दारु पिऊन तो वेड्यासारखी गाडी चालवायचा. त्याच्या या स्टाईलमुळे त्याच्या मागे कोण बसायला मागत नव्हत.

आमची पार्टी ठरली. निगडीच्या नाक्यावर एक नवीन बार झाला होता. वार शनिवार होता. हाफ़ डे भरुन आम्ही संध्याकाळी सहा वाजता निगडीच्या नाक्यावर गेलो. दोघांचेही तीन तीन पेग झाले असतील. मग जेवण झाल. निगडीला येताना मी संज्याबरोबर आलो होतो. जाताना मात्र मी त्याला टाळुन बस ने पुण्याला घरी गेलो. रविवारी सकाळी हे महाराज नेहमीप्रमाणे आमच्या रास्तापेठेतल्या मिसळीच्या दुकानावर नाष्टा करायला का नाही आले हे बघायला त्याच्या घरी समोरच्याच पोलीस लाईनमधे गेलो तेव्हा कळले की त्याने एका माणसाला चिंचवडला ठोकले. संज्या पोलीसांच्या ताब्यात होता. सोमवारी त्याला कोर्टापुढे हजर करुन पोलीस कस्टडी मागायची होती. पोलीसाचा मुलगा म्हणुन या महाराजांनी ड्रायव्हींग लायसन्स पण काढले नव्हते. कोणी पकडलेच तर वडीलांचे नाव सांगीतले की एका मिनटात सुटका व्हायची. त्यातुन एखादा तरुण वहातुक पोलीस हेड ऑफ़िसमधली याच्या वडीलांची किर्ती ऐकुन वरुन त्याला साहेबांना नमस्कार सांग म्हणायचा.

त्यादिवशी जरा विचीत्रच घडल. संज्याने त्या माणसाला उडवला ते नेमके पोलीस चौकीसमोरच. त्यादिवशी कुणा मंत्र्याची गाडी जायची म्हणुन पोलीस बंदोबस्त जरा जास्तच होता. चिंचवडच्या चौकात सिग्नल तोडुन, पायी चाललेल्या माणसाला दारु पिऊन लायसन्स नसताना बेफ़ाम गाडी चालवुन ठोकरण म्हणजे जरा मोठ्ठाच गुन्हा झाला होता. इतक्या लोकांच्या समोर घडलेला गुन्हा दाबायचा कसा असा प्रश्न उपस्थित सर्वच पोलीस आणि त्यांच्या अधिकारी वर्गाला पडला होता. त्यातुन जखमी झालेल्या माणसाच्या पायाची हाडे इतक्या ठिकाणी तुटली होती की त्याचा पाय त्याच रात्री ऑपरेशन करुन कापावा लागला होता. अश्या परिस्थीतीत ही केस जशी सामान्य माणसाची हाताळावी तशी चिंचवडच्या पोलीसांनी हाताळली. संज्याच्या वडीलांच्या प्रेशरला अजिबात भिक घातली नाही.

या घटनेनंतर संज्यात बदल झाला. त्याची दारु सुटली नाही पण कधीतरी आणि तिही प्रमाणात त्याच बरोबर घराच्या जवळच्या बार मधे इतक परिवर्तन त्याच्यात दिसल. आठ दिवस पोलीस कस्टडीत काढल्यावर पोलीस लाईनची मस्ती उतरली. संज्याचा जामीन झाला आणि केस उभी राहीली. यादरम्यान संज्याच्या आयुष्यात एक व्यक्ती आली ती म्हणजे वैद्य काका.

वैद्य काका बॅचलर माणुस. संज्याचा बाप शोभेल इतक्या वयाचा. दोघांच आराध्य दैवत म्हणजे रास्ता पेठेतले माळी बाबा. माळी बाबांनी समाधी घेऊन अनेक वर्षे झाली होती. दर गुरुवारी त्यांच्या रास्तापेठेतल्या मठात या दोघांची सुरवातीला नजरा नजर झाली. मग पुढे ओळख होऊन वैद्य काका पोलीस लाईनला दर गुरुवारी येऊ लागले.

वैद्य काकांच शिक्शण काय झाल होत माहित नाही पण कोणत्याही विषयातले त्याची माहिती अफ़ाट असे. इंजिनीयरींग कंपनीत काम करणारे वैद्य काका इंजिनीयरीग बरोबरच ज्योतिष, तत्वज्ञान कोळुन प्यायले होते. त्यांच्या भाड्याच्या जागेला आम्ही मठी म्हणायचो. एका वाड्यात दहा बाय दहा च्या खोलीत काका रहायचे. स्वत: हाताने जेवण बनवायचे. कपडे धुवायचे. इतक सगळ असुन त्यांना रामाची पुजा करायला वेळ असायचा. वाचनाचा अफ़ाट छंद होता. दहा बाय दहाच्या एका भिंतीला जेवण बनवायचे टेबल, दुसया भिंतीला झोपायला एक कॉट , तिसया भिंतीला देवघर ज्यात राम सीता व लक्ष्मणाची एकत्र मुर्ती. कॉट खाली असंख्य पुस्तके. चवथ्या भिंतीला मात्र त्या खोलीत यायचा दरवाजा आणि त्याला जोडुन एक खिडकी असल्यामुळे तिथे काही सामान नसायच.

गुरुवारी सुट्टीच्या दिवशी काकांची रामाची साग्रसंगीत पुजा असायची. ते झाल की आठ दहा लोक बाहेर पत्रीका घेऊन वाट पहात असायचे. बारा वाजेपर्यंत कोणतीही दक्षीणा न घेता काका पत्रीका बघुन अडचणीवर तोडगे सांगायचे. मग काका स्वयंपाकाला लागायचे. गोडाधोडचा नैवेद्य दाखवुन मग जेऊन जरा आडव पडल की संध्याकाळी पोलीस लाईनला हजर व्हायचे. संध्याकाळी सातला संज्याला घेऊन माळीबाबांच्या आरतीला जायचे. मग रात्रीचे संज्याच्याच घरी जेऊन सायकलवर परत आपल्या घरी यायचे. हा परिपाठ संज्याच लग्न झाल्यावर सुध्दा असाच सुरु होता.

संज्याच लग्न म्हणजे सुध्दा एक गुंताच झाला होता. संजयच्या मोठ्या भावाची मावस मेहुणी संजयच्या अश्या धाडशी स्वभावाने त्याच्या प्रेमात पडली होती. दोघे भेटत होते. दोघांच्या घरापर्यंत हा विषय पोहोचला होता पण या मुलीचे वडील या लग्नाच्या विरोधात होते. कारण एकच होत. ह्याच्यावर सुरु असलेली पोलीस केस. या गुन्ह्यात जर संजयला सजा झाली तर सरकारी नोकरी गेलीच असती शिवाय सजा भोगण्यासाठी तुरुंगात किती वर्ष जावे लागले असते माहित नाही. वडीलांची काळजी लग्नाला नकार देत होती. वडील संजयचा नाद सोडायला सांगत होते आणि मुलगी ऐकत नव्हती. शेवटी वैद्य काकांनी मध्यस्ती करुन या लग्नाला परवानगी मिळवली. वैद्य काका आणि मुलीचे वडील यांच्यात नेमक काय बोलण झाल हे वैद्य काकांनी आम्हाला कधीच सांगीतल नाही.

स्वत: लग्न न करता ब्रह्मचारी राहिलेले वैद्य काका मात्र या लग्नात खुष होते. नवरदेवाचा पोषाख खरेदीसाठी स्वत: संजयबरोबर गेले होते. संजयच्या लग्नात त्याच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन होते. विशेष म्हणजे संजयच्या लग्नाआधीच्या बॅचलर्स पार्टीला पण हजर होते. संज्याला आयुष्यभर दारु सोडायचा आग्रह करणारे वैद्य काका त्या दिवशी एक पेग लाउन होते. वयाने मोठा असलेला हा माणुस पटकन कुठेही मिसळुन जायचा. त्यांच्यामुळेच संजयचे आम्ही काही मित्र शास्त्रीय संगीताची काही जाण नसताना अनेक वर्ष सवाई गंधर्वला हजर असायचो.

कोणत्याही गोष्टीची चिंता न करणारे काका या केसचा विषय निघाला की सिरीयस व्हायचे. येवढी एकच चिंता मला आहे म्हणायचे. संज्याच्या वडीलांनी ही केस कोर्टात सुनावणीला येईपर्यंत कागदपत्रात बरेच बदल घडवले होते. वैद्य काका गेले की ते हसुन म्हणायचे. च्यायला, ही लफ़डी मिटवताना मला घाम फ़ुटला. काकाला काय जातय चिंता करायला.

संज्याच्या केसच्या तारखा पडत होत्या. तो पाय तुटलेला माणुस न चुकता कुबडी घेऊन प्रत्येक तारखेला हजर असायचा. एकच वाक्य तो कोर्टापुढे जितके वेळा संधी मिळेल तितक्या वेळेला म्हणायचा. माझा पाय कापावा लागला जजसाहेब. याला सोडु नका. याला जास्तीत जास्त शिक्षा द्या. हे वाक्य ऐकले की संज्याच काय संज्याच्या वडीलांना सुध्दा कोर्टात घाम फ़ुटायचा.

दरम्यान संज्याच्या वडीलांनी बरीच खटपट करुन अपघाताच्या आधीच्या तारखेला जारी झालेले लायसन्स हजर करुन त्या केसची हवा काढली होती. अपघतानंतर संज्याची मेडीकल झाली होती पण कोर्टासमोर सादर केलेल्या रिपोर्टमध्ये त्यात तो दारु पिलेला होता हा उल्लेख मात्र टाळण्यात आलेला होता. परिणामी बेजबाबदार पणे गाडी चालवुन एका व्यक्तीला ठोकर देऊन जखमी केल्याचा गुन्हा तेव्हडा शिल्लक होता. त्याच्या जवळ लायसन्स नव्हत किंवा तो दारु पिऊन गाडी चालवत होता ही कलमे कोर्टाच्या सुनावणीत सिध्द झाली नव्ह्ती. दरम्यान इंन्शुरन्स कंपनीने थर्ड पार्टी क्लेम मंजुर करुन दिला होता आणि त्या अपघात झालेल्या व्यक्तीला एक लाख रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार होती. १९९३ साली ही भरापाई तशी बरीच होती.

आमच्या माहितीत एकदाच वैद्य काका आजारी पडले. गुरुवारी आरतीला आले नाहीत म्हणुन संज्याबरोबर आरतीला हजर असणारे आम्ही चार मित्र वैद्य काकांच्या घरी गेलॊ. वैद्य काका झोपुन होते पण हसत होते. नेहमी प्रमाणे चेष्टा मस्करी करत होते. आम्ही डॉक्टरांना बोलावले. तेही वैद्य काकांच्या ओळखीचे होते. त्यांनी काकांना तपासले आणि लगेचच अ‍ॅम्ब्युलन्स बोलावली. मला काही झालेल नाही हे वाक्य हसत म्हणत काका उठले आणि स्ट्रेचरवर स्वत: चालत जाऊन झोपले. संज्या अ‍ॅम्ब्युलन्समधे बसला. मी आणि बाकीचे स्कुटरवरुन निघालो. दहा मिनीटांच्या अंतरावर असलेल्या हॉस्पीटल मधे पोहोचे पर्यत काका गाढ झोपी गेलेले होते.

आम्ही हलवुन उठेनात म्हणुन शंका आली. डॉक्टरांनी त्यांचे हार्ट फ़ेल चे निदान करुन आम्हाला सगळ्यांना धक्काच दिला. भेटायला गेलेले आम्ही चार मित्र त्यांना वैकुंठात पोचवुनच घरी आलो.

वैद्य काका गेल्यानंतर जवळ जवळ एका वर्षाने केसची फ़ायनल तारीख पडली. संज्याच्या वकीलांनी हा गुन्हा बेजबाबदार पणे वहान हाकुन घडलेला नसुन रात्रीच्या वेळी चिंचवडच्या चौकात रस्त्यावर दिवे नव्हते. इ. बाजु मांडत तो गुन्हा अनवधानाने घडला आहे असा युक्तीवाद केला. आता सगळी मदार त्या अपघातात जखमी झालेल्या माणसाच्या म्हणण्यावर अवलंबुन होती.

दरवेळेला या जजसाहेब याला सोडु नका म्हणणारा हा माणुस त्यादिवशी भलतेच बोलला. जणुकाही त्याला संजयच्या वकीलांने केलेला युक्तीवाद मान्य झाला होता. आता पाय तर गेलाच आहे. नुकसान भरपाई म्हणुन पैसेही मिळाले आहेत. माझी तक्रार नाही. याला सोडा असे विधान त्या पाय तुटलेल्या माणसाने केले. त्याच दिवशी निकाल लागुन कोणतीही शिक्शा न होता. लायसन्स १ महिन्याकरीता सस्पेंड होणे व सोबत काही दंड होऊन संज्या सुटला.

संज्या निकाल घेऊन कोर्टाच्या बाहेर पडल्यावर तो माणुस पुन्हा समोर आला. तुमचे काका वर्षभर माझ्याकडे येत होते. मला संजयला सोड म्हणुन हात जोडुन विनंती करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार मी तुला सोडल आहे. आज कसे काय आले नाहीत. आले असते तर मीच त्यांना मी दिलेला शब्द पाळला आहे म्हणुन सांगीतले असते. पण आता तु सांग.

संज्याला काही कळेना. वैद्य काका त्या आधीच्या कोणत्याही तारखेला कोर्टात आलेले नव्हते. या व्यक्तीचा आणि त्यांचा संपर्क कधी आलेला नव्हता अस असताना आणि मागचे वर्षभर हयात नसताना काका या माणसाला कसे भेटतील हे समजत नव्हते. संजयने काकांचा फ़ोटो त्याच्या पाकीटात ठेवला होता. आपल पाकिट काढुन संजयने तो फ़ोटॊ त्या माणसाला दाखवला." असे दिसत होते का माझे काका ?".

हो हो, हेच हेच काका मला भेटतात. आमची शेवटची भेट मागल्या आठवड्यात झाली तेव्हा मी कोर्टात तुला सोडा अस बोलेन असा शब्द त्यांनी माझ्याकडुन घेतला आणि मी तो पाळला.

संज्याच काय हा संवाद ऐकणारे सगळेच सुन्न झाले होते. आपली कुबडी खट खट वाजवत तो माणुस निघुन गेला.

वैद्य काकांचे आणि संजयचे काय ऋणानुबंध होते आणि कुठल्या जन्मातले होते हे काही अजुन आम्हाला समजलेले नाही. आपल जिवंतपणी कमावलेले सार पुण्य पणाला लाऊन संजय सरळपणे संसाराला लागावा यासाठी मृत्युनंतरही खटपट करणारा हा पुण्यात्मा कोणाच्याही बुध्दी, तर्क यांच्या पुढचे प्रकरण होते.

रात्रीचे जवळ जवळ सात वाजले होते. ऑफीसचा वॉचमन दरवाजा वाजवत घरी जायच नाहीका म्हणुन आम्हाला विचारत होता. त्यालाही ऑफीस बंद करुन घ्यायची घाई असावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमोल, सुहास्य, झकासराव्,प्रिती, पलक, पियू, आशिका, चिमुरी, आणि रविकांत धन्यवाद