पालक पराठा -पुदीना चटणी

Submitted by सुलेखा on 16 June, 2014 - 04:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक पराठासाठी साहित्य :--
१ कप कणिक ,
२ मध्यम आकाराचे बटाटे .
१ कप चिरलेला पालक,
२ टे.स्पू. चिरलेली कोथिंबीर,
७-८ पुदीना पाने,
१ लहान चीज क्युब /१ टे.स्पू चीज स्प्रेड किंवा एक चीज स्लाईस,
१ टी स्पू.हिरवी मिरची व आले जाडसर वाटलेले,
१/२ टी स्पून प्रत्येकी भाजलेले जिरे व चाटमसाला,
१/४ टी स्पू मिरे पूड,
१ टे स्पू टोमॅटो केचप,
चवीनुसार मीठ.
२ टे स्पू पराठा भाजताना वरुन लावायला तेल..
पुदीना चटणी साहित्यः--
१ कप पुदीना पाने कोवळ्या देठासकट,
२ मध्यम आकाराचे कांदे -मोठ्या फोडी चिरुन घ्याव्या.,
२ हिरव्या मिरच्या,
१ टी स्पून भाजलेले जिरे,
१/२ लिंबाचा रस
पराठा वाढताना सजावटीसाठी--किसलेले चीज

क्रमवार पाककृती: 

बटाटे सोलुन किसणीवर किसुन घ्या.एका नॉन-स्टीक पॅन मध्ये एक टेबल स्पून तेल गरम करुन त्यावर हा बटाट्याचा किस मऊ होईपर्यंत परतुन घ्या.
आता एका मोठ्या बाऊल मध्ये कणिक चिरलेला पालक,कोथिंबीर,पुदीना पाने हाताने तोडुन टाका.
जाडसर वाटलेली हिरवी मिरची - आले ,साय्,एक चीज क्युब किसुन घाला. मीरेपूड, चाट मसाला.टोमॅटो केचप आणि चवीपुरते मीठ घाला.
सर्व साहित्य छान एकत्र करुन घट्ट गोळा भिजवा.परतलेल्या बटाट्याच्या किसाला ओलसरपणा असतो व पालकाला थोडे पाणी सुटते त्यामुळे .पिठ भिजवताना शक्यतो वेगळे पाणी वापरायचे नाही १० मिनिटांनी भिजवलेला गोळा मऊ होतो.
आता मोठ्या पुरीच्या आकाराची जाडसर पोळी लाटा व गॅसवर मध्यम आचेवर तवा तापवुन दोन्हीकडे अगदी कमी तेल सोडुन खरपूस रंगावर भाजा.
असे दोन पराठे केले कि ते गरम असताना त्यापैकी एकावर किसलेले चीज पसरा लगेच त्यावर दुसरा पराठा ठेवा व चारी बाजुने दाबा.या चीज सँडविच पराठ्याला पिझ्झा कटर किंवा सुरीने कापा.असे सर्व पराठे करुन घ्या.
पुदीना चटणी --
पुदीना पाने,हिरवी मिरची,कांदे,जिरे मिक्सरच्या भांडयात एकत्र करुन वाटा.आता त्यात लिंबाचा रस व चवीप्रमाणे मीठ घाला व पुन्हा एकदा वाटुन घ्या.पुदीना चटणी तयार आहे. या चटणी फ्रीज मध्ये टिकते व चटणीचा रंग हिरवागार रहातो .
सँडविच पालक पराठ्याबरोबर पुदीना चटणी वाढुन सर्व्ह करा.
palak paratha---2222222222.JPG

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी आहे. लेकीचा अत्यंत आवडता पदार्थ आहे. मी पालक प्युरी करून कणकेत घालून भिजवते. नेक्स्ट टाईम फ्रेश पालक मिळाला की यापद्धतीने करून बघेन.

मस्त दिसत आहे .. नक्कीच ट्राय करून बघेन ..

एक शंका, पुदिन्याच्या चटणीत नुसताह कच्चा कांदा वाटून आहे तर वास येत नाही का आणि चवही कडवट लागत नाही का?

अंजली_१२ , सशल
ह्या चटणीत कांदा कच्चा च घालायचा आहे.तयार चटणीत एकुण कांदा प्रमाण जास्त असले तरी पुदिन्याचाच वास जास्त येतो.आणि जिरे कमी असुनही, चव जाणवते.ही पंजाबी पद्धतीची चटणी आहे.त्यांच्याकडे ही चटणी फ्रीज मधे कायम असते..टोमॅटो सॉस सारखीच ही चटणी मुक्त हस्ताने [ब्रेड-पराठा-रोटी-भात-पुलाव-भजी-कटलेट] खातात. ,

डाएट करणार्‍यांनी बटाटा ऐवजी भोपळा तसेच रताळे वापरता येईल.मल्टी ग्रेन कणिक घेता येईल .साय -चीज न घालता पराठा करुन त्यावर एकुण अर्धा टी स्पून तेल वापरुन छान चवीचा डाएट पराठा तयार होतो.

ओके Happy

काल केले होते हे पराठे. एक नंबर.
आज पोरीच्या डब्यातही दिले. आभारी आहे सुलेखाताई.

सशल- कडवट नाही लागत. मी नेहमी करते कैरी, कच्चा कांदा, पुदिना, आणि शेंगदाणे- यांची चटणी.