एव्हरेस्ट बेस कँप - भाग २ - हिमशिखरांच्या सोबतीने.........

Submitted by आऊटडोअर्स on 2 June, 2014 - 03:32

आधीचा भाग :- http://www.maayboli.com/node/49177

दिवस ५ वा:- देबोचे ते डिंगबोचे (१४,१०७ फूट) (अंतर अंदाजे ११ कि.मी.)

सकाळी बाहेर येऊन बघितलं तर आकाश छान निळं दिसत होतं. आज हवामान स्वच्छ असेल असं वाटत होतं. निघायची वेळ साधारण ७ ते ७.३० च्या आसपास ठरलेली असायची. आजही ५-६ तासांची चाल होती. देबोचे सोडल्यावर आता परत दुधकोशी नदीच्या पात्राजवळ आलो होतो. एक मोठा ब्रिज तुटलेला दिसत होता. त्याला पर्याय म्हणून पुढेच एक नवीन ब्रिज बांधलेला दिसत होता. ब्रिज ओलांडल्यावर चढण सुरु झाली.

देबोचे सोडल्यावर

डोंगरावर एक कमान दिसत होती, ती ओलांडून पुढे आल्यावर दूरवर 'पांगबोचे' गाव नजरेच्या टप्प्यात आलं. येताना आमचा एक रात्र मुक्काम पांगबोचेमध्ये असणार होता. तिथे एक चहाचा स्टॉप घेतला. तेव्हा असं ठरवलं की दुपारच्या जेवणासाठी अधे-मधे कुठेही न थांबता सरळ 'डिंगबोचे'ला पोचल्यावरच जेवावं. इथून साधारण अजून ३ तास लागतील असा अंदाज होता. रस्ता फार चढाचा वगैरे नव्हता, परंतू कडक ऊन जाणवत होतं. आणि अचानक त्या स्वच्छ आकाशात अमा दबलम, ल्होत्से(चौथ्या क्रमांकाचं शिखर) आणि एव्हरेस्ट या शिखरांनी पहिल्यांदाच अगदी काही मिनीटांसाठी ओझरतं दर्शन दिलं. एव्हरेस्ट बघुन मला नक्की काय वाटलं हे कळायच्या आतच त्याने लगेचच ढगांचा पडदा ओढून घेतला. खरंतर हवा स्वच्छ असती तर नामचेहून निघाल्यापासूनच ही शिखरं दिसली असती. पण तसं झालं नव्हतं त्यामुळे रुखरुख लागून राहिली.

पांगबोचे नजरेच्या टप्प्यात

पांगबोचेला बरीच ट्रेकर्स मंडळी पुढे मागे होती. तिथून पुढे निघाल्यावर दूरवर एक गाव दिसत होतं. डेंडीसरांनी तिथे जेवायला थांबू असं सुचवलं कारण डिंगबोचेला पोचायला २ वाजून गेले असते. त्यामुळे मग 'स्यमोरे' नावाच्या गावात जेवायला थांबलोच. गेल्या ५ दिवसातलं पहिलं चवदार जेवण जेवलो. उकडलेले बटाटे आणि फ्राईड राईस. Happy

जसं जसं वर चढत होतो तशी झाडं गायब होत होती. स्यमोरे ते डिंगबोचे च्या वाटेवर फक्त खुरटी झुडपंच होती. फारच कंटाळवाणा रस्ता वाटला. मगाशी पुढे-मागे असणारी ट्रेकर मंडळी केव्हाच पुढे निघून गेली होती. डिंगबोचेच्या वाटेवर एक 'लाओस' हून आलेली मुलगी दिसली. एकटीच होती, कदाचित पोर्टर पुढे-मागे असावा कुठेतरी. पण त्यादिवशी पार गोरक शेपहून उतरत आली होती व पांगबोचेला मुक्काम करणार होती. गोरक शेप ते पांगबोचे हे अंतर तसं बरंच. म्हणजे गोरक शेप-लोबुचे-थुकला-डिंगबोचे ही गावं पार करून ती पांगबोचेला जात होती. आम्हांलाही असंच यायचं होतं आणि मुख्य म्हणजे ती ट्रेक करून परत चालली होती म्हणून तिचं कौतुक वाटलं. दुपारी ३.३० च्या आसपास एकदाचं डिंगबोचे दिसायला लागलं. तेंगबोचेपेक्षा आकाराने मोठं वाटलं. आणि मगाशी कंटाळवाणा वाटणार्‍या रस्त्यांवरुन चालत इथपर्यंत पोचल्याबद्दल बक्षिस म्हणुन पुन्हा एकदा अमा दबलम आणि ल्होत्से च्या जोडीला आयलंड पीक, नुप्त्से, थामसेरकु, कान्गतेन्गा, चोलात्से, मकालू (पाचव्या क्रमांकाचं शिखर) ह्यांनी सुरेख दर्शन दिलं. डिंगबोचेला आमचा उद्या दुसरा व शेवटचा रेस्ट डे असणार होता. अर्थात सकाळी अ‍ॅक्लमटायझेशन वॉक होताच. उद्या आरामाचा दिवस म्हणून रिलॅक्स वाटत होतं. रात्री जेवायच्या आधी मस्त अंताक्षरी खेळलो. बाहेर निळ्याशार आकाशात सगळी शिखरं चंद्रप्रकाशात मस्त न्हाऊन निघालेली दिसत होती. आत्तापर्यंतचे सगळे ट्रेक्स हे उत्तरांचलमध्ये केले असल्याने ही अशी शिखरं काही पहिल्यांदाच बघत नव्हते पण इथे आजूबाजूला असणारी सगळी शिखरं नावाजलेली होती त्यामुळे फारच भारी वाटलं. आता हे असंच हवामान अगदी शेवटपर्यंत म्हणजे निदान काला पत्थरला पोचेपर्यंत तरी राहू देत म्हणजे ज्यासाठी आलो होतो त्या एव्हरेस्ट्चं दर्शन नीट होईल अशी मनातल्या मनात प्रार्थना केली. ट्रेकमध्ये पहिल्यांदाच फेदर जॅकेट घालावं लागलं इथे आल्यावर.

दिवस ६ वा:- डिंगबोचे

अ‍ॅक्लमटायझेशनसाठी डिंगबोचेच्या मागच्या बाजुलाच एका टेकडीवर जाऊन समीट करायचं असं आधी ठरलं होतं. पण मग नंतर नुसतंच तासभर जाऊन परत यायचं ठरलं. टेकडीच्या पलिकडून आमचा उद्याचा 'थुकला' ला जायचा रस्ता दिसत होता. बरीच जणं अ‍ॅक्लमटायझेशन वॉकसाठी आले होते. आमच्यातले तीन जण अजून वर जाऊन चढून आले. आता बाकीचा दिवस अगदीच मोकळा होता. उद्या उंची गाठणार असलो तरी वॉक मॉडरेट व फक्त ३ तासांचा होता. देबोचे सोडल्यापासून फोनचं नेटवर्क गेलं होतं. गोरक शेपला दोन-तीन मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स आहेत त्यामुळे तिथे व्यवस्थित नेटवर्क मिळतं असं डेंडीसरांकडून कळलं. इथे सॅटेलाईट फोन दिसत होता, ज्याचे दर फारच महाग होते. इंटरनेटचे दरही असेच असायचे.

डिंगबोचेहून आजूबाजूची शिखरं :- मा. अमा दबलम

मा. ल्होत्से

टेकडीवरून डिंगबोचे गाव

आम्ही ट्रेकमध्ये पहिल्यांदाच दुपारी जेवणानंतर ताणून द्यायचा प्लॅन केला. २-२.३० तास झक्कास झोप झाल्यावर अजूनच फ्रेश वाटायला लागलं. आमच्यातले दोघं तिघं कॅरम खेळायला गेले होते. ते परत आल्यावर आम्ही पण डायनिंग रूममध्येच पत्त्यांचा डाव मांडला. आमच्या टी-हाऊसजवळच फ्रेंच कॅफेचा बोर्ड अपर्णाच्या चहा/कॉफीबाज नजरेने हेरला होता. त्यामुळे तिथे जाऊन कॉफी पिऊन येणं प्राप्त होतं. मग तिथेच कॉफी पित पित पत्ते कुटायचा प्लॅन सर्वानुमते ठरला व आम्ही मोर्चा फ्रेंच कॅफेकडे वळवला. कॉफी व पेस्ट्रीज ऑर्डर केल्या व पत्त्यांचा डाव मांडला. कॅफेत आमच्याशिवाय कोणीच नव्हतं त्यामुळे त्या मालकिणीलाही प्रॉब्लेम नव्हता. काहींच्या कॉफीच्या दोन राऊंड्स झाल्यावर व अंधार पडत आल्यावर आम्ही आमच्या टी-हाऊसवर परतलो.

आज आमच्या टी-हाऊसमध्ये ट्रेकर्सची बरीच गर्दी झाली होती. त्यामुळे जेवणानंतर डायनिंग रूममध्ये न रेंगाळता रूमवर परतून उद्याची तयारी केली. फेदर जॅकेट सॅकमध्येच ठेवा अशी सूचना ट्रेक लीडरने केली होती. 'थुकला' ची उंची खरंतर खूप नव्हती पण थंडी जास्त असण्याची शक्यता होती.

डेंडीसरांच्या बहिणीची तब्येत बिघडली असल्याचं त्यांना कळलं. त्यामुळे त्यांना डिंगबोचेहून तिच्या गावाला जावं लागणार होतं. तिथूनच ते आम्हांला 'लोबुचे' ला भेटणार होते. उद्या अगदी पहाटेच ते निघणार होते. त्यामुळे उद्यापासून आमचा दुसरा गाईड 'आन्ग गुम्बु' वरच सगळी जबाबदारी होती.

दिवस ७ वा:- डिंगबोचे ते थुकला/तुगला/तुकला (१४,२७१ फूट)

डिंगबोचेच्या खालच्याच बाजूला 'फेरिचे' गाव आहे. डिंगबोचे डोंगरावर तर फेरिचे खाली होतं. थोडं चालून गेल्यावर गाव दिसायला लागलंच. या गावात हॉस्पिटल तसंच हेलिपॅड आहे. त्यामुळे थुकलाला जाताना रेस्क्यूचं हेलिकॉप्टर सारखंच नजरेला पडत होतं.

डिंगबोचेकडून थुकलाकडे जाताना खाली दिसणारं 'फेरिचे'

आज तसा बर्‍यापैकी रमत गमत ट्रेक होता. फार उंची गाठायची नव्हती व फक्त ३ च तास असं डेंडीसरही म्हणाले होते. आता डिंगबोचे सोडल्यावर तर आमच्या चोहोबाजुंना हिमाच्छादित शिखरांनी गर्दीच केली होती. हवामानही स्वच्छ असल्याने निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती भन्नाट दिसत होती. आणि आज चालही फार नसल्याने आम्ही त्या आजूबाजूच्या दृश्यांचा आनंद घेत चाललो होतो. ऊन कडकडीत असलं तरी हवेत गारवा होता. जेवणाच्या वेळेपर्यंत 'थुकला' आलंच. मोजून २-३ टी-हाऊसेस होती इथे. रूममध्ये सामान ठेवलं व डायनिंग रूममध्ये जेवायला आलो.

थुकलाकडे जाताना

थुकला

अल्टिट्यूडचा बाकी काहीच त्रास होत नव्हता, फक्त भूक असली तरी जेवायची इच्छा नसायची. तेच तेच पदार्थ बघूनही कंटाळा आला होता. त्यामुळे मी आणि अपर्णा अगदी ब्रेकफास्ट पासून रात्रीच्या जेवणापर्यंत दोघीत मिळून एकच पदार्थ ऑर्डर करायचो. कधी कधी तर ते ही जायचं नाही. नामचेला डेंडीसरांनी आम्हांला चव म्हणून लसूण व मिरची वाटलेला ठेचा काय दिला, त्यांना तो बाटलीत भरून त्यांच्या बरोबरच घ्यावा लागला. Proud प्रत्येक जेवणाच्या वेळेस ते तो आम्हांला काढून द्यायचे. आम्हीही तो कशातही घालून खायचो. काल निघायच्या गडबडीत तो ठेचा 'डिंगबोचे' लाच राहिला होता. इथल्या डायनिंग रूममध्ये आम्ही लाल मिरचीचा ठेचा बघितला म्हणून घेऊन बघितला तर तो कायच्या काय तिखटजाळ निघाला. Proud

अल्टिट्यूडचा त्रास होऊ नये म्हणून तसंही रुममध्ये जाऊन बसायला किंवा झोपायला मनाई होती त्यामुळे जेवण झाल्यावर आम्ही तिथेच पत्त्यांचा डाव मांडला. तिथे दोघं जण आले होते. कोणत्यातरी एक्सपिडीशनला जात असावेत असं वाटलं म्हणून चौकशी केली असता कळलं की ते ६५ दिवसांचा 'ग्रेट हिमालयन ट्रेल' करत होते. त्यातले २३ दिवस पूर्ण झाले होते व ४२ दिवस शिल्लक होते. नुसतं ऐकूनही भारी वाटलं आम्हांला.

दिवस जसा कलायला लागला तशी चांगलीच थंडी जाणवायला लागली. इथल्या डायनिंग रूममध्ये फायर प्लेस असायचीच. संध्याकाळी त्यात शेणाच्या गोवर्‍या वगैरे घालून ती पेटवली की मस्त उबदार वाटायचं. आम्हांला बर्‍याचदा डायनिंग रूममध्येच झोपायची इच्छा व्हायची. इथला पत्त्यांचा डाव पार रात्रीच्या जेवणाची वेळ होईपर्यंत सुरु राहिला. रात्री झोपल्यावर तर रजईच्या आत चादर लावून व फेदर जॅकेट असूनसुद्धा चांगलीच थंडी वाजत होती.

दिवस ८ वा:- थुकला ते लोबुचे (१६,१७४ फूट) ते गोरक शेप (१६,९२९ फूट)

आज २००० फूटांची उंची गाठायची होती परंतू चाल तीन तासांचीच होती. चढणही फार नव्हती असं गुम्बुने सांगितलं होतं. काल सॅकमध्ये ठेवलेलं फेदर जॅकेट आज परत डफेल बॅगमध्ये टाकलं व अंगावरचे कपड्यांचे लेअर्स तेवढे वाढवले. काल चढताना सॅकमध्ये असलेल्या त्या जॅकेटचं वजनही सहन होत नव्हतं. आमच्या प्रोग्रॅमप्रमाणे आम्ही आज 'लोबुचे' ला मुक्काम करणार होतो. पण सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस ट्रेक लीडरने सगळ्यांना जमत असेल, अल्टिट्यूडचा त्रास वगैरे नाही झाला तर आपण आज लोबुचेला मुक्काम न करता दुपारच्या जेवणानंतर 'गोरक शेप' करिता निघू असं सुचवलं. थुकला सोडल्यावर एक टेकडी ओलांडेपर्यंत चढच होता. टेकडी ओलांडल्यावर एव्हरेस्ट मोहिमेत मृत्यूमुखी पडलेल्यांची आठवण म्हणून बांधलेली स्मारकं नजरेस पडली. काही नुसतीच दगड रचून केलेली तर काही पक्की बांधलेली. त्यात बाबू चिरी शेर्पा व स्कॉट फिशरचंही एक होतं. बाबु चिरी शेर्पाच्या नावावर दोन विश्वविक्रम आहेत. एक म्हणजे एव्हरेस्टच्या माथ्यावर तो २१ तास ऑक्सिजनचा बाह्यपुरवठा न घेता राहिला व जलद एव्हरेस्ट चढणे.

थुकला मागे पडलं

लोबुचेच्या वाटेवरील स्मारकं

हे स्मारक 'बाबू चिरी शेर्पा' चं

लोबुचेला जाताना

लोबुचे गाव

थुकला सोडल्यापासून आता पांढर्‍या दगड धोंड्यांतूनच सगळी वाट दिसत होती. डाव्या बाजुला 'लोबुचे' शिखर दिसायला लागलं. शिखरावर चढाई करणारी माणसंही दिसायला लागली. १२ वाजेपर्यंत लोबुचेला पोचलो देखील. थुकलापेक्षा लोबुचे मोठं दिसत होतं. इथे पोचेपर्यंत तसा काही थकवा जाणवत नव्हता त्यामुळे जेवल्यावर लगेचच आमच्या ट्रेकचा शेवटचा टप्पा 'गोरक शेप' ला जायचं ठरल.

लोबुचे सोडल्यावर बराच वेळ सपाटीच होती. नंतर मात्र एका चढानंतर परत जी दगड धोंड्यांची वाट सुरु झाली ती अगदी शेवटपर्यंत. लोबुचे ते गोरक शेप साधारण ३ तास लागतील असा अंदाज होता. पण गोरक शेप काही येत नव्हतं. जाताना उजव्या बाजुला खुंबू ग्लेशिअरचा भाग दिसत होता. नुप्त्से शिखरही दिसत होतं. इथे मात्र उंचीमुळे डोकं दुखायला लागलं होतं. शेवटी ४.३० तासांच्या चालीनंतर गोरक शेप दृष्टीस पडलं. बाजुलाच 'काला पत्थर' ही टेकडीही दिसत होती. खरोखरच काळसर रंगाच्या मातीची टेकडी होती.

गोरक शेपच्या वाटेवर

मा. पुमोरी समोरच (त्याच्या खालीच मातकट रंगाची टेकडी दिसतेय तीच काला पत्थर)

संपूर्ण मोरेनचा रस्ता. उजवीकडे खुंबू ग्लेशिअरचा भाग.

मा.नुप्त्से

पोचलो एकदाचे. 'गोरक शेप'

गोरक शेपला पुण्याच्या "गिरीप्रेमीं" नी २०१२ साली स्थापन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. पण आम्ही ज्या बाजूने उतरलो त्याच्या दुसर्‍या बाजूला तो आहे हे नंतर कळलं. शिवाजी महाराजांचा हा सर्वाधिक उंचीवर असलेला पुतळा आहे असं म्हटलं जातं.

गोरक शेपला पोचल्यावर थोडं गरम पाणी पिऊन अर्धी डायमॉक्स व एक कॉम्बिफ्लाम घेतली व रूममध्ये जाऊन १०-१५ मिनीटं पडून राहिले. नंतर एकदम ओके वाटायला लागलं. इथल्या हॉटेलमध्ये लोकांची बर्‍यापैकी गर्दी दिसत होती. इथे तसंही आता संध्याकाळभर काहीच उद्योग नव्हता. उद्या सकाळी ५ वाजता काला पत्थरला जायचं ठरवलं होतं त्यामुळे पहाटे ४ वाजता उठायचं होतं. म्हणून मग रात्री ९ च्या आधीच आडवे झालो. थुकलाला जायला निघण्यापूर्वी काला पत्थरहून सुर्योदयच्या वेळेस माऊंट एव्हरेस्टचं दर्शन घ्यायचं होतं.

क्रमश :

पुढच्या भागासाठी इथे वाचा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलाच फोटो कातिल!!!! Happy बाकीचे सगळेच अप्रतिम.
सध्या मन भरून फोटो पाहुन घेतले. वृत्तांत सावकाश वाचेन.
दुसरा भाग लवकर प्रदर्शित केल्याबद्दल धन्यवाद. Happy

कसलं मस्तं लिहिलंय! हॅट्स ऑफ आडो! जबरी यात्रा आहे.

फोटो एकापेक्षा एक देखणे आहेत. मा. अमा दबलम आणि नंतरच्या काही फोटोंत करड्या टेकड्यांमागची निळी-पांढरी शिखरं कसला ड्रमॅटिक इफेक्ट देताहेत!

फोटोत ती स्मारकं पाहिल्यावर लोक जिवावर उदार होऊन या ट्रेकचं वेड जपतात हे जाणवलं.

तुम्हां सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद Happy

या ट्रेकचं वेड तर आहेच पण मा. एव्हरेस्टचं वेड जास्त.

मस्त फोटो आणि वर्णन. फोटो बघूनच थकायला झालं मला Happy
ती सतत दूरवर बॅ़कग्राउंड ला दिसणारी मातब्बर शिखरं खरंच आउट ऑफ धिस वर्ल्ड वाटतायत !!

मस्त !

>> ती सतत दूरवर बॅ़कग्राउंड ला दिसणारी मातब्बर शिखरं खरंच आउट ऑफ धिस वर्ल्ड वाटतायत !!

+१

हिमालयातली शिखरं बघून फारच मस्त वाटतं .. एकदम स्फुरण वगैरे चढतं .. Wink

Pages