स्वरार्थरमणी रागरससिद्धांत - गानसरस्वती किशोरी आमोणकर

Submitted by चिनूक्स on 27 April, 2009 - 14:19

'संगीताने धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची प्राप्ती होते, म्हणजेच चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते,' असं भरतमुनींनी सांगितलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा जन्मच मुळी स्वरांतील सौंदर्य व्यक्त करण्यासाठी झाला आहे. चारही पुरुषार्थांची प्राप्ती करण्याच्या या मार्गावर संगीतातील रससिद्धांत जाणून घेणं अतिशय गरजेचं ठरतं. आत्मरंजनासाठी आणि आत्मशोधासाठी असलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतातील सौंदर्य गानसरस्वाती किशोरी आमोणकर यांनी उलगडून दाखवलं आहे.

शब्दभाषा, स्वरभाषा, स्वरशक्ती, अलंकार, रागनाट्य, रागरसोत्पत्ती अशा विविध विषयांचा मागोवा घेत किशोरीताई भारतीय शास्त्रीय संगीतातील गूढ उलगडून दाखवतात. या अजोड ग्रंथातील हा निवडक भाग -

------------------------------------------------------------------------------------


swarartharamani.jpgभूमिका

तसे पहायला गेले तर संगीताच्या विषयात मी 'गर्भश्रीमंत'च आहे, असे मी म्हणेन. माईच्या गर्भात असताना माई अल्लादिया खाँसाहेबांकडे जे जे शिकत होती, त्याचे संस्कार होत होतच मी वाढत होते. त्यामुळे माझे संगीताचे शिक्षण मी गर्भात असतानाच सुरू झाले. गर्भस्थ अवस्था ही अहंकारशून्य अवस्था असते. अहंकारशून्य अवस्थेमध्ये 'ज्ञान' हे जसे आहे तसे प्राप्त होत असते. या अहंकारशून्य ज्ञानाच्या भरभक्कम पायावरच जन्मल्यानंतरच्या माझ्या शिक्षणात कृतिस्वरूप अशी वाढ होत होती. बालमनावर जेव्हा संस्कार घडतात, तेव्हा ते नि:शंकपणे घडत असतात. त्या ज्ञानाबद्दल प्रश्न विचारण्याचा किंवा शंका घेण्याचा विचारही बालकाच्या मनात येत नाही. सुरुवाती सुरुवातीला माईने माझ्या कंठावर स्वरांचे संस्कार केले. हे संस्कार करतना अस्थाई-अंतरे, वेगवेगळ्या तालांचे ज्ञान, घराण्यांची वैशिष्ट्ये यांचा मागमूसही तिथे नव्हता. त्यामुळे निखळ स्वरांचे म्हणून एक क्षेत्र असते आणि कंठाला त्या स्वरांनी संस्कारित करायचे असते, एवढे माझ्या नकळत मी शिकले. जसजशी मी मोठे होत गेले, तसतसे माझे संगीताचे शिक्षणही विस्तारत गेले. आधी सप्तकातले स्वर शिकले, त्यांचे एकमेकांशी असलेले नाते वेगवेगळ्या अलंकारांतून शिकले. नंतर कंठ जसाजसा सांगीतिकरीत्या संस्कारबद्ध होत गेला, तसतसे हळूहळू सोपे सोपे राग, सोपे अस्थाई-अंतरे शिकले. म्हणजेच ज्याला आपण शास्त्रीय संगीत म्हणतो, त्याच्या कायदेशीर शिक्षणाचा लाभ मला घडत गेला. त्यानंतर ओडव, षाडव, संपूर्ण आणि संकिर्ण रागांच्या शिक्षणातून हे क्षेत्र विस्तारत गेले. त्यातूनच माईच्या गायकीचे संस्कारही माझ्यावर होत होते. माईच्या गायकीतून जयपूर घराण्याची शिस्त, कायदे, स्वराचे शुद्ध कंठयुक्त स्वरूप म्हणजे 'आकारयुक्त' गाणे, तालासुरांचे एकमेकांशी असणारे संगनमत, बंदिशीची वैशिष्ट्यपूर्ण शिस्तबद्ध मांडणी यांचेही ज्ञान मला होत होते. स्वरभाषा ही गतीशी संबंध ठेवणारी असल्याने विलंबित लयीपासून ते अतिद्रुत अशा लयीच्या अनुसंधानाशी असणार्‍या प्रगल्भतेचेही संस्कार माझ्यावर घडले. एखाद्या भाषेवर आपले प्रभुत्व असेल, तर त्या भाषेद्वारे सहजगत्या आपल्याला संवाद साधता येतो. असा सहजसंवाद कुठल्याही रागामधून मी साधू शकत होते. म्हणजेच व्यापक अशा स्वराकाशामध्ये सहजगत्या संचार करण्याचेही सामर्थ्य मला प्राप्त झाले. हे सामर्थ्य या गुरूंमुळेच माझ्या कंठाला लाभले. कुठल्याही क्षेत्रामध्ये नावीन्य अनुभवण्याचे सामर्थ्य आपल्याला गुरूच देत असतो. अशा पद्धतीने जयपूर घराण्याची शिस्तबद्ध तालीम घेत असताना घराण्याच्या पलीकडची व्यापकता पाहण्याचे सामर्थ्य या साधनेतूनच मला प्राप्त झाले. हे ज्ञान जसजसे वाढत गेले, तसतसे वेगवेगळ्या घराण्यांतील वेगवेगळी सांगीतिक वैशिष्ट्ये, त्यांची संकुचित अवस्था नाहीशी होऊन त्या विषयाचे म्हणजेच स्वरभाषेचे व्यापक असे दर्शन मला होत होते. मानवाच्या अनेक जाती असल्या तरी मानवधर्म किंवा मानवता ही जशी महत्त्वाची असते; तसेच घराणी कितीही असली, तरी स्वरभाषा ही महत्त्वाची असते. ती वैश्विक आहे, ती घराण्यांमध्ये बंदिस्त असू शकत नाही. अशा ज्ञानाच्या भूमिकेतून या स्वरभाषेचा अभ्यास करताना माझ्या मनात काही शंका उपस्थित झाल्या. ही स्वरभाषा कशासाठी जन्माला आली? या भाषेच्या सम्यक ज्ञानातून मला कुठे जायचे आहे? ही स्वरभाषा अधिकाधिक व्यापक कशी करता येईल? दुसर्‍या कुठल्याही परक्या माध्यमाची मदत न घेता होऊ शकणारा स्वरसंवाद हा देह, मन, बुद्धी, चित्त आणि आत्मा या सर्वांशी कसा संवाद करतो? आत्मा हा सर्वत्र एकच असल्याने आत्म्याशी संवाद साधणारा कोणताही संवाद हा सर्वांशीच संवाद साधू शकतो. म्हणूनच स्वरभाषेतून आत्मिक असा स्वरसंवाद साधण्यासाठी मी अविरत चिंतन केले. या साधनेतून एक गोष्ट माझ्या प्रत्ययाला आली. ती अशी की, स्वर हे शब्द तालावर यत्किंचितही अवलंबून नाहीत! अशा पद्धतीने चिरंतन अशा स्वरभाषेची मानवी दृष्टीकोनातून होणारी कलात्मक स्वरसृष्टी हा लौकिकातून अलौकिकाकडे जाणारा कलात्मक मार्ग माझ्या दृष्टीपथात येऊ लागला आणि या तत्त्वाने साधना करता करता कुठल्याही रागातील स्वरविश्व हे व्यापक झाले पाहिजे, हे माझ्या लक्षात आले. जसा राग असेल तशी त्याची अभिव्यक्ती व्हावी आणि तीही निखळ स्वरातूनच व्हावी - अशी एक शिस्त मी स्वतःला घालून घेतली. यातूनच मला जे काही सांगायचे आहे, ते स्वरांच्या सुपूर्त करताना इतर बर्‍याचशा तत्त्वांची जाणीव झाली. रागातील स्वरांनाही त्यांचे स्वतःचे असे काही 'सांगायचे' असते. ते काय सांगतात, त्यांचे शुद्ध मनाने निरीक्षण करता करता तो राग किंवा कुठलेही सांगीतिक अस्तित्व हे त्याचे स्वतःचे चैतन्य घेऊनच जन्माला आलेले असते. इथे 'मी' महत्त्वाची नसून तो 'राग' महत्त्वाचा आहे, तो व्यापक आहे, तो वैश्विक आहे आणि तो चिरंतनही आहे, एवढे मला समजले. स्वतःची अस्मिता, स्वतःचा अहंकार म्हणजेच दैहिक अस्तित्व यांचा विसर पडल्याखेरीज या अमूर्त, निरहंकार विश्वाचे दर्शन घडणे शक्य नाही. म्हणून त्या दृष्टीने पुढची वाटचाल करण्याखेरीज मला दुसरा पर्याय नव्हता आणि नाही. हे अंतःप्रेरणेतून होणारे ज्ञान आहे. या देहाचे महत्त्व असे की, जोपर्यंत देह अस्तित्वात आहे, तोपर्यंतच मी हे करू शकेन. म्हणूनच एक गृहिणी असल्याने संसारातील कार्य व्यवस्थित पार पाडण्याइतका वेळ दिल्यानंतर इतर कुठेही वेळेचा अपव्यय होऊ नये, यासाठी मी अत्यंत दक्ष राहिले. सारखे कार्यक्रम (रागनाट्य) करत राहणे, जरूरीपेक्षा अधिक प्रवास करणे हे मी शक्यतो टाळले. रागनाट्य हे सुंदर असतेच; परंतु रागसत्य जे 'सत्यं शिवं सुंदरा'चे स्वरूप आहे, त्या स्वरुपावर माझे मन जडले, तर त्यात नवल नाही.

निखळ स्वरविश्व हे शब्दविश्व आणि काल (लय) विश्वाला सालंकृत, सार्थ करत असेल, तर ते प्रत्यक्षात किती सुंदर, किती अर्थवाही, किती रम्य असेल, हा विचार काही केल्या मनातून जाईना! याचा खराखुरा अनुभव घेण्यासाठी मला त्या सम्यक स्वरविश्वाच्या अस्तित्वाचा सूक्ष्म अभ्यास करावा लागला. या सूक्ष्म अभ्यासातून स्वरांचा अर्थ, श्रुतींचा अर्थ, भावघटनेचा अर्थ सांगीतिक कसा होऊ शकतो, रागस्वरुपात कसा प्रकट होतो आणि तो किती मनोरम आहे, किती रम्य आहे याची जेव्हा मला जाणीव झाली, तेव्हा त्या अथांग अशा मनोरम विश्वात आयुष्याची मी किती वाटचाल केली, हे मला कळलेही नाही!

संगीतक्षेत्रातील सर्व प्रकार मी ऐकले आणि गाण्याचा प्रयत्नही केला. या सर्व प्रकारांमध्ये म्हणजे सुगम संगीतापासून ते शास्त्रीय संगीतापर्यंत असलेल्या सर्व प्रकारांमध्ये शास्त्रीय संगीत हे फारसे लोकप्रिय नाही, असे माझ्या लक्षात आले. स्वर हा अतिशय मंजुळ आणि कानाला गोड वाटणारा असूनही तो लोकांना का भावत नाही? भावणे हा मनाचा धर्म आहे. शास्त्रीय संगीतात 'शास्त्र' जरूर आहे, पण कलेचे आदितत्त्व असलेला 'भाव' मात्र जवळ जवळ नसल्याइतकाच अगदी अल्प असल्याने त्यातून श्रोत्यांना आनंद मिळत नाही, श्रोते त्याच्यात समरस होऊ शकत नाहीत, असे माझ्या प्रकर्षाने लक्षात आले. शास्त्रीय संगीतातील 'राग' या संकल्पनेला भावनेचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. 'स्वर' हा स्वयंप्रकाशित असून स्वरंजित असे त्याचे अस्तित्व असल्याने स्वराला किंवा स्वरअस्तित्वाला स्वतंत्र भावगर्भता असलीच पाहिजे हे निश्चित! शास्त्रीय संगीतातील प्रत्येक राग हा एक भाव असतो. तो भाव प्रकट करणे म्हणजे राग प्रकट करणे असा याचा अर्थ होतो. प्रकट होणार्‍या प्रत्येक स्वरअस्तित्वातून किंवा स्वरक्रियेतून त्या भावाची अभिव्यक्ती होणे आवश्यक असते. ती सार्थ आणि सौंदर्यपूर्ण होण्यामागची 'शिस्त' हा भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया आहे, याची जाणीव मला झाल्यामुळे 'राग' या अस्तित्वाकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलली.

अशा पद्धतीने संगीताची साधना चालू होती. त्याचबरोबर कॉलेजचे शिक्षणही चालू होते. कोणताही राग सादर करण्याइतपत ज्ञान आणि कंठ दोन्हीही तयार झाले होते. जशी ज्ञानपूर्तीसाठी अविरत साधना करावी लागते, तशीच सदैव तत्पर, योग्य रीतीने कार्यशील राहण्यासाठी आणि सांगीतिक होण्यासाठी कंठाचीही साधना तितक्याच प्रकर्षाने करावी लागते. या आणि अशा साधनामार्गावर येणार्‍या प्रत्येक अनुभवाचे मला अप्रूप होते.

मातृहृदय हे किती विशाल असते, याची मी प्रत्यक्ष अनुभूती घेतली आहे. आपली कन्या आपल्यापेक्षा अधिक ज्ञानवंत व्हावी, या तळमळीतून सुगम संगीताचे ज्ञान देण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील नामवंत गुरूंकडे शिकण्याची तिने मला संधी दिली. त्यावेळी मी फक्त शास्त्रीय संगीतच शिकत होते. प्रकर्षाने 'आकारयुक्त' स्वरांचे विलंबित ते द्रुतापर्यंतचे अलंकारच शिकत असल्याने इथे हरकती, मुर्क्या किंवा शब्दांचा वापर करण्याचे प्रयोजनच नव्हते. त्यामुळे आवाजही त्या दृष्टीनेच चालायचा. एके दिवशी माझे सुगम संगीताचे गुरू आईला म्हणाले, "माई, तुझ्या मुलीचा आवाज म्हणजे शुद्ध दगड आहे दगड! तो हलता हलत नाही." हे शब्द जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा तारुण्यावस्थेतला माझा अहंकार दुखावला गेला. परंतु ईश्वरीकृपा अशी की, त्या अहंकारातून अधिक खोलवर अशा ज्ञानाशी संपर्क मी साधू शकले. मी निश्चय केला, यापुढे संगीतातील (स्वरभाषेतील) एकही अस्तित्व असे असता कामा नये, जे माझ्या कंठातून येणार नाही. भावगीत, नाट्यसंगीत, चित्रपटसंगीत, गझल, भजन, अभंग जसेच्या तसे मला गाता आले पाहिजेत - असा मी पणच केला! म्हणून आज कोणताही भावानुकूल अलंकार गाणे मला सोपे जाते. खरे म्हणजे आधी शास्त्रीय संगीत शिकून मग लघुसंगीताकडे वळणे यापेक्षा लघुसंगीतातील म्हणजे सुगम संगीतातील छोट्या छोट्या अलंकारांची साधना करून करूनच निखळ स्वरांचे व्यापक दैवी विश्व अनुभवण्याचे सामर्थ्य कलाकारात येत असते. म्हणूनच असे वाटते की, ज्याचे निखळ स्वरांच्या संगीतावर, स्वर्गीय संगीतावर प्रेम बसले, तो भौतिक संगीताच्या क्षेत्रात पाऊल टाकीलच कशाला? शुद्ध निखळ स्वरांचे सौंदर्यव्यापी विश्व अनुभवल्यानंतर शब्द किंवा मात्रा यांचा अधिक वापर असलेले संगीत हे शेवटी लौकिक, भौतिक पातळीवरचेच असते, हे मला मान्य करवेच लागले. याच विचारातून माझी संगीताची साधना चालू होती.

अनेक लोकांकडे माईने मला शिकायला पाठविले. म्हणूनच पैगंबरवासी मरहूम अन्वर हुसेन खाँसाहेब यांच्याकडून ज्ञान प्राप्त करण्याचे भाग्य मला लाभले. खाँसाहेब खरं म्हणजे आग्रा घराण्याचे होते. परंतु स्वरांचा सखोल विचार आणि त्यानुसार तालाचा वापर करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या चरणी बसून मी 'बहादुरी तोडी' शिकले. दोन महिन्यांनंतर खाँसाहेब म्हणाले, "बेटा, दो महिनोंसे मैं तुम्हें बहादुरी सिखा रहा हूं. और कुछ सीखने की तुम्हारी इल्तजा नहीं है क्या?" मी खाँसाहेबांना म्हणाले, "तुमच्या गळ्यातील बहादुरीच्या रिषभ-गंधाराच्या चलनामुळे, पद्धतीमुळे अनेक वेळी माझ्या डोळ्यांत पाणी येते. ते आणि तसेच चलन माझ्याही गळ्यात यावे, असे मला वाटते. तोपर्यंत आपण मला बहादुरीच शिकवाल का?" तेव्हा खाँसाहेब म्हणाले, "लोकांनी माझा असा समज करून दिला होता की, मोगुबाईंच्या मुलीला तू शिकवतोयस, तेव्हा वेगवेगळे राग आणि अस्थाई-अंतरे शिकण्याची त्यांची अपेक्षा असल्यास तू नवल मानून घेऊ नकोस!" असो. माझी आई जितक्या मोठ्या मनाची, त्याहूनही अधिक मोठ्या मनाचे माझे गुरू खाँसाहेब! त्यांची मी सदैव ऋणी राहीन.

कैलासवासी श्री. मोहन पालेकर यांच्याकडेही मी त्यावेळी शिकत होते. जिवाचे कान करून ऐकणे किंवा शिकणे म्हणजे काय, हे मी तिथे शिकले. अस्थाई-अंतरा शिकताना जसे माई म्हणायची, तसेच तेही म्हणायचे, "नीट लक्ष देऊन ऐक, मनात दुसरे काही ठेऊ नको. अस्थाई किंवा अंतरा मी फक्त दोनदाच गाईन. तिसर्‍यांदा तो तसाच्या तसा तुला म्हणता आला पाहिजे." यातून एकचित्त होणे म्हणजे काय हे मी शिकले.

माईकडेही माझे शिक्षण चालूच होते. माईने मला प्रथमच जेव्हा 'हिंडोल' राग शिकवला; तेव्हा माझ्या लक्षात आले की, या रागाचे विशिष्ट असे चलन, पद्धत आहे. त्याच पद्धतीने मी सतत गात आहे. मी त्या विशिष्ट पद्धतीमागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. 'हिंडोल' या शब्दाचा अर्थ 'हिंदोळा'! हिंदोळा कसा असतो? तो किती वर जाऊ शकतो? त्या झुलणार्‍या हिंदोळ्याचे वरून तसेच जमिनीवरून दर्शन कसे असते? हिंदोळा थांबताना कसा थांबतो? या सर्व गोष्टींचे मी बारकाईने निरीक्षण केले आणि हिंडोल रागाच्या विशिष्ट चलनामागचा मला उलगडा झाला. या रागाचे चलन शिकत असताना ठरावीक अशी विशिष्ट चाल (चालणे) माईनी मला शिकवली आणि या चालीला विकृत करणारे कोणतेही अलंकार माईनी का वापरली नाहीत याचाही त्यावेळी मला शोध लागला. हिंदोळ्यावर बसल्यानंतर मनाची जशी प्रसन्न अवस्था होते, शरीराला जसा शीतलतेचा अनुभव येतो; तीच प्रसन्नता, तीच शीतलता हा राग गाताना स्वरांच्या विवक्षित अशा झुलण्यातून वाटते, याचे मला ज्ञान झाले. या सर्व ज्ञानातूनच 'हिंडोल' खर्‍या अर्थाने कसा गायचा, हे मला समजले. अशा पद्धतीनेच मी प्रत्येक रागाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, त्यामधला अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला.

असेच एकदा अतिशय प्रफुल्लित आणि प्रसन्न मनाने मी 'बागेश्री' रागाची साधना करायचे ठरवले. गाऊन झाल्यानंतर जेव्हा तंबोरा आडवा ठेवला, तेव्हा एका गोष्टीची मला जाणीव झाली. माझ्या मनाची अवस्था अतिशय उदास, खिन्न अशी झाली आहे. मी जेव्हा बागेश्री गायला बसले, तेव्हा माझे मन अतिशय उल्हसित होते, मग ते इतके उदास का बरे व्हावे? राग गाताना मला काही सुचत नव्हते, असे नाही. माझे सूर बागेश्रीचे लागत नव्हते, असेही नाही. आजोबाजूचे वातावरणही प्रसन्न होते. तरीही माझ्या मनाची अवस्था इतकी खिन्न आणि उदास का झाली? याचा जेव्हा मी विचार केला, तेव्हा मला जाणवले की, हा त्या रागाच्या वातावरणाचा माझ्या मनावर झालेला परिणाम आहे. अर्थात हा अनुभव रागाच्या भावाशी अंतर्यामी एकरूप झाल्याखेरीज म्हणजेच स्वतःला विसरल्याखेरीज येणे शक्य नाही. मग मी असा विचार केला की, बागेश्रीचा जर अशा तर्‍हेने मनावर परिणाम होत असेल्, तर इतर रागांच्या वातावरणाचा परिणामही मनावर होत असला पाहिजे. तेव्हा वेगवेगळ्या रागांमधून मनाच्या विविध अवस्था प्रतीत होत असल्या पाहिजेत. म्हणूनच 'मन' म्हणजे काय? ते कसे असते? ते कसे कार्य करते याचा अभ्यास करणे मला आवश्यक वाटले. या विषयाचा मागोवा घेता घेता शेवटी उचित अशा रागप्रकटीकरणाची आनंदस्वरूप अशी अवस्था होऊ शकते, याकडे माझे लक्ष केंद्रीत झाले.

या विषयाचे ज्ञान व्हावे म्हणून मी अनेक ग्रंथ व पुस्तके प्रामाणिकपणे वाचली. त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. ही सर्व पुस्तके, ग्रंथ साहित्यशास्त्र आणि नाट्यशास्त्राची असल्याने या कलात्मक अवस्थांचा मनावर होणारा परिणाम यासंबंधीचे ज्ञान मला प्राप्त झाले. पण त्याचा स्वरभाषेशी संबंध कसा जुळवावा, असा प्रश्न मला पडला. म्हणून 'हा रससिद्धांत संगीतातील काही पुस्तकांत उपलब्ध आहे का?' याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मात्र मी निराशच झाले. पूर्वीच्या ग्रंथांमध्ये तो असेलही, परंतु पूर्वीचे ग्रंथ हे संस्कृतात असल्याने आणि त्या भाषेशी माझी फारशी ओळख नसल्याने मी अनभिज्ञच राहिले. शेवटी साहित्यशास्त्रातील काही ग्रंथ, पुस्तके आणि नाट्यशास्त्र यांच्या आधारे मी स्वरभाषेतील रससिद्धांताचा अभ्यास केला. भरतमुनी, भामह, दण्डी, लोल्लट, क्षेमेन्द्र, उद्भट, वामन, आनंदवर्धन, राजशेखर, भट्टनायक, भट्टतोत, कुंतक, अभिनवगुप्त, भोज, मम्मट, विश्वनाथ, जगन्नाथ इत्यादींनी केलेल्या रससिद्धांताच्या विश्लेषणाचा मी शक्य तितका अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि 'रसो वै सः' असे जे या विद्वानांनी म्हटले आहे, त्याचा प्रत्यय माझ्या रागातूनही येत असलाच पाहिजे, असे मला निश्चितपणे वाटले. म्हणूनच रससिद्धांताची जी जी तत्त्वे साहित्यशास्त्रात आणि नाट्यशास्त्रात विद्वानांनी मांडली, त्यातील प्रत्येक तत्त्व हे स्वरभाषेतील रागसंकल्पनेशी किती एकरुपत्व साधू शकते, याचा सखोल अभ्यास करणे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. या अभ्यासातून मला एवढे समजले की, 'राग' हा मूलतः 'चैतन्यस्वरूप' असाच आहे. त्या मूळ चैतन्याची म्हणजेच आत्म्याची अनुभूती येणे हीच आत्मप्रचिती असते आणि शेवटी कलाकाराला अशा तर्‍हेने आलेली आत्मप्रचिती श्रोत्यांमध्ये संक्रमित करणे हे कलाकाराचे परमकर्तव्य आहे! स्वरभाषेची वाटचाल मी याच दृष्टीने करते आहे. स्वतःला विसरणे इतके सोपे नसते, याची क्षणोक्षणी प्रचिती येत असूनही त्या आनंदमार्गाचा मोह कोणत्याही खर्‍या कलासाधकाला आवरता येणार नाही हे निश्चित! माउलींनी स्पष्ट सांगितले आहे त्याचा मागोवा घेण्याचा मी प्रयत्न करत आहे.

'सुख सुखासि भेटो आले'

ही अवस्था माझ्या कलेतून मला प्राप्त व्हावी, जेणेकरून जगाला मी सुख देऊ शकेन , अशी आशा बाळगून मी कार्यरत आहे. जे काही ज्ञान मला या विद्वानांच्या आणि माझ्या गुरूंच्या कृपेने मिळाले, ते शब्दरुपाने मांडून ठेवावे, विशेषत्वाने संगीतातील अननुभवी विद्यार्थ्यांना त्यातून काही घेता येईल, अशी आशा करून हे ज्ञान शब्दरुपाने मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. या पुस्तकात जे कही आहे, ते गुरुकृपेने मिळाले असल्याने, 'बोलविता धनी वेगळाची' असे म्हणणेच योग्य ठरेल.

'स्वरार्थरमणी' हे पुस्तकाचे शीर्षक देण्यामागचा माझा हेतू असा की, स्वरभाषा ही भावार्थसौंदर्याची अभिव्यक्ती असते. कला हा शब्द तसेच स्वरभाषा हा शब्दही स्त्रीलिंगीच आहे. मनाच्या अनेकविध अवस्थांचे अनेकविध रंग ही स्वरभाषा अभिव्यक्त करत असते. ही कार्यप्रणाली हे स्त्रीच्या कार्यशक्तीचे स्वरूप आहे. कार्यशक्तीचे मूळ स्वरूप हे देवीस्वरूप आहे. हे देवीस्वरूप मूर्त अशा सौंदर्यशाली रमणीचे स्वरूप असते. भावघटनेला विभूषित करून जगासमोर मांडणारी ती कला आणि स्वतः कलाकार आणि श्रोत्यांना रममाण करणारी ती 'रमणी'. स्वरकलेचे मूर्त व अमूर्त स्वरूप हे 'स्वरार्थ सौंदर्या'ने नटलेले असल्याने या पुस्तकाचे शीर्षक 'स्वरार्थरमणी'! अर्थ म्हणजे भाव आणि रमणी म्हणजे सुंदर स्त्री.

कलेच्या अंतिम ध्येयामध्ये एकरूप होणारा हा मार्ग अतिशय दुरापास्त, अतिशय कठीण परंतु तरीही शक्य होणारा असा असल्याने आपले सप्रेम आशीर्वाद, आपल्या सदिच्छा माझ्या पाठी या मार्गक्रमणात असाव्यात, एवढीच आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना!

...

कलेचे सम्यक दर्शन

संगीत हे ज्ञानाधिष्ठीत असे अस्तित्व आहे. म्हणूनच संगीताला प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. संगीत हे एक शास्त्र असल्यामुळेच संगीत ही विद्याही आहे व ती कलाही आहे. संगीताचे मूलगामी ज्ञानस्वरूप एकदा निश्चित केल्यामुळे संगीताचे या स्वरमाध्यमातून कलात्मकदृष्ट्या सर्वांगीण ज्ञान करून घेणे आवश्यक आहे.

संगीतकला म्हणजेच स्वरभाषा ही एक ललितकला आहे. म्हणूनच सर्वप्रथम 'कला' म्हणजे काय आणि 'ललितकला' म्हणजे काय याचा परामर्श घ्यावा लागेल. कलेची व्याख्या करताना 'सरस्वतीकंठाभरण' आणि 'शृंगार प्रकाश' या साहित्यशास्त्रीय ग्रंथांचे कर्ते भाष्यकार भोजराज म्हणतात, " ईश्वराच्या कर्तृत्वशक्तीचा जो आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो, त्याला 'कला' असे म्हणतात." तसेच 'औचित्यविचारचर्चा' आणि 'कविकण्ठाभरण' या साहित्यशास्त्रीय ग्रंथांचे कर्ते भाष्यकार क्षेमेंद्र म्हणतात, "कलावंत एखाद्या वस्तूच्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचा जो आविष्कार करतो, त्याला 'कला' असे म्हणतात."

'कला' हा शब्द 'कल्' या धातूपासून झाला आहे. कल् म्हणजे रव वा शब्द. कल् म्हणजे मधुर, मंजुळ, सुखद, सुंदर, कोमल अशा तर्‍हेचे शब्द वा ध्वनी. थोडक्यात सांगायचे म्हणजे कला हे आनंद देणारे 'अस्तित्व' किंवा 'वस्तू'! आनंद ही मनाची एक अवस्था आहे. 'मनाच्या अनंत अवस्थांचा (भावविश्वाचा) होणारा परिणाम कौशल्यपूर्ण आणि सुंदर रीतीने माध्यमाच्या साहाय्याने व्यक्त स्वरुपाला आणणारी ती कला! कोणत्याही माध्यमातून होनारी भावनेची अभिव्यक्ती कौशल्यपूर्ण आणि सौंदर्यात्मक झाली, तरच ती कलेला पात्र ठरते. वास्तविक पाहता भावविश्व, सौंदर्य आणि आनंद यांच्या परिणामातून 'मन' म्हणजे काय याचे ज्ञान होत असते. मनावर होणारा परिणाम हा भावस्वरुप असतो. वेगवेगळ्या भाव-भावनांचा सुंदर रीतीने आविष्कार करणे हे माध्यमाचे कार्य असते. संगीत हे स्वरांचे माध्यम असल्याने हा भावाविष्कार ज्या स्वरांमधून होतो, त्याला त्या भावाची सांगीतिक अभिव्यक्ती म्हणून आपण ओळखतो. स्वरमाध्यमातेल या कलात्मक अभिव्यक्तेला 'राग' अशी संज्ञा आहे.

आता 'ललित' या शब्दाचा अर्थ काय याचाही विचार त्याच अनुषंगाने येतो. शुद्ध, सूक्ष्म, नाजूक, रेखीव, हळुवार, सुंदर, लावण्यमय असे जे जे आहे; ते ते सर्व 'ललित' या शब्दप्रयोगाने ओळखले जाते. ललितकलेतील या सर्व लक्षणांचा स्वरमाध्यमाशी कसा निकटचा संबंध आहे, ते पाहण्याचा येथे प्रयत्न आहे.
'कला' ही प्रत्यक्ष वा लौकिक जीवनातील अनेकविध अनुभूतींची अभिव्यक्ती असते. प्रत्येकाला जीवन सुखावह असावे असे वाटते. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीतून, घडामोडीतून वा घटनेतून सुखाचाच शोध घेत असतो. शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि आत्मा या शरीरासह असलेल्या सर्व अस्तित्वांवर सुखाचा परिणाम होत असतो. शरीराला नटवणे हाही सुखाचाच एक भाग आहे. म्हणूनच कलेतून येणार्‍या प्रत्येक अभिव्यक्तीलाही नटवण्याचा प्रयत्न होत असतो. नटवणे म्हणजे आहे त्याहून अधिक सुंदर करणे, आकर्षक करणे होय, अत्यंत सुंदर असलेल्या स्त्रीलासुद्धा नटावेसे वाटते. 'सौंदर्य' हा कलेचा आत्मा आहे, असे म्हटलेच आहे. म्हणूनच भावविश्वरुप अभिव्यक्तीला अधिकाधिक सुंदर करणे हे कलेचे आद्य कर्तव्य आहे.
स्वरमाध्यम हे गायन-वादनातून प्रकट होणारे माध्यम असल्याने ते 'स्वर' आणि 'लय' या दोन घटकांनी सिद्ध होते. म्हणून 'स्वर' आणि 'लय' या दोन्ही घटकांच्या ललित अंगांचा विचार होणे आवश्यक आहे. 'राग' हे भावाचे सांगीतिक असे व्यक्त स्वरूप आहे त्यामुळे रागातील भावाला अभिव्यक्त करणारे स्वराचे अस्तित्व आणि भावलयबद्धता ही भावगर्भ, श्रवणरम्य, सुमधुर, सुडौल, प्रमाणबद्ध, सहज, कर्णमधुर, गतिरम्य आणि सौंदर्यात्मक होते; तेव्हाच ते एक ललितकलेचे दिव्यदर्शन असते. किंबहुना अशा स्वरक्रीडेने अभिनीत झालेल्या भावाला 'रागकाव्यात्मक' अभिव्यक्ती असे म्हणणे अधिक योग्य होईल.

रागकाव्य

'अर्थ क्रियोपेतम् काव्यम्|' अशी नाट्याचार्य भरतमुनींनी नाट्याच्या संदर्भात काव्याची व्याख्या केली आहे. 'अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होणारा सौंदर्यपूर्ण भावार्थ हे 'काव्य' आहे.' म्हणूनच स्वरांनी अभिनीत केलेला सौंदर्यपूर्ण भावार्थ हेही काव्यच ठरते. काव्यप्रचितीसाठी माध्यम आणि त्यातून प्रवाहित होणारा सौंदर्यपूर्ण भावार्थ या दोन्हींचा विचार करता असे लक्षात येते की, माध्यम जरी प्रावाहिक नसले तरी अर्थ हा नेहमीच प्रावाहिक असतो. त्यामुळे तो माध्यमालाही प्रावाहिक स्वरूप देत असतो.

स्वरभाषा ही मुळातच प्रावाहिक अशी भाषा आहे. त्यातील प्रत्येक अस्तित्वच प्रावाहिक अशा स्वरुपाचे आहे. स्वराचा बिंदू आणि त्या बिंदूचे आसयुक्त क्षेत्र असे दोन्ही मिळूनच स्वर अस्तित्वात येत असतो. बिंदू जरी प्रावाहिक नसला, तरी त्याची आस प्रावाहिक असते. म्हणूनच हे माध्यम पूर्णतया प्रावाहिक, गुंजनात्मक, अनुरणनात्मक म्हणून गेय स्वरुपाचे आहे. स्वराचा स्वभाव हा मूलतः आल्हाददायक, मधुर, मंजुळ, सुकुमार असा असल्याने स्वरांच्या अभिनयातून जो प्रवाह वाहतो तो अधिक सुंदर, अधिक लालित्यपूर्ण असा होतो. हे सौंदर्य स्वरांच्या या वैशिष्ट्यपूर्ण स्वभावाने प्रकट होत असते. त्यामुळे अर्थाचे प्रावाहिकत्वही अधिक सुंदर, सुश्लिष्ट, निखळ आणि एकसंध होत जाते. स्वरांच्या सौंदर्यपूर्ण अभिनयातून त्या अभिनयामागचा हेतू म्हणजे भावार्थही त्याचबरोबर प्रवाहित होत असतो. अशा तर्‍हेचा सौंदर्यपूर्ण भावप्रवाह हा संगीतातील 'काव्य' या संज्ञेला पात्र ठरतो.

संगीत व इतर कलांमधील फरक हा स्वरांच्या वैशिष्ट्यामुळे स्पष्ट होतो. स्वराचा बिंदू, त्याची आस म्हणजे क्षेत्र, त्याची अनुरणनात्मकता म्हणजे झंकार, त्याचे माधुर्य, त्याची गतिशीलता ही स्वराची लक्षणे आहेत. स्वराची शक्ती अनेक प्रकारांनी प्रत्ययाला येत असते. स्वरमाध्यमातून अभिव्यक्त होणारा भाव हा भावार्थाचे सौंदर्य, लयबद्धतेचे सौंदर्य आणि स्वरसौंदर्य यांमधून व्यक्त होत असतो. अशा ललितलक्षणांनी सिद्ध झालेला भाव हा माध्यमातील सौंदर्यपूर्ण स्वराभिनयाने जेव्हा रागातून एकसंधपणे प्रवाहित होतो, तेव्हा तो 'कलात्मक' होतो आणि हेच त्या सांगीतिक भावाचे 'रागकाव्य' असते.

'गेयता' हे काव्याचे मूळ लक्षण, मूळ स्वरूप आहे. गेयता म्हणजे काव्य नव्हे; पण गेयता असल्याखेरीज काव्यप्रचिती येणे शक्य नाही, हेही तितकेच खरे! म्हणूनच 'काव्य' म्हणजे काय हे कळल्याशिवाय या स्वरमाध्यमातून 'काव्यप्रचिती' वा 'रसप्रचिती' येणार नाही. ज्याप्रमाणे नाट्यशास्त्रात आणि साहित्यशास्त्रात काव्याचा सूक्ष्म अभ्यास केला गेला आहे, तसाच तो स्वरमाध्यमातही तितक्याच सूक्ष्मतेने किंबहुना अधिक सूक्ष्मतेने आणि प्रामाणिकपणे होणे आवश्यक आहे.

गेयतेची दोन स्वरुपे आहेत. एक आंतरिक आणि दुसरे त्याचे बाह्य प्रकट स्वरूप. "माध्यमातील सौंदर्यपूर्ण भावार्थाचे प्रावाहिक व्यक्त स्वरूप म्हणजे अभिव्यक्तीतील 'गेयस्वरूप' असते. जिथे जिथे गेयता असते; तिथे तिथे ध्वनीचे अत्यंत आल्हाददायक, आसयुक्त, अनुरणनात्मक असे वातावरण असते. गेयतेचे प्रावाहिक स्वरूप हे अखंड, अतूट, आसयुक्त असेच असते. ही आस सौंदर्यपूर्ण भावार्थाची असते. शब्द, चित्र, शिल्प या माध्यमांमध्ये गेयता नसते, परंतु त्यातील सौंदर्ययुक्त भावार्थाचे एकसंध प्रावाहिक स्वरूप त्या माध्यमांना गेयता आणते. माध्यमातील साहित्य जरी आसयुक्त नसले तरी भावार्थ हा आसयुक्तच असतो, म्हणूनच तो प्रवाह आसयुक्त होतो. मूळ अमूर्त भावस्वरुपाला स्थित्यंतरे नसतात, म्हणूनच तो प्रावाहिक असतो. भावअस्तित्वाने मन जेव्हा व्यापून जाते, तेव्हा तो भाव उत्स्फूर्तपणे माध्यमातून व्यक्त व्हायला लागतो. पूर्णतया भावाने गर्भित झालेले मन, वेधलेले मन ही कलाकाराच्या मनाची व्यापक अवस्था असते. व्यापक दृष्टी असणे हे ज्ञानाचे स्वरूप आहे. ज्ञान हे आनंदस्वरूप असते, म्हणूनच अशा अभिव्यक्तीतून आनंदाची अनुभूती येत असते. किंबहुना अशा प्रकारची अभिव्यक्ती ही उत्स्फूर्तपणे स्वतःच व्यक्त होत असते. हीच कलेतून व्यक्त होणारी अत्युच्च पातळीवरची अभिव्यक्ती असते. आत्म्याची प्रचिती ही सत्याची प्रचिती असते. म्हणून सौंदर्यात्मक सत्य आणि सत्यात्मक सौंदर्य असे दोन्ही एकरूप होऊनच जेव्हा मनात निर्माण होतात, तेव्हा तो भाव 'प्रतीयमान' झाला असे म्हणतात; आणि हे प्रतीयमानत्व जेव्हा प्रत्यक्ष अभिव्यक्त होते, तेव्हा जे घडते त्याला 'काव्य' असे म्हणणे उचित ठरेल.

तत्त्वज्ञान किंवा शास्त्र हे प्रत्येक वेळी सह्य किंवा सुंदर असेलच असे नाही. समजायला अत्यंत कठीण असे तत्त्वज्ञानसुद्धा पद्यामध्ये लिहिले की, ते गेय स्वरुपाचे होते. तत्त्वज्ञानातील शब्दांच्या मथितार्थाची सातत्याने प्रवाहित होणारी सौंदर्ययुक्त शब्दरचना हे त्या तत्त्वदर्शनी साहित्याचे गेयस्वरूप आहे. या गेयतेमुळे तत्त्वज्ञान समजणे, ग्रहण करणे सहजसुलभ आणि आनंददायक होत असते. स्वरमाध्यम हे मूलतःच गेय आहे. गेयता हेच ज्या माध्यमाचे मूळ आहे, त्या माध्यमातील अभिव्यक्तीचे स्वरूपही उच्चतम असणार हे निश्चित. परंतु स्वरमाध्यम हे गेय आहे म्हणून ते काव्यात्मक आहे किंवा रसात्मक आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही. खरे म्हणजे स्वरांची सौंदर्यपूर्ण गेयता आणि भावार्थाचे प्रावाहिक गेयस्वरूप यातला फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.

स्वरमाध्यमातील कलात्मक संकल्पना म्हणजे 'राग' ही एका विशिष्ट भावाची सांगीतिक अभिव्यक्ती असते. या अभिव्यक्तीतून काव्याची, रसाची प्रचिती येणे यातच रागाभिव्यक्तीचे खरे यश असते. हे माध्यम सुंदर आहेच; परंतु त्यातून भावार्थाचे प्रावाहिकत्व अभिव्यक्त होत आहे की नाही ते पाहणे अत्यंत आवश्यक आहे. भाव निश्चित झाल्याखेरीज रागातील स्वराभिव्यक्ती निश्चित स्वरुपाची होणे अशक्य आहे. रागातील वादी, संवादी इत्यादी फक्त स्थूल तत्त्वांतून त्या रागाच्या भावाचे वातावरण निश्चित होणार नाही. वादी-संवादी ही भावाची निश्चितता नसून तत्त्वांची निश्चितता आहे याची जाणीव असली पाहिजे. त्यातून भावाची साधारण कल्पना येऊ शकते. भावाच्या निश्चिततेसाठी त्या रागाची अविरत साधना करणे आवश्यक आहे.

भावार्थाच्या अधिकाधिक समीप जाणे आणि त्या निश्चित अर्थप्रवाहाशी एकरूप होणे, हे साधनेचे श्रेय आहे. निश्चित अशा भावाभिव्यक्तीतूनच रसप्रचिती म्हणजेच भावाची सुंदर आणि व्यापक अनुभूती येऊ शकेल. न पेक्षा तो केवळ अनेक स्वरांचा आणि स्वरलीलेचा निर्हेतुक असा प्रवासच ठरेल. अशा प्रकटीकरणातून रसप्रचिती येत नसते, एवढे लक्षात ठेवल्यास त्या दृष्टीने अभ्यास करणे सोपे जाते. कलाकाराचे माध्यमावरील असलेले प्रभुत्व किंवा प्रावीण्य यापलीकडे अशा अभिव्यक्तीला दुसरा अर्थच राहणार नाही. यातून कलाकाराच्या वैयक्तिकतेचे किंवा त्याच्या अहंकाराचेच दर्शन होईल. इथे भावदर्शनाची अपेक्षापूर्ती होऊ शकणार नाही.

माध्यम सौंदर्ययुक्त असणे वा करणे हे माध्यमातील कार्य आहे आणि भावाचे पूर्ण, निष्कलंक, सुंदर व्यक्त स्वरूप हे भावसत्य आहे. माध्यम असो वा त्यातून व्यक्त होणारा भाव असो तो सौंदर्यपूर्णच हवा अशी कलेची असते. म्हणूनच सौंदर्य म्हणजे काय याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. सौंदर्य ही एक जाणीव आहे, अनुभूती आहे, ती एक मानसिक घटना आहे. या अनुभूतीचा शरीरांतर्गत तसेच बाह्य शरीरावरही हितकारक असा परिणाम होत असतो. सौंदर्यामुळे मनाची एक प्रकारची समधातता होत असते. ही समधाततेची मनाला होणारी जाणीव हीच सौंदर्याची जाणीव असते. मन साम्यावस्थेला येण्याने त्याचा शरीरावर, मनावर, बुद्धीवर, चित्तावर, अहंकारावर परिणाम होतो, म्हणूनच या सर्वांना एक समतोलपणा येतो. त्याचा परिणाम बाह्य शरीरावरही होऊन शरीर निरोगी आणि सुदृढ होण्यास साहाय्य होते. म्हणूनच सौंदर्य हे कलेचे प्राणभूत तत्त्व मानले गेले आहे. लौकिक जीवनातील सौंदर्याची प्रचिती आणि अलौकिक जीवनातील अस्तित्वाच्या सौंदर्याची प्रचिती यांचे सम्यक दर्शन करून देणे हे कलेचे अद्वितीय सामर्थ्य आहे. कलेच्या अभिव्यक्तीतील माध्यमयुक्त भावार्थसौंदर्य हे जसजसे व्यापक होत जाते तसतसे ते दृश्य स्वरुपातून अनुभूतीत, जडातून चेतनेत, स्थूलातून सूक्ष्मात, मूर्तातून अमूर्तात, म्हणजे लौकिक पातळीवरून अलौकिक पातळीवर जात असते. भावार्थसौंदर्याची अलौकिक पातळी ही आत्मप्रचितीची अनुभूती असते. आत्मा हा सत्य, शिव आणि सुंदर यांचे एकत्व आहे. म्हणूनच अशा आविष्कारातून येणार्‍या आत्मप्रचितीला 'ब्रह्मानंदसहोदर' असे म्हटले आहे.

शरीर, जीव, प्राण, आत्मा

या विश्वामध्ये अविरत असे काही घडतच असते, म्हणूनच हे विश्वचक्र युगानुयुगे चालत राहते. माणूस या विश्वाचा म्हणजेच निसर्गाचा एक घटक आहे. निसर्गातील एक घटक असणार्‍या मानवी अस्तित्वाला विविध घटनांमधून अनेक अनुभूती येत असतात. या अनुभवांतूनच त्याला जीवनाचे ज्ञान होत असते. हे अनुभव म्हणजेच सुखदु:खांची जाणीव होय. यापैकी सुखाचा अनुभव पुनःपुन्हा यावा असे वाटणे साहजिकच आहे. परंतु दु:खद अनुभव शक्यतो आपण टाळायचा प्रयत्न करीत असतो. दु:ख नको असले, तरी जीवन सुखावह जगण्यासाठी त्याला दु:खाच्या ज्ञानाची तशीच सुसह्यतेची आवश्यकता असते. जीवनामध्ये सुखदु:खांची आवर्तने-विवर्तने होतच राहणार, ती आपण थांबवू शकत नाही. सुखदु:खांवर आपली सत्ता नसते. सुखद घटनेतून सुख होते आणि दु:खद घटनेतून फक्त दु:ख होते, असा प्रत्यक्ष जीवनात अनुभव येतो. या लौकिक सुखदु:खात्मक आंदोलनातून अलौकिक आनंदाची प्राप्ती होऊ शकते का?

अशा तर्‍हेचा अलौकिक आनंद फक्त कलेमधूनच प्राप्त होऊ शकतो, म्हणूनच कलेचा जन्म झाला आहे! 'आनंद' हीच मनातील सुखदु:खांच्या आंदोलनांना स्थिर करणारी, शांत करणारी अशी अवस्था आहे. 'आनंद' हा मनाचा मूलधर्म आहे. 'मन' हे 'भावने'चे उगमस्थान आहे. मनाची म्हणजेच पर्यायाने भावनेची अभिव्यक्ती होणे, हे कलेचे अधिष्ठान आहे. म्हणूनच आपण भावविश्वाला कलात्मकतेने साकार करण्याचा प्रयत्न करीत असतो. अमूर्त भावविश्वाला मूर्त स्वरूप देणे हेच कलेचे कार्य आहे. त्या मूर्त स्वरुपालाच कलेतून व्यक्त होणारी, प्रकट होणारी त्या भावाची अभिव्यक्ती असे म्हटले जाते. ही अभिव्यक्ती कलेतील वेगवेगळ्या माध्यमांच्या आधारे होत असते. माध्यमाच्या शक्तीनुसार तसेच मर्यादेनुसार तो भाव मूर्त स्वरूप धारण करीत असतो, आकार घेत असतो.

पूर्वसूरींनी प्रत्येक विषयाचा शरीरसादृश्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. शरीराची बाह्याकृती आणि शरीरांतर्गत असलेल्या जीव, प्राण आणि आत्मा या सर्वांनी मिळून शरीरातील चैतन्ययुक्त अस्तित्व सिद्ध होत असते. म्हणून प्रत्येक विषयाचा आणि माध्यमाचाही शरीर, जीव, प्राण, आत्मा या सादृश्यांतून विचार केला; तरच माध्यम हेही चैतन्ययुक्त असते याचे ज्ञान होऊ शकेल.

शरीर हे सहज दिसणारे, तत्क्षणीच लक्षात येण्याजोगे असे अस्तित्व आहे. 'स्थूल शरीर' आणि 'लिंग शरीर' अशी शरीराची दोन अंगे आहेत. 'सूक्ष्म' शरीराला 'लिंग' शरीर असे म्हटले आहे. त्या दृष्टिकोनातून स्वरमाध्यमाचा विचार करणे योग्य ठरेल. 'स्वर' हे या स्वरमाध्यमाचे शरीर आहे. स्वराची जाणीव आपल्याला श्रवणातून होत असते. स्वराचे अनुरणनात्मक, गुंजनात्मक वैशिष्ट्य हेही सकृद्दर्शनी स्वरमाध्यमाचे शरीरच म्हणावे लागेल. तेव्हा श्रवणातून येणार्‍या स्वराच्या शरीराची जाणीव हे या स्वरमाध्यमाचे 'स्थूल' शरीर आणि त्या स्वराचा स्वभाव हे त्या स्वरमाध्यमाचे 'सूक्ष्म' शरीर असे म्हणणे योग्य ठरेल.

हे शरीर कार्यरत कसे होते असा विचार केला असता लक्षात येते की, स्वरांच्या ज्या अनेकविध अशा क्रिया किंवा लीला घडत असतात तीच स्वरमाध्यमाची कार्यरतता असते. ज्याप्रमाणे शरीरात 'जीव' असल्याशिवाय शरीर कार्यप्रवृत्त होऊ शकत नाही, त्याप्रमाणे माध्यमात 'जीव' असल्याशिवाय माध्यमही योग्य रीतीने कार्यरत होऊ शकत नाही. ही कार्यरतता माध्यमाच्या 'जीविता'वर अवलंबून असते. 'जीव' हा वाढतो, कमी होतो वा संपतो (क्षय होतो). हे ज्या शक्तीवर चालते ती त्याची 'प्राणशक्ती' असते. स्वरमाध्यमातील स्वरांच्या क्रिया वा लीला ज्या शक्तीमुळे कार्यशील होतात ती या स्वरमाध्यमाची 'प्राणशक्ती' हे निश्चित. माध्यम कार्यरत होऊ शकते ते त्या माध्यमात सामर्थ्य आहे म्हणूनच आणि सामर्थ्य आहे म्हणूनच त्यात 'प्राण' आहे असे आपण म्हणतो. 'प्राणशक्ती' ही कार्यसिद्धी करणार्‍या शक्तीचे मूलस्वरूप असते. ती वाढतही नाही तशीच ती कमीही होत नाही. ती असते किंवा नसते. शरीरातून प्राण गेला की त्याबरोबरच शरीरातील जीवही नाहीसा होतो. असा हा 'जीव' आणि 'प्राण' यातील सूक्ष्म भेद असतो.

शरीराचे अस्तित्वच मुळी ज्याच्यावर अवलंबून आहे तो आत्मा म्हणजे काय याचा विचार केल्याशिवाय या स्वरमाध्यमाचे सम्यक दर्शन होणार नाही. शरीर, जीव आणि प्राण हे ज्याच्यामुळे; ज्याच्या आधारे अस्तित्वात येतात; ती या माध्यमाची 'आत्मशक्ती' असते. आत्मशक्ती ही सर्वव्यापक अशी एक शक्ती, एक अनुभूती असते. आत्मा हा कालही होता, आजही आहे, उद्याही आहे; त्यामुळे तो चिरंतन आणि अविनाशी आहे.

चेतनायुक्त शरीर हे आत्मसिद्ध असते.पण तरीही शरीर आणि आत्मा ही दोन वेगळी अस्तित्वे आहेत. शरीर वेगळे आणि आत्मा वेगळा. शरीराचे अस्तित्व हे अल्पकाळ टिकणारे, मर्यादित स्वरुपाचे असते. परंतु आत्म्याचे अस्तित्व हे अपरिमित, अमर्याद, निराकार, निरंजन, चिरंतन, स्थिर स्वरुपाचे असते. त्याची फक्त जाणीव वा अनुभूती येऊ शकते. त्याचे आपल्याला ज्ञान होत असते, प्रचिती येत असते. अशा तर्‍हेची प्रचिती माध्यमातून येणे हे माध्यमाचे पूर्णस्वरूप, अंतिमस्वरूप असते. हीच 'आत्मप्रचिती' असते. ही प्रचिती एखाद्या माध्यमातून कशी येते, ते माध्यम कृतिशील कसे होते, कोणकोणत्या कारणांनी होते, तो त्याचा प्रवास कशा स्वरुपाचा असतो वा घडतो ते पाहणे हा कुतुहलाचा विषय आहे.

ही कृतिशीलता ज्या कारणाने घडते ते भावविश्व साकार करणे हे या स्वरमाध्यमाचे ध्येय आहे. स्वरमाध्यमातून साकार होणारे भावसत्य, ते उत्कट आणि उत्स्फूर्त करणारी त्याची शक्ती आणि त्याला भावार्थ सौंदर्याचे रूप देणारे माध्यमातील सौंदर्यपूर्ण साहित्य, या तीनही तत्त्वांच्या एकरुपत्वाचा, समन्वयाचा ज्या क्षणी साक्षात्कार होतो तो क्षण ही 'आत्मप्रचिती'ची अनुभूती असते. अशा वेळी माध्यम हे स्वतःच आत्मस्वरूप होत असते, म्हणजेच चैतन्यस्वरूप होत असते. माध्यमातून आत्मप्रचिती किंवा आत्मसौंदर्याची प्रचिती येणे हे पर्यायाने स्वतःच्या आत्म्याचेच दर्शन वा बोध असतो.

अलंकार

शरीर, शरीरस्थ असलेली दशेंद्रिये आणि मन यांची आपण जीवन सुसह्य व्हावे म्हणून जपणूक करीत असतो. जीव जगवणे आणि तोही चांगल्या पद्धतीने जगवणे हे जीवनाचे रहस्य आहे. खरे म्हणजे शरीर, मन, बुद्धी इत्यादींचा समतोल असणे वा त्यांना त्या अवस्थेला आणणे हे जीवनाचे मर्म आहे. ते स्वास्थ्याचे तसेच आनंदप्राप्तीचे साधनही आहे. म्हणून ज्या ज्या कारणाने ते लाभेल त्या सर्व तत्त्वांचे ज्ञान आणि जोपासना होणे महत्त्वाचे असते.

सर्वप्रथम सहज, सुलभ रीतीने करता येण्याजोगी गोष्ट म्हणजे शरीराची जोपासना. शरीर निरोगी त्याचबरोबर सुंदर, आकर्षक असावे असे वाटणे साहजिक आहे. ते अधिकाधिक जोपासावे, सांभाळावे असे वाटणे नैसर्गिक आहे. शरीर जोपासणे म्हणजे त्यातील चैतन्याची जोपासना करणे होय. त्यासाठी जीव, प्राण यांचीही जोपासना होणे जरुरीचे असते आणि त्यांना अस्तित्वात आणणार्‍या आत्म्याची अनुभूती येणे हेही अत्यंत महत्त्वाचे असते.

शरीर मुळातच सुंदर असणे वेगळे आणि त्याला सुंदर करणे वेगळे. शरीराला ज्या ज्या साधनांनी आपण नटवतो वा सुशोभित करतो त्याला 'अलंकार' असे नाव आहे. तेव्हा 'अलंकार' म्हणजे शरीराला वा कोणत्याही वस्तूला सुंदर करणारे, चांगले करणारे, शोभा देणारे असे तत्त्व! 'अलंकार' म्हणजेच 'सौंदर्य'. 'काव्यालंकारसूत्रवृत्ति' या साहित्यशास्त्रीय ग्रंथाचे कर्ते भाष्यकार वामनांनी 'सौंदर्यम् अलंकार:' अशी काव्याच्या संदर्भात अलंकाराची व्याख्या केली आहे.

'सु' याचा अर्थ चांगले काय याची अनुभूती करून देणारे तत्त्व. 'जे जे चांगले आहे ते ते 'सु' या शब्दप्रयोगाने सूचित होते.' उदा. सुयोग्य, सुगम, सुखद, सुवास, सुंदर, सुलोचन, सुप्रसिद्ध इत्यादी. सुंदर, सुशोभित, सुखद असे जिथे जिथे आहे तिथे तिथे ते 'सौंदर्यात्मक' आहे असे म्हटले जाते. सौंदर्याची जाणीव ही मनाची एक 'भावावस्था' आहे. याच सौंदर्याला आपण दृश्यसौंदर्य, स्वरसौंदर्य, वाक्सौंदर्य, आत्मसौंदर्य अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. करमणूक, मनोरंजन, आस्वाद, आल्हाद, उल्हास इत्यादी सगळी विशेषणात्मक सौंदर्यरुपे आहेत. त्या त्या वेळच्या मनाच्या अवस्थेला अनुरूप होणारे वैशिष्ट्यपूर्ण नाव दिले जाते. परंतु सौंदर्याच्या सर्वोच्च अवस्थेला मात्र 'आनंद' अशी संज्ञा आहे. हीच सौंदर्याची परिसीमा असते. या सौंदर्याला प्रकट करणारे माध्यमातील प्राणभूत तत्त्व हे त्या माध्यमातील साहित्यातून प्रकट होत असते. ते ज्या ज्या घटकांनी प्रकट होते त्या त्या घटकांना 'अलंकार' असे म्हणतात.

अलंकारांनी शरीर सुशोभित होत असते. परंतु प्रत्यक्ष अलंकारच जर स्वतंत्रपणे सुंदर असतील, तर सोन्याहून पिवळे असेच म्हणावे लागेल. इथे अलंकारांच्या सौंदर्याची पातळी उंचावते असे लक्षात येईल. अलंकार हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात. काही अलंकार प्रत्यक्ष सोन्याचे वा खर्‍या रत्नांचे असतात; तर काही कमी प्रतीच्या सोन्याचे, चांदीचे, कथलाचे, धातूचे वा वस्तूंचे असतात. यातील उच्च प्रतीचे अलंकारच वापरावे अशी सर्वसाधारण नैसर्गिक इच्छा असते. त्याचप्रमाणे माध्यमातील अलंकारांचीही निवड होणे महत्त्वाचे असते. अलंकार सुबक, सुघटित दिसले; तरी ते उच्च दर्जाचे असतीलच असे नाही. ते हलक्या प्रतीचेही असू शकतात. त्यातले कोणते स्वीकारावे वा कोणते नाकारावे हे माणसाच्या विदग्धतेवर, त्याच्या सौंदर्यदृष्टीवर अवलंबून असते.

शरीरावर योग्य स्थानी योग्य अलंकार घातल्याने त्या स्थानांना व संपूर्ण शरीराला शोभा येते. ते अलंकार विशिष्ट पद्धतीने तयार केले, तरच ते शरीरावर चपखल व सुंदर दिसतात. म्हणजेच अलंकारांनाही सुयोग्य स्थानांची आवश्यकता असते. तेव्हाच शरीर खर्‍या अर्थाने शोभायमान, अलंकृत होत असते. प्रत्यक्ष जीवनात ज्या पद्धतीने अलंकारांचा आपण विचार करतो, तोच विचार माध्यमातील अलंकारांचाही होणे आवश्यक आहे. अलंकार कितीही सुंदर असले; तरी ज्या शरीरावर ते घालावयाचे ते शरीर अचेतन असेल, तर त्या अलंकारांनाही काही अर्थ राहात नाही. म्हणून शरीरात चैतन्य असणे अत्यंत आवश्यक आहे.

स्वरमाध्यमाचा विचार करताना दोन पद्धतीने करणे आवश्यक आहे. कारण स्वरमाध्यम हे गायन म्हणजे कंठसंगीत आणि वादन म्हणजे वाद्यसंगीत या दोन्ही प्रकारांनी व्यक्त होत असते. कंठ अथवा वाद्य ही स्वरांना मूर्त स्वरूप देणारी माध्यमे आहेत. कंठमाध्यमाचा विचार करता त्याचे साधन म्हणजे आवाज होय. हा आवाज सुमधुर, मंजुळ, श्रवणसुलभ, झंकारयुक्त तसाच अर्थगर्भ असा असावा. इथे एका गोष्टीवर श्रद्धा ठेवणे आवश्यक आहे, की आवाज कसाही असला तरी तो योग्य रीतीने केलेल्या साधनेने सांगीतिक होऊ शकतो, परंतु वाद्याच्या आवाजात फारसा बदल घडू शकत नाही. झंकारयुक्त स्वर प्रकट करणार्‍या वाद्यांचीच इथे निवड केली जाते. शिवाय वाद्याचे स्वतःचे सामर्थ्य वा मर्यादा असतेच. या सगळ्या गोष्टींचा विचार अभिव्यक्ती सौंदर्यपूर्ण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.

स्वरमाध्यमातून जेव्हा एक निश्चित असा भाव व्यक्त होत असतो, तेव्हा त्याचे मूर्त, बाह्यस्वरूप हे त्या भावाची ढोबळ (आकृती) स्वरूप असते. ते स्वरूप व्यक्त करणारी स्वरमाध्यमातील कलात्मक संकल्पना 'राग' या नावाने ओळखली जाते. रागात लागणारे स्वर, वादी-संवादी, त्याची अकरा लक्षणे आणि स्वरालंकार इत्यादींचा विचार करून केलेली अभिव्यक्ती ही 'शारीरिक'च असते. म्हणून ज्या भावाची अभिव्यक्ती करायची त्या भावाला अनुकूल असेच स्वर, लय, स्वरालंकार, श्रुती असल्या पाहिजेत. भाव जेव्हा उत्स्फूर्तपणे प्रकट होतो, तेव्हा स्वर आणि त्या भावाचे स्वरालंकार हे स्वाभाविकपणे सुंदर आणि बोलके होऊनच येतात. अशा अलंकारांनाच उच्च कोटीचे अलंकार म्हणतात.

रागातील अंतर्गत भावाला उचितपणे प्रकट करणारे आणि त्याचबरोबर अत्यंत सौंदर्यपूर्ण असणारे तितकेच अलंकार या माध्यमातून वापरले असता त्या रागातून भावाची योग्य प्रचिती येत असते. एखादा अलंकार अतिशय सुंदर जरी असला, तरी तो एखाद्या भावाला अनुचित ठरू शकतो. अशा वेळी तो केवळ सुंदर आहे म्हणून वापरणे हे भावाभिव्यक्तीच्या दृष्टीने रसभंग करणारे ठरते. इथे खरे आणि खोटे याचा उचित आणि अनुचित किंवा भावगर्भ आणि भावबाह्य असाच अर्थ आहे. खरे अलंकार हे तेव्हाच खरे असतात, जेव्हा ते माध्यमातून प्रकट होणार्‍या भावाभिव्यक्तीचे स्वतःचे असतात. माध्यमावरील प्रभुत्वाचे वा प्रावीण्याचे प्रदर्शन करण्यासाठीच फक्त ज्या स्वरालंकारांचा वापर नको तिथे, नको इतका केला जातो, ते सर्व अलंकार 'अनुचित' असेच मानणे भाग आहे. अशा वेळी ते अधम प्रतीचे असतात. सांगीतिक शरीराला स्वरसाहित्याच्या साहाय्याने सुशोभित करणारे स्वरालंकार हे त्या भावाचे बाह्यालंकार असतात. माध्यमातील अलंकार मूळ अपेक्षित भावाला उत्कट करणारे नसतील, तर ते फक्त माध्यमाचे अलंकार आहेत असेच म्हणावे लागेल. त्यांनी प्रत्यक्ष भाव अलंकृत झाला असे म्हणता येणार नाही.

भाव सुखात्मक असो वा दु:खात्मक असो त्याचे शरीर आपण बदलू शकत नाही; परंतु ते सुंदर मात्र करू शकतो. ते सुंदर करणे, सुशोभित करणे म्हणजेच 'अलंकृत' करणे होय. स्वरमाध्यमात स्वरालंकारांनी तो भाव सुशोभित होत असतो. 'स्वर' हा मूलतःच श्रवणमधुर, रंजक, सुंदर असा असल्याने त्यातून प्रवाहित होणारे भावाचे शरीर हे सुंदर वाटणारच. परंतु जोपर्यंत त्याचा भावार्थ स्वर किंवा स्वरालंकारातून उत्स्फूर्तपणे प्रवाहित होत नाही, तोपर्यंत माध्यमातून होणारी अभिव्यक्ती ही खर्‍या अर्थाने भावस्वरूप किंवा चैतन्यमय होत नाही. भाव उत्कट व व्यापक झाल्याशिवाय अभिव्यक्तीतील अलंकारही उत्कट व व्यापक होणार नाहीत.

स्वरसाधना ही माध्यमावर प्रभुत्व यावे म्हणूनच करायची असते. एकदा भाषेवर प्रभुत्व आले की त्यातून कोणताही भाव सहजगत्या प्रकट करण्याचे कलावंताला सामर्थ्य येते. अशा वेळी त्या अभिव्यक्तीतील स्वररचना वा कोणतेही स्वरअस्तित्व हे माध्यमावरील अद्वितीय प्रभुत्वामुळे उत्स्फूर्तपणेच व्यक्त होत असते; त्यासाठी वेगळे सायास करावे लागत नाहीत. रागातील भावाचे मनात व्यापक, सचेतन स्वरूप निर्माण झाले तरच अभिव्यक्ती उत्स्फूर्त होऊ शकते. अशी चेतनायुक्त अभिव्यक्ती ही मुलातच सौंदर्ययुक्त अशी असते. अशा स्वरुपाच्या अभिव्यक्तीतील स्वरालंकार हे स्वाभाविक, नैसर्गिक, भावाला सयुक्तिक म्हणूनच उच्च कोटीचे असतात.

------------------------------------------------------------------------------------

स्वरार्थरमणी रागरससिद्धांत

लेखिका - गानसरस्वती किशोरी आमोणकर
प्रकाशक - राजहंस प्रकाशन , पुणे
पृष्ठसंख्या - १५८
किंमत - रुपये चारशे

------------------------------------------------------------------------------------

पुस्तकातील निवडक भाग राजहंस प्रकाशन, पुणे, यांच्या सौजन्याने
टंकलेखन साहाय्य - श्रद्धा द्रविड, अंशुमान सोवनी

------------------------------------------------------------------------------------

हे पुस्तक आता मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.

http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17121

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!
'अक्षरवार्ता' समूहाचे पुनःश्च आभार.

वा.. छान वाटलं वाचून. घेतलं पाहिजे पुस्तक.
बरोबर किंमत पण टाकत जा ना Happy

हे पुस्तक घ्यायचे आहेच. हा भाग वाचून आता तर नक्कीच घेणार!

ह्म्म्म धन्स क्स आणि मंडळी

*********************

प्रतिकार आणि प्रतिहल्ला यात फरक असतो! Biggrin स्वसंरक्षणार्थ असतो तो प्रतिकार अन् दुसर्‍याला स्वरक्षणाची संधी देतो तो प्रतिहल्ला! Wink

सुरेख भाषा. त्यांचं बोलणंही असंच सुंदर. ..
इतक्या गदारोळात वाचणं राहूनच गेलं होतं हे.. धन्यवाद बदलून टाकल्याबद्दल.

चिनुक्स/श्र/अंशूमनः आभार आभार ढीगभर आभार. उत्सुकता होतीच कसं असेल याची.
जबरी. ४ वेळा वाचलं नीट अधोरेखित करुन तेव्हा थोडं समजलं. Happy घेतलच पाहिजे आता.

प्रतीयमान म्हणजे काय ? कोणाला माहित असेल तर कृपया सांगा.

खुप मनोवेधक लिहीलय. गायनकलेच अध्यात्मिक दृष्टीकोनातून मस्त वर्णन केलय.

चिनूक्स,

कैच्याकै ओघवतं लेखन आहे. शास्त्रीय संगीत ज्याला समजतं त्याच्यासाठी वरील तात्त्विक विवेचन वाचून त्यावर मनन आणि चिंतन करणे कमालीचे आनंदनीय आहे.

मला स्वत:ला शास्त्रीय संगीतातील काडीमात्र ज्ञान नाही. मी कानसेन नाही. संगीतात अगदी औरंजेब नसलो तरी सर्वसाधारण मराठी माणसापेक्षा जास्त काही कळत नाही. मात्र वरील मजकूर अतिशय भावपूर्ण आहे. ललितकलाकृती नसला तरीही चटकन आत भिडतो. पूर्ण पुस्तक किती अर्थवाही असेल याची कल्पनाही येत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष वाचायलाच हवं ते! Happy

विवेचनात 'भाव' आला मात्र 'रस' दिसत नाही. पुस्तकात असेलच म्हणा!

पुस्तक परिचयाबद्दल तुमचे खास आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

रैना,

>> प्रतीयमान म्हणजे काय ? कोणाला माहित असेल तर कृपया सांगा.

मला भावलेला अर्थ सांगतो. प्रतीयमान म्हणजे प्रत्यय आणून देण्याचे सामर्थ्य बाळगणारे असे काहीही. अथर्वशीर्षातील या ओळींचा आधार घेऊया :

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते
सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति

गणपतीमुळे सर्व जगाचा प्रत्यय येतो. हे जग प्रतीयमान आहे.

किशोरीबाईंच्या वरील उदाहरणांत सौंदर्यात्मक सत्य आणि सत्यात्मक सौंदर्य असे दोन्ही (गायकाच्या व/वा श्रोत्याच्या मनात) एक होतात तेव्हा गायकाच्या मनातील भावाचा श्रोत्यास प्रत्यय येतो. म्हणजे भाव प्रतीयमान बनतो. इथे प्रतीयमान म्हणजे ढोबळमानाने प्रकाशमान असं समजा.

हे प्रतीयमानत्व ज्यातून व्यक्त होते ते काव्य. प्रस्तुत उदाहरणांत गळ्यातील स्वरांच्या सहाय्याने प्रतीयमान (=प्रकाशमान) असा भाव श्रोत्यांपर्यंत संक्रमित होतो. म्हणून संगीत हे स्वरकाव्य आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

किशोरी अमोणकरांची मुलाखत खूप आधी ऐकली होतॆ. या पुस्तक परिचयाच्या निमित्ताने पुन्हा स्मरण झाले. फारच छान लेख आणि पुस्तकही वाचायला हवे.

सगळ्यात आवडते राग यमन कल्याणातले 'म्हारो प्रणाम' - किती वेळा ऐकले तरी मन तृप्त होत नाही

sontakka, धन्यवाद! Happy तत्त्वज्ञान हा एक नाठाळ घोडा आहे. किशोरीबाईंची त्यावर घट्ट मांड आहे हे पदोपदी जाणवते. वर रैना यांनी म्हंटल्याप्राणे हे पुस्तक अनेक पारायणे करण्यायोग्य आहे.
आ.न.,
-गा.पै.