गहू
जुन्या मायबोलीवरचे लेखन इकडे हलवताना लक्षात आले की आता पारंपारीक पद्धतीने केल्या जाणार्या प्रकारात बरेच बदल झालेत. खरतर त्यामुळे कुरड्या करणं आणखी सोईस्कर झालय.
ग्रामिण भागात उन्हाळा आला की ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी बायकांची तारंबळ उडायची, आताही उडतेच पण आता बर्याच ठिकाणी कुरड्या तयार करून मिळतात. गहू दळण्यासाठीचे यंत्र आता आकाराने मोठे झालेत तसेच ते आता मोटरचलित झालेत. तुमचे भिजवलेले गहू घेवून गेलात की तुम्हाला प्रति किलो दराने ते दळून मिळतात.
खेडेगावात १० - १२ घरांच्या छोटछोट्या वस्त्या असतात. ह्या सगळ्या बायका एकत्र येवुन मग कुरड्या करायचा कार्यक्रम पार पाडत. कुणाचे गहू कधी भिजत घालायचे इथपासुन सुरुवात होते.अगदी टपोर्या म्हणजे चांगल्या प्रतिच्या गव्हाचे दळण केले जाते. एखादीकडे जर चांगले गहू नसले तर गव्हाची उसणवारी होते. गहू भिजत घालण्यासाठी ठेवणीतले माठ निघत, हा माठ किमान २ वर्ष जुना असावा लागतो. बुडाला सिमेंट लावलेला माठ वापरत नाहीत.तुम्हाला कळलेच असेल की गावी प्रत्येक घरी एका खोलीत नेहमी माठांची चळत लावुन का ठेवत ते. ह्या माठांचीही देवाणघेवाण चालायची. आता घरोघरी माठाऐवजी स्टीलचे पिंप वापरतात
एका दिवशी साधारण २ ते ३ पायल्या गहू भिजत घातले जातात.(१ पायली= २ आधुल्या. माझ्या माहेरी एका पायलीत साधारण ५ की. तर सासरी एका पायलीत ७ की धान्य मावते).
दुसर्या दिवशी पुन्हा दुसरा हप्ता भिजत घातला जातो माठ कमी पडत असतील तर मग स्टिलच्या टिपेत पण गहू भिजत घालतात. हे गहू तीन दिवस भिजू द्यावे लागतात. चौथ्या दिवशी हे वाटले जातात. पुर्वी हे पाट्यावर वाटले जात. मग घरोघरी गहु दळण्याचे यंत्र आले. एका पाटाला हे यंत्र धुवुन लावले जात. हा पाट साधारण दोन तिन विटांवर ठेवला जातो, जेणेकरुन त्याचे हॅंडल फिरवता येईल एवढ्या उंचीवर ठेवले जाते. टोपलीत किंवा चाळणीत भिजलेले गहू काढले जातात आणि ते धुवुन निथळवले जातात. मग ते यंत्राच्या सहाय्याने हे दळतात. गहू दळायचे काम साधारण दुपारीच केले जायचे. ह्या कामात मुलांची मदत व्हायची, यंत्र फिरवायला. आता हे भिजवलेले गहू मोटरचलित यंत्रातून वाटून आणतात. इथे महत्वाचे काम असते ते हे दळलेले गहू पिळायचे. त्यासाठी दोन मोठे पातेले घेतात. पहिल्या पिळणीनंतरचा कोंडा दुसर्या पातेल्यात टाकतात आणि तो पुन्हा एकदा पिळला जातो. हे गहू पिळण्याचे काम फारच किचकट असते. त्यात गावी पुर्वी हातातल्या बांगड्या इतक्या घट्ट चढवलेल्या असायच्या की त्या उतरवायला कासार हवा असायचा, त्यामुळे गहू पिळायला सुरवात करण्यापुर्वी हाताला आणि बांगड्यांना तेल लावले जायचे. एव्हाना एक एक माठ ज्यात गहु भिजत घातले होते ते रिकामे होतात. ते पुन्हा धुवुन विसळुन व्यस्थित ठेवले जातात. पडणार, लवंडणार नाही याची खात्री करुन घेतली की मग गहू पिळताना सोबत ते गाळण्याचे ही काम करावे लागते. ते आधी पिठ चाळायच्या चाळणीने गाळले जाते. पुन्हा ते माठावर एक पातळ कापड बांधुन ( ह्यासाठी शक्यतो पांढरे धोतर कींवा उपरणे वापरतात ) त्यातुन गाळले जाते. महत्वाची गोष्ट म्हणजे हे गहू पिळण्यासाठी शक्य तितके कमी पाणी वापरावे लागते.
हा सगळा गोंधळ आटोपला की मग वापरात आलेले सर्व भांड्यांची रवानगी विहिरिजवळ होते. मोकळ्या वाहत्या पाण्यात भांडे धुण्याचे काम आटोपते. मग एकदा चहापाणी होतो. दुसर्या दिवशी सकाळी कोण ४.०० वा. तर कोण साडेचारला येणार हे ठरते. आणि जमलेल्या बायकांची पांगापांग होते.
जिच्या घरी कुरड्या होणार आहेत तिला बाकिचे साहित्य गोळा कारायचे असते.
(१) कुरड्या सुकवायला किमान ४ पलंग (लोखंडी पट्ट्यांचे) वापरत. ते कमी पडत असतील तर मग बाजांना मान मिळतो.
(२) दुसरी लागणारी महत्वाची गोष्ट म्हणजे कुरड्या सुकवायला गव्हाचे काड वापरत. ज्यांचे कुणाचे गहू आगस असतिल ते सोंगणीला लवकर येतात. ह्यात मग हे गहू मळणीयंत्रात घालण्यापुर्वी २० - २५ पेंढ्यांच्या ओंब्या हाताने खुडून हे काड बाजुला ठेवले जात आणि हेच काड सर्वांच्या घरी कुरड्या सुकवायला वापरले जात. वस्तीवरच्या सर्वांच्या कुरड्या होईस्तोवर ह्यांना जीवापाड जपले जात. आता गहू सोंगणीसाठी हार्वेस्टरचा वापर होतो. तसेच फारसे कोणी कुरड्यासाठी म्हणून काड काढत नाहीत मग आता कुरड्या सुकवण्यासाठी प्लास्टीक कागदाचा वापर केला जातो. कागदावर सुकवलेल्या कुरड्या एका बाजूने जरा चपट्या होतात.
(३) कुरड्या करायचा सोर्या. हा सोर्या लोखंडी असतो तिन किंवा चार पायांचा. उंचीला साधारण अडीच ते तिन फुट असतो त्याला १४ ते १५ सें.मी. ची एक खोलगट भाग असतो त्यात चिक भरतात. एक लोखंडी दांडी असते आणि त्यालाच एक लाकडी किंवा लोखंडी ताटली जोडलेली असते की जेणे करुन ह्याने चिक दाबला जातो. किलो -दोन किलो गहू असतिल तर हातसोर्याचा वापर करतात.
(४) चिक हाटायला पितळेची मोठी डेगी (तपेलं), ह्यला मात्र आतुन कल्हई केलेली असावी लागते नाहीतर चिकाला हिरवा रंग येतो.
(५) चिक हाटण्यासाठी मोठा लाकडी चाटू वापरतात तो साधारण साडे तिन फुट उंच असतो.
(६)पितळी चरवी. पाणी हिनेच मोजतात. आताशा ह्या पितळेच्या चरव्या गायबच झाल्यात. त्यांची जागा कळश्यांनी घेतलिय. किती पायल्या गव्हाला किती चरव्या हा अंदाज ठरलेला असतो, चिक शिजत असताना तिच्यात पाणी भरुन ती डेगीवर ठेवली जाते. पाणी कमी पडतेय असा अंदाज आला कि ह्यातलेच थोडे पाणी घालता येते.
(७) तिन दगडांची चुल मांडावी लागते. जमिन थोडिशी खोदुन हे दगड मांडले जातात. चुलीसाठी लागणारे सरपण तयार ठेवले जाते.
ह्या सर्व सामानाची जमवाजमव करुन बाई निवांत होते.
दुसर्या दिवशी सकाळीच उठुन चुल पेटवतात. मग डेगीला माती लावतात. ती चुलिवर ठेवून तित चरवीने पाणी मोजुन टाकतात. ह्यात मिठ व तुरटी टाकतात व वर एक चरवी पाण्याने भरुन ठेवतात.
घरची एखादी पुरुष मंड्ळी जर चिक हाटणार असेल तर ठिक नाहीतर चिक हाटणार्या काका / तात्यांना बोलावुन आणायचे. बायकाही चिक हाटतात. परंतु प्रत्येक वस्तीवर एक तरी पारंगत पुरुष असतोच. चिक हाटणे हे काम तसे ताकदीचे आणि स्किलचेपण.
पाण्याला आधण येईपर्यंत चिक फोडला जातो. आधल्या दिवशी गाळुन ठेवलेला चिक एव्हाना तळाशी घट्ट होऊन बसलेला असतो. वरती अगदी नितळ पाणी तरंगत असते. हा माठ तिरका करुन काळजीपुर्वक ते ओततात. खाली जमलेला चिक / सत्व हे एका भांड्यात काढतात. पाण्याला उकळी आली की मग बांगड्या किंवा बाह्या आणि चाटू सरसावला जातो. एकीकडे हातात चाटु गरगर फिरायला लागतो तर दुसरीकडे एकजण चिकाची धार डेगित सोडत असते. चाटू फिरवताना तो विशिष्ठ पध्दतिनेच फिरवला जातो. सुरुवातिला नवशिक्यांना संधी मिळते. मी हा मान आत्तापर्यंत दोनदा पटकवलाय. चुलीतले सरपण जरा आतबाहेर होते. मग हा चाटू काकुकडे किंवा आजीकडे जातो. माझी आई, चुलत आजी ह्यांचा नंबर इथे लागतो मग शेवटी (अर्जुन)तात्या आपल्या बाह्या सावरतात आणि चाटू आपल्या ताब्यात घेतात. मी मात्र बघतच बसते की ह्यावेळी जर मी हाटत असते तर चाटू ईंचभर सुध्दा हलला नसता इथे तर तो चक्क नाचतोय...
आजुबाजुला असलेल्या तज्ञ आजी डोकावत असतात, त्यांनी पुरे म्हटले की चाटू जागीच थांबतो. पलंग, बाजांवर काड पसरवले जातात.
चिक हाटणारे अर्जुनतात्या आता म्हातारे झालेत. काही आज्ज्या देवाघरी गेल्यात काही जाण्याची वाट बघतायेत. मात्र नव्या पिढीत नवे लोक तयार झालेले असतात.
डेगी उतरते आणि सोरे मांडलेत तिथे स्थानापण्ण होते. एवढ्यावेळात उशिरा येणार्या एक दोघी जनता)चिल्लेपिल्ले) पाठीशी घेउन येतात. गायीच ताजं दुध निघालेलं असतं (प्युअर) दुधाचा चहा होतो, तात्या आपल्या कामाला निघुन जातात आणि सोरे सरसावले जातात. ह्या सोर्यावर कुरड्या करायच्या म्हणजे दोन व्यक्ती लागतात. एक कुरडई चाळायला आणि दुसरी सोर्या दाबायला. तिसरी व्यक्ति कुरडई काडावर टाकायला. ह्या सगळ्या प्रकारात माझी घाई वेगळीच असायची. साखरेचा डबा, जरा जास्तच खोलगट ताटली घेऊन मी तयारच असायचे. कुरड्या ह्या ताटलिच्या उलट्या बाजुने चाळल्या जातात माझी ताटली मात्र सुलट जात. सोर्यात आहे तेवढा चिक दबला गेल्याशिवाय माझी ताटली हलत नसायची. एकदा गरम गरम चिक पोटात गेला की मग कितीही वेळ सोर्या दाबायला मी सिद्ध.
आमच्या शेजारच्या एका आजींना सोर्या दाबण्यासाठी मदत नको असायची, सोर्या फिरवुन उलटा ठेवत म्हणजे उजव्या हाताने दाबायचे आणी डाव्या हाताने चाळायचे. मला तर जाम कौतुक वाटायचे. हे असे करणे फारच अवघड असेन असे वाटायचे पण मीही ह्याच पद्धतीने कुरड्या चाळायला शिकले.
चिक गरम आहे तोपर्यंत छान कुरड्या येतात, एकदा का तो थंड झाला की मग एकदा सोर्यातुन संपुर्ण दाबुन काढावा लागतो आणि पुन्हा टाकुन एक एक करुन चाळावी लागते.
पहिल्या दिवशीच्या कुरड्या ईतर दिवसांपेक्षा कमी होतात कारण पहिल्या दिवशीचा चिक हा घरोघरी वाटला जातो. काकुंसोबत आलेल्या जनतेला दुध साखरेसह दिला जातो. हि जनता ही काम करते बरंका! सोर्या दाबण्याचे, कुरड्या टाकण्याचे. दुसर्यांच्या घरी कुरड्या असतील तर मग आमचा समावेश जनतेत असायचा.
जेमतेम सकाळचे ८.३० किंवा ९.०० वाजलेले असतात, पुन्हा एकदा चहा होतो. भांडे धुवायला विहिरीवर जातात. दिवसभराचे कामे दुपारपर्यंत आटोपली जातात आणि दुसरा हप्ता वाटायला घेतला जातो.
दुपारच्या जेवणात अर्धवट वाळलेली कुरडई खाताना तसेच संध्याकाळी सुकलेल्या कुरड्या पाट्यांमध्ये भरुन ठेवताना गळुन पडलेल्या कुरकुरीत काड्या खाताना येणारी मजाच वेगळी. सगळे हप्ते करून झाल्यावर सर्व कुरड्या कडकडीत उन्हात पुन्हा एकदा सुकवल्या जातात आणि मग पत्र्याच्या किंवा स्टीलच्या मोठमोठ्या डब्यांत बंद होतात.
आता कुटूंब विभक्त होऊ लागलीत तसेच छोटी पण होऊ लागलीत त्यामुळे २ पायल्यांचा एकच हप्ताही काही घरांमधे पुरतो.
झाल्या तयार वर्षभराच्या सणासुदीच्या, लग्नकार्यासाठीच्या कुरड्या तयार. लग्नात रुखवद म्हणुन लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाच्या केल्या जातात.
दमला असाल ना एवढ सगळं एका दमात वाचून तर मग तुम्ही खा आता मनमुराद, हव्या तेवढ्या कुरड्या.
गावी कुरड्या करतानाचे फोटो काढून ह्या लेखात समावेश करायचा विचार होता पण करतेवेळी माझे जाणेच झाले नाही. आयत्या तयार, मस्त सुकवून मला निघतेवेळी कुरड्या घरपोहोच मिळाल्या त्यामुळे फोटो पुन्हा कधीतरी.
जुन्या मायबोलीतले लिखाण संपादित करताना जुनी पद्धत तसेच नव्याने होणारे बदल लिहिताना, लिहिण्यापेक्षा आठवणीतच जास्तवेळ रमल्यामुळे लिखाणात काही चुका राहण्याची शक्यता आहे.
आरती, खास तुझ्या आग्रहामुळेच हे लिखाण इकडे स्थलांतरीत झाले. धन्यवाद!
सुंदर लेख! काही वर्षांपूर्वी
सुंदर लेख! काही वर्षांपूर्वी कुर्डया करून पहायची हौस होती.पण त्यातले ओ की ठो माहीत नसल्याने ती जिरली.
मस्त लिहिलंय. चिकाच्या
मस्त लिहिलंय. चिकाच्या आठवणीने जीभ चाळवली
मस्त लिहीलं आहेस. गव्हाचा चीक
मस्त लिहीलं आहेस. गव्हाचा चीक हा माझा वीक पॉईंट त्यामुळे गावी गेलं की काकू अगदी दिवाळीतही गहू भिजत घालून माझ्यापुरता चीक करून द्यायची.
फोटो असते तर मजा आली असती.
फोटो असते तर मजा आली असती.
सुंदर लेख.. सगळे डोळ्यासमोर
सुंदर लेख..
सगळे डोळ्यासमोर आले.
नगरला जितक्या वेळा जेवलोय त्या प्रत्येक वेळी ताटात तळलेली कुरडई होतीच. कोल्हापूरला पण पुर्वी पद्धत होती पण तिथे सोबत सालपापड्या, कोहळ्याचे सांडगे असत.
आईसोबत मी पण केल्या आहेत पण अर्थात थोड्या प्रमाणात. मग आमच्याघरी तळणेच कमी झाले. तरी कुरड्याचा
कारवारी पद्धतीचा उपमा होत असे.
छान माहिती. लेख आवडला.
छान माहिती. लेख आवडला.
मस्त आठवण! आजीकडे असायच्या
मस्त आठवण!
आजीकडे असायच्या गव्हाच्या कुरडया .. आईकडे तांदळाच्या पांढर्या कुरडया ..
उसगावात आल्यावर पी एफ चँग मधे पहिल्यांदा घाबरतचं व्हेजिटेबल लेट्युस रॅप ऑर्डर केलं .. तर त्याच्या वर मोडलेल्या कुरडया गार्निश करुन ! .. मी खुश पण मग पंचाईत की तेलगु रुममेटला कसं सांगणार ईंग्लिश मधुन!
नलु, मस्त वाटलं वाचून. गावची
नलु, मस्त वाटलं वाचून.
गावची गोष्टच वेगळी. मीही भातुकलीतील पोळपाट लाटणं घेऊन बसायचे उडदाच्या पापड लाटतांना. पोळपाटापेक्षा लाटीच मोठी असे. दोन वेळा इकडं तिकडं फिरवून कंटाळा आला की ती लाटीसुद्धा तेलाबरोबर गट्ट्म
बिबड्यांचा घाटा शिजवतांना आम्ही बच्चेकंपनी खिशीसाठी लुडबुडतच असायचो. तीळ लावलेले, पांढरेशुभ्र चमकणारे बिबडे-वर लोणी आणि कच्चे शेंगदाणे की स्वर्गच! कुरडया मात्र नाजूक प्रकरण. आमरसाशिवाय जेवणात कुरडयांची कल्पनाच करवायची नाही. निळे, पिवळे, गुलाबी रंग ल्यालेल्या कढईभर फुललेल्या सुंदर कुरडया. आता दिसतही नाहीत कुठे.. पापडं रेडीमेड आणली जातात. साबा, आई अजूनही घाट घालतच असतात या सर्व प्रकारांचा. पण हे सर्व प्रकार हळुहळु नाहीसे होतील काय अशी भिती वाटते.
चनस, तेलुगु रूमीला वडीयालु-आप्पडालु म्हणून सांगायचे
बापरे !! केवढे कष्टाचे काम.
बापरे !!
केवढे कष्टाचे काम. आता हे वाचल्यावर इतक्या सहजासहजी खाल्ल्या जाणार नाहीत कुरड्या.
चिन्नु .. ... मग सगळं गुडु
चिन्नु .. ... मग सगळं गुडु गुडु होतं ..
सुंदर लेख! कितीतरी नवीन शब्द
सुंदर लेख!
कितीतरी नवीन शब्द समजले.
जमेल तेव्हा फोटो टाक नक्की.
सुंदर लिहिलय...मस्त...चीकाची
सुंदर लिहिलय...मस्त...चीकाची पद्धत माझ्या गावी म्हणजे अलिबाग ला नाही पाहीली.....म्हणुन हे सर्व नवीन वाचायला मज्जा आली.....
मस्त लेख. आमची आजी गहू पिळून
मस्त लेख. आमची आजी गहू पिळून झाल्यावर जो कोंडा उरायचा तो परत वाळवून द्ळून त्याच्या परत पापड्या करायची, त्यासुध्दा चवीला छान लागायच्या.
धन्यवाद नलिनी. जुन्या माबोवर
धन्यवाद नलिनी. जुन्या माबोवर हे लिखाण वाचल होत आणि खूप आवडल म्हणून तुम्हाला ईकडे लिहिण्याचा त्रास दिला. आता लवकरच फोटो जमेल तसे द्या.
मस्त मजा आली वाचतांना. माझ्या
मस्त मजा आली वाचतांना. माझ्या आत्याआजीकडे (बाबांची आत्या) अगदी आत्ता आत्ता गेल्या वर्षीपर्यंत ३०-४० किलो गव्हाच्या कुरड्या केल्या जायच्या आणि सुट्यामधे येणार्या सगळ्यांना नव्हाळी म्हणुन दिल्या ही जायच्या. यंदा आजी नाही त्यामुळे माहिती नाही झाल्या की नाही.
वा! मस्त. काही काही ठिकाणी
वा! मस्त.
काही काही ठिकाणी संगती लागली नाही. शब्दसंपत्तीत मात्र चिक्कार भर पडली.
आख्खे गहू हाताळायचा फारसा संबंधच येत नाही हल्ली. चार वर्षांपूर्वी ठुली केली होती तेव्हा गव्हाचं सत्त्व काढलं होतं. पण आता नक्की घेऊन येणार आणि चीक करून खाणार.
नलिनी लिखाण खुप म्हणजे खुप
नलिनी लिखाण खुप म्हणजे खुप आवडल.
माझ्याकडे सध्या विकत आणलेल्या कुरड्या आहेत.
माझ्या सासरी जुन्या घरी तो सोर्या आहे असे सा.बा. नेहमी म्हणतात. आता तो घेऊन येईन. कुरड्या करण्याची इच्छा झाली तुझा लेख वाचून.
खुप सुरेख लिहलयं... मी आणि आई
खुप सुरेख लिहलयं... मी आणि आई नी मिळुन गेल्या आठवडयातच केल्या.. कुरडई चे खुप मोठे बाळंतपण असते
बुवा... एकटी ने घाट घालायची हिंमतच होत नाही.. नवर्याला ह्यचा चिक खुप आवडतो.. कुरडया आंब्याच्या रसा बरोबर छानच लागतात शिवाय खिचडी सोबत साडगे,कुरडई,धण्याची तळलेली मिरची, ताक ,लिंबाचे लोणचे मस्तच लागते...
सुंदर लेख.. सगळे डोळ्यासमोर
सुंदर लेख..
सगळे डोळ्यासमोर आले.
काही काही नवे शब्दसुद्धा कळालेत... चाटू, कुरडई चाळणे वगैरे...
सुन्दर लेख!!
सुन्दर लेख!!
गोव्यात असाच शिरवळ्यांचा घाट
गोव्यात असाच शिरवळ्यांचा घाट घालतात. त्या तांदळाच्या ताज्या शेवया. नारळाच्या रसाबरोबर खायच्या.
रताळ्याच्या पण करतात त्या वाळवून तळून खातात. तळल्यावर वरून पिठीसाखर घालायची.. गव्हाच्या मात्र तिथे नाहीत.
दिनेशदा, जरा व्यवस्थित रेस्पी
दिनेशदा, जरा व्यवस्थित रेस्पी द्या ना. प्रमाण वगेरे. तांदळाच्या आणि रताळ्याच्याही.
मस्तच ग नलिनी!!! खुप छान
मस्तच ग नलिनी!!! खुप छान डिटेलवार लिहीलं आहेस! आमच्या घरी पण अशा प्रकारे घाऊक कुर्डया होत पण तू लिहीलेला अनुभव वेगळ च आहे. मजा आली!
ग्राइंडर, चाटु आणि ते पातेलं मात्र असच आहे! चुल नसायची आणि गव्हाच्या कुडावर म्हणजे काय ते समजले नाही!
आमच्याकडे घाट घेताना बाबा मदत करायचे! एरव्ही कधीच मदत करायचे नाहीत पण घाट घेणे आणि मसाला कूटने ही त्यांचीच कामे होती!
चिन्नु, तांदळाच्या
चिन्नु, तांदळाच्या शिरवळ्यांची कृती असणार इथे. आणि रताळी नुसती उकडून त्याचा लगदा करून त्याची शेव ( चवंगे ) घालून वाळवतात. त्यात काहीच घालत नाहीत. तळल्यावर मग पिठीसाखर घालतात. याच शेवयांची खीर पण छान होते. नारळाच्या दूधात करायची.
ओके थँक यू
ओके थँक यू
व्वा दिनेश दा... रताळ्याच्या
व्वा दिनेश दा... रताळ्याच्या शेवयांची खीर... सही आणि ती पण नारळाच्या दुधात,, सहीच लागत असेल..
पण नारळाचे दुध गरम करतात का? सांगा ना जरा..
हो, या शेवया थोड्या तूपात
हो, या शेवया थोड्या तूपात परतून मग त्यावर नारळाचे पातळ दूध घालायचे व जरा उकळायचे. मग जाड दूध घालून गॅस बंद करायचा. असे केल्याने दूध फाटत नाही.
सॉरी, नले ! विषयांतर झाले.
थांक्यु दा... हो खरच आपण
थांक्यु दा... हो खरच आपण नलिनींच्या धाग्यावरच बोलतो आहे नाही का.सॉरी हं...
नलिनी तुम्ही सुरेख लिहीलय,
नलिनी तुम्ही सुरेख लिहीलय, अगदी टिप्पीकल गावाकडचे.:स्मित:
आता आम्ही कुरडयान्चा घाट घालत नाही, पण चीक मात्र करतो घरी. अगदी पारम्पारीक पद्धतीनेच करतो. फार कुटाणा असला तरी केला जातोच.
तुमच्या लिखाणाला दाद. मस्त
तुमच्या लिखाणाला दाद. मस्त शैलीत अगदी सविस्तर पणे लिहिलं आहे. तरीही इंटरेस्टिंग. भाषेचा लहेजा ही मस्त.
कुरडया करण्याचा एवढा व्याप असतो ह्याची अजिबात कल्पना नव्हती. आमच्या कोकणात नाही हा प्रकार कारण मुळात गहूच कमी ना. पोळ्याच सणावारी व्हायच्या तिथे कुरडया कोण करणार? तांदुळाचेच प्रकार जास्त आमच्याकडे.
Pages