अननोन चायना- भाग ४

Submitted by वर्षू. on 25 April, 2014 - 23:35

अननोन चायना -भाग १ - http://www.maayboli.com/node/48666

अननोन चायना -भाग २- http://www.maayboli.com/node/48669

unknown china part 3 http://www.maayboli.com/node/48684

आज टूर चा शेवटचा दिवस होता. आत्तापर्यन्त आमच्या ग्रुप मधील लोकांशी तशी ओळख झाली होती.

त्यापैकी एका फॅमिली शी तर जास्तच जवळीक झाली होती. नवीन लग्न झालेला २५ वर्षाचा सॅमसन , आपल्या बायको,

आई , वडील, आजी, आजोबा अश्या सर्वांना बरोबर घेऊन आला होता. त्याला बर्‍यापैकी इंग्लिश बोलता

येत होते . गेल्या तीन दिवसात भरपूर प्रॅक्टीस मिळाल्याने तो खूश होता अगदी ,आणी त्या आनंदाच्या भरात त्याची

बायको त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे हे सीक्रेट ही त्याने आम्हाला कुजबुजत्या आवाजात सांगून टाकलं होतं Happy

त्याचे आजी आजोबा सत्तरी ओलांडलेले असले तरी चांगलेच काटक होते. हातात , पाठीवरच्या पिशवीत फळं ,

पाण्याच्या, जूस च्या बाटल्या , स्नॅक्स ची पाकिटे घेऊन हसतमुखाने चढण, चढत उतरत होते.

दररोजप्रमाणे आम्ही सर्व ब्रे फा घेऊन बस मधे येऊन बसलो, बस नेहमीसारखी सुरेख, गुळगुळीत रस्त्या वर धावू

लागली. पुन्हा बर्फाळलेली सोनेरी शिखरे साथ देऊ लागली.

प्रत्यक्षात तिबेट ला जाणं यावेळी शक्य झालं नव्हतं , पण या भागात वसलेल्या तिबेटिअन खेड्यांना भेट देऊन

दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न करत होतो.

एक दीड तासाच्या प्रवासानंतर अचानक ओळीने उभी असलेली तिबेटिअन स्टाईल ची घरं दिसू लागली.

भिंतींवर, दरवाज्यांवर रंगीबेरंगी चित्रं रंगवलेली होती. रस्त्यावर ओळीने रंगीत झेंडे फडकत होते. पगोडाज,

लहान मोठी देवळे दिसत होती . त्यांच्या समोरच्या पटांगणात पताकांच्या माळाच माळा लावलेल्या होत्या. शेवटी

एका संकुला समोर बस थांबली.

आम्ही सगळे पायी गाईड च्या मागून निघालो. खेड्याच्या स्वच्छ झाडलेल्या

गल्लीबोळातून जाताना फारच सामसूम पाहून मी प्रश्न केला कि या खेड्यात लहान मुलं नाहीत कि काय?? आणी

शाळा ही दिसत नाही ती?? त्यावर उत्तर मिळाले कि विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरता रोज दहा किमी चालत

जावे लागते . जे थोडे फार पैसे वाले आहेत त्यांची मुलं शाळेच्या हॉस्टेल मधेच राहतात आणी वीकेंड ला घरी येतात

पण बाकीच्या लहान पोरां च्या शिक्षणा ची काहीही सोय खेड्यांमधून उपलब्ध नाही.

तेव्हढ्यात् ५,६ बायका आमच्याकडे पाहण्याचे टाळून भराभरा उतारावरून गेल्या.. पण त्यांच्याबरोबर असलेली

दोन चार गोडुली पिल्लं आमच्याकडे उत्सुकतेने पाहात होती.. वाईट वाटलं त्यांच्या शिक्षणाचे हाल ऐकून.

चालत चालत एका घरापाशी आमची वरात येऊन थांबली. बंद दारावर रंगीत चित्रं होती . या घराचे आतून फोटो

काढायला बंदी होती.

शिरल्यावर स्वैपाकघर वजा बैठक होती. भिंतीवर ,'माओ त्से तुंग' चा भला मोठा फोटो

लावलेला होता. तिथेच छोट्या स्टुलांवर आम्ही बसलो.

एका तिबेटी मुलीने तिबेटिअन संस्कृती बद्दल थोडक्यात माहिती दिली. तिच्या सुरकुतलेल्या , उन्हाने रापलेल्या

म्हातार्‍या आईने बाजूच्या चुलाण्यावरच्या भल्या मोठ्या अ‍ॅल्युमिनियम च्या किटलीतून आम्हाला लहान लहान

चिनीमातीच्या कपांमधे चहा. दिला. खोलीतूनच एक अगदी चिंचोळा लाकडी जिना वर चाललेला दिसला. पण

वरच्या खोल्यात जायची मनाई होती.

पूर्वी या खेड्यांतून एक विचित्र प्रथा पाळली जायची. घरात तीन मुली असतील तर तिघींचं लग्नं एकाच मुलाशी

लावून मोकळे होत. जर एखाद्या मुलीला हे मान्य नसेल तर तिला आजन्म कुँवार राहावं लागे.

मुला मुलींच्या प्रमाणात जर मुलांची संख्या जास्त असेल तर एकाच मुलीला चार,पाच मुलांशी लग्न लावावं लागे.

१९५० साली माओ ने सत्तेत आल्यावर या सर्व प्रकारांवर बंदी घातली.

थोड्याच अंतरावर एक मोनेस्ट्री होती

त्याच्या शेजारीच असलेले हे देऊळ

आतल्या भागात बुद्धाच्या शेकडो लहान मूर्त्या भिंतीत केलेल्या शेल्व्ज वर मांडून ठेवल्या होत्या.

मुख्य मूर्ती च्या आसनावर रंगवलेली कलश आणी स्वास्तिक ची चित्रे बुचकळ्यात पाडणारी होती.

देवळात, घरांबाहेर हे चिन्ह वारंवार दिसत राहिलं..

देवळाच्या , घरांच्या दारावर , आतील भिंतींवर या प्रकारची अनेक चित्रे रंगवलेली होती

प्रार्थना करण्याकरता जमिनीवर हाताने विणलेली रंगीत आसने हारीने मांडून ठेवलेली होती

संपूर्ण खेड्यात, देवळाच्या पटांगणात असल्या प्रकारच्या पताका दिसत होत्या. यावरची लिहिलेली भाषा तेथील

माँक्स ना ही अगम्य होती. त्यांनी सांगितले ही तिबेटिअन भाषा आहे म्हणून. त्यावरून इथली जनता तिबेटी

असली तरी नेमलेले माँक्स , हान चायनीज असावेत अशी दाट शंका आली Happy

एक शॉपिंग सेंटर ही होते. तिबेटी माळा, सोविनिअर्स, याक च्या शिंगांपासून बनवलेल्या वस्तू, कंगवे , लोकरीच्या

टोप्या, स्वेटर्स पाहून लहानपणी थंडी च्या मोसमात एम पी च्या लहान शहरांतून भारंभार रंगीत लोकरी कपडे

आणून विकणारे तिबेटिअन लोकांची आठवण आली.

अचानक सोविनिअर्स च्या गर्दीत दिसले ,गाँधी जी के तीन बंदर??? चू>>क!!!

शॉपिंग चे सोपस्कार पार पडल्यावर तिथल्या लोकल घर वजा रेस्टॉरेंट मधे जेवायला गेलो

हे एक तिमजली रंगीबेरंगी घर होते. घराच्या अंगणात आम्हा सर्वांच्या गळ्यात एकेक पिवळ्या सिल्क चा स्कार्फ

टाकून स्वागत करण्यात आले. आमच्याकडून कसलीशी प्रार्थना ओरडून ओरडून म्हणवून घेतली. आतमधे अंधार्‍या ,

चिंचोळ्या जिन्यावरून दुसर्‍या मजल्यावर च्या अनेक खोल्यांपैकी एका खोलीत नेऊन बसवलं . बसण्याकरता लाल

रंगाचे बुटके लाकडी बाक आणी टेबलं होती. आमच्यासमोर लगेच वाफाळते याक बटर टी चे प्याले, सुके मासे

घालून केली वांग्याची भाजी , वाळवलेले, भाजलेले याक मीट, लँब मीट , पानकोबी आणी तोफू चे सूप,

जाड्या तांदुळाचा बेचव भात , उकडलेले बटाटे ठेवण्यात आले. तिथली खासियत म्हणून बार्ली वाईन ही देण्यात

आली. आमच्या बरोबरचे लोकं तसराळ्याने ती पीत होते. चवीला अतिशय गोडमिट्टं आणी वेगळ्याच वासाची ही

वाईन मलातर एक थेंब भर ही नाही घेववली.

तिथे दोन तास तिबेटिअन क्लासिकल संगीत, नृत्या चा तुफानी कार्यक्रम झाला..

नृत्यात टूरिस्ट्सना ही सामिल करून घेतले होते. मधे पेटवलेल्या होळी भोवती सर्व फेर धरून नाचले..

दमून भागून एकदाचे हॉटेलवर परत आलो.. दुसर्‍या दिवशी ही आमचा ग्रुप बरोबर होताच ,' छंग तू'

पर्यन्त. मग काय एअरपोर्ट वर एकमेकांबरोबर फोटो काढणे, फोन नंबर, ई मेल्स एक्सचेंज करणे हे सर्व

कार्यक्रम यथासांग पार पडले .

चिउचायकोउ ते छंग तू प्रवासात पुन्हा एकदा हिमशिखरांकडे डोळे भरून पाहून घेतलं.. नवीन जोडलेल्या

मित्रपरिवाराचा निरोप घेतला आणी समाधानाने मायदेशी परतलो, अर्थातच पुढच्या एखाद्या अश्याच ,' हटके'

ठिकाणाला भेट द्यायचा बेत करत..

समाप्त!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटोज , धन्यवाद वर्षुताई एक सुंदर सफर घडवल्याबद्दल.
एका फोटोत खुप सारे ड्र्मसारखं काहीतरी दिसतं ते फिरवतात का ? काय म्हणतात त्याला ?
गांधीजींच चौथं माकड काही समजलं नाही.

.
श्री.. ते १२ प्रेयर व्हील्स आहेत. तिबेटिअन संस्कृतीत त्यांचे फारच महत्व आहे. यांच्यावर मंत्र कोरलेले असतात. क्लॉक वाईज फिरवल्याने ते मंत्र जागृत होऊन आसपासच्या वातावरणातील सर्व प्रकारच्या निगेटिविटीज ना नष्ट करतात, प्रेमभावना फैलावतात, मुक्ती च्या मार्गातील अडथळे दूर करतात अशी भावना आहे.
आणी पूर्ण गावभर , रस्त्यांच्या कडेने लावलेल्या रंगीत पताकां वर लिहिलेले मंत्र, प्रार्थना ही हीच कामगिरी बजावतात. हे फडफडणारे प्रेअर फ्लॅग्स स्पिरिचुअल वायब्रेशन्स पैदा करतात आणी वार्‍याबरोबर आपल्या मूक प्रार्थना देवापर्यन्त पोचवतात अशी मान्यता आहे.

आणी गांधीजींच्या तीन बंदरांत , अजून एक माकड जोडणे ही संपूर्णपणे चीनी डोक्याची करामात आहे .. वेरी इनोवेटिव्ह हाँ!!!! Happy

Pages