मोदी सरकार आलेले आहे. तळागाळात पोचलेल्या काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्याचे स्वप्न वर्षानुवर्षे पाहणार्या आणि प्रत्यक्षात सत्ता प्राप्त करू न शकणार्या भाजपला ह्यावेळी मतदारांनी सुस्पष्ट बहुमत प्रदान केलेले आहे.
ब्राह्मणांचा पक्ष, संघाच्या तत्वज्ञानावर चालणारा पक्ष, हिंदूत्ववादावर जिवंत राहू शकणारा पक्ष, जातीधर्मांंमधील तेढ वाढवण्यास जबाबदार असलेला पक्ष, राममंदिरासारखे नॉनइश्यूज पेटवत ठेवून त्यावर जिवंत राहणारा पक्ष अशी अनेक टीकात्मक बिरुदे मिरवणार्या भाजपला एकदाचे स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. हे बहुमत असे आहे की निव्वळ भाजप हा एक पक्षच सरकार स्थापन करू शकेल, करेल. सहकारी पक्षांची सरकार बनवण्यासाठी भाजपला आवश्यकता नसेल. १९८४ नंतर प्रथमच संसदेत एक स्पष्ट बहुमतात आलेल्या पक्षाचे स्थिर सरकार असेल. प्रदीर्घ इतिहास असलेला, गांधी नेहरुंच्या वैचारीक साच्यात घडलेला काँग्रेस पक्ष अभूतपूर्व पराभवाला सामोरा गेलेला आहे.
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन आणि कित्येक दिग्गज नेत्यांनी भाजप ह्या पक्षाची धुरा आपापल्या कालावधीत समर्थपणे किंवा जमेल तशी वाहिली. त्यातल्यात्यात अडवानींची रथयात्रा एक प्रकारची नवसंजीवनी देणारी ठरली होती. नरेंद्र मोदींचे वैशिष्ट्य हे की ज्या ज्या आघाडीवर जे जे प्रयत्न करणे शक्य आहे ते सर्व प्रयत्न त्यांनी नेटाने केले. पैसा खर्च करणे, देशभर प्रचार करून देश ढवळून काढणे, सर्व प्रकारच्या माध्यमांंमधून प्रभावी प्रचार करणे हे उपाय कोणत्याही नेत्याने केलेच असते. किंबहुना हे उपाय काँग्रेसनेही केलेच. पण नरेंद्र मोदींचे वेगळेपण अनेक बाबींमध्ये जाणवले. स्वतःचे व्यक्तिमत्व पंतप्रधानपदासाठी बोलीवर लावण्याआधी मोदींनी गुजराथमध्ये अनेक गोष्टींचा कायापालट करून दाखवला. एखादी लाट यावी आणि ओसरून जावी असे आपल्या नावाचे होणार नाही ह्याची खबरदारी घेत त्यांनी अतिशय शिस्तबद्धपणे स्वतःचेच मार्केटिंग केले. पक्षांतर्गत विरोध मोडून काढताना त्यांच्या जमेला गुजराथमधील विजयांची मालिका आणि इतर राज्यांमध्ये त्यांच्याबाबत असलेली 'क्रेझ' या दोन गोष्टी असतील हे त्यांनी नक्की केले. पक्षाबाहेरील लोकांना भाजपतर्फे मोदी पुढे केले जातात की अडवानी ह्या गोष्टीशी आत्ताआत्तापर्यंत घेणेदेणेही नव्हते. पण अचानकच ही परिस्थिती पालटली. अचानक देशभरात मोदी हे नांव असे काही गाजू लागले की अडवानी हे नांव त्याच पक्षातील एका नेत्याचे आहे ह्यापलीकडे अडवानी ह्या नावाची जादूही राहिली नाही. प्रचाराची पातळी स्वतःच्या भाषणांमध्ये तरी घसरू न देता मोदींनी आत्मविश्वासाने व मिश्कील शैलीत भाषणे केली. त्यांची देहबोली गेले जवळपास तीन महिने एखाद्या जेत्यासारखीच होती. पण हे सगळे असूनही, भारतीय मतदाराने केवळ 'मोदींकडे पाहून' भाजपला मतदान केले आहे का?
तर तसे मानायला वाव नाही.
१. काँग्रेसकडे करिष्माई नेतृत्व नसणे! मनमोहन सिंगांना वलय नाही, सोनिया गांधींचे वक्तृत्व 'आपलेसे' वाटत नाही आणि राजीवजींची पत्नी असण्याची जादू फार पूर्वीच संपलेली असणे! राहुल गांधींची प्रतिमा एक अपरिपक्व युवक अशी तयार होणे! राहुल गांधींचे वक्तृत्वही प्रभावी नसणे! इतर सर्वच नेते वरिष्ठ असूनसुद्धा कधी ना कधी गांधी - नेहरू घराण्यासमोर झुकणारेच नेते असल्याचे जनमानसाला ज्ञात असल्याने त्यांनाही काही खास वलय प्राप्त न होणे! थोडक्यात, ह्या सत्तापालटामागे मोदींव्यतिरिक्त जी कारणे आहेत त्यातील पहिले कारण हेही आहे की काँग्रेसकडे तूल्यबळ नेतृत्वच नव्हते. कणाहीन पक्ष झाल्याची भावना सर्वत्र दिसून येत होती.
२. काँग्रेसशी आतून किंवा बाहेरून हातमिळवणी करणार्या पक्षांची व्याप्ती त्यांच्यात्यांच्या राज्यापुरती मर्यादीत होती. त्याशिवाय ह्या पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा खालावलेलीही होती.
३. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये 'मोदींची जादू चालते' हे सामान्य मतदाराला समजलेले होते. ह्या व्यक्तीला केंद्रातील निवडणूकांमध्ये हात दिला, साथ दिली तर काहीतरी बदल घडेल असा विश्वास निर्माण झालेला होता.
४. गेल्या कित्येक वर्षात भाजपकडून प्रथमच फारशी भावनिक आवाहने नसलेला आणि विकासाबाबत मुद्दे असलेला प्रचार झाला. गुजराथ पॅटर्न म्हणजे काय ह्याच्या खोलात कितीजण गेले आणि किती नाही हा भाग वेगळा, पण असे काहीतरी असते आणि इतर देशाला ते मिळू शकत नाही आहे कारण सरकार भाजपचे नाही आहे अशी एक भावना निर्माण झाली.
५. सामान्य माणसाला काहीतरी नवे, ताजेतवाने समोर आले तर आकर्षक वाटते. नैसर्गीकरीत्याच त्याच त्याच नेत्यांना वर्षानुवर्षे निवडून देण्याऐवजी मोदी हा फ्रेश चेहरा पसंत केला गेला.
६. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असलेले देशाचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्या कारकीर्दीत ओलांडले गेलेले अनेक विकासाचे टप्पे, इतर अॅचिव्हमेंट्स ह्या गोष्टींचे मार्केटिंग त्या पदावरील नेत्याने स्वतः केल्यास ते अधिक शोभून दिसते. राहुल गांधी हे 'घराण्यातील व्यक्तिमत्व' एक्झिक्युटिव्ह पॉवर्स नसतानाही काँग्रेस सरकारच्या कारकीर्दीवर भाषणे ठोकत असताना मनमोहनसिंगांचा मुखदुर्बळपणा अदृष्यपणे नकारात्मक प्रभाव टाकत राहिला. त्यातच मेड इन कानपूर, मेड इन मिर्झापूर अशी सवंग व स्वस्त विधाने करून राहुल गांधींनी काही प्रमाणात स्वतःचे हसेही करून घेतले.
७. 'आपण काही ह्यावेळेस जिंकत नाही' ही भावना अनेक काँग्रेसी नेत्यांच्या देहबोलीत जणू आधीपासूनच ठासून भरल्यासारखी आली होती. परिणामतः अनेक काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षातील नेत्यांनी बेताल वक्तव्ये करून जनतेचे मनही दुखावले. सुशीलकुमार, मुलायम सिंग, अजितदादा ही अशीच काही उदाहरणे! जनमानसाची नाडी सापडल्यानंतरही तुम्ही त्यांना बरे वाटेल असे बोलला नाहीत तर काय होते ते ह्या निवडणूकीत सगळ्यांना समजले.
८. तांत्रिक विकास, परकीय गंगाजळी, इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ ह्या तीनही गोष्टींचा सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव पडतोच. 'जे आहे ते काही बरोबर नाही, ह्यापेक्षा अधिक चांगले असू शकते' ही नैसर्गीक मानवी मनातील इच्छा अनेकदा बदल घडवून आणण्यास माणसाला प्रवृत्त करते. ह्याला अनुसरून लोकांनी बदल घडवण्यासाठीही मते दिली. प्रत्यक्षात भारतात जो काही विकास झाला व जो झाला असता पण झाला नाही ते सर्व काही काँग्रेसच्या कारकीर्दीत प्रामुख्याने झालेले आहे. बहुमत मिळाल्यामुळे भाजप पाच वर्षात काही जादू करून दाखवेल हा भ्रम आहे. खरे तर प्रशासनात असल्याची सवय नसलेल्या त्यांच्या कित्येक नेत्यांना नवलाई संपेपर्यंत गोष्टींवर नियंत्रण तरी आणता येईल की नाही असेच वाटत आहे.
९. दलित समाज, मुस्लिम समाज हे काँग्रेसपासून नेमके का दूर गेले (आणि खरंच दूर गेले का) ह्याबाबत मला काहीच समजत नाही आहे. पण असे मानायला वाव आहे की बहुधा ही मतेही काँग्रेसला मिळाली नाहीत.
१०. आम आदमी सारख्या पक्षांना प्रत्यक्षात ह्या निवडणूकीतून काहीच मिळाले नसेल, पण मतदानपूर्व काळात असलेले त्यांचे प्रचारातील अस्तित्व मात्र भल्याभल्यांची झोप घालवणारे होते. ते कोणाची मते खाणार, किती जागा मिळवणार हे प्रश्न डोक्याला भ्यंगा लावत असावेत अनेकांच्या! बरं तडजोडी करण्याइतकी त्यांची पात्रता तरी असेल की नाही आणि असल्यास ते तडजोडी करतील की नाही हेही सांगता येत नव्हते. नेमका आपच्या नेत्यांनी प्रचारही मोदींविरोधात प्रामुख्याने केला. आपोआपच त्यामुळे काँग्रेस आणि आप आतून सामील आहेत की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सरकारात केजरीवालांनी घडवून आणलेले विनोदी 'पथनाट्य' आठवल्यामुळे बहुधा जनतेने ह्यावेळी त्यांना नाकारले.
११. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जसे सिंधूदूर्गमध्ये राणेंना स्थानिक राकाँ वाल्यांकडून विरोध झाला तसाच तो अनेक नेत्यांना देशभरात झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अंतर्गत सत्तापिपासा, मत्सर, कारस्थाने ह्यांनी काँग्रेस व मित्रपक्ष पोखरले असावेत असे सतत 'वाटत' राहिले खरे!
१२. मोदींनी वैयक्तीक व पक्षाचा प्रचार हा एखाद्या बिझिनेस मॉडेलप्रमाणे केला. सर्व माध्यमे, सर्व संभव प्रचारअस्त्रे त्यांनी नियोजनबद्ध रीतीने राबवली.
१३. प्रचाराची नवीन तंत्रे 'अविरत असंतुष्ट असलेल्या' तरुण पिढीला भावली. ही पिढी बाहेर पडली. मतदानाचा टक्का वाढला. हे वय असे असते की जे असते ते लाथाडावेसे वाटते व जे नसते तेच हवेसे वाटते. भाजपने भारताचा तरुण मतदार आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवले.
१४. व्यावसायिक प्रचारतंत्राचा भाग म्हणा किंवा काही इतर, पण क्षणभरही भाजपने 'स्वतःचे काय होणार ह्याबाबत स्वतःच गोंधळलेले आहोत' हे कोणालाही भासवू दिले नाही. सातत्याने जेत्याच्या आवेशात वावरण्याचा परिणाम जनमानसावर निश्चित झालेला असणार!
एकुण काय तर सत्तापालट झालेला आहे. पण तूर्त तरी फक्त भाजप नेते, समर्थक, त्यांचे मतदार ह्या लोकांना एक वैयक्तीक आनंदच झाल्यासारखा दिसत आहे. हा आनंद फक्त एखाद्या सूड घेतल्यानंतरच्या आनंदाशी तुलना करण्याजोगाच आहे. सत्तेत आल्यावर काय काय करू शकणार हे इतक्यात कळणे शक्यच नाही.
कित्येक ठिकाणी काँग्रेसला खातेही उघडता आले नाही असे दिसत आहे. सुशीलकुमारांसारखे दिग्गज स्वतःच्या बालेकिल्ल्यात कोसळलेले आहेत. सोनिया व राहुल ह्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. पण हे सगळे बघताना मनात येते की जो पक्ष गेली सव्वाशे वर्ष भारताच्या कणाकणात स्थान मिळवून होता, ज्याला गांधींसारख्यांचा परीसस्पर्श झालेला होता तो असा कस्पटासमान फेकला कसा काय गेला? ह्याला मोदी लाट म्हणणे हा मतदारराजाचा अपमान ठरेल. मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घेऊन मतदान केलेले आहे. फक्त मोदी हवेत म्हणून नव्हे, फक्त काँग्रेस नको म्हणून नव्हे, फक्त बदल हवा म्हणून नव्हे तर सुजाणपणे, नेत्यांची बेताल वर्तने व भ्रष्टाचार ह्यांचा सूड घेण्यासाठी, आपल्या हातात असलेला मतदानाचा हक्क बजावून आपले सामर्थ्य दाखवून देण्यासाठी मतदान केले गेलेले आहे. तीन दशकांनी आपल्यासारख्याच कोट्यावधी लोकांनी एक स्थिर सरकार पुन्हा आणलेले आहे. बहुतेक आता पाच वर्षे त्रिशंकू सरकारचे भय वाटू नये. मोदी लाट, मोदी लाट असे म्हणून सूज्ञ मतदारांचे श्रेय हिरावून घेतले जाऊ नये.
मात्र भाजपपुढे अनेक आव्हाने आहेत. काँग्रेसपुढे एकच आव्हान आहे. पुन्हा नव्याने बस्तान बसवणे!
सत्तापालटाची कारणमीमांसा, तुमची काही खास मते, माझ्या लेखनात काही तृटी असल्यास त्या, ह्या सर्वांवर अवश्य मनमोकळेपणे लिहावे अशी सर्वांना विनंती!
बाकी ह्या सत्तापालटामुळे परराष्ट्रांच्या मनात काय काय आले असेल ह्यावरतीही येथील तज्ञांनी आपली मते मांडावीत अशी विनंती!
धन्यवाद!
जय लोकशाही!
======================
-'बेफिकीर'!
असे विधान गडकरीन्नी केले ?
असे विधान गडकरीन्नी केले ? तसे असेल तर ते अत्यन्त अपरिपक्व आणि बेजबाबदार आहे.<<< सहमत
गडकरी ने ते वक्तव्य
गडकरी ने ते वक्तव्य उत्तरादाखल दिलेले
अणूबाँब चे वक्तव्य पाकिस्तान कडून आलेले.. कुरापती काढणारे होते
त्यात नविन सत्ता मिळाली असता थोडीफार उर्मी होतेच
टिव्ही डिबेट मधे पाकिस्तान पत्रकारांकडून असे वाक्य येतच राहते त्यामुळे असे उत्तर स्वभाविक आहे
फक्त तुलना चूकीची केली मनमोहन सिंगांनी कधी स्वतःहून पाकिस्तान शी हातमिळवनी केली नाही वाजपेयीं सारखी उलट
संबंध तोडलेले
तुलना वायपेयी सरकार शी केली असती तर योग्य वाटले असते
'संरक्षण मंत्री' म्हणूनही
'संरक्षण मंत्री' म्हणूनही आपला विचार झाला तरी चालेल, हें सुचविण्यापलीकडे गडकरींच्या विधानात फार कांहीं अर्थ शोधूं नये, असं आपलं मला वाटतं !
हा जोर कृपया विधानसभेतही कायम
हा जोर कृपया विधानसभेतही कायम राहो आणि बाबा-दादा(टग्या) चे उच्चाटन होवो ही इच्छा..
आमेन
आमेन
खूप छान आणि संयत लेख लिहिलाय
खूप छान आणि संयत लेख लिहिलाय !
मला एक गोष्ट फार मनापासून
मला एक गोष्ट फार मनापासून वाट्ते ती म्ह्ण़़जे माझ्यासारख्या लोकाना, ज्याना राजकारण जास्त कळत नाही ,,.......त्यानी उद्या congress समजा निवडून आल आणि राहुल गान्धी PM झाला तर देशाचे काय वाटोळ होईल हे विचार करून congress आजिबातच मत दिली नाहीत....:)
आजचं पार्लमेंटरी बोर्डाच्या
आजचं पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीतलं मोदींचं भाषण तरी एका आत्मविश्वास व निर्णयक्षमता असलेल्या, मुत्सद्दी व परिपक्व नेत्याच्या हातात देशाने सूत्र हवाली केलीत याचं आश्वासन देणारं होतं. [ बरीच वर्षं कागद समोर ठेवून वाचावं अशीं मरगळ निर्माण करणारीं भाषणं ऐकून वीट आला होता; कुणीं तरी उत्स्फुर्तपणे, जोषपूर्ण पण नम्रपणे, कांहींतरी भरीव करून दाखवण्याची उत्साही भाषा करतोय व त्यासाठी सर्वाना आवाहन करतोय, हें ऐकूनच जनताजनार्दनाचा कौल योग्य बाजूनेच पडला आहे असं वाटतंय. देव करो अन हें खरं ठरो !! ]
भाउ तुमच्या पोष्टीला लाखो
भाउ तुमच्या पोष्टीला लाखो मोदक!!
माननिय प्रशासक हा काय प्रकार
माननिय प्रशासक
हा काय प्रकार आहे ? हे बेफिकिर म्हनजे राश्ट्रपतिचे दुत आहे का ? हे काहि पन जुलाब केल्यासारक लिहुन ठेवतात आनि दुस-याच्य इथ येउन दमदाटि करतात. हि दडपशाहि नाहि का ? आपन न्याय करावा. आपल्यावर पुर्न विश्वास आहे.
जर हे राश्ट्राति असतिल तर काहि म्हनन नाहि. पन आमच्यसारकेच सामान्य सदस्य असतिल तर सारखि सारखि प्रत्येक ठिकानि वॉर्निन्ग द्यायला यान्चा काय अधिकार आहे याचा खुलासा व्हावा. याना अशे अधिकार असतिल तर म्हनने मागे घेतो पन नसतिल तर याना कन्ट्रोल मधे ठेवावे हि नम्र विनन्ति. त्याना तक्रारि करायच्या असतिल तर आपल्याजवल करायला सान्गाव्यात हि विनन्ति.
Pages