‘वृत्तबद्ध वृत्ती' : स्वामी निश्चलानंद
कुसुमाग्रज,विंदा, मर्ढेकर,दि.पु. चित्रे ,ग्रेस ,बोरकर, रेगे यांच्यावर पोसलेला पिंड घेऊन कविता लिहायला सुरुवात केली होती खरी ,
त्या कवितांतली कधी लयतत्वे,कधी मुक्ततत्वे मूळ रसतत्वात एकजीव होऊन भावली होती खरी,
घरात व्याकरणाच्या पुस्तकांची कमी नव्हती खरी,
पण वृत्तबद्ध कवितेकडे गांभीर्याने पाहण्यासाठी एका संन्यस्त कवीची गाठ पडावी लागली.
स्वामी निश्चलानंद.
त्यांचा ‘वृत्तबद्ध वृत्ती- माझ्या वृत्तबद्ध रचना ‘ हा पहिलाच कवितासंग्रह माझ्यासमोर आहे.रूपाली पब्लिशिंग हाऊस, कोल्हापूर यांनी ४ जानेवारी २०१४ रोजी सासवड येथील साहित्य संमेलनात प्रकाशित केलेला.संग्रहात एकसष्ट कविता आहेत,जवळपास तितकंच स्वामींचं वय असावं असा अंदाज . मनोगतात गेली पस्तीस वर्षे संन्यस्त जीवनात उत्तर भारतातील वास्तव्यात मराठी कवींच्या समृद्ध रत्नभांडारातल्या वृत्तबद्ध कवितांनी केलेला संस्कार मनात जिवंत राहिल्याचा उल्लेख स्वामींनी केला आहे.
वृत्तबद्ध वृत्तीचा असा जाणीवपूर्वक शीर्षकात,मनोगतात केलेला उल्लेख एका प्रदीर्घ ध्यासाचा,अभ्यासाचा परिपाक आहे. इथे कवितेसाठी वृत्त नाही,वृत्तासाठी कविता आहे.म्हणून तर नव्या पिढीचं लक्ष आक्रमक आग्रहाने वेधून घेण्याची शक्ती या व्यक्तिमत्वात आणि त्यातून अंकुरलेल्या कवितेत आहे.एरवी ती कविता तिच्यापुरतीच राहिली असती.अनेक श्रेष्ठ पूर्वसूरींनी काय वृत्तबद्ध लेखन केलं नाही ? ते त्यांच्यात्यांच्या संग्रहात वाचायला मिळतंच की आपल्याला.
शिवाय ,आज जागतिक कवितेतच विच्छिन्न आणि व्यामिश्र जाणिवांचा काळ आलेला असताना जुन्या वृत्तांचं पुनरुज्जीवन ही गोष्टच प्रतिगामी वगैरे वगैरे वाटण्याची बरीच शक्यता आहे. असा आरोप करून वृत्तबद्धतेच्या कडक शिस्तीतून मोकळे होणे अधिक सोपेही आहे !
इथे या निमित्ताने मूलत: स्वतःलाच केलेला एक प्रश्न. का लिहायची वृत्तबद्ध कविता ? आजवर मनात साठलेलं संपृक्त आशयद्रव्य कवितेतून स्फटिकीकृत होत आपोआप अवतरताना अनुभवलं त्याचा थरार इतका होता की कोणत्याही प्रकारची कृत्रिमता, संस्करण कवितेवर करणं या गोष्टी कविताधर्माशी विसंगत अशी माझी स्वत:चीच तर धारणा होती.आणि आता इथे अत्यंत जाणीवपूर्वक प्रत्येक शब्द अवतरतो आहे ! पण लिहिताना अनुभव असा आला की तेच जुनं आशयद्रव्य आता निरनिराळ्या साच्यांमध्ये सुखाने पाझरतं आहे, हीसुद्धा अस्सल निर्मितीप्रक्रियाच आहे , हिच्यातही अथांग आनंदमय प्रतिभा एक वेगळा खेळ खेळते आहे.हेही सुंदरच घटित आहे.
शिवाय , कुणी सांगितलं की वृत्तबद्ध लिहिणं म्हणजे कवितेच्या इतर सर्व रूपकळांशी फारकत घेणं ! कविता म्हणजे जगण्याची समग्रता, या समग्रतेत सामावलेली वृत्तबद्ध कविता म्हणजे सौंदर्यशाली वैविध्यपूर्ण आकृतिबंधांची लयलूट ,तालबद्धतेचे कानामनात रेंगाळणारे संस्कार,एक समृद्ध सांस्कृतिक संचित ,जे जपायचं आहे,त्याचं संवर्धन करायचं आहे .
आणि होय , समकालीन आशय या आकृतीबंधात उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे !
पण ही सोयीस्कर समन्वयवादी भूमिका स्वामीजींना तितकीशी समाधानकारक वाटत नाही.
कवितेसंबंधी त्यांची धारणा अगदी दुसऱ्या टोकाची आहे. त्यांचे म्हणणे तसे अगदी साधे आहे. लय हे निसर्गाचं आणि जीवनाचं प्राणभूत तत्त्व आहे. झऱ्याचं झुळझुळणं , समुद्राची गाज , वाऱ्याने होणारी पानांची सळसळ,अगदी आपल्या हृदयाची धडधड हे सारे निसर्गातले ध्वनी लयबद्ध असतात. याला अपवाद नैसर्गिक प्रकोपांचा.पण तो अपवादच, मूळ नियमाला अधोरेखित करणारा.
असं असल्याने , स्वामीजी प्रतिपादन करतात की वृत्तबद्ध कविता हीच नैसर्गिक कविता आहे ! मुक्तच्छ्न्दाच्या नावाखाली गद्यमय कविता लिहिणे हाच कवितेच्या निसर्गाशी विद्रोह, कृत्रिमता आहे! याविषयीच्या चर्चेतील त्यांचेच शब्द उद्धृत करायचे तर –
‘’ एका मुद्यावर मात्र माझा दृष्टिकोण सर्वस्वी वेगळा आहे. जे काही नैसर्गिक असतं, ते लयबद्धच असतं.... निसर्गातले भूकंप, विजेचा कडकडाट, ज्वालामुखीवगैरे अपघात वगळता बाकीचे सर्व ध्वनि लयबद्धच असतात.... त्यामुळे आमचे मनोभाव अत्यन्त नैसर्गिकपणे व्यक्त झाले तर ते तेही स्वाभाविक रीत्या लयबद्ध - वृत्तबद्ध असायला हवेत, असं माझं मत आहे. त्यामुळे वृत्तबद्ध लिखाण हे माझं "मिशनरी कार्य" नसून माझ्या भावनांची नैसर्गिक अभिव्यक्ति वृत्तबद्धच असते, हा अनुभव आहे.....! यातला आणखी एक बारकावा असा की रचनेच्या आशयानुसार तितक्याच सहजतेने वृत्ताची लय तयार होते, तो आशयच वृत्ताची निवड करतो..... हाही अनुभव. ऑर्कुटच्या एका समूहात अष्टाक्षरीचे धडे देण्यासाठी काही रचना करायचं ठरवलं तेंव्हा लक्षात आलं की एकेका वृत्ताची लय मनात गुणगुणत असताना त्या वृत्तानुरूप आशय शब्दबद्ध होत गेले...!’’
तर ‘वृत्तबद्ध वृत्ती’ मागची कवीची भूमिका ही अशी आहे.लयीला अनुसरत आशय जिथे प्रकटतो त्या पातळीपर्यंत कवीला जायचे आहे.हे अभ्यास आणि ध्यास यातून साध्य होत असतं..
कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावरचं काचेच्या ताशीव अगणित पैलूंचा झळाळ मिरवणारं, सोनेरी प्रकाशात न्हायलेलं पारदर्शी क्रिस्टलचं कमळ स्वामींनीच कॅमेराबद्ध केलेलं आहे आहे.वृत्तबद्ध कवितेत एकएका शब्दाची अशी पैलूदार नितळ घडण जपत आशय शिल्पित करायचा असतो.सर्व शब्दांचा मिळून एकारलेला झगमगता डौल असतो.
एकूण प्रमुख अक्षरगणवृत्ते, मात्रावृत्ते व प्रचलित छंद यांची संख्या शंभराच्या घरात सहज जाईल असं स्वामीजी सांगतात..त्याबद्दलच्या आपल्या शंकांना समाधानकारक उत्तरे त्यांच्याकडूनच मिळतात.उदा. मघा उल्लेख झालेला अष्टाक्षरी हा आठ अक्षरे असलेला छंद आहे, छंदांमध्ये अक्षरसंख्या हा निकष असतो.याअंतर्गत लघुगुरूक्रमानुसार मग अनेक वृत्ते अष्टाक्षरीच्या अंतर्गत येतात. अष्टाक्षरी (अनुष्टुप्) चे विविध भेद चित्रपदा, माणवक, विद्युन्माला, समानिका, प्रमाणिका, गजगति, हंसरुत, नाराचिका, गर्भवती व अनुगीत या सर्व वृत्तांत स्वामीजींनी अष्टाक्षरीचे धडे देण्यासाठी अन्यत्र काव्यलेखन केले आहे !
संस्कृत साहित्य, व्याकरण ,छंद:शास्त्र आणि काव्यशास्त्राचा दांडगा व्यासंग असलेल्या स्वामींनी अशी अनेक अपरिचित वृत्ते , उदाहरणार्थ अष्टाक्षरीची नाराचिका व सामानिका ही वृत्ते,तसेच अन्यही वृत्ते - गंगोदक, मत्तकोकील, तोटक,क्रीडचंद्र ,चंपकमाला, श्रवणाभरण आदि या संग्रहातून मराठीत आपल्यासमोर ठेवली आहेत.
स्वामीजींनी निरनिराळ्या वृत्तांत अगदी दैनंदिन जीवनातला आशय हाताळला आहे. अगदी सुरुवातीलाच त्यांच्या श्रवणाभरण वृत्तातील (लललल गालल गालल गा ललगा ललगा ललगा )‘दिवस उजाडत ‘या रचनेचं एक कडवं – इथे एक नोंद करावीशी वाटते -विलक्षण शब्दप्रभुतेतून ते शब्दांची नवी आल्हाददायक रूपे बनवतात, वृत्ताच्या कोंदणात ती बसवतात.( जसे , या कडव्यातील चांदण हा शब्द, चांदणी या शब्दाऐवजी योजलेला )
‘’लुकलुक चांदण मावळते हळु , झुंजुर गार हवा सुटता
लखलख शुक्र मलूल पडे जणु पश्चिम गाठत मावळता
सळसळ वेळूबनातुन ऐकत बावरली टिटवी उडते
दंवभरल्या गवतात थरारून पान शहारत पाझरते ‘’
पहिल्याच कडव्यातील या चार ओळींमध्ये जणू तीन मिती असलेले एक चित्र श्वसते आहे. एका अ-नागर , निसर्गरम्य वातावरणातील पहाट तिच्या सूक्ष्मभव्य रंग-ध्वनीचित्रांसह आपल्या संवेदना वेढून घेते आहे. श्रवणाभरण हे वृत्तच ( कानातल्या चालताना डुलणाऱ्या लोंबत्या आभूषणासारखी) लडिवाळ लय असलेले आहे, मराठीत कमीच वापरले गेलेले. स्वामीजींनी त्याची मनोहारी शक्ती ओळखून ते इथे असे योजले आहे की त्या वृत्तात लिहायचा/ लिहिलेले अधिक वाचायचा मोह आपल्याला पडावा.
तसेच गंगोदक वृत्तातील ( गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा गालगा ) पल्लेदार अन गतिमान लयीचा भयभावनेच्या आविष्कारासाठी वापर करणारी ही एक प्रभावी रचना –‘’एकटे चालता सांजवेळी’-
आपण ओळीतल्या जणू पाठलाग करणाऱ्या पावलांसारख्या लयीतूनच घेरले जातो..एक अज्ञात अनाम भय पाठलाग करते आहे..
-एकटे चालता सांजवेळी कसे लोपते धैर्य अन संभ्रमाची स्थिती
हालते पालवी , वाट अंधारली,पान वाजे तरी चाहुलीची भिती
खुट्ट वाजे जरासे , मना वाटते आपली सावली का भुतासारखी
एरव्ही हिंमतीचे बडे बोलणे सर्व शक्ती कशी आज हो पारखी ‘’
मात्रावृत्त वनहरिणी ( ३२ मात्रा, ८+८+८+८ अशा चार टप्प्यात एक ओळ पूर्ण होते ) नावाप्रमाणेच द्रुत लयीतले. या वृत्तात कथानक शोभून दिसते , उत्कंठेचा परिपोष होतो.स्वामीजींच्या अनेक रचना या वृत्तात आहेत, त्यातील काही फेरफटक्याला निघाल्यावर दिसणाऱ्या निसर्गशोभेवर आहेत.पण ‘मृत्युपत्र’ या नावाची एक सुंदर रचना आहे.ती कथनात्म तंत्राचा अवलंब करणारी आहे.एका अनिकेत अतिवृद्ध दरिद्री माणसाचे त्यात वर्णन आहे. त्याची स्थिती, त्याची भ्रमंती,त्याचा बेवारशी मृत्यू आणि त्याच्या मळक्या फाटक्या पडशीत सापडलेले ‘मृत्युपत्र’!
- उशाखालची पडशी काढुन पोलिस पाही उलटुन सारे
काही बोळे , सुकी भाकरी, पुरचुंड्या अन दाणे खारे
गुंडाळीच्या मधून निघती पाकिटातल्या नोटा काही
सोबत त्यांच्या एक चिठोरा , ओळ लागुनी पसरे शाई
इतकं साधं अन प्रभावी वर्णन ! आठ कडव्यांचा बाज असाच कथेच्या प्रवाहासारखा , जणु गद्यानेच पद्याचे स्वरूप सहजतेने घेतले आहे. ही सहजता हा स्वामीजींच्या शैलीचा एक विशेष आहे.ही सतत चिंतनातून आली आहे.
ही सहजता भाषा-शैलीप्रमाणेच विषय-वैविध्यातूनही प्रकट होते.दैनंदिन जीवन अगदी बारकाव्यांसह अनेक वृत्तांच्या चित्र-चौकटीत निमूट उभे राहते !
वृत्त चंपकमाला मराठीत विशेष वापरले गेलेले नाही.’’गालल गागा गालल गागा ‘ असा साधा अन मोहक परिवेष धारण करणाऱ्या या वृत्तात तशाच मोहक लाघवी भावनांचा आविष्कार ‘ऐक जरा ना ‘ या रचनेत आहे.(याच नावाची इंदिरा संतांची एक रचना उगीच ही कविता वाचताना आठवली होते, पण त्या गूढगर्भ उदासीचा या रचनेतील प्रणयोत्सुक भावाशी दुरूनही संबंध नाही..)
‘’झांजर वारा कातळमाळी
भोकर बोरे काजळजाळी
चाखुन घेता माधुर ओठी
बोलत जाऊ लाघव गोठी
ऐक जरा ना..’’
पंचचामर वृत्तात (लगालगा लगालगा लगालगा लगालगा ) वीरभाव अधिक खुलतो.निसर्गाचं रौद्ररूप प्रत्येक ऋतूत वेगळ्या प्रकारे सत्ता करतं ..’निसर्गचक्र‘चं पहिलं कडवं वानगीदाखल -
‘’प्रचंड सूर्य तापला , उन्हात पेटती दिशा
जमीन भाजुनी तिच्या उफाळती झळा कशा
तहानल्या जीवांस ना मिळे कसाच आसरा
जलाशयात कोरड्या कुठेच ओल ना जरा ‘’..
ग्रेसांच्या कवितेचा अर्थ लावण्यात रमणारे स्वामीजी स्वत;च्या कवितेत मात्र सुस्पष्ट आशयसूत्रांचाच पाठपुरावा करताना दिसतात , हा त्यांच्या रोखठोक स्वभावधर्माचा विशेष आहे, पण त्यामुळे कळण्या न कळण्याच्या सीमेवरील असं काही व्यक्त करणं राहून गेलं आहे असं आपल्याला मात्र वाटत राहतं ..
अनेक रचना उपदेशात्मक आहेत, जीवनात काय करावे, काय टाळावे हे सांगणाऱ्या आहेत , देशकालस्थितीवर भाष्य करणाऱ्या आहेत. हा कवीच्या ‘स्वामी’ या गुरुत्वदर्शक जाणिवेचा भाग आहे. या प्रकारच्या सर्वच रचना अगदी अंतरंगीच्या रंगातल्या, सशक्त अशा आहेत. व्यक्तिगत स्तरावर मानसिक दुर्बलतेचा आणि सामाजिक स्तरावर बुजबुजलेल्या दुर्जनतेचा धि:क्कार करणाऱ्या आहेत.
‘’सहज जगत जाणे का न यावे कुणाला
फिरून फिरून का रे दु:ख दावा जगाला
अजब कसब झाले याचना सांत्वनेची
सतत करून घाई लक्तरे टांगण्याची ‘’ ( मालिनी वृत्त ) ,
किंवा
‘’देश झाला कोंडवाडा , राखणी चोरांकडे
मार सावांना पडे
आज सत्तेची चुलाणे दुर्जनांनी बांधली
मेजवानी रांधली ‘’ ( अर्धसमवृत्त भ्रांत ) ही काही उदाहरणे.
असं जरी असलं तरी निसर्गाचे कोमल आविष्कार , हळुवार भावना , प्रणय, प्रतीक्षा,वात्सल्य , कौटुंबिक विवंचना सामाजिक समस्या, लहान मुलांचं हरवलेलं बाल्य या सर्व अनुभूती कवीच्या संवेदनांना नेहमीच स्पर्श करतात. कवीच्या भूमिकेतून त्या स्वामीजींनीही टाळलेल्या नाहीत ..ही एक प्रकारे सांकेतिक व्यूहांशी बंडखोरीच आहे.
‘’नका पाकळ्यांनो सडा अंगणी या पहाटेच सांडू
नको रे दंवा थेंबनक्षी पुन्हा उंच जाळ्यात मांडू
नको स्नान केल्यावरी गार वाऱ्या असे अंग झोंबू
नका पुंजक्यांनो ढगाच्या निळ्या आसमंतात लोंबू ..’’
क्रीडचंद्र वृत्तात (लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा ) व्यक्त झालेली ही साजणाची व्याकूळ प्रतीक्षा.
पण हे भावदर्शन म्हणजे केवळ त्यांच्या कवितेशी असलेल्या बांधिलकीतून आलेल्या भूमिकेचा भाग आहे. असं असल्यामुळे अगदी हक्काच्या संन्यस्तवृत्तीवरची ‘’माझी सारी चिंता त्याला ‘ असं खणखणीतपणे सांगण्याचा त्यांचा अधिकार शिल्लक राहतो.
याच्यासाठी त्याने गावे
त्याचे गाणे याने व्हावे
घेण्यादेण्याचे ना दावे
कोणी माझे का रे व्हावे ?
माझे येथे कोणी नाही
एकाकी मी माझा राही
पोटासाठी भिक्षा घेई
वैराग्याचे गाणे गाई .. ( वृत्त विद्युन्माला – ‘गागागागा गागागागा “)
अनेक दुर्मिळ वृत्ते आणि अनेक अस्पर्श विषय .. स्वामीजींच्या भाषाप्रभुत्वाला कसलाच अडसर नाही.संस्कृत आणि इंग्लिश या दोन्ही ‘स्वामि’त्व गाजवणाऱ्या भाषांचा, अनेक ज्ञानशाखांचा सारखाच व्यासंग असल्यामुळे एक बहुआयामी परिशीलनाची सखोलता त्यांच्या कवितेत उतरली आहे.
शेवटी ,ऐन उमेदीत भगवी वस्त्रे धारण करून घेऊन हिमालयगमन करणारे एक संन्यासी स्वत:तल्या कवीपणाचा एक अलिप्त आविष्कार या संग्रहातून करत आहेत , स्वत:च्या अभिव्यक्तीपेक्षा वृत्तबद्ध कवितेची अभिवृद्धी हा त्यांचा हेतू आहे, आणि त्यांचा हा वेगळ्या प्रकारचा परम-अर्थ अनेक पातळ्यांवर यशस्वी झाला आहे..
भारती बिर्जे डिग्गीकर
ऊत्तम परिचय !!
ऊत्तम परिचय !!
वा ! उत्तम परिचय. वृत्तबद्ध
वा ! उत्तम परिचय.
वृत्तबद्ध कविता हा माझाही जिव्हाळ्याचा विषय आहे.
उदाहरणादाखल दिलेल्या सगळ्याच कविता खूप सुंदर आहेत.
वृत्तातच कविता होणे हा सहजभाव असल्याचे जाणवतेय.
धन्यवाद.
आम्हाला शाळेत 'वृत्ते'
आम्हाला शाळेत 'वृत्ते' शिकवताना ईतकी उदासपणे शिकवली जात, की ४ मार्कांचा प्रश्न, म्हणून त्याकडे पाहिले जाई. नाही म्हणायला मालिनी, मंदाक्रांता, शार्दुलविक्रीडित,वसंततिलका यांची तोंडओळख करून दिली जाई, पण त्यातले बारकावे आणि सौंदर्य याची जाणीव आत्ता कुठे होत आहे.
जाई,चैतन्य, रमा,या काहीशा
जाई,चैतन्य, रमा,या काहीशा क्लिष्ट वाटू शकणाऱ्या विषयात तुम्हाला,तुमच्या वयोगटाला स्वारस्य वाटावं हेच आशादायक आहे . धन्यवाद.
मस्त लेख! एकूण प्रमुख
मस्त लेख!
एकूण प्रमुख अक्षरगणवृत्ते, मात्रावृत्ते व प्रचलित छंद यांची संख्या शंभराच्या घरात सहज जाईल असं स्वामीजी सांगतात..... ह्या वृत्तांच्या एकत्रित ओळखीसाठी एखादे पुस्तक सुचवाल का?
हर्पेन कवी माधव ज्यूलियन
हर्पेन
कवी माधव ज्यूलियन यांनी लिहिलेले छंदोरचना पुस्तक आहे.
इथे ते ऑनलाईन वाचता येईल.
धन्यवाद चैतन्य
धन्यवाद चैतन्य
स्वामीजींची ओळख खुप सुंदर आणि
स्वामीजींची ओळख खुप सुंदर आणि तपशीलवार करून दिलीत ताई. सासवडला त्यांना जवळून बघितलं होतं, पण ओळख मात्र आज झाली. 'दिवस उजाडत' अथपासून इतिपर्यंत अत्यंत आवडलेली रचना आहे.
रमा म्हणते तसंच मीही म्हणेन, शाळेत वृत्तांची फक्त भिती बसण्याचे मुख्य काम झाले. धडे, कविता, निबंधांची केलेली उत्तम तयारी परिक्षांच्या वेळी ही वृत्ते खाऊन टाकत.. खरं तर मराठी शिकवणारे सारेच शिक्षक-शिक्षिका कवितांचे आणि एकंदर साहित्याचेच उत्तम जाणकार होते, शिकवतही चांगलं, तरीही असं का व्हावं कोण जाणे. असो.
छान ओळख. खुप वर्षांनी परत
छान ओळख. खुप वर्षांनी परत कविता वाचाव्याश्या वाटतात ते याचमूळे.
वृत्ताची एक लय असते आणि चांगल्या कवितेत त्या मात्रांसाठी काही कसरत करावी लागलीय असे वाटतच नाही.
धन्यवाद सर्वांचे ! हर्पेन
धन्यवाद सर्वांचे !
हर्पेन तुमचा प्रश्न महत्वाचा आणि त्यामुळे चैतन्यने दिलेली लिंक खूपच मोलाची आहे . या विषयावर स्वामीजीही पुस्तक लिहिणार आहेत असं ऐकल्याचं आठवलं ..
पंचचामर आणि कलिंदनंदिनी वृत्त
पंचचामर आणि कलिंदनंदिनी वृत्त एकच का ?
म भा दिनानिमित्त स्वामीजींनी
म भा दिनानिमित्त स्वामीजींनी केलेल्या वृत्तबद्ध कविता ऐकताना खरंच रंगून व्हायला झालं. अत्यंत सोप्या समजणाऱ्या भाषेत आशय व्यक्त होतो हे तुम्ही म्हणताय ते अगदी प्रत्येक ओळीत जाणवलं. लयबद्ध छंदातल्या कविता (बारकावे न समाजता ही) वाचायला गुणगुणायला आवडतात.
हे पुस्तक वाचायला आवडेल. कुठे उपलब्ध आहे?