चिकन पटाखा(तेलाशिवाय)

Submitted by देवीका on 25 April, 2014 - 05:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

हि तेलाशिवाय करायची कृती आहे. चवीला झणझणीत पण मस्त वाटते एखादी तंदूरी रोटी किंवा नान असेल तर. ब्रेड्/पाव वगैरे सुद्धा मस्त जातील. तयारी जरा करावी लागते.

१ किलो चिकनचे तुकडे.
२ मोठे चमचे हिरवी चटणी: पेरभर आलं, लसूण(८-९ पाकळ्या), १ मूठी कोथींबीर धूवून निवडून, २-३ हिरवी मिरची, १ मूठी पुदीना धूवून साफ निवडून घेवून गंधासारखे वाटून.
१ मोठा कांदा उकडून वाटून
पटाखा मसाला: २ चमचे धणे, १ चमचा जीरं, पाव चमचा बडीशेप, पाव पेक्षा निम्मी काळंमिरी, पेरभर दालचिनी तुकडा, ३-४ लवंग, १ फूल जायपत्री, १ बडी वेलची, १ चहा वेलची असे वेगवेगळे भाजून पूड करून घ्यायची. वरील पूड १ मोठा चमचा घेवून त्यातच आपल्या सोसेल अशी व आवडीप्रमाणे तिखट लाल मिरची भिजवून वाटायची. १ चमचा रंगाला म्हणून काश्मिरी तिखट किंवा देगी मिरची पूड टाकावी. आता हा ओलसर मसाला तयार करून ठेवायचा.
२ मोठया वाटया घट्ट दही भरपूर फेटून एकजीव करून,
मीठ चवीला

क्रमवार पाककृती: 

आदल्या दिवशी रात्री चिकन साफ करून आधी हळद लावून मग पटाखा मसाला मस्त चोळून ठेवावा व चिकन बाहेरच ठेवावी.
१ तास वाट पाहून त्याला हिरवी चटणी लावावी. मग त्यातच कांदा पेस्ट घालावी मस्त कालवावे जिन्नस मग चिकन काचेच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावी.
दुसर्‍या दिवशी सकाळीच बाहेर काढून फेटलेले दही घालावे व आता चिकन बाहेरच ठेवावी. दोन तास मुरवावी.
दोन तासाने पुर्ण चिकन टोपात घालून , टोपाच्या कडेला कणीकेने बंद करून वरून झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवावी. खाली लागायची भिती असेल तर झाकणावर पाणी ठेवायचे. पण आत अजिबात पाणी टाकू नये.

चिकन शिजल्याचा वास सुटेल आपोआप. तसेही चिकनला २०-२२ मिनिटेच लागतील. मुरलेली असल्याने पटकन शिजेल.चिकन अप्रतिम लागते.

अधिक टिपा: 

दही चांगल्या प्रतीचे व घट्ट असावे.
आता ताजे काजू मिळतात ते सुद्धा घालू शकता.
चिकन शिजले की त्यातच सोललेली उकडलेल्या अंडयाचे काप टाकावे. वाढताना एक अंड देवु शकता.
नेहमी सारख्याच कांदा चकती, टोमॅटो व लिंबू काप देवून वाढावी.
मसाला पापड सुद्धा बनवु शकता.

खास शाकाहारीसाठी: कच्चा बटाटा मुरवून घाला. Happy पनीर घालू शकता, उकडलेले छोले ह्या मसाल्यात ठेवून आणखी मुरवून चवीष्ट बनवु शकता. सर्व कुर्मा भाज्या घालून बनवु शकता.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशिका१३०५: मी वरती लिहिलेय प्रमाण मसाल्याचे. इतरांना करताना उपयोगी होइल. लाल मिरची तिखट असेल तर तुम्हाला सोसेल इतकी घ्या. म्हणून मुद्दाम बोल्ड केलेय की प्रत्येकाला सोसेल तशी हिरवी व लाल मिरची घ्यावी. आम्ही तिखट खातो बर्‍यापैकी. आमच्याकडे बुटक्या लाल तिखट मिरच्या असतात. परत घरचे तिखट(मालवणी कोंबडी मसाला) असतेच.

वर्षू_नीलः धन्यवाद प्रतिसादाबद्दल व आठवणीने सांगितल्याबद्दल.

देवीका, मंद आचेवर किती वेळ ठेवावे चिकन?
हे ग्रेवी होते की ड्राय?
ड्राय झाल्यास भाताबरोबर आणखी वेगळं काही करावे लागेल.

साती,
चिकन शिजल्याचा वास सुटेल आपोआप. तसेही चिकनला २०-२२ मिनिटेच लागतील. मुरलेली असल्याने पटकन शिजेल.
दह्यावर अवलंबून आहे. दही घट्ट असेल तर ग्रेवी कमी होइल. जरी दही घट्ट असले पण जरा ज्यास्त प्रमाणात घेतले तर ग्रेवी होइल बर्‍यापैकी. दही फेटून घाला मग मिळोन्न येइल चिकन.

मी कधी कधी दही जरा ज्यास्त टाकते दुसरं काही करायच्या एवजी.

देवीका बघते.
पटाखा मसाला वाटून ठेवलाय.
पण आमच्याकडे टिपीकल रत्नागिरी पद्धतीने नारळाच्या दूधातलं सुकं चिकन आणि मालवणी/ रत्नागिरी टाईप कांदा खोबर्याची ग्रेवी एवढंच खायची सवय आहे.
हा पटाखा कसा उडतो ते आता उद्या कळेलच.
Wink

मालवणी/ रत्नागिरी टाईप कांदा खोबर्याची ग्रेवी एवढंच खायची सवय आहे............अगदी! त्यामुळे थोड्या पिसेसचे पटाखा करून बघणार.फक्त मॅरिनेशनला फारच कमी वेळ मिळेल.कारण चिकन उद्या घरी आणले जाईल.

.

पटाखा फूस हुई गवा.पीसेस एक बाजूमा और बहुत पानी दुसरी बाजूमा ! माझं काही तरी चुकलं असेल.दही गाईच्या दुधाचे होते.त्यामुळे पातळ झाले का? मी_ मस्तानीच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे दाट पणा नाही.

दही हे घट्ट असावे व पुर्ण फेटून घेतले न्हवते का?

मी गायीचेच वापरते. पण ग्रीक दही वापरते जे घट्ट असते. फेटून नसेल घातले व पाणी असेल तर ते फाटते.
पाणी कशातही न घालता करावे कारण तेल नाहीये. हिरवी चटणीत बेताचेच पाणी घालून वाटावी.पाणी न टाकता कांद्याची पेस्ट हि नुसती वाटावी.

पटाखा मस्तं झाला.
काल दुपारी केलं होतं हे चिकन.
दुपारपेक्षा रात्री मुरल्यावर छान लागलं.
सगळ्यात भारी काय तर मस्तं तर्री आली होती तरी तेलाच्या बाटलीतलं तेल तसंच होतं. Wink

धन्यवाद.

देवकी आपल्याकडचे गाईच्या दुधाचे दही पातळच असते. परदेशातले घट्ट आणी क्रिमी असते. ग्रीक सगळ्यात भारी. थोडेसे गॅसवर फुल फ्लेमवर परत शिजवुन बघ. पाणी आटेल.

देवीका, रश्मी,
पटाखा केल्या केल्या इथे पोस्टलं. चटणी/कांदा यामधे पाणी घातलेच नव्हते.थोडे आटवले.जेवताना पाहिले तर व्यवस्थित होते.छान झाले म्हणून रिपोर्ट मिळाला.पुढच्यावेळी नक्कीच करेन.
आज लिहितेय,कारण नंतर नेटचा प्रॉब्लेम होता.
कहर म्हणजे माझ्या बाईनेदेखील माझ्याकडे मा.बो.वाचून पटाखा केला .तीपण सातीप्रमाणेच म्हणत होती की एवढी तर्री कशी आली.तिचा पटाखा मस्त झाला होता.आम्हा दोघींकडून धन्यवाद!

कांदा कसा शिजवायचा? १) कांदा(सालासकट) गॅसवर भाजायचा.वांगे भाजतो तसे.२) कांदा कापून कढईमधे कोरडाच
भाजायचा.

एवढी तर्री कशी आली
<<
दह्यातल्या लोण्याचे तूप झाले असणार.

एवढी तर्री कशी आली
<<
दह्यातल्या लोण्याचे तूप झाले असणार. >> असु शकते. पण तर्रीचे मेन कारण चिकन मधली चरबी असु शकेल.

आम्ही सायीचे दही वेगळे लावतो त्यामुळे या साध्या दह्यातलं इतकुस्सं लोणी जर इतकं छान चिकन बनवणार असेल तर चालेलच.
वर्षा, मलाही असेच वाटते.
कारण मी फॅट, बोन्स सगळेच घातले होते.

जरा वेगळी रेसिपी सांगतो,
कांदा आले हीमी टोमॅटो उकडून त्याची पेस्ट करायची व चिकनला लावायची. त्यात व्हीनेगर ,मीठ टाकायचे .आठ दहा तास मुरवायचे.
लोणी तापवून त्यावर खोबरे खसखस लसूण व कोथिंबिरिचे वाटण तेल सुटेपर्यँत परतायचे, यात चिकन टाकून मोठ्या आचेवर परतायचे .
काजू पेस्ट ,थोडे दही, नारळाचे दूध टाकून लपथप शिजवायचे.

खोबरे, खसखस, काजू, दही, नारळाचे दूध्, लोणी... माणूस (कायमचा)स्वर्गात पोचलाच हे खावून. Proud

(ह. घ्या.)

पनीर वापरून 'पनीर पटाखा' मस्त झाला! भाजीचा रंग हिरवा आला होता. साधेच तिखट वापरल्याचा परिणाम असावा. चव छान! जसजसा भाजीत मसाला मुरत जातो तसतसा स्वाद जास्त खुलतो. बिर्याणीसमान.

>>या पदार्थाशिवाय चव येणार नाही ,पण महागाई वाढलीय.( हलके घ्या.)<<
तसेही हे महागाचे खावून नंतर महागातच पडणार...(डॉकची बिले देवून कोलेस्टेरॉल कमी करा... वगैरे).
बरं, असो.
सॉरी देवीका.. विषयांतर झालं.

बर्रेच दिवस लिस्टवर होती. फायनली या विकेंडला स्लो कुकरमध्ये केली. मी चिकनचं फॅट काढलंय म्हणून असेल तर्री नाही आहे पण एकंदरीत तेलाची उणीव भासली नाही. कुणाला फोटोत दिसत असेल तर मी पोटॅटो मेडले आणलं होतं त्यातले पर्पल पटेटोज इकडे चिकनबरोबर खपवले. तिखटाचं प्रमाण बच्चे कंपनीच्या हिशेबाने असल्यामुळे तेही दिसतंय. विकेंडच्या धामधुमीत प्रत्येकवेळी बाहेर खायचं नसेल तर ब्येस्ट रेसिपी आहे. रात्री तयारी करून सकाळी लावून गेलं की अ‍ॅक्टिव्हीट्या होईस्तोवर घरी चिकन शिजत राहतं.

Cpatakha.JPG

आभार्स देवीका. Happy

Pages