***आधीच्या लेखाच्या प्रतिक्रिया मी वाचल्या आहेत. इतिहासाचे काही factual तपशील तर त्यावर विस्ताराने लिहावे. उदा सनावळी किंवा महत्वाच्या घटना. माझ्या लेखामध्ये बऱ्याच गोष्टी सारांशाने मांडल्या आहेत. वाचकांनी ज्यांचे विषयावर वाचन आहे त्यांनी इतरांच्या संदर्भासाठी विस्ताराने ही माहिती दिली आणि पुढील वाचनाची सूची दिली तर मदतच होईल.
आधुनिकतेवर या आधी काही लिखाण इथे दिले होते. ही लेखमाला मायबोलीवर टाकावी का यासाठीची ती चाचपणी होती. या भागातला काही मजकूर त्यामुळे आधी वाचला असण्याची शक्यता आहे. क्रमसंगत असल्यामुळे या भागात पुन्हा लिहिले आहे.
या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.
http://www.maayboli.com/node/48375
http://www.maayboli.com/node/48417
http://www.maayboli.com/node/48419
आधुनिकता,प्रतिसाद, विकास आणि अरब राष्ट्रे
इस्लामिक जगतातही आधुनिकतेच्या प्रारुपास नाकारून वैकल्पिक संरचनेची कल्पना आणि व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येतो. उदा. इराणच्या इस्लामिक राज्यक्रांतीनंतर लिहिलेल्या १९७९ च्या संविधानाची प्रस्तावनेत त्यानी आधुनिक अर्थशास्त्रात अभिप्रेत अशा जडवादी विचारसरणीस नाकारले आहे. " जडवादी विचारसरणीचे उद्देशच नफा आणि संपत्ती कमावणे हा आहे. या विचारसरणीत आर्थिक व्यवहार आणि सत्ता हीच समाजरचनेची अंतिम उद्दिष्टे आहेत. याचा परिणाम म्हणूनएक भ्रष्ट िध्वंसकारी प्रक्रिया मनुष्याच्या विकासात दिसून येतात. इस्लाममध्ये अर्थव्यवस्था हे फक्त एक माध्यम आहे- ज्याचा उपयोग मुक्तीच्या अंतिम ध्येयापर्यंत जाण्यापुरताच करणे अपेक्षित आहे …" हे उद्धृत करण्यामागचा उद्देश म्हणजे इराणने पर्यायी राजनीतीचा पुरस्कार केला आणि अशी राज्यव्यवस्था निर्माण केली . संविधान प्रस्तावना हे त्या त्या देशांच्या मुख्य धोरणामागची मुल्ये अधोरेखित करणारे महत्वाचे दस्तैवज आहे. इथे इराण स्पष्ट म्हणतो कि आम्हाला जगात चाललेल्या, अस्तित्वात असलेल्या अर्थव्यवस्थेशी घेणेदेणे नाहि. आम्ही नवीन अर्थ व्यवस्था निर्माण करु! अशी व्यवस्था ते निर्माण करू शकले का -या प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थी आहे. फक्त वैकल्पिक अर्थव्यवस्थेपुरताच हा प्रश्न सीमित नाहि. आतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धात्मक पातळीवर सारेच मुस्लिम देश तोकडे पडतात मग ते लष्करी सामर्थ्य असो किंवा अंतर्गत विकासाच्या निकषांवर- साक्षरता,आरोग्य, राजकीय सहभाग इ. ( इराण आणि पाकिस्तानकडे असलेली अनुशस्त्रे ही लष्करी सामर्थ्याची प्रतीके जरूर आहेत परंतु गेल्या ५० वर्षात झालेली मुख्य युद्धे उदा १९६७ सालचे इस्रायेल विरुद्धच्या युद्धात मुस्लिम राष्ट्रांना सांघिक माघार घ्यवी लागली आणि या देशतील राजवटीवर त्याचा दूरगामी परिणाम झाला - हे मुद्दे आपण त्या त्या राष्ट्राचा/ भूभागाचा अभ्यास करताना जास्त सविस्तररित्या पाहणारच आहोत.
आधुनिकता आणि मुस्लिम प्रतिसाद
आधुनिकतेच्या आव्हानाला जो प्रतिसाद मुस्लिम देशांत मिळाला त्याचे ढोबळ चार भागात वर्गीकरण करता येइल. आधी चर्चा केल्याप्रमाणे अरब आणि मुस्लिम देशांना स्वताच्या दैदिप्यमान अशे भूतकाळाची प्रतिमा आणि सांप्रतकालची त्यांची वास्तविकता यांचा मेळ घालणे कठीण जाते. आधुनिकतेमुळे आरपार बदललेल्या नव्या वैश्विक समीकरणात त्यांच्या या स्वप्रतिमा आणि अस्मितेच्या कल्पनांमुळे स्वतःला समाधानकारकरीत्या बसवणे अवघड दिसते. हा प्रश्न जसा मुस्लिम आणि अरब राष्ट्रांचा आहे तसाच तो वसाहतवादाच्या कचाट्यात सापडलेल्या अनेक देशांचा आहे. हा वसाहतवाद जरी भौतीकरीत्या गेल्या ५० वर्षात संपुष्टात आला असला तरी या देशांवर, समाजमनावर त्याचे ओरखडे अजूनही आहेत. एके काळी साम्राज्य स्थापनाऱ्या या बलाढ्य शक्तींना पश्चिमेच्या छोटाशा राष्ट्रांनी नामोहरम करून आजही त्यांचे ऐतिहासिक आणि सांप्रतचे स्थान वैश्विक परीघावर अगदी नगन्य केले आहे. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने जग झपाट्याने जवळ आले, उत्पादनाच्या आणि बाजाराच्या पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे एक बातमी पोहचायला महिने, कधी कधी वर्षे जात. आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडणारी घटना तुम्हाला आपल्या घरी किंवा जिथे कुठे असाल तिथे अगदी सविस्तर कळू शकते. ज्ञान, तन्त्रज्ञान आणि त्यावर आधारित वैश्विक क्रयव्यवस्थेने सर्व स्थानिक संदर्भ जणू नामशेष करून टाकले आहेत. ज्या देशांमध्ये औद्यागिक क्रांतीमुळे ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली त्या देशांमध्येही सामाजिक आणि राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणावर झाल्या. औद्योगीकरणाच्या प्रक्रियेत वसाहतींचा वाटा हा फक्त कच्चा माल पुरवणाऱ्या आणि तयार मालाचा खप असणाऱ्या अर्धविकसित बाजारपेठा एवढाच होता. परंतु या प्रक्रियेत मालाचा क्रयविक्रय, त्यानुषंगाने निर्माण होणारे छोटे उद्योग, विस्तारणारे सेवा क्षेत्र, निर्माण होणारी संपत्ती, शहरीकरण आणि त्याच जोडीने येणारे बकालीकरण हा बदल अनेक समाजात अभूतपूर्व असा होता. मुख्य म्हणजे या बदलाच्या आणि घडामोडींच्या नाड्या परकियांच्या हाती होत्या. वसाहतवादाच्या या संदर्भात आधुनिकीकरणाची प्रक्रिया स्वकीयांना त्यांच्यावर लादलेली वाटणे साहजिक होते. या प्रक्रियेत आपण नगण्य आहोत, निष्प्रभ आहोत हे उमजल्यावर या समूहांना वाटणारी दुर्बलतेची, हताशपणाची भावना या कालखंडात या सर्व देशांमध्ये रुजली. भूतकाळाचे स्वप्नरंजन,आधीच्या व्यवस्थेचे गुणगान आणि आधुनिकतेच्या अनुषंगाने आलेल्या सर्व गोष्टींबाबत कमालीचा अस्वीकार या गोष्टी या सर्व समाजात दिसून येतात. प्रचलित साहित्य, कला यामध्ये गतकाळाचे अगदी रुमानी प्रतिबिंब दिसून येते - चिनुआ अचेबे या विख्यात नायजरियन लेखकाची Things Falling Apart, या कादंबरीत आफ्रिकन टोळीप्रमुखाची कथा सांगितली आहे. औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे आधीची शेतीपद्धती व त्यावर आधारित समाजाचा कसा ऱ्हास होतो याची ही कहाणी. इराणी साहित्यात जलाल -अल- अहमद, अरब लेखक सादेक हेदायात यांच्या लोकप्रिय लिखाणातूनही भूतकाळाचे असेच गौरवीकरण दिसून येते. हा भूतकाळ मात्र धर्म आणि धार्मिक सत्ता यांच्याशी अतूटपणे बांधला गेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आधुनिकीकरणाला प्रत्युत्तर म्हणून भूतकाळ आणि अनुषंगाने तेव्हाची धार्मिक व्यवस्था हा पर्याय यातून समोर येताना दिसतो.
गतकाळातील संकल्पनावर आधारीत अशा समाजरचनेचे हे स्वप्न थोड्याफार फरकाने सर्व मुस्लिम जगतात आढळते. परंतु सद्यपरिस्थितिस सामोरे जाताना वेगवेगळ्या देशात वेगवेगळे मार्ग अवलंबलेले दिसतात. ढोबळमानाने याचे चार प्रकारात विभाजन करता येईल. हे विभाजन फक्त सैद्धांतिक पातळीवर आहे- प्रत्यक्षात एकाच देशातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि त्यांचा देशाच्या धोरणांवर कमीजास्त फरक पडत असतो आणि काही देशात तर आमुलाग्र बदल झालेले दिसतात.
यातील पहिला मार्ग आहे तो पूर्णपणे पाश्चिमात्य देशांच्या अनुकरणाचा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९व्या शतकात तुर्कस्तान, इराण, इजिप्त असे देश. पाश्चात्य देशांत प्रचलित अर्थ- राज्य आणि प्रशासन व्यवस्था या देशांतील तत्कालीन सत्ताधारी आणि अधिकारी वर्गाला जवळची वाटतात. उदा कैरो विद्यापीठाची स्थापना झाल्यावर इथे इस्लामिक धर्मशास्त्राऐवजी आधुनिक शास्त्रांचा अभ्यास सुरु होतो. ओटोमान साम्रज्याच्या लष्करी प्रशिक्षणात, संघटनात्मक बांधणी आणि संरचनेत जर्मनीचा मोठा सहभाग दिसून येतो. ओटोमान साम्राज्यात या अनुकरनास तन्झीमात- सुधाराची चळवळ असे नाव दिले आहे. या चळवळीच्या प्रमुखपदी सुरुवातीला तत्कालीन सुलतान होता परंतु लवकरच एका तरुण मिलिटरी अधिकाऱ्याने आपण आणखी गतीने हे बदल घडवून आणले पाहिजेत या उद्देशाने बदलाची सूत्रे हाती घेतली. हा तरुण, मुस्तफा केमाल पाशा पुढे अतातुर्क - तुर्कांचा पिता म्हणून ओळखला जाऊ लागला. केमाल पाशा आणि त्याच्या तरुणतुर्क सहकाऱ्यांनी तन्झीमातचा विचार सोडून फ्रान्सच्या धर्तीवर आधारित धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाची घोषणा आणि स्थापना पहिल्या महायुद्धादरम्यान केली. तुर्कस्थानात गेल्या दहा वर्षात धर्माचे सामाजिक जीवनात स्थान या विषयावर चर्चा आणि बदल चालूच आहे. थोडे विस्ताराने हे आपण नंतर पाहणार आहोत. परंतु संपूर्ण अनुकरण यामार्गे आधुनिकतेचा अंगीकार हा पहिला दृष्टीकोन होय -यात धर्मनिरपेक्ष समाजरचना अंगभूत आहे.
आधुनिकतेच्या अंगीकारातला दुसरा दृष्टीकोन हा धार्मिक उदारमतवाद हा आहे. नवीन बदलांना आत्मसात करताना आधीच्या प्रथा, परंपरा आणि धर्म यांना बाजूला सारण्याची गरज नाही. धर्मपरंपरांमध्ये आवश्यक ते बदल आणून आधुनिकतेमुळे येणारी आव्हाने स्वीकारण्याचा हा गट पुरस्कार करतो. या गटाचे प्रतिनिधित्व मोरोक्को आणि ट्युनिशिया हे देश करताना दिसतात. या देशांतील परिस्थितीचा सविस्तर विचार आपण नंतर करुयात परंतु येथे हे विभिन्न दृष्टीकोन समजाऊन घेताना यांचा उल्लेख केला आहे. इस्लाम हा सर्वसमावेशी धर्म असून तो आधुनिकतेसही अंगिकारू शकतो, नवीन आव्हाने असली तरी मुख्यतः इस्लामिक कायद्यात विशद केलेल्या संकल्पनांची पुनर्मांडणी करून त्या आव्हानांवर मात करू शकतो अशी या दृष्टिकोनावर आधारित धारणा. मुस्लिमजगतात सर्वात प्रभावी असा हा मतप्रवाह. येणाऱ्या काळानुसार बदल आवश्यक आहेत आणि ते बदल इस्लामिक कायद्याचे विवेचन, स्पष्टीकरण देऊन कायद्याच्या आधारावर संमत होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ट्युनिशिया, मोरोक्को ५७-५८ मध्ये कौटुंबिक कायद्यात केलेले बदल. मोरोक्कोत हेच बदल २००४ मध्ये पुन्हा करण्यात आले. कौटुंबिक कायदे असोत किंवा इतर क्षेत्रातील बदल असोत अनेक मुस्लिम विचारवंत इस्लामचे वेगळ्या अंगाने स्पष्टीकरण देऊन अनेक असे बदल सामावून घेतात. परंतु या दृष्टीकोनात इसलाम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सार्वजनिक कायद्यांचीच सर्वोच्चता मानली जाते.
तिसरा दृष्टीकोन हा परम्परावाद्यांचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौदी अरेबिया आणि इतर गल्फ देश. यांची मांडणी आणि दृष्टीकोन म्हणजे आम्हाला बदलाची काहीही गरज नाही. इस्लामिक शासन आणि इस्लामिक समाज हा आपल्या जागी फक्त योग्यच नव्हे तर इतर समाजांपेक्षा आणि विशेषतः पतित अशा पाश्चात्य देशांच्या तुलनेत उत्कृष्ट आहे. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ हे नेहमी आधुनिक जीवनाच्या काही बाबींचा उल्लेख करत असतात उदा. घटस्फोटाचे वाढते प्रमाण, कौटुंबिक जीवनाचा ऱ्हास, वेश्याव्यवसाय ई. अन्य समाजांच्या तुलनेत मुस्लिम समाज किती स्थिर आणि सुयोग्य आहेत कारण त्यांची बांधणी इस्लामिक कायद्यावर आधारित आहे. असा कायदा जो सर्वसमावेशक आणि जीवनाच्या सर्व पैलूंना विधिवत नियंत्रित करणारा आहे. त्यामुळे परंपरागत किंवा आधुनिक आव्हान असो -आम्हाला बदलायची गरजच नाही. आधुनिकतेच्या प्रक्रियेत येणाऱ्या अनेक तन्त्रज्ञानावर आधारित अनेक बदल मात्र यांनी अंगिकारले आहेत. हे तन्त्रज्ञान चालवण्यासाठी लागणारी मानवी संसाधनेही हे समाज आयात करतात. पाश्चात्य देशातील बनणाऱ्या सर्व सुख सुविधांचा उपभोग या देशात सर्रास केला जातो परंतु तेथील समाजाचे नियमन मात्र ते पूर्णपणे या प्रक्रियांपासून अलिप्त राहून करतात.
चौथा आणि सर्वात महत्वाचा गट - महत्वाचा यासाठी के मुसलीम आणि इतर समाजात हा गट राजकीय मंचावर जास्त चर्चिलेला, लोकांच्या मनात, कल्पनेत आज मुस्लिम म्हणून जी साधारण कल्पना आहे तीत असणारा असा हा मुस्लिम मुलतत्ववादी गट. या गटांतर्गतही खूप विभिन्नता आहे, खूप सक्रियता आहे. सैद्धांतिक दृष्ट्या आज हा गट सर्वात जास्त सक्रीय आणि प्रभावशाली आहे. या गटाने आधुनिकतेला एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे. या आव्हानास प्रतिसाद देण्यात धर्मनिरपेक्षवादी गट आणि उदारमतवादी सुधाराकांचा गट अयशस्वी झाल्यामुळे इस्लामवर आधारित शासनप्रणाली आणण्याची हा गट आपली जबाबदारी मानतो. अशी शासनप्रणाली जी आधुनिक जगात पाश्चात्य जगताशी टक्कर घेऊ शकेल. यांच्यामते इस्लाम हा मूलतः भांडवलशाही किंवा समाजवाद या पाश्चात्य संकल्पनापेक्षा श्रेष्ठ आहे. हा गट अरब आणि मुस्लिम देश ज्यांनी पूर्णतः किंवा अंशत: पाश्चात्यांचे अनुकरण केले त्यांच्या असफलतेचा हवाला देत इस्लामच्या मुलतत्वांवर आधारित अशी प्रणाली विकसित करण्याचे ध्येय राखतो. प्रेषितांच्या वेळची आदर्श नैतिक व्यवस्था या गटास अभिप्रेत आहे आणि या व्यवस्थेचे हे पुरस्कर्ते हेच या व्यवस्थेस कार्यान्वित करणारे शास्तेही आहेत. अयातुल्ला खोमेनींच्या मते इस्लाम ही तिसरी आणि सर्वश्रेष्ठ समाजप्रणाली आहे. ही विचारसरणी सर्व मुस्लिम जगतात गेल्या ३०-४० वर्षात लोकप्रिय झाली आहे.
आधुनिकता, विकास आणि अरब राष्ट्रे
आधुनिकतेचे हे आव्हान वस्तुतः काही नवीन गोष्ट नाही. ही प्रक्रिया जवळपास दोनशे वर्षापासून चालू आहे. या प्रक्रियेत मुस्लिम राष्ट्रे मात्र आर्थिक, सामाजिक आणि लष्करी सामर्थ्यात तोकडी पडलेली दिसून येतात. परंतु हे आव्हान सध्याच्या अरब देशातील घडामोडी बघता आणखीनच बिकट झालेले दिसते. या घडामोडींबद्दल प्रसारमाध्यमातून बरीच माहिती पुढे आली आहे. परंतु या चर्चांमध्ये या राष्ट्रांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि अर्थविषयक धोरणांचाही महत्वाचा भाग आहे आणि सद्य चर्चांमध्ये तो थोडा दुर्लक्षिलेला आहे म्हणून थोडा विस्ताराने हा उहापोह. अर्थात ज्या काही घडामोडी चालू आहेत त्यांचे असे एकांगी विश्लेषण शक्य नाही आणि त्यातील इतर आयामही महत्वाचे आहेत, परंतु अर्थविषयक विश्लेषनाचीही तितकीच गरज आहे.After the Spring हे या विषयावरचे अगदी नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक. मान्यवर अर्थशास्त्रज्ञानी अरब आणि मुस्लिम देशातील सद्य परिस्थितीचा अभ्यास करून काही लेख यात प्रसिद्ध केले आहेत- यातील बरेच आंतरजालावरहि उपलब्ध आहेत.काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी इथे आलेखांचा वापर केला आहे.
या पुस्तकात गेल्या काही दशकात ज्या देशांमध्ये आमुलाग्र बदल झाले अशा १०३ देशांचा अभ्यास मांडला आहे. यातील ५७ देशांच्या अर्थव्यवस्था वाढताना ( GDP परिमाण )दिसतात, तर ४६ देशांच्या अर्थव्यवस्था त्या तुलनेत कमी विकसित दिसतात. म्हणजेच टोकाच्या राजकीय घडामोडी झाल्या तरी त्यानंतर त्या देशांची घडी कशी बसवली गेली यावर त्या देशांचा नंतरचा विकास अवलंबून होता. यात काही महत्वाचे घटक सकारात्मक ठरतात उदा - शिक्षण, रोजगाराच्या संधी, उद्योगधंद्यांचा विस्तार, भ्रष्टाचारमुक्त सेवा क्षेत्र आणि स्त्रियांचा आर्थिक प्रक्रियेत सहभाग. राजकीय घडामोडीत जेव्हा जुनी व्यवस्था कोलमडून पडते, जुन्या उत्पादनव्यवस्था बंद पडून उत्पादन, नफा आणि उत्पन्न घटते आणि गरिबी वाढते तेव्हा आलेल्या नवीन राजकीय बदलांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अर्थव्यवस्थेची घडी बसवता न आल्यामुळे अधिक जास्त राजकीय आणि सामाजिक अंदाधुंदी निर्माण होते. इजिप्त आणि ट्युनिशिया येथे दोन वर्षापूर्वी सुरु झालेल्या आंदोलनातून सत्ताबदल होऊनही अजून स्थैर्य येत नाहीये याचे महत्वाचे कारण आर्थिक घडी बसण्यासाठी जे संस्थात्मक आणि प्रक्रियात्मक घटक आवश्यक असतात त्यांचा अभाव हे आहे.
खालील आलेखात वेगवेगळ्या भौगोलिक विभागानुसार देशातील अर्थव्यवस्थेत प्रतिव्यक्तिचे योगदान दाखवले आहे.
यातील सर्वात वर आशियायी वाघ = चीन, कोरिया, विएतनाम हे देश आहेत. या देशांमध्ये गेल्या वीस वर्षात प्रत्येक व्यक्तिच्या उत्पादकतेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदानात मोठा फरक पडला आहे. याचा परिणाम म्हणून त्यांचे वेतन, क्रयशक्ती आणि एकूणच उत्पन्न व जीवनशैली सुधारली आहे. या देशांच्या अर्थव्यवस्थाही प्रगती करत आहेत.
मध्ये निळ्या रंगाच्या रेषेने दर्शवलेले देश हे पूर्व युरोपीय आणि मध्य आशियायी देश आहेत आणि यांची प्रगतीही समाधानकारक आहे. पिवळ्या रेषेने दर्शवलेले देश हे प्रगत, ओउद्योगिक देश आहेत, यांचेही दरडोई व राष्ट्रीय उत्पन्न गेल्या २० वर्षात २०% नी वाढले आहे. आता खालच्या दोन लाल आणि हिरव्या रेषेकडे पाहूयात. लाल रेषा सब सहारन आफ्रिकी देश दाखवते आणि गेल्या १०-१५ वर्षात यांचेही राष्ट्रीय उत्पन्न वाढताना दिसत आहे. परंतु सर्वात कमी दरडोई उत्पादक्ता, दरडोई उत्पन्न व स्थिर राष्ट्रीय उत्पन्न अरब देशात दिसून येते. याचाच अर्थ जी संपत्ती, उत्पन्न या देशात निर्माण होते ते सर्वांपर्यंत पोहोचत नाही. आणि हे देश असे आहेत जिथे एक विशिष्ट जीवनशैली प्रचलित आहे, लोक शिक्षित आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या आणि देशाच्या उत्पन्नाबद्दल ठोस अपेक्षा आहेत.
हा दुसरा आलेख यातही अरब देशांच्या कमकुवत उत्पादकतेची प्रचीती येते. या आलेखात अरब देशांचा परस्परातला व्यापार आणि इतर देशांशी व्यापार दाखवला आहे. इतर देशांच्या तुलनेत हा व्यापार नगण्य आहे, याचाच अर्थ या देशांची देशांतर्गत उ त्पादकता कमी तर आहेच आणि हे देश दुसर्या देशात आयात- निर्यात करू शकतील असे याचे उत्पादन नाही. आर्थिकप्रगतीच्या दृष्टीने ही काही फार आशादायक गोष्ट नाह
पुढील आलेखात या देशांची लोकसंख्यावाढ दाखवली आहे. इथे युरोपिअन आणि औद्योगिक देशांची लोकसंख्या स्थिरावलेली दिसते - याचेही वेगळे परिणाम आहेत पण तो इथे चर्चेचा विषय नाही. या देशांच्या लोकसंख्यावाढीचा दर ०-१% च्या दरम्यान आहे. शेष जगाचा १-२% दरम्यान आहे तर अरब जगाचा ३% च्या वर आहे.
या लोकसंख्येत तरुणांचा भरणा खूप मोठा आहे. एकूण लोकसंखेच्या २/३ लोक तिशीच्या आतले आहेत. अरब देशांनी गेल्या तीस वर्षात शिक्षणक्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. हा सगळा तरुण वर्ग शिक्षित आहे आणि त्याच्या नोकरीच्या, उत्पन्नाच्या अपेक्षा या प्राथमिक श्रमक्षेत्राच्या पलीकडच्या आहेत. वर्षानुवर्षे या देशांमध्ये शासकीय सेवाक्षेत्रापलीकडे तरुणांना रोजगाराच्या संधीच निर्माण केल्या नाहित. सेवाक्षेत्राची लोकांना सामावून घेण्याची क्षमता मर्यादित आहे. लोकांची रोजगार आणि उत्पन्नाबाबतीतल्या अपेक्षांची पुर्ती न होणे हे या असंतोषाच्या मागचे महत्वाचे कारण आहे. खालील आलेखात काही प्रमुख देशातील बेरोजगारीची आकडेवारी दिली आहे.
दरवर्षी श्रम बाजारात येणाऱ्या प्रशिक्षित लोकांच्या टक्केवारीत २ ते ५% च्या दरम्यान वाढते आहे. याचाच अर्थ २-५% नवीन लोक दरवर्षी नवीन रोजगारासाठी तयार असतात आणि एवढा रोजगार त्या त्या व्यवस्थेने पुरवावा अशी त्यांची अपेक्षा अस्ते. या आलेखातील गुलाबी रेषा श्रमिकांच्या संखेतील वाढ तर निळ्या रंगाची रेषा तरुण बेरोजगाराची संख्या दाखवते. उदा अल्जेरियात ४५%, बहरीन २०% इजिप्त ३०%, जॉर्डन ४०% - यावरून सध्याच्या आंदोलनातील तरुण पिढीच्या स्फोटक विद्रोहाची कल्पना येईल.
शिक्षित, रोजगार व जीवनशैली याबाबत ठोस अपेक्षा असणारी, संपत्ती स्थैर्य यांची अभिलाषा असणारी ही पिढी सर्वच पातळ्यांवर निराश दिसते आहे. नोकरी नाही म्हणून संसार सुरु करता येत नाही आणि ज्या व्यवस्थेत वाढली तिथे निषेध, बंड करण्याची परंपरा नाही, इथल्या शासनव्यवस्था त्यांच्याशी निष्ठावान असणाऱ्यांवर कृपा आणि विरोधकांचे दमन करणाऱ्या, यामुळे घुसमटलेला असंतोष हिंसकरित्या बाहेर पडत आहे. यावेळी लोक पुढे येउन काही करू इच्छित आहेत, करत आहेत, हिच अरब राष्ट्रांच्या संदर्भात विलक्षण अशी घटना आहे. ही क्रांती जिथे सुरु झाली इजिप्त आणि ट्युनिशिया येथे नेमके हेच घटक - लोकांच्या आर्थिक आणि सार्वजनिक सेवा - आरोग्य, दळणवळण, शाळा, निवारा - सरकार पुरे करण्यात कमी पडली. जोपर्यंत सरकार या गोष्टी पुरवत होते तोपर्यंत जनता त्यांच्या अधीन होती, शांत होती. नवीन वैश्विक वातवरणात या सरकारांना त्यांच्या अर्थव्यवस्था सावरता आल्या नाहीत आणि परिणामी त्यांचे जनतेबरोबर जे कंत्राटी स्वरूपाचे संबंध होते त्यांनाच हादरा बसला. आता नव्याने आलेल्या सरकारांनीही नवीन व्यवस्थाबांधणीत राजकीय, वैधानिक व्यवस्थेबरोबरच नव्या अर्थव्यवस्थेच्या या आव्हानांना तोंड दिले नाही तर ही नवीन सरकारेही अल्पमुदतीची ठरतील. इजिप्तमध्ये सत्ताबदल होऊन गेल्या वर्षात तीन सरकारे आली आहेत. लष्कराचा आणि मुलतत्ववादी गटांचा प्रभाव आणखीनच वाढला आहे. ज्या लोकशाही मार्गाने उठाव करणाऱ्या जनतेसमोर लष्कर किंवा मुलतत्ववाद्यांची हुकुमशाही असे पर्याय आज तरी दिसत आहेत. वाढणाऱ्या लोकसंखेच्या, तरुण बेरोजगारांच्या समस्या या निकटच्या काळात सोडवता आल्या नाहीत तर परिणामी आणखी गोंधळ, अस्थिरता आणि असुरक्षितताच या देशातून वाढताना दिसेल.
लेखमाला आतापर्यँतचे भाग एकदा
लेखमाला आतापर्यँतचे भाग एकदा वरवर वाचून झाली .लेखन फारच दमदार आहे आणि विचार करायला लावणारे आहे .लेखाच्या विषयाचा आवाकाही मोठा आहे त्यावर मतप्रदर्शन करण्यासाठी बरेच अशाप्रकारचे वाचन तरी केलेले हवे अथवा वर्णन केलेल्या देशांत स्वतंत्र पर्यटन केलेले असायला हवे .या देशांतच राहून असे लेखन करणे किती जोखमीचे आहे हे आपण जगातल्या इतर उदाहरणांवरून पाहातोच आहे .
एकदा का देव ( ? )आहे हे मानलं की " मध्यस्त" आलेच .आणि ती जागा घेण्यासाठी मानवप्राण्यांत भरपूर स्पर्धा आहे .एवढेच म्हटतो .
शिक्षित, रोजगार व जीवनशैली
शिक्षित, रोजगार व जीवनशैली याबाबत ठोस अपेक्षा असणारी, संपत्ती स्थैर्य यांची अभिलाषा असणारी ही पिढी सर्वच पातळ्यांवर निराश दिसते आहे. नोकरी नाही म्हणून संसार सुरु करता येत नाही आणि ज्या व्यवस्थेत वाढली तिथे निषेध, बंड करण्याची परंपरा नाही, इथल्या शासनव्यवस्था त्यांच्याशी निष्ठावान असणाऱ्यांवर कृपा आणि विरोधकांचे दमन करणाऱ्या, >>> हे भारताला जसेच्या तसे लागू पडते.
ते 'things fall apart' असे हवे.
" जडवादी विचारसरणीचे उद्देशच
" जडवादी विचारसरणीचे उद्देशच नफा आणि संपत्ती कमावणे हा आहे. या विचारसरणीत आर्थिक व्यवहार आणि सत्ता हीच समाजरचनेची अंतिम उद्दिष्टे आहेत. याचा परिणाम म्हणूनएक भ्रष्ट िध्वंसकारी प्रक्रिया मनुष्याच्या विकासात दिसून येतात. इस्लाममध्ये अर्थव्यवस्था हे फक्त एक माध्यम आहे- ज्याचा उपयोग मुक्तीच्या अंतिम ध्येयापर्यंत जाण्यापुरताच करणे अपेक्षित आहे … उत्तम विचार आहे पण मुस्लीम राष्ट्रे उदा. इराक आणि इराण एक मेकांविरुध्द ८ वर्षे लढली. त्यानंतर साक्षात्कार इराणला झाला पण इराकला पटला नाही. त्यांनी कुवेतवर आक्रमण केले.
आगाऊ +१ (हेच लिहिणार होते
आगाऊ +१ (हेच लिहिणार होते अगदी)
या इस्लामी राष्ट्रांमधे अल्पसंख्यांक लोकसमूहांशी बहुसंख्यांकांचे कसे ताणेबाणे आहेत हेही जाणून घ्यायला आवडेल.
इस्लाम हा सर्वसमावेशी धर्म
इस्लाम हा सर्वसमावेशी धर्म असून तो आधुनिकतेसही अंगिकारू शकतो, नवीन आव्हाने असली तरी मुख्यतः इस्लामिक कायद्यात विशद केलेल्या संकल्पनांची पुनर्मांडणी करून त्या आव्हानांवर मात करू शकतो अशी या दृष्टिकोनावर आधारित धारणा. मुस्लिमजगतात सर्वात प्रभावी असा हा मतप्रवाह >>>
असे गेल्या १०० वर्षात कधी दिसुन आले आहे? असा मत प्रवाह जर चुकुन असलाच तर तो अति अल्प असेल, प्रभावी तर नाही च नाही.
सौदी मधे आता नास्तिक असणे हा गुन्हा असेल असा कायदा केला आहे.
असे गेल्या १०० वर्षात कधी
असे गेल्या १०० वर्षात कधी दिसुन आले आहे? असा मत प्रवाह जर चुकुन असलाच तर तो अति अल्प असेल, प्रभावी तर नाही च नाही.
धार्मिक गोष्टींमध्ये बदल घडण्यासाठी १०० वर्षे हा काळ फारच अत्यल्प आहे, हे सती, जातीयवाद अशा परंपरा १०००० वर्षे बाळगणार्यांना समजू नये म्हणजे आश्चर्यच.
आणि अशा वाइट गोष्टींविरुद्ध तुमच्या धर्मात सुरु झालेले प्रवाहही सुरुवातीला क्षीणच होते.
'अरब राष्ट्रे' ह्या गटात
'अरब राष्ट्रे' ह्या गटात कुठले कुठले देश येतात ? ह्या लेखात किंवा आधीच्या कुठल्या लेखात आलं असेल तर माझ्या कडून सुटलं बहुतेक.
लेख मस्त आहे.. लांबी एव्हडीच ठेवा..
आणि अशा वाइट गोष्टींविरुद्ध
आणि अशा वाइट गोष्टींविरुद्ध तुमच्या धर्मात सुरु झालेले प्रवाहही सुरुवातीला क्षीणच होते.>>>>
मला स्वताला धर्म नाही. त्यामुळे प्रश्नच येत नाही.
तुमचे मान्य आहे, १००० वर्षात तरी कधी असा सुधारणा वादी spark दिसला होता का मुस्लिम जगतात?
सती, जातीयवाद >>>>> सती ही प्रथा काही compulsion नव्हते. फार क्वचित बायका सती जात होत्या, म्हणुन तर त्याचे इतके कौतुक होते. दक्षीण भारतात तर ही प्रथा अजिबात नव्हती.
मराट्यांनी जातीवाद केला हे जरी मान्य केले तरी बाकीच्यांना कुठे जबरदस्ती होती जातीवाद करायची?
मी सर्वांना सांगू शकतो की मी नास्तिक आहे. बाकीची लोक मला जास्तीत जास्त मुर्ख म्हणतील.
पण कोणी मुस्लिम आहे आणि सर्वांना सांगतोय का की मी नास्तिक आहे.
मुख्य म्हणजे माझ्यावर प्रश्नांची दिशा यायचे काही कारण च नाही. कोणीतरी खोटी नाटी भलावण करण्यासाठी लेख लिहते आहे म्हणुन मी प्रतिसाद दिला.
मी जर उद्या असा लेख लिहीला की भारतात सती नव्हतीच तर मारा मला. पण मी असले लेख लिहीण्याचे ढाँग तरी करत नाहीये.
मी सर्वांना सांगू शकतो की मी
मी सर्वांना सांगू शकतो की मी नास्तिक आहे. बाकीची लोक मला जास्तीत जास्त मुर्ख म्हणतील.
पण कोणी मुस्लिम आहे आणि सर्वांना सांगतोय का की मी नास्तिक आहे.
गंमतच आहे. तुम्ही नास्तिक आहात, हे सांगताय. याचा अर्थ इतर धर्मातही नास्तिक असलाच पाहिजे आणि कुणी तसे सांगत नसेल तर तो भयापोटी गप्प बसतोय , हे तुम्ही कशाच्या आधारे ठरवलेत?
१००० वर्षात तरी कधी असा सुधारणा वादी spark दिसला होता का मुस्लिम जगतात?
स्पार्क म्हणजे तुमच्या दारातला कुत्रा आहे का हो? की जगाच्या पाठीवर कुठेही चमकणार असला तर आधी तुम्हाला त्याने वर्दी द्यावी? शोधा म्हणजे सापडतील.
छान लिहीलय! अर्थात एका वाचनात
छान लिहीलय!
अर्थात एका वाचनात समजले /आकलन झाले असे होत नाही, सबब दोनतिनदा पुन्हा वाचून आशय/तपशील नीट स्मरणात ठेवावा लागेल.
बरेच दिवसांन्नी काही एक "क्लिष्ट अभ्यासपूर्ण" वाचायला मिळतय.
धन्यवाद
प्रसाद१९७१, आधुनिकतेचे उदाहरण
प्रसाद१९७१, आधुनिकतेचे उदाहरण म्हणून ट्युनिशिया आणि मोरोक्कोची नावे दिलेली दिसत आहेत.
बरेच मुद्दे एकत्र आले आहेत तरी लेख चांगला झाला आहे. जागतिक पातळीवर मुसलमान म्हणजे केवळ वहाबी/ सौदी प्रकारचे असा गैरसमज जो सर्वत्र आढळतो तो कमी झाला तरी पुष्कळ आहे. मला भेटलेल्या अल्जिरिया, मोरोक्को वगैरे देशातल्या मुस्लिम मुली या एकंदरित जगभर फिरणार्या, उच्चशिक्षित मराठी मुलींसारख्याच वाटलेल्या आहेत. म्हणजे धर्माचे प्रेम केवळ सांस्कृतिक संदर्भापुरते.
शबाना, माफ करा पण प्रत्यक्ष
शबाना, माफ करा पण प्रत्यक्ष अनुभवांच्या अभावाने हा लेख मला थोडा वरवरचा वाटला.
त्या त्या देशांत राहणार्या लोकांचे अनुभव आणि प्रसिद्ध केली जाणारी आकडेवारी.. खुप फरक असतो त्यात.
आधुनिकता आणि अर्थव्यवस्था असे
आधुनिकता आणि अर्थव्यवस्था असे शब्द धर्माच्या उजेडात वापरायचे असतील तर ( टायटल मधील मुस्लिम जगत शब्द) धर्मग्रंथात ह्या दोन्हीचा अर्थ काय आहे हे पण इथे विषद केले पाहिजे होते असे वाटते.
इनफॅक्ट इस्लामी अर्थव्यवस्था म्हणजे काय हे ह्या लेखात यायला हवं होतं. हदीथ आणि कुराण मध्ये ह्यावर भरपूर उहापोह आहे. त्या प्रकाशात इस्लामी अर्थव्यवस्था वाचकांना कळाली असती असे वाटते. मग ती रिलेट जास्त होईल.
प्रेषितांच्या वेळची आदर्श नैतिक व्यवस्था या गटास अभिप्रेत आहे आणि या व्यवस्थेचे हे पुरस्कर्ते हेच या व्यवस्थेस कार्यान्वित. >>
ह्या वाक्यात असे गृहितक आहे की प्रेषितांच्या वेळी आदर्श नैतिक व्यवस्था होती. ज्यावर चर्चा होऊ शकते. अर्थात तुम्हाला हवी असेल तरच !
मला अजून एक खटकले म्हणजे तुम्ही मागच्या वा ह्या लेखावर प्रतिक्रिया दिली नाही, लोकांना उत्सूकता आहे म्हणून ते तुम्हाला विचारतील. ह्या प्रश्नांचे शंकानिरसन १००% होईल असे नाही, पण निदान चर्चेतून अनेकांना काही नविन दिशा मिळेल. इस्लाम एखाद्याविषयावर काय म्हणतो ते कदचित नीट उलगडेल. तुम्ही उत्तर द्यायला हवीत असे परत मला वाटते.
होप यु डोन्ट माईंड. लेखातच्या चुका वगैरे दाखवायचा उद्देश नाही हे आधीच लिहितो. तसे यु आर राँग, आय अॅम राईट असे लिखान कुठेही नेत नसते. हे मला ज्ञात आहे.
शबाना ,चांगले विवेचन, विषयाचा
शबाना ,चांगले विवेचन, विषयाचा आवाका मोठा आणि वादांना भरपूर खाद्य.पण तुम्ही संतुलित लिहीत आहात.
मुस्लीम समाजांनी अंगीकारलेल्या विचारसरणीनुसार तुम्ही चार प्रकारांमध्ये प्रतवारी केली आहे ती बरोबरच आहे. पण डाव्या विचारांच्या प्रभावाखाली आलेले काही मुस्लीम कवी , विचारवंत आहेत , तो प्रभाव सामाजिक स्तरावर कुठे झाला आहे का ? झाल्यास व्यक्तिगत पातळीवरील भ्रमनिरास एवढेच त्याचे स्वरूप , जे भारतात दिसले तसेच इतरत्र घडले का ?
भारती, एकूणच या डाव्या
भारती,
एकूणच या डाव्या चळवळी का विफल झाल्या त्यावर नंतर लिहिणे होणारच आहे. त्यावेळी या विषयावर जास्त चर्चा करूयात.
केदार,
इस्लामी अर्थ व राज्य व्यवस्था यावर पुढे येईल. या किंवा इस्लाम या विषयावर माझे पांडित्य नाही. एकूण ज्या घडामोडी चालू आहेत त्यावर थोडे विचार - मला समझलेले इथे मांडले आहेत. आणखी बरेच लिखाण येणे अपेक्षित आहे त्यामध्ये येथे आलेल्या बर्याच प्रश्नांवर उत्तरे येतील. आपणाला माहित असलेले विचार जरूर मांडावेत.
प्रसाद,
मला वाटते एका लेखावरून आपले विचार व मत न मांडता पुढचे वाचन करावे.
एकूणच इथे मला हे तुकड्या तुकड्यात द्यावे लागत आहे आणि त्यामुळे बरीच मोठी मर्यादा आहे, वाचकांपुढे पूर्ण विषय मांडता येत नाही.
नितीन, इराण व इराक वर आणि एकूणच मुस्लिम राष्ट्रातल्या आपापसातल्या युद्धावर येईल पुढे.
वरदा, एकूणच अल्पसंख्यांक समुदाय त्या त्या देशातले इस्लामी राजवटीखाली दबले किंवा नष्ट झाले आहेत. आणि कुठल्याही धर्माधिष्ठित राजवटीत हे होणारच. असे का होते यावर लिहीन पुढे. पण या विषयावर चर्चा करताना भारतातील परिस्थितीचे संदर्भ येतील आणि फार खोलात न जाता ( इथे ) माझ्या मते भारतात त्यामानाने सर्वच अल्पसंख्यांक समाजाची परिस्थिती आणि प्रगती तुलनेने चांगली आहे.
अरब राष्ट्रे नकाशा व नावे
वाचतोय...
वाचतोय...
वरदा, एकूणच अल्पसंख्यांक
वरदा, एकूणच अल्पसंख्यांक समुदाय त्या त्या देशातले इस्लामी राजवटीखाली दबले किंवा नष्ट झाले आहेत. आणि कुठल्याही धर्माधिष्ठित राजवटीत हे होणारच. असे का होते यावर लिहीन पुढे. > >
इतर कोणत्या धर्माधिष्ठित राजवटीत असे झालेय का मुस्लिम सोडून ?
किंबहुना मुस्लिम अल्पसंख्य असलेल्या अनेक देशात कोठेही मुस्लिम नष्ट होत चाललेले किन्वा कमी होत चाललेले दिसत नाहीयेत. उलटपक्षी अल्पसंख्य असूनही मुस्लिमांचीच लोकसंख्या वाढताना दिसतेय , असे का घडत असावे बरे ?
डेलिया, उदा. पोर्तुगीज
डेलिया, उदा. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातल्या हिंदुंवरचे अत्याचार.
ह्म्म बरोबर साती. जरा प्रश्न
ह्म्म बरोबर साती. जरा प्रश्न मॉडीफाय करते.
इतर कोणत्याही धर्माच्या राजवटीत मुस्लिम धर्मातले लोक राज्यकर्त्यांचा धर्म स्वीकारताना दिसत नाहीत. असे कोठे झाले आहे का? अशी उदा. मला तरी माहित नाहीत , असल्यास माहित करून घ्यायला आवडेल. मुस्लिम कीतीही अल्पसंख्य असले तरी मोठ्या प्रमाणात मुस्लिमांचे धर्मांतर होताना दिस्त नाही. हे कसे काय ?
वैयक्तिक पातळीवर ख्रिस्चन , हिन्दू , बौद्ध (देशी / विदेशी ) लोक (लग्न सोडून इतर ) वेगवेगळ्या कारणांनी मुस्लिम झालेले माहित आहेत. पण कोणीही मुस्लिम असा काही धर्मांतर करण्याचा विचारही मनात आणूच शकत नाही , हे बघितले आहे.
आजच्या आधुनिक काळात उघडपणे स्वतःच्याच धर्माविरूध्द बोलणारी , जुन्या अन्यायकारक रूढींना विरोध करणारी माणसे इतर धर्मात जितक्या सहज दिसतात , तसे मुस्लिम आढळत नाहीत.
यामागचे कारण काय असावे , ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
डेलिया, स्पेनमध्ये मुस्लिम
डेलिया,
स्पेनमध्ये मुस्लिम राजवट परास्त झाली तेव्हा ख्रिश्चन जेत्यांनी तीन पर्याय ठेवले. १. धर्मांतर. २. मृत्यू. ३. तडीपारी. बहुतेकांनी पहिला पर्याय स्वीकारला. अधिक माहितीसाठी : http://en.wikipedia.org/wiki/Reconquista#Spanish_Inquisition
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद गापै.
धन्यवाद गापै.