ते चार तास....

Submitted by आशिका on 23 April, 2014 - 09:17

गेल्याच आठवड्यात माझ्या मोठ्या जावेचे ऑपरेशन मुंबईतील एका टर्शियरी केअर हॉस्पिटलमध्ये करण्याचे ठरले. ऑपरेशन दुपारी अडीच वाजता होणार होते. चार तास शस्त्रक्रियेसाठी लागणार होते.सर्व नातलग हजर होते. अडीचच्या सुमारास त्याना ओ.टी. त नेले. हॉस्पिटलच्या नियमानुसार एकच जण ओ.टी. च्या बाहेर थांबू शकत होता. दादांना तिथे थांबवून आमची रवानगी रिसेप्शन लॉबीत झाली. दादांना काही लागले तर कळवा असे सांगून आम्ही सगळे खाली आलो आणि त्यानंतरचे चार तास आम्हाला चार युगांसारखे भासले.या चार तासांत बरंच काही अनुभवलं. दडपण, अधीरता, काळजी, असहाय्यता अशा संमिश्र भाव्-भावनांची स्थित्यंतरे बरंच काही शिकवून गेली.

डॉक्टर्स किंवा संबंधित प्रोफेशनमधील व्यक्तींना कदाचित या लेखात काही विशेष जाणवणार नाही मात्र माझ्यासारख्या स्वतःच्या किंवा जीवलगांच्या आजारपणातच हॉस्पिटलशी संबंध आलेल्यांना बर्‍यापैकी समजू शकेल हे मनोगत.

.....तर तळ मजल्यावरील प्रशस्त, चकचकीत लॉबीत आम्ही स्थानापन्न झालो. मी, माझा नवरा, काका, वहिनींचे आई, वडील व भाऊ असे आम्ही ६ जण. या लॉबीच्या मधोमध एका स्तंभावर काळ्या पाषाणात कोरलेली गणपतीची सालंकृत मूर्ती विराजमान होती, कुठूनही दिसेल अशी.

इतरही बरेच जण आजुबाजूला बसले होते. समोरच एक पंजाबी कुटुंब दिसलं अगदी असहाय्य, चिंतातूर नजरा, एक ६०-६५ वर्षांची वॄद्ध बाई, तिच्या डोळ्यांतलं पाणी खळत नव्हतं. इतर जणी तिच्या सांत्वनात चूर. तिच्या नवयाची तब्येत खूप गंभीर होती. डॉक्टरांनी सर्व नातलगांना बोलवून घ्यायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे नातलगांची रीघ लागली होती. १-१ जण वर जाऊन पेशंटला बघून मग आजीजवळ येत होता, धीर देत होता. काय धीर देत असतील या वेळी तिला? काय मनः स्थिती असेल तिची? इतक्या वर्षांच्या भाव-गंधित साथीला आपण आता काही क्षणांत अंतरणार आहोत... ही भयाण जाणीव.....'मॄत्यू'.... एक अटळ सत्य....कितीही म्हटले की मी घाबरत नाही मरणाला, पण जेव्हा त्या मृत्यूचे भीषण तांडव आपल्या जीवलगांभोवती चालू असते तेव्हा जीव थार्‍यावर रहात नाही. राहून-राहून तिची नजर गणपती बाप्पाकडे जात होती, हात जुळत होते, ओठ काही-बाही पुटपुटत होते. कसली प्रार्थना करीत असेल ही आता? नवर्‍याच्या दीर्घायुष्याची, वर I.C.U. मध्ये काही चमत्कार घडवण्याची, की सांगत असेल तिचं वेडं मन "हे सगळं थांबवून शांतपणे घेऊन जा माझ्या नवर्‍याला, सोडव या यातनांतून, मी जगेन बापडी कशीही पण त्यांचा त्रास थांबव".... बापरे...मन विषण्ण होतं...

मनचं ते कोण थोपवू शकलंय त्याला?..... क्षणांत वाटून गेलं की तिच्या जगी आपण असतो तर....... आणि पायाखालची जमीन सरकली, क्षणांत सगळं फिरुन अंधारी आली डोळ्यांसमोर... घट्ट मिटून घेतले डोळे, पण विचार येतात का असे मिटता? भलत्या-सलत्या विचारांनी आपलं हॄदय खूप जोरात धडधडतंय हे जाणवू लागलं आणि तेव्हाच कोणीतरी खांद्याला धरून हलकेच हलवलं... बघते तर नवरा समोर चहाचा कप घेऊन उभा होता! त्याला समोर ठीकठाक उभं पाहून काय हायसं वाटलं म्हणून सांगू! क्षणांत झटकले हे विचार झुरळासारखे आणि चहाचा आस्वाद घेऊ लागले.....

आपण तर दिवास्वप्न पाहत होतो आणि वहिनींचं पण काय लहानसे ऑपरेशन तर आहे, आत्ता कळेल चांगली बातमी, आपल्यापेक्षा या पंजाबी कुटुंबाचा प्रॉब्लेम किती मोठा आहे असं मन समजावू लागलं स्वतःला, खरंच किती चुकीचे विचार पण मनाला त्यावेळी समाधान देऊन गेले खरे.

मात्र क्षणिकच होते हे समाधान, सहजच शेजारी पाहिले तर वहिनींच्या आई-बाबांची अवस्थाही बघवत नव्हती. ऑपरशन साधेच असले तरी त्यांची लेक आहे ना ... बस्स, नकळत माझे हातही जोडले गेले त्याच्यापुढे आणि त्याला आळवणे सुरु झाले"देवा, जे काही होऊ घातलंय, त्याला धीराने सामोरं जायची शक्ती दे इथल्या सर्वांना आणि तु सगळ्यांच्या बरोबर रहा".

तु सगळ्यांच्या बरोबर रहा.... पण तो तर असतोच ना! सर्वांच्या विनवण्या, प्रार्थना, तक्रारी मूकपणे ऐकतच तर असतो, कसलाही भेदभाव न करता..पण आता या क्षणी मी केलेला नमस्कार आणि रोज घाईघाईत पूजा उरकून केलेला नमस्कार.... किती फरक आहे या दोन नमस्करांत? दरवर्षी ५ दिवस जेव्हा हाच बाप्पा घरी येतो, तेव्हाही कुठे निवांतपणे त्याला भेटणे होते? नैवेद्याची, पूजेची, आल्या-गेल्यांच्या पाहुणचाराचीच गडबड. पण त्याला कुठे हवंय हे सारं? त्याला तर हवंय फक्त आपलं निर्हेतुक प्रेम आणि तू जे देशील ते स्वीकारण्याची ताकद दे असं मागाणं... जे आता या मोक्याच्या क्षणी आपसुक मागितलं गेलं....

मोबाईलच्या आवाजाने तंद्री भंग पावली. शेजारी एका मुलीचा फोन वाजत होता, तिने तो घेतला आणि आनंदाने चित्कारली, "आई, भावोजींचा फोन आहे, ताईला मुलगी झाली, दोघीही सुखरुप आहेत" आणि या कुटुंबाचा एकच कल्ला चालू झाला, मिठ्या मारणे, अभिनंदन करणे, मुलीच्या आईने बाप्पासमोर डोकेच टेकले" सुखरुप सोडवलेस रे लेकीला".

जन्म आणि मृत्यू या सजीवांच्या जीवनातील दोन परस्परविरोधी क्रिया, आम्ही एका वेळी, एका ठिकाणी अनुभवत होतो ! काही वेळातच नवा बाबा खाली आला, त्याचे पालक, नातलग, मित्र सार्‍यांनी त्याला घेरून टाकले. कुणी पटकन जाऊन बरफी आणली, बाप्पापुढे ठेवून वाटली, आम्हाला, त्या पंजाबी बाईलाही दिली. तिनेही प्रेमाने "सौ साल गे" असे बोलुन "शतायुषी भव" असा आशिर्वाद दिला नुतन बालकास.... बाळाचा बाबाही गहिवरला... कोण, कुठली ही चिमुरडी पण तिच्या आगमनाने वातावरणातला तणाव बराच निवळला. सारे त्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी झाले.

काही वेळातच लिफ्टबाहेर गलका झाला. पांढर्‍या कोटातील डॉ., नर्सेसचा ताफा बाहेर आला. त्यातील एका डॉ.चे लक्ष पंजाबी बाईकडे गेले व तो तिच्या दिशेने येवू लागला. सारे स्तब्ध..डॉ. आता काय सांगणार याची कल्पना आलीच होती.....मात्र डॉ म्हणाले," आम्ही बर्‍याच सिनियर डॉ.शी सम्पर्कात होतो, सर्वांशी विचारविनिमय करत औषधोपचार चालू होते आणि तुमचा पेशंट चांगला प्रतिसाद देऊ लागलाय्"जिच्यावर आभाळ कोसळत आहे असे वाटत असताना तिच्यावर जणू आनंदघन बरसू लागला, तिने चक्क नव्या बाबालाच मिठी मारली, त्याच्या मुलीचा पायगुण म्हणे.... परत एकदा आनंदाची बरसात झाली लॉबीत.

आता फक्त आमचाच result बाकी होता आणि तो ही काही वेळातच समजला की ऑपरेशन नीट पार पडले आहे व वहिनींना recovery room मध्ये नेले आहे. बस्स... डोक्यावरचं ओझं उतरल्यासरखं झालं आणि आम्ही समाधानाने परतलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी तिथे जाताच सहज नजर वळली लॉबीकडे आणि कालचे ४ तास आठवले....अंगावर सरसरून काटा आला. आज तिथे कालच्यापैकी कोणीच नव्हते, सगळे नवे चेहरे होते, अरे हो.... दिवसच तर नवा होता.... नवा दिवस, नवा रंगमंच, नवी पात्रे.... सूत्रधार मात्र तोच....काळ्या पाषाणातला, सोंडेआडून मिश्किल हसणारा बाप्पा.... नकळत त्याच्याकडे पावले वळली, चपला उतरल्या, मस्तक त्याच्या चरणी स्थिरावले.... काही मागण्यासाठी खचितच नाही, तर फक्त Thank You म्हणण्यासठी.....Thank You बाप्पा !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अचूक वर्णन्...शेवटचा परिच्छेदपण एकदम सर्मपक..ती शातंता - स्वतःशी झालेले मनन खूप चांगले वाटते..अशा वेळी हॉस्पीटलबाहेरचे जग एकदम वेगळे - धावपळीचे वाटते.. ज्याची आयुष्यात गरज नसते..

आशिका, फारच प्रत्ययकारी लिहिलंयस. सगळे भावाभावानाचे कल्लोळ आमच्यापर्यंत पोहोचवले आहेस.

आशिका,

मस्त लिहिले आहेत. मुख्य म्हणजे मनातील विचार अगदी सहजपणे शब्दबद्ध केल्यासारखे वाटत आहेत.

वेरी फिल्मी. लिखाण अर्थातच नाही तर आपण घेतलेला अनुभव. ज्यांनी तो स्वतावर अनुभवला त्यांच्यासाठी तर एक अविस्मरणीय असा दिवस. पण हे असे काही जवळपास घडताना बघायला मिळणेही भाग्याचेच, फक्त त्यातून अर्थ सकारात्मक घ्यायला हवा. एकूणच लेख आणि त्यातही शेवटचा परिच्छेद खूपच छान आणि समर्पक .

अतिशय समर्पक पण मानवी भावनांचे अन अगतिकतेचे सुंदर वर्णन. माझ्या डोळ्यासमोर तुमचे ४ तास सरकत होते, ते क्षण मी अनुभवले.
अप्रतिम

पंजाबी काकां ना उदंड आयुष्य लाभो...!
ज्याला कुणाला माज मस्ती चढ्ली असेल त्याने फक्त २४ तास हॉस्पिटलमध्ये (अथवा लॉबीत) घालवावे, कुठे बुवा / बाबा कडे जाण्याची गरज नाही सर्व "मी" पणा गळून पडतो.

चार तासांचा स्नॅपशॉट - त्या लॉबीतला तसेच तुमच्या मनाचाही - अगदी समर्पक उतरलाय तुमच्या शब्दातून. शेवटचा पॅरा खासच!