आधीचे लेखः
चांदण्यांचे शब्द - उमेश कोठीकर
==================================================
------------- श्वासांच्या समिधा - श्री सतीश दराडे -------------------------
मागेच सर्व इच्छा गेल्या लयास माझ्या
हे एकमेव कारण भाग्योदयास माझ्या
होईल ती कळीही माझ्या बरोबरीची
थांबून ठेव काळा थोडे वयास माझ्या
=========================
धर्माला ग्लानी आली पापाने गंगा न्हाली
तुज यदायदाचा तरिही का श्लोक स्मरेना देवा
कोणाच्या सुखदु:खाचा मी गूढ उतारा आहे
वाचीत स्वतःला बसलो पण अर्थ कळेना देवा
आगीत तिच्या हृदयांच्या श्वासांच्या समिधा माझ्या
काळाच्या वार्यालाही हा यज्ञ विझेना देवा
===========================
जन्ममृत्यूच्या फेर्यात अडकलेल्या माणसाला प्रांत, भाषा, संस्कृती, धर्म, संस्कार ह्या सर्वांच्या निरनिराळ्या रंगांच्या मिश्रणातून स्वतःच्या व्यक्तिमत्वासाठी निरनिरा़ळे पैलू प्राप्त होतात. त्यामुळेच प्रत्येक माणूस दुसर्यापासून पूर्ण भिन्न असतो. मात्र ह्या सर्व भिन्नतेच्या मुळाशी काही समान घटक आढळतातच. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षिततेची इच्छा, प्रेम, क्रोध, अहंकार, मत्सर, भय ह्या सारख्या भावना, सर्वांगीण विकासासाठी एकाचवेळी दैववादी व प्रयत्नवादी असण्याचे मिश्रण असे अनेक घटक!
किंबहुना, समानतेतील वैविध्य आणि वैविध्यातील समानता ही गूढता मानवी जीवनाला रसरशीत बनवते, आस्वाद्य बनवते. कलाकार तो, जो ह्या विचाराशी पोहोचून मग एखाद्या गुणगुणणार्या माशीप्रमाणे त्यातच आपली कला चितारत राहतो किंवा तिला मूर्त स्वरूप देत राहतो. कवी हा एक कलाकारच असतो. कवी तो, जो ह्या विचाराशी पोचून स्वतःच्या खास ठेवणीतल्या अक्षरकुंचल्याने त्याच त्याच माणसाला त्याच त्याच आयुष्याचे तेच तेच पैलू असे दाखवतो की जणू नवेच आयुष्य बघायला मिळाले अशी भावना रसिकाच्या मनात यावी.
नाहीतर वेगळे सांगणार काय? अरबस्तानातील बंधनांमध्ये जगणारी तरुणी, इथियोपियातील उपासमारीवर पोसलेला एखादा तरुण किंवा स्वित्झर्लंडमधील एखादा धनिक हे सगळेजण त्यांची कथा सांगतील ती वरवर खूप वेगळी वाटेलच. पण खूप खोलवर, त्यातही काहीतरी समान आढळेल. आणि त्या साम्यातही किती वैविध्य आहे हे जो सूक्ष्मपणे दाखवू शकतो तो समर्थ कवी ठरू शकतो.
वय ३३, इ,स. २००८ पासून गझल लेखनास प्रारंभ! हात धरून गझल शिकवणारे कोणीही नाही. विचार स्वतःचे, अनुभुती स्वतःच्या, तंत्राचा अभ्यास स्वतःच स्वतः केलेला आणि संदर्भ घ्यायला भटसाहेबांची 'गझलेची बाराखडी'! एवढ्या भांडवलावर कोणी मंचावरील सर्वात लोकप्रिय गझलकार ठरता ठरताच काही अंतर्मुख करायला लावणारे शेर रचणारा गझलकारही झाला असेल हे अविश्वसनीय वाटते.
अर्ध्या मात्रेवर ज्या क्षेत्रात हिणकस स्वरुपाचे वाद होतात, टोळ्या बनतात, राजकारणे होतात, रक्तदाब वाढवले जातात किंवा वाढवून घेतले जातात त्या क्षेत्रात सकस लेखन करून पुन्हा सर्वांना प्रिय होणे अवघड आहे. त्यातच पुन्हा मराठवाड्याचे दुष्काळी संस्कार मनावर झालेले आणि व्यवसाय शिक्षकाचा! हळवेपणा त्यामुळे रक्तातच पेरलेला! अश्या ह्या कवीचा 'श्वासांच्या समिधा' हा गझलसंग्रह प्रकाशित झाला व त्याचा परिचय आज आपण करून घेत आहोत.
मराठी गझलेने आता कोणताही विषय वर्ज्य मानलेला नाही. महाराष्ट्रातून इतक्या वैविध्यपूर्ण गझला वाचायला मिळत आहेत की उर्दूची ही धाकटी बहिण आता केव्हाच स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःची वेगळी संस्कृती झळकवत आहे. मराठी गझलेवर कामही खूप होत आहे. मुशायरे, पुस्तके इत्यादी!
मात्र त्यातल्यात्यात मराठवाड्याची गझल औरच आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. का ते माहीत नाही, कदाचित मातीतच गुण असावा, पण मराठवाड्यातील गझल हृदयाला बोचते. वरवर पाहता तिच्यात काहीही आकर्षक नसते, पण शेर वाचून झाला की क्षणभर आवंढा गिळण्यासाठी थांबावे लागते. अनंत ढवळे आणि वैभव देशमुख तसेच त्यांच्यासारख्या इतर अनेकांनी भूषवलेल्या ह्या मराठवाड्याच्या गझलेला आता सतीश दराडे नावाचे एक नवीन, अल्पावधीत सर्वतोमुखी झालेले आणि प्रामाणिक कोंदण मिळालेले आहे.
मजला सुपातल्यांनो सांगू नका हुषारी
बोलू निवांत सगळे जात्यात भेटल्यावर
================
थोडा उजेड द्या हो, थोडा उजेड द्या
काढील सूर्य हेही उद्गार शेवटी
================
सूर्यास मावळू द्या नादान काजव्यांनो
मिरवू नका बुडाच्या ठिणग्या भल्या दुपारी
=============================
या मनाचा मोर हेकेखोर झाला
पावसावाचून म्हणतो नाचुया चल
=============================
सतीश दराडेंची गझल ही एखाद्या आडगावात एखादा परंपरागत पियक्कड अर्ध्या रात्री, आजूबाजूने डझनावारी कुत्री भुंकत असतानाही स्वत:च्याच धुंदीत बडबडत कुठेतरी चाललेला असतो तशी आहे. त्याला ना फिकीर टाळीबाज म्हणणार्यांची ना चिंता मात्रादोष अन् वृत्तदोष सांगून वांझोटे आखाडे स्थापणार्यांची! कुठेतरी म भा चव्हाणांच्या शायरीची जातकूळ तेवढी दिसते ह्या नशील्या शब्दसिंचनात! 'मी तुला गंभीरपणे घेतले तर तू स्वतःला गंभीरपणे घेऊ शकशील ना, मी कुठे तुला गंभीरपणे घेतोय पण' असा एक मिश्कील आणि बेफिकीर सवाल सगळ्या जगाला करत ही शायरी डुलत डुलत चाललेली आहे.
झालो कसा विदेही गझले तुझ्यामुळे
देहाशिवाय जगणे जमले तुझ्यामुळे
चौर्यांशि लक्षवेळा जन्मून वारलो
हे चक्र जीवघेणे चुकले तुझ्यामुळे
सतीश दराडेंवर मंचीय कविता रचणारा आणि टाळीबाज शेर कोरणारा कवी असा शिक्का मारण्यात मराठी गझलक्षेत्राने उत्कृष्ट घाई करून दाखवली. लेबले लावण्यात पटाईत असलेल्या ह्या गझल राजकारण्यांना हा एक शेर समर्पक चपराक देतो. पण नेमका हाही शेर टाळीबाज शेर मानला जाणार, कारण आपण सगळे 'मराठी' ना?
फक्त टाळ्यांची नका रे दखल घेऊ
एक तुटका हातही बेभान आहे
'टाळीबाज शेर' ही संज्ञा एखाद्या शिवीप्रमाणे गझल क्षेत्राला इन्फेक्ट करत असताना ही संज्ञा आये दिन वापरणार्यांना माझा सवाल असा आहे, की टाळीबाज नसलेले शेर महान असतात हे समजण्यासाठी तरी टाळीबाज शेर व्हायला हवेत ना? आम माणूस गझलेचा रसिक व्हावा असे वाटत असेल तर त्याच्या सामान्य अभिरुचीला ललकारणारे शेर रचणे हा तुम्हा थोर समीक्षकांच्या मते एक स्वस्त उपाय असेल, पण असे काम कोणीतरी करते म्हणून तर त्यापेक्षाही मोठे काहीतरी असू शकते हे समजायला वाव निर्माण होतो, नाही का?
जीव आंब्याची डहाळी होत जातो
काय गाते कोकिळा माहीत नाही
पोट फुटल्यासारखे आभाळ गळते
मारला कोणी विळा माहीत नाही
परवाच एका मुशायर्याला उपस्थित होतो. ह्या मुशायर्याला मिळालेली उत्स्फुर्त दाद ही जितकी गझलेच्या आशयनिगडीत सौंदर्याला होती तितकीच सादरीकरणातील ठसक्याला होती. एखादा शेर शायराने स्वतः प्रस्तूत केलेला नसेल, आपण जर तो नुसताच कोठेतरी वाचला असेल आणि त्या शेराने काळजात घर केले असेल तर तो मंचीय, टाळीबाज ठरू नये. कारण त्यात सादरीकरणाचा प्रभाव काहीच नाही. सतीश दराडेंचे असे अनेक शेर श्वासांच्या समिधामध्ये आढळतात. परवाच्या त्या मुशायर्यातच ह्या पुस्तकाचे प्रकाशनही झाले आणि सतीश दराडेंना गझल उन्मेष हा पुरस्कारही मिळाला त्याबद्दल तो पुरस्कार देणार्यांचे एका उत्तम निर्णयाबद्दल अभिनंदन!
श्वास माझा अता मोकळा वाटतो
हा हवेचा नवा सापळा वाटतो
======================
वारतो माणूस जेव्हा चांगला
अंतराळी एक तारा वाढतो
नेहमी झाकुन कुपी ठेवू नये
अत्तराचा कोंडमारा वाढतो
======================
व्यवसायाने शिक्षक असलेल्या सतीश दराडेंची स्वानुभुती त्यांच्या शेरात कशी डोकावते पाहा:
पुस्तके जाळुनी भाकरी भाजते
ह्या मुलीला कसे मी अडाणी म्हणू
========================
एकुणात, सामाजिक, स्वानुभुतीविषयक आणि काही प्रमाणात रुढीप्रथांची खबर घेणारी अशी दराडेंची ही गझल आहे. पुस्तक वाचनीय व संग्राह्य आहे. काही ठिकाणी काही किरकोळ तांत्रिक तृटी दिसतात. आपण जेव्हा पुस्तक छापतो तेव्हा त्याची अधिक काळजी घ्यायला हवी असे वाटते. विचारांचे रिपीटेशन जाणवत नाही ही बाब चांगली आहे. कोणाचाही प्रभाव जाणवत नाही पण वर म्हंटल्यानुसार म भा चव्हाणांच्या गझलेची जातकुळी असल्याचे वाटून जाते. मला असे वाटते की ढवळे, वैभव देशमुख, समीर आणि विदिपा ह्यांच्या गझलांचे त्यांनी अधिक वाचन करावे.
या लेखमालिकेतील पुढील लेख अमेय पंडितांच्या मनराईवर लिहिण्याची इच्छा आहे.
सतीश दराडेंच्या गझले लेखनास व एकुणच समृद्धीस मनःपूर्वक शुभेच्छा
-'बेफिकीर'!
=====================
श्वासांच्या समिधा
सोमनाथ प्रकाशन
सुरेश भट जयंतीदिनी (१५ एप्रिल २०१४) प्रथमावृत्ती प्रकाशित
मूल्य - रुपये १००-००
मुखपृष्ठ व मळपृष्ठ - ग्लोईंग सोनेरी व काळ्या रंगाने सजलेले!
वितरण - नीता हिरवे - ९७६ ५५५ ९३२२
सूर्यास मावळू द्या नादान
सूर्यास मावळू द्या नादान काजव्यांनो
मिरवू नका बुडाच्या ठिणग्या भल्या दुपारी............व्वा..
पुस्तके जाळुनी भाकरी भाजते
ह्या मुलीला कसे मी अडाणी म्हणू...... सिग्नेचर सतीश दराडे शेर.
कोणाच्या सुखदु:खाचा मी गूढ उतारा आहे
वाचीत स्वतःला बसलो पण अर्थ कळेना देवा....क्या बात है.
तुमच्या या परिचयपर लेखानंतर पुस्तक वाचण्याची उत्सुकता लागली आहे.
धन्यवाद भूषणजी.
अभिनंदन सतीश.
व्वाह ! उत्कृष्ट लेख. अनेक
व्वाह !
उत्कृष्ट लेख. अनेक ओळी परत परत वाचल्या. खासकरून -
समानतेतील वैविध्य आणि वैविध्यातील समानता ही गूढता मानवी जीवनाला रसरशीत बनवते, आस्वाद्य बनवते. कलाकार तो, जो ह्या विचाराशी पोहोचून मग एखाद्या गुणगुणणार्या माशीप्रमाणे त्यातच आपली कला चितारत राहतो किंवा तिला मूर्त स्वरूप देत राहतो. कवी हा एक कलाकारच असतो. कवी तो, जो ह्या विचाराशी पोचून स्वतःच्या खास ठेवणीतल्या अक्षरकुंचल्याने त्याच त्याच माणसाला त्याच त्याच आयुष्याचे तेच तेच पैलू असे दाखवतो की जणू नवेच आयुष्य बघायला मिळाले अशी भावना रसिकाच्या मनात यावी.
क्या बात है !
जितक्या पोटतिडकीने सतीश लिहितो, तितक्याच पोटतिडकीने तुम्ही हे लिहिले आहे.
उल्लेखलेले बहुतेक शेर व त्या-त्या गझला मी फेसबुकवर वाचल्या आहेत, पण संग्रही नाहीत. ह्या पुस्तकाच्या रूपाने त्या सर्व मी माझ्या संग्रही ठेवीन.
'टाळीबाज शेर' बद्दल माझं मत असं आहे की गझलचा शेर व कवितेच्या ओळीत हाच फरक आहे की गझलचा शेर थेट, चटकन काळजापर्यंत पोहोचायला हवा. जेव्हा इतक्या चटकन एखादी गोष्ट अपील होते, स्पर्श करते तेव्हा एक संवेदनशील रसिक साहजिकच आपली भावना रोखू शकत नाही आणि आवेगात 'वाहवा' केली जाते, 'टाळी' दिली जाते.
हे सांगायला मला अजिबात कमीपणा वाटत नाही की ज्या शेरावर टाळी पडत नाही, तो शेर माझ्या मते गंडलेला असतो. कदाचित मी क्लासेसमध्ये नसीन, मासेसमध्ये असीन पण जर प्रत्येक दोन ओळींत डुबकी मारून अर्थाचा ठाव घेण्याचं झालं तर गझल पचणे अवघड आहे. हे वैशिष्ट्य कवितेला अधिक शोभून दिसत असावं. शेर हा थेटच असायला हवा. मग भले त्यामुळे तो 'टाळीबाज' म्हणवला जात असेल तर असो. माझ्या मते ही शेराला हवीहवीशी पोचपावती मानायला हवी.
उत्कृष्ट परिचय बेफिजी . मला
उत्कृष्ट परिचय बेफिजी .
मला खात्री होती तुम्ही या गझलसंग्रहाविषयी लवकरच लिहिणार याची .
मराठवाड्यातील गझलेविषयीचे आपले मत वाचून आनंद झाला .त्या मताशी मी सुध्दा सहमत आहे .
या संग्रहात मला रक्तात घट्ट भिनलेल्या मातीशी आजच्या कृत्रिम ,बेगडी जगाशी चाललेली ओढाताण फार स्पष्टपणे जाणवत राहिली .तिथेच एक वेगळा बाज आणि शैली सतिशजींनी कमावल्यासारखी वाटते .
मला या संग्रहातील काही विशेष आवडलेले शेर -
शेतीप्रधान देशा दे एवढेच उत्तर
केव्हा भिजेल अमुची डाळीत पूर्ण भाकर
फक्त टाळ्यांची नका रे दखल घेऊ
एक तुटका हातही बेभान आहे
रानातले गवतही पायास लॉन वाटे
मी वाटतो मला का हल्ली अमीर मित्रा
आता तरी व्यथांनो तुमच्या कुळात घ्या ना
उरलाच प्रश्न कोठे गणगोत मानल्यावर
मन रस्त्यावर भटकत राहो
मात्र पाउले घरात ठेवा
कोणाच्या सुखदुःखाचा मी गूढ उतारा आहे
वाचीत स्वतःला बसलो पण अर्थ कळेना देवा
धन्यवाद !
े
अतिशय उत्तम परिचय, पुस्तक आणि
अतिशय उत्तम परिचय, पुस्तक आणि कवीविषयी आपुलकी निर्माण करणारे लेखन. लवकरच पुस्तक हातात येईल आणि या लेखनाची वाचतेवेळी मोलाची मदत होईल. सतीश दराडे यांचे पुस्तक येणार हे माहित झाल्यावर मुद्दामच त्यांचे नेटवर उपलब्ध लिखाण वाचायचे टाळले कारण पुस्तकातून मिळणारा एकसंध परिणाम जास्त हवाहवासा वाटतो.
इंदोरला आपणा सर्वांची भेट होण्याचीही शक्यता आहे.
परिचय बरोबर करून दिला आहे
परिचय बरोबर करून दिला आहे अनेक बाबी जश्याच्यातश्या पटल्या
मी त्या दिवशी हे पुस्तक आवर्जून विकत घेतले . काल दराडेंसोबत फोनवर चर्चा झाली . मला म्हणाले की तुम्ही पुस्तकाबाबत काही तरी लिहा .मी ओके म्हणालो
आता बेफीजींचा लेख आला म्हटल्यावर मी माझा बेत रद्द केला आहे कारण बेफीजी लिहिताय्त म्हटल्यावर मी लिहायची गरजच नाही आहे
बेफीजींनी दिलेले शेर मलाही ह्या संग्रहातील खास शेर वाटतात ह्या व्यतिरिक्तही असे अनेक शेर आहेत जेही खूप उत्तम आहेत पण सगळेच असे देता येत नाहीत हेही खरेच
मंचावरील सर्वाधिक लोकप्रियता .. अंतर्मुख करायला लावणारे शेर...गझलेतला प्रामाणिकपणा ....ह्याबाबत मी सहमत ...
म.भा. चव्हाणांसारखी जातकुळी ...विचारांचे रिपीटेशन न आढळणे हे विचार तर अगदी माझ्या मनातले
टाळीबाज शेर आणि दराडेंची गझल ह्या बाबत लेखातील काही वाक्यांशी माझी मतभिन्नता .....
सतीश दराडेंची गझल ही एखाद्या आडगावात एखादा परंपरागत पियक्कड अर्ध्या रात्री, आजूबाजूने डझनावारी कुत्री भुंकत असतानाही स्वत:च्याच धुंदीत बडबडत कुठेतरी चाललेला असतो तशी आहे.<<<<<<<क्षमस्व! मला नाही पटले
मला असे वाटते की ढवळे, वैभव देशमुख, समीर आणि विदिपा ह्यांच्या गझलांचे त्यांनी अधिक वाचन करावे. <<< पटले .आणि हे बेफी़जीच सांगू शकतात इतर कुणीही नाही त्यांनी हे सांगीतले त्याबद्दल माझ्यातर्फे बेफीजींचे आभार
सतीश दराडेंना गझल उन्मेष हा पुरस्कारही मिळाला त्याबद्दल तो पुरस्कार देणार्यांचे एका उत्तम निर्णयाबद्दल अभिनंदन! <<<< +१००००००.....
धन्यवाद
आणि हो, एक लिहायचं
आणि हो, एक लिहायचं राहिलंच.
<<या लेखमालिकेतील पुढील लेख अमेय पंडितांच्या मनराईवर लिहिण्याची इच्छा आहे.>>
छान वाटलं वाचून
मस्त परिचय. धन्यवाद,
मस्त परिचय. धन्यवाद, बेफिकिर.
अनेक शेर आवडले.
खूपच सुरेख परिचय करुन दिलात
खूपच सुरेख परिचय करुन दिलात ....
वर उद्धृत केलेले अनेक जबरदस्त शेर आहेत ....
अतिशय तळमळीतूनच असा परिचय
अतिशय तळमळीतूनच असा परिचय सिद्ध होतो. नव्या दमाच्या गझलकार व कवींचे त्याच जोशात तुम्ही केलेले परीक्षण निरीक्षण वाचनीय असणे क्रमप्राप्त !
मराठवाड्यातील प्रतिभेबद्दलची तुमची मते मननीय. अगदी बी रघुनाथांपासून हे चालत आले आहे..पण कोरडवाहू शेतीप्रमाणेच काहीतरी चिवट टिकून रहाणारे जीवनसत्व या प्रदेशाने आपल्या लेकरांना दिले आहे आणि आता सर्वच क्षेत्रात त्यांची दखल घेतली जात आहे.
दराडे यांची गझल या लेखातूनच मी वाचली, ती सखोल वेदनेतून आली आहे , टाळीबाज सादरीकरणात
समूहमनाचे नियम लागू होतात , एकांतातली सूक्ष्मसूक्ष्म स्तर शोधणारी अंतर्मुख शैली तिथे कमी पडू शकते पण हे सुरुवातीलाच. एकदा अशा लेखनाचा परिचय झाला, गोडी लागली की हेच समूहमन त्याचा उदार स्वीकार करते,गर्दीतही प्रत्येकजण आत्मरती अनुभवू शकतो.
अमेय पंडित यांच्या मनराईवरील लेखाची प्रतीक्षा ..
प्रत्येक प्रतिसाददात्याचे
प्रत्येक प्रतिसाददात्याचे मनापासून आभार!
भारती, मूळ लेखनापेक्षा त्यावर आलेला प्रतिसाद गौरवनीय ठरावा असा तुमचा प्रतिसाद आहे.
टाळीबाज सादरीकरणात समूहमनाचे
टाळीबाज सादरीकरणात
समूहमनाचे नियम लागू होतात , एकांतातली सूक्ष्मसूक्ष्म स्तर शोधणारी अंतर्मुख शैली तिथे कमी पडू शकते पण हे सुरुवातीलाच. एकदा अशा लेखनाचा परिचय झाला, गोडी लागली की हेच समूहमन त्याचा उदार स्वीकार करते,गर्दीतही प्रत्येकजण आत्मरती अनुभवू शकतो.>>>>>
टाळीबाज सादरीकरणात समूहमनाचे
टाळीबाज सादरीकरणात
समूहमनाचे नियम लागू होतात , एकांतातली सूक्ष्मसूक्ष्म स्तर शोधणारी अंतर्मुख शैली तिथे कमी पडू शकते पण हे सुरुवातीलाच. एकदा अशा लेखनाचा परिचय झाला, गोडी लागली की हेच समूहमन त्याचा उदार स्वीकार करते,गर्दीतही प्रत्येकजण आत्मरती अनुभवू शकतो.<<<<<<<<<<<<<<<<<<<
________________________/\_________________________
फक्त टाळ्यांची नका रे दखल
फक्त टाळ्यांची नका रे दखल घेऊ
एक तुटका हातही बेभान आहे
व्वा.
दराडेंचे अभिनंदन.
भूषणः परिचयाबद्दल धन्यवाद.
प्रकृतीस्वास्थ्यासाठी आभाळभर
प्रकृतीस्वास्थ्यासाठी आभाळभर शुभेच्छा सतीश!
आभाळभर!
आज सतीश गेला.
आज सतीश गेला.
(कदाचित काहींनी फेसबुकवर हे वाचले असेल)
भावपूर्ण श्रद्धांजली
<< आज सतीश गेला.>> ------
<< आज सतीश गेला.>>
------