९० डिग्री साऊथ - ३

Submitted by स्पार्टाकस on 18 April, 2014 - 15:33

१९०८ मध्ये जीन बाप्टीस्ट चार्कोटच्या फ्रेंच मोहीमेने अंटार्क्टीकमधील अनेक प्रदेशांचा शोध घेतला. रेनॉड बेटं, मिकेल्सन उपसागर, मार्गारेट उपसागर, जेनी बेट, मिलरँड बेटं अशा अनेक प्रदेशांचे नकाशे फ्रेंचांनी तयार केले. परंतु दक्षिण धृवाच्या दिशेने मजल मारण्यात मात्रं त्यांना अपयशच आलं.

१९०४ मध्ये डिस्कव्हरी मोहीमेवरुन परतल्यावर कॅप्टन रॉबर्ट फाल्कन स्कॉटने पुन्हा आपल्या नौदलातील कारकिर्दीला पुन्हा सुरवात केली. ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तावरुन परत फिरावं लागलेलं असलं, तरीही पुन्हा अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर जाण्याचा विचार त्याने सोडला नव्हता. एर्नेस्ट शॅकल्टन निम्रॉड मोहीमेत ८८ अंश दक्षिण अक्षवृतापर्यंत पोहोचून परत फिरल्यावर तर स्कॉटचा निश्चय आणखीनच पक्का झाला. त्यातच मॅकमुर्डो साऊंड आणि व्हिक्टरी लँडच्या आपल्या हक्काच्या प्रदेशातून शॅकल्टनने वाटचाल केल्यामुळे स्कॉट चांगलाच खवळला होता. रॉयल जॉग्रॉफीक सोसायटीच्या पाठींब्याने स्कॉटने पुन्हा अंटार्क्टीकाच्या मोहीमेची जुळवाजुळव केली. या मोहीमेला नाव देण्यात आलं टेरा नोव्हा !

स्कॉटने शॅकल्टनवर प्रखर टीका केली असली, तरीही त्याने शॅकल्टनच्या मोहीमेचा बारकाईने अभ्यास केला होता. शॅकल्टनने डिझेल मोटरवर चालणा-या स्लेजसारख्या गाडीचा वापर केला होता. स्कॉटनेही आपल्या मोहीमेत अशा गाड्यांचा तसेच शॅकल्टनप्रमाणेच घोड्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. मात्रं कुत्र्यांच्या वापराबाबत स्कॉटचं मत फारसं अनुकूल नसलं, तरी योग्य प्रशिक्षणाअंती त्यांचा योग्य वापर करुन घेता येईल याची त्याला कल्पना होती. मात्रं त्याचा मुख्य भर पदयात्रेवरच होता.

मोहीमेची जुळवाजुळव सुरू झाल्यावर स्कॉटने दक्षिण धृवावर जाण्याचा इरादा जाहीर केला.

" ही शास्त्रीय संशोधनमोहीम असली तरीही आमचं मुख्यं लक्ष्यं असेल ते ब्रिटीश साम्राज्याच्या वतीने सर्वप्रथम दक्षिण धृव पादाक्रांत करणं !"

स्कॉटच्या टेरा नोव्हा मोहीमेचा अर्धा खर्च ब्रिटीश सरकारने उचलला असला तरी उरलेल्या खर्चाची तरतूद करण्याच्या दृष्टीने स्कॉटने अनेकांकडून मदत मिळवली होती. प्रत्यक्ष मोहीमेवर निघाल्यावरही त्याला दक्षिण आफ्रीक, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथे आर्थिक मदत मिळवण्यात यश आलं होतं.

स्कॉटच्या मोहीमेची जुळवाजुळव सुरू असताना इतरत्रं काय हालचाली सुरू होत्या ?

१८९७-९९ च्या पहिल्या बेल्जीयन मोहीमेतून परतल्यावर रोनाल्ड अ‍ॅमंडसेनने उत्तर धृवीय प्रदेशावर आपलं लक्षं केंद्रीत केलं होतं. अटलांटीक महासागरातून पॅसीफीक मध्ये जाण्यासाठी केप हॉर्नमार्गे दक्षिण अमेरिकेला वळसा घालून न जाता आर्क्टीक मधून जाणारा ' नॉर्थवेस्ट पॅसेज ' शोधण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला होता. अनेक जण त्या प्रयत्नात बर्फाला अडकून प्राणाला मुकले होते.

१९०३ मध्ये ४५ टनांच्या ग्जो या आपल्या नौकेतून अ‍ॅमंडसेनने सहा सहका-यांसह नॉर्थवेस्ट पॅसेजच पार करण्याच्या इराद्याने प्रस्थान ठेवलं. लहानशा नौकेच्या सहाय्याने किना-या-किना-याने प्रवास करत अलास्का गाठण्याचा त्याचा बेत होता.

बॅफीन उपसागर, पॅरी चॅनल मार्गे त्यांनी पील साऊंड, जेम्स रॉस, सिम्प्सन आणि रे या सामुद्रधुन्या ओलांडल्या आणि कॅनडातील नॉनव्हट इथलं किंग विल्यम बेट गाठलं. पुढचे दोन हिवा़ळे त्यांनी तिथे मुक्काम ठोकला ! या दरम्यान स्थानीक रहिवासी असलेल्या नेटस्लीक लोकांकडून अ‍ॅमंडसेनने धृवीय प्रदेशांत सफाईदारपणे वावरण्याचं आणि कमीत कमी सामग्रीत टिकाव धरण्याचं तंत्रं आत्मसात केलं. कुत्र्यांच्या सहाय्याने स्लेजचा वापर करणं आणि लाकडाच्या भुशापासून बनवलेले थंडीला प्रतिरोध करणारे जड कपडे वापरण्याऐवजी प्राण्यांच्या कातड्यापासून बनलेले हलके कपडे वापरण्याची कलाही त्याने आत्मसात केली. धॄवीय प्रदेशांतील आपल्या पुढील मोहीमांत या सर्व ज्ञानाचा त्याने योग्य तो उपयोग केला.

किंग विल्यम बेट सोडल्यावर अ‍ॅमंडसेनने पश्चिमेचा मार्ग धरला आणि केंब्रीज उपसागर गाठला. १८५२ मध्ये पश्चिमेहून रिजर्ड कॉलीसनने इथपर्यंत मजल मारली होती. केंब्रीज उपसागर ओलांडून त्यांनी व्हिक्टोरीया बेट गाठलं. १७ ऑगस्ट १९०५ मध्ये त्यांनी आर्क्टीक समुद्राचा कॅनेडीयन भाग ओलांडला. हिवाळा ओलांडल्यावर त्यांनी १९०६ मध्ये अलास्काच्या पश्चिमेला किना-यावर असलेलं नोम गाठलं.

नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे ओलांडण्यात अ‍ॅमंडसेनने यश मिळवलं होतं !

Northwaste Passage.jpgनॉर्थवेस्ट पॅसेज

नोमपासून सर्वात जवळ असलेलं तारेची सोय असलेलं ठिकाण म्हणजे ५०० मैलांवरील इगल सिटी ! अ‍ॅमंडसेनने इगल सिटी गाठून आपली मोहीम यशस्वी झाल्याची तार नॉर्वेचा राजा ७ वा हकोन याला पाठवली. अ‍ॅमंडसेन नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर असताना नॉर्वे स्वीडनपासून स्वतंत्र झाला होता. आपल्या मोहीमेचं यश अ‍ॅमंडसनने स्वतंत्र नॉर्वेला समर्पीत केलं ! साडेतीन वर्षांच्या मोहीमेनंतर १९०६ च्या नोव्हेंबरमध्ये अ‍ॅमंडसेन नॉर्वेला परतला.

नॉर्वेला परतल्यावर अ‍ॅमंडसेनने आपल्या पुढच्या मोहीमेच्या दृष्टीने तयारीला सुरवात केली. या खेपेला त्याचं लक्ष्यं होतं ते उत्तर धृव !

१८९३-९६ च्या मोहीमेत फ्रिट्झॉफ नॅन्सन उत्तर धृवाच्या मोहीमेवर गेला होता. न्यू सैबेरियन बेटांवरुन उत्तर धृवाच्या मार्गाने ग्रीनलंड गाठण्याचा त्याचा बेत होता ! त्या दृष्टीने त्याने कॉलीन आर्चर याच्याकडून ' फ्राम ' हे जहाज बांधून घेतलं. आर्चर हा जहाजबांधणीत नावाजलेला सर्वोत्कृष्ट नॉर्वेजीयन इंजिनीअर आणि आर्कीटेक्ट होता ! बर्फात अडकल्यानंतरही नुकसान न पोहोचण्याच्या दृष्टीने त्याने काळजीपूर्वक फ्रामची बांधणी केली.

उत्तर धृवाच्या आपल्या मोहीमेत नॅन्सनने ८६ अंश उत्तर अक्षवृत्त गाठण्यात यश मिळवलं, परंतु उत्तर धृवावर पोहोचण्यात मात्रं त्याला अपयश आलं. मात्रं फ्राम जहाज मात्रं कसोटीला पूर्णपणे उतरलं होतं ! १८ महीने बर्फावर अडकून आणि भरकटूनही फ्रामचं कसलंही नुकसान झालेलं नव्हतं ! आपल्या उत्तर धृवीय मोहीमेच्या दृष्टीने फ्राम जहाज वापरण्याची अ‍ॅमंडसेनने नॅन्सनकडून परवानगी मिळवली !

Nansen.jpgफ्रिट्झॉफ नॅन्सन

उत्तर धृवाच्या मोहीमेवर जाण्याचा आपला इरादा अ‍ॅमंडसेनने १० नोव्हेंबर १९०८ मध्ये जाहीर केला. नॉर्वेहून निघाल्यावर केप हॉर्नमार्गे दक्षिण अमेरिकेला वळसा घालून सॅन फ्रान्सिस्को गाठायचं आणि उत्तरेच्या दिशेला पॉईंट बॅरो मार्गे बर्फातून उत्तर धृव गाठण्याचा त्याचा बेत होता. अ‍ॅमंडसेनच्या या मोहीमेला नॉर्वेचा राजा ७ वा हकोन याने पूर्ण पाठींबा दिला.

अ‍ॅमंडसेनच्या मोहीमेची तयारी सुरू असतानाच अमेरीकन फ्रेड्रीक कूक आणि रॉब पेरी यांनी अनुक्रमे १९०८ आणि १९०९ मध्ये उत्तर धृव गाठल्याचा दावा केला. पेरी आणि कूक यांनी परस्परांवर उत्तर धृवावर न पोहोचल्याचा आणि खोटी माहीती दिल्याचा आरोप केला. रॉयल जॉग्रॉफीक सोसायटीने पेरीला अर्थसहाय्य केलं होतं, त्यामुळे त्यांनी पेरीचा हा दावा ताबडतोब मान्यं केला ! कूकच्या पाठीराख्यांची संख्या हळूहळू रोडावत गेली. पेरीच्या यशाबद्दलही संदिग्धता असली तरीही तत्कालीन बहुसंख्य संशोधकांनी पेरीचा दावा मान्यं केला.

( उत्तर धृवावर नि:संशयपणे पोहोचलेला पहिला संशोधक आणि दर्यावर्दी म्हणजे वॉल्टर विल्यम हर्बर्ट ! १९६९ च्या मोहीमेत त्याने उत्तर धृवावर पाऊल ठेवलं ! )

पेरी आणि कूक यांनी परस्परविरोधी दावे केले असले तरीही दोघांपैकी एकजण निश्चीतच उत्तर धृवावर पोहोचण्यात यशस्वी झाला असणार याबद्दल अ‍ॅमंडसेनला खात्री होती. त्यामुळे उत्तर धृवावर पोहोचण्याचा आपला इरादा बदलून त्याने आपलं नवीन लक्ष्यं निश्चीत केलं.

दक्षिण धृव !

उत्तर धृव पादाक्रांत करण्यात पेरीला यश आल्याच्या बातमीमुळे अ‍ॅमंडसेनच्या मोहीमेला मिळणारा पाठींबा आणि आर्थिक मदत ब-याच प्रमाणात कमी झाली. मोहीमेचा खर्चाच्या तयारीसाठी अ‍ॅमंडसेनने आपलं घरही गहाण टाकलं !

उत्तर धृवाऐवजी दक्षिण धृवावर जाण्याचा अ‍ॅमंडसेनने निश्चय केला असला तरी आपल्या बदललेल्या बेताची त्याने कोणालाही चाहूल लागू दिली नाही. आधीच रोडावलेली आर्थिक मदत पूर्णपणे बंद पडण्याची त्याला भीती वाटत होती ! नॉर्वेचा किनारा सोडेपर्यंत केवळ अ‍ॅमंडसेनचा भाऊ लिऑन आणि मोहीमेतील अ‍ॅमंडसनखालोखाल दुस-या क्रमांकाचा अधिकारी थॉर्वल्ड निल्सन यांनाच या बदललेल्या बेताची कल्पना होती !

नॉर्थवेस्ट पॅसेजच्या मोहीमेवर असताना अ‍ॅमंडसेनला बर्फाळ प्रदेशातील कुत्र्यांची उपयुक्तता ध्यानात आलेली होती. आपल्या धृवीय मोहीमेच्या दृष्टीने त्याने बर्फात वावरण्यास सरावलेले १०० ग्रीनलँड कुत्रे बरोबर नेण्याचा निर्णय घेतला होता. बर्फावर प्रवासाच्या बरोबरच इतर कुत्र्यांना आणि जरुर पडल्यास मोहीमेतील लोकांनाही ताजं मांस मिळण्यासाठी कुत्र्यांचा वापर करण्याचा त्याचा विचार होता !

अ‍ॅमंडसेनच्या उत्तर धृवाच्या मोहीमेबद्दल माहीती मिळाल्यावर कॅप्टन स्कॉटने त्याला इंग्लंडमधून काही उपकरणं पाठवली होती. अ‍ॅमंडसेनने उत्तर धृवावर आणि आपण दक्षिण धृवावर शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने एकाच वेळेस आवश्यक माहीती मिळवावी असा त्यामागे स्कॉटचा हेतू होता.

ब-याच खटपटी करुन स्कॉटने टेरा नोव्हाला ब्रिटीश नौदलाचं जहाज म्हणून मान्यता मिळवली होती ! त्यासाठी त्याने रॉयल याच स्क्वॉड्रनची सदस्यता मिळवली होती. अन्यथा सामान्य व्यापारी जहाज म्हणून टेरा नोव्हाला अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर जाण्याची परवानगीच मिळाली नसती !

७ जून १९१० ला अ‍ॅमंडसेनने नॉर्वेचा किनारा सोडला !

१५ जून १९१० ला टेरा नोव्हाने इंग्लंडचा किनारा सोडला. काही कामानिमीत्त मागे राहीलेल्या स्कॉटने काही दिवसांतच प्रस्थान ठेवलं.

दक्षिण धृवावर पोहोचण्यात कोण बाजी मारणार होतं ?

क्रमश :

९० डिग्री साऊथ - २                                                                                                           ९० डिग्री साऊथ - ४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users