बाबा

Submitted by संतोष वाटपाडे on 15 January, 2014 - 10:17

खांद्यावरती जुनी घोंगडी
गर्द धुळीने बरबटलेली
पागोट्याची कैक लक्तरे
डोक्यावरती लपेटलेली
जुनाट मळक्या धोतरातला
मस्त देखणा माझा बाबा
शेत उभ्याने कातरताना
भाळावरच्या घामामध्ये
जीवन माझे शेंदत होता....

नाकामधल्या वेसणीतला
आवेग त्याचा कळवळणारा
तोंडामधून क्षणाक्षणाला
फ़ेस धरेवर टपटपताना
गवत वाळके माती खाऊन
क्षीण बापुडा धडपडणारा
बैल जीवाच्या आकांताने
वावरातल्या ढेकळातही
अजून नांगर ओढत होता....

आयुष्याच्या पाठीवरती
नाराजीच्या चाबूकातले
असंख्य फ़टके देता देता
कैक शिव्यांना हासडताना
रक्त कोरड्या ओठावरचे
हळूच गिळता गिळता बाबा
वांझ भुईच्या पोटावरती
मंतरलेली खुळी गरीबी
डोळ्यांमधून ओतत होता...

लहान भाऊ बहिण आणिक
सुरकुतलेली माझी आई
डोक्यावरती चिंधूक घेऊन
बोरखडीच्या झाडाखाली
घशात वारा ओतून ओतून
हताश व्याकूळ बसले असता
धगधगणारा सुर्य नभातील
पाहून त्यांना असे उपाशी
खदखद साला हासत होता...

वांझ जरीही जमीन होती
भूक गरीबी कठीण होती
शुष्क फ़ाटक्या शेतामधूनी
अंकूर फ़ुटतील कधीतरी रे
देव झोपला अजून नाही
असेच बोलून माझा बाबा
औतावरच्या बैलांसोबत
खोदून शेतामधली माती
प्राक्तन आमचे शोधत होता...

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न राहवून आज परत वाचली कविता.
एकदम लख्खं झालेली ओळ - "मस्त देखणा माझा बाबा".

शेंदणे - आडातून पाणी शेंदतो. आडामधे नाही.
असं मला वाटतं. इतक्या सुंदर कवितेत इतकीही फट नको ह्यसाठी आटापिटा आहे, संतोष... राग नका मानू प्लीज.

अतिशय ह्र्दयस्पर्शी कविता आहे. भिडली एकदम.

दाद तू राग मानणार नसशील म्हणून लिहिते या कवितेसाठी वापरलेला "शेंदणे"चा प्रयोग बरोबर आहे (की आता शब्द बदलला आहे माहित नाही. मी उशीरा वाचतेय)

Pages