होल व्हिट बन्स - कणकेचे पाव/ब्रेड/बन

Submitted by मामी on 11 March, 2012 - 00:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कोमट पाणी : १/४ कप
कोमट दूध : १ कप
तेल : १/३ कप
ब्राऊन साखर / साधी साखर / मध - १/४ कप (हे मी जी रेसिपी नेटवरून घेतली होती त्यातलं प्रमाण दिलं आहे. पहिल्यांदा बन्स बनवले त्यावेळी याच प्रमाणानं मी पाव कप मध वापरला. पण खरंतर या प्रमाणानं बन्स गोड लागतात. त्यामुळे दुसर्‍या वेळी करताना एक चमचा साखर वापरली. ते आपल्याला झेपतात.)
यीस्ट - २ टेबलस्पून (ब्लुबर्डचं ड्राय यीस्ट मिळतं. हे छोट्या छोट्या दाण्यांच्या स्वरूपात (granules) असतं.)
मीठ - १ टेबलस्पून
अंड - १
कणिक - साडेतीन कप

इथे लिहिलेल्या पदार्थांच्या प्रमाणात जो कपाचा उल्लेख आहे तो आपल्या चहाचा कप नाही. हे कपाचे प्रमाण म्हणजे जे मेझरिंग कप्स असतात त्यांचं आहे. नेहमी घरी केक वगैरे करणार्‍यांकडे असा प्लॅस्टिक अथवा काचेचा मग असतो, त्यावर अर्धा कप, एक कप अशा खुणा असतात. साधारणपणे असा एक कप म्हणजे आपला चहाचा दीड कप (मध्यम आकाराचा) होतो. हे मी माझ्या घरातल्या चहाच्या कपाच्या प्रमाणाने सांगितले आहे. थोडेफार प्रमाण बदलले तरी ब्रेडवर तसा फारसा परिणाम दिसणार नाही.
या प्रमाणात घेऊन खूपच बन्स बनतात. म्हणून साधारण ३ लोकांकरता हवे असतील तर अर्ध्याच प्रमाणात बनवावे.

क्रमवार पाककृती: 

कोमट पाणी, कोमट दूध, यीस्ट, तेल, साखर (किंवा मध) एका भांड्यात व्यवस्थित एकत्र करा आणि झाकून १५ मिनिटे तसंच राहू द्या.

अंड फोडून हलकेच फेटून घ्या.

पंधरा मिनिटांनी त्या मिश्रणाच्या भांड्यात अंडं, मीठ आणि कणिक घाला आणि चांगलं एकत्र करा. पुन्हा १५ मिनिटांकरता झाकून ठेवा.

एकीकडे आवन ३७५ डिग्री फॅरनहाईट (म्हणजे साधारण १९० डिग्री सेल्सियस) ला गरम करून घ्या.

पंधरा मिनिटांनी भिजवलेली कणिक नीट मळून घ्या. आता त्या कणकेला जाळी सुटलेली जाणवेल. या कणकेचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करून आवनमध्ये १० मिनिटांकरता (किंवा बाहेरून सोनेरी-तांबूस रंग येईपर्यंत) भाजा.

अधिक टिपा: 

नुसते गोळे करण्यापेक्षा बर्‍याच कलाकुसरीही करता येतात. पहिल्यांदा बन्स केले त्यावेळी आम्ही बरेच आकार केले होते. करण्याच्या आणि खाण्याच्या त्या उत्साहात फोटो काढायचे मात्र राहून गेले. पण काही आकार :

स्माईली बनवणे - चपटा गोळा करून त्यावर दोन छोटे गोल डोळ्याच्या जागी आणि एक सुरळी करून हसरं तोंड बनवता येईल.
वेणी - तीन सुरळ्या करून तिपेडी वेणी वळून दोन्ही बाजूची टोकं व्यवस्थित एकत्र करून ठेवा.
असेच चकली, लगोरी, ब्रेडस्टिक्स असे असंख्य प्रकार करता येतिल.

हा ब्रेड गरमागरम एकदम सही लागतो. पण उरलात तर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. एखाद-दोन दिवस चालेल.

हवं असल्यास कणिक भिजवताना त्यात पार्सली, ओरेगानो, बेसिल असे हर्ब्ज घालत येतील. दालचिनी पावडरही घालून करता येईल.

माहितीचा स्रोत: 
मंजूडीचं प्रोत्साहन आणि नेटवरून मिळालेली पाककृती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मावेचं माहित नाही. मी साधा अ‍ॅल्युमिनियमचा गोल आवन वापरते. त्याचं टेंपरेचरचं बटणही तुटलंय. Proud

जरा इतर कोणी सांगा ब्रेड कोणत्या मोडवर ठेवायचा ते. Happy

त्याचं टेंपरेचरचं बटणही तुटलंय. >>> हे भगवान!!!

>>>> Happy जनाबाईचं दळण दळून देणारा देव माझे ब्रेडही भाजून देतो. Wink

मामे, काल केला एकदाचा हा ब्रेड. तुझ्या घरी खाल्ल्यापासुन ऐशू मागे लागलेली कर कर म्हणुन पण जळ्ळं ते यिस्टच दुकानांतुन गायब झालेलं (त्यांना कळलं काय मी करणारे ते.. Happy ) हायपरमध्ये एकदाचं सापडलं आणि मग काल केला ब्रेड, करताना लसुण आणि रोजमेरी, थाइम व्.व. जिन्नस घातलेले त्यामुळॅ छान गार्लिक ब्रेडसारखा झाला. अंडी सध्या नाहीयेत घरात त्यामुळॅ घातली नाहीत. पुढच्या वेळेस घालेन.

मामी, त्या सगळ्या मिश्रणामध्ये जर कोको पावडर आणि थोडी जास्त साखर घातली तर चालते का गं?

मी काल केले हे बन्स. मस्त झाले Happy
फक्त ही रेसिपी सार्वजनिक करणार का? शोधायला गेलं तर सापडत नाही.

सार्वजनिक केली आहे. धन्स राखी.

भानुप्रिया, मला वाटतं आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण थोडंफार वाढवायला हरकत नाही.

कोकोही वाईट कशाला लागतोय? पण हे पाव आहेत, मफिन्स वा केक नव्हेत म्हणून नक्की कसे लागतील ते नाही सांगू शकत.

मामी, धन्स गं!
करून बघेन आणि सांगेन तुला!

आणि अहो टकाटक, तुम्हि जरा हे रिक्षा स्पॅमिंग बंद करावत अशी नम्र विनंती!

मामी,कालच करून बघितले.मस्त जमले.याआधी बन्स कधीच केले नव्हते त्यामुळे अर्धे प्रमाण वापरुन घाबरतच केले.पण काल केले व कालच संपले Happy
रेसिपीबद्दल धन्स!

बिग बझार मधे मेजरिंग कप घ्यायला गेले तर २ वेगवेगळ्या रंगामधे वेगळे मेजर होते. १ मधे २५० मिली. तर दुस-यामधे २४० मिली. मग मैत्रिणीला फोन करुन विचारल तर तिच्या कडच्या कप मधे २०० मिली. तर मी असे कप न घेताच परत आली. कोणी सांगाल का कप वरच माप काय असते?

हे बन करायला आज मुहुर्त लागला. कणिक मिसळल्यानंतर लगेच माझ्याकडे इमर्जंसी सिच्युएशन झाली. कणिक बर्‍यापैकी सैल वाटत होती. मग मंजूडीला समस करून कणकेची नक्की कंसिस्टंसी विचारुन घेतली. तिच्या सल्ल्याप्रमाणे नंतर कणिक भरपूर मळूनही घेतली. गोळे करायला घेतले तेंव्हा कणकेला थोडीशीच जाळी पडली होती, पण तरीही ते गोळे बेक करायला ठेवले...... आणि हाय राम, १० चे २० मिनीट झाले तरी तांबूस रंग काही येता येईना. मग टेम्परेचर १९० वरून २०० वर आणून परत ४-५ मिनीट भाजले ते गोळे. किंचीतसा तांबूस रंग आला होता, पण आतमध्ये थोडेसे कच्चेच होते.

नवर्‍याचं मत यिस्ट जुनं असेल / हिवाळ्यामध्ये पीठ जास्तवेळ भिजवून ठेवावं लागणार. त्याच्यामते आटा खमीरा नही था. Happy

त्या गोळ्यांची चव थोडीफार खरपूस भाजलेल्या बाट्यांसारखी वाटतेय.

अल्पना ... Happy

तुझ्या नवर्‍यानं केलेलं निदान योग्य वाटतंय. पण यातून एक निष्पन्न झालं की पाव फसले तर दाल-बाटी करता येईल. Happy

मामी मी पण यिस्ट जुने वापरले त्यामुळे मग ते सगळे प्रकरण फोडणीच्या पोळीच्या रॉ मटेरिअल मधे मिक्स केले. चांगले लागले.

हो हो. आज आमच्याकडे दाल बाटीचा बेत आहे. माझी राजस्थानी कामवाली पोरगी पुढचे सोपस्कार करुन रात्री दाल-बाट्या खाऊ घालेल Happy

मामी, एकदाचे मी हे बन्स करुन पाहिले. चवीला छान लागले, पण माझे अगोच्या फोटोत आहेत तसे वरून गुळगुळीत नाही झाले, एकदम ओबड्धोबड झालेत. आतून ओके आहेत, फार जाळी नाही पडलेली. एक प्रकारचा वास येतोय अंड्+यीस्ट्चा. त्या वासाचे काही करता येईल? की तो येतोच?

30 डिसे 20१३ - काल बनवले होते मी. पण आतून शिजले नाहीत. मग जास्त वेळ ठेवले तर वरून दगड झाले. आतून नीट स्पॉन्जी झाले नाहीत. यीस्टची मॅन्यु तारीख नोव्हे २०१३ होती. मी अंड घातले नव्हते, तेलाऐवजी बटर घातले होते. काय चुकले माझे? पीठ थंडीमुळे जास्त वेळ फुगायला हवे होते का? अंड नसल्याने बटर जास्त वापरायला हवे होते का?

माझ्या पिल्लाने मदत केली होती. बिचार्‍याने तसाच बाहेरून दगड झालेला बन दूधात भिजवून खाल्ला.

०४ जाने २०१४ - आज परत बनवून पाहिले. पीठ थोडेसे सुके वाटले. कोणीतरी सांगितल्याप्रमाणे हलक्या हाताने मळले होते, त्यामुळे ते तुकतुकीत असे स्मूथ दिसत नव्हते. बेक करायला अर्धा तास लागला तरी आतून थोडेसे दगड झाले होते. . काय चुकले असेल?

वल्लरी, आवनमध्ये टाकण्याआधी पीठाला छान जाळी सुटली असली पाहिजे. जाळी सुटली म्हणजे यीस्टचं काम सुरू झालं. एकदा मळून झाल्यावर कमी जाळी वाटली तर अजून थोडावेळ झाकून ठेव. एखाद्या उबदार ठिकाणी ठेवलंस तर पीठ लवकर फुगून येईल. इडलीच्या पीठाला जे तत्व लागू असतं तेच इथे.

दुसरं म्हणजे आवन आधी गरम करून घ्यायचा. तो २०० डिग्री सेल्सियसला गरम झाला की मगच त्यात हे कच्चे बन्स ठेवायचे.

टेंपरेचर कमी असेल तर ब्रेड भाजायला जास्त वेळ लागेल आणि ब्रेड कडक होईल.

पुन्हा एकदा प्रयत्न करून बघ. Happy आधी थोडी कमी प्रमाणातच कणिक घेऊन बनव. बटरही जास्त घालून बघ. अंडं नसेल तर फॅटचं प्रमाण वाढवायला लागेल.

मामी, वर दिलेल्या प्रमाणाच्या निम्मे प्रमाण घेउन बन्स बनवणार आहे. वर १ अंड वापरले आहे तर ते पण मोजून अर्ध फेटलेले अंडे घातले पाहिजे का? अक्ख अंडे घातले तर बन्सना अंड्याचा वास येइल का?

मामी, वर दिलेल्या प्रमाणाच्या निम्मे प्रमाण घेउन बन्स बनवणार आहे. वर १ अंड वापरले आहे तर ते पण मोजून अर्ध फेटलेले अंडे घातले पाहिजे का? अक्ख अंडे घातले तर बन्सना अंड्याचा वास येइल का?

>>>> ऑर्किड, मी ही अर्ध्या प्रमाणात बनवले होते. पण अंडं पूर्ण वापरलं. काही फरक पडत नाही.

मामी. इथे तुम्ही लिवलय त्यावरून , ह्या काय सोप्पय , जमेल की सहज. वगैरे वल्गना करून मी केल. जे काय झाल त्याला बन्स म्हणायची काही सोय नव्हती. इटालियन हर्ब्स, (डोमिनो पिझ्झा बरोबर आलेली पाकिटे) आणि लसुण यामुळे वास लै भारी येत होता. पण हलकेपणा जाळी शुन्य. शेवटी स्पाइसी दाल बाटी आहे म्हणून खपवल मी. Proud
यिस्ट मुळे लोचा झाला अस वाटतय. अती शहाण्पणा आणि नसलेल्या बेकिंग क्षमतेवर विसंबणे हेपण चुकलच.

इन्ना, असं कसं झालं. यिस्टमध्येच गडबड असेल. नाहीतर मला जमलं म्हणजे सगळ्यांना जमलंच पाहिजे.

नाहीतर मला जमलं म्हणजे सगळ्यांना जमलंच पाहिजे.>> डोम्बल , हम आपसे सवाइ हय Wink
करेन परत प्रयत्न.

मी आज केले हे बन्स. अंड्याऐवजी १ टेस्पून दही आणि १ टे स्पून तूप घातलं. (बटरच्या ऐवजी)
कणिक मळल्यावर वाचत बसले तर झोप लागली. २ तासांनी जाग आल्याबरोबर कणकेला सॉरी म्हणायला झाकण उघडले तर मस्स्स्त जाळी पडली होती. मग हलक्या हाताने मळून घेऊन वेण्या केल्या आणि मावेत मावे+कन्वि मोडवर २२० से ला २० मिन बेक केले.
मस्त खुसखुशीत हलक्या ब्रेडवेण्या तयार झालेल्या आहेत. Happy
थान्कू मामी. Happy

मामी, मी काल बन्स केले. थोडीच जाळी पडली आणि अर्थातच फारसे हलके नाही झाले. ईटालियन हर्ब्स घातल्यामुळे चव चांगली आहे आणि अर्धे बन्स संपले.
मला दोन प्रश्न आहेत. पिठाची कन्सिस्टंसी कशी हवी? पिठ मिसळल्यावर १५ मिनिटा नंतर बघितल तर ते फार घट्ट वाटलं म्हणून त्यात अगदी थोडे कोमट पाणी घालून झाकून ठेवले.
दुसरा प्रश्न हा की पिठ किती वेळ मळायचं?
मी दोन बॅचेस मधे बन्स बेक केले. पहिल्या वेळी नीट जाळी पडली नाही म्हणून पिठ थोडा वेळ झाकून ठेउन दुसरी बॅच केली तरी ये रे माझ्या मागल्या.

Pages