होल व्हिट बन्स - कणकेचे पाव/ब्रेड/बन

Submitted by मामी on 11 March, 2012 - 00:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

कोमट पाणी : १/४ कप
कोमट दूध : १ कप
तेल : १/३ कप
ब्राऊन साखर / साधी साखर / मध - १/४ कप (हे मी जी रेसिपी नेटवरून घेतली होती त्यातलं प्रमाण दिलं आहे. पहिल्यांदा बन्स बनवले त्यावेळी याच प्रमाणानं मी पाव कप मध वापरला. पण खरंतर या प्रमाणानं बन्स गोड लागतात. त्यामुळे दुसर्‍या वेळी करताना एक चमचा साखर वापरली. ते आपल्याला झेपतात.)
यीस्ट - २ टेबलस्पून (ब्लुबर्डचं ड्राय यीस्ट मिळतं. हे छोट्या छोट्या दाण्यांच्या स्वरूपात (granules) असतं.)
मीठ - १ टेबलस्पून
अंड - १
कणिक - साडेतीन कप

इथे लिहिलेल्या पदार्थांच्या प्रमाणात जो कपाचा उल्लेख आहे तो आपल्या चहाचा कप नाही. हे कपाचे प्रमाण म्हणजे जे मेझरिंग कप्स असतात त्यांचं आहे. नेहमी घरी केक वगैरे करणार्‍यांकडे असा प्लॅस्टिक अथवा काचेचा मग असतो, त्यावर अर्धा कप, एक कप अशा खुणा असतात. साधारणपणे असा एक कप म्हणजे आपला चहाचा दीड कप (मध्यम आकाराचा) होतो. हे मी माझ्या घरातल्या चहाच्या कपाच्या प्रमाणाने सांगितले आहे. थोडेफार प्रमाण बदलले तरी ब्रेडवर तसा फारसा परिणाम दिसणार नाही.
या प्रमाणात घेऊन खूपच बन्स बनतात. म्हणून साधारण ३ लोकांकरता हवे असतील तर अर्ध्याच प्रमाणात बनवावे.

क्रमवार पाककृती: 

कोमट पाणी, कोमट दूध, यीस्ट, तेल, साखर (किंवा मध) एका भांड्यात व्यवस्थित एकत्र करा आणि झाकून १५ मिनिटे तसंच राहू द्या.

अंड फोडून हलकेच फेटून घ्या.

पंधरा मिनिटांनी त्या मिश्रणाच्या भांड्यात अंडं, मीठ आणि कणिक घाला आणि चांगलं एकत्र करा. पुन्हा १५ मिनिटांकरता झाकून ठेवा.

एकीकडे आवन ३७५ डिग्री फॅरनहाईट (म्हणजे साधारण १९० डिग्री सेल्सियस) ला गरम करून घ्या.

पंधरा मिनिटांनी भिजवलेली कणिक नीट मळून घ्या. आता त्या कणकेला जाळी सुटलेली जाणवेल. या कणकेचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे करून आवनमध्ये १० मिनिटांकरता (किंवा बाहेरून सोनेरी-तांबूस रंग येईपर्यंत) भाजा.

अधिक टिपा: 

नुसते गोळे करण्यापेक्षा बर्‍याच कलाकुसरीही करता येतात. पहिल्यांदा बन्स केले त्यावेळी आम्ही बरेच आकार केले होते. करण्याच्या आणि खाण्याच्या त्या उत्साहात फोटो काढायचे मात्र राहून गेले. पण काही आकार :

स्माईली बनवणे - चपटा गोळा करून त्यावर दोन छोटे गोल डोळ्याच्या जागी आणि एक सुरळी करून हसरं तोंड बनवता येईल.
वेणी - तीन सुरळ्या करून तिपेडी वेणी वळून दोन्ही बाजूची टोकं व्यवस्थित एकत्र करून ठेवा.
असेच चकली, लगोरी, ब्रेडस्टिक्स असे असंख्य प्रकार करता येतिल.

हा ब्रेड गरमागरम एकदम सही लागतो. पण उरलात तर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा. एखाद-दोन दिवस चालेल.

हवं असल्यास कणिक भिजवताना त्यात पार्सली, ओरेगानो, बेसिल असे हर्ब्ज घालत येतील. दालचिनी पावडरही घालून करता येईल.

माहितीचा स्रोत: 
मंजूडीचं प्रोत्साहन आणि नेटवरून मिळालेली पाककृती.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑर्किड, पीठ कसंही असेल तरी काही हरकत नाही. मुख्य म्हणजे 'डो'ला चांगली जाळी पडायला हवी. कणिक खूप मळण्याचीही गरज नाही.

चांगली जाळी पडावी म्हणून कणिकेचा गोळा गरम जागी झाकून ठेवावा. जाळी पडेपर्यंत थांबाण्याचा पेशन्स अंगी बाणवावा लागेल.

ऑर्किड, मध्ये ती अ‍ॅडिशनल स्टेप मितानने घेतली आहे ती घ्यायला विसरलीस तू. वाचता वाचता झोपी जायचं असतं Biggrin

मितान, फोटो टाक की वेण्यांचा Happy

अश्विनी, परवाच्या वेण्या संपल्या म्हणून आज पुन्हा घाट घातला. पण ओवनमध्ये ठेवण्याआधीच वीज गेली. अजून आली नाही. ४ तासात पिठाची जाळी म्हणजे मासेमारीची जाळी झाली आहे ! त्याचे पिझ्झा बेस भाजून ठेवलेत आता !

आज बहुतेक झोप घेण्याची स्टेप केली नाही म्हणून फजिती झाली Wink

केश्वि , मितान Proud
मी पिठ जवळ जवळ ५ तास झाकलं होते (सेकंड बॅच)... म्हणून वाटलं की पिठाची कंसिस्टंसी गडबडली.

४ तासात पिठाची जाळी म्हणजे मासेमारीची जाळी झाली आहे >>>> Lol
भारी रेसिपी आहे.. आम्ही विकेंडला करू म्हणतोय..

ऑर्किड, मध्ये ती अ‍ॅडिशनल स्टेप मितानने घेतली आहे ती घ्यायला विसरलीस तू. वाचता वाचता झोपी जायचं असतं >>> Lol

४ तासात पिठाची जाळी म्हणजे मासेमारीची जाळी झाली आहे ! Biggrin

४ तासात पिठाची जाळी म्हणजे मासेमारीची जाळी झाली आहे ! >>>>>>:खोखो:
इंटरनेटवरूनच सर्च करून हा ब्रेड बनवला. महत्वाची सूचना: घरातली इतर कामे करता करता हा ब्रेड बनवावा.
२ कप कोमट पाणी, १ च. ड्राय यीस्ट, १ च. मीठ, ३ च. कनोला ऑइल, ४ कप होलव्हीट कणीक, २ च. मध.
आधी कोमट पाण्यात यीस्ट आणी मध घालून ३ ़कप पीठ मिक्स करा. ते अर्धा तास झाकून ठेवा.
अर्ध्या तासाने ते फुगेल. मग त्यात उरलेले पीठ , मीठ आणि तेल घालून फोल्ड करा. परत अर्धा तास झाकून ठेवा.
ते परत फुगेल. मग ओट्यावर/परातीत तो गोळा घेऊन त्यात थोडे थोडे करत पीठ घालून हलक्या हाताने मळा.
या मळ्लेल्या गोळ्याचे २ भाग करून ते ब्रेड्च्या टिन मधे घालून ठेवा. आणि मग पुन्हा अर्धा तास ठेवा मग अर्ध्या तासाने
३५० फॅ. प्रीहीटेड अव्हनमधे ४५ मि. भाजा. उत्तम खरपूस ब्रेड तयार.
इथे चौकोनी ब्रेड टिन नसल्याने कुकरच्या भांड्यात पण अव्हनमधे केला. हे ते २ ब्रेड
(आरती वाचतेस ना? :स्मितः)

अनघा, कुकरमध्ये ब्रेड बनवण्याचा अनुभव अजिबात नाही. मुळात ब्रेड बनवण्याचाही फारसा अनुभव नाही. कुकरमध्ये भात करण्याचा मात्र खूप अनुभव आहे.

हाहा मामी Happy , मलाही कुकरमधे भात, मटण, भाज्या, पुरण, पुडिंग, असे बनविता येते, पण ब्रेड येत नव्हता म्हणूनच अनघा यांचा प्रश्न मस्त आहे

कुकरमधे केक मस्त होतो. पण कुकरची जरा वाट लागते कारण कुकरमधे पाणी न घालता वाळू घालतात.
ब्रेड्चा मलाही फार अनुभव नाही.

आज केले हे बन्स.
दिलेल्या प्रमाणाप्रमाणे १ कप पिठाचे करून बघितले. मिठ आणि साखरेचं प्रमाण गंडलं फक्त. दोन्ही कमी पडलं.
त्यामुळे पहिल्या घाण्याला काही चवच लागली नाही. मग वरून मध आणि जॅम लावून खाल्ले.
नंतर सारख, मीठ घातलं. बेक करताना तळाला काळे झाले. आमचं अवन एकदम छोटं आहे. त्यामुळे ते खूप पटकन तापतं, त्यामुळे असेल कदाचित.
पण जाळी मस्त पडली एकदम. आणि बाकी टेक्श्चर अगदी बेकरीतल्या सारखं झालं.

IMG_4074.JPGIMG_4066.JPG

पुढच्यावेळी अजून फ्लेवर घालून करून बघणार आहे.
रेस्पि करता मामींना धन्यवाद. Happy

धन्यवाद विनिता. बघते लिंक. खरच प्रामाणिक प्रश्न होता ग तो, ही ब्रेड करून तर पहावी वाटत होती, पण ओव्हन तर नाही,, म्हणून..

पराग, छान दिसताहेत दुसर्‍या फोटोतले. पहिल्या फोटोतले दाल्-बाटीतल्या बाट्या म्हणून चालतीलसं वाटतंय.

इन्ना, शाब्बास.

अनघा. , माझं उत्तरंही खरंच प्रामाणिक होतं गं. उगा काही अनुभव नसताना काय सांगणार मी तुला? Happy

Pages