काल आमच्या ऑफिसच्या चायवाल्याने गोंधळ घातला. घाबरला बावरला, डोळ्यात पाणीही आले बिचार्याच्या. २२-२४ वर्षांचा मुलगा म्हणजे अगदीच काही लहान नाही, आपला तर खास फंटर ! कधी आपण जागेवर नसलो तरी आठवणीने चहा ठेवतो.. बघावे तर तसे हे एकच कारण, खास असण्याचे. पण ज्या आपुलकीने चहा पाजतो त्याने स्वताला खास झाल्यासारखे वाटते. म्हटलं तर कुठलीही देवाणघेवाण हा एक धंदाच, पण त्यात थोडा भावनांचा ओलावा आला की त्याचे आपलेच एक नाते बनते. काल कदाचित त्याच नात्याने त्याला तारले.
वॉशरूममधून जागेवर आलो तेव्हा त्याचे एकेकाच्या जागेवर जात चहा वाटपाचे काम चालू होते. पुढच्या दोनेक मिनिटात माझ्या जागेवर येईल त्या आधी पाण्याचे दोन घोट घेऊया म्हणून मागच्या टेबलवर ठेवलेली माझी पाण्याची बाटली घ्यायला म्हणून खुर्चीवर न बसता तिथेच गेलो. मात्र पाण्याचा एक’च घोट घ्यायचा नशीबात होते. पाठीमागून चारचौघांचा गोंगाट कानावर पडला तसे वळून पाहिले तर माझ्या टेबलाचा रंग पार पालटला होता. आधी पांढरा असायचा म्हणे, पण आता पुरता रंगला होता. माझ्या वाटणीची चहा कॉम्प्युटरचा किबोर्ड पित होते, तर मॉनिटरच्या स्क्रीनवर नवीन वॉलपेपर छापला गेला होता. डायरीने वर्ष सरायला दहा दिवस शिल्लक असतानाच माझा निरोप घेतला होता. काही शिंतोडे खुर्चीवर उडाले होते तर कसलाही आवाज न करता चहाचा एक ओघोळ टेबलावरून खाली येत फ्लोरींगवर आपले साम्राज्य स्थापत होता.
माझाच टेबल का??? हा मनात आलेला पहिला विचार. पाठोपाठ किबोर्ड आणि कॉम्प्युटर हि ऑफिसची मालमत्ता असते हे त्यातल्या त्यात चांगलेय हा दुसरा विचार. इतक्यात नजर अचानक एका ओळखीच्या वस्तूवर पडली. माझा कॅल्क्युलेटर होता तो.. हो, माझा स्वताचाच. त्याची पुर्ण आंघोळच झाली असल्याने एवढा वेळ त्याचे अस्तित्व जाणवले नव्हते. घाईघाईत त्याला उचलून हाताच्या चिमटीत उभा धरला. समोर पाहिले तर चहावाला देखील तसाच उभा भासला. माझ्या कॅल्क्युलेटरसारखा. जी अवस्था याची चहाने केली होती तीच त्याची भितीने. जेवढी चहा झटकता येईल तेवढी झटकून मी आजूबाजुचे रफ पेपर घेऊन त्याला पुसायला घेतला. इतर मालमत्तेशी माझे काही घेणेदेणे नसल्यासारखे. आणि हो, त्याचबरोबर त्या चहावाल्याच्या बडबडीकडेही दुर्लक्ष करत. काय झाले, कसे झाले, याची तोडकीमोडकी कारणे तो देत होता, मात्र माझा कॅल्क्युलेटर बिघडलाच तर तो काही भरून देऊ शकत नाही हि मनाची समजूत काढून मी त्याला ठिक करायच्या मागे लागलो होतो.
पुढची दहा-पंधरा मिनिटे मी बोटांनी बटणे दाबून दाबून आत गेलेली चहा बाहेर काढायच्या प्रयत्नात होतो. थोडावेळ एसीसमोर धरला तर मध्ये त्या चहावाल्यानेच आणून दिलेले टिश्यू पेपर घेऊन आत गेलेली चहा शोषायचा प्रयत्न केला. एवढ्या काळात त्या चहावाल्याने पाणी आणि फडक्याने माझी जागा आणि इतर औजारे पुसुन पुर्ण साफ केली होती. इतरांनीही हलक्याफुलक्या कॉमेंटस मारत त्याच्यावरचा ताण थोडाफार हलका केला. हातात बंद पडलेला कॅल्सी होता तरीही साफसुधरी जागा आणि निवळलेले वातावरण पाहून माझेही वैतागलेले मन पुरेसे स्थिर झाले. मात्र अजूनही त्याचे कारणे द्या चालूच होते ज्याचे मी काहीच करू शकत नव्हतो. चल छोड यार, जो हुआ सो हुआ असे मनात आले तरी पटकन बोलून दाखवणे माझा स्वभाव नाही कि मला ते जमत नाही. पण खरेच जे झाले ते झालेच. कदाचित त्याची तितकीशी चुकही नसावी, कारण नुकतीच माझ्या जागेवर एक छोटीशी कामकाजाची मिटींग कम गप्पांची मेहफिल आटोपल्याने खुर्च्या तश्याच आपली मूळ जागा सोडून वेड्यावाकड्या पसरल्या होत्या. त्यांनाच तो अडखळला असावा या संशयाचा फायदा त्याला देण्यास हरकत नव्हती.
तर, माझ्या हातात एक फ्रेश अन गरमागरम चहाचा प्याला ठेऊन अखेर तो निघून गेला. पण नुकत्याच त्या चहाने घडवलेला उत्पात जवळून आणि स्वतावर अनुभवलेला असताना कसाबसा अनिच्छेनेच तो घश्याखाली ढकलला. याहीपेक्षा काय वाईट घडले असते याचा विचार करता आठवले कि आज आपण कधी नव्हे ते पांढरेशुभ्र शर्ट घालून आलो होतो. जर आपण जागेवर बसलेलो असतो तर... काही शिंतोडेदेखील पुरेसे होते त्याची चमक घालवायला.. तसेच आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे चहाच्या एका प्याल्याने केलेल्या नासधुशीनंतर ऑफिसवाले केवढीशी ती चहा पाजतात हि उगाचची कुरबुर यापुढे मी तरी कधी करणार नव्हतो.
कॅलक्युलेटर मिटून बॅगेत टाकला, चिकट झालेला कीबोर्ड बदलला, खुर्चीवर बसायच्या आधी ती पुन्हा एकदा साफ पुसली गेलीय याची खात्री केली आणि नेहमीच्या कामाला लागलो. ते थेट रात्री बायकोला दिवसभराच्या घडामोडी सांगतानाच पुन्हा याची आठवण झाली. मात्र पुन्हा कॅल्क्युलेटर चालू झालाय कि बंद पडलाय हे बघायची तसदी नाही घेतली.
किस्सा बायकोला सांगून झाला तरी मनात मात्र घोळत राहिला. आजच्या प्रकाराचा त्रागा न करता तो हलकाच घेतला हे एकंदरीत दिवसाच्या शेवटाला स्वतालाच बरे वाटले. पण या चहावाल्यावरून आणखी एक चहावाला, खरे तर चहा कम पोहेवाला आठवला. ईंजिनीअरींगच्या पहिल्या वर्षाला सांगलीच्या वालचंद कॉलेजला असताना भेटलेला. दोन वेळच्या जेवणाची मेस लावली असली तरी सकाळचा चहानाश्ता रोजच्या भुक आणि इच्छेनुसार बाहेरच करावा लागायचा. आम्हा सार्यांचाच पॉकेटमनी जेमतेम, त्यामुळे ठरवून आणि पुरवूनच व्हायचा. कुठे ४ रुपयांच्या जागी ३ रुपयांना पोहे मिळतात असे समजले तर थोड्या तंगड्या तुडवत तिथली चव चाखून यायची. जमली नाही तर पुन्हा नेहमीच्याच जागी. अश्यातच एके दिवशी विश्रामबागेत एके ठिकाणी खूप चांगले पोहे मिळतात असे समजले. फारसे लांबही नव्हते, थोडी वाट वाकडी करावी लागणार होती इतकेच. पण खरेच, खबर पक्की होती, खाल्ले ते पोहे लक्षात राहण्यासारखेच होते. इथे आल्यापासून गेले तीन महिने एवढे चांगले पोहे इतर कुठे खाल्ले नव्हते. पहिला चमचा तोंडात घेताच मी आणि माझ्या मित्राने ठरवले की आता रोज इथेच. पण तेच तोंड पैसे देताना मात्र थोडेसे हिरमुसल्यासारखे झाले, जेव्हा समजले की इथे पोहे ४ च्या जागी ५ रुपयांना आहेत. माझ्या मित्राने पटकन तसे बोलूनही दाखवले. तर समोरून उत्तर आले की भाऊ पोहे खाऊन तर बघा, इतर कुठे असे मिळणार नाहीत. काय चुकीचे बोलत होता तो, खरे तर होते. पटतही होते. पण रोजचा एक रुपया जास्त म्हणजे आमचा महिन्याचा हिशोब ३० रुपयांनी बोंबलला होता !
दुसर्या दिवशी काय करावे या द्विधा मनस्थितीत, आपसूकच वळणावर आम्हा दोघांचीही पावले त्याच्याच दिशेने वळली. कालच्या पोह्याची चव जीभेवर रेंगाळत होतीच, अन महत्वाचे म्हणजे आता यापुढे आमच्या नेहमीच्या गाडीवरचे पोहे फिके लागले असते. पोहे खाऊन आम्ही दोघांनी आपापले पाच पाच रुपये त्याच्यासमोर धरले तसे त्याने नेमके चार चार रुपयेच उचलले आणि म्हणाला, स्टुडंट कन्सेशन.. तुमच्यासाठी चार रुपये फक्त !
अर्थात, हे कन्सेशन आजपासूनच त्याने सुरू केले होते, तसेच ते इतरांनाही लागू होते की नाही माहित नव्हते. पण त्यानंतर मग आमचे रोजचे नाश्त्याचे ठिकाण तेच झाले. काही इतर मित्रांनाही आम्ही वाट वाकडी करायला लावली. आम्हा सर्वांसाठी पोहे चार रुपये पर प्लेटच होते. पुढे जाऊन त्याचेही उधारखाते सुरू झाले. तसा वयाने आमच्यापेक्षा तो सात-आठ वर्षे मोठाच, पण आमच्या गप्पांच्या ग्रूपमध्ये तो देखील सामील होऊ लागला. इतर स्थानिक गिर्हाईकांच्या तुलनेत आमचा कटींगचा ग्लास किंचित जास्त भरला जाऊ लागला. एके दिवशी संध्याकाळी भूक लागलेली असताना तिथे गेलो तेव्हा पोह्याच्या जागी मिसळ कट्टा रंगलेला दिसला. पोह्याची चव तोंडावर बनवून आल्याने परत फिरणार इतक्यात तोच म्हणाला, एकदा मिसळ खाऊन तर बघा भाऊ... नकार द्यायचा प्रश्नच नव्हता !
ती मिसळ एवढी आवडली की पुन्हा आता या मिसळीसाठी रोज संध्याकाळी इथे यायची चटक तर लागणार नाही ना अशी भिती वाटली, कारण ती चटक खिश्याला नक्कीच परवडणारी नव्हती. मुळात थोड्याच वेळात मेसचा टाईम होत असल्याने तेवढी भूकेची कळ सोसल्यास संध्याकाळच्या भरपेट नाश्त्याची खास गरजही नव्हती. त्याचबरोबर ती मिसळ अशी काही तिखट झणझणीत होती की रोज रोज ती खाणे तब्येतीलाही झेपणारे नव्हते. अन तरीही शेवटाचा शेव-दाणा पुसून वाटी चकाचक साफ करून त्याला पैसे द्यायला गेलो तेव्हा त्याने ते घेण्यास नकार दिला, असे बोलत की आवडली आणि पुन्हा आलात तरच पैसे घेईन. आजच्या तारखेला खिश्यात चार दमड्या खुळखुळत असताना बळेच एखाद्याच्या हातात पैसे कोंबले असते, पण तेव्हा कोण आनंद झाला. स्वाभिमानाची व्याख्या त्या दिवसांत वेगळीच असते नाही..
पुढच्या मिसळकट्ट्याची संध्याकाळ दोन-चार दिवसांतच आली अन अधनामधना येतच राहिली. मात्र त्याने पहिल्या मिसळीचे पैसे काही शेवटपर्यंत घेतले नाही. बस्स आठवणीतच राहिले.
आज पुन्हा नेहमीसारखेच ऑफिस होते. नेहमीच्याच वेळी तो चायवाला आला. चहा देतेवेळी आज त्याच्या हसण्यात आपलेपणा किंचित जास्त भासला. चहाचा चटकाही जिभेला किंचित जास्त लागला. कोणालातरी कालच्या प्रसंगाची आणि माझ्या कॅलक्युलेटरची आठवण झाली. मी अजूनही तो चालू झालाय का बंदच पडला हे चेक केले नव्हते. विषय हसूनच टाळून नेला. आपसात काही संबंध नसताना मला त्या कधीकाळच्या चहापोहे मिसळीचे कर्ज थोडेफार फिटल्यासारखे वाटले. चहा पिता पिता पुन्हा एकदा ते जुने दिवस आठवू लागले. मला त्या आठवणींबरोबर सोडून चायवाला मात्र केव्हाच पुढे निघून गेला होता.
- तुमचा अभिषेक
मस्त लिहीलय. आवडलं
मस्त लिहीलय. आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लेख! अशी लोकं खूप मेहनती
छान लेख! अशी लोकं खूप मेहनती आणि सालस असतात... मी अशा लोकांना (चायवाला, लिफ्टवाला, सेकयुरिटिवाला इत्यादि.) त्यांच्या नावाने हाक मारतो आणि शक्यतो त्यातील स्वतः करण्याजोगी कामे स्वतः करतो...
सुंदर
सुंदर
आवडलं
आवडलं
खूप छान आवडली मनाला भिडली
खूप छान आवडली मनाला भिडली तुमची कथा
खरंच खुप छान लिहिलय.
खरंच खुप छान लिहिलय.
छान ! सकृतदर्शनीं अशा छोट्या
छान !
सकृतदर्शनीं अशा छोट्या छोट्या वाटणार्या घटनांतून व कर्जफेडीतूनच आपलं खरं आयुष्य घडत जात असावं !
मस्तच
मस्तच
शंभर नंबरी सोने आहे हे... असे
शंभर नंबरी सोने आहे हे... असे आजकाल का लिहीत नाही तुम्ही...
सुंदर
सुंदर
धन्यवाद च्रप्स..
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
च्रप्स..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदा निवृत्त झालो कामातून आणि पोरांच्या व्यापातून तर हेच लिहायचेय तेव्हा
Pages