दोई बेगुन

Submitted by चिनूक्स on 28 March, 2014 - 02:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१. मोठी वांगी (जांभळी) - २
२. घट्ट दही - दीड कप
३. हळद
४. हिरव्या मिरच्या - दोन लहान
५. मोहरी - अर्धा चमचा
६. आलं - अर्धा चमचा
७. लसूण - चार पाकळ्या
८. दालचिनीची पूड - पाव लहान चमचा
९. पाच-सहा वेलदोड्यांची पूड
१०. पुदिन्याची पानं - दहाबारा
११. मीठ
१२. साखर
१३. तेल

क्रमवार पाककृती: 

१. वांग्याचे हवे तसे काप करावेत. म्हणजे चौकोनी, लांब, चकत्या इत्यादी.
२. हे काप मिठाच्या पाण्यात साधारण पंधरा मिनिटं बुडवून ठेवावेत.
३. नंतर पाण्याबाहेर काढून पाणी चांगलं निथळलं की त्यांवर हळद, साखर चांगली चोळावी.
४. अर्ध्या तासानंतर सुटलेलं पाणी फेकून हे काप तेलात खरपूस तळावेत.
५. वांग्याचे तळलेले काप थंड होईपर्यंत दही पाणी घालून चांगलं फेटून घ्यावं. घट्ट कढीइतपत ते दाट असावं.
६. दह्यात मीठ, वेलदोड्याची पूड, दालचिनीची पूड घालावेत. दही आंबट असल्यास आपापल्या इच्छेनुसार साखर घालावी.
७. एका कढईत तेलाची मोहरी, हळद घालून फोडणी करावी.
८. फोडणीत आलंलसूण घालून चांगलं परतावं.
९. तांबूस रंग आला की हिंग घालावं. हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात.
१०. शेवटी हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्या तडतडल्या की कढई खाली उतरवावी.
११. एका भांड्यात वांग्याचे काप ठेवावेत. त्यावर दही ओतावं आणि शेवटी तयार केलेली फोडणी घालून हे मिश्रण एकजीव करावं. फोडणी अगदी गरम असतानाच दह्यावर घालावी.
१२. वरून पुदिन्याची बारीक चिरलेली पानं घालावीत.

वाढणी/प्रमाण: 
चार व्यक्तींसाठी
अधिक टिपा: 

हा पदार्थ अनेक पद्धतींनी करता येतो.
दह्याची चव कशी असावी, हे आपलं आपण ठरवावं. हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट वापरता येईल, आलंलसूण वगळता येईल, किंवा फोडणीत कांदा घालता येईल. दालचिनी-वेलदोडा न घालता धणेजिर्‍याची पूड घालता येईल. पुदिन्याऐवजी कोथिंबीर वापरता येईल. क्वचित कढीपत्ताही वापरला जातो. 'पण हे असलं काहीतरी हल्लीहल्लीच इकडे आलेले साउदिंडियनच करतात, आमच्यात कढीपत्ता घालत नाहीत', असं मला ही पाककृती सांगणार्‍या आजोबांनी सांगितलं.

दह्याऐवजी फेसलेली मोहरी वापरली तर 'शोर्शे बेगुन' हा पदार्थ तयार होतो.

हा पदार्थ पोळी, भात, पुलाव यांबरोबर खाता येतो.

माहितीचा स्रोत: 
जगन्नाथपुरीच्या एका मठातील बल्लवाचार्य
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिनूक्सा, वांग्याच्या रंगा सारखेच घट्ट दह्याचे पण काही आहे का? कारण नंतर पाणी घालून फेटायचे असे लिहिले आहेस, जर नंतर पाणी घालायचेच तर आधी घट्ट दही कशास हवे.

इंग्रजीत काय म्हणतात हे फक्त हिंगाबाबत लिहिण्यास कारण असेलच

सर्वसाधारणपणे तू काहीही 'उगाच सांगत नाही' त्यामुळे विचारत आहे. Happy

पुरीला गेलो असताना एका ट्रेनिंग मध्ये खाल्लेला पदार्थ -- बरीच वर्षे चव जिभेवर आहे पण नाव आणि रेसिपी माहित नव्हती. आता करेन.

मस्त रेसिपी.

अवांतर - सिनेमा फारच आवडलेला दिसतोय. हिंगाच्या रेफरंसकरता का होईना, अधिकाधिक लोकांनी सिनेमा पहावा असा हेतू दिसतोय Happy

मी त्या इंग्रजी नावाची व्युत्पत्ती वगैरे लिहिणार होते, पण त्याआधी सिनेमा पहावा लागले, त्यामुळे राहू दे Happy

मस्त रेसिपी. उन्हाळ्यात बर्‍याच वेळा केली जाते. ( फक्त दालचिनी आणि वेलदोडा घातलेला पाहीला / खाल्ला नाहीये. साखर अजिबात वापरत नाही. आलं , लसुण थोडं ठेचुन घालते )
अशीच दही भेंडीही करता येते. भेंड्या उभ्या चार भागात चिरायच्या.

हा असफटिडा चा तडका जामच विनोदी होता बुवा हसून हसून बोबडी वळली Proud असो

पदार्थ मस्त … करून बघेन नक्कीच

बेस्टच कृती. आवडतो हा पदार्थ.
इंटरनॅशनल कॉल न करता असफटिडा कळले... भारीच Lol

दोई बेगुन या पदार्थात वांग्याशिवाय इतर काहीही घालता येणार नाही. क्षमस्व. धन्यवाद. कृपया. मुकाट्याने वांगी खा.
>> Rofl

क्वीन बघायलाच हवा तर.
वांग्याच्या चकत्या बेक करून हा पदार्थ करण्यात येईल.

व्वा! मस्त रेसिपी चिनुक्सा!
क्वीन ही मस्तच. पण सुरवात जरा चुकलीच. (उशिरा गेलो)

ही रेसिपी सुमारे दोन वर्षे आधी लिहिली असती तर मला फायदा झाला असता. Proud
वांगी कंगणाचा वापर करून गोल गोल कापायची का?

आज हा प्रकार करून खाल्ला, एकदम चविष्ट.
पण जरा वेळखाऊ प्रकरण वाटले, वर २ तास लिहीलेत खरे.
वांग्याच्या चकत्यांना तेल लावुन अवन मध्ये ४५० फॅ ला बेक केल्या. त्याला २०-२५ मिनीटे इतका वेळ लागला.
बाकी कालच क्वीन बघितलाय त्यामुळे हिंगाला पूर्ण मार्क Happy

हिंगाला इंग्रजीत 'असफटिडा' असं म्हणतात.>>>> ग्रेट
तुला कंगनाने फोन केला होता वाटत
Proud Biggrin

ऑन सिरियस नोट
छान आहे पाकृ
आता पुढच्या वेळी वांग्याचे काप करेन तेव्हा हे करून पाहिन

मी काल हिरवी वांगी आणली. आता काय करु?? करु का त्यांचेच बेगुन??

रच्याकने विकीवर ऑस्मॉसिस पाहिले, पहिले वाक्य कसेबसे अर्धे वाचल्यावर पुढचे वाचुन काहीही उपयोग नाही हे लक्षात आले.

त्यामुळे, जर साध्या भाषेत ऑस्मॉसिस सांगता आले तर सांगा बुवा.... नायतर, तेल आत जायचा प्रयत्न करत असतानाच आतले पाणी बाहेर पडायच्या भानगडीत असणार आणि त्या मारामारीत तेलाला आत जायलाच मिळत नसणार असा माझ्यापुरता अर्थ मी लावुन घेईन.. Happy

<<< नायतर, तेल आत जायचा प्रयत्न करत असतानाच आतले पाणी बाहेर पडायच्या भानगडीत असणार आणि त्या मारामारीत तेलाला आत जायलाच मिळत नसणार असा माझ्यापुरता अर्थ मी लावुन घेईन.

Biggrin

मस्त रेसिपी. मॄ ने अचारी बैंगन नांवाची रेसिपी कोणाच्यातरी विपूत दिलीये त्याची आठवण झाली, उगाच Happy .

रच्याकने - या शब्दाचा अर्थ काय? बऱ्याच कमेंट्स मध्ये वाचलेला आणि कोणाचे नाव नाही हे खात्री करून इथे प्रश्न टाकते आहे .

Pages