"कई बार यूं भी देखा है !"

Submitted by अशोक. on 2 January, 2013 - 22:38

काही जालीय मित्रांसमवेत मुकेशने गायलेल्या कित्येक सुमधुर गाण्यांच्या संदर्भात चर्चा चालू असताना राजकपूरशिवाय अन्य कोणकोणत्या अभिनेत्यासाठी मुकेशने पार्श्वगायन केले आहे याची यादी आठवत असतानाच त्यातील एका मित्राने त्याला मुकेशचे "रजनीगंधा" चित्रपटातील 'कई बार यूं भी देखा है...' हे गाणे खूप आवडीचे वाटत असल्याचे म्हटले. जे कोणत्याच अभिनेत्याच्या तोंडी नसून नायिकेच्या सैरभैर मनस्थितीच्या वर्णनासाठी पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटात या गाण्याचा मार्मिकपणे वापर केला गेला आहे. हे गाणे माझ्याही अत्यंत आवडीचे आहे. त्या अनुषंगाने सलिल चौधरी यांच्या त्या गाण्याविषयी काही लिहावे...विशेषतः गीतकार 'योगेश' यांच्या एरव्ही गद्य वाटू शकणार्‍या गीतांविषयी....असे मनात आले.

तोच हा प्रयत्न !

हृषिकेश मुखर्जी यानी १९५९ मध्ये राज कपूरला घेऊन तयार केलेला 'अनाडी' आणि त्यातील गाणी खूप गाजल्याचे इथल्या सर्वच चित्रपटप्रेमी सदस्यांना माहीत आहेच. अनाडीच्या यशाने प्रेरित होऊन हृषिदांनी राज कपूर यालाच केन्द्रस्थानी ठेवून 'आनंद' ची जुळवाजुळव सुरू केली होती. इतकेच नव्हे तर अनाडीच्या वेळेसच आनंदसमवेत गाजलेले 'बाबू मोशाय' हे सहाय्यक पात्राचे नावही नक्की झाले होते...त्याला कारण म्हणजे राजकपूर हृषिकेश मुखर्जी याना सेटवर नेहमी 'बाबू मोशाय' याच नावाने हाक मारीत असे. गीतकार म्हणून अर्थातच शैलेन्द्र, ज्यानी 'अनाडी' साठी लिहिलेली गाणी संगीतप्रेमींच्या तोंडात बसली होती. पण त्याच वेळी स्वत:च्या 'आर.के.प्रॉड्क्शन'च्या 'जिस देश मे गंगा बहती है' मध्ये राजकपूर इतका व्यस्त झाला की त्याला 'आनंद' साठी तारखा देणे शक्य झाले नाही. पुढे त्या पाठोपाठ 'संगम' आला...त्यात तब्बल ५ वर्षे गेली...संगम गाजत असतानाच राजकपूरने त्याच्या महत्वाकांक्षी 'मेरा नाम जोकर'मागे लागल्यावर मग तर 'आनंद' साठी तो मिळणार नाही हे पक्केच झाले आणि निराश झालेल्या हृषिदांनी 'आनंद' ची कथा आणि निर्मिती विचार आपल्या फडताळात ठेवून दिला...कारण त्याना त्या भूमिकेसाठी राजकपूरशिवाय अन्य अभिनेता सुचत नव्हता. [विशेष म्हणजे ज्यावेळी 'आनंद' तयार झाला त्यावेळी हृषिकेश मुखर्जी यानी तो चित्रपट 'राजकपूर आणि मुंबई शहर' याना अर्पण केला].

पुढे 'आराधना' नंतर राजेश खन्ना युग आल्यावर आणि त्याच्या अभिनयाची धाटणी त्यावेळी सर्वानाच 'आल्वेज हॅपी काईंड फेलो' अशी वाटू लागल्यावर हृषिदांनी त्याला घेऊन 'आनंद' सुरू केला. 'अनाडी' ची संगीतकार जोडी शंकर-जयकिशन संपले होतेच...पण कथानकातील गाण्यांसाठी हृषिदां ज्या नावावर ठाम होते, ते नाव...शैलेन्द्र...हे देखील परलोकवासी झाले होते. संगीतासाठी सलील चौधरी ठरले आणि मग त्यानाच 'शुद्ध हिंदी लिहिणारा', साहित्याची जाण असणारा, कवी-गीतकार शोधण्यास सांगण्यात आले...[कारण शैलेन्द्रनंतर त्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत जे काही गीतकार होते...उदा. मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, नक्श लायलपुरी, शकील बदायुनी, अंजान, आनंद बक्षी, एच.एस.बिहारी आदी...यांच्यावर उर्दू भाषेचा फार प्रभाव होता, नेमका तोच हृषिदांना नकोसा झाला होता....]आणि इथे प्रवेश झाला तो त्या गरजेला पुरेपूर उतरणारा एक युवा कवी 'योगेश गौड'.

दुर्दैव म्हणा वा दुर्लक्ष म्हणा हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारांना त्यांच्या चालीसाठी 'कवी' नको 'गीतकार' हवा असतो, शिवाय तो 'साहित्या'च्या प्रांतातील तर बिलकुल नको असतो...कारण बैठकीच्यावेळी तो शिरजोर होईल अशी भीती या संगीतकारांच्या मनात असते. त्यामुळेच की काय योगेश या साहित्यिक कवीला चित्रपटसृष्टीने जसे 'समीर' ला भरभरून स्वीकारले तसे कधीच आपलेसे केले नाही. असे असले तरी योगेश यानी जी काही मोजकी कामे केली त्यात एरव्ही गद्य वाटू शकणार्‍या त्यांच्या गीतांनी जी काही लोकप्रियता मिळविली ती हजारभर चित्रपट करणार्‍या समीरला मिळू शकत नाही.

लखनौच्या एक सुसंस्कृत कुटुंबात जन्म झालेल्या योगेशचे शिक्षणही तिथेच झाले आणि पदवीपूर्वीच वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबासाठी नोकरीचाकरी करण्याची वेळ आली...साल होते १९६०. काही मित्रांच्या सल्ल्यावरून योगेशने मग मुंबई महानगरीत आपले नशीब आणि प्रतिभा अजमावण्याचा निर्णय घेतला. उत्तर भारतातून या मोहनगरीत येणार्‍या प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते ते चित्रपटसृष्टीत आपल्या साहित्यिक कलागुणांना वाव मिळतो का ते पाहाण्याचे. त्यावेळी लखनौमधील त्याचे एक मित्र सत्यप्रकाश मुंबईतच चोप्रा फिल्म्सच्या पटकथा विभागात उमेदवारी करीत होते. साठच्या दशकात मुंबईतील ओशिवारा इथे टिपिकल अशा एका चाळीतील सिंगल रूममध्ये अशी ही तीनचार धडपडे युवक पाठ टेकण्यासाठी जमत आणि दिवसभर केलेल्या पायपिटीची उजळणी रात्री तिथेच स्टोव्हवर केलेल्या जेवणासोबत एकमेकाला सांगत. योगेश त्यातीलच एक. सत्यप्रकाशने योगेशला दोनचार सहाय्यक संगीत दिग्दर्शकाकडे 'चित्रपट गाणी लिहिण्याच्या शिकवणी'साठी नेले. त्यावेळी ह्या युवकाला समजले की संगीत दिग्दर्शकाकडे गाण्याची 'चाल' अगोदर तयारच असते आणि ती हार्मोनियमवर गीतकाराला ऐकविल्यावर त्याच्या आधारे कथानकातील त्या जागेला पूरक अशी शब्दरचना लिहायची....[किंवा तयार करायची...]. हा प्रकार 'कवी' म्हणून वयाच्या नवव्या वर्षापासून लिखाण केलेल्या योगेशच्या पचनी पडणे कठीण होते...कारण हा तर मुक्त छंदाचा प्रेमी...शिवाय 'ट' ला 'ट' जुळवून 'एबीसीडी छोडो..प्रेम का साथ जोडो...' अशी शुष्क गाणी लिहिणेही याला नामंजूरच होते. तरीही सत्यप्रकाशने त्याला 'जीना यहाँ मरना यहाँ..' हे मंजूर असेल तर चालीवरच गाणी लिहिली पाहिजेसच तू...अशी धमकीवजा सूचना दिल्यावर तो तयार तर झाला, पण त्याने 'तशा पद्धतीची गाणी लिहिताना मी माझ्या कवितेवरील भक्तीला दूर करणार नाही..' असा मनोमनी निश्चयही केला. सत्यप्रकाशने मग 'सी' दर्जाच्या चित्रपटांना संगीत देणार्‍या रॉबिन बॅनर्जीकडे योगेशला नेले. त्या काळात दारासिंगला आलेला भाव पाहता सी ग्रेड निर्मातेही धडाधड तसलेच चित्रपट बाजारात आणत होते...'सखी रॉबिन, मार्व्हल मॅन, फ्लाईंग सर्कस, रॉबिनहूड..." अशी चित्रपटांची नावे जरी वाचली तर ते काय दर्जाचे होते याची कल्पना होती. या सार्‍या चित्रपटांचे संगीतकार होते रॉबिन बॅनर्जी. अशा चित्रपटांतील गाणी गाजली काय किंवा न गाजली काय...निर्मात्याला कसलाही फरक पडत नसायचा. कारण त्यांच्या दृष्टीने हाणामारी, कोलांट्याउड्या, राजकन्येचे अपहरण, खलनायक सेनापती, एखादा जादूगार, मग एक तगडा नायक, त्याची तलवारबाजी...बस्स..झाले काम. अधुनमधून तोंडी लावण्यापुरती हेलेन-लक्ष्मीछाया-मधुमती-राणी यांचे एखाददुसरे नृत्य...मग त्यावर कसलेही शब्द गाण्यासाठी असले तरी काही फरक पडत नव्हता. योगेशने अशातर्‍हेच्या चित्रपटासाठी गाणी लिहून दिली एका गाण्याला २० रुपये अशा दराने.. निदान महिन्याभराचे रेशन तरी खोलीवर आपल्या पैशातून आले याचाच योगेशला जास्त आनंद.

रॉबिन बॅनर्जीच्या रूमवर संगीत बैठकीसाठी येणार्‍यामध्ये गीतकार 'अंजान' [लखनौचेच लालजी पांडे...प्रसिद्ध गीतकार समीरचे वडील] यांच्याशी त्याची मैत्री जुळली. कारण एकच.. दोघेही धडपडे आणि तितकेच उपाशीही. योगेशला मिळालेला पहिला चित्रपट जसा आपटला, तितकाच अंजान याना मिळालेला 'गोदान'ही...ज्याला पं.रविशंकर यांचे संगीत लाभले होते. मात्र त्या अपयशाने दोघांची मैत्री जुळली आणि कामे शोधताना एकमेकाची साथ 'बेस्ट' द्वारा सुरू राहिली.

'अंजान' आणि सलील चौधरी यांची दाट मैत्री होती पण सलीलदा यांच्या संगीतप्रकृतीला मानवेल अशी गाणी अंजान लिहू शकत नव्हते. तथापि त्यांच्या मैत्रीत काही फरक आला नव्हता...त्याला कारण म्हणजे सलीलदा यांची पत्नी सविता ह्या साहित्यप्रेमी होत्या. अंजानसमवेत घरी येणार्‍या योगेशसमवेत सविता चौधरींची चांगलीच मैत्री जुळली. सविताने त्याची कविताची वही पाहिली....[योगेश यांच्या याच कवितेच्या वहीचा उपयोग हृषिकेश मुखर्जी यानी 'आनंद' च्या त्या एका प्रसंगात केला आहे...ज्यात एक मोरपीस ठेवलेले असते.. जे पाहून राजेश खन्ना हळुवारपणे 'कही दूर जब दिन...' गाणे म्हणतो] आणि योगेशच्या सहजसुंदर गद्य कवितांनी त्या भारावून गेल्या...त्या रात्री त्यानी सलील चौधरींना योगेशची ती वही दाखविली आणि मग तिथेच सलील, हृषिकेश मुखर्जी याना अभिप्रेत असलेला 'शैलेन्द्र' सापडला.

दुसर्‍या दिवशी तात्काळ मुखर्जी यांच्याकडून अंजानला निरोप गेला की त्या युवकाला घेऊन सलील चौधरीच्या घरी येणे. हृषिकेश मुखर्जी हे नाव किती दबदब्याचे आहे हे अंजान, सत्यप्रकाश याना अर्थातच माहीत होती. ती संधी अजिबात घालवू नकोस असे योगेशला वारंवार सांगून त्याला सलीलदांच्या घरी आणले. तिथे प्रमुख कलाकार वगळता चित्रपटाशी संबंधित सर्वच घटक होते...अगदी कॅमेरामन जयवंत पाठारेसुद्धा....कथानक वाचन सुरू झाले...आणि सायंकाळच्या सुमारास योगेश यानी त्या वातावरणालाच जणूकाही अनुसरून ऐकविलेल्या चालीवर गीत रचले :

"कहीं दूर जब दिन ढल जाये
सांझ की दुल्हन बदन चुराये, चुपकेसे आये..."

गायिले मुकेशने आपल्या तरल आवाजात...सोनेच केले या रचनेचे.

चित्रपट पूर्ण झाल्यावर त्या एका गाण्याने तसेच दुसरे..."जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसांए...कभी ये रुलाये !" [जे मन्ना डे यानी गायले होते]...यानी अतोनात प्रसिद्धी मिळविली...'आनंद'शी निगडित सारेच घटक एका रात्रीत देशात लोकप्रिय झाले. योगेश आणि सलील चौधरी असे समीकरण छान जुळले. पुढे 'अन्नदाता...आनंदमहल...अनोखा दान' असे काही चित्रपट या जोडीने दिले...पण या सर्वात आगळावेगळा होता तो म्हणजे 'रजनीगंधा'.

चित्रपट 'आर्ट फिल्म' म्हणून समीक्षक आणि रसिकांना उचलून धरला. अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा ही दोन नावे हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलीच रुजली. यातील संगीत तर सर्वतोमुखी झाले. योगेश यानी ह्यासाठी दोन गाणी लिहिली...तितकीच होती 'रजनीगंधा' मध्ये :

१. "रजनीगंधा फूल तुम्हारे..." लता
२. "कई बार यूं भी देखा है...ये जो मन की सीमा रेखा है".. मुकेश.
[मुकेश याना त्यांच्या दीर्घ अशा पार्श्वगायन प्रवासात फक्त एकदाच 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला....तोही शंकर-जयकिशन तसेच राजकपूरसमवेत केलेल्या चित्रपट गायनासाठी नव्हे तर...योगेशच्या याच गीतासाठी, हे एक विशेषच म्हणावे लागेल.]

दोन्ही गाण्यांतील हळवेपणा विलक्षणच...शिवाय अतिशय शुद्ध हिंदीचा वापर...मुक्त छंदाचा उपयोग...आणि लता मुकेश यांच्या आवाजाची दैवी करामत. इथल्या सर्व सदस्यांनी ही दोन्ही गाणी जरूर माहीत असतील...ऐकलीही असणार, पण दोन्हीचे एक वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक बासू चटर्जी यानी कलात्मकतेने ही गाणी नायिका नायकाच्या तोंडी न देता त्यांचा 'पार्श्वसंगीत' म्हणून उपयोग केला आणि नायिकेच्या मनी असलेल्या भावनांना त्याद्वारे 'चित्रित' केले. हा एक अनोखाच प्रयोग होता...जो बासू चटर्जीसारखाच दिग्दर्शक करू जाणे. बासूदा यानीच मग पुढे 'छोटी सी बात', 'प्रियतमा', 'दिल्लगी', 'बातो-बातो मे' आणि "मंझिल" या चित्रपटासाठी योगेश यानाच गीतकार म्हणून करारबद्ध केले. या सार्‍या चित्रपटातील गाणी तितक्याच सघन अर्थाने आणि मधुरतेने चिरपरिचित झाली आहेत. 'मंझिल' मधील अमिताभ बच्चन आणि मौशुमी चटर्जी यांचे गेटवे ऑफ इंडिया समोरील भर पावसातील 'रिमझिम घिरे सावन...' हे गाणे तर उत्कृष्ट छायाचित्रणाचा एक सुंदर नमुना ठरला आहे. 'छोटीसी बात' मधील लताचे 'न जाने क्यों होता है, ये जिन्दगी के साथ अचानक ये मन किसी के जाने के बाद....' हे गाणे तर पत्रलेखन केल्यासारखेच गद्यमय आहे...लताने म्हटलेही आहे अत्यंत नाजुकपणे.

...पण काळाच्या ओघात ह्या मोहमयी मायावी चित्रदुनियेतून जिथे हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, सलील चौधरी आदी मागे पडले, बर्मन पितापुत्रही कैलासवासी झाले...मारधाड आणि गाण्यातील शब्दांना कसलाही आगापिछा नसला तरी चालते असे दिवस आल्यावर 'योगेश' यांच्यासारख्या 'कवी-गीतकारा'ने या प्रेमाला रामराम करणे हे क्रमप्राप्तच होते....झालेही तसेच.

१९४३ साली जन्मलेले योगेश गौड आज बरोबर ७० वर्षाचे झाले असून त्यानी चित्रपटलेखन संन्यास घेतला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोली मे बिठाईके थोडे तरी ऐकण्यातले, पण गाईडमधले, अल्ला मेघ दे, तर चित्रपट बघितल्यावर देखील लक्षात रहात नाही. दोष द्यायचाच झाला तर त्यातल्या बाकीच्या गाण्यांच्या अवीट चालींना द्यायला पाहिजे.

वर्षू नील आणि महेश....

...व्वा, काय योगायोग पाहा. तुम्ही दोघांनीही आपापल्या प्रतिसादात 'नीरज' बद्दल लिहिले आहे, आणि विशेष म्हणजे माझे दोन मित्र असे आहेत की जे जालावर फक्त वाचनमात्र असतात [त्याना टायपिंग जमत नाही, म्हणून इच्छा असूनही इथे भाग घेऊ शकत नाहीत] त्यानीही हा लेख वाचताक्षणीच मला फोनवर 'अशोक, आता नीरज वर लिहिण्याचे मनावर घेच !" असे सांगितले.

आनंद होतो की रसिकांना योगेश...नीरज...प्रदीप...भरत व्यास अशा शुद्ध हिंदी लिहिणार्‍या गीतकारांची आपुलकीची आठवण आहे.

नीरज...प्रदीप यांच्या कारकिर्दीवरही अभ्यासानंतर लिहिण्याचा प्रयत्न जरूर करतो.

अशोक पाटील

अशोक सर खुप सुंदर लेख.......

मला वाटत शुध्द हिंदी लिहिणार्‍यांमधे पंडित नरेंन्द्र शर्मा ( ज्योती कलश छलके) यांचेहि नाव घ्यायला हरकत नाहि.

श्री अशोक,

खूप छान. काळाच्या ओघात बरेच माणिक-मोती हरवले किंवा पायदळी तुडवले गेले आहेत.

"आनंद होतो की रसिकांना योगेश...नीरज...प्रदीप...भरत व्यास अशा शुद्ध हिंदी लिहिणार्‍या गीतकारांची आपुलकीची आठवण आहे." ....

हे खरे आहे. आपण बाकीच्या गीतकारांविषयीपण लिहावे असे वाटते. आणि दुसरे म्हणजे, दुसरे कोण इतक्या अधिकाराने लिहिणार? फार थोडे.

होय, सुर्य....पंडित नरेन्द्र शर्मा सारखी ज्येष्ठ साहित्यिक व्यक्तीही 'शुद्ध हिंदी' प्रयोगाच्या पंगतीत मानाचे स्थान मिळविणारी आहे. विशेष म्हणजे याच वर्षी (म्हणजे २०१३ हे वर्ष) पंडितजींची जन्मशताब्दीही आहे. साहजिकच उत्तर प्रदेश सरकार नक्कीच त्याना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आखेल.

मी मूळ लेखात लिहिल्यानुसार अशी ज्येष्ठ साहित्यिक मंडळी....पं.नरेन्द्र शर्मा, हरिवंशराय बच्चन, सुमित्रानंदन पंत आदी बडीबडी नावे एकाच बैठकीतील होती. यांच्या साहित्यापासून याना देशभर खूप प्रसिद्धी मिळत असल्याने [शिवाय पं.नरेन्द्र शर्मा हे तर आकाशवाणीवर मोठ्या पदावर नोकरीत होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याशी तर अगदी अरेतुरेचे संबंध] त्याना चित्रपटसृष्टीने कधीच मोह पाडला नाही.

तुम्ही भाभी की चुडियाँ मधील ज्या गाण्याचा 'ज्योति कलश छलके...' चा वर उल्लेख केला आहे, ही रचना त्या चित्रपटासाठी म्हणून लिहिली नव्हती तर त्या पूर्वीच त्यांच्या 'निर्झर' काव्यसंग्रहात प्रकाशित झाली होती, चित्रपटासाठी वापरली गेली....तीच गोष्ट "सत्यम शिवम् सुंदरम्' गाण्याची कथा.

@ आकाश नील...धन्यवाद. जरूर पुढे लिहितो तुमच्या सूचनेचा विचार करून.

अशोक पाटील

कई बार युहि देखा है , मला ह्या गाण्याच बंगाली वर्जन खूप आवडत. (ते पण सलिल ह्यांचच आहे वाटत, आता आठवत नाही).

रजनीगंधा मूवी पण मस्त आहे. पहिल्यांदा पाहिला तेव्हा कळला न्हव्ता नीट. मग कळला डायरेक्टर ला काय म्हणायचेय. ह्या एका गाण्यातच पुर्ण मूवीचे सार आहे.

साडीची त्यावेळची स्टाईल व विद्या सिन्हा मस्त वाटते बघायला. तिच्याबरोबर असलेला तो अजागळ अ‍ॅक्टर अगदीच कसातरी आहे ह्या गाण्यात. Happy

सलिलदा ह्यांची गाणी खूपच गोड सुरांची असत्/आहेत. त्यांची सर्व बंगाली वर्जन पण मस्त आहेत एकायला.

मस्त माझे अत्यंत आवडीचे गाणे Happy
लहानपणा पासून गाणी ऐकताना मुकेश मला जास्त आवडला नव्हता.
पण सलीलदा आणि खय्याम ह्यांच्या बरोबरची सगळी गाणी आवडतात. Happy

आज वाचला हा लेख मी. खुप आवडला. अर्थात ही सगळी गाणी, गायक, संगीतकार, फिल्म्स, कलाकारांसकट आवडीची आहेत.

तुम्ही उल्लेख केलेली कवी योगेश यांची विविध भारतीवरची चार भागांतली प्रदीर्घ मुलाखत मी ऐकलेली आहे. त्यामुळे या लेखाने मला पुनःप्रत्ययाचा आनंद दिला. इथे योगेश यांच्या छान आवाजाचा आणि बोलण्याच्या धाटणीचाही उल्लेख करायला हवा. काही लोकांचा बोलण्याचाही आवाज फार प्रभावी असतो, त्या व्यक्तिमत्वाला साजेसा, त्यापैकी हा एक. खुप दिलखुलास आणि आनंदाने गप्पा मारल्या आहेत त्यांनी युनुस खान यांच्याशी. स्वतःच्या मोजक्याच पण दर्जेदार कारकिर्दीबद्दल समाधान आहे, आपल्याला जमणार नसलेल्या तडजोडी करण्याचा हव्यास न ठेवता स्वखुशीने या मोहमयी दुनियेपासून दूर राहिल्याचा आनंद आहे आणि तत्कालीन सहकवींचे, गीतकारांचे मोकळे कौतुकही आहे. त्यांनी त्या कार्यक्रमात ऐकवलेली गाणीही फार आवडणारी होती.

आज पुन्हा हा लेख वाचला आणि एक माहीती आठवली जी आधी न्हवती आठवली,

मला ह्या गीताचे(हिंदीतील) बोल नक्की कधी लिहिले ह्याबद्दल जरा शंका आहे.

कारण बांगला मध्ये हे गाणं (आमी चोलते चोलते थेमे गेच्छी. )बहुधा आधी रेकॉर्ड केले होतं वाटतं( मला आता लक्षात नाही).

सलील माझे आवडते संगीतकार आहेत. आणि बासुदांचे सर्व चित्रपटसुद्धा.

मामा किती सुंदर आणि ओघवती वाणी आहे तुमची. अजून काही व्यक्तीमत्वांचा परिचय करून दया आम्हाला, आमच्या पिढीला एवढी माहिती नाही.

तुम्ही इतिहास किंवा सिनेमा ह्या विषयावर सहज डॉक्टरेट मिळवाल.

सई.....

योगेश आणि युनुस खान यांची ती दीर्घ मुलाखात मला माहीत आहेच; पण दुर्दैवाने मला एकच भाग ऐकायला मिळाला होता. अर्थात हा देखणा कार्यक्रम विविध भारतीवर रीपिट होत असतोच [जसा अचानक वहिदा रेहमानच्या मुलाखतीचा पुन्हा आनंद घेता आला होता] त्यावेळी ऐकता येईलच. बाकी निग्रहाने मोहमयी दुनियेपासून दूर राहून आपल्या प्रतिभेची बाजारू तडजोड केली नसल्याबद्दल योगेश हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.

झंपी....

बंगालमध्ये 'रजनीगंधा' नावाचा चित्रपट आला होता पण त्याच्या कथानकाचा हिंदीतील रजनीगंधाशी काही संबंध होता असे दिसत नाही. गाण्याविषयी सविस्तर लिहिले तुम्ही तर त्या ओघाने मत देता येईल.

अन्जू....

तुला लिखाण आवडले हीच मला डॉक्टरेटचा आनंद मिळवून देणारी घटना वाटते....थॅन्क्स....तू "रजनीगंधा" पाहिला होतास ना ?

येस्स्स्स.....येस....सई "उजाले उनकी यादों के....’ ह्या मालिकेची ओळखही अगदी अपीलिंग अशीच आहे. निवेदकाचा आवाज श्रोत्याला त्या काळात घेऊन जातो. असाच "सरगम के सितारे..." आणि "पिटारा" हे दोन कार्यक्रम भूतकाळाकडे नेतात.

वा, मस्त लिहिलं आहे ललित.. ही सर्व गाणी माहिती असूनही योगेश गौड हे नाव संपूर्ण अपरिचीत होते. ओळख करून दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.

मीही बहुतेक आजच वाचतेय .. सुंदर आहे लेख .. Happy

मुकेश मलाही आवडत नाही पण ही सगळी गाणी मात्र आवडतात ..

>> र्दूविरहित शुध्द हिंदी काव्य - ही बाब कधी लक्षात आली नव्हती. +१

>> या गाण्यांचे शब्द सूरातच वाचावे लागतात, अशी जादू आहे. +१

वा! मस्त लेख.:स्मित: गीतकार योगेश म्हणल्यावर एक कुतुहल असायचे. हे पण माझे आवडते गाणे.

हलकी फुलकी गाणी आणी त्याना तितकेच सुमधुर सन्गीत. हृषीकेश मुखर्जीनी खरच तो काळ हिट केला. योगेश यान्च्यासारखा गीतकार परत नाही होणार. आजच्या सन्गीताचा आत्माच हरवलाय या ढॅण ढॅण च्या जमान्यात. त्यामुळेच त्यानी रीटायर होणे पसन्त केले असावे.

मस्त लेख! उर्दूऐवजी हिंदी वापरुनही उत्कृष्ट गाणी निर्माण करता येतात हे नक्कीच सिद्ध केले आहे. आपण उल्लेखलेली सगळी गाणी नव्याने आठवली आणि अगदी बरे वाटले!

रजनीगंधा हा सिनेमा व त्यातली गाणीही अलिकडे नव्याने पाहिल्यावर खूपच आवडली. लहानपणी पाहिला तेव्हा अगदी वैताग आला होता.

साध्या, सोप्या गोष्टीवर आधारित पण तरी बरेच काही शिकवणारे, आनंद देणारे सिनेमे आणि त्यांचे संगीत बनवणारे दिग्गज काळाच्या ओघात हरपले हे पुन्हा जाणवले.

काल मुद्दामहून "कहिं दूर जब दिन ढल जाए" बघत होते .. वर कोणीतरी लिहीलंय की राजेश खन्ना कडे जी वहि असते कवितांची ज्यात एक सुकलेलं फूल असतं ती खरोखरची योगेश ह्यांचीच वहि आहे .. ते बरोबर वाटत नाही .. पिक्चरमधल्या वहित उर्दू मध्ये लिहीलेलं असतं .. जर योगेश हे शुद्ध हिंदीतले कवि असतील तर मग वहि उर्दू मध्ये कशी असेल? Happy

अशोक मामा, काय सुरेख लिहिता हो तुम्ही! खरे रसिक आहात!
रातो के साये घने हे माझं खूप आवडतं गाणं कवी योगेश यांचच Happy
युट्युबवर कवी योगेश यांची दोन भागात असलेली मुलाखत ऐकली तिचा दुवा इथे देत आहे.
दुवा:भाग १: http://www.youtube.com/watch?v=z-dkk7tzZA4
भाग २: http://www.youtube.com/watch?v=Z9VCegVI9jM

अवांतर: राज्यसभा टीव्ही आणि त्यावरील गुफ्तगू हा कार्यक्रम अत्यंत दर्जेदार आहे असा शोध लागला! आता त्याचे बाकीचे भाग ही पाहणार आहे.

खूप माहितीपूर्ण लेख! चित्रपटक्षेत्राशी संबंधीत गोष्टींचा तुमच्याकडे खजिनाच आहे! आणि तुमची मांडण्याची पद्धत पण एकदम मस्त आहे. या क्षेत्राची तुमच्यामुळे खूप जवळून ओळख होऊ लागली आहे. Happy

हा धागा वर काढणार्‍या व्यक्तीला अक्षरशः दंडवत. मी आजच वाचला हा लेख आणि आता प्रतिक्रिया द्यायला शब्द सुचत नाहीत.
मामा, तुम्ही खरचं ग्रेट आहात. लेखात तुम्ही जितक्या गाण्यांचा उल्लेख केला आहे ती सर्व माझ्या anytime classic collection मधली गाणी आहेत. कवी योगेश बद्दल खुप माहीती मिळाली, धन्यवाद.
'छोटी सी बात, बातो-बातो मे, रजनीगंधा, चितचोर, गोलमाल, नरम गरम यामधून एक वेगळा अगदी सामान्य दिसणारा, अजागळ पण आपल्या कामात एकदम चोख, दिग्दर्शकाला जे प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचं आहे ते अगदी व्यवस्थित तितक्याच उत्कटतेने आपल्यापर्यंत पोहोचवणारा अमोल पालेकर खरोखर आवडायला लागला. अगदी आपल्यी आजूबाजूला वावरणार्‍यातला एक वाटू लागला. आणि त्याला मिळालेली गाणी तर सुंदरच. ‘जब दीप जले आना’, ‘तू जो मेरे सुर में’ ‘आनेवाला पल जानेवाला है’, ‘आजसे पहले, आजसे ज्यादा’, 'दो दिवाने शहरमें'...........

हा लेख पुन्हा पाहिला आणि एक गीत आठवत होते,

स्वप्न झरे फूलसे, मीत चुभे शूलसे,
लूट गये सिंगार सभी बाग के बबूलसे
और हम खडे खडे बहार देखते रहे
कारवाँ गुजर गया गुबार देखते रहे

आधी वाटले हे पण योगेश यांचे आहे, पण हे गीत निरज यांचे आहे.
फार म्हणजे फारच उच्च दर्जाचे काव्य आहे.

कवी योगेश यांच्या बद्दल सविस्तर माहिती देणारा अत्यंत उपयुक्त लेख.

योगेश आणि नीरज हे खरे हिंदी कवी. बाकी सगळे राजेन्द्र कृष्ण आणि आनंद बक्षी पाठशाळेचे विद्यार्थी.

आजा मेरी जान या टीसिरीज पटातील कवि योगेश यांचे शहर की गलियोंमें चर्चे होंगे आज हे गाणे (खरे तर कविता) फारच सुंदर आहे.

http://www.youtube.com/watch?v=ZHxAla4adNA

Pages