प्रचिती म्हणींची (१) - मराठी भाषा दिवस २०१४ - स्वप्ना_राज

Submitted by स्वप्ना_राज on 26 February, 2014 - 04:48

'भावोजी आले, भावोजी आले' असा पुकारा झाला आणि प्रिया लगबगीने तबक घेऊन बाहेर धावली. तिच्यामागून अनुक्रमे प्रथमेश (तिचा नवरा), नयनाबाई (सासूबाई), सुरेशराव (सासरेबुवा), अर्चना (नणंद) आणि हेमंत (नणंदेचा नवरा) अशी सगळी वरात बाहेर गेली तसं अनुसूयाबाईंनी नाक मुरडलं. 'बघा, बघा कशी सगळी बाहेर पळाली. आत्याची आठवण आहे का कोणाला?' वसंतरावांनी म्हणजे त्यांच्या यजमानांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाले 'अग, तू अमिताभ बच्चन. ह्या ना त्या जाहिरातीत सदानकदा दिसणार. तो भावोजी एकदा आला, त्या आमीर खानसारखा. तू जा बघू बाहेर. नाहीतर भावोजींची ओळख व्हायची राहील.' एव्हढं बोलून त्यांनी क्रिकेटच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केलं. त्या भावोजीची ब्याद घरात घुसल्यावर टीव्ही बंद होणारच होता. एका खोलीत दोन-दोन इडियट बॉक्स कसे मावतील? हे त्यांचं मत त्यांनी त्यांच्यापुरतेच ठेवलं होतं. अनुसूयाबाई भावोजींच्या जबरदस्त फॅन होत्या.

अनुसूयाबाई बाहेर पोचतात तेव्हढ्यात तुतारीचा असू शकेल अशी शंका उत्पन्न करणारा एक जबरदस्त आवाज आला आणि भावोजी दचकले. झालं होतं काय की गोसाव्यांच्या अम्याने तुतारी वाजवली त्याच क्षणी भावोजींच्या स्वागताप्रीत्यर्थ शेजारच्या रॉय वहिनींनी शंख फुंकला होता. आणि माछेर झोलमध्ये पुरणपोळी बुडवून खाल्ल्यावर होईल तसा जबरदस्त झोल भावोजींच्या आगमनाच्या वेळीच झाला. सुरुवातच अशी दणदणीत झाल्यावर प्रियाने ओवाळायला तबक पुढे केलं तेव्हा भावोजी भेदरून दोन पावलं मागे गेले.

त्यांच्या मागे असलेल्या प्रथमेशने त्यांना पुढे ढकलत धीर दिला 'औक्षण'.
'असू दे, असू दे' भावोजी एक डोळा निरांजनाच्या ज्योतीवर ठेवत म्हणाले.
'पेढा' प्रियाने पेढा पुढे करताच मागून प्रथमेश म्हणाला. 'दिसतोय' हा शब्द भावोजींनी जीभेच्या टोकावरून परतवला.

घरात येताच 'हा काऊ', 'ही चिऊ', 'ही माऊ' असा सगळा ओळखसोहळा झाला. जवळजवळ वीसेक लोकांची नावं ऐकल्यावरही यादी संपेना तसा भावोजींनी सर्वांना घाऊक नमस्कार करून सोहळा आटोपता घेतला. टीव्ही बंद झाल्याने वसंतरावांचा नाईलाज झाला होता. त्यामुळे हा एक कॉमेडी शो आपल्यासाठीच चाललाय ह्या निराकार भावनेने ते सगळं काही पहात होते.

यथावकाश 'आता प्रियावहिनींच्या स्वभावातले तुम्हाला न आवडणारे पैलू सांगा' असा सवाल भावोजींनी सासरच्यांना केल्यावर मात्र ते कान टवकारून ऐकायला लागले. सासू, सासरे, नणंद वगैरेनी नेहमीच्या फैरी झाडल्या - सकाळी उशिरा उठते, ऑफिसमधून निघताना फोन करत नाही, काम भराभरा आवरत नाही, स्वभाव तापट आहे, फटकळ आहे, खर्चिक आहे, स्वयंपाक जमत नाही वगैरे वगैरे. मग थोडी शांतता पसरली. 'आता ह्यांच्या स्वभावातले चांगले गुण सांगा' असं म्हणायला भावोजी तोंड उघडणार तेव्हढ्यात अनुसूयाबाईनी घसा खाकरला. प्रियाच्या कपाळावर बारीकशी आठी आली. वसंतरावांनी बायकोला दंडाला धरून मागे खेचण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण जे आजतागायत जमलं नव्हतं ते आज जमायला हा थोडाच हिंदी सिनेमा होता?

'बरं का भावोजी' असं म्हणून अनुसूयाबाईनी सुरुवात केली. 'एक नंबरची विसरभोळी आहे ही. आणि काय झालं, मागच्या आठवड्यात मी आणि हे (इथे त्यांनी वसंतरावांना खेचून एका दमात background मधून foreground मध्ये आणलं) इथे आलो होतो. चांगला एक तासाचा प्रवास करून पोचलो आणि ह्या सूनबाई काय विचारतात? जेवणार का? असं विचारतात का हो कोणाला?'

मघाच्या जम्बो ओळखपरेडमधून अनुसूयाबाईचं नाव आणि नातं भावोजींच्या लक्षात राहणं अशक्य होतं. त्यामुळे त्यांनी 'आपण कोण?' असा सवाल केला.

'मी मुलाची आत्या - सौभाग्यवती अनुसूयाबाई वसंतराव फातरफेकर.' हजेरीला 'ओ' देतात त्या स्वरात अनुसूयाबाई बोलल्या आणि वसंतरावांना नेहमीप्रमाणे 'धरणी पोटात घेईल तर बरं' असं झालं.

'बरं, एक तासाचा प्रवास करून आलात काय तुम्ही? तुमच्या घरी कोण कोण असतं?'
'मुलगा, सून, मी आणि हे' ह्यावर त्यांच्या 'ह्यां'ना त्यांचे 'हे' असल्याचा पुन्हा एकदा पश्चात्ताप झाला.
'अरे वा! सून आहे. मग तिने घरी जेवण केलं नव्हतं का?' काडी लावण्यात नारदाने भावोजींची ट्युशन लावली पाहिजे.

उत्तरादाखल अनुसूयाबाईनी नुसतीच मान झटकली त्यावरून एकूण प्रकार भावोजींच्या लक्षात आला. 'अच्छा, म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर निघालं तर' असं त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

'तुमचं काय म्हणणं आहे ह्याच्यावर?' भावोजींनी प्रथमेशला विचारलं.
'अग आत्या, तुझी ऐकण्यात चूक झाली असेल. काय जेवणार असं विचारलं असेल प्रियाने.' तो हसत म्हणाला आणि अनुसूयाबाईच्या अंगाचा नुसता तिळपापड झाला.
प्रियाने मात्र मानभावीपणे 'आता आत्याबाई येतील तेव्हा त्यांच्या आवडीचं जेवण करेन' असं कबूल केलं.

ह्या घटनेला एक महिना झाला. मधल्या काळात भावाच्या घरी जायला अनुसूयाबाईना काही जमलं नाही. पण मग त्याच्या घराजवळच काही काम निघालं आणि 'जातोच आहे एव्हढं दूर तर त्याला भेटून यावं' असा विचार करून त्यांनी सुनेला आदल्या दिवशी तसं सांगितलं. सुरेशरावांच्या घरी फोन केला तेव्हा प्रियाने उचलला. थोड्या घुश्श्यातच त्यांनी तिला उद्या येतोय असं सांगितलं.

दुसर्‍या दिवशी सकाळचे ११:३० झाले. अनुसूयाबाई स्वयंपाकघरात आल्या तर कट्ट्यावर सगळा थंडा कारभार. सून आरामात पेपर वाचत बसलेली. 'प्रणिती, अग काय ग हे? स्वयंपाकाचं काय? तू कधी करणार आणि आम्ही कधी जेवणार?'

'अय्या आई, तुम्ही घरी जेवणार मला माहीतच नव्हतं. म्हटलं मामांकडे जाताय तिथेच बेत असेल काहीतरी खास - प्रियाने केलेला. त्या कार्यक्रमात म्हणाली होती नाही का ती? तुम्ही जेवला नाहीत तर तिला वाईट नाही का वाटणार? परत संध्याकाळी तुम्हाला आणि बाबांना यायला उशीर होणार तेव्हा तुम्ही जेवूनच येणार म्हणून मी आणि सुहासने आज संध्याकाळी पिझ्झा खायचा बेत केलाय. तुम्ही जेवायचं म्हणताय तर कुकर लावू का? वरणभात होईल लगेच.'

'नको एव्हढे उपकार. तिथेच जेवतो आम्ही.' असं म्हणत अनुसूयाबाई तावातावाने बाहेर पडल्या.

दोघे दादरला पोचले तेव्हा दुपारचा १ वाजला होता. आता दादाच्या घरी जाऊन मस्त जेवायचं आणि मग शॉपिंगला बाहेर पडायचं असं अनुसूयाबाईनी ठरवलं होतं. तर वसंतराव तिथून आपल्या एका मित्राच्या घरी जाणार होते. प्रियाने दरवाजा उघडला तेव्हा नयनाबाई आणि सुरेशराव टीव्ही बघत बसले होते.

'या या' सुरेशरावांनी स्वागत केलं.
'काय तरी बाई उन्ह हे, नुसता जीव हैराण झालाय.' अनुसूयाबाई हाशहुश करत पंख्याखाली बसल्या. मग थोडा वेळ गप्पांत गेला. प्रिया आरामात मासिक चाळत बसलेली बघून अनुसूयाबाईना रहावलं नाही. 'अग प्रिया, जेवणाचं बघ की आता जरा. का सगळं सांगावं लागतं?'

'अय्या, आत्याबाई, म्हणजे तुम्ही जेवून नाही आलात?' प्रिया डोळे मोठे करत म्हणाली. अनुसूयाबाई चमकल्या. नयनाबाई आणि सुरेशराव त्यांच्याकडे बघायला लागले. एव्हढी शांतता पसरली की वसंतरावांना त्यांच्या पोटातल्या कावळ्याची कावकाव स्पष्ट ऐकू आली.

'वन्स, अहो आज महाशिवरात्र आहे. विसरलात का? आज आमच्याकडे सगळं उपासाचं असतं.' नयनाबाई म्हणाल्या.

'हो ना, साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा कूट घालून गोडा कीस, बटाट्याची भाजी. तुम्हाला तर शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी आहे आणि बटाटा सहन होत नाही.' प्रिया म्हणाली.

'अग, मग काल रात्री फोन केला होता तेव्हा सांगायचं नाही का?' अनुसूयाबाई शक्य तितक्या मऊ सुरात म्हणाल्या.

'मला कुठे माहित होतं? रात्री उशिरा सासूबाईंनी साबुदाणा भिजवायला सांगितला तेव्हा कळलं. तेव्हा तुम्ही झोपला असाल म्हणून रात्री फोन नाही केला'

'अग मग सकाळी सांगायचं ना? मला वाटलं तू सांगितलं असशील.' नयनाबाई म्हणाल्या.

'सॉरी सासूबाई, विसरले मी कामाच्या गडबडीत. सॉरी हं आत्याबाई, तुम्हाला माहीतच आहे ना एक नंबरची विसरभोळी आहे मी." प्रिया चेहेरा पाडून म्हणाली आणि अनुसूयाबाईच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. सटवीने असं उट्टं काढलं होतं तर.

'आत्ता चढवू का कुकर? पटकन वरणभात टाकते.' प्रियाने विचारलं.
'नको नको, आता आम्ही बाहेरच खातो'

'विसावा' मध्ये डोसा खाताना वसंतरावांना रहावलं नाही. 'बरं का अनुसूये, शाळेत असताना एक म्हण ऐकली होती - दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. आज प्रचिती आली' ते मिस्किलपणे म्हणाले.

वि.सू. - 'होम मिनिस्टर' मध्ये एका आत्याबाईने भाच्याच्या बायकोबद्दल केलेल्या तक्रारीवरुन ही लघुकथा लिहिली आहे. भरत, हे सुचवल्याबद्दल धन्स Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं Happy

chan

छान

वाचता-वाचता 'दोन्ही घरचा पाहुणा...' म्हण असणार लक्षात आलं तरी सगळ्या कथेत म्हणी पेरण्याची कल्पना आवडली.

सर्वांना धन्यवाद! हे लिखाण विनोदी असणं अपेक्षित नव्हतंच. पण ह्या कार्यक्रमाने खूप पकवलं आहे त्यामुळे तिरकं लिहायचा मोह आवरला नाही एव्हढंच. ओरिजिनल कार्यक्रम लेखाच्या मानाने बराच विनोदी आहे हे मान्य Happy

वाचता-वाचता 'दोन्ही घरचा पाहुणा...' म्हण असणार लक्षात आलं तरी सगळ्या कथेत म्हणी पेरण्याची कल्पना आवडली. >> +१

मस्त लिहिलंय.. म्ह णी पेरुन लेख लिहायची कल्पना आवडली. मी भावोजी प्रकरण बघत नसल्याने मला हे प्रकरण खुप आवडलं.

ओह! Uhoh

हा एपिसोड टीवी वर पाहिला होता. अतरंगी होता. त्या तक्रार करणार्‍या बाई महान होत्या.

इथे हा लेख वाचताना त्याची आठवण होवून हसायला येत होते.

मस्तच.