मराठी दिनानिमित्त अमराठी लोकानी मराठी बोलण हा विषय आला आणि माझ्या आजुबाजूचे अनेक अमराठी डोळ्या समोर आले. तुळू मातृभाषा असून मराठीत व्याख्यान देणार्या मराठीतून पुस्तके लिहिणार्या आमच्या माजी कुलगुरु हिरा अध्यन्ताया, कर्नाटकातून आले तेंव्हा एक शब्दही मराठीत बोलू न शकणारे पण आता अस्खलित मराठीत व्याख्यान देणारे, वृत्तपत्रात मराठी लेखन करणारे संस्कृत विभाग प्रमुख श्रीपाद भट, पार्किन्सन्स मित्र मंडळात शुभंकर असलेल्या कानडी मातृभाषा असलेल्या भैराप्पांची पुस्तके मराठी आणणार्या, पार्किन्सन्सवरिल इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणार्या आशा रेवणकर. आमच्या आजुबाजूचे कितीतरी सिन्धी,मारवाडी,तेलगु भाषिक. पण या सर्वात मला अधिक भावली ती सुरेखाच. तिचीच ही पूर्वप्रकाशित कहाणी !
"१९७७मध्ये मी सातवी पास झाले. त्याच वर्षी मला सासरी यावे लागले. माझी शाळा सुट्ली. माझ्याच द्प्तरात पुस्तकांच्या ऐवजी कपडे कोंबून कृष्णा नदी ओलांडून मी महाराष्ट्रात आले. त्या दिवसापासून सातवीचा शिक्का कपाळावर ठळक दिसू लागला. डोळे पूर्ण उघडून जगाकडे बघताच येइना. मोठे शहर, शिकलेले लोक बघून पार भेदरुन गेले. शिकण्याची इच्छा मनाच्या पार तळाशी पड्ली. परत शिकण्याची संधी मिळेल असे वाटलेच नव्हते. परंतु टिमविच्या मुक्त विद्या केन्द्रामुळे माझे मध्येच तुटलेले स्वप्न साकार झाले."
पदवीधर झाल्यावर सुरेखाच भलं मोठ पत्र आल होत. त्यातील हा मजकूर. तिच्या पत्रात पदवीधर झाल्याचा आनंद ओसंडून वाहात होता. टिळक विद्यापीठाबद्दलची अपरंपार कृतज्ञता,तिच्या घडणीतील विद्यापीठाचा वाटा याबद्दल तिने भरभरुन लिहिल होत. विवाहामुळे शिक्षण तुटलेल्या व मुक्त विद्या केन्द्रामुळे पदवीधर झालेल्या गृहिणीची कथा थोड्याफार फरकाने अशीच असते. परंतु सुरेखाच्या यशाला वेगळा रंग आहे. खर तर तिचे बी.ए..साठी प्रवेश घेणं एक धाडसच म्हणावयास हरकत नाही.
सुरेखा पाटील अथणीची. मातृभाषा कानडी. मराठीची दूरुनही ओळख नव्हती. हिंदी विषय शाळेत असल्याने देवनागरी लिपी मात्र येत होती. ती हुषार होती शाळेत पहिली यायची. परंतु खेळत्या वयात म्हणजे अगदी पहिलीतच लग्न झाल.सातवीत असताना सासरी आली. नव-याची बदली महाबळेश्वरला झालेली. आजूबाजूच्या काम करणार्या मुलींबरोबर लंगडी छप्पापाणी खेळताना त्यांची मराठी मोडकी तोडकी येऊ लागली. ग्रामीण भागातून नागरी जीवनात आलेल्या सुरेखाला त्याच जवळच्या वाटायच्या.चवदाव्या वर्षीच मुल झाल.
नंतर मुल,संसार्,नवर्याच्या बद्ल्या यात वर्ष निघून गेली. मुले इंग्रजी माध्यमात होती.त्याना एक विषय मराठी असल्याने थोडथोड वाचन सुरु झाल. कानडी तर नजरेलाही पडत नव्हत. घरात सकाळ यायचा तो वाचायचा. चांदोबासारखी लहान मुलांची मासिकही वाचायची. थोड्थोड मराठी समजायला लागल.बोलताही येऊ लागल.
आणि एके दिवशी मुलीनी बातमी आणली. घरबसल्या बी.ए.करता येइल. पूर्व शिक्षणाची अट नाही. पण अभ्यासक्रम मराठीतून. सुरेखानी घाबरत घाबरत फोन केला. ज्या व्यक्तीने फोन घेतला त्या व्यक्तीचे बोलणे इतके आश्वासक होते की सुरेखाला वाटले प्रवेश घ्यावा. तिने बी.ए. प्रवेश चाचणी परीक्षा दिली. आश्चर्य म्हणजे तिला १००पैकी ६८ गुण मिळाले. सुरेखानी प्रथम वर्षास प्रवेश घेतला.
प्रवेशाबरोबर मिळालेली मराठीतून असलेली दहा पुस्तके पाहिली आणि धडकीच भरली. पण मनाच्या तळाशी असलेली इच्छा आता नजरेच्या टप्प्यात होती. जिद्द होती कष्ट करायची तयारी होती. सुरेखाची तपश्चर्या सुरु झाली.
घरची काम उरकली की रोज रात्री तीन् तीन वाजेपर्यंत वाचन, लिहिण सुरु झाल. पुन्हापुन्हा वाचायच लिहायच. मुलांकडून न समजलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे. मराठीतल्या सनावळ्यांचे आकडे मुलाना विचारुन कानडीत लिहायचे. आणि पाठ करायचे असा क्रम चालू झाला. लिहून लिहून हात दुखला तरी लिहिणे थांबायचे नाही. मग हात तट्ट सुजायचा.काम करेनासा व्हायचा. मग तिला रडायला यायचे. हात दुखतो म्हणून नाही तर काम थांबले म्हणून.
सर्व संपर्कसत्राना ती हजर राहायची. जिवाचा कान करून प्राध्यापकांचा शब्द न शब्द ऐकायचा.आत्मसात करायचा. त्यावर चिंतन करायचे.हुषार सुरेखाच्या मेंदूवर ते कोरले जायचे
सुरेखा सांगते परीक्षेवेळी हातवार्यासकट. प्राध्यापकांचे व्याख्यान डोळ्यासमोर येई. आणि ती झट्पट पेपर लिहित असे.
प्रथम वर्षात अनेक गृहिणींचा एखादा विषय राहतो; सुरेख मात्र सर्व विषयात उत्तीर्ण झाली. कानडी मातृभाषा असूनही मराठी आत्मसात करणे,पहिल्या झट्क्यात सर्व विषयात पास होणे हे वाखाणण्याजोगे होते. या यशाने तिचा आत्मविश्वास वाढला.या पूर्वीही काही अमराठी विद्यार्थ्यानी बी.ए. केले होते. परंतु त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झालेले होते. नोकरी व्यवसायामुळे बाह्य जगाशी मराठीशी संपर्क होता. अभ्यासक्रम मराठीतून असला आणि सर्व लिखित साहित्य मराठीतून असले तरी पेपर इंग्रजीमध्ये लिहिण्याची परवानगी होती. त्यामुळे लिखाणासाठी इंग्रजीचा आधार होता. आणि मुख्य म्हणजे बी.ए.होणे ही त्यांची व्यावसायिक गरज होती. परंतु सुरेखाच्या बाबतीत यापैकी काहीच नव्हते. सातवी उत्तीर्ण मराठी व्यक्तीही प्रवेश घेताना दहावेळा विचार करतात. पण सुरेखानी मात्र जिद्दीने प्रथम वर्ष पूर्ण केले.
पहिल्याच वर्षात तिला स्मिता देसाई,महाशब्दे वाणी, परदेशी अशा मैत्रिणी मिळाल्या. स्मिता त्यांची लीडर. सुरेखाला प्रोत्साहन देण्यात तिचा मोठा वाटा होता. या सर्वानी एकत्र येऊन अभ्यास तर केलाच शिवाय दिवसभर विद्यापीठात रेंगाळणे कँटीनमध्ये गप्पाटप्पा करणे, निवासी संपर्कसत्रात विद्यापीठाच्या उपक्रमात सह्भागी होणे; असे करत दूरशिक्षणात राहुनही महाविद्यालयीन जीवनाचा आनंदही लुटला. या सर्व मैत्रिणींच्या सहवासात भित्री सुरेखा बोलायला लागली. चक्क शुद्ध मराठीतून बोलायला लागली. अभ्यासाची खडतर तपश्चर्याही चालूच होती. दुसरे तिसरे वर्षही ती पहिल्या खेपेतच द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. तृतीय वर्षात संज्ञापन कौशल्य या विषयात तीन वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित वैचारीक निबंध असत. विद्यार्थ्याना नेहमीच हा विषय कठीण वाटतो. सुरेखाला मात्र यात प्रथम श्रेणीचे गुण मिळाले. तिच्या सख्यानी एकत्र येऊन तिचा सत्कार केला. आम्हा प्राध्यापकानाही बोलावल होत. एरवी आम्ही असे विद्यार्थ्यांकडे जात नसू. पण आम्हा सर्वानाच या मैत्रीणींच्या भावनांचा आदर करावासा वाटला.
आज सुरेखा डोळे उघडे ठेऊन जगाकडे पाहू शकते. स्वतःकडे स्वतःच्या कुटुंबाकडेही ती आता अधिक सुजाण नजरेने पाहू शकत आहे.
सुरेखानी सानेगुरुजींच्या आंतरभारतीचे एक सुरेख उदाहरण दिले आहे. तिच्याकडे पाहिले कि वाटते "कष्टाने मराठी शिकणार्या सुरेखाला अमराठी म्हणायचे की मराठी मातृभाषा असूनही मराठी माध्यमाची लाज वाटणार्याना."
हा लेख आल्यानंतरही तिची खबरबात फोनवरुन कळत होती आता तिची ज्ञानाची भूक वाढली होती. बी.ए.झाल्यावर तिने पुणे विद्यापीठाच्या स्त्री अध्यासन(women study department) येथे 'स्त्री विषयक अभ्यास' या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. सख्यांच बोट सोडून एकटी जाण्याएवढी ती धीट झाली होती. बिबवेवाडीहून बसने एकटी विद्यापीठात जायला लागली. वर्षाचा अभ्यास्क्रम.५ पेपर आणि शोधनिबंध अस अभ्यासक्रमाच स्वरुप होत. "बालविवाह आणि शिक्षण" असा तिचा शोधनिबंधाचा विषय होता. स्वतः च्या जीवनावरच केसस्टडी अस त्याच स्वरुप होत. तिला आता पंख फुटले होते. आकाश तिला खुणावत होत.
मायबोलीवर सुरेखावरचा लेख टाकायचा ठरवल्यावर तिला फोन करायच ठरवल तर माझ्याकडे असलेल्या फोनवर फोन लागेना. मग स्मिताला फोन केला तिच्याकडे नंबर मिळाला.सुरेखा फोन केल्यामुळे खुपच खुश झाली.आनंदाबरोबर तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता.
"मॅडम कालच आठवण काढली होती तुमची.धावत धावत याव आणि तुम्हाला भेटाव वाटतय. आज माझा दिवस छान जाणार. तुमचा चेहरा बोलण हातवारे सगळ डोळ्यासमोर येतय." ती भरभरुन बोलत होती. विद्यापीठातल्या जुन्या आठवणी सांगत होती पीएच,डी करणार असल्याच सांगत होती. सध्या मुलीच लग्न, बाळंतपण, नातवंडाना सांभाळण चालू होत. पण तिची स्वप्न तिला खुणावत होती.तिला मराठी दिनाच्या निमित्याने विचारण्यासाठी मी प्रश्न काढले होते. पण मला तिचा ओघ थांबवून ते विचारावेसे वाटलेच नाहीत. तिच बोलण ऐकत राहावस वाटत होत.
पण मी एक मनाशी ठरवल तिच तारु पीएच.डीच्या बंदराला लागण्यासाठी शिडात थोड वार भरायला हव. तिला मधून मधून फोन करायला हवा .
(वरील लेख ८ जानेवारी २००५च्या केसरीच्या अंकात 'उत्तुंग भरारी' या सदरात छापून आला होता. इथे पुन्हा टाकण्यासाठी दै. केसरीने परवानगी दिली त्या बद्दल त्यांचे आभार! )
ग्रेट!
ग्रेट!
वा सुरेखाताईं तुमचे खरच मराठी
वा सुरेखाताईं तुमचे खरच मराठी होण्याबद्दल खुप खुप कौतूक. तुमच्या धाडसाचे, अभ्यासू वृत्तीचेही खुप कौतुक.
शोभनाताई तुमचे धन्यवाद. तो शेवटचा तुम्ही लिहीलेला परीच्छेद भावला.
एका कौतुकास्पद जिद्दीचे
एका कौतुकास्पद जिद्दीचे तितक्याच सुंदरतेने तुम्ही केलेले वर्णन इतके भावले की मूळ कन्नड विद्यार्थिनी आज पूर्णतः मराठी प्रांतातील मराठी मुलांमुलींसाठी आदर्श बनून उभी आहे याची स्पष्ट जाणीव झाली. सुरेखाचे स्वप्न होते हे खरे, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तिने जे कष्ट घेतले आहेत त्याचे वर्णन वरील लिखाणात तर आले आहेच पण सुरेखा म्हणजे नित्याच्या व्याख्येतील विद्यार्थिनी नसून प्रथम ती स्त्री...पत्नी,...आई अशा भूमिका करत होती....आणि तो सारा राबता सांभाळता सांभाळता समोर पुस्तक धरीत होती रात्रभर....हा खरा आदर्श आहे अनेक लोकांसमोर. समाजात टिंगलटवाळ्या करणार्यांची संख्या काही कमी नाही. मुंबईपुण्यात निदान काही प्रमाणात प्रोत्साहन उत्तेजन लाभते पण छोट्या शहरात मांडीवर बाळाला ठेवून अभ्यास करणार्या मुलीबद्दल मोठी माणसे [यात स्त्रियाही आल्याच] जे काही उदगार काढतात ते ऐकल्यावर तर अशा कित्येक सुरेखांची उच्च शिक्षणाची आस आटूनच जाईल. आमच्या रंकाळा तलावात कमरेला डबा बांधून पोहायला शिकणारी एक स्त्री होती. तिला आमच्यासारख्या नित्यनेमाने तिथे पोहायला जाणार्याकडून वेळोवेळी प्रोत्साहन मिळत असे....आणि ते तिला भावत असे. पण ज्याना पोहायला येत नाही, अन शिकणार्याला ते शिकूही द्यायचे नाही अशा बाया रंकाळ्याच्या काठावर नुसत्या पाहात बसून नको असलेली शेरेबाजी करायच्या. ज्ञानप्राप्तीसाठी केवळ जिद्दच उपयोगी पडत नाही तर त्याहीपेक्षा समाजाच्या बोलण्याकडेही दुर्लक्ष करण्याचे बळ मिळविणे क्रमप्राप्त असते.
सुदैवाने सुरेखाच्या पदवी पर्यंतच्या प्रवासापर्यंतची वाटचाल खाचखळग्याशिवाय झाली असेल अशी आशा आहे. झालीही असेल, अन्यथा त्याशिवाय तिलाही पीएच.डी.ची भूक लागली नसती.
शोभनाताई....आज तुमची तिच्याशी प्रत्यक्ष गाठ पडत असेल किंवा फोनवरून क्षेमकुशल विचारले जात असेल तर या निमित्ताने माझ्याकडून तिला मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल अभिनंदन आणि नमस्कार जरूर कळवा.
शोभनाताई - किती स्फुर्तीदायक
शोभनाताई - किती स्फुर्तीदायक आहे हे, हे इथे लिहिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.
सुरेखाताईंना पुढील शिक्षणासाठी व एकंदरीत वाटचालीसाठी शुभेच्छा.
मस्त लेख! अगदी सकारात्मक..
मस्त लेख! अगदी सकारात्मक.. वाचून खूप छान वाटलं.
मंजूडी +१, आवडलाच.
मंजूडी +१, आवडलाच.
शोभनाताई... सुरेखा डॉक्टरेट
शोभनाताई... सुरेखा डॉक्टरेट पुर्ण करणारच.. आणि हे पण तुम्ही अश्याच कौतुकाने इथे लिहिणार आहात.
मस्त लेख शोभनाताई - किती
मस्त लेख
शोभनाताई - किती स्फुर्तीदायक आहे हे, हे
इथे लिहिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.
सुरेखाताईंना पुढील शिक्षणासाठी व
एकंदरीत वाटचालीसाठी शुभेच्छा.>>>>> +1111
शोभनाताई, सुरेखाताईंचे खुप
शोभनाताई, सुरेखाताईंचे खुप खुप कौतुक वाटले.. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेछा
इच्छितांसाठी सुलभ निकष ठेऊन दूरशिक्षण उपलब्ध करून देणा-या टिमवीलाही धन्यवाद दिले पाहिजेत. तुम्ही खुप यथार्थ व्यक्तिमत्व निवडलेत या विषयासाठी..
पण मी एक मनाशी ठरवल तिच तारु पीएच.डीच्या बंदराला लागण्यासाठी शिडात थोड वार भरायला हव. तिला मधून मधून फोन करायला हवा>>> इतके प्रोत्साहक शिक्षक-मार्गदर्शक मिळाल्यावर का नाही मिळणार सुरेखाताईंना डॉक्टरेट?
खूप छान लेख! धडपड्या सुरेखाची
खूप छान लेख! धडपड्या सुरेखाची तितकीच सुरेख ओळख करुन दिलीत शोभनाताई
खूप कौतुक वाटले. त्यांच्या पुढच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
खूप छान लेख! धडपड्या सुरेखाची
खूप छान लेख! धडपड्या सुरेखाची तितकीच सुरेख ओळख करुन दिलीत शोभनाताई
खूप कौतुक वाटले. त्यांच्या पुढच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! >>>>> +१००....
ग्रेट, ग्रेट.....
शोभनाताई... सुरेखा डॉक्टरेट
शोभनाताई... सुरेखा डॉक्टरेट पुर्ण करणारच.. आणि हे पण तुम्ही अश्याच कौतुकाने इथे लिहिणार आहात.>>>>>> १००००००++
फार छान ओळख करून दिलीत! सुरेखाला पुढच्या वाटाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
वा! सुरेखाचं तर कौतुक आहेच.
वा! सुरेखाचं तर कौतुक आहेच. पण तुमचंही शोभनाताई!
सुरेखाला शुभेच्छा!
खुप छान लेख! खूप कौतुक वाटले.
खुप छान लेख!
खूप कौतुक वाटले. त्यांच्या पुढच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! >>>>> +१
सुरेखाताईंची जिद्दं आणि
सुरेखाताईंची जिद्दं आणि चिकाटी कौतुकास्पद आहे!
शोभनाताई, तुमचा लेख खूप आवडला.
सुरेखा खरंच ग्रेट आहे, तिचे
सुरेखा खरंच ग्रेट आहे, तिचे मनापासून कौतुक. शोभनाताई ह्या लेखासाठी तुम्हाला धन्यवाद.
दिनेशदांना अनुमोदन.
मस्त लेख, आवडला.
मस्त लेख, आवडला.
खूपच कौतुकास्पद आहे सुरेखाची
खूपच कौतुकास्पद आहे सुरेखाची गोष्ट. इथे आणल्याबद्दल धन्यवाद!
प्रतिसादाबद्दल सर्वाना
प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद!सर्वांच्या शुभेछ्या आणि अभिनंदन सुरेखापर्यंत नक्की पोचवीन.
मस्त लेख. सुरेखाची ओळख आवडली.
मस्त लेख. सुरेखाची ओळख आवडली.