जात्यावरची पहाट

Submitted by संतोष वाटपाडे on 3 February, 2014 - 22:23

रामपहारी पुढल्या दारी
पडवीमध्ये विसावलेल्या
आमच्या दगडी जात्यावरती
गहू बाजरी उडिद नाचणी
आईसोबत दळण्यासाठी
म्हातारीच्या जुनाट ओव्या
पदरामध्ये मिळण्यासाठी
गल्लीमधल्या गावामधल्या
शिकलेल्यांच्या शेतकर्‍यांच्या
अनेक बाया जमा व्हायच्या...

लाजत मुरडत गालामध्ये
दळता दळता घेत उखाणे
एकेकीच्या दळणासोबत
ननंद जाऊ नवर्‍याचीही
बरीच चेष्टा गाण्यांमधुनी
सासूची अन नक्कलसुद्धा
अगदी खर्‍याच आवाजाने
काळ्या चहात समरसताना
दातावरती मंजन काळे
हळूच काही लावायाच्या...

शेणपटाने सारवलेल्या
मळक्या पाटीमध्ये मोठ्या
विस्कटलेले पीठ ओतूनी
त्यावर नक्षी कशाकशाची
राम कृष्ण या नावांचीही
गप्पा मारत नाजूक साजूक
तरूण सुनांना देत टोमणे
मिचकावून पण हसरे डोळे
हळूच चिमटे तळपायाला
वात्रट काही काढायाच्या....

गजबलेली पहाट जेव्हा
डोंगरातल्या सुर्यासोबत
तुळशीभवती घिरट्या घेई
डोक्यावरती घेत टोपल्या
मऊ पीठाने थबथबलेल्या
जात्यावरच्या ओव्यांमधले
माहेराचे व्याकूळ आठव
ओठांवरती पुटपुटताना
नव्या सुखाच्या आशेवरती
सर्व बायका घरी जायच्या....

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर .....

त्या जात्यावरच्या ओव्या माहित असतील तर टाका ना इथे प्लीज......

पुन्हा एकदा (जुन्या काळातल्या) ग्रामीण विभागातील आठवणी जाग्या करणारी छान कविता.

वा!

मस्त !

गजबलेली पहाट जेव्हा
डोंगरातल्या सुर्यासोबत
तुळशीभवती घिरट्या घेई >>
झुंजुमुंजू पहाटेचं अगदी नेमकं वर्णन..

जात्यावरच्या ओव्यांमधले
माहेराचे व्याकूळ आठव
ओठांवरती पुटपुटताना
नव्या सुखाच्या आशेवरती
सर्व बायका घरी जायच्या....

सुरेख Happy

खुप छान .
अडवळणाचे गाव एकटे,
काटेच काटे अंथरलेले.
खडतर होते जीवन तिथले,
तरीही होते मंतरलेले.

सुन्दर