बघण्यासारखे काही
केनयात पर्यटक जातात ते खास करून मसाई मारा आणि गेम पार्कस बघण्यासाठी. काही जण मोंबासा मालिंदीला शुभ्र समुद्र किनारे आणि मासेमारीसाठी पण जातात. या बहुतेक ठिकाणी जाण्यासाठी नैरोबी हा बेस ठेवता येतो. तिथून रस्त्याने किंवा छोट्या विमानाने त्या त्या ठिकाणी जाता येते. ( मोंबासा पण आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. )
नैरोबी शहरात दिवसभरात फ़िरणे जिकीरीचे आहे खरे पण सकाळी लवकर निघून दिवसभरात बघून होतील अशी
काही ठिकाणे नैरोबीच्या आसपास आहेत.
खुद्द नैरोबी शहरात अनेक देवळे आहेत आणि ती खरोखर बघण्यासारखी आहेत. स्वामीनारायण मंदीर आणि त्याचे आवारही छान आहे. नगारा भागात सोमनाथ देवळाची मोठी प्रतिकृती आहे. हरे रामा हरे कृष्णा ( तिथे हेच नाव प्रचलित आहे ) पण छान आहे. नैरोबी वेस्ट भागात अंबाजीचे देऊळ आहे. या देवळात नियमित पूजा होत असतात. आणि काही खास सणांना प्रसादाचे जेवणही असते. हरे रामा.. देवळात कायमस्वरूपी मिठाईचे दुकान आहे.
आजकाल सर्वच मोठ्या शहरात असतात तसे नैरोबी शहरातही मॉल्स आहेत. त्यांचे स्वरुप नेहमीचेच म्हणजे
एखादे मोठे सुपरमार्केट, दोनचार कपड्यांची दुकाने, फ़ुड कोर्ट असेच आहे. पण वेगळेपण म्हणजे आठवड्यातील
ठराविक दिवशी त्या त्या मॉलमधे मसाई बाजार भरतो. मसाई लोकांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या वस्तू तिथे
विकायला येतात. त्यापैकी काही वस्तूंची माहिती पुढे शॉपिंग सदरात येईलच.
नैरोबीपासून जवळ असणारी म्हणजे एका दिवसात जाऊन येण्यासारखी काही ठिकाणे म्हणजे. लॉस्ट पॅराडाईज.
इथे एक मोठी नैसर्गिक गुहा आहे. तिथे बरेच आतपर्यंत जाता येते. गुहेसमोरून एक छोटा धबधबा कोसळत
असतो. खालून एक नदी पण वहात असते.
अथी रिव्हर च्या पुढे एक ऑस्ट्रीच पार्क आहे. तिथे मांसासाठी शहामृगांची पद्धतशीर जोपासना केली जाते.
( फ़क्त पाच आठवड्यापर्यंतच त्यांचे मांस खाण्याजोगे असते, नंतर ते वातड होत जाते. ) तो पार्क बराच
मोठा आहे आणि शहामृगांना जवळून बघता येते. शहामृगाच्या पाठीवर बसून रपेट करण्याचीही सोय आहे.
आणि आवड असल्यास त्याचे मांसही खाता येते. या वाटेवर बरीच फ़ुलशेती दिसते.
वरील दोन्ही ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे.
खुद्द नैरोबीत काही मोठे गुरुद्वारे आहेत. अर्थातच तिथे लंगर चालू असते. थोडा वेळ असेल तर मकिंडो
या गावच्या मोठ्या गुरुद्वाराला भेट देता येईल. तिथल्या लंगरमधले जेवण तर अति खास असते.
तिथेही राहण्याची सोय आहे.
पण नैरोबीतले सर्वात खास आकर्षण म्हणजे नैरोबी नॅशनल पार्क. हा पार्क शहरापासून केवळ ८ किमीवर
आहे. त्या पार्कमधून नैरोबीमधल्या उंच इमारती आणि तिथले प्राणी एकाचवेळी दिसतात.
तिथे त्यांची बससेवा आहे शिवाय आपली गाडी घेऊन पण जाता येते. प्राण्यांमधे जिराफ़, झेब्रा, शहामृग,
हरणे, वानरे खात्रीने दिसतात. सिंहसुद्धा दिसू शकतो. पक्षी तर अनेक प्रकारचे आहेत.
पार्कमधे ३ ठिकाणी खास पिकनिक स्पॉट्स केलेले आहेत. तिथे थोडा वेळ आराम करता येतो. बाकी कुठेही
गाडीतून बाहेर येण्याची परवानगी नाही.
तिथले प्राणी पर्यटकांना चांगलेच सरावलेले आहेत. गाडी जवळ आली तरी ते बिचकत नाहीत. कधी कधी
आपणच गाडीजवळ येतात. गाडी शक्यतो ४ व्हील ड्राईव्ह असावी कारण आ्तले रस्ते पक्के नाहीत.
साधी गाडी चिखलात रुतू शकते. या पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ घनदाट जंगल आहे पण आतमधे गवताळ
प्रदेश आहे. त्यामूळे दूरवरचे प्राणी दिसू शकतात. छोटे प्राणी मात्र गवतात सहज लपू शकतात.
ज्यांना पायी फ़िरायची आवड आहे त्यांच्यासाठी या गेटला लागूनच नैरोबी सफ़ारी वॉक आहे. खास बांधलेल्या
लाकडी पायवाटांवरून मनमुराद भटकता येते. तिथे बिबळ्या, चित्ते, सिंह काही हरणे असे प्राणीही आहेत.
त्यांना जवळून बघायची सोय आहे. तिथेच प्राण्यांचे अनाथालय आहे. ज्या प्राण्यांची पिल्ले आईविना पोरकी
सापडतात त्यांना तिथे वाढवून मग जंगलात सोडतात. त्या पिल्लाना हाताळायचीही सोय आहे. या दोन्ही ठिकाणी
जाण्यासाठी डे एस्कर्शन्स असतात. आतमधे खाण्यापिण्याची दुकाने नाहीत. फ़ोटोग्राफ़ीची मात्र भरपूर संधी आहे.
( या सर्व ठिकांणांबदलचे सविस्तर लेख मायबोलीवरच आहेत. )
याशिवाय सरीत सेंटर, व्हीलेज मार्केट, ओश्वाल ऑडीटोरियम अशा काही जागा आहेत जिथे काही ना काही प्रदर्शन वगैरे चालू असते. भारतीय नाटकांचे, गाण्यांचे कार्यक्रमही अधूनमधून होत असतात. निव्वळ पायी भटकायचे असेल तर उहूरू पार्क आहे. तिथे एका छोट्या सरोवरात बोटींगची सोय आहे. तिथे काही खास पक्षी दिसू शकतात. म्यूझियम जवळ एक वनस्पति उद्यान आहे.
खुद्द म्यूझियम मात्र आता तितकेसे चांगले राखलेले नाही. विश्वात्मा चित्रपटात दाखवलेला बबल्स डिस्को पण
म्यूझियमच्या जवळच होता. तो आता बंद पडला आहे. एक नवीन वॉटर पार्क होऊ घातले आहे.
कुणी जाणकार सोबत असल्यास टाऊनमधेही फ़ेरफ़टका मारता येईल. नैरोबीत नाईट लाईफ़ आहे, असेही ऐकून आहे. अनुभव नाही.
शॉपिंग
शॉपिंग लिस्ट मधे टॉपवर असायला पाहिजे तो चहा. केरिचो गोल्ड हा साधा चहा. आणि मग मसाला, आले,
वेलची अश्या स्वादाचे चहा. शिवाय मारा मोजा नावाचा इन्स्टंट चहा. हे सर्व चहा अगदी ट्रांझिट मधे असाल
तरी घेता येतील. एअरपोर्टवरच ड्यूटी फ़्री मधे ते मिळतील. बाहेर सुपरमार्केटमधेही मिळतील. जर प्रत्यक्ष
केरीचो गावात जाऊ शकलात तर तिथे थेट टी फ़ार्मवरून खरेदी करता येईल. केनयात कॉफ़ीचेही मळे आहेत.
तीदेखील उत्तम स्वादाची मिळते.
ड्राय फ़्रूट्समधे अर्थातच मकाडामिया. ते सिझनमधे रस्त्यावरच विकायला असतात. त्यावेळी मोठे मोठे बघून
घेता येतील. सिटी मार्केटमधेही मिळू शकतात तसेच ब्रांडेड पॅकेट्सही मिळू शकतात. पण त्यांची प्रत मलातरी
चांगली आढळली नव्हती. मसाल्यांपैकी झांजिबारहून आलेल्या वेलच्या, लवंगा, मिरे अवश्य घ्या. रुपाने ओबडधोबड असले तरी ते स्वादाला उत्तम असतात.
केनयात कोकोचेही पिक येते. त्यामूळे स्थानिक चॉकलेट्स अवश्य चाखून बघा. तिथे काही वेगळे स्वाद उपलब्ध
आहेत. आवडले तर अवश्य घ्या.
टेक्स्टाईलमधेही बघण्यासारखे बरेच काही आहे. किनारी प्रदेशात एक खास सुती शॉल मिळते. तिला म्हणतात
कहांगा ( म्हणजे रंगीबेरंगी करकोचा ) या शॉलीला त्यांच्या संस्कृतीत फ़ार महत्व आहे. मोठ्या माणसांकडून
तरुण मुलींना आशिर्वाद रुपात ही देतात. यात शक्यतो पेस्टल रंग असतात. फ़ार डिझाईन नसते पण कधी
कधी त्यांच्या भाषेतील आशिर्वादपर मजकूर असतो. सुती असल्याने उबदार असते.
मसाई लोकांचीही शॉल असते. त्यात लाल, निळा, जांभळा आणि काळा असेच रंग जास्त करून असतात.
गवताळ प्रदेशात दूरवरचा माणूस दिसण्यासाठी हे रंग योग्य असतात. आपल्याला हे रंग थोडे भडक वाटू
शकतील पण इतर रंगांबरोबर संयोग केल्यास शोभून दिसतील.
त्याशिवाय आफ़्रिप्रिंट्स कापड घेता येईल. यातही शक्यतो लाल, हिरवा, निळा, काळा, पिवळा असे बेसिक
रंगच असतात. प्रिंट जिओमेट्रीक, फ़्लोरल असे मिश्रण असते. डिझाईन फ़ार मोठे असते. बारीक वेलबुट्टी
वगैरे नसतेच. त्या बायका हे कापड लुंगीप्रमाणे नेसतात किंवा छातीभोवतीने गुंडाळतात. तशी डिझाईन्स
आपल्याकडे दिसत नाहीत. ती तत्वे वापरून तयार केलेले आधुनिक कपडेही मिळू शकतात.
एम्ब्रॉयडरी केलेले टीशर्ट्स हि आणखी खासियत. यात बिबळ्या, चित्ता, सिंह किंवा त्यांचे मण्यांचे दागिने,
अशी एम्ब्रॉयडरी खुप सुंदर असते. पॅचवर्क केलेले टी शर्ट्सही मिळू शकतात. सफ़ारी सूट ही मूळ कल्पना
केनयातली. ते नाहीत पण खाकी रंगाचे भरपूर खिसे असलेले शर्ट्स तिथे मिळतात. ट्रेकसाठी ते फ़ार छान.
मसाई लोक मण्यांचे वेगवेगळे दागिने घालतात. बारीक मण्यांपासून ते केलेले असले तरी खुप मोठे असतात.
पण आपल्याला रुचतील असे लॉकेट्स, इअरींग्ज, केसांना लावायचे पट्टे, हाताभोवती गुंडाळायचे पट्टे मिळतात.
वरती मसाई मार्केटचा उल्लेख आलाय. एकदा अवश्य या बाजाराला भेट द्यावी. सोपस्टोनपासून केलेले छोटे
छोटे प्राणी, डिशेस, बुद्धीबळाचे पट, चामड्याच्या वस्तू, लाकडापासून केलेल्या वस्तू अशी अनेक उत्पादने
तिथे मिळतात. या लोकांना पर्यटकांशी बोलायचा सराव असल्याने ते उत्तम इंग्रजी बोलतात. या बाजारात
बार्गेनींग ला भरपूर वाव असतो. वस्तूंचा दर्जा उत्तम असतो. तिथे नुसत्या लाकडाच्या बाहूल्या न करता
त्यांना मण्यांनी वगैरे सजवलेले असते. फ़क्त लहानमोठे मणी विकणारी काही दुकाने आहेत तिथे.
नैरोबीतून रिफ़्ट व्हॅलीकडे जाताना शेवटी एका कड्यावर आपण येतो. तिथेही मसाई लोकांनी चालवलेली
दुकाने आहेत. तिथेही या वस्तू मिळतात. बाजाराचा दिवस गाठता आला नाही तर इथे या वस्तू मिळतातच.
तिथेच काही फ़र् विकायला असतात. सध्या फ़र च्या विरोधात लोकमत असल्याने अनेक एअरलाइन्स
सामानात फ़र घेत नाहीत. तेव्हा ती चौकशी आधी केलेली बरी.
कसावाचे पापड ही पण केनयाची खासियत. सुपरमार्केट मधे हे मिळू शकतात. एखाद्या गुजराथी कुटूंबाशी
ओळख झाल्यास असे पापड तयार करूनही मिळतात. असा घरगुति उद्योग करणाऱ्या अनेक बायका तिथे
आहेत. त्यांच्याकडे इतरही उत्पादने मिळू शकतात.
वाईल्ड लाईफ़ फ़ोटोग्राफ़ी व रिफ़्ट व्हॅली संबधित अनेक पुस्तके तिथे मिळतात. खुपच सुंदर फ़ोटोग्राफ़ी
असते त्यात. किम्मत थोडी जास्त असते पण तरी मला ती योग्यच वाटते. स्थानिक लेखकांची इंग्रजी
पुस्तकेही मिळतील.
आणखी एक आवर्जून नोंदवायची वस्तू म्हणजे कच्चे सोने. कच्चा सोना हा तिथला शब्द. हे अगदी चोख
सोने असते. केनयातील काही नद्यांच्या खोऱ्यात सोने सापडते. असे सोने अगदी चोख रुपात तिथे विकायला
असते. या सोन्याचे दागिने घडवता येत नाहीत ( ते मऊ व ठिसूळ असते. फ़ारतर त्याचे जाडसर कडे
करता येते ) भारतात त्याचे कडे आणून त्यात थोडे तांबे मिसळून दागिने करता येतात. ते सोने बघितल्यावर
भारतातले सोनार ते घ्यायला ताबडतोब तयार होतात. आता भावात फ़ार फ़रक नाही पण तरी ते स्वस्त
पडते. ( मी बरीच वर्षे तसे सोने आणलेले नाही, त्यामूळे सध्या भारतात त्यावर काही आयात निर्बंध आहेत
का ते बघावे लागेल. तरीही अंगावरच्या दागिन्यात सूट असावी. ) हि दूकाने अगदी उघड दिसतील
अशी नाहीत. त्यासाठी स्थानिक भारतीय माणसाची मदत घ्यावी लागेल.
फ़ळ प्रक्रिया उद्योग मात्र अजून तितकासा जोरात नाही तिथे. तरी प्लम, आंबा यांचे जाम आणि लिंबू व संत्र
यांच्या मार्मलेड्स तिथे छान मिळतात. मी इथे केनयात निर्माण होणाऱ्या वस्तूंचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला
आहे. आतंरराष्ट्रीय ब्रॅंडच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, बूट देखील तिथे मिळतात.
क्रमश :
छान माहिती!!!
छान माहिती!!!
वा छान वर्णन, तुमच्याबरोबर
वा छान वर्णन, तुमच्याबरोबर आम्हीपण फेरफटका मारतो.
>>कसावाचे पापड हे मी कासवाचे
>>कसावाचे पापड
हे मी कासवाचे पापड वाचलं
पुन्हा सगळं नीट वाचायला हवं पण मग वाटतं जर जायचं प्लान करायचं झालं तर एवढे डिटेल्स घेऊ बाकी केनिया म्हणजे मसाईमारा सोडून काहीच माहित नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तिंना हा लेख म्हणजे अभ्यास आहे
वाचतानाच इतकी मज्जा येत आहे,
वाचतानाच इतकी मज्जा येत आहे, सगळी दृष्यं डोळ्यासमोर येत आहेत...
वेके.. आफ्रिका आणी चीन बद्दल वाचत असलं तर कासवाचे पापड ही रियालिटी वाटते ना
फोटओ ???
फोटओ ???
वर्णन मस्तच पण फोटु पाहिजेतच
वर्णन मस्तच पण फोटु पाहिजेतच - त्याशिवाय काय मजा नाय बघा ....
केनयातील काही नद्यांच्या खोऱ्यात सोने सापडते. असे सोने अगदी चोख रुपात तिथे विकायला
असते. >>>>>> ऐकावे ते नवलच .... याबद्दल अजून जास्त वाचायला आवडेल - हे असे कसे सापडते सोने तिथे ???
मीपण फोटो मिस करतेय दिनेशदा,
मीपण फोटो मिस करतेय दिनेशदा, वरती लिहायचे राहिले.
मी पण कासवाचे पापड वाचलं
मी पण कासवाचे पापड वाचलं
मकाडामिया - म्हणजे काय?
बाकी छानच.
शशांक, निसर्गात सोने शुद्ध
शशांक,
निसर्गात सोने शुद्ध रुपातच सापडते. तिथल्या काहि नद्यांच्या गाळात ते सापडते. ऑस्ट्रेलियात पण सापडते.
माझ्या लेकीने तिथून काही कण गोळा करून आणलेत. दिवसभर चिखल चिवडत होती.
मकाडामिया नावाचे नट्स असतात. याच नावाने ओळखले जातात. मुंबईत क्वचित दिसतात दुकानात. साधारण छोट्या सुपारीच्या आकाराचे असतात. चवीला मस्तच लागतात.
फोटोच्या लेखाच्या लिन्क्स, मालिका संपल्यावर !
मस्तं. इतकी देवळे नी
मस्तं.
इतकी देवळे नी गुरुद्वारे पाहून भारतातल्याच एखाद्या शहराचे वर्णन आहे का असे वाटले.
अफ्रिकन फूड विषयी पण लिहा.
इथे फूडफूड चॅनेलवर अफ्रिकन फूडविषयी संजीव कपूरचा एक कार्यक्रम असतो त्यातले पदार्थ भारतीय पद्धतीचेच वाटतात.
खास अफ्रिकन म्हणून दाखवलेल्या भाज्या, पुलाव इ. बनवायची पद्धत भारतीयच वाटली.
साती, अवश्य.. खरं तर नेहमी
साती, अवश्य.. खरं तर नेहमी लिहितो म्हणून या विषयावर लिहायचा बेत नव्हता..