रात्रीचे दहा वाजले होते. दिवसभरातील पाहिलेल्या आणि लक्ष्यात राहिलेल्या पेशंटांचा विचार करीत नुकतीच पाठ टेकवली होती, एव्हड्यात मोबाईल वाजला. स्वतःवर थोडासा वैतागुनच मोबाईलवर दिसणारा नंबर पहिला. +१ म्हणजे अमेरिकेतून आलेला दिसल्यामुळे पटकन स्लाईड करून कानाला लावला आणि उत्तरलो, "हलो, मी डॉक्टर शिंदे बोलतोय !"
"अरे, मी सुर्यकांत शहा बोलतोय, जाड्या शहा ! ओळखलेस का?"
जाड्या शहा माझ्या बरोबरच एमबीबीएस होवून अमेरिकेत गेला व नंतर न्युरोलोजी शिकून तेथेच स्थायिक झाल्याचे मला माहीत होते.
"अरे मित्रा, तुला कसा विसरणार ! बोल, कशी आठवण केलीस ?"
"तुझी प्र्कटीस जोरात दिसतेय ! या महिन्याच्या अमेरिकन जर्नल ऑफ न्युरोरेडीऑलॉजिमध्ये तुझे आर्टिकल वाचले. व्हेरी इम्प्रेसिव्ह ! ह्या जर्नलमध्ये आर्टिकल एक्सेप्ट होणे सोपे नाही. व्हेरी क्रेडीटेबल ! कॉन्ग्रटस् ! तुझे अभिनंदन करण्यासाठी खास तुझा नंबर सर्च करून फोन केलाय."
जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यामुळे फोन नंतर बराच वेळ चालला होता. पेशंट सुनील ताकवले आणि त्यानंतरच्या घटना पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
"सर, मी सौ. मनीषा ताकवले. माझे मिस्टर खडकवासल्याला काम करतात. गेले वर्षभर ते आजारीच आहेत. वर्षापूर्वी त्यांना डाव्या अंगावरून वारे गेल्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. काही दिवसानंतर बरे होवून घरी आले, त्यानंतर सहा महिने कामावर हेखील जात होते. पण हळूहळू त्यांची तब्ब्येत बिघडत चालली आहे. सुरुवातीला त्यांना भरभर चालता येणे कमी झाले. लघवी करतांना त्रास होवू लागला. लवकर होत नसे. हळू हळू त्यांच्या वागण्यात बदल होवू लागला. असंबद्ध बोलू लागले. म्हणून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यावरून हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. पण दिवसेंदिवस त्यांची तब्ब्येत अधिकच खराब होत चालली आहे. आता तर ते माणसेही ओळखत नाहीत. अर्धवट शुद्धीवर असल्यासारखे झाले आहेत. काय करावे काहीच सुचेनासे झाले आहे. माझा पूर्ण धीरच सुटला आहे."
ताकवले बाई मोठ्या धीराच्या दिसत होत्या. हातातल्या रुमालाने डोळे पुसून व थोडेसे थांबून त्या पुढे म्हणाल्या, "तुमच्या एका पेशंटकडून माहिती मिळाल्यामुळे मी मोठ्या आशेने आपल्याकडे आले आहे."
"पण सध्या आपला पेशंट कोठे आहे ?"
"ते एका आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यांच्या पद्धतीनुसार त्यांचे उपचार चालू आहेत पण … " ताकवले बाई अंमळ थांबल्या.
"मी त्या हॉस्पिटलमध्ये येवून त्यांना तपासू शकणार नाही. तुम्हाला त्यांना रुबीमध्ये हलवावे लागेल म्हणजे मला त्यांना उपचार करता येतील."
"माझी हरकत नाही. आम्ही आजच त्यांना हलवतो. तुम्ही तसे रुबीसाठी लेटर द्याल तारे बरे होईल."
त्याच रात्री उशिरा ताकवले रुबीमध्ये दाखल झाले. दुसय्रा दिवशी सकाळी मी त्यांना तपासले. सुनील ताकवले थोडासा स्थूल बांधा असलेला आणि सुमारे चाळीशीच्या आसपास असावा, हॉस्पिटलच्या कॉटवर छताकडे नजर लावून निपचित पडला होता. मी आवाज दिला पण सुनीलचा प्रतिसाद 'शून्य' ! खांद्याला धरून हलवलं तरी काहीच उत्तर नव्हते. सुनील एका वेगळ्याच विश्वात हरवला होता.
"ते काहीच बोलत नाहीत. रात्रंदिवस असेच पडून आहेत." सौ.
पुढील दहा मिनिटे मी त्यांना तपासत होतो. सुनीलचा मेंदू कोठलाही प्रतिसाद देत नव्हता. प्रतिक्षिप्त क्रियादेखील मंदावल्या होत्या. जणू या जगाशी पूर्ण संपर्कच तुटला होता. एखाद्या ग्यासच्या चुलीचा ग्यास पुरवठा अगदी कमीतकमी करून मंद ज्योत चालू ठेवावी तसा सुनीलचा मेंदू 'स्लो' झाला होता, सेमिकोमा मध्ये गेला होता. पांवलांवर थोडीशी सूज होती आणि त्वचा रक्त कमी असल्यामुळे दिसावी तशी पांढुरकी दिसत होती. बीपी नॉर्मल होते. डायबेटीस नव्हता. ईसीजी आणि छातीचा एक्सरे देखील नॉर्मल होता.
सौ सुनील माझ्या हालचालींचे निरीक्षण करीत शेजारीच उभ्या होत्या. त्यांना जास्त घाबरवून न देता त्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना देण्याचे कठीण काम मला करायचे होते. अर्थात मला हे नेहमीचेच होते. त्यांच्याकडे वळून मी म्हणालो,
"हे पहा, यांचा मेंदू खूप कमी काम करतो आहे. पूर्वी मेंदूला जसा त्रास झाला होता तसाच त्रास पुन्हा संभवतो. आपला पेशंट सध्या अर्धवट शुद्धीत म्हणजेच सेमिकोमामध्ये आहे. आपला मेंदू जागृतअवस्थेत येण्यासाठी 'रेटीक्युलर ॲक्टिव्हेटींग सिस्टीम' जबाबदार असते. या सिस्टिमला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे असा त्रास असावा असे मला वाटते. आज त्यांच्या मेंदूचा एमआरआय स्क्यान आणि एमआर ॲन्जिओग्राफी करून घेवू म्हणजे चित्र बरेचसे स्पष्ट होईल. तो पर्यंत रक्ताचे रिपोर्टदेखील येतील. तोपर्यंत योग्य ते उपचार सुरु केले आहेत. काळजी नसावी. शिवाय माझ्यापेक्षा सिनियर व अनुभवी न्युरोफिजिशियन डॉक्टर वाडिया यांना देखील आपला पेशंट पाहण्यासाठी रिफर केले आहे. म्हणजे माझी जबाबदारी आणि तुमची काळजी आणखी कमी होईल."
"डॉक्टर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. " असे म्हणून सौ ताकवलेंनी माझ्या खांद्यांवर आणखीच ओझे टाकले. डॉक्टर म्हणजे देव नाही ही जाणीव तिला करून देण्याची ही वेळ नव्हती. मी वॉर्डच्या डॉक्टरांना उपचारांबाबत योग्य सूचना देवून पुढील पेशंट पाहण्यासाठी निघून गेलो.
अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी डॉक्टर वाडियांचा फोन आला.
"शिंदे, युवर पेशंट इज व्हेरी इन्टरेस्टिंग ! उसका एमआरआय तो औरभी इन्टरेस्टिंग ! मेटाबॉलिक एनसेफ़लोपथी जैसा दिखता है. उसके सब ब्लड रिपोर्ट्स तो नॉर्मल है, साला गॉड नोज व्हाट ही इज ह्यावींग !" टिपिकल पारशी टोनमध्ये वाडिया सर बोलत होते. "थॅन्क्स फॉर इंव्होल्व्हिंग मी इन हिज केयर ! विल फॉलो ॲन्ड कीप इन टच !"
डॉक्टर वाडिया अतिशय मितभाषी आणि एखाद्या रक्तपिपासू जळवेसारखे ज्ञानपिपासू डॉक्टर आहेत.
त्या रात्री झोपताना सुनीलचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नव्हता.
दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा सुनीलच्या खोलीत शिरण्यापूर्वी मी बाहेरील कौंटरवर बसून सर्व रिपोर्ट्सचा अभ्यास केला. रक्तामध्ये हेमोग्लोबिनचे प्रमाण मात्र कमी होते. लघवीमध्ये थोडी प्रथिने दिसत होती पण किडनीचे काम व्यवस्थित असल्याचे दाखवीत होते. एमआरआय मध्ये संपूर्ण मेंदू पांढरा दिसत होता. नेहमी दिसणारे पांढरे आणि ग्रे म्हणजे करड्या रंगांचे विभाजन पूर्ण नाहीसे झाले होते. या प्रकारचा बदल अगदी क्वचितच दिसणारा असा होता. रेडीओलोजीस्ट देखील रिपोर्ट देताना गांगरले होते. पुस्तके पाहून आणि नेटवर पाहून पुरवणी रिपोर्ट देणार होते. असे का व्हावे याचा विचार करीतच मी सुनीलच्या खोलीत शिरलो. सौ सुनील वाट पाहत उभ्याच होत्या. सुनीलच्या परिस्थितीमध्ये तीसूभरही सुधारणा नव्हती. पेशंट तपासून मी कॉटशेजारी खुर्ची ओढून चक्क बसलोच.
"हे पहा, मी आणि डॉक्टर वाडिया यांनी आपल्या पेशंटचे सर्व रिपोर्ट पहिले आहेत. खरे सांगायचे तर अजूनही आम्हाला यांना नेमका काय त्रास आहे हे समजत नाहीये.यांच्या मेंदूवर काही केमिकल्स चा परिणाम तर झाला नाही न हे पाहावे लागेल.त्यांना काही विषाणूंचा संसर्ग झाला असण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आज त्यांच्या पाठीतील पाणी काढून तपासू आणि तो नमुना राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतही पाठवू. त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही प्रदूषण तर नसेल ना याचाही तपास करावा लागेल.? मला थोडी आणखी माहिती हवी आहे. त्यांना गेल्या सहा महिन्यांत काय काय औषधे दिली आणि कोणती चालू आहेत ते जर सांगाल का ? "
सौ ताकवले यांनी लगबगीने चालू औषधे दाखविली. ती सर्वसामान्य व्हीटँमिन्स सदृशः औषधे दिसत होती.
"या व्यतिरिक्त मी काही आयुर्वेदिक आणि देशी औषधे देत होते." असे म्हणून त्यांनी एक जीर्ण कागद माझ्या हातात दिला.
गेल्या वर्षी ह्यांना पँरालीसिसचा त्रास झाल्यापासून मी वैद्यांच्या सांगण्यावरून महायोगराज गुग्गुळ च्या रोज आठ गोळ्या देत होते. या शिवाय 'सिंदूरभस्म' देखील मधातून देत होते. एव्हडे म्हणून पर्समधून एक प्लास्टिक ची डबी मला दिली. त्या डबीमध्ये स्त्रिया कपाळाला लावतात तशा रंगाची भुकटी दिसत होती.
"सर, सिंदूर म्हणजे मराठीमध्ये शेंदूर तर नव्हे !" माझ्याशेजारी उभ्या असलेल्या वॉर्ड डॉक्टर उद्गारल्या.
माझ्या डोक्यात ट्यूब पेटली, शेंदूर म्हणजे लेड ऑक्साईड - रसायन शास्त्र इयत्ता आठवी !
"ओ गॉड ! युरेका ! सुनील आठदहा महिने चक्क लेड खात होता. नो वंडर ही ह्याज लेड एनसेफ़लोपथी !" मी जवळजवळ ओरडलोच !
माझा शोध ऐकून वाडियासर देखील अवाक् झाले.
"युवर हायपोथिसिस लुक्स ॲट्रक्टिव्ह बट हाऊ टू प्रुव्ह ?" सर म्हणत होते.
लेड पॉयझनिंग सिद्ध केल्याशिवाय त्यावर उपचार तरी कसे करणार ?
दिवसभर हाच विचार माझ्या मनात घोळत होता. ही सुमारे सातआठ वर्षांपूर्वीची घटना आहे. तेंव्हा पुण्यातील कोणतीही प्रयोगशाळा रक्तातील लेड लेव्हल मोजमाप करीत नव्हते. नेटवर सर्च घेतले असता बेंगलोर येथे डॉ. टी. वेंकटेश हे नँशनल सेंटर फॉर लेड पॉयझनिंग मध्ये ही तपासणी करतात असे कळले. मी त्यांच्याशी तांतडीने संपर्क साधला आणि त्याच दिवशी सुनीलच्या रक्ताचा नमुना बेंगलोरला रवाना झाला.
दोन दिवस सुनीलचे 'रुटीन' उपचार चालूच होते पण परिस्थिती 'जैसे थे' च होती.
तो दिवस माझ्या चांगलाच लक्ष्यात आहे. माझा फोन खणखणला ,"मी बेंगलोरहून डॉक्टर वेंकटेश बोलतोय. तुमचा हा पेशंट जिवंत आहे का ?"
"हो, आहे ना. का बरे ?"
"अरे त्याची लेड लेव्हल १५४ मायक्रोग्राम आहे. नॉर्मल पाच पेक्षा कमी असते. एव्हडी लेव्हल मी प्रथमच पाहतो आहे. नेव्हर रीपोर्टेड बेफोर इन अवर लँब ! हा तोंडी रिपोर्ट आहे. लेखी रिपोर्ट पोस्टाने पाठवीत आहे. कसला पेशंट आहे हा ?"
मी त्यांना पेशंटची पार्श्वभूमी सांगितल्यानंतर ते म्हणाले, " ती दोन्ही औषधे आमच्याकडे पाठवा. आम्हाला त्याचे पृथःकरण करण्यास आवडेल. फ्री ! एक उत्सुकता म्हणून !"
"अवश्य! अवश्य पाठवू. धन्यवाद !"
"आम्हाला या पेशंटचा फोलो अप कळवा. वी आर इन्टरेस्टेड !"
आता प्रश्न होता पुढील ट्रीटमेंटचा ! या प्रकारची ही पहिलीच केस होती. लेड हे एक हेवी मेटल आहे. ते एकदा शरीरामध्ये शिरल्यानंतर शरीर त्याला बाहेर काढू शकत नाही. हा धातू मेंदू आणि हाडांमध्ये जावून चिकटून बसतो व शरीरक्रियेमध्ये बिघाड निर्माण करतो. पुस्तकांनुसार BAL नावाचे औषध वापरावे असे होते. दुसर्या महायुद्धामध्ये लेडच्या बुलेटस् शरीरात राहून विषबाधा करीत त्यासाठी उपाय म्हणून हे औषध शोधले होते. हे औषध शरीरात अडकून बसलेल्या लेड धातूला खेचून लघवीवाटे बाहेर काढू शकते. पुण्यातील एक कंपनी लेड-क्लियर या नावाने BAL इंजेक्शन तयार करत असल्याचे सौ ताकवले यांनी शोधून काढले आणि घेवूनही आल्या. रोज चार इंजक्शने असे पाच दिवस दयायचे ठरले. त्याच दिवशी पहिला डोस सुनीलच्या शरीरात गेला. दुसर्याच दिवशी सुनीलने माणसे ओळखण्यास सुरुवात केली. चार दिवसात खोलीत चालण्या इतपत प्रकृती सुधारली. एक आठवड्यानंतर पुन्हा ब्रेनचा एमआरआय केला आणि तो अपेक्षेप्रमाणे अगदी नॉर्मल आला. हातचे कांकण आरशात दिसत होते !
आजमितीला सुनीलची तब्ब्येत ठणठणीत आहे. डॉ. वेंकटेश यांनी त्या गोळ्या आणि भस्म यात भरपूर शिसे म्हणजे लेड असल्याचा रिपोर्ट देखील दिला.
---------------
ही केस आणि त्यातील एम आर आय च्या इमेजेस सुरुवातीस उल्लेख केल्याप्रमाणे अमेरिकन न्युरोरेडीऑलॉजी जर्नलमध्ये प्रसिध्द झाल्याने केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाल्यासारखे वाटले. सुनीलची ही केस माझ्या मित्रावर्गामध्ये चर्चिली गेली. आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात अशी एक समजूत असल्याने ही केस मी आमच्या फिजिशियन असोशियनच्य मासिक सभेमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरविले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या आणखी तीन फिजिशियन मित्रांनी त्यांचे अनुभव आणि केसेस दाखविण्याचे ठरवले. त्या अविस्मरणीय मिटिंगमधील इतर केसेस ची संक्षिप्त माहिती येथे देवू इच्छितो
१. डॉ. विनोद शहा, गँस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट.
पेशंट स्वतः डॉक्टर. डायबेटीसचे निदान झाले. मित्राने आयुर्वेदिक औषधाची कंपनी काढली होती. त्याच्या आग्रहामुळे त्याच्या कंपनीने काढलेले देशी औषध सुरु केले. चार महिन्यात सिव्हियर ॲनेमिया झाला. हिमोग्लोबिन १५ ऐवजी ३ झाले. पोटात दुखू लागले. अल्सरची शंका आल्याने डॉक्टर विनोद कडे आले. इंडोस्कोपिमध्ये अल्सर दिसला नाही. लेडची शंका आली. मुंबईला लेड तपासले. भरपूर सापडले. DMSA या गोळ्या औषधवाल्या मित्राने मागवून दिल्या. शेवट गोड. मित्राने कंपनी बंद केली.
२. डॉ. श्रीकांत वाघ, र्हूमँटॉलॉजिस्ट आणि एम. एससी (आयुर्वेद)
पुण्यातील एका वैद्यांची मुलगी अमेरिकेत. मुल होत नव्हते. वडिलांनी 'पुष्पधनवा' नावाच्या आयुर्वेदिक औषधाच्या गोळ्या अमेरिकेत पाठविल्या. मुलीच्या पोटात दुखू लागले. लेड पॉयझनिंग निदान झाले. गोळ्यांमध्ये भरपूर लेड सापडले. या कंपनीच्या या गोळ्यांवर त्या स्टेटमध्ये बंदी घातली गेली. गुगल करून शोधा म्हणजे ही बातमी सापडेल !
३. डॉ. उमा दिवटे , गँस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट.
पेशंटला बरेच दिवस जुलाब, अंगावर काळे डाग आणि हातापायांच्या नसांना सूज ! रक्तात सापडले 'आर्सेनिक' - हा एक आणखी जड धातू, हेवी मेटल !
देशी औषध घेत होता. ( आपल्या देशातील बंगालमधील अर्सेनिकच्या नैसर्गिक संकटाविषयी नवीन लेख भविष्यात लिहीन !)
----------
हा लेख लिहिण्यामागे आयुर्वेदीय औषधांवर टीका करावी, अपप्रचार करावा असा हेतू मुळीच नाही. आयुर्वेदाविषयी मला आदर आणि अभिमानच आहे. कृपया तसा ग्रह करून प्रतिसादही देवू नये हि विनंती आहे. काही कंपनीच्या औषधांबरोबरच्या माहितीपत्रकावर हेवी मेटल कंटेंट नसल्याचा क्रोमँटोग्राफ छापलेला मी पहिला आहे. सर्व औषध उत्पादकांना ही दृष्टी असावी हा उद्देश जरूर आहे.
शेवटी 'देह देवाचे मंदिर !' ही जाणीव प्रत्येकानं ठेवणे महत्वाचे !
सुंदर लेख. डॉक्टर प्रो. इयान
सुंदर लेख.
डॉक्टर प्रो. इयान स्टेवर्ट ( जिओलॉजिस्ट ) यांची एक क्लीप यू ट्यूबवर आहे. त्यांच्या मते रोमन राज्यकर्त्यांच्या विक्षिप्त वागणुकीला आणि नंतर रोमन साम्राज्याच्या र्हासाला शिसंच कारणीभूत आहे.
त्या काळी पाणीपुरवठा यंत्रणेतून आणि लाल द्राक्षांपासून केलेल्या एका पेयातून शिसं त्यांच्या आहारात जात होते.
उपयुक्त लेख. असे अनुभव आलेले
उपयुक्त लेख.
असे अनुभव आलेले आहेत आयुर्वेदाचा औषध वापरून. मी हि हेच म्हणेन की आयुर्वेद चुकीचे असे माझे म्हणणे नाही व प्रचार करण्याचा हेतु नाही(तसे अॅलोपॅथी वापरून होवु शकते). तसे सौम्य आयुर्वेदीक उपचार मी सर्दी, खोकल्यावर केलेत. पण एक अनुभव महागात पडलेला.
त्या आयुर्वेदीक अनुभवात आपल्याला समजत नाही अशी काय मिश्रण असतात्/पावडरी असतात. म्हणजे काय की, त्या पावडरी दाखवून नक्की त्यात काय हे आपण सांगू शकत नाही. तर अॅलोपॅथीत गोळ्यांची स्ट्रीप्स दाखवून "किमान" नावं समजू शकतात.
(पुन्हा, हा प्रतिसाद वाचून आयुर्वेद व अॅलोपॅथी वाद नकोय पण एक ग्राहक नात्याने दिलेली प्रतिक्रिया आहे)
बापरे ! भयंकर आहे हे. आणी ते
बापरे ! भयंकर आहे हे. आणी ते पुषधन्वा अजूनही बाजारात आहे आणी त्यात रस सिंदूर ( Lead Oxide) आहे हे अभिमानाने लिहिले जातेय.
बापरे, हे वाचून काटाच आला..
बापरे, हे वाचून काटाच आला.. मी माझ्या मुलीसाठी कधी कधी देसी औषधांचा वापर करते मोस्टली बालाजी तांबे आणि रामदेव बाबा पण समजणार कसं कि कशात शिसं आहे आणि कुठलं औषध घातक आहे?
बापरे, देशी औषधे डेंजरच पण
बापरे, देशी औषधे डेंजरच
पण हानिकारक औषध कसे ओळखायचे?
खुपच छान लेख डॉक्टर. माझाही
खुपच छान लेख डॉक्टर. माझाही सेम प्रश्न ...हानिकारक औषध कसे ओळखायचे?
खरंच भयंकर आहे.
खरंच भयंकर आहे.
इथे अमेरिकेत Lead paints
इथे अमेरिकेत Lead paints असलेलि खेळणि, baby cribs, रिकॉल केले गेले. भारतात खेळणि बनवताना अजुनहि lead paints वापरतात. लहान मुले खेळणि तोंडात घालतात, चाटतात, त्यामुळे सावध असावे. माझे वडिल रामदेव बाबांचि औषधे घेतात. त्यांना घटक वाचावयास सांगते. लेखाबद्दल धन्यवाद.
भयंकर आहे.... पण लेडची आणि
भयंकर आहे.... पण लेडची आणि आर्सेनिकची इतकी जास्त मात्रा औषधात असावी हे चुकीचे नाही का?
गुग्गुळाच्या प्रतिदिवशी आठ गोळ्या जरा अति वाटत नाही का?
बापरे, डॉक्टरसाहेब, डोळ्यात
बापरे, डॉक्टरसाहेब, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. ज्या औषधांमधील घटक लिहिलेले नाहीत, त्यांचं प्रमाण माहित नाही अशी औषधे घेणे टाळा. मग ती औषधे कोणी ओळखीचे सजेस्ट करू देत अथवा कोणी बाबा, बुवा.
हर्बल प्रॉडक्ट्स जे पोटात घेत नाहीत पण वरून डोक्याला, त्वचेकरता वापरतात उदा. तेल, क्रीम, जेल, पावडरी उकळून केस धुण्याकरता वापरणे वगैरे , यातूनही धोका उद्भवू शकतो का?
अतिशय उपयुक्त लेख आहे.
अतिशय उपयुक्त लेख आहे. नेहमीप्रमाणेच केस खूप छान मांडली आहे.
मिटींगमधील पहिल्या केसमधे, औषध बनविणार्या व्यक्तिनी पेशंटच्या पुढील औषधोपचाराची जबाबदारी घेऊन स्वतःची कंपनी बंद केली हे वाचून त्यांच्यातल्या माणूसकीला, सामाजिक भानाला दाद द्यावीशी वाटतेय.
Erin Brockovich या सिनेमाची आठवण झाली.
.
बापरे खूपच भयंकर.. यातून
बापरे खूपच भयंकर.. यातून वाचला तुमच्यामुळे
डॉ.साहेब - आमच्या ओळखीचे डॉ.
डॉ.साहेब - आमच्या ओळखीचे डॉ. वामन खाडिलकर (एंडोक्रायनालॉजिस्ट) यांनी सांगितलेला एक अनुभव इथे सांगू इच्छितो - त्यांच्याकडे आलेला असाच एक सिरियस पेशंट. त्यांना अशीच शंका आल्याने त्याला काही हेवी मेटल पॉयझनिंग झाले असावे असे लक्षात आल्यावर तो शोध घेतला तेव्हा - असेच काही लेड/ अर्सेनिक पॉयझनिंग झाल्याचे लक्षात आले - तो पेशंट आधी काही महिने कुठलेतरी आयुर्वेदिक "भस्म" औषध महणून घेत होता - त्यात हे लेड/ अर्सेनिक भरपूर प्रमाणात सापडले.
माझ्या अगदी जवळच्या नात्यातल्या एका व्यक्तिला आर्थ्रायटिसचे निदान झाले होते - एका वैदूकडून औषध (काही गोळ्या) घेतल्यावर एका डोसमधे त्यांना खूपच रिलिफ मिळाला - नेमका मी तिथे होतो - मला शंका आली म्हणून मी त्या गोळ्या घेऊन एका मित्राच्या लॅबमधे टेस्ट करायला पाठवल्या - त्यात हेवी स्टिरॉईड्स मिळाली - जी नक्कीच वनस्पतीजन्य नव्हती तर वरुन त्या गोळ्यात घातलेली होती ...
बापरे, डॉक्टरसाहेब, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. ज्या औषधांमधील घटक लिहिलेले नाहीत, त्यांचं प्रमाण माहित नाही अशी औषधे घेणे टाळा. मग ती औषधे कोणी ओळखीचे सजेस्ट करू देत अथवा कोणी बाबा, बुवा. >>>>>>>+१०००००.......
बाप रे!!!
बाप रे!!!
फार छान.
फार छान.
फार चांगला लेखन.लेख वाचून
फार चांगला लेखन.लेख वाचून आनंद
अतिशय उपयुक्त लेख आहे.
अतिशय उपयुक्त लेख आहे. नेहमीप्रमाणेच केस खूप छान मांडली आहे.>>+१
बापरे, खरंच डोळ्यांत अंजन
बापरे, खरंच डोळ्यांत अंजन घालणारा लेख ! मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर.
खुप माहितीपुर्ण लेख!!
खुप माहितीपुर्ण लेख!!
बापरे, डॉक्टरसाहेब, डोळ्यात
बापरे, डॉक्टरसाहेब, डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख आहे. ज्या औषधांमधील घटक लिहिलेले नाहीत, त्यांचं प्रमाण माहित नाही अशी औषधे घेणे टाळा. मग ती औषधे कोणी ओळखीचे सजेस्ट करू देत अथवा कोणी बाबा, बुवा. >>> ++
तुमच्या पोतडीत बरेच अनुभव
तुमच्या पोतडीत बरेच अनुभव असणार.........तुमच्या लेखाची मी वाट बघत असते.
हा अनुभव तर डोळे उघडणारा आहे. बाबाबुवांच्या औषधांवर डोळे झाकून विश्वास ठेवणार्यांना सद्बुद्धी मिळो !
डोळ्यांत अंजन घालणारा लेख !
डोळ्यांत अंजन घालणारा लेख ! मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर.
अरे बापरे!!! अश्याप्रकारचा
अरे बापरे!!!
अश्याप्रकारचा रुग्ण यशस्वीपणे बरा केल्यानंतर त्या विशिष्ट औषधाची तक्रार करण्याची तुम्हाला मुभा असते का? अश्यावेळी अन्न व औषध प्रशासन कश्याप्रकारे पावले उचलते?
नेहेमीप्रमाणेच छान लेख,
नेहेमीप्रमाणेच छान लेख, माहितीपूर्ण.
"अति सर्वत्र: वर्ज्ययेत" किन्वा "अति तिथे माती" या म्हणी "आयुर्वेदालाही" लागू पडतातच व आयुर्वेदास त्या मान्यही आहेत, उपचारकर्त्याकडूनच विसरले गेले तर वरील सारखा गोन्धळ होऊ शकतो.
झोप यावी म्हणून घेतल्या जाणार्या अॅलोप्याथीच्या गोळ्या जास्त्/अति प्रमाणात घेतल्या गेल्यास जितक्या घातक होऊ शकतील, तितक्याच प्रकारे कॉफी/दुधात घालुन घेतले जाणारे नेहेमीच्या वापरातले साधे जायफळ देखिल मात्रा अधिक झाल्यास घातक ठरेल. तेव्हा हा नक्कीच अॅलोप्याथी वा अन्य उपचार पद्धतीमधिल योग्य अयोग्याचा संबंध नसून, कोणतीही औषधयोजना अतिशय काळजीपूर्वकच करावी लागते हा धडा आहे.
त्याचबरोबर, स्वतःच स्वतःच्या अर्धवट माहितीवर आधारीत किन्वा पूर्वी डॉक्टरनी लिहून दिली होती तर तीच पुढे चालू ठेवणे (म्हणजे डॉक्टरची तपासणीची फी वाचते....) अशाप्रकारे औषधे घेणेही टाळले पाहिजे. मी तर म्हणतो की तुमच्या जीवश्च कंठश्च मित्रान्मधे किमान एक तरी डॉक्टर मित्र असावा. माझ्या मित्रमंडळींमधे आहे. अन त्यास गेली २८ वर्षे "फ्यामिली डॉक्टरचा" दर्जा आहे. त्या आधीचे डॉक्टर वडिलांचेपासूनचे होते.
(पण हल्ली काये ना? की लिमलेटच्या गोळ्या चघळून खाल्याप्रमाणे लोक अॅसिडीटी वगैरे वर निरनिराळ्या गोळ्ञा सतत चघळत अस्तात, अन्गदुखी/ पाठदुखी/दातदुखीवर स्वतःच्या अक्कलेप्रमाणे इतकी निरनिराली पेनकीलर्स इतकी सातत्याने पोटात ढकलत असतात की ते बघुनच छातीत धडकी बसते, वरील लेख वाचून किमान याबद्दल जरी जागृती झाली तरी बरे असे वाटते. )
खुपच छान लेख डॉक्टर.
खुपच छान लेख डॉक्टर. ..............
चर्चा थोडी भरकटतेय असे
चर्चा थोडी भरकटतेय असे वाटते.
प्रथितयश आयुर्वेदिक फार्मसी आपल्या औषधांवर कंटेंट छापतातच.
"ज्या औषधांमधील घटक लिहिलेले नाहीत, त्यांचं प्रमाण माहित नाही अशी औषधे घेणे टाळा. मग ती औषधे कोणी ओळखीचे सजेस्ट करू देत अथवा कोणी बाबा, बुवा."
हे मात्र खरे.
रामदेवबाबांची औषधे त्यामानाने सुरक्षित वाटतात. आतापर्यंत रामदेवबाबांची औषधे घेउन इजा झालेली एकही केस पाहण्यात नाही.
डॉक्टर, नेहमीप्रमाणेच सुंदर
डॉक्टर, नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. कुठलीही औषधे प्रिस्क्राईब करताना डॉक्टर्सनी आणि औषधं तयार करताना फार्मा कंपन्यांनी..आपण पेशंटच्या जिवाशी खेळत तर नाही ना? हा विचार केलाच पाहिजे.
धन्यवाद डॉक्टर. अतिशय उत्तम
धन्यवाद डॉक्टर. अतिशय उत्तम माहिती.
सध्या आयुर्वेदिक औषधांमध्ये भेसळ आढळून येते, तेव्हा आयुर्वेदिक औषधे घेतांना काळजी घेणे आवश्यक आहे.
मस्त लेख. कुठलीही औषधे
मस्त लेख.
कुठलीही औषधे प्रिस्क्राईब करताना डॉक्टर्सनी आणि औषधं तयार करताना फार्मा कंपन्यांनी..आपण पेशंटच्या जिवाशी खेळत तर नाही ना? हा विचार केलाच पाहिजे.> +१
पुन्हा एकदा महत्वपूर्ण
पुन्हा एकदा महत्वपूर्ण लेख.
डॉक्टर, याच्याशी संबंधित एक शंका आहे. मसुरडाळीला जो केशरी/अबोली रंग असतो, तो शिशामुळे येतो असे ऐकण्यात आले. याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? मी स्वयंपाकात मसुरडाळीचा ब-यापैकी वापर करते, लेख वाचून चिंतेत पडले.
Pages