मराठी उच्च शिक्षण समिती - "मुशिस"

Submitted by नरेंद्र गोळे on 4 October, 2011 - 08:43

पार्श्वभूमी

देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे ६४ वर्षे झाली, तरीही महाराष्ट्रात मराठीमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. ते तसे उपलब्ध असावे असे मला प्रकर्षाने वाटते आहे. इतरही अनेकांना वाटत असेल. मात्र आज कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. मी आता पुढाकार घ्यायचा असे ठरवले आहे.

चीन, जपान व कित्येक युरोपिअन देशांत सर्व प्रकारचे उच्च शिक्षण त्यांच्या त्यांच्या भाषांतून उपलब्ध आहे. त्या अनेक देशांच्या त्या त्या भाषा बोलणार्‍या लोकांहूनही मराठी बोलणार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर इतकी वर्षे उलटूनही आपले उच्च शिक्षण इंग्रजीच्या दावणीलाच बांधलेले आहे.

ज्या देशांत त्यांच्या स्वभाषेत उच्च शिक्षण उपलब्ध असते, त्यांच्या भाषेचा त्यामुळे विकास होत राहतो. ते लोक इंग्रजी न शिकताही आपापला विकास करून घेऊ शकतात. त्यामुळे इंग्रजी शिक्षणात जे मनुष्यबळ आपण वाया घालवतो आहोत, ते त्यांच्या देशात त्यांच्याच विकासाकरता उपयोगात येते. त्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. तिथे, इतर देशांशी ज्यांची गाठ पडते अशा १०-१५% टक्के लोकांखेरीज जनसामान्यांना अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागत नाही. आपल्याला अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागायची कारण इंग्रजांचे आपल्यावर राज्य होते. आता ते राहिलेले नाही. तरीही आपली मनोवृत्ती गुलामगिरीस इतकी धार्जिणी झालेली आहे की, आपल्या भाषेचा, विभागाचा विकास हे मुख्य ध्येय राहिले नसून, इंग्रजी भाषा प्रथम अनिवार्यपणे शिकून घेऊन मग विश्वाच्या प्रांगणात उच्च शिक्षणाचा शोध आपण घेऊ लागतो. मातृभाषेत ते उपलब्ध नाही याची आपल्याला ना खंत असत, ना खेद.

शालांत परीक्षेपर्यंत अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागत असल्याने काय बिघडते? शिकावी की आणखी एक भाषा, आपल्यालाच उपयोगी पडेल. असे लोक बोलतात. हो. शिकावी. पण परकी भाषा अनिवार्यपणे का शिकावी? तिला शेकडो इतर पर्याय का उपलब्ध नसावेत. निदान आपल्याच भारतातल्या १४ मान्यताप्राप्त भाषा, इंग्रजीला पर्यायी का नसाव्यात? ह्याचा विचार होण्याची गरज आहे. इंग्रजी हवी त्यास ती शिकण्याचा पर्याय अवश्य असावा, मात्र हल्लीप्रमाणे ती अनिवार्य नसावी हे निश्चित.

कारणे अनेक आहेत. दहावी, बारावीचा उत्तीर्णता-दर आपण दरसालच्या परीक्षांत पाहतो. तो सुमारे ५०% च्या आसपास असतो. त्यातील बव्हंशी विद्यार्थी इंग्रजीत नापास होतात. त्यातील कित्येकांना पुढे शिक्षणच घेता येत नाही. तदनंतर उर्वरित आयुष्यात इंग्रजीचा वापर करणेही त्यांना अनिवार्य नसते. किंबहुना तिचा त्यांना फारसा उपयोग तर होत नाहीच, मात्र तिचा दुस्वास मात्र वाटू लागलेला असतो. प्रगत “इंडिया” आणि “नापास” भारतातील ही तफावत आपण हकनाकच वाढवत आहोत. हे शैक्षणिक धोरण मुळातच चुकीचे आहे. इंग्रजी शिक्षण उपलध असावे. मात्र ते अनिवार्य नसावे.

मराठीत उच्च शिक्षण का उपलब्ध नाही?

मुंबई विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांकरता नियुक्त केलेल्या पुस्तकांवर आणि त्यांच्या लेखकांवर नजर टाकली तरीही एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ती ही की त्यातील बव्हंशी लेखक मराठी आहेत. ते इंग्रजीत पुस्तके लिहीतात. इंग्रजीतून आपल्याच विद्यापीठांतून ती शिकवतात. मराठीच विद्यार्थी ती इंग्रजीतून शिकतात. आणि माझे काही मित्र, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध नाही म्हणून, आपापल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालतात. म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध नाही म्हणून पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालायचे, आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्याने इंग्रजी उच्च शिक्षणालाच काय ते विद्यार्थी मिळायचे. मराठीतून उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले तरीही ते कुणी खरोखरच घेईल काय? अशी परिस्थिती! त्यामुळे इथे अंडे आधी की कोंबडी आधी असा प्रकारच दिसून येतो.

मात्र राष्ट्रीय योजना आयोगाने ह्याचा विचार करायला हवा आहे की, आपण आपल्या उपलब्ध मनुष्यबळापैकी किती टक्के मनुष्यबळ, अनिवार्य इंग्रजीच्या उपासनेत वाया घालवतच राहणार आहोत. आपल्याच मायबोलीत उच्च शिक्षण मिळू लागेल, तर हे मनुष्यबळ कायमस्वरूपी मुक्त होईल. इंग्रजीत नापासाचा शिक्का बसून आयुष्यभराकरता नाउमेद होण्याची पाळी, आपल्या लोकसंख्येतील एका मोठ्या हिश्श्यावर येणार नाही. पण आजवर कुठल्याही योजना आयोगाने इतका मूलभूत विचार केलेला दिसत नाही. मराठीत उच्च शिक्षण का उपलब्ध नाही? ह्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

दुसरे एक कारण आहे, ते म्हणजे पुस्तकच नाहीत हो मराठीत. ती इंग्रजीतून अनुवादित करायला हवी आहेत. आता उच्च शिक्षण नाही म्हणून पुस्तके नाहीत की पुस्तके नाहीत म्हणून उच्च शिक्षण नाही, हा एक तसलाच न सुटणारा प्रश्न आहे. मुळात स्वतःच्या, स्वभाषेच्या, देशाच्या विकासाशी आपण प्रामाणिकच नाही. हे खरे आहे.

काय करायला हवे आहे?

मराठी विचारवंतांनी आपल्या मायबोलीच्या लेकरांच्या विकासाकरता, मायबोलीच्या विकासाकरता, हे एकदा आणि नेहमीकरता नक्की करण्याची गरज आहे की मायबोलीतून उच्च शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. आधुनिक शास्त्र हे मान्यच करते की असे झाल्यास व्यक्तींचा विकास झपाट्याने होईल. मात्र हे साधावे कसे?

याकरता एक “मराठी उच्च शिक्षण समिती-मुशिस” असावी. तिने पाच-दहा वर्षांच्या सुनिश्चित कालावधित महाराष्ट्रात, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध होईल अशाप्रकारचे नियोजन, कार्यान्वयन करावे आणि शिक्षणसंस्थांनी, शिक्षणमहर्षींनी, राज्यकर्त्यांनी त्यात आपापल्या अधिकारास, क्षमतेस साजेशी भूमिका प्रामाणिकपणे निभावावी. तरच हे साध्य होण्यासारखे आहे.

संकल्पना अशी आहे की जे प्राध्यापक स्वतःच लिहिलेली विज्ञान व तंत्रज्ञानाची इंग्रजी पुस्तके, इंग्रजीतून विद्यार्थ्यांस शिकवत आहेत, त्यांनीच त्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद करावेत. त्यांनीच ते मराठीतून शिकवावेत. त्याकरता इंग्रजीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांनी पुढे यावे आणि जे इंग्रजीने दिले नाही ते मायबोलीकडून हक्काने मागून घ्यावे.

मी काय करू शकतो?

७ डिसेंबर २००४ रोजी माझी अँजिओप्लास्टी झाली. लोकं “गेट वेल सून” म्हणायला येत. कसे? ते मात्र मला माहीत नव्हते. ते शोधून काढण्याच्या प्रयत्नात “डॉ. डीन ऑर्निशस प्रोग्रॉम फॉर रिव्हंर्सिंग हार्ट डीसीज”, डॉ. डीन ऑर्निश, पृष्ठसंख्या: ६७१, बॅलंटाईन बुक्स, १९९०, हे पुस्तक माझ्या वाचनात आले. मी ह्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो. स्वतःस ते शब्द-न्‌-शब्द समजावे म्हणून मी त्याचा मराठीत अनुवाद केला. त्या पुस्तकातील सल्ल्याबरहुकूम जीवनशैली परिवर्तने घडवत घडवत मी माझ्या हृदयविकाराची माघार घडवली. आज किमान औषधे घेऊनही माझा रक्तचाप १००/७० मिलीमीटर पारा, असा राहत आहे. मग ह्याच संबंधात मी “बायपासिंग बायपास सर्जरी”, डॉ.प्रतीक्षा रीग डेब, एम.बी.बी.स., एम.डी.(मुंबई) व डॉ.एल्मर म.क्रँटन, एम.डी.(अमेरिका), पृष्ठसंख्या:२६७, प्रतिबंधक हृदयोपचार संस्था प्रतिष्ठान, २००७ ह्या पुस्तकाचाही मराठीत अनुवाद केला. त्यानंतर मला वैज्ञानिक पुस्तकांचा मराठीत अनुवाद करण्याचा छंदच लागला. रुची आणि गतीही प्राप्त झाली. त्यानंतरही मी आणखी तीन पुस्तकांचा मराठीत अनुवाद केलेला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानातील किमान ५० पुस्तकांचा मराठी अनुवाद उपलब्ध झाल्याखेरीज कुठलाही अर्थपूर्ण, उच्च शिक्षण अभ्यासक्रम सुरू होऊच शकत नाही. ह्यासंदर्भात अशाप्रकारचे अनुवाद करणे मला वरील पार्श्वभूमीमुळे शक्य झालेले आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मी ह्यात जे काय करू शकतो, ते करायचे असा निर्णय घेतला आहे.

मी स्वतः अनुवाद करू शकतो, इतरांना मदत करू शकतो, “मुशिस” च्या कार्यात मोलाचा वाटा उचलू शकतो. इतर कोण कोण, काय काय करू शकतात हे त्यांच्याजवळ ही संकल्पना मांडून समजून घेऊ शकतो आणि एकूणच ह्या संकल्पास सशक्त आधार देऊ शकतो. तो देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. मान्यवर, तुमचा काय विचार आहे. तुम्हालाही असेच वाटते का? तुम्ही ह्याकरता काय करू शकता?

संकल्पनाः नरेंद्र गोळे २०१११००४

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नरेंद्रजी हार्दिक अभिनंदन, अगदी काळजालाच हात घातलात.

तुमची तळमळ अगदी रास्त आहेच, पण दुर्दैव असे आहे की तुम्ही ५० च काय अगदी शेकडो पुस्तके जरी मराठीत अनुवादीत केली तरी देखील तुम्हाला जे वाटते ते घडणे सर्वस्वी अशक्य आहे. लोक आता इंग्रजीची शेपटी कदापि सोडणार नाहीत असेच चित्र दिसत आहे.

इंग्रज जिंकले, कायमचे जिंकले असे खेदाने म्हणावेसे वाटते. प्रश्न फक्त भाषेचा नाही, जाता जाता देशी भाषांबरोबर इथले विचार, संस्कृती सर्व काही मरेल याची काळजी घेऊनच गेले. Sad

पुस्तकांबरोबरच इंटरनेटवर जास्तीत जास्त देशी भाषांमधे लिहिले गेले पाहिजे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे तर काही होण्याची शक्यता आहे.
विकिपिडिया सारख्या स्थळांवर मराठीत फार कमी माहिती आहे. तिकडे जास्तीत जास्त लिहिले गेले पाहिजे.

संदिप, विजय आणि महेश; प्रतिसादांखातर मनःपूर्वक धन्यवाद!

विजय,
मराठीतुन उच्च शिक्षण - अजिबात नको.>>> का बरे?

महेश,
इंग्रज जिंकले, कायमचे जिंकले असे खेदाने म्हणावेसे वाटते. प्रश्न फक्त भाषेचा नाही, जाता जाता देशी भाषांबरोबर इथले विचार, संस्कृती सर्व काही मरेल याची काळजी घेऊनच गेले.>>>>>
दुर्दैवाने हे खरे आहे!
आपलेच लोक आपल्याच संस्कृतीच्या विनाशाची वाट चालत असावेत आणि
त्यांना ते कळतही नसावे, ह्यापरता दु:ख ते कोणते?

आपले विचार नक्कीच उच्च आहेत आणि आपण केलेली कृती सुध्दा.... तरी तंत्रज्ञानाचे मराठी भाषांतर करताना फार क्लिष्टता येते. उदा. शाळे मध्ये इयत्ता दहावी मध्ये आम्हाला "Vacuum tube" ला मराठी भाषांतर "विद्युन्मोचनलीका" असे काहिसे होते. जे परिक्षेला लिहीताना माझा हात थरथरला होता !

विशुभाऊ,
प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद.

तरी तंत्रज्ञानाचे मराठी भाषांतर करताना फार क्लिष्टता येते.>>>
म्हणजे क्लिष्टता येऊ नये असे तुम्हाला म्हणायचे आहे. ह्याबाबत दुमत नसावे.

"Vacuum tube" = निर्वात नलिका

नाही, vacuum Tube = व्हॅक्युम ट्युब असं का करु नये?
नरेंद्र {माफ करा, पण जी वगैरे लावणे जमत नाही}, मी कोरियात जवळजवळ ५.५ वर्षे काढली. इथल्या शिक्षणपद्धतीचं आणि सोबत जपान वगैरेचं खुप कौतुक केलं जातं, पण गंमत म्हणजे या लोकांना साधं रेफ्रीजरेटर, वॉशिंग मशिन हे शब्द माहितीच नाही, त्याला ते नेंजांगो आणि सेथाक्की म्हणतात आणि हे मी पीएचडीला असणार्‍या लोकांबद्दल म्हणतोय. इंग्रजी बोलणे खुप दुरचे.

१० वर्षांपुर्वी कोरियन सरकारने प्रत्येक कोरियन शाळेत {इथे ९९% शाळा सरकारी आहेत} इंग्रजी भाषा आणि संभाषण शिकवण्यासाठी केवळ नेटीव्ह स्पीकर्सची नेमणुक केली. अंदाजे २००० ते ३००० डॉलर्स प्रतिमाह वेतनावर. तेंव्हा कुठे इथले कोरियन मुलं इंग्रजी वाचु,लिहु शकतात आणि बोलू शकतात. त्यांना आता कळतय की जागतिक स्पर्धेत, तुम्ही अगदी देश सोडणार नसाल तरीही, इंग्रजी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे.

दुसरं म्हणजे प्रतिशब्द स्वीकारणे. जर संस्कृत मधुन शब्द घेता येतात तर इंग्रजीतुन का नाही. उगाच न कळणार्‍या संस्कृत मधुन शब्द कशाला घ्यायचे. सरळ ट्रांझिस्टर, कॅपॅसिटर किंवा हार्ट अटॅक वगैरे का म्हणु नये. जेणेकरुन पुढे जाऊन तो विद्यार्थी जर इंग्रजी पुस्तक वाचेल तर त्याला नेमकं काय लिहिलय ते तरी कळेल. उदा. व्यवस्थापन -(मॅनेजमेंट) मराठीतही शिकवता येईल, पण त्यातले तांत्रिक शब्द मात्र इंग्रजीच ठेवावे, जेणेकरुन हेच ज्ञान जगातल्या दुसर्‍या एखाद्या व्यक्तीशी शेअर करायचे असेल, तर ते सोपे जाईल, ज्यात फक्त भाषा बदलेल, तांत्रिक शब्द तेच राहतील.

पुस्तकांचे भाषांतर उत्तम कल्पना आहे, पण त्याहीपेक्षा, त्यांना या विषयांवर 'समजेल' अशी पुस्तके बनवणे हे मोठे आव्हान आहे.

त्याहीपलिकडे जाऊन मी हे म्हणेन, की अजुनही आपण भाषा आणि माध्यम यांची गल्लत करतोय. शिक्षण अश्या भाषेतुन हवं, जी विद्यार्थ्याला सहज समजेल, मग त्यात पारिभाषिक शब्द धेडगुजरी का असेना. मग ते पुस्तक मराठीत आहे की इंग्रजीत, याचा विचारही मनात येऊ नये. एकदा मराठी माध्यमातील विज्ञानाचं पुस्तक बघा. इतके कठीण शब्द वापरले आहेत की काय करावं सुचत नाही. ते शब्द ज्यांनी संस्कृत भाषा हा एक विषय घेतला आहे, त्यांच्याकरीता योग्य आहे, पण आज किती लोकं संस्कृत शिकतात आणि किती लोकांना (विद्यार्थ्यांना) शब्दाची फोड करता येते? त्यामुळे जरी माध्यम मराठी असेल (किंवा इतर कोणतही) तरी सर्व भाषेत चालतील असेच तांत्रिक शब्द स्वीकारावे.

आणि यावरुन एक किस्सा आठवला. नागपुरात एक गणिताचे इटालिअन प्रोफेसर आले होते. त्यांनी एक लेक्चर दिलं ते चक्क ८०% इटालिअन भाषेत, पण त्यांनी तांत्रिक शब्द तेव्हढे इंग्रजी वापरले, अन आम्हाला ते जवळजवळ पुर्ण समजलं. Wink

Back to top