कविते...
तुझ्या अनावृत्त शरीरावरुन
माझ्या भावनांची बोटं फ़िरवताना
स्पंदनांची सारी आवर्तने
मी स्पर्शाने जेव्हा जेव्हा मोजतो
तेव्हा तेव्हा मला त्या मिलनानुभवातुन
तुझ्यावरचं माझं प्रेम व्यक्त करायचं असतं....
डोळे मिटून कल्पनांच्या मोरपिसाने
असंख्य लहरी तुझ्या रोमारोमात भरुन टाकताना
तू अंगाभोवती मारलेल्या गच्च मिठीत
मी पुर्णत्वाच्या शिखराकडे जातो....
तुझ्या अतंरगांची खोली मोजून
शब्दांनी निथळणारा माझा प्रत्येक श्वास
तुझ्या धपापणार्या हृदयावर कोसळतो
तेव्हा पहाट आता संपायला आलीय
हे मी लगेच ओळखतो....
तुझ्या उदरात नव्या कवितेचे बीज पेरून
मी कागदावरती निढाल होतो
तेव्हा हळूच कूस बदलून
आभाळासारखी अथांग तुझी पाठ
माझ्याकडे वळवतेस
आणि मी बघत राहतो
तुझ्या पाठमोर्या सौंदर्याकडे
उद्याच्या नवीन अविष्कारासाठी...
-- संतोष वाटपाडे (नाशिक)
माझा आवाज ऐकण्यासाठी खालील धाग्यावर टिचकी मारा...
व्वाह....
व्वाह....
व्वा!
व्वा!