सकाळी नेहमीपेक्षा वीसेक मिनिटे उशीराच घराबाहेर पडलो. ऑफिसला जायचे नसून ऑफिसच्याच कामासाठी इतरत्र जायचे होते. पुढची ट्रेन पकडायला हरकत नव्हती म्हणून बिछान्यातच पंधरा-वीस मिनिटे जास्तीचा मुक्काम ठोकला. तयारी मात्र नेहमीच्याच वेगाने झरझर आटोपून, मोबाईलमध्ये ट्रेनचा टाईम आणि आता झालेली वेळ, दोन्ही चेक करून रमतगमत चाललो तरी वेळेच्या आधी स्टेशनवर पोहोचेन अश्या हिशोबाने निघालो. पावले मात्र सवयीनेच झपझप पडू लागली, नव्हे किंचित जास्तच उत्साहाने. याचे एक कारण म्हणजे नेहमीच्याच त्याच त्या रूटीनमधल्या ऑफिसला जायचे नव्हते, आणि दुसरे म्हणजे पंधरा मिनिटांची एक्स्ट्रा झोप घेता आली या समाधानानेच एक छानशी तरतरी आली होती. भमरसिंग मिठाईवाल्याच्या गरमागरम समोश्यांचा वास छान पैकी नाकात भरून घेत, पुढील टपरीवरून सुटणार्या चहाच्या वाफा अंगावर झेलत पुढे पास झालो इतक्यात मागून सहजच एक आवाज आला, "अरे आपल्याइथे कुरीअरवाला कुठेय माहीतीये का रे?"
आपल्याच नादात रस्त्याने जात असताना अचानक समोरून कोण्या अनोळखी माणसाने पत्ता विचारला की माझा नेहमीच गोंधळ उडतो. मला शाळाकॉलेजमध्ये तोंडी परीक्षांची कधी भिती वाटली नव्हती एवढी या चौकश्यांची वाटते. त्या शाळेतल्या तोंडी परीक्षेला निदान मी घरून अभ्यास तरी करून गेलेलो असायचो, पण इथे मात्र कोणीतरी अचानक आऊट ऑफ सिलॅबस प्रश्न विचारला आहे असे वाटते. तसे पाहता त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे, किंबहुना ते आलेच पाहिजे अशी काही गरज नसते, तरीही "माहीत नाही" किंवा समोरून प्रश्न इंग्रजीत आला असेल तर "आय हॅव नो आयडीया" म्हणतानाही एक अपराधीपणाची भावना उगाचच माझ्या मनात दाटून येते. एवढेच नाही तर ती मला चेहर्यावर केविलवाणे भाव आणून मुद्राभिनयाद्वारे दाखवावीशीही वाटते. अश्यावेळी जेव्हा मी माझ्या एरीयात नसतो तेव्हा पटकन, "अॅक्च्युअली, मै यहा का नही हू" असे बोलून वेळ मारून नेतो. पण आपल्याच विभागात ते देखील करता येत नाही. आज मी माझ्या घरापासून पाचच मिनिटांवर असताना हा प्रश्न बेसावधपणे मागून आला होता. सुदैव एवढेच की बायको बरोबर नव्हती. अन्यथा समोरच्याने प्रश्न विचारताच तिने आम्हा दोघांकडे अश्या काही नजरेने बघितले असते की याने पण कोणत्या गाढवाला विचारलेय. आणि मग ती नजर बघून माझी आणखी धांदल उडाली असती.
असो...
कुरीअरवाला नक्की कुठे आहे आपल्या इथे याचा विचार मी ‘अं अं’ करत चालतच करू लागलो आणि प्रश्नकर्ता देखील माझ्या जोडीनेच चालू लागला. ईतक्या वेळात मी त्याला थोडेसे निरखून घेतले. वयाने माझ्यापेक्षा लहान आणि पोरसवदाच दिसत होता. माझ्याप्रमाणेच दोन्ही खांद्यावर सॅक टाकून तो देखील नोकरीधंद्यासाठी म्हणून स्टेशनच्या दिशेनेच जात होता. साधासाच पेहराव, चालणे बोलणे अन वागण्यातही पहिल्या नजरेत साधेपणाच भरला. त्याने मला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मला पुर्ण वेळ देऊन, माझ्या चालण्याच्या वेगाशी आपला वेग जुळवून चालू लागला. काही लोकांना हे सहज कसे जमते याचे मला नेहमीच कौतुक वाटते. माझे बोलायचे झाल्यास, एखाद्या अनोळखी माणसाकडे चौकशी करायची असल्यास, मी आधी शब्दांची मनातल्या मनात जुळवाजुळव करून त्याची मनातल्या मनातच एक रंगीत तालीम करतो. त्यानंतर प्रश्न सोडवायला कोणती व्यक्ती पकडावी हे शोधायला घेतो. प्रश्न विचारायच्या आधीच त्याचे उत्तर याला माहीत तर असेल ना, माहित असल्यास नम्रपणे देईल का, माहीत नसल्यास उगाचच चिडचीड करत कुठून येतात हि असली लोकं अश्या नजरेने आपल्याकडे बघणार तर नाही ना, एखादी मॉडर्न पेहरावातली व्यक्ती दिसली की तिला ईंग्लिशमध्येच प्रश्न विचारावा लागेल का, असे एक ना सत्तर, सतराशेसाठ फाटे फोडतो. त्याहूनही मग एखाद्याला हेरून जेव्हा फायनल करतो तेव्हा त्याला दादा, मामा, काका, भाईसाब, एs बॉssस नक्की काय हाक मारायची याचा परत मनातल्या मनात गोंधळ, अन या गोंधळात मगाशी रटलेले चौकशीचे वाक्य एव्हाना बोंबललेले असते की झालीच म्हणून समजा आयत्या वेळेला ततपप..
असो...
साधीशीच चौकशी हा बरोबरचा साधासुधा मुलगा अगदी सहजपणे करून गेला. त्याने मला ना दादा म्हटले ना मित्रा म्हटले. एक्सक्यूजमी तर दूरच राहिले. तसेच आता माझ्या बरोबर देखील असा चालत होता की जणू फार आधीपासूनचीच ओळख आमची. आता याला "माहीत नाही रे" असे तोडके मोडके उत्तर देऊन कटवता येणार नाही हे लक्षात आल्यावर मी उगाचच, आपल्याकडे कुरीअरवाला एक इथे, एक तिथे, पण तो आता तिथे असतो की नाही माहीत नाही रे, असे काहीतरी असंबद्ध पुटपुटायला लागलो. मी थोडासा बावचलोय हे त्याला समजले की काय कोणास ठाऊक पण त्याने स्वताच पुढे बोलायला सुरुवात केली, "ब्ल्यूडार्ट आणि डिएचएल दोघेही नाही बोलले रे, आणखी कोणी माहीत आहे का?"
घ्या...
उत्तर द्यायला उशीर केल्याने त्याने स्वताच नेमकी अशी नावे घेतली की मी उडालेल्या धांदलीतून सावरून सावचितपणे आठवायला घेतले असते तर कदाचित हिच दोन नावे पहिला आठवली असती. आता तिसरे कुठून आठवू.. पण इतक्यात मला पळवाट म्हणून एक छानसे उत्तर सुचले, "नाही रे, खरे म्हणजे मला कुरीअर करायचे झाल्यास ऑफिसमधूनच करतो ना, त्यामुळे काही कल्पना नाही इथली."
"ऑफिसवाले कोणती कुरीयर सर्विस वापरतात?" त्याचा पुढचा प्रश्न.
‘अरे देवा असेही असते का?’ मी मनातल्या मनात.
पण लगेच सावरून म्हणालो, "ते बदलत राहतात रे, आणि माझे ऑफिस बेलापूरला आहे.."
"पण तुला ब्ल्यूडार्ट आणि डिएचएलवाले का नाही म्हणाले?" माझा हा प्रश्न विषय बदलायला होता की त्यात अजून अडकायला हे विचारताना मलाच समजत नव्हते.
"कॅमेरा पाठवायचा होता बहिणीला. ती बेंगलोरला असते. डिएचएलवाले नाही म्हणाले, आणि मगाशी ब्ल्यूडार्टवाल्यांचा देखील फोन आला, परत पाठवतोय म्हणून."
"ओह्ह, कॅमेरा तुटायफुटायची भिती वाटत असेल. दिवाळी फराळाच्या लाडू चकल्या कुस्करल्याचे बरेच जणांने अनुभव ऐकलेत" मी माझ्या जेमतेम ज्ञानाच्या भरवश्यावर तारे तोडले.
"तसे नाही रे, चांगली पॅकींग केली आहे, दहा हजारांचा कॅमेरा आहे. बहिणीला तिच्या लग्नाच्या पहिल्या अॅनिवर्सरीला भेट द्यायची आहे. आम्ही तिघा भावांनी मिळून घेतलाय. ताईने बरेच केलेय रे आमच्यासाठी. आता आमचे पण कर्तव्य बनते ना. तिला कॅमेर्याची आवड आहे म्हणून देतोय, पण हे कुरीअरवाले उगाच वेळ काढत आहेत...."
"हम्म.." गडी बोलताना थोडासा भावूक झाल्याने मला पुढे काही बोलायचे सुचले नाही. दहा हजारांचा कॅमेरा तिघांमध्ये मिळून म्हणजे काही फार मोठे गिफ्ट वाटत नसले तरी त्याच्या हातातला दिड-दोन हजारांचा मोबाईल पाहता त्याच्यासाठी त्या कॅमेर्याची पैश्यातली किंमत तितकीही कमी नसावी.
"ऑनलाईन शॉपिंगने घेतला असतास तर तिथलाच अॅड्रेस देता आला असता, त्यात काही फसायला होत नाही, कॅमेर्यांचे तर ठरलेलेच मॉडेल असतात ना.." मी स्वता फारसा ऑनलाईन शॉपिंगचा चाहता नसलो तरी दुसर्याला सल्ले द्यायला आपले काय जाते.
"बरोबर आहे रे तुझे, पण स्वताहून घेऊन देण्यात एक मजा असते ना.."
ह्म्म.. गडी पुन्हा भावूक झाला आणि मी देखील तो मुद्दा तिथेच सोडला. पण त्याच्या या भावनात्मक उत्तराने माझे समाधान झाले नाही हे माझ्या चेहर्यावर दिसले की काय कोणास ठाऊक, पुढे तो स्वताहूनच त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी, त्याच्या भावांसाठी, त्यांचे शिक्षण आणि नोकरीसाठी काय काय केले हे सांगू लागला. मी स्वता चाळीत वाढल्याने सर्व प्रकारची आणि सर्व परिस्थितीतील माणसे पाहिली आहेत. याची कथा काहीशी अशी होती, डोक्यावरचा वडिलांचा आधार कोवळ्या वयातच गेला, तर त्यांची जागा मोठ्या भावंडाने पर्यायाने इथे त्याच्या बहिणीने घेतली. नोकरीव्यतिरीक्त ट्यूशन घेऊन घरखर्चाचा भार उचलला. आता तिच्या लग्नाचा हा पहिलाच वाढदिवस म्हणजे या सर्वांची घडी बसवूनच तिने स्वताचा विचार केला असावा. काही त्याने सांगितले काही अंदाज मी बांधले. इतर काही खरे असो वा खोटे, पण झालेले संस्कार तरी नक्कीच दिसत होते. आपल्या बहिणीने आपल्यासाठी खस्ता खाल्याचे कौतुक एखाद्या अनोळखी माणसाला कौतुकाने सांगणे हि माझ्यामते तरी फार कौतुकास्पद बाब आहे. सार्याच गोष्टींची परतफेड करता येत नाही, पण जाण ठेवणे जमल्यास कर्तव्य आपसूक निभावले जाते. छे, मलाही भावूक केले गड्याने..
इतक्यात त्याला कोणाचातरी फोन आला, बहुतेक एखाद्या भावाचाच असावा. अजून एका कुरीअरवाल्यांनी कॅमेरा पाठवायला नकार दिला या विषयावरच त्यांचे बोलणे चालू झाले. बोलताना त्याचा चेहरा असा चिंतातूर झाला होता जसे ऐन परीक्षेच्या दिवशी एखाद्याला हॉल तिकीट सापडू नये. त्या भावाच्या बोलण्यावरूनच तो जवळच्या एका पानटपरीवर चौकशी करायला शिरला तसे मला माझ्या ट्रेनचा टाईम होत आल्याची आठवण झाली. थांबणे शक्य नव्हते, कारण हि ट्रेन चुकवणे मला परवडणारे नव्हते, माझीही कुठेतरी वाट बघितली जात होती. तसे मी त्याच्याजवळ जात त्याला, "आता मी निघतो" असे म्हणालो.
"अरे हो, सॉरी.. तू हो पुढे.. तुझी ट्रेन असेल.. थॅंक्यू.." माझे दोन पैश्याचेही नुकसान केले नसताना तो मला सॉरी म्हणाला आणि मी न केलेल्या मदतीसाठी थॅंक्यू..
निघतानाही तो मला ‘मित्रा’ नाही म्हणाला की फॉर्मेलिटी म्हणून हस्तालोंदन नाही केले. मोजून सहा ते आठ मिनिटांचे आमचे एकत्र चालणे अन एकमेकांशी बोलणे झाले, पण तेवढ्या वेळेतही तो मला बराच उलगडला.. पुन्हा कधी तो मला भेटेल ना भेटेल, दोनचार दिवस त्याला कुरीअरवाला भेटला की नाही हि रुखरुख मनात राहील, चार-आठ दिवसांत कदाचित विस्मरणातही जाईल, पण अशी साधीशीच माणसे अधनामधना भेटत राहणे खूप गरजेचे असते.. खरंच, मदत होते अश्यांची, आपला स्वताचा चांगुलपणा टिकून राहण्यासाठी ..
- तुमचा अभिषेक
Aavadale...Manala Bhavale...
Aavadale...Manala Bhavale...
मस्तच
मस्तच
(No subject)
(No subject)
छान!
छान!
तुम्ही नेहमी इतक छान कस
तुम्ही नेहमी इतक छान कस लिहिता.
(No subject)
नेहेमीप्रमाणेच सहज सुंदर...
नेहेमीप्रमाणेच सहज सुंदर...
छान लिहिलयेस दादा अशी साधीशी
छान लिहिलयेस दादा
अशी साधीशी माणसं खुप असतात आजुबाजुला
याचीही लेखमालिका होऊ शकते.. बघ जमतय का
तुम्ही नेहमी इतक छान कस
तुम्ही नेहमी इतक छान कस लिहिता.+११११
मस्त लिहिलंय..
मस्त लिहिलंय..
अभिषेक, लेख चांगला आहे. साधी
अभिषेक,
लेख चांगला आहे. साधी माणसं साधं वर्णन! अवघड असतं शब्दांत मांडणं, पण तुम्ही नेमकं ते पकडलंय!
चेहर्यावरून अनोळखी असलात तरी त्या मुलास संवाद साधावासा वाटला यातंच सारं आलं.
आ.न.,
-गा.पै.
मस्त लिहिलंय.......
मस्त लिहिलंय.......
गोड लिहिलंय
गोड लिहिलंय
मस्त ..
मस्त ..:)
आवडले
आवडले
आवडले....
आवडले....
धन्यवाद सर्वच
धन्यवाद सर्वच प्रतिसाद,
वसुधा, मृणाल __ खरे तर नेहमीच नाही लिहिले जात छान, खास करून जेव्हा ते आतून येत नाही, अन आपण बरेच दिवस झाले काही लिहिले नाही तर आठवून एखाद्या विषयावर लिहितो तेव्हा .. प्रयत्न करतो असे न करण्याचा पण बरेचदा मोह आवरत नाही हा..
रिया __ आणि या वरच्याच कारणासाठी म्हणून माझ्याही डोक्यात हे लिहिल्यावर याचीही मालिका होऊ शकते हा आलेला विचार मी झटकला.. व्हायचीच असेल तर होईल आपसूक
गापै __ खरंय, एखाद्या अनोळखी माणसाला आपल्याशी विश्वासाने संवाद साधावासा वाटतो याने आपल्याला स्वताबद्दलही एक फील गूड येतो.. थोडेसे कौतुक स्वताचेही वाटतेच ..
वॉववॉव!! सुपर्ब
वॉववॉव!! सुपर्ब अभिषेक..शब्दात पकडायला कठीण अश्या भावना तू सहजपणे लिहून जातोस, नेहमीच!!
मस्तच!
मस्तच!
मस्त! किती साधा प्रसंग काय
मस्त! किती साधा प्रसंग काय मस्त वर्णन केला आहेस. कमाल
मस्त! किती साधा प्रसंग काय
मस्त! किती साधा प्रसंग काय मस्त वर्णन केला आहेस. कमाल >> +१०
दुसरा आणि तिसरा पॅरा डिट्टो
दुसरा आणि तिसरा पॅरा डिट्टो
आपल्याला अशी अनेक साधी माणसे भेटून जातात... साध्या साध्या तरीही खास गोष्टींसाठी लक्षात राहतात...
अशा आणखी काही साध्या तरीही खास व्यक्तींविषयी वाचायला नक्की आवडेल अभिषेक.
छान लिहिलय
छान लिहिलय
अभिषेक एक छोटासा प्रसंग छान
अभिषेक एक छोटासा प्रसंग छान रंगवलायस.
तुझी दृष्टी सुद्धा खासच. एखादा सामान्या माणूस मामुली प्रसंग म्हणून विसरून गेला असता.
एक साधासा अनुभव किती खास करून
एक साधासा अनुभव किती खास करून टाकला....
धन्यवाद सर्व
धन्यवाद सर्व प्रतिसाद,
ड्रीमगर्ल, मग सेम पिंच
दक्षिणा, खरंय, त्याच दिवशी संध्याकाळी मी हे लिहून काढले नसते तर दुसर्या दिवशी मी सुद्धा विसरून गेलो असतो, वा मग लिहावेसे सुद्धा वाटले नसते..
वा ...छानच लिहिलंय
वा ...छानच लिहिलंय ...बर्याचदा अशी साधीसुधी माणसं सहज भेटून जातात आणि मनाला मात्र नकळत एक हुरहुर लागुन जाते ...
अभिषेक, अरे किती साधा
अभिषेक, अरे किती साधा प्रसंग... तुझ्या-माझ्या आयुष्यात कधीही अनेकवेळासुद्धा घडलेला. त्याला तू किती सुंदर परिमिती दिलियेस.
साध्या, सोप्प्या शब्दांत्,नेमकं...
वाह दादची दाद, अन धन्यवाद
वाह दादची दाद, अन धन्यवाद सुशांत ..
Pages