पारसी व्हेज धनशाक

Submitted by दिनेश. on 1 June, 2009 - 06:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तूरीची डाळ एक वाटी
वालाची डाळ एक टेबलस्पून
मुगाची, मसुरिची वगैरे डाळी मिळून दोन टेबलस्पून
एक छोटे वांगे, एक छोटे रताळे, एखादा लहान लाल भोपळ्याचा तूकडा,
एखादा फ़्लॉवरचा तुरा.
समुद्रि मेथीच्या चार पाच जुड्या ( नसल्यास साध्या मेथीची अर्धी जुडी )
चिंचेचा कोळ दोन टेबलस्पून, चवीला थोडीशी साखर.
तूप, मीठ, हिंग, हळद.

मसाल्यासाठी
धणे एक टेबलस्पून
जिरे एक चहाचा चमचा, एखादी लवंग, दोन चार मिरीदाणे, अर्धा इंच दालचिनी.
दोन हिरव्या वेलच्या. चार पाच लाल मिरच्या. सर्व कोरडे भाजून पूड करावी.
(किंवा तयार पारसी धनशाक मसाला तीन चहाचे चमचे )

भातासाठी :
दोन कप बासमति तांदूळ ( धुवुन अर्धा तास भिजवून निथळून घ्या ), दोन मोठे कांदे (उभे चिरुन), तूप, मीठ, हळद, खडा मसाला ( आवडीप्रमाणॆ )

क्रमवार पाककृती: 

सर्व डाळी एकत्र करुन धुवुन घ्या. त्यातच वर सर्व भाज्या चिरुन घाला. मग हळद हिंग घालून कुकरमधुन शिजवून घ्या. शिजल्यावर भाज्या वर राहतील, त्या बाहेर काढून घोटून घ्या. शक्यतो मिक्सरमधुन काढून घ्या, म्हणजे त्या एकजीव होतील. तूप गरम करुन त्यात वरील मसाला घालून परता. मग त्यावर डाळ, भाज्या, कोळ व साखर घाला.
उकळू द्या.

भातासाठी:
तूप तापवून त्यात उभे चिरलेले कांदे सोनेरी करुन घ्या. ( कांद्यावर थोडेसे मीठ व थोडी साखर पेरा ) कांदा काढून आवडीप्रमाणे खडा मसाला घाला, त्यावर हळद घालून तांदूळ परता. चार कप गरम पाणी घालून उकळी आली कि मीठ घाला. मोकळा भात करुन घ्या.

खायला घेताना भात वाढून वरुन डाळ घ्या.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

व्हेज धनशाक हि खरे तर पळवाट आहे. मटणाशिवाय धनशाक होउ शकत नाही. तरीपण मग माझ्यासारख्या मंडळीनी काय करावे ?

माहितीचा स्रोत: 
हं
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अशी धनसाक बनवताना डाळ्,भाज्या,मटणाचा खिमा घालते(तेच तर खरी धनशाक रेसीपी ना). दालचिनी,तेजपत्ता,थोडे केशर्,बडी वेलची नी साधी वेलची +एखादाच चमचा धनसाक मसाला + हिंग +सुखी लाल मिरची + ताजी धणा पूड असे शुद्ध तूपाच्या फोडणीला घालते. खडा मिठ मस्त लागते. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेला पालक वा मेथी घालते वेगळी वाफवून. खमंग वास येतो. चव मस्त लागतेच. Happy हे एकदम वन पॉट मील आहे नुसतेच खावून.

मेथी सहजासहजी मिळंत नाही. तेव्हा पालक किंवा इतर काही पालेभाजी चालते का? (चव ती येणार नाही हे कबूल.)

शक्य असेल तर कसूरी मेथी वापरावी. मी मटणाला पर्याय म्हणुन सुरण वापरुन बघितला पण चव चांगली नाही लागली, सोया चंक्स वापरले नाहीत मी, ते पण ट्राय करता येतील.

धन्यवाद. घरी कसूरी मेथी आहे. वरच्या कृतीच्या प्रमाणात किती वापरावी. ही MDHची कसूरी मेथी जरा जास्त झाली की पदार्थ फार कडू होतो. Sad

दोन चहाचे चमचे पुरे. डाळीत घालण्यापूर्वी ती जरा गरम करुन चुरडून घ्यावी.

ऑथेंटिक धनशाक कसं लागतं ते माहीती नाही. पण आज डाळी-भाज्या-मसाले ह्यांचं ह्या कृतीनं केलेलं मिश्रण घरी सगळ्यांनी चापून खाल्लं! Happy
पुन्हा एकदा धन्यवाद!
(कसूरी मेथी घाबरत एक चमचा घातली. पण चव लागली.)

dhansak.jpg

आज सुट्टी घेण्याचा फायदा, मी केले आजच धनसाक. यम्मी! (वरती वेज लिहिलेय पण मी मटण खीमा घातलेय. जवळपास त्याच पद्ध्तीने केलेय. ) मसूर डाळ, मूग डाळ, वांग, टोमॅटो,मेथी,जरासा पालक,बटाटा, भोपळा, फ्रेश धनसाक मसाला ,केसर्,बडी वेलची. चिंच व साखर नाही टाकले. पण शेवटी मस्त लिंबू पिळला,कोथींबीर वगैरे वगैरे).

हा मटणाचा खिमा वेगळा शिजवुन घ्यावा आणि मग भातावर डाळ आणि खिमा वाढावा काय??

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

नाही एकत्रच शिजवायचा. आधी तेल + थोडे शुद्ध तूपाची मस्त फोडणी करायची(कांदा,हिंग्,दालचिनी काडी, १-२ लवंग,बडी वेलची, तेजपत्ता,रोजची वेलची,सुख्या लाल मिरच्या, मेथी दाणे, केशर्,आलेलसूण पेस्ट परतून मग मटणाचा खिमा(त्याला आधीच हळद व साधा रोजचा घरचा लाल मसाला) हे सर्व परतून झाकण ठेवायचे ५ मिनीटे. मग टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा. पाणी अजिबात घालायचे नाही. वर ताटली ठेवून त्यावर पाणी ठेवून मी ५ मिनीटे शिजवले). मग १ तास भिजलेली मूग व मसूर डाळ परतायची. त्यावर फ्रेश वाटलेला धन्साक मसाला. मग सर्व भाज्या सगळ्यात शेवटी परतून घालून झाकण ठेवायचे. त्यावर पाणी. मग १५ मिनीटे शांत शिजवायची झाकणात फक्त पाणी ठेवायचे मग सीसॉल्ट घालून सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली मेथी व कोंथीबीर. मी मेथी + पालक आधी थोडे उघड्यावर वाफवते मग घालते. झाकण ठेवून मेथी व पालक शिजाव्त नाही.(कडू होते मेथी). हे सर्व घातले की मगच लिंबू पिळायचा. वर भरपूर कोथींबीर. पाणी घालायची गरज नाहीच पडत. टोमॅटो असतोच ना. डाळी भिजवल्याने शिजायला वेळ लागत नाही. वरून हवेच असेल तर उतरल्यावर एक चमचा शुद्ध तूप टाकून मी अवन मध्ये असेच ५ मिनीटे ठेवते फॉइल लावून १५० वर. अगदी जेवायला बसणार असे वाटले की ती फॉइल उघडली की इतका घमघमाट येतो की अहाहा. मस्त ब्रॉउन भात बनवून खायचे. Happy ऑथेंटीक ह्याच्यात टोमॅटो टाकताच असे नाही(इति पारसी मैत्रीण). तरीही पाणी न टाकता छान सरसरीत होते. मसाला हा फ्रेशच चांगला लागतो.(imo).

धन्यवाद मनु, मी लगेच लिहुन ठेवते आजकाल आवडलेल्या पाकृ. नाहीतर कधी कधी गडप होतात Happy

परत एक शंका.. तु सर्व भाज्या सगळ्यात शेवटी.. असे जे लिहिलेस ते मुळ कृतीत लिहिल्याप्रमाणे तुरडाळ+ वांगे रताळे वगैरे कुकरमध्ये वाफवुन घोटलेले मिश्रण ना??

वरुन पाणी न घालता, सरसरीत होते .. पुढच्या रविवारी स्वतःच करुन बघते :).

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

छान आहे रेसीपी. मी पण करते व्हेज धनशाक पण जरा वेगळे. मी पुदिना घालते भरपूर. आणि उकड्लेल्या अंड्यांबरोबर देते. मस्त लगते खूप. तुमच्या नुसार मेथी घालून करून बघते एकदा. पण हे मात्र खरे कि सगळ्या आवड्त्या आणि नावडत्या भाज्या पोटात जाण्यासाठी हा उत्क्रुष्ट (? कस लिहू) पदार्थ आहे. Happy