'रील' ची रियल ष्टोरी (पहायला विसरु नका)

Submitted by मंजूताई on 22 November, 2013 - 00:54

शाळेत असताना किती भाबडी स्वप्न असायची नाही का? खूप मोठे व्हावं आणि पेपरमध्ये (त्या काळी पेपर हेच दृश्य एक साधन होतं झळकण्याचं) निदान फोटो नाहीतर नाही पण कमीत कमी कुठल्यातरी कोपर्‍यात नाव तरी छापलं जावं अन आपण झळकावं अशी आम्हा मैत्रिणींची इच्छा म्हणा किंवा स्वप्न म्हणा! पण असं काही होणं दुरापास्तच कारण आम्ही सामान्यातील सामान्य. चुकून माकून फोटो काढला गेला अन तो पेपरमध्ये आला तर ह्या आशेवर कधीतरी शाळेच्या पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला निघणार्‍या प्रभात फेरीत कितीही हात दुखला तरी हातात झेंडा घेऊन समोर उभं राहायचो. नाही म्हणायला खेळात होतो पण काळ्या - पांढर्‍या दहाजणीतील मी कोण? स्वतःचा फोटो स्वतःला ओळखायला आला तर शप्पथ! इतरांना काय कळणार. अगदीच हे सगळं नाही झालं तर .....वार्तात छापल्या जाईल पण आपण ते बघायला कुठे असू Happy . शाळकरी वयातली स्वप्न ती काळाबरोबर मागे पडली. दूरचित्रवाणीचा जन्म झाला स्वप्नांच्या कक्षा रुंदावल्या. पाककलेला समर्पित वर्षानुवर्ष अनेक कार्यक्रम बघून वाटायचं की ह्यापेक्षा कितीतरी चांगले पदार्थ आपण करू शकतो, व झळकू शकतो. हे फक्त वाटणंच होतं! दूरचित्रवाणीवरच्या कोट्याधीश स्पर्धांसाठी एकच लघुसंदेश (समस) पाठवायचा नियम मात्र केला. कधीतरी महानायकाशी भेटण्या-बोलण्याचंही एक स्वप्न , माध्यमात झळकण्याचं स्वप्न.. धनलाभाचं स्वप्न...... स्वप्नांची उड्डाणे कोटी महाकोटी.. ....इतके पर्व झाले पण अजून तरी भाग्य उजळले नाही. असो! असेच एकदा ईटीव्हीवरच्या सास्वा-सुनांच्या कार्यक्रमाकरिता समस पाठवला. मला हा कार्यक्रम माझ्या बहिणीला 'भेट' द्यायचाय होता. आणि काय आश्चर्य लगेचच पोच आली की लवकरात लवकर तुमच्याशी संपर्क करू! दुसर्‍याकरिता मागितलेलं मिळतं म्हणतात! इंतजार सुरू....महिना झाला पुढे काहीच नाही. मेरा नंबर नही आयेगा! विसरूनही गेले होते पण अचानक एक दिवस फोन आला अठरा तारीख शूटिंगसाठी चालेल का? चालेल का काय, अगदी धावेल! तोपर्यंत बहिणीला काहीच माहीत नव्हतं. सुनेबद्दल नाही पण तिच्याबद्दल साशंकता होती ती अगदी फोल ठरली. त्या दोघींचे फोन नंबर दिले. पुण्यात आल्यावर, तुम्हाला भेटल्यावर नक्की काय ते सांगू. फिर इंतजार... अखेर इंतजार खतम अन अठरा तारखेला सकाळी आठ वाजता येण्याचे नक्की झाले. अमेरिकेहून येऊन दोन दिवसात लग्न करून जाणार म्हटल्यावर जी काय वधुपक्षाची धावपळ होत असेल तशी आमची सुरू झाली. ह्यांपूर्वी आमच्यापैकी कोणाचाही कॅमेऱ्याशी आमना सामना झालेला नव्हता. स्क्रिप्ट वेगैरे काही नसतं अगदी उत्स्फूर्त गप्पा असतात अजिबात टेन्शन घेऊ नका, असे खरंतर टीव्हीवाल्यांच्या कोऑर्डिनेटरने आश्वस्त केले होते तरी डोक्यात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली. काय प्रश्न विचारतील ? काय बोलायचं? ततपप तर होणार नाही ना? काही लिहून काढायचं का? पदार्थ ऐनवेळेला बिघडणार तर नाही ना! शंकाच शंका! दोघींनीही पदार्थ बनवण्याची - कृतीची रंगीत तालीम केली होती पण वेळेवर काही गोंधळ तर होणार नाही ना ही शंका मधून मधून डोकं वर काढतच होती. चॅनेलवाल्यांची पंधरा सोळा माणसांची वरात येणार म्हणजे साग्रसंगीत तयारी तर करायलाच हवी ना! वर्‍हाडी मंडळी व यजमान व पाहुणे मंडळी आठशे स्क्वेअर फुटात कसे काय मावणार? हे वेगळंच टेन्शन! आता ह्या विषयावर चर्चा नको, काय होईल ते होईल असं चार-सहा वेळा म्हणून झाले तरी गाडी फिरून परत त्याच फलाटावर येत होती. ये अय्या! तिच्या ये अय्या ने आम्ही क्षणभर दचकलोच. काहीतरी न निस्तरण्याजोगा मोठ्ठा घोळ झालेला दिसतोय असा विचार मनात येतो न येतो तोच, हा ड्रेस मी ठरवला पण त्याचे मॅचिंग कानातलेच सापडत नाहीयेत, सूनबाईने वदल्या. हुश्श!

सूनबाईचे मनोगत
आपल्या घरी पाहुणे येणार म्हटलं की एक ना अनेक गोष्टींचे प्लॅनिंग डोक्यात सुरू होतं.... कुठल्या भाज्या करायच्या, भाताचा प्रकार, गोड काय etc etc.. पण पाहुणे येणारेत आणि रोजचा स्वयंपाक करायचा नसून एखादा विशेष पदार्थ दाखवायचा आणि मुख्य म्हणजे लाखो लोक तो टीव्हीवर बघणार आहे असं कळल्यावर डोक्यात किती गोंधळ उडेल... तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं... माझ्या मावससासूबाईंने माझं अन माझ्या सासूबाईंचे नांव ह्या कार्यक्रमासाठी दिलं... त्यांना आम्हाला सरप्राइज द्यायचं होतं... हे कळल्यावर आम्ही उत्स्फूर्तपणे हो तर म्हणालो पण त्यासाठी काय काय तयारी असते आणि आणि किती गोष्टींचे प्लॅनिंग असतं ह्याची कल्पना नव्हती... ...आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेऱ्या समोर उभं राहणार होतो... शूटिंगचा दिवस ठरला... त्यांची लोकं येणार, चहा - नाश्ता काय करायचा, ड्रेस घालावा की साडी नेसावी, सासूबाई काय घालणार ? कोणते पदार्थ करणार...अश्या अनेक प्रश्नांची भुतं डोक्यात नाचू लागली... त्यात अगदी आदल्या दिवशी कळलं की त्यांची सतरा लोकं येणार...झालं हे कळल्यावर तर एकच प्रश्न समोर उभा राहिला की ती सतरा आणि आपण घरातले दहा इतकी माणसं मावतील कशी.. त्यांना कुठे बसवायचं.. . .. कोणते पदार्थ करून दाखवायचे.... जमेल तितकी तयारी आधीच करून ठेवायची... डिटेल प्लॅनिंग करून झालं....

ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी बरोब्बर ही मंडळी हजर झाली... आम्ही तर त्यांच्या काम करण्याची पद्धत बघून थक्कच झालो... अगदी घरात शिरल्याबरोब्बर त्यांची तयारी, मांडामांड सुरू झाली... इतक्या सराईतपणे घरात वावरत होते की जणू काही घरातले मेंबर्स असावेत... हे कुठे ठेवू..हे हवंय, ते हवंय, हे नाहीये का.. काही प्रश्न नाही... कुठेही गडबड गोंधळ नाही....योग्य तर्‍हेने व काळजीपूर्वक सामानाची हालवाहालव करून झटपट 'सेट' तयार झाला.....हे एकीकडे चाललेले असताना दुसरीकडे आमच्या पदार्थाला लागणार्‍या साहित्याची मांडामांड सुरू झाली .. मीठ न पांढर्‍या वाटीत नका ठेवू... तुमच्याकडे नसेल तर मी देतो रंगीत.. लगेच मीठ रंगीत वाटीत ठेवलं ....आमच्या सास्वा-सुनांचा मेकअप करता करता स्क्रिप्ट रायटर मुलाखत घेत होता... तेवढ्यात सूत्रधाराचे आगमन झाले... त्याची तर गंमतच झाली... कौस्तुभ (माझा पती) दोन्ही हातात जड नाश्त्याच्या पिशव्या घेऊन येताना फाटकात सूत्रधाराने त्यालाच विचारले.... कुठे राहतात? दोघंही बरोबरच घरात आले...सूत्रधाराचा नट्टापट्टा करता करता चहा-नाश्ता -ब्रीफिंग सुरू झालं... हे इतकं सहजपणे, शांततेत चालू होतं.. कुठेही गडबड गोंधळ नाही ..चिडचिड नाही.. बाहेर चित्रीकरण झालं नसतं तर कदाचित शेजार्‍यापाजार्‍यांना कळलंही नसतं ........असो तर अखेर तो क्षण आला....'रोल अ‍ॅक्शन' म्हटल्याबरोबर दडपण येईल असं जे वाटलं होतं पण अगदी त्याच्या विरुद्धच झालं.... काही टेन्शन घेऊ नका, हसत-खेळत गप्पा मारायच्या आहेत, मोकळेपणाने बिनधास्त बोला असं जे आम्हाला दिग्दर्शकाने सांगितले होते ते अगदी शंभर टक्के दिग्दर्शकाने व सूत्रधाराने आमच्याकडून करवून घेतले विदाऊट एनी रीटेक हे महत्त्वाचं...(मी तर ठरवलं होतं की कॅमेऱ्याकडे बघायचंच नाही...खरंच कोणा ओळखीच्या व्यक्तीशी गप्पा मारतोय तसं बोलायचं) ... कुटुंबाशी ओळख करून द्यायची होती. मी कौस्तुभची ओळख करून देताना सूत्रधाराच्या चेहऱ्यावर ओळखीचे एक स्मित ( अरेच्च्या ह्यालाच तर आपण विचारले ... कुठे राहतात) ... पण पदार्थ करताना आम्ही दोघंच होतो .. मी व सूत्रधार......सूत्रधारही मस्त गप्पा मारत होता... कुठे लक्ष द्यावं काही कळत नव्हतं ... पदार्थ करावा की गप्पा माराव्या.... मी घाबरले? गोंधळले? नक्की काय झालं पाहायला विसरू नका उद्या शनिवार दि: २३ नोव्हेंबर संध्याकाळी ६:३० वाजता ईटीव्ही मराठीवर....अठरा ऑक्टोबरला शूटिंग झालं... तेव्हापासून इंतजार.... आखिर वो शुभघडी आही गयी....आमच्या सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोचलीय ...कधी एकदा आपल्याला पडद्यावर बघायला मिळतंय असं झालंय..पण हे सांगीन की हा एक 'अविस्मरणीय अनुभव' अतिशय 'गोड' व 'चटपटीत' आहे! आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ह्या झगमगाटी माध्यम दुनियेच खूप आकर्षण असतं .. ते जग जवळून बघता आलं, अनुभवता आलं...२२ मिनिटाच्या फितीसाठी सहा तास लागले.... खरंच ह्या क्षेत्रातील लोकं, त्यांचं काम, त्या कामावरची निष्ठा,त्यांची शिस्त, त्यांचं टीमवर्क हे पाहण्यासारखं आहे.. सूत्रधार अमेय वाघ, दिग्दर्शक शिवाजी पद्मजा, रेश्मा, श्वेता, योगेश, सुरिंदर हे जरी खंदे शिलेदार असले तरी इतरही सहाय्यक मंडळींची कामगिरीही तितकीच महत्त्वपूर्ण असते ...जरा आपल्या कोशातून बाहेर पडून हे सगळं अनुभवायला हवं. हे असे अनुभव जगणं समृद्ध करतात ...हो, नक्कीच.........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास...

छान जमल्यास नक्की बघेन उद्या क्रिकेटचा सामना नसल्याने या कार्यक्रमाचा मायबोली टिआरपी वाढायला हरकत नाही

chhaan chhan paahaate paahaataa ala tar naahi tar youtubevar disel naa? link denaar kaa?

मस्त !
पण वरच्या लेखात कार्यक्रमात काय घडले यावर जास्त भाष्य नाही, सस्पेंन्स सस्पेन्स का? Happy

मंजु ताई अभिनंदन. मी घरी जाइन तेव्हा संपलेला असेल, असो, लिंक देऊन ठेव. आतुरतेने वाट बघते आहे.
पुन्हा एकदा मना पासुन कौतुक.

आज दुपारी एक वाजता रिपीट टेलीकास्ट एक वाजता दखवतील अन युट्युबवर अजुन आले नाहीये आल्यावर लगेच लिंक देईन.

मी पाहिला तो एपिसोड रिपीट झाला तेंव्हा. छान झाला! दोन्ही रेसीपी पण आवडल्या. खरवसाच्या वड्या बघताना तर सोप्या वाटल्या. तो चिक शिजवताना त्यात साखर घालायची नाही का ते जरा सांगा म्हणजे करता येतील!
अभिनंदन Happy

Back to top