दूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती. पण तसा कसलाही नकारात्मक विचार करण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. पाठी वळून बघायची जराही हिंमत होत नव्हती. त्या नादात धावायचा वेग कमी होणे देखील मला परवडणारे नव्हते. मात्र हळूहळू तो आवाज अजून जवळ येतोय हे जाणवत होते. धुळीचे उठलेले लोट आणि त्या जनावरांचा वास आता सभोवतालच्या वातावरणात जाणवू लागला होता. मी आणखी मरणाच्या आकांताने धावू लागलो. पाय तुटून मरणे मला पसंद होते, धावता धावताच छातीतून एक कळ येणे मंजूर होते, पण त्यांच्या तावडीत मला पडायचे नव्हते. फार कमी लोकांना मृत्युला अगदी जवळून बघायची संधी मिळते पण मला ती साधायची नव्हती. पण नाही, आता कुठल्याही क्षणी पाठीमागून आपल्यावर कोणीतरी झडप घालणार असे मला वाटले तेव्हा मी माझ्याच मृत्युचे एक शेवटचे दर्शन घ्यायला मागे वळलो आणि...................
ती सारी जनावरे माझ्या ओळखीचीच होती. सर्वात पुढे होता तो एक बोकड. धष्टपुष्ट निगरगट्ट सोकावलेला अन माणसाच्या रक्ताला चटावलेला बोकड, अन पाठोपाठ त्याच्याच जातभाई बोकडांचा भला मोठा कळप. तोंड असे कोणाचे नजरेस पडतच नव्हते कारण प्रत्येकाने आपली मान खाली घातली होती. मला काही दिसत होते तर ती भाल्यासारखी रोखली गेलेली त्यांची धारदार शिंगे जी सुसाट वेगाने माझ्याच दिशेने येत होती, बस्स काही क्षणांतच माझ्या देहाच्या चिंधड्या उडवत आरपार जाणार होती. पण त्याही पेक्षा जास्त भयानक दिसत होती ती रानडुकरांची टोळी. बेफामपणे आपले सुळे मिचकावत चौफेर उधळली होती. त्यांच्या धावण्यात जराही लयबद्धता नव्हती अन याचीच मला जास्त भिती वाटत होती कारण तश्याच बेशिस्त प्रकारे मी त्यांच्या पायदळी तुडवला जाणार होतो. अचानक एक जनावर त्यामध्ये उठून दिसू लागले ज्याचा आकार पाहता माझे पाय लटपटायचेच बाकी होते. पीळदार बांध्याचा, गोलाकार आणि टोकेरी शिंगांचा एक मस्तवाल बैल, ज्या वेगाने आक्रमण करून येत होता, त्याचा एक हलकासा धक्का देखील मला यमसदनाला धाडण्यास पुरेसा होता. त्याच्या पायाशी घुटमळणार्या रानसश्यांच्या लालबुंद निखार्यांसारख्या डोळ्यात देखील रक्त उतरलेले दिसत होते. जणू आज मला कुरतडून खायचे काम नियतीने त्यांच्यावर सोपवावे अशीच इच्छा त्या नजरेत दिसत होती.
या सर्व जनावरांच्या फौजेबरोबर काही कोंबड्या देखील आपले जळके पंख फडफडवत उडत येत होत्या. जणू गिधाडांप्रमाणे माझ्या मृत देहाचे लचके तोडायचे काम या करणार होत्या. काही क्षणासांठी माझा स्वताचच छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह माझ्या द्रुष्टीपटलावर तरळून गेला आणि मी पुन्हा मान पुढे वळवून, ते द्रुष्य नजरेसमोरून हटवून, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने पळत सुटलो. तरीही पाठीमागून ऐकू येणारा कोलाहल काही कमी व्हायचे नाव घेत नव्हता. मानवी शरीर म्हणजे काही मशीन नव्हते, कधी ना कधी पाय साथ सोडणारच होते. आणि मला त्या आधी पोहोचायचे होते, एका सुरक्षित स्थळी.
इतक्यात अचानक डोळ्यासमोर पाण्यासारखे काहीतरी तरळले. भास निश्चितच नव्हता तो. नजरेच्या टप्प्यात असलेले नक्कीच ते एक जलाशय होते. मला चांगलेच पोहता येत होते, अन कदाचित या प्राण्यांना येत नसेल तर सुटकेची ती एक आशा होती. याच आशेने नवीन बळ दिले. आता माझ्यासमोर एक निश्चित लक्ष्य होते. मला त्या जलाशयापर्यंत पोहोचायच्या आधी कोसळायचे नव्हते. पुढचे काही क्षण, काही मिनिटे, अन युगे मी कसलीही गणिते न मांडता धावत होतो. जलाशय आता अगदी शंभर पावलांवर आले होते. मात्र मागच्या जनावरांचा वेग अजूनही मंदावल्याचे जाणवत नव्हते. याचा अर्थ असा तर नाही की ते सुद्धा माझ्यापाठोपाठ पाण्यात शिरणार होते. पण हा विचार करायला आता वेळ नव्हता, मागे पलटायचा मार्ग तसाही नव्हताच. फार फार तर जलसमाधी झाली असती, एखादे जलाशय माझ्या रक्ताने रंगल्यास निसर्गाला काही फरक पडणार नव्हता. काठ जवळ आला तसे बुळबुळीत शेवाळांत माझा पाय सरकून मी जलाशयाच्या दिशेने वेगाने घसरू लागलो. जेवढी घाई मला त्या जलाशयापर्यंत पोहोचायची झाली होती त्यापेक्षा जास्त आतुरता बहुधा जलाशयाला माझी लागली होती. कुणास ठाऊक, कदाचित तिथेच माझा शेवट लिहिला असावा.
स्वतावर ताबा नसलेल्या अवस्थेत मी वेगानेच सरपटत त्या थंडगार पाण्यात प्रवेश करताच एवढा वेळ पाठीमागून चाललेला कल्ला अचानक थांबला आणि एका वेगळ्याच शांत जगात शिरल्यासारखे मला वाटू लागले. पाय सुन्न पडले होते ते एवढी घोडदौड केल्यामुळे कि त्या थंडगार पाण्याचा हा करीष्मा होता माहीत नाही, पण पाण्याच्या पृष्ठभागावर स्वताचे शरीर मी पलंगावर अंथरलेल्या चादरीसारखे भिरकाऊन दिले होते. एका निवांत अवस्थेत लागलेली समाधी होती ती. पण काही काळच, अचानक कुठुनशी सुळसुळत चंदेरी माश्यांची फौज माझ्या अंगावर तुटून पडली आणि माझ्या शरीराला लक्ष्य लक्ष्य सुयांसारखी टोचू लागली. बांगडा, सुरमई, हलवा, पापलेट, माश्यामाश्यांमधील फरक मी कधीच ओळखू शकलो नव्हतो, आणि आताही ते जमत नव्हते. सारेच एकसमान वाटत होते, सारे तेवढेच हिंस्त्र भासत होते. त्यांच्या वेड्यावाकड्या तीक्ष्ण दातांनी माझ्या चामडीची केलेली चाळण, आता मी देखील त्यांच्यासारखाच एक खवल्याखवल्यांचा प्राणी बनत चाललो होतो. वेदनेचा कळस होता तो. मी त्यांना जितके भिरकाऊन द्यायचा प्रयत्न करत होतो तेवढी पाठाहून नवी कुमक त्यांना मिळत होती. आता मला जमिनीचे वेध लागले होते. दूरवर किनारा दिसत होता मात्र तिथवर पोहायची शक्ती कुठून आणनार होतो. इथवर जे झुंजलो ते आता हार मानायची नव्हती. पुन्हा उरलेसुरले बळ एकवटून मी किनार्याच्या दिशेने हातपाय मारू लागलो. अंगाशी जलचरांची झोंबाझोंबी चालूच होती. जलाशयाने अखेर माझे रक्त खरोखरच चाखले होते. किनारा जवळ आला तसे एकेक करत अंगावरचे मासे गळू लागले, अन पुन्हा हलके हलके वाटू लागले. पण एव्हाना हातापायातली शक्तीने उत्तर दिले होते. शेवटी एका जोरदार लाटेबरोबरच मी बाहेर फेकलो गेलो.
खरखरीत रेती माझ्या खुरदडलेल्या अंगाचे आणखी सालटे काढत होती मात्र तिला मागे सारून मी आता काठावरच्या खडकांतून वाट काढत मार्ग आक्रमू लागलो. इथून पुढे कुठच्या दिशेला जायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती. कदाचित पुढे मार्ग नव्हताच. माझा शेवट इथेच होता. सुर्य भर डोक्यावर तळपत होता आणि अंगावरून ओघळणारे रक्तमिश्रित पाणी पायाखालच्या सावलीत मिसळत होते. शेवटी अंगातले त्राण संपल्यावर एका खडकाचा आधार शोधत मी तिथेच विसावलो, तसे त्याच खडकाच्या फटीतून सरसर करत काही खेकडे माझ्यावर धाऊन आले. मोजून चारपाचच असावेत मात्र आता एखाद्या छोट्याश्या कोलंबीशीही झुंजण्याची ताकद माझ्यात शिल्लक नव्हती. मी तिथून उठणार तोच त्यांनी माझे पाय पकडून पायाच्या दोन्ही अंगठ्यांचे करकचून चावे घेतले. पायातना निघालेली कळ भणभणत थेट मस्तकात गेली आणि अखेर मानवी सहनशक्तीचा अंत झाला तशी मला जाग आली !
.
.
.
.
उगवला वाटते सुर्य, चल ब्रश कर पटकन आणि आंघोळ आटोपून घे, आज जेवणात तुझ्या आवडीची सुरमई फ्राय आणि कोलंबीचे सार आहे, सोबत आत्येने पाठवलेली मटण बिर्याणी पण आहे. गरमागरम खायचे असेल तर आवर लवकर..... आईची हाक कानावर पडली !
खरेच भयंकर होते ते सारे .. !
ब्रश नुसता दातात धरून किती तरी वेळ तसाच बेसिनच्या कठड्याचा आधार घेत उभा होतो. ईतक्यात आईने कूकर उघडला आणि बिर्याणीच्या वासाने भूक चाळवली. तसे लागलीच दांडीवरचा टॉवेल खेचून मी बाथरूमच्या दिशेने कूच केले .. बदला घ्यायची पाळी आता माझी होती !!
.................
एक हाडाचा मांसाहारी,
तुमचा अभिषेक
mast.
mast.
सहिये
सहिये
मस्त
मस्त
वाह! मस्तच त्यांनी घेतलेला
वाह! मस्तच
त्यांनी घेतलेला बदला आवडला (मी पुर्ण शाकहारी
)
एक च नंबर !
एक च नंबर !
अभिषेक, बैलाचा पण बदला
अभिषेक, बैलाचा पण बदला घेतला?
आ.न.,
-गा.पै.
जबरी रे.... पण हे खरच
जबरी रे.... पण हे खरच (सुरुवात) होऊ लागली तर मात्र खैर नाही.
गामा पै __ बदला बैलाने माझा
गामा पै __ बदला बैलाने माझा घेतला, दहावी-बारावीला असताना नाईटस्टडीला जायचो तेव्हा गाड्यांवर खाल्लेल्याचा. मी सध्या त्यांचा बदला घेत आय मीन खात नाही कारण आवडत नाही.
आदिती (पुर्ण शाकाहारी) __ एक दिवस झाडांच्या फांद्या आणि वेली पण तुझा बदला घेतील बघ
विजय दे. __ हे असे खरेच होऊ नये म्हणूनच बहुतेक आपण शाकाहारी प्राण्यांवरच ताव मारतो, मांसाहारी प्राण्यांच्या वाटेला जात नाही, न जाणो कधी त्यांची सटकली तर...
प्रतिसादांचे __ धन्यवाद
हा हा हा हा !!! मस्त !!!
हा हा हा हा !!! मस्त !!!
सह्हीये.
लिखाण मस्त आहे, विजय दे. __
लिखाण मस्त आहे,
विजय दे. __ हे असे खरेच होऊ नये म्हणूनच बहुतेक आपण शाकाहारी प्राण्यांवरच ताव मारतो, मांसाहारी प्राण्यांच्या वाटेला जात नाही, न जाणो कधी त्यांची सटकली तर... हा प्रतिसाद पण
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद सर्वांचे
हाहाहाहाहहाहाहा मस्तच
हाहाहाहाहहाहाहा मस्तच
एक गम्मत म्ह्ण्जे मला हे सर्व
एक गम्मत म्ह्ण्जे मला हे सर्व वाचत असताना अचानक नरक यातना काय असतिल याचि जानिव झालि.
non vege खावे कि नाहि याच tenshion.
बाकि लिखान एकदम मस्त......+++++११११
कथा विस्तार खूप छान आवडली
कथा विस्तार खूप छान आवडली
इतके छान लिहिता तुम्ही. मग
इतके छान लिहिता तुम्ही. मग आजकाल काही सकस का लिहित नाही?. (कुठे गेला तो अभिषेक तुमचा????)
जे जेव्हा सुचेल ते
जे जेव्हा सुचेल ते स्वानंदासाठी लिहितो आणि हलके होतो
तेव्हाही हेच करायचो. आताही हेच करतो.
फक्त आयुष्य पुढे सरकत असते. बदलत असते. प्रायोरीटी बदलते, लिखाणाचे विषय आणि त्यासाठी मिळणारा वेळ काळ स्थळ सारे बदलते. स्विकारावे आणि पुढे जावे.
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद
मस्त लिहलंय..!
मस्त लिहलंय..!
लिहत रहा..:)
आणि जळणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा
धन्यवाद सांज,
धन्यवाद सांज,
मग जे जसे जमेल ते लिहू लागलो. आता ज्यातून मला आनंद मिळतो ते माझी ओर्जिनॅलिटी जपत कायम लिहीत राहीनच 
कोणी जळावे ईतकी प्रतिभा लिखाणात नक्कीच नाही
खरे तर मी तुमचा अभिषेक मधून नवीनच लिहायला सुरुवात केलेली तेव्हा तुमच्या संपी टाईप्स लिखाण करायची इच्छा होती. पण प्रयत्न करता ते दवणीय होऊ लागले