क्रॅनबेरी सॉस (भारतीय स्वादाचा - मेथांब्यासारखा)

Submitted by स्वाती_आंबोळे on 28 May, 2012 - 11:13
cranberry sauce
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. १ पाकीट ताज्या क्रॅनबेरीज (या अर्ली विंटरमधे - साधारण नोव्हेंबर-डिसेंबरात मिळतात. फ्रोझन वर्षभर मिळतात, पण त्यांचा या सॉसला उपयोग नाही. १ पाकीट १२ औंसांचं म्हणजे साधारण ३४० ग्रॅम्सचं असतं.)
crnb_pkt.jpgcrnb_sz.jpg
२. अर्धा कप* तेल (हो, टिकवायची तर इतकं लागतं. थोडी करून लगेच संपवायचा प्लॅन असेल तर कमी चालेल.)
३. २ टीस्पून लाल तिखट
४. १ कप* ब्राऊन शुगर
५. १ टीस्पून मीठ
६. मोहरी, मेथी, हिंग - प्रत्येकी अर्धा टीस्पून

(* १ कप म्हणजे ८ औंस. आपल्या आमटीच्या वाटीने अदमासे दीड वाटी होईल.)

क्रमवार पाककृती: 

१. क्रॅनबेरीज धुवून निथळून घ्याव्यात.
crnb_wash.jpg
२. जाड बुडाच्या भांड्यात अर्धा कप तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, मेथी यांची फोडणी करावी.
(हे मूळ पाककृतीनुसार. मी स्प्रेडसारखी करते, त्यामुळे मोहरी घालत नाही. त्याऐवजी मला स्वाद आवडतो म्हणून भाजक्या जिर्‍याची पूड घालते. पण मेथी मात्र हवीच. हवंतर आधी निराळी भाजून पूड करून घ्यावी.)
३. निथळलेल्या क्रॅनबेरीज फोडणीत घालाव्यात. मध्यम आचेवर ढवळत रहावं.
४. क्रॅनबेरीज लगेचच मऊ व्हायला लागतात. त्या चांगल्या घोटाव्यात किंवा मॅशरने मॅश करत जावं.
crnb_mush.jpg
५. सॉस आळायला लागला की त्यात तिखट आणि मीठ घालावं.
६. पाणी पूर्ण आळलं की गॅस बंद करून दोन मिनिटांनी यात ब्राऊन शुगर घालावी. सॉस गरम असल्याने ती लगेच विरघळते आणि सॉसला सुरेख रंग येतो.

cr_sauce.JPGcran.JPG

७. पूर्णपणे गार झाल्याशिवाय सॉस बरणीत भरू नये.
८. फ्रीजमधे सहा महिनेसुद्धा टिकतो. (कदाचित आणखीही टिकेल, पण माझा त्याच्या आत संपतोच.)

अधिक टिपा: 

नुसतासुद्धा पोळी / ब्रेडला लावून छान लागतो. पराठ्यांबरोबर छान लागतो.
मला हा सॉस, थिन स्लाइस्ड कोल्ड कट टर्की, लेट्यूस असं सँडविचही आवडतं.
ही रेसिपी फक्त फ्रेश क्रॅनबेरीजसाठीच आहे. वाळवलेल्या/पाकवलेल्या/गोठवलेल्या इ. क्रॅनबेरीजसाठी/क्रेझिन्ससाठी हिचा उपयोग नाही.
क्रॅनबेरीज तेलावर घालण्याआधी नीट निथळून घ्याव्यात. हवंतर पंचावर किंवा टॉवेलवर घालून टिपून घ्याव्यात. (ही टिप वृंदाताईंकडून साभार.)
सॉस शिजवण्यासाठी जरा मोठंच भांडं घ्यावं म्हणजे क्रॅनबेरीज शिजून फुटायला लागल्या की बाहेर शिंतोडे उडणार नाहीत. (ही टिप सशलकडून साभार. :P)

माहितीचा स्रोत: 
एक ज्येष्ठ मैत्रीण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रॅनबेरीज ला बिया असतात का? मी फक्त फ्रोजन आणि रेडीमेड सॉस मध्ये खाल्यात त्यामुळे मला माहित नाहीये....
पण या विशेषत: स्त्रीयांच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात असं वाचलंय....

रेसिपी टेम्प्टिंग आहे....:)

धन्यवाद स्वाती,
इथे वाळवलेल्या क्रॅनबेर्‍या मिळतात त्याचे होईल का? फ्रोझन नसतात त्या.
फ्रेश क्रॅनबेरी चेरी रंगाच्या बोरांसारख्या दिसतात का? कधी पाहिल्या नाहीत. चित्र पाहिली फक्त म्हणुन विचारते आहे.

मस्तच. हे करणार मी. अशा पद्ध्तीने मी टोमॅटोची पण चटणी करते. गुळ घालून. डिप म्हणून खायला मस्त लागते आणि ब्रेडवर पण. क्रॅनबेरीजची पण आवडेलच . फोटो टाक ना.

वेका, बिया असतात, पण अगदी छोट्या असतात. (चित्र पहा.)
काढाव्या लागत नाहीत.

cranberry-seeds.jpg

रैना, वाळवलेल्या क्रॅनबेरीजची नाही होणार.
ताज्या क्रॅनबेरीज.... छोट्या लालभडक करवंदांसारख्या दिसतात.

शूम्पे, फोटो टाकेन आज-उद्यात. Happy

मृण, कळव मग कशी झाली ते. Proud

छानच आहे रेसिपी. धन्यवाद ! सध्या मी इथल्या लोकल स्टोअरमधुन क्रॅनबेरीची चटणी आणते कधीकधी. आता विंटरपर्यंत वाट पहाणे आले.

स्वाती, आभार्स...अगं मला या फळाचा ज्युस आवडत नाही म्हणून कधीच विकत घेऊन पाहिली नाहीत..
रासबेरीच्या बिया लागतात म्हणून न खाणारा प्राणी माझ्या घरात आहे म्हणून बी चं विचारलं...:) पण तरी यावेळी फ्रेश दिसल्या की निदान एकदा करून पाहीन....मी स्ट्रॉबेरीचा फ्रेश सॉस करते काहीवेळा.. वॉफल्स इ. वर बच्चेकंपनीला आवडतो...:)

बाजारात क्र्~अनबेरीज आल्यात....मस्त लागतो हा ज्~अम.... सोपी आणि बिना कटकटीची असे शीर्षकात यायला हरकत नाही Wink

CranberrySauce.jpg

मी पण केली क्रॅनबेरी चटणी/स्प्रेड का. नां. ना फार आवडली.
मी ब्राउन शुगर ऐवजी घरात चिक्कार होता म्हणून गूळ घातला. जीर्‍याचं विसरलेच Happy
मस्त रेसिपी.

स्वाती_आंबोळे,

दोन्ही प्रकारे करून बघितलं. क्रेझिन्सचा चिकट गोळा झाला.
ताज्या क्रॅनबेरीजचा प्रयोग मात्र एकदम सुपरहिट.
पाककृतीबद्दल धन्यवाद.

धन्यवाद स्वाती.
आज केला, थंड होता होता वाटीभर नुसता चाटूनच संपला Proud
IMG_3412.JPG

आणि हा रंगलेला चमचा (धुतल्यानंतर)

IMG_3414.JPG

मी करुन बघितला हा सॉस. मस्त झाला आहे. मैत्रिणींनाही खूप आवडला. सगळ्यांना या रेसिपीची लिंक पाठवली आहे.

स्वाती, तू फोडणीत मोहरी घालत नाहीस, मेथ्यांची पूड करून घाला म्हणतेस मग फोडणीत घालण्यासारखं काही उरलं नाही तेव्हा तेलावर लगेच निथळलेल्या क्रॅनबेरीज परततेस का? आणि मेथी पूड, जिरं पूड ह्याचं प्रमाण काय साधारणपणे?

हिंग, मेथ्या आणि जिर्‍याची पूड घालते तेलावर आणि मग त्यात क्रॅनबेरीज घालते. मी मेथीची पूड नाही, अख्खे दाणेच घालते. तो एक ऑप्शन सांगून ठेवला आहे फक्त.
प्रमाण.. अंदाजाने घालते त्यामुळे आता अंदाजपंचेच सांगते - एका पाकिटाला मिसळणाचा अर्धा चमचा (१/३ टीस्पून?) हिंग, अर्धा टीस्पून मेथ्या आणि अर्धा टीस्पून जिरेपूड.

ते औंसांचं माप आप्ल्या हिकडच्या लोकास्नी सम्जायाकर्ता.

येक औंस = येक स्मॉल पेग. थर्टी येमेल.

थर्टी ग्र्यामला बी त्ये लोकं औंसच म्हंत्यात.

(औंसिक) इब्लिस

योगेश क्रॅनबेरी म्हणजे करवंद नाहीत. चवितही खुप फरक आहे.
मला वाटत भारतात हे करुन बघायच असेल तर तोतापुरी आंबा, अननस चालेल. (क्रॅनबेरीजची चव येणार नाही. पण ही कृती वापरता येईल म्हणून लिहिल.)

Pages

Back to top