शनिवारी ’संहिता’ हा चित्रपट बघण्याचा योग आला. अशा अर्थगर्भ आणि नितांतसुंदर चित्रपटाचे माध्यम प्रायोजकत्व स्वीकारले ह्याबद्दल मायबोलीचा अभिमान वाटला
शिरीन नावाच्या एका निर्मातीला मृत्यूशय्येवर असलेल्या आपल्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या आवडत्या कथेवर एक चित्रपट बनवायचा आहे. रेवती ह्या डॉक्यूमेंटरीज बनवणाऱ्या अवॉर्ड विनिंग हुशार मुलीची दिग्दर्शिका म्हणून, तर हेमांगिनी नावाच्या एका देखण्या अभिनेत्रीची चित्रपटाची नायिका म्हणून तिने मनोमन निवडही केली आहे. शिरीनच्या मते ही उत्कट प्रेम आणि समर्पणाची कथा आहे. विवाहसुख न लाभलेल्या राजासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या एका राजगायिकेचं समर्पण ! ह्या चित्रपटाची ’संहिता’ लिहायची तर ’दर्पण’ असे शीर्षक असलेली मूळ कथा मिळवून वाचणे आवश्यक आहे. ती मिळवण्यासाठी रेवती कथेच्या लेखिका तारा देऊसकर ह्यांना जाऊन भेटते. संशोधनाचा भाग म्हणून ज्या संस्थानात ही कथा घडली त्या परिसराला, राजवाड्याला भेट देऊन येते. त्या पात्रांची प्रतिबिंबं तिच्या मनात हळूहळू उमटत जातात. त्यांना ती चेहेरा बहाल करु लागते. कथेतील पात्रं कसा विचार करत असतील हे उकलण्याचा प्रयत्न करत एकेक प्रसंग गुंफू लागते. ’दर्पण’ ह्या कथेवरची संहिता पूर्णत्वाला जाण्याचा प्रवास हीच ह्या चित्रपटाची संहिता !
सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकरांनी ’दर्पण’ ह्या कथेच्या शीर्षकाप्रमाणेच एखाद्या आरश्यात प्रतिबिंबं दाखवावीत इतक्या कमालीच्या तटस्थतेने ह्या दोन काळातील पात्रं आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना चितारल्या आहेत कारण कोण चांगलं, कोण वाईट ह्यावर भाष्य करणं हा ह्या चित्रपटाचा हेतू नाही. एखाद्या घटनेकडे दोन माणसं वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात, निर्णय घेतात. त्यात कोण चूक आणि कोण बरोबर हे कसं ठरवायचं ! एखाद्याच्या आयुष्यपटाकडे ’संहिता’ म्हणून आपण पाहिलं तर महत्त्वाचं काय ठरतं ? ज्याला जे हवं ते लाभलं की नाही ? संहितेचा शेवट कसा झाला ... Did he/she live happily ever after ?
सुखाची व्याख्या व्यक्तीगणिक बदलते ह्याचं भान ठेवून शोधलं तर कदाचित उत्तर गवसू शकेल आणि उत्तर शोधण्याच्या त्या प्रवासात सुख म्हणजे आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे हेही उमजू शकेल. अभंग आरशात प्रतिबिंब दिसतं तसं फुटून जमिनीवर विखुरलेल्या आरश्याच्या प्रत्येक तुकड्यातूनही ते दिसतंच. प्रश्न हा आहे की तुमच्यासाठी मौल्यवान काय आहे - आरसा की त्यात दिसणारं तुमचं प्रतिबिंब ?
ह्या चित्रपटाला एक ठेहराव आहे, एक लय आहे जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदाही हलत नाही. एखाद्या कसलेल्या गायिकेनं एकापाठोपाठ एक अलगद आवर्तनं घेत मधूनच लीलया समेवर यावं तसे दोन काळ आलटून-पालटून येत राहतात. अभिनय, संवाद, चित्रीकरण, पार्श्वसंगीत, गाणी ह्या सगळ्याचा एकसंध परिणाम इतक्या खोलवर भिडतो की आपण अंतर्मुख झाल्याशिवाय राहत नाही.
वास्तवातलं आणि संहिता लिहिण्याच्या ओघात स्वातंत्र्यपूर्व काळातलं अशी दोन समांतर आयुष्य जगताना, "माणूस स्वत:ची संहिता स्वत: कधी लिहू शकेल ?" असा रास्त प्रश्न रेवतीला पडतो तर God is a bad scriptwriter असं शिरीनला तिच्या अनुभवावरुन वाटून जातं. ’संहिता’ बघताबघता अगदी प्रकर्षाने मनात आलं की आपल्या आयुष्याची संहिता कुणी अज्ञात शक्ती लिहित असेलही पण त्या संहितेतल्या गाळलेल्या जागा आपण भरतो का ? Do we really read between the lines ? ... शेवटी लिहिलंय काय ह्याइतकंच ते वाचलं कसं जातंय हेही महत्त्वाचं ...कदाचित जास्तच !
अगो.........खूप छान लिहिलयस
अगो.........खूप छान लिहिलयस परीक्षण!
खूप इच्छा आहे हा चित्रपट बघण्याची...............
छान लिहिले आहे ... बघायची
छान लिहिले आहे ... बघायची उत्सुकता वाढली आहे...
शेवटी लिहिलंय काय ह्याइतकंच
शेवटी लिहिलंय काय ह्याइतकंच ते वाचलं कसं जातंय हेही महत्त्वाचं>>
खरंय अगदी.
अगो, छान लिहिलं आहेस
अगो, छान लिहिलं आहेस
धन्यवाद मानुषी आणि प्राची.,
धन्यवाद
मानुषी आणि प्राची., नक्की बघा आणि लवकर बघा ! अतिशय सुरेख चित्रपट आहे.
रच्याकने, मी थोडं-फार मराठी समजणार्या माझ्या बंगाली मैत्रिणीसोबत पाहिला. तिलाही खूप आवडला. 'हा एकदा बघण्याचा चित्रपट नाही. थोडा मुरल्यावर काही दिवसांनी परत बघायला आवडेल.' अशी तिची प्रतिक्रिया होती
’संहिता’ बघताबघता अगदी
’संहिता’ बघताबघता अगदी प्रकर्षाने मनात आलं की आपल्या आयुष्याची संहिता कुणी अज्ञान शक्ती लिहित असेलही पण त्या संहितेतल्या गाळलेल्या जागा आपण भरतो का ? >>>>> वा, सुरेखच लिहिलंय .....
मुद्दाम वेळ काढूनच बघायला पाहिजे हा चित्रपट .....
>>ह्या चित्रपटाला एक ठेहराव
>>ह्या चित्रपटाला एक ठेहराव आहे, एक लय आहे जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदाही हलत नाही. एखाद्या कसलेल्या गायिकेनं एकापाठोपाठ एक अलगद आवर्तनं घेत मधूनच लीलया समेवर यावं तसे दोन काळ आलटून-पालटून येत राहतात. >>
अगो, लेख आवडला.शेवटले दोन्ही परिच्छेद अप्रतिम.
>>ह्या चित्रपटाला एक ठेहराव
>>ह्या चित्रपटाला एक ठेहराव आहे, एक लय आहे जी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदाही हलत नाही. एखाद्या कसलेल्या गायिकेनं एकापाठोपाठ एक अलगद आवर्तनं घेत मधूनच लीलया समेवर यावं तसे दोन काळ आलटून-पालटून येत राहतात. >> वा! हे आवडलंच! छान लिहिलं आहेस अगो.
मस्तच लिहिले आहे, हा सिनेमा
मस्तच लिहिले आहे, हा सिनेमा परत एकदा बघावा असं वाटतंय
वाह! अगदी साध्या सोप्या
वाह! अगदी साध्या सोप्या शब्दांत छान लिहिलंत
फक्त एक दुरुस्ती कराल का? 'अज्ञान' शक्ती नव्हे, 'अज्ञात' असे हवे.
harshalc, टायपो लक्षात आणून
harshalc, टायपो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल केला आहे.
धन्यवाद सर्वांना