दसरयाला काय नविन गोड पदार्थ करुन पाहु म्हणुन शोधाशोध चालु होती. घरात बेसणाचे मोठे पाकिट, तुपाचा भरलेला डब्बा होता. या साहित्यापासुन काय करता येइल असा विचार करत होते. तेव्हा या पदार्थाची रेसिपी मिळाली. हा प्रकार आपल्याकडे बहुधा सर्वजण विकतच आणत असावेत. दक्षिणेकडील राज्यात हा पदार्थ घरी बनवतात असे कळले. कृती म्हटली तर सोपी, म्हटली तर थोडी किचकट, पण एकदा याचे टेक्निक कळले कि पटकन करता येण्याजोगा हा प्रकार आहे.
तर याचे साहित्य खालीलप्रमाने
१. दिड वाटी बेसण
२. एक वाटी साखर ( मला गोड कमी लागते. तुम्ही दिड वाटी घेउ शकता)
३. एक किंवा ३/४ वाटी तेल
४. एक किंवा ३/४ वाटी तुप
५. वेलची पुड / केशर काडया ( ऐच्छिक)
कृती :
१. प्रथम बेसण चाळुन घ्या.
२. आता बेसण भिजुन त्याची पेस्ट तयार होईल इतके तेल घाला. हि कृती दोन प्रकारे करता येते. एक तर तुम्ही थंड तेलात बेसन भिजवुन त्याची पेस्ट तयार करा किंवा अर्धी वाटी तेलाचे कडकडीत मोहन तयार करुन ते बेसनात घाला. तेल बेसणाला नीट लागेल असे ढवळा.
३. आता एका मोठया कढईत एक ते दिड वाटी साखर घेउन त्यात अर्धी वाटी पाणी घालुन त्याचा एकतारी पाक बनवायला सुरु करा. पाक चमच्याने सतत ढवळत रहा. आच मंद असु दया.
४. दुसरया गॅसवर एका पॅनमध्ये तुप गरम करायला ठेवा. तुप चांगले कडकडीत झाले पाहिजे. नुसते गरम नाही. बेसण भिजवताना तेल उरले असेल. तर ते तेलही तुम्ही या तुपात मिसळु शकता.आच मंद असु दया.
५. साखरेचा पाक एकतारी बनला आहे कि नाही ते एक थेंब बोटाच्या चिमटीत पकडुन तपासा. लक्षात ठेवा आपल्याला एकतारी पाकच हवा आहे. पाक तयार झाल्यावर त्यात वेलची पुड किंवा दुधात भिजवुन ठेवलेल्या केशर काडया घाला.
६. आता या पाकात बेसणाची पेस्ट किंवा तेल चोळलेले बेसण घाला. चमच्याने सतत ढवळत रहा. बेसणाच्या गुटळ्या रहाता कामा नयेत. सतत ढवळत राहणे अंत्यत आवश्यक आहे.आच मंद असु दया.
७. आता दुसरया बाजुला जे तुप गरम करायला ठेवले होते. ते एक एक चमचा करत या मिश्रणात घाला व सतत ढवळत रहा. तुपाचा गॅस बंद करु नका. तुप सतत कडकडीत गरम ठेवायचे आहे.एक एक चमचा तुप हळु हळु करत मिश्रणात घालत रहायचे व मिश्रण सतत ढवळत रहायचे.
८. सर्व तुप घालुन झाले कि मिश्रण सतत ढवळत ठेवायचे. हळु हळु ते कडेने सुटु लागेल व त्याला जाळी पडु लागेल.
९. आता एका तेल लावलेल्या (तुप नव्हे) ताटात हे मिश्रण काढुन घ्यावे.
१०. आठ ते दहा मिनिटांनंतर सुरीने चौकोनी वड्या कापाव्यात. मैसुरपाक थोडा गरम व मउ असतानाच वडया पाडाव्यात कारण एकदा तो थंड झाला कि खुटखुटीत होतो व नंतर वडया पाडता येत नाहीत.
११. मैसुरपाक हवाबंद डब्ब्यात भरुन ठेवावा. महिनाभर तरी चांगला रहातो.
१२. मैसुरपाक बनवायला अर्धा ते पाउन तास लागतो.
मी केलेल्या मैसुरपाकाचा हा फोटो. मी पुर्ण जाळी पडेपर्यंत काही धीर धरला नाही. त्यामुळे बाजारात मिळणारया मैसुर पाकापेक्षा कमी जाळी दिसत आहे. पण तुम्ही अजुन थोडा धीर धरा व चांगले जाळी पडेपर्यंत ढवळा, मग ताटात काढुन घ्या. मी पहिल्यांदाच मैसुरपाक करुन बघितला. अगदी बाजारात मिळणारया ताज्या मैसुरपाकासारखीच सुरेख चव होती. दिवाळीसाठी गोड पदार्थ म्हणुन हा प्रकार करुन बघता येइल. हा प्रकार झटपट होतो व टिकाउ देखील आहे.
माहितीचा स्त्रोतः
आपलेच गुगल महाराज
व्वा... मस्तच...मला
व्वा... मस्तच...मला आवडतो....आता या दिवाळीला करून बघनार.....................
चांगली डिटेल कृती दिलीय. या
चांगली डिटेल कृती दिलीय.
या अगोदर मी इथेतिथे वाचून मैसूरपाक करायचा प्रयत्न केला होता तो पूर्ण फसला.
मैसूरवड्या झाल्या.
आता अश्या करून बघते.
नक्की करुन बघण्यात येईल
नक्की करुन बघण्यात येईल
छान आहे. फोटो मस्त!! वाचून
छान आहे. फोटो मस्त!!
वाचून सोपी वाटतेय कृती, मी करून बघेन.
खूप आवडतो साजूक
खूप आवडतो साजूक तूपातलाच.
करायचे म्हणजे कष्ट आहेत. पण एकदा करेन...(तो एकदा यायला मुहुर्त हवा)
मला खुपच आवड्तो.. फोटो मस्तच!
मला खुपच आवड्तो.. फोटो मस्तच!
अहाहा! जीभेवर मैसुरपाक
अहाहा! जीभेवर मैसुरपाक विरघळल्याची चव आली
वाह ....मस्तच
वाह ....मस्तच
वा मस्तच.
वा मस्तच.
मी पण प्रयत्न करेन नक्कीच
मी पण प्रयत्न करेन नक्कीच
मस्त मस्त
मस्त मस्त
यशस्विनी प्रयत्न यशस्वी झालाय
यशस्विनी प्रयत्न यशस्वी झालाय की.:फिदी: मस्त दिसतायत वड्या. दोन्ही प्रकारचा पाक खाल्लाय, आपल्याकडचा कडक आणी साऊथकडचा मऊ मोहनथाळसारखा. मऊ जास्त आवडला. मऊला जाळी नसते. पण हा प्रकार करुन पहाण्यात येईल. धन्यवाद यशस्विनी.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
छान दिसतोय. मी टीव्हीवर
छान दिसतोय.
मी टीव्हीवर पाहिलेल्या कृतीत गंज (रुंदीपेक्षा जास्त उंचीचा टोप) वापरायचा होता. तसंच मेसूरपाक झाल्यावर चाळणीत काढून त्यातले तूप निथळून जाऊ द्यायचे होते.
छान जमलाय. आमच्याकडे
छान जमलाय. आमच्याकडे दाक्षिणात्य शेजार्यांकडून दिवाळीला येतो. घरी मात्र करत नाही. तूप वगैरे अति वाटतं.
धन्यवाद मयेकर, दिनेशदा मयेकर
धन्यवाद मयेकर, दिनेशदा
मयेकर मी केलेल्या कृतीत कडकडित तूप वापरुन मिश्रण सतत ढवळत ठेवल्यामुळे हळु हळु तूप मिश्रणात पुर्णतः मुरते. मैसुरपाक थंड झाल्यावर खुटखुटीत होतो.तूप निथळावे लागत नाही.
रश्मी, मउ मैसुरपाक करतानाची कृती अशीच आहे फक्त कडकडीत तूप वापरायची गरज नाही. जाळी पडेपर्यंत ढवळत ठेवायचे नाही. त्याआधीच्या स्टेजला मिश्रण ताटात काढुन वडया पाडायच्या. मउ वडया होतात. मउ मैसुरपाक हि दाक्षिणात्य पद्धत आहे. यासाठी काही लोक साखर पाकात अर्धी वाटी दुध देखील घालतात.
यशस्विनी मी काल घरी ही रेसिपी
यशस्विनी मी काल घरी ही रेसिपी केली. मला जमला बनवायला. सेम तुमच्यासारखाच जमला. सगळ्यांना खूप आवडला.
यशस्विनी फोटो मस्तच हं...
यशस्विनी फोटो मस्तच हं... कृती सोपी करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद. मी पण मैसुरपाक बनवण्याचा प्रयत्न करीन.
धन्स हेमांगी इथे
धन्स हेमांगी इथे कळविल्याबद्दल
स्मिता धन्स, नक्की करुन बघ
मस्तच पाकृ.. चेन्नै ला पांढरा
मस्तच पाकृ..
चेन्नै ला पांढरा मैसुरपाक मिलतो . तो कसा करतात कल्पना आहे का ?
धन्यवाद शाहिर.. पांढरया
धन्यवाद शाहिर.. पांढरया मैसुरपाकाविषयी काही कल्पना नाही. पण दक्षिणेकडे मउ मैसुरपाक करतात ज्याची थोडक्यात कृती वरील प्रतिक्रियेच्या पोस्ट मध्ये दिली आहे.
लेखात फोटो दिसत नाहीत पण
लेखात फोटो दिसत नाहीत पण क्रमवार पाककृती बेस्ट दिलीत.
... तेल उरले असेल तर ते तुम्ही तुपात मिसळु शकता...
हे मात्र करून नये, लगदा होईल.
आवडत्या पण कमी खायला मिळणाऱ्या मिठाईमध्ये ह्याचा नंबर.
पांढरा नाही पण इतक्यात ताडाचा गूळ वापरून केलेला मैसूरपाक खाल्ला. डीप ब्राऊन रंग, थोडा कमी गोड, जाळीदार. स्वर्गीय चव.