सार्थकतेच्या शोधात .... संहिता

Submitted by केदार जाधव on 18 October, 2013 - 02:07

सार्थकतेच्या शोधात ... ही या चित्रपटाची Tagline . आणि हाच या चित्रपटाच्या संहितेचा गाभा .
आपली संहिता आपल्यालाच लिहिता का येत नाही असा प्रश्न पडला नाही असा मनुष्य विरळाच . पण ती स्क्रिप्ट आधी लिहिली नसतेच , तुम्ही स्वतः ती लिहित असता हे लक्षात येण महत्वाचं.
चित्रपट एकाच वेळी अनेक पैलूंवर भाष्य करतो .
पण मला सर्वात आवडलेला पैलू (ज्याच्याशी मी रिलेट होऊ शकलो) म्हणजे यात सर्वच पात्रे माणसं आहेत ,थोडी चुकीची ,थोडी बरोबर आहेत.
लहानपणापासूनच आपल्याला चांगला आणी वाईट (रूढार्थाने नायक आणी खलनायक ) हे भेद करायला शिकवल जात . नायक हा सद्गुणांचा पुतळा असतो , तो चुकीचे काही करूच शकत नाही आणि त्याउलट खलनायक .
पण खरच अस असत का ? आपल्या रोजच्या आयुष्यात आपणच नायक आणी खलनायक दोन्ही असतो ना ?
इथेही तसच आहे . या चित्रपटात एका चित्रपटाची संहिता पूर्ण करण्याच काम सुरू आहे . "त्या चित्रपटाची कथा ही म्हणायला गेल तर एक प्रेमत्रिकोण आहे १९४६ सालातला, एक राजा , राणी अन दरबारातील गायिका यांचा . तिघेही आपापल्या ठिकाणी आपापल्या नजरेतून बरोबरच वागत आहेत . ती कहाणी अपूर्णच आहे. पण कहाणी पूर्ण तर व्हायलाच हवी ना ?" त्याच वेळी ही संहिता लिहिणारी रेवती , तिचा नवरा रणवीर अन गायिकेच्या रोल साठी निवड झालेली हेमांगिनी यांच्याही आयुष्यात वादळ उठलेले आहे.
उत्तरार्ध आहे ही कहाणी पूर्ण करण्याचा प्रवास . एकाच वेळी आपण ती वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून पहात असतो . कुणाला ती समर्पणाची कथा वाटते , तर कुणाला त्यात शोषण दिसत . तर कुणी ही स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याची कहाणी म्हणून पहात . कुणाला याचा दु:खांतच होऊ शकेल अस वाटत , तर कुणी तिघांनाही जे हवे ते मिळाल अस होऊ शकेल का याचा विचार करत .
या कहाणीचा शेवट काय होतो ? ज्या "सार्थकतेच्या शोधात" सगळे असतात ती मिळते का ? की God is a bad Scriptwriter हेच खर ? प्रत्येक पात्राच्या आयुष्यात काय बदल होतात ? हे पाहण्यासाठी संहिता पहायलाच हवा . यात दोन आणखी उपकथानकेही आहेत जी तितकीच महत्वाची आणी सशक्त आहेत . पण सगळ लिहिण योग्य नाही .
अभिनय हे या चित्रपटाच बलस्थान आहे . देवकी दफ्तरदारानी स्वतंत्र विचारांची आधुनिक महिला आणी आपल्या वाचनाचा , ज्ञानाचा गर्व असलेली , व्यक्तिस्वातंत्र्य हवी असणारी राणी दोन्ही समर्थपणे उभ्या केल्या आहेत . राजेशवरीनेही गायिकेच्या भूमिकेत जान ओतलीये. पण लक्षात राहतो तो मिलिंद सोमण . एक अगतिक,vulnerable राजा आणी नवरा त्याने अप्रतिमपणे साकारलाय . ज्योती सुभाष आणि उत्तरा बावकर यांचा अभिनय नेहमीप्रमाणे परफेक्ट .
दुसर बलस्थान म्हणजे संवाद . चित्रपट संपल्यावरही ते तुमच्या डोक्यात रूंजी घालत असतात . एकच उदा. देतो . राणीला प्रेम म्हणजे काय हे समजावताना पुरूभैया तिला प्रेम हे एक वस्त्र आहे , ते दोघानी मिळून विणायच असत , धागा तुटला तर परत जोडायचा असतो , यावर राणीच उत्तर असत "कुणी ?" . केवळ त्या एका कुणीने राणीचे विचार आपल्यापर्यंत पोचतात.
तिसर म्हणजे संगीत . आरतीजीनी म्हटलेली सगळीच गाणी अप्रतिम , विशेषतः "क्या यही था जुर्म" . त्याच बरोबर शेवटच "मन" ही मस्तच .
चौथ म्हणजे कोल्हापूरच्या राजवाड्याच अप्रतिम चित्रण . एक न एक फ्रेम सुंदर आहे . जुना काळ उभा करण्यावरही बरीच मेहनत घेतलेली जाणवते.

पु न गाडगीळांचे दागिनेही छान आहेत . पण तो आपला प्रांत नोहे. Happy
एकूणातच एक परिपूर्ण चित्रपट . जरूर पहावा असा .
आपली मायबोली यात सहभागी असल्याचा अभिमानही आहेच.

आता थोडेसे प्रिमिअर विषयी :
काशी , अरूंधती , पौर्णिमा ,हर्पेन , चैतन्य , सई , अतुल , मी पुणेकर आणी इतर माबोकरांबरोबर प्रिमिअरला धमाल आली . विषेशत: काशी आणि अरूंधतीचा मिसो बरोबर फोटो काढण्याचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मी लहान आहे ही मला नवीनच कळल . Wink साजिरा आणि चिनूक्स अर्थातच संयोजनात बिझी होते.
मिसो ,देवकी , सुमित्रा भावे , मोहन आगाशे या सर्वांबरोबर फोटोसेशन झाल . अमोल पालेकरही आले होते.
चित्रपटाआधी सर्व कलाकारांच्या ओळखीचा कार्यक्रमही छान झाला . शो नंतर निर्मात्याना ऑडिओ रिलीज करण्यासाठी बोलवायचे ठरले , पण १० वाजत आल्याने ऐनवेळी ते रद्द्द झाले.
एका सुंदर अनुभवासाठी मायबोलीचे अनेकानेक आभार Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहेस केदार.

चित्रपट अप्रतिम आहे. खूप खूप दिवसांनी एक अतिशय प्रगल्भ चित्रपट पहायला मिळाला, ज्यात काहीही लूज एन्ड्ज नाहीत. यातली एकूणएक गोष्ट, एकूणएक पात्र, एकूणएक शब्द अगदी पर्फ़ेक्ट असेच आहेत. ना कम ना ज्यादा. यातली एकूणएक फ़्रेम देखणी आहे. यातली निर्मिती मूल्य खरोखरीच उच्च आहेत. कुठेच ’चालतंय’ असा ऍटिट्यूड नाही, त्यामुळे सिनेमाही देखणा झाला आहे. नायिकांच्या अंगावरचे अस्सल सोन्याचे पारंपरिक दागिने पाहून डोळे निवले, तसेच देविका आणि राजेश्वरीचा क्षणिक हेवाही वाटला Happy पुरुषांचे कपडे, दागिने, पगड्या, त्या काळचा माहौल आणि याही काळातल डिटेलिंग अतिशय समाधान देऊन गेलं.

पॅरलल ट्रॅक्सवर चालणारे सिनेमे अनेक निघालेले आहेत. पण एक ट्रॅक दुसर्‍यात कधी आणि कसा मिसळतो हेच पहाणं अतिशय इन्टरेस्टिंग असतं. भावे-सुखथनकरांना हे जमलेलंच आहे या सिनेमात. आपण सिनेमात इतके गुंततो, की त्या पात्रांबरोबर आपणही अनेक शक्यता पडताळून पहायला लागतो आणि आपण त्या जागी कोणता निर्णय घेतला असता बरं असा विचारही करायला लागतो. हेच चित्रपटाचं यश आहे- आपल्याला त्याच्या समवेत तो घेऊन पुढे सरकतो.

अभिनयाबाबत काय सांगावं? देविका, राजेश्वरी, ज्योती सुभाष यांनी कमाल केली आहे. उत्तरा बावकरांना कमी रोल आहे, पण अर्थातच त्यांनी तो सुंदर केला आहे आणि रॉयल दिसल्या आहेत. मिसोच्या अभिनयाबाबत पास. पण तो दिसतो जसा अपेक्षित आहे तसाच Happy गाणी अप्रतिम अशीच आहेत. ती ऐकावीत आणि अनुभवावीत, बस्स!

एक सुंदर अनुभव देणारा अभिरुचीसंपन्न चित्रपट आहे ’संहिता’ आणि तो कोणीच खरोखर चुकवू नका.

तटी १) चिन्मय, ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. प्रॉडक्शन टीमचा तूही एक सदस्य होतास, म्हणून तुझे खास अभिनंदन.

२) मॉबसीनमधली इतरांना अजिबात दिसणार नसली, तरी आम्हाला आमची माणसं दिसली Wink

धन्यवाद पौर्णिमा ,
हे ’संहिता’ ग्रूपमध्ये कस हलवायच ? की तिथे परत नवा धागा काढावा लागेल ?

केदारः (नसलास तर) आधी 'संहिता' ग्रूपचा सदस्य हो.
मग हा धागा संपादित कर. संपादनात तुला 'वाचकवर्ग' ऑप्शनमध्ये तू ज्या ज्या ग्रूपांचा सदस्य आहेस ती यादी दिसेल. तिथे संहिता सिलेक्ट कर आणि सेव्ह कर. ती यादी दिसली नाही, तर अ‍ॅडमिननांना साकडं घाल Proud

एकच उदा. देतो . राणीला प्रेम म्हणजे काय हे समजावताना पुरूभैया तिला प्रेम हे एक वस्त्र आहे , ते दोघानी मिळून विणायच असत , धागा तुटला तर परत जोडायचा असतो , यावर राणीच उत्तर असत "कुणी ?" . केवळ त्या एका कुणीने राणीचे विचार आपल्यापर्यंत पोचतात.>>>> +१

केदार, छान लिहिलं आहेस Happy

छान लिहिलं आहे केदार,खरोखर जिच्यात कुणीही खल नाही अशीच आहे ही संहिता.
पौर्णिमा >> मॉबसीनमधली इतरांना अजिबात दिसणार नसली, तरी आम्हाला आमची माणसं दिसली >>
अरे देवा, आम्हाला कशी कळायची ती ? आम्ही तर चिनूक्सलाही ओझरतंच पाहिलं ..

पौर्णिमा , तिथे "सामिल व्हा " येत नाहिये . Sad
This is a closed group. The group administrators add/remove members as needed.
अ‍ॅडमिननांना साकडं घालतो Happy

एक सुंदर अनुभव देणारा अभिरुचीसंपन्न चित्रपट आहे ’संहिता’ आणि तो कोणीच खरोखर चुकवू नका. >>>> बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपटाबद्दल इतके भरभरून लिहिलेले वाचायला मिळते आहे - ही जाणीवदेखील खूपच सुखद आहे...

आजपासून आहेत ना चित्रपटगृहांमध्ये ह्या चित्रपटाचे खेळ? पुणे, मुंबई व महाराष्ट्रात...

Back to top