समर्थाचिया सेवका....

Submitted by विशाल कुलकर्णी on 16 October, 2013 - 08:05

गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालली बळे
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥

गर्जता मेघ तो सिंधू । ध्वनीकल्होळ ऊठिला ।
कड्याशी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २ ॥

तुषार उठती रेणू । दुसरे रज मातले ।
वात मिश्रित ते रेणू । सीत मिश्रित धुकटे ॥ ३ ॥

दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटती छाया । त्या मधे वोघ वाहती ॥ ४ ॥

गर्जती श्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री । ध्वनी कल्लोळ ऊठती ॥ ५ ॥

कर्दमू निवडेना तो । मानसी साकडे पडे ।
विशाळ लोटती धारा । ती खाले रम्य वीवरे ॥ ६ ॥

विश्रांती वाटते तेथे । जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा । सार्थके काळ जातसे ॥ ७ ॥

अगदी शांतपणे , फार फार शेजारच्या व्यक्तीला ऐकु जाईल इतक्या मोठ्या स्वरात रघु अगदी श्रद्धेने गात होता. कधी कधी शांतताच बोलकी होते आणि मग त्या बोलक्या शांततेचे मौन भंग करण्याचे धाडस करायची इच्छा होत नाही. आपल्याही नकळत त्या शांततेच्या सुरात सुर मिळवत आपणही शांतपणे बोलायला लागतो. सर्वत्र पसरलेला काळोख , आकाशातल्या चांदण्यांचीच काय ती साथ. नाही म्हणायला मठात एक छोटासा विजेचा दिवा लुकलुकत होता पण तेवढाच. बाकी सगळा मिट्ट अंधार. कानात रातकिड्यांची किरकीर आणि त्या देखण्या जलपुरूषाचा धीरगंभीर स्वर.....! एकंदरीत सगळे वातावरण भारून टाकणारे.

आणि अशात आम्ही पाच मित्र, योगायोगही असा होता की यातले तिघे जण तर जवळ जवळ १५-१६ वर्षांनी भेटलेले. कॉलेज संपल्यावर "कुठे फिरविसी जगदिशा, पोटासाठी दाही दिशा" म्हणत उदरनिर्वाहाच्या पाठी कुठे-कुठे विखुरलेले मित्र फेसबुकच्या कृपेने परत मिळाले होते. आणि त्या सगळ्या जुन्या आठवणी परत जागवायच्या असे ठरवून एकत्र आले होते. त्या दिवशी अचानक रघ्याचा फोन आला. त्याला आमच्याच कुठल्यातरी जुन्या मित्राकडून माझा फोन नंबर मिळाला. त्याला स्वारगेटहून थेट घरी घेवुनच आलो. तेव्हाच बोलता बोलता ठरले की सगळे मिळून 'शिवथर घळीला ' जायचे . इतर तिघांशी बोलून सहकुटूंबच जायचे ठरले. खरेतर पुन्हा एकदा बॅचलर लाईफ अनुभवण्याची सगळ्यांची इच्छा होती. पण ठिक आहे..... असे तर असे.... भेटणे महत्वाचे. ऐनवेळी एक जण (मंग्या) गळाला, त्याला कंपनी टूरवर जायचे होते. पण बाकीचे तयार होते. शुक्रवारी रात्री सगळे कुलकर्ण्यांच्या घरी डेरे दाखल झाले. यापैकी दोघे जण सतीश खेडेकर आणि अरविंद गुमास्ते सद्ध्या बार्कमध्ये आहेत. मंग्या उर्फ मंगेश देशपांडे चेंबुरला आर.सी.एफ. मध्ये, तर रघ्या पुण्यात इन्फीला. नेहमीप्रमाणे नाना-नानीला पण तयार केले आणि शनिवारी सकाळी गंतव्याकडे रवाना झालो......

आणि 'मिशन शिवथरघळ' सुरू .....!

रघ्या उर्फ रघुनाथ शेवतेकर. पक्का रामदासी. त्यामुळे समर्थांची वचने बाबाच्या जिव्हाग्रावर. भोर मागे टाकून गाड्या वरंध घाटाच्या दिशेने पळायला लागल्या आणि आमची टकळी सुरू झाली.....

रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवरील घळ, रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा (प्रचंडगड) अशा दुर्गश्रेष्ठांच्या सान्निध्यात समान अंतर राखून असलेली. शिवकालीन महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणे येथून श्री समर्थांना अतिशय सोपे होते. सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या महाड या मुख्य ठिकाणापासून जेमतेम 25 किलोमीटर अंतरावर, डोंगराच्या बेचक्‍यात वसलेली ही घळ. घळीच्या डोक्‍यावरूनच शिवथर नदीचा प्रवाह अनामिक आतुरतेने कड्यावरून खाली झेप घेतोय, आजूबाजूला सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील जावळीच्या प्रसिद्ध खोऱ्यातील निबीड अरण्य... दिवसा भरदुपारी ज्या भागात सूर्याचे हात पोचत नाहीत त्याबद्दल रात्रीची केवळ कल्पनाच बरी! इथे महाडमार्गेही जाता येते आणि वरंध घाटातुनही. वरंध मार्गेची वाट थोडी जास्त खडतर आणि वेळखाऊ आहे. पण आम्ही हाच रस्ता निवडला होता. कारण वरंध घाटातला देखणा निसर्ग....

सुरूवात नीरा देवधरच्या धरणापासून झाली. भोरपर्यंत आभाळ कोरडे होते. पण भोर ओलांडले आणि वरुणराजाने हजेरी लावलीच.

1

खालच्या बाजुला आम्ही ज्या रस्त्याने आलो, तो हिरवाईत लपलेला नागमोडी रस्ता दिसत होता..

2

आजुबाजुला चहूकडे पसरलेली हिरवळ, डोंगरातील दृष्य-अदृष्य जलप्रपातांचे गर्जून उरात धडकी भरवणारे धीर-गंभीर स्वर , अव्याहतपणे चालू असणारी पावसाची रिपरिप, डोंगरांच्या बेचक्यात, झाडांच्या फांद्यात अडकून पडलेला नाठाळ वारा... ! आपलं "स्वत्व , आपलं 'अस्तित्व' विसरायला भाग पाडणारे वातावरण आणि तशातच एखाद्या एकाकी साधकाप्रमाणे संन्यस्त, समाधीरत भासणारा एखादा भर पाण्यात असून कमलदलासारखा अलिप्त वठलेला वृक्ष....... !

3

आमची बडबड अविरत चालुच होती. अरु अधुन-मधुन मोबाईलमार्फत संपर्क ठेवून होता. जुन्या आठवणी, कॉलेजमधल्या भानगडी. बोटक्लबवरच्या कँटीनमधली उधारी.... एक ना दोन गप्पांचे विषय प्रचंड होते. नाना सुरुवातीला थोडासा बुजला होता. पण थोड्याच वेळात तोही रुळला. सकाळचे साडे दहा वाजून गेले असावेत. एवढ्यात आमचा फोन वाजला. पोरांना भुकेची जाणिव झालेली होती. आम्ही बर्‍यापैकी वरंधच्या मध्यापेक्षाही पुढे आलो होतो. घाटाच्या शेवटच्या टप्प्यात एका ठिकाणी काही छोटे छोटे धाबावजा हॉटेल्स आहेत. तिथल्याच पवार हॉटेल नामक धाब्यासमोर आम्ही थांबलो. पोरं आणि स्त्रीवर्ग लगेच अन्नब्रह्माच्या आराधनेत लीन झाला. अरुला बासरी वाजवायची लहर आली. नानालाही आता तल्लफ आवरेनाशी झाली होती. त्यामुळे आम्ही बाहेर थांबलो. अरुने पाकीट माझ्यापुढे केले आणि मी सिगारेट सोडली हे ऐकल्यावर तीघेही असे काही जोरजोरात हसायला लागले की पुछो मत... (कारणे सर्वांची सारखीच असतात. तेव्हा विचारू नयेत, फाट्यावर मारण्यात येइल Wink )

त्यांचे अग्निहोत्र सुरू झाले आणि मी, सत्या व रघ्या गप्पा मारत तिथेच उभे राहीलो. आजुबाजूला अतिशय सुंदर वातावरण होते. एखाद्या चित्रकाराने चित्र पुर्ण झाल्यावर सगळीकडे मनमुरादपुणे हिरवा रंग उधळून द्यावा तसे काहीसे चित्र होते... त्यात धुक्याचा गुढ वावरही अंमळ आपले अस्तित्व दाखवत होता. गिरीशिखरांची पांढर्‍या शुभ्र ढगांशी लपाछपी रंगलेली होती.

45678

रस्त्याच्या कडेने फुललेली सोनकी, तिळाची फुले तसेच अजुनही काही अनोळखी मित्र खुणावत होते.

91019

खाणे आटोपले आणि आता थेट शिवथर घळईत 'सुंदर मठा' पाशीच थांबायचे असे ठरवून निघालो. पण निसर्गाला ते मंजूर नसावे. जणु काही माझ्या दारात येवून मला न भेटता कसे काय जाऊ शकता तुम्ही? असेच मिश्किलपणे विचारत होता तो. पवार हॉटेल सोडल्यावर एकच वळण पुर्ण केले आणि जे काही समोर आले, तिथे थांबण्यावचून गत्यंतरच नव्हते. ती हिरवाई, ते सौंदर्य, निसर्गाचा तो मनोहर आविष्कार टाळून पुढे जाणे अगदी औरंगजेबालासुद्धा शक्य झाले नसते.

11121415

तिथल्या वळणावर बाजुला असलेली मोकळी जागा बघून गाड्या पार्क केल्या आणि त्या शांत वातावरणात आमचा गोंधळ सुरू झाला.

161718

आमच्या बरोबर असलेली सायलीच्या बहिणीची मुलगी सई तर सॉलीड खुश होती. तिथे एक गंमतच झाली. आमच्यामागून आलेली एक स्कोडा तिथेच थांबली. त्या गाडीतून एक चौकोनी कुटूंब उतरले. नवरा-बायको आणि त्यांची दोन मुले. गाडी महा- बाराचीच होती. त्या गृहिणीने आपल्या गाडीच्या डिक्कीतून एक पॉलीथिनची पिशवी काढली आणि त्यातून चार कागदी डिशेस काढून काहीतरी खायला काढले व खायला सुरूवात केली. सायलीच्या कडेवर असलेल्या 'सई'ने अस्सल पंढरपुरी स्वभावाला जागत त्या वहिनींना विचारले...

"तुम्ही काय खाता?"

ते पुणेरी कुटुंब असावे बहुदा. त्यापैकी दोन्ही मुलांनी (एक मुलगा आणि एक मुलगी) लगेच आमच्याकडे पाठ फिरवली आणि दरीच्या दिशेने तोंड करत खायला सुरूवात केली. या बयोने परत विचारले, "तुम्ही काय खाता?" शेवटी नाईलाजाने त्या वहिनींनी चेहर्‍यावर उसने हसू आणत सांगितले.

"आम्ही भेळ खातोय. तुला हवीये?"

"च्याक, मी कुक्के (कुरकुरे) खातेय." कारटीने सरळ पोपटच केला त्यांचा. वर तोंड उघडून तोंडातले कुक्केसुद्धा दाखवले त्या बाईंना.... पुढची पाच-दहा मिनीटे कारटी प्रत्येकाला तोंड उचकून दाखवत होती. शेवटी न राहवून मी सायली आणि सई, दोघींना उभे करून त्याच पोजमध्ये एक स्नॅप मारलाच.

19

इथुन मात्र निघालो ते थेट शिवथर घळईपाशीच थांबलो. वरंध घाट उतरल्यावर शिवथर घळईकडे जाणारे दोन मार्ग आहे. घाट संपल्यावर लगेचच उजव्या बाजुला एक कमान आहे जिथून शिवथरघळीकडे जाणारा रस्ता आहे. आम्ही जाताना याच रस्त्याने गेलो, पण हा रस्ता फार म्हणजे फारच खराब आहे. अंतर फक्त सहा किमी आहे पण दरीत उतरणारा, वळणावळणाचा आणि सगळीकडे उखडलेला रस्ता. त्यात समोरून एखादे वाहन आले की एका बाजुला थांबून त्याला जागा द्यावी लागते कारण रस्ता अगदीच अरुंद आहे. या रस्त्याऐवजी तसेच महाडच्या दिशेने पुढे गेल्यास सात किमीवर बारसगाव म्हणून एक गाव लागते. तेथुनही घळीकडे जाणारा एक रस्ता आहे. बारसगावफाट्यापासून शिवथर घळ अजुन १५ किमी आत आहे. म्हणजे बारसगाव फाट्यापासून गेलो तर २२ किमी चा पट्टा आहे, तेच पहिल्या रस्त्याने ६ किमी. पण बारस गावहून जाणारा रस्ता खुपच चांगल्या स्थितीत आहे. (आम्ही दुसर्‍या दिवशी पहाटे परतताना तो मार्ग निवडला)

शिवथर घळीच्या रम्य आणि पवित्र परिसरात आपल्या स्वागतार्थ एकशिवड्या अंगाची शिवथर नदी सिद्ध असते.

20

एखाद्या खळाळत्या झर्‍याप्रमाणे मंद्र स्वरात नाद करत वाहणारी शिवथर ओलांडून तुम्ही सुंदरमठाच्या पवित्र परिसरात पाऊल ठेवता आणि मग अस्तित्वाचे भान विसरायला होते. श्री समर्थांच्या त्या मठीवर एखाद्या कुटुंबपरायण पित्याप्रमाणे आपली शितल छाया ठेवून असलेल्या त्या जलप्रपाताच्या स्वरा-स्वरातून एकच नाद जाणवायला लागतो....

"जय जय रघूवीर समर्थ "

2122

त्या जलपुरूषाच्या संमोहनातून बाहेर पडलात की समोर येवुन उभी ठाकते 'सुंदरमठाच्या प्रवेशद्वाराची कमान ' ! कितीही अलिप्त राहायचे ठरवले तरी माथा नमतोच. श्रीमद दासबोधासारख्या महाग्रंथाच्या रचनेसाठी असले विलक्षण स्थान शोधून काढणार्‍या समर्थांच्या रसिकतेची दाद द्यावी, रायगड, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमेवरील ही घळ, रायगड, राजगड, प्रतापगड, तोरणा (प्रचंडगड) अशा दुर्गश्रेष्ठांच्या सान्निध्यात समान अंतर राखून असलेली. शिवकालीन महाराष्ट्राच्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणे येथून अतिशय सोपे होईल या श्री समर्थांच्या दुरदृष्टीला दंडवत घालावा की आपण त्या काळात जन्माला का नाही आलो असे म्हणत स्वतःच्या नशिबाला दोश द्यावा या विचारात आपण श्री समर्थांच्या चरणी नतमस्तक होत, समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या त्या पवित्र घळीकडे जाण्यासाठी पावले उचलतो.

23२४

पायऱ्या चढून गेल्यावर समोरच 'शिवथर घळ सुंदरमठ सेवा समिती'ची इमारत लागते. या इमारतीमध्ये पर्यटकांच्या राहण्याची सोय केली जाते. शिधा दिल्यावर इथे जेवणाची सोयही होते. इमारतीवरून जाणारा रस्ता थेट घळीपाशी जातो. या घळीमध्ये बसून समर्थांनी दासबोध ग्रंथाची रचना केली. सुंदर मठ सेवा समीतीच्या इमारतीकडून समर्थांच्या घळईकडे जाणारा रस्ता. इथे मात्र लोखंडी गर्डर्स टाकून निसर्गाची अवहेलना केल्यासारखे वाटले.

२५

याचसाठी केला होता अट्टाहास म्हणत श्रद्धेने आम्ही त्या पवित्र स्थानात प्रवेश केला.

26

या स्थानाचे समर्थांनी केलेले वर्णन वरील कवितेत आलेले आहेच. समर्थ म्हणतात, " गिरीचे मस्तकी गंगा , तेथुनि चालली बळे , धबाबा लोटती धारा , धबाबा तोय आदळे..".

काळ नदीच्या पवित्र परिसरातील ही घळ धुळ्याचे समर्थभक्त शंकरराव देवांनी 1930 च्या दरम्यान शोधून काढली. घळ साधारण सव्वाशे फूट लांब व पाऊणशे फूट रुंद आहे. इथे श्री समर्थांनी स्थापलेले श्री रामाचे सुंदर मंदीर आहे. यात श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि समोर बसलेल्या मारुतीरायाच्या सुंदर मुर्ती आहेत.

27

तसेच हातात लेखणी घेवून बसलेले श्री कल्याणस्वामीं आणि त्यांना दासमोध सांगणारे श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनोहारी मुर्तीदेखील इथे आहेत.

28

व्यवस्थीत दर्शन झाले. तोपर्यंत पाऊसही थांबलेला होता. मुक्कामाचे ठरलेले असल्याने सुंदर मठ समीतीच्या पुजारीकाकांची परवानगी काढली. तिथेच आवारात जेवण केले. आजुबाजुला बरीच पायी भटकंती झाली. रात्र झाल्यावर चिल्ली-पिल्ली आणि महिलामंडळ तिथेच सुंदर मठाच्या शेडमधे आडवे झाले आणि मैफल सुरू झाली.....

सुरूवात जरी श्री समर्थांच्या वरील काव्याने झालेली असली तरी जवळ-जवळ १५-१६ वर्षांनी भेटत असल्याने गप्पांचे विषय फार वेगवेगळे होते. त्यावर इथे चर्चा करणे योग्य नाही.

तेव्हा इथेच......

२९

( शेवटचा श्री समर्थांचा फोटो आंतरजालावरून साभार )

जय जय रघुवीर समर्थ !!

विशाल....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! बर्याच दिवसांनी विशाल्-दर्शन! मस्त लेख, अप्रतिम प्रचि.
घळीत जायचा योग कधी एणार कोणास ठावुक?

अप्रतिम वर्णन आणि फोटो. Happy एकदम जावंसंच वाटलं.

बाकी >>निसर्गाचा तो मनोहर आविष्कार टाळून पुढे जाणे अगदी औरंगजेबालासुद्धा शक्य झाले नसतं >> ह्या वाक्याचा निषेध, औरंगजेब रसिक नव्हता असं कोण म्हणलं?

विशालदा, मस्त प्रचि आणि प्रवासवर्णन.

समर्थांचे नाव घेतल्यावर आणखी कशाची आठवण येते का? स्म्रुतीवर जरा जोर द्याच.

'जलपुरुष ' शब्द आवडला. त्याचे वर्णन करायला समर्थांचे शब्दच हवेत. कधीही वाचले तरी अंगावर शहारे आणणारे.

लेख मस्तच , प्रचि अगदी देशांतराला घेऊन जाणाऱ्या .

छान फोटो.

विशाल, कॅमेरा बदलला का ? नेहमीपेक्षा वेगळ्या शैलीतले आहेत फोटो. आता मला वॉटरमार्क नसला तरी
मायबोलीकरांचे फोटो बघून, त्यामागचा कलाकार ओळखता येतो.

मस्स्त! आपला सह्याद्री असाच नटलेला आहे. तुम्ही सगळे कसलेले फोटोग्राफर्स ही पर्वणी आम्हाला देतच असता.

श्रीराम, सीता आणि लक्ष्मण बघायला परत परत स्क्रोल करतेय. मी अजून तिथे जाऊन नाही आलेय ना! Happy

विशाल ....सुंदर वर्णन आणि फोटोही मस्त. रामसीतालक्ष्मणाच्या मूर्ती काय देखण्या आहेत.
गेलच पाहिजे एकदा इथे!

धन्यवाद मंडळी !

दिनेशदा, कॅमेरा तोच आहे. निकॉन डी ५००० ! हा यावेळी फोटो काढताना अँगल बदलण्याचा प्रयत्न केलाय थोडासा. तुमच्या प्रतिसादावरून त्यात थोडे यश मिळाल्याचे जाणवतेय. धन्यवाद Happy