शेवटी कुमारच्या हट्टापुढे प्रियाचं काहीच चाललं नाही. ती मुकाट गाडीत बसली. त्याने हसून चावी फिरवली व तिच्याकडे पाहीलं. तिचा मुळचा गव्हाळ रंग आता त्याला लालेलाल भासु लागला.
"काय झाल ?" माहीत असुनही त्याने तिला खिजवलं.
"काही गरज आहे एवढ्या रात्री निघायची ? सकाळी निघालो असतं तर चाललं नसतं ? पण नाही... मी म्हणतो तेच खरं. कोणाचं ऐकशील तर शपथ." एकदाची त्याला बडबडून ती मोकळी झाली. थोडक्यात का होईना पण मनातलं सगळं कचकचून बाहेर आलं आणि तिचं तिलाच बरं वाटलं.
"गोड दिसतेस गं चिडलीस की." त्याने तिची ती चिडचिड मनावर घेतलीच नाही. तिने त्याच रंगात त्याच्याकडे पाहीलं आणि तो गोडसा हसला. तशी ती विरघळली. मुळात चिडणं हा तिचा पिंड नसला तरी तिचा प्रयत्न नेहमी असतोच तसा.
"कुमार... ?" तिच्या चिडचिडीची जागा लटक्या रागाने घेतली.
"ओ.के. रिलॅक्स." त्याने गिअर टाकला व गाडी सुरू केली आणि पुढच्या पाचच मिनिटात तो हवेशी गप्पा मारू लागला.
"यु नो प्रिया. आय लव लॉन्ग ड्राईव्ह. रात्रीच्या शांतता आणि त्यात तुझी सोबत..... अशा वेळी मौजच वेगळी असते. त्यात हे रिकामे रस्ते... निवांत पडलेले... सुमसाम... आणि अशी घाटवळणे....धमाल नुसती." बोलता-बोलता त्याने स्पीड वाढवला.
"कुमार, स्पीड कमी कर.... कमी कर." तिचा आवाज वाढला. त्याने स्पीड कमी करून तिच्याकडे पाहीलं.
"कमोन प्रिया, आय कॅन हॅन्डल इट."
"तरीही नाही. भलत्या वेळी नाहीच नाही. एक तर घाटातला इतका सुमसाम रस्ता आणि त्यात तुझं हे असं वेड्यासारखं गाडी पिटाळणं.... नो वे. काही कमी जास्त झालं तर धावणार कुठे आणि कोणाकडे ?" तिने कारणाची संपुर्ण यादीच सादार केली. त्याला पटली नसली तरी नव्या नवरीचा हिरमोड नको म्हणून त्याने स्पीड कमीच ठेवला.
"आणि नजर समोर ठेव. मी आहे इथेच. पळून नाही चालले." तिचा पुढील हुकुम आणि त्याने हसून नजर समोर फिरवली.
"किती वळणं रे या रस्त्याला ! "
"मोजली नाहीत गं. मोजू ?" त्याने तिच्याकडे पाहीलं.
"शट अप कुमार. उगाच पी.जे...... समोर....... समोर... कोणीतरी आहे... "
......................................................................................................................
अमावस्येच्या काळ्याकुट्ट अंधारात ती झोपडी दिसण्याचा प्रश्नच नव्हता. नवख्या माणसाला तर ते अशक्यच. नावापुरता उजेड तरी हवा त्यासाठी. पण तो ही नाही. पण एक अंधुकसा उजेड दिसला.
त्याने मेणबत्ती पेटवली आणि त्या प्रकाशात फक्त चेहराच दिसला त्याचा. काळासावळा वर्ण, कपाळावरच्या सुरकुत्या, मागे फिरवलेले, पिकलेले आणि उरलेले केस, दाढीचे वाढलेले पांढरे खुंट व उडी मारून, रांग सोडून पुढे आलेले दोन दात, गळ्याच्या मोजता येतील इतक्या शिरा, नुसताच सापळा वाटावा असा काटकुळा देह. क्षणभर ज्योत देखील शहारली त्याला पाहून. तो पुढे सरला. सराईतपणे त्या अंधारात.... मेणबत्तीच्या अंधुक प्रकाशात त्याने आपला डावा हात पुढे करून टेबल चाचपडलं. मागोमाग त्यावरचा कंदिल आणि ज्योत पेटवली. थोडाफार प्रकाश पडला त्या झोपडीत. चार पाच खाटा व त्यावर आडव्या टाकलेल्या फळ्या, फळ्यांवर स्टीलचे जग, तीनचार ग्लास, एखादी थाळी त्या जागेचं सद्यवर्णन सांगायले पुरेसे होते. दिवसाउजेडी तो एक ढाबा आहे हे कळायला मार्ग तरी होता. पण अंधारात कसं कळावं कोणाला ? एखाद्या परिचिताशिवाय.
......................................................................................................................
करकचून ब्रेक लावला कुमारने. पर्यायच नव्हता. रस्त्याच्या मधोमध उभा होता तो. डोक्यावर पांढरी टोपी, सफेद आणि आखुड सदरा लेंगा.. निदान त्या सफेद रंगामुळे कोणीतरी आहे ते दिसलं तरी. त्याच्यापासून फक्त एका हातावर थांबली गाडी त्याची.
"अरे, मरायचय का ? " कुमारने मान बाहेर काढून, ओठांवर आलेल्या शिव्या टाळून त्याला विचारलं. तो अपरिचित पुढे सरसावला. कुमारच्या दिशेने. भर रस्त्यात उभ्या असलेल्या गाडीकडे व तेही ड्रायव्हरच्या दिशेला धावताना त्याला हेही भान उरलं नाही की दुसऱ्या बाजुने येणारी कोणतीही गाडी त्याला सहज सोबत घेऊन जाईल.
"साहेब, तासभर झालाय वाट बघतोय. दोन गाड्या गेल्या पण कोण थांबला नाय. म्हणून असा रस्त्यात उभा रायलो. मला पुढच्या गावात सोडा साहेब. उपकार होतील. पाया पडतो तुमच्या..." तो गाडीच्या बाहेरच खाली वाकला. कुमारने प्रियाकडे पाहीलं. तिच्या डोळ्यात भीती दिसली त्याला आणि नकारदेखील. "साहेब, उपकार करा साहेब. पुढच्या गावात. आता गाडीची सोयबी नाय. साहेब,..." भेदरलेली प्रिया त्याला न्याहाळत होती. रापलेला तांबूस रंग, गालाचे उंचवटे, किंचित खोल डोळे, वयाने तो चाळीशीचा दिसत होता. त्याच्या विनवणीत त्याची हतबलता जाणवली तिलाही आणि त्यालाही.
"चल बस." प्रियाकडे न बघताच कुमारने त्याला होकार दिला.
"लय उपकार साहेब. भलं होवो तुमचं." बडबडतच तो त्या उलट्या दिशेनेच गाडीत शिरला.
......................................................................................................................
"बाब्या...." अंधाराला चिरत गेला त्याचा तो आवाज. दुसरा कंदिल चाचपडत त्याने पेटवला. पण बाब्याचे प्रत्युत्तर काही आले नाही. रागाची एक सणक गेली त्याच्या चेहऱ्यावरून.
"बाब्या." तो चिडलाय हे त्या हाकेतून कळत होतं, पण बाब्या अजूनही गायबच. तो वळला. हातातली दुसरी मेणबत्ती पेटवत तो कोपऱ्यातला बाकड्याकडे गेला. तोंडावर फडका घेऊन एकजण पडला होता. त्याने तिथेच मेणबत्ती लावली आणि किंचाळला,"बाब्या भडविच्या." तो झोपलेला प्राणी खडबडून उठला. तोंडावरचा फडका खाली पडला. पोरगेलासा तरूण होता तो. उभट सावळा चेहरा, काटकुळी शरीरयष्टी, अंगात फाटका बनियान व लांब मळका बर्म्युडा. आळसावलेल्या नजरेत भीतीही होतीच.
"मालक, कवा आलात ? "
"धंद्याच्या टायमाला कसली झोप म्हनायची रे ही ? कोन आल्यागेल्याचं भान हाय का नाय ?"
"वाईच डोळा लागला. उठणारच व्हतो जराशान." त्याने सारवासारवीचा प्रयत्न केला.
"कंदिल इझला तेबी कळलं नाय तुला ? "
"आता आपल्यासारक्यांच काय, उजेड असला काय आनी नसला काय ? सारकचं समद."
"बस. जास बोलायचं काम नाय." मालक टेबलाजवळच्या खुर्चीत बसले. ड्रॉवर उघडून त्यातली एक काडी काढली आणि दात कोरायला सुरुवात केली. खांब्यासारख्या उभ्या बाब्याला पाहून पुन्हा करवादला,"चल फडकं मारायला घे. रात वाढाया लागलीय. आतापतूर एक तरी गिऱ्हाईक याया हवं होतं.
"अस्सं वाट बघुनशान गिऱ्हाईक येत नाय मालक." शेवटच्या शब्दाबरोबर एक जांभई बाहेर पडली.
"मंग अस्स आडवं पडून येत का ते ? येइल. यायलाच पायजे. दोन दिस कोन फिरकला नाय. अशान कसं चालायचं आपलं ? "
"येईल तर येईल. इतं कोन येतय मरायला ?" बाब्याने खाली पडलेला कपडा उचलला आणि फळकुटांवर मारायला सुरुवात केली. "आनी तुमच्या माज्या नशीबात असलं तर येईल."
......................................................................................................................
"क्षणभर मला वाटलं तू..."
"कुमार, एकेरीवर काय येतोस तू ?" प्रियाने त्याला दटावलं.
"असु द्या मॅडम. चालत ते." खेडूताने त्याचा पक्ष घेतला.
"ते अहो-जाहो वगैरे फार ऑड वाटतं गं. एवढं काही वय नाही त्यांच, काका-मामा म्हणायला ?"
"कायबी चाललं साहेब. बोला तुम्ही."
"हं.. क्षणभर मला वाटलं तू आत्महत्या करतोयस की काय ? " कुमारने आरशात पहात त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली.
"आत्महत्या ? नाय व्हो." तो नीट सावरून बसला."पन कोन थांबाया तयार नाय म्हनून केली डेरींग. तशी रातची या रस्त्याला गर्दी कमीच अस्तीया."
"आणि मी थांबवलीच नसती गाडी तर ... ? "
"तर.... दुसऱ्या गाडीसमोर उभा रायलो असतो." त्याच्या या उत्तरावर कुमारने हसायला सुरुवात केली.
"काय जाल ? " त्याने विचारलं.
"तू रस्त्याच्या मध्ये उभा आणि मी गाडी थांबवली नसती तर... तर मेला असतास ना तिथल्या तिथेच." कुमार पुन्हा हसायला लागला. प्रियाला ते हसणं आवडलं नाही. नुसत्या नजरेनेच तिने त्याला दटावलं.
"लक्षात नाय आलं बगा ते. गरजेला अक्कल गवता खाया जाते साहेब." तो खजील होऊन बोलला.
"हिला दिसलास तू आधी. गाडी थांबवूच नको म्हणाली मला. मग मीच म्हटल, अगं आपल्या गाडीखाली गचकला, तर उद्या मानगुटीवर बसेल, भुत म्हणून."
"भुश्श्श्श्त ?" डबडबला तो क्षणात.
"अरे, घाबरतोस कशाला ? इथे भुत नाही कुणी." कुमार पुन्हा हसायला लागला.
"साहेब, हसण्याची गोष्ट नाय ही. तासभर मगाशी कसा काढलाय माजं मला माहीत. एकतर अमावस्येची रात..."
"आज अमावस्या आहे ? " नकळत प्रिया त्याच्याकडे वळली. त्याने होकारार्थी मान डोलावली.
"तरी मी सांगत होते तुला." ती कुमारकडे वळली.
"रिलॅक्स प्रिया, अमावस्या असली तर घराबाहेर पडू नये असा कायदा आहे का ? "
"सायाबांना, भीती वाटत नाय कशाची ?"
"कशाची भीती ? भुतांची ? अरे, मेलेल्यांची भीती ती का ? भीती खरी जिवंत माणसाची. अशा सुमसाम रस्त्यावर आडवं येऊन आडवा करणारे भुतांपेक्षा भयानक."
"कुमार, प्लिज काहीही बोलू नकोस." प्रियाने पुन्हा दटावलं त्याला.
"ओ.के. पण एवढ्या रात्रीचा तू निघालास कुठ ? "
"इथून चौथं गाव माजं. सांजच्याला निरोप आला. बायकोला एडमिट केलय म्हनुन. अवघडलेली हाय ना ती."
"अच्छा म्हणजे गुड न्युज आहे तर... कॉंग्रेटस."
"अभिनंदन." प्रिया.
"थेंकू साहेब."
"नाव काय तुझं ? "
"दिलप्या."
"दिलप्या.... चांगल आहे."
"सायेब, पाणी हाय का तुमच्याकडं ?"
"पाणी ? नाही रे."
"नाय हाय. घसा कोरडा झालाय मगापास्न."
"तहान तर मलाही लागलीय. इथे मिळेल का कुठं ? "
"इथे पुडं एक खानावळ हाय. फक्त रातची चालू असतीया ती. तिकडं बगुया."
"कुठे ? "
"गाडी हळू करा आनी डाव्या हाताला घ्या, हळू.... हळू. घ्या इतनं. ती बगा समोर."
"अंधार दिसतोय तिकडे."
"ते मिणमिणताहेत ना दिवं. तिकडं बगा."
"अच्छा, तिथे... ती खानावळ आहे ? "
"हाय म्हणतात. म्या गेलो नाय कदी."
"चला. तहानभुक भागली म्हणजे मिळवलं." कुमारने गाडी त्या अंधुक उजेडाकडे वळवली.
......................................................................................................................
"मालक, आइकला का आवाज ? "
"आइकला. गिऱ्हाइक आलं वाटतं." म्हाताऱ्याने समोरच्या १ बाय दोनच्या खिडकीतून बाहेर पाहीलं. "थांबली गाडी..... हा दर्वाजा उघडला...... तिगजण हायती. उतरले. दर्वाजा बंद गाडीचा. आले बघ." दोनेक मिनिटांनी दार ठोठावल्याचा आवाज आणि दार उघडलं. नाकावर हात असलेली प्रिया दारात उभी. ती पुढे सरली व मागोमाग कुमार आणि दिलप्या. पुढे सरलेली ती जागीच थांबली. दोघेही दारापासून चार हात लांब उभे. तिने त्यांच्याकडे पाहीलं आणि मग दाराकडे.
"हे दार कोणी उघडलं ? " तिचा गोंधळलेला स्वर.
"दार उघडचं होतं बाई. तुम्ही दार ठोकलं, तसं उघडलं. तुम्हाला काय वाटलं, आपोआप उघडलं म्हणून" बाब्या तिला आपदमस्तक न्याहाळत बोलला. कुमार व दिलप्या जाऊन बाजेवर बसले.
"कुमार, तुला हा दर्प जाणवत नाही." तिने रुमाल नाकावर ठेवला.
"जाणवतो गं. पण नाकाला बऱ्याच दर्पाची सवय आहे. लॅबमध्ये तर यापेक्षा भयानक दर्प असतात. कधी कधी चुकून जावं लागतं तिकडे. आणि असल्या ठिकाणी तुला कुठून सुवास यायचा ? ये बस... अरे ये, खुर्ची घे रे ती." इति कुमार.
"खुर्ची ? ती नगं. इकडे बसा ना बाई तुम्ही."
"अरे पण खुर्ची का नको ? दे ती खुर्ची."
"अरे तो नको म्हणतोय ना, मी बसत इकडे." प्रिया समजुतीच्या स्वरात बोलली.
"नको काय ? " कुमारने उठून खुर्ची घेतली व तो मालकाकडे वळला." ही पद्धत आहे का तुमची सर्विस द्यायची ?"
"तुम्ही ऐकाया पायजे होतं त्याचं ? "
"का ? "
"खुर्ची मोडलेली हाय. आता घेतलीच हाय तर बसा."
"काय खाणार साहेब ? " बाब्याने वेटरधर्म पाळत विचारलं.
"काय मिळते या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ?"
"मांस..." थंड सुरात बोलला बाब्या.
"मांस...????" प्रिया नकळत शहारली.
"मांसमच्छी सोडून बोला. शाकारी थाळी हाय. चाललं ?"
"चाललं. गरम मिळलं नव्हं ?" दिलप्या दोन्ही हात मागे करून रेलला.
"करावं लागलं. येळ लागलं.
"जरा लवकर केलसं तर उपकार होतील." कुमारने पाय लांब केले.
"तेच्याआधी थोडं पानी मिळलं का ?" दिलप्याने फळकुटावरचा रिकामा जग पाहीला.
"थंड की गरम ? "
"प्यायला हवयं. साधं मिळालं तरी चालेल." बाब्याने थंड नजरेने कुमारकडे पाहील आणि तो आतल्या अंधारात वळला.
"जरा विचित्र आहे, नाही ?" प्रिया त्या अंधाराकडे पहात बोलली.
"अगं, प्रवासात असले नमुने भेटतातच." कुमारने तिला त्याच्या भटकंतीच्या अनुभवाचे सार सांगितले. दिलप्याने विडी काढली आणि कुमारकडे वळला.
"घेनार का सायेब ? "
"नाही रे. इथून परवानगी नाही."
"मग असू द्या." त्याने बंडल पुन्हा खिशात टाकलं. तेवढ्यात भांडी पडल्याचा आवाज शांतता चिरत गेला. सगळे आत पाहू लागले. पण काहीच दिसेना. काठी झोडपल्याचा आवाजाबरोबर मांजरीचा आवाज तेव्हढा कानी आला.
"काय हो, त्या अंधारात त्याला दिसणार का काय करायचयं ते ?" कुमार दात कान एकाच काडीने कोरणाऱ्या मालकाकडे वळला.
"सवय हाय साहेब, रोजचचं हाय हे."
"तुम्ही घरी परतताय मग तुमच्याकडे सामान कसं नाही काहीच ?" प्रियाने मघाशी अर्धवट राहीलेल्या संभाषणाची गाडी रूळावर आणली.
"सामान ? ते कशाला ? उद्या परतायचय. मी मुकादम हाय इथल्या रस्त्याच्या कामाचा. उद्या परतायला हवयं" बाब्याने त्यांच्यासमोर पाण्याचे ग्लास ठेवले आणि बाजूस एक भरलेला जग. फळकुटावरचे रिकामे ग्लास आणि जग तो आत घेऊन गेला.
"म्हणजे थांबणार नाही बायकोजवळ ?" प्रियाला आश्चर्य वाटलं त्याच्या बोलण्यामुळे.
"हायेत की घरला माणसं." गावकऱ्याने पाण्याचा ग्लास उचलला. त्याचवेळेस प्रियानेही ग्लास उचलला. पाण्याकडे लक्ष जाताच तिचं तोंड वेडंवाकडं झालं. त्या अपुऱ्या उजेडात तिला ते पाणी लालसर दिसायला लागलं.
"शी.... !"
"काय झाल प्रिया ? " तिने पाण्याचा ग्लास पुढे केला.
"वेटर ... वेटर..." किंचाळलाच कुमार.
"काय जालं सायेब ? " मालक पुढे सरले.
"हे कसलं पाणी दिलयं तुमच्या वेटरने ? प्यायचं पाणी आहे का हे ? बिसलरी नाही का इथे ? " बाब्या येतो.
"सायेब, इतं कुनाला परवडतेया बिसलरी-विसलरी. हे बावीचं पानी हाय. पण सकाळच्याला तर बरं होतं पानी. आता काय झालं ? " प्रश्नाकिंत चेहऱ्याने तो पाण्याकडे पाहू लागला आणि मग काहीतरी आठवल्यासारखं स्वत:शीच बडबडला. "त्याच्यामुळं तर जालं नसेल ? त्याच्यानेच जालं असेल."
"कशानं ? " कुमार जरा चिडलाच त्याच्या त्या स्वगताने.
"ग्रामपंचायतीच्या माणसानं टाकलं कायतरी पान्यात. म्हनला, रोगराई वाडते पान्यानं. उकळून प्या. त्याच्यामुळं जालं असलं"
"पॉटेशिअयम परमॅगनेट.. जंतुनाशक आहे ते."
"त्याच्यामुळे पाण्याचा रंग बदलतो ?" प्रियाने कुमारकडे पाहीलं.
"असेलही.... नसेलही. कदाचित पाण्याचा रंगच असा असेल."
"प्यायचं पानीच हाय ते. आमीबी पितो की. ये बगा." मालकाने ग्लास उचलून तोंडाला लावला. अर्धा ग्लास त्याच्या घशाखाली उतरताच कुमारने ग्लास तोंडाला लावला.
"सायेब, पिऊ नका." दिलप्याला नस्ती शंका.
"पाणी आहे ते. त्याने काय होतय ? उगाच भीती नको. असली भीती नसत्या कल्पनांना जन्म देते."
"कुमार, आपण निघुया का. मला इथे थांबावसं वाटत नाही." ती दाराकडे वळते. दार बंद असतं. "दरवाजा कुणी बंद केला ? " ती स्वत:शीच पुटपुटली. ती त्यांच्याकडे वळली. "हा दरवाजा कोणी बंद केला ? " सगळे तिच्याकडे वळले. "हा दरवाजा कोणी बंद केला ? " कोणीच उत्तर देत नाही हे पाहून ती यावेळेसा ओरडलीच. बाब्या बाहेर आला त्याबरोबर.
"रिलॅक्स प्रिया, दरवाजा उघडाच आहे तो." ती वळली. दरवाजा उघडा होता.
"हा दरवाजा बंद होता... आताच... दोन सेकंदापुर्वी... खरचं.. कुमार हा दरवाजा बंद होता."
"ओ.के. असेल. मघाशी बंद होता आणि आता उघडा आहे. यात अपसेट होण्यासारखं काहीच नाही."
"तुला खरं वाटत नाही मी बोलतेय ते ?"
"बाईसायेब, तो दर्वाजा ढिला झालाय. वाऱ्याने उघडझाप होतीया त्याची." कुमारचं लक्ष बाब्याकडे गेलं. तो आरामात रेलून सगळ्यांकडे पहात होता.
"जेवण झाल गरम ? "
"नाय."
"मग इथे उभा काय करतोयस ? जेवण आण गरम करून. भुकेने कावळे ओरडायला लागलेत पोटात."
"इतकी भुक लागली असलं तर मलाच खा." बाब्या थंडपणे त्याला बोलला.
"बाब्या, आत जा. गिऱ्हायकाशी कसं बोलावं ते बी कळना काय तुला ? जा आत." मालकाच्या दरडावणीबरोबर बाब्या आत गेला. मालक कुमारकडे वळले. "पोरगं नवं हाय सायेब, माफी करा."
"कुमार आपण निघुया." प्रियाचा आता धीर सुटू लागला.
"एवढी घाई कसली गं ? तीन तासांचा तर प्रवास आहे. पोहचू पहाटेपर्यंत.
"या कोंदट वातावरणात मी अजून थोडा वेळ थांबले तर माझं काही खरं नाही."
"ठिक आहे. निघूया. पण दोन घास खाऊ देशील की नाही. उपाशी पोटी रात्री गाडी चालवू नये हा वाहतूकशास्त्राचा नियम आहे."
"प्रत्येक गोष्टीत विनोद कसा सुचतो रे तुला ? आणि अशा ठिकाणी तुला जेवण जाईल तरी कसं ? मला तर साधं पाणीसुद्धा प्यावसं वाटत नाही."
"अगं, कसल्याही प्रकारचं अन्न पचवायची ताकद आहे या जठरात. तू काळजी नको करूस. शिवाय इथून बाहेर पडल्यावर पेट्रोलपंप शोधायला हवाय."
"त्याची काळजी नगं. इतनं दोन किलोमीटरवर हाय की पंप." दिलप्याने माहीती पुरवली.
"चला. म्हणजे हा प्रश्न ही निकालात निघाला. आता जेवायचं आणि सुटायचं."
"तू बस जेवत. मी जाऊन पेट्रोल भरून येते." बाब्या हातात चाकू घेऊन बाहेर आला. त्यांचं त्याच्याकडे लक्षचं नव्हतं.
"तू जाणार ? तिही एकटी ?" कुमारने तिची थट्टा करायला सुरुवात केली.
"हो. मी.... मी जाणार आणि तिही एकटी. दे चावी." तिने हात पुढे केला. क्षणभर विचार करून कुमारने चावी तिला दिली.
"लवकर ये. आणि एक कर. बाहेरच्या वळणावरच थांब. आम्ही तिथेच येतो."
"यस्स. आलेच मी." चावी घेऊन ती वळली आणि समोर हातात चाकू घेऊन उभ्या असलेल्या बाब्याला पहाताच एक अस्फ़ुट किंकाळी तिच्या तोंडून त्या शांततेला चिरत गेली. क्षणभर सगळेच शांत झाले. केवळ रातकिड्यांची किरकिर तेवढी होती शांतता भंग करत. तिच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे पहात बाब्या मालकांकडे वळला.
"मालक, याला धार लावून घ्याया पायजेल. कांदाबी कापला जात नाय याच्याने."
"उद्या लावतो. आता आत जा तू." त्या तिघांकडे एक नजर टाकून बाब्या आत वळला.
"प्रिया, रिलॅक्स. जा तू पेट्रोल भरून ये." त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आश्वस्त केले. ती वळली. दरवाजा उघडला गेला. ती कुमारकडे वळली. त्याच्या लक्षात आलं काय झाल ते. तो तिला कारपर्यंत घेऊन गेला. तिने कार स्टार्ट केली. त्या उघड्या माळरानावर प्रकाशाचे दोन झोत पडले. पुढे असलेल्या झाडीच्या मधल्या रस्त्याकडे त्याने बोट दाखवले आणि तिने गाडी गिअरमध्ये टाकली. गाडी पुढे सरताच तो खानावळीकडे वळला. दरवाजा उघडाच होता.
"काय हो मालक, खानावळ अशी रस्त्यापासून व गावापासून दूर का बांधलीत ?"
"याच्या उत्तरासाठी वर जावं लागेल सायेब." मालकाने बोट वर केलं.
"म्हंजी ?" दिलप्या दचकला.
"माज्या बान बांधली ही खानावळ आनी त्यो वर गेलाय. त्याचं त्यालाचं ठावं."
"एवढ्या भागात ही एकच खानावळ म्हणजे धंदा जोरदार असेल."
"हाय की. तुमच्यावानी कोनी आलं की चार पैसे जास्त मिळतात आमास्नी."
"तरी तुम्ही दोघचं इकडे."
"पुरतो." मालक बोलले. "आम्ही दोघचं समद्यास्नी पुरतो. आता एक तिसरा मानुस घेतलाय कामाला. येईल तो कवाबी."
"तुमच्या या खानावळीची अवस्था बरीच बिकट दिसतेय. थोडी बांधून रंग मारलात तर मस्त दिसेल."
"रंग मारला की थोड्या दिवसात लाल होतो बघा."
"आपोआप ?"
"आपोआप व्हायला जादुगिरी हाय व्हय ? नाना प्रकारची माणसं .. मावा, पान खाऊन पिचकाऱ्या मारतात नव्हं."
"मग लाल रंगच मारायचा." कुमारने हसायला सुरुवात केली आणि कोणीतरी त्याच्या सुरात सुर मिसळवला. हसण्याचा आवाज शांतता व्यापून राहीला. मागोमाग एक किंकाळी. श्वास कोंडाल्यावर येणारी. सर्वशक्तीनिशी. दरवाजा आपटून बंद झाला आणि हुंदक्यांना सुरूवात झाली. अचानक गळा दाबावा तसे हुंदके थांबले. शांततेत उगाच एक तडफड जाणवायला लागली. पुन्हा तोच हसण्याचा आवाज. यावेळेस शांततेसह काळीज चिरत गेला. दरवाजा पुन्हा उघडला गेला. दिलप्या ताडकन उभा राहीला. कुमारही आतल्या अंधारात पाहू लागला पण काही नजरेस पडत नव्हतं.
"मालक, ह्यो तुमचा बाब्या येडा हाय का ? काय करतोया त्यो आत ?" दिलप्या मालकांकडे वळला.
"त्यो बाब्याचा आवाज नाय. इतं अशे आवाज येतात रातीच्या वक्ताला. लक्ष नाय द्यायचं तिकडं." मालकाचा स्वर अवचित घोगरा वाटला कुमारला.
"पण हा आवाज होता तरी कोणाचा ? बाईचा वाटला." कुमारने संशयाने मालकाकडे पाहील. जरा लक्षपुर्वकच. कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात तो चेहरा जरासा भेसूर वाटला त्याला. प्रिया नाही ते बरं झालं असं वाटलं त्याला.
"कोनाला ठाव ? कदी दिसतं, कदी दिसत नाय आनि दिसतय ते पटत नाय. मागं एका जोडप्याची गाडी उडवली डंपरनं. पोरगी खल्लास झाली. पोरगं वाचलं. तेव्हापास्न चाललय हे."
"सायेब, त्याचं म्हणणं खरं हाय. म्याबी अनुभवलय हे. मघाशी रस्त्यावर उभा व्ह्तो तवा कोनीतरी आवाज देतयं असं वाटत होतं. कोनीतरी बाजुलाच उभं हाय असं. स्वासाचा आवाजबी येत व्हता. त्यामुळं रस्त्यात येऊन उबा रायलो."
"तुला काय म्हणायचयं इथे भुताटकी आहे ? "
"साहेब, तुमच्यासारख्या शहरी माणसाला नाय पटायचं. पण इतं बरचं काय घडतं जे डोक्याला उमगत नाय."
"ज्या गोष्टी मी पाहील्या नाहीत त्यावर मी विश्वास ठेवत नाही. भाकडकथांवर तर बिल्कुल नाही. ही सगळी अंधाराची भीती आणि कमकुवत मनाचे खेळ. भीती दाटली की मग मन चिंती ते वैरी ना चिंती. नकोसे वाटणारे भास सगळे."
"सायेब, मला तरी वाटतयं, इतं कायतरी व्हनार हाय."
"काय बी व्हायचं नाय सायेब. इतं कोनबी येत नाय." मालकांनी बसल्या जागेवर पोज बदलली. बाब्या आला.
"वेळ झाली मालक. आता व्हईल बगा. ती येईल आनी त्या खुर्चीत बसलं."
"बाब्या, आत जा. जेवणाचं बघ. त्याचं मनावर घेऊ नका सायेब." बाब्या पुन्हा त्या अंधाराकडे वळला. कुमारला क्षणभर वाटलं की तो त्या अंधारात जणू विरघळलाच. दरवाजा वेगाने बंद झाला आणि पुन्हा मग शांतपणे उघडला गेला. पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. खुर्ची फिरली आणि कुणीतरी त्यात बसण्याचा आवाज आला. खिशातल्या रुमालाने कुमारने घाम पुसला. हे खरचं घडतय की वाऱ्यामुळे की आणखी काही ..... ?
"कोण आहे ? "
"सायेब, जागचं हलू नगा." मालकाने तंबी दिली.
"इथे काय चाललय तरी काय ? "
"म्या बोललो तुमास्नी. इतं वावर हाय कुनाचा तरी." दिलप्याने छाती धरली.
"कोणी नाही. कोणी नाही." कुमार खुर्चीकडे वळला आणि..
"बसु नगा सायेब." दिलप्याला आपलं काळीज आता बाहेर येतं की काय ही भीती. सर्वांगाला व्यापून.
"ऐका त्याचं. बसू नगा." न राहवून मालकाने तोंड उघडलं. कुमार धडधडत्या ह्रुदयाने ख्रुर्चीवर बसला.
"जे होईल ते होईल." विस्फारित नजरेने दोघेही त्याच्याकडे पहात होते. दोन क्षणाच्या भयाण शांततेनंतर कुमार हसू लागला. भीती त्या दोघांच्या चेहऱ्यावर काळ्या मेघांसारखी दाटली.
"काही झाल का ? " कुमारने विचारलं. जीव भांड्यात पडला दोघांचा. गावकऱ्याने समोरचा ग्लास उचलला आणि एका दमात संपवला.
"सायेब, राहु द्या जेवण. निघूया चला." दिलप्याने बाहीने तोंड पुसलं.
"दोन मिन्ट सायेब, बाब्या, बाब्या जालं का ?" मालक आतल्या अंधारात हरवले. बाहेर हॉर्न वाजल्याचा आवाज आला.
"प्रिया...." पण कुमारच्या आधी दिलप्या पुढे सरला. दरवाजा प्रचंड आवाज करत बंद झाला आणि यंत्रवत दिलप्या कुमारकडे वळला. त्याच्या डोळ्यात रक्त साकळलं होतं. त्याचा हात कुमारच्या दिशेने उठला. रक्ताचे थेंब त्याच्या डोळ्यातून ओघळले आणि भीतीची लहर पहिल्यांदाच जाणवली कुमारला. दुसऱ्याच क्षणी दिलप्याने आपला गळा धरला. फिट यावी तसा त्याचा सगळा देह तडफडू लागला. कुमार त्याच्याकडे धावला.
"मालक... मालक.... बाब्या... बाब्या." त्याने समोरचा कंदिल उचलला आणि तो आतल्या खोलीकडे वळला. दोन पावलंच चालला तो. पण त्या कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात त्याला काहीच दिसेना. अंधाराला डोळे सरावयाला किंचित वेळ लागायचाच. त्याने समोर पाहील. चोहीकडे माळरान होतं. ओकंबोकं. भीतीची लहर आता कधी नव्हे ती त्याला व्यापून शरीरात सळसळली. अंग गारठायला लागलं. तो दर्प आता जास्त उग्र आणि हिरवट होऊ लागला. कुमार दिलप्याकडे वळला. पण तिथे कोणीच नव्हतं. मघासची खुर्ची आता थरथरू लागलेली आणि मागोमाग इतरही सारं जे आल्यापासून नजरेला दिसलं होतं. बघता-बघता थरथर वाढली आणि ते विरायला... विरघळायला लागलं. कुमारच्या हातून कंदिल कधी खाली पडला हे त्यालाच कळलं नाही. तोच दरवाजा धाडकन उघडला आणि प्रिया आत आली.
"थॅंक गॉड, तू आलीस. चल निघूया आता." तिला बोलण्याची संधीही न देता तिचा हात धरून तो दाराकडे वळला. ते तिघेही समोर दारात उभे होते. भोवताल आता फक्त माळरान उरलेला. पण दार मात्र जागच्या जागी उभे. त्याच्या दोन्ही हलत्या झडपांसह. जागीच थांबला कुमार. त्या तिघांना पाहून. नव्हे, आपल्या हातात असलेला हात इतका गार कसा ? हेच त्याला कळेना. तो तिच्याकडे वळला. पण तोपर्यंत फार उशीर झालेला. आतातर दारही विरघळू लागलं.
समाप्त.
(साधारण ९३-९४ च्या सुमारास एकांकिका करावी म्हणून संतोष मयेकर ( टिव्हीवर कॉमेडी एक्स्प्रेसमह्ये दिसणारा नव्हे.) या माझ्या मित्राबरोबर हे कथानक योजलं होतं. पण हे प्रकरण बाजुलाच राहीलं. राहीलं ते राहीलचं. अशी अनेक अर्धवट राहीलेली प्रकरणं आहेत. म्हटल एक सादर करू. जमलय की विस्कटलय ते कळेलच.)
कौतुक...
कौतुक... अॅज युज्वल झक्कास कथा... वाचताना अंगावर काटा आला.... सगळा प्रसंग डोळ्यासमोर घडतोय अस वाटलं.. वातावरण निर्मिती सहीच... फार सुरेख लिहीता... पु ले शु....
आज माझा पहिला नंबर प्रतिसाद द्यायला...
व्वा!!
व्वा!! सह्हेच कथा. तशी पहिल्यापासून थोडी कल्पना येतच होती...पण वातावरण निर्मिती भारीच्....ए.सी. त पण घशाला कोरड पडली!
फुलराणी
कौतुक...
कौतुक... लाजोच्या प्रतिसादाला १००% अनुमोदन.. संवाद व वातावरणनिर्मिती नेहमीप्रमाणे जबरीच..
तुझ्या लिखाणाचा... पंखा..
मुकुंद
कौतुक...
कौतुक... लाजोच्या प्रतिसादाला १००% अनुमोदन
मला तर भीती वाटायला लागली होती.... संवाद व वातावरणनिर्मिती नेहमीप्रमाणे जबरीच..
०------------------------------------------०
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका!!!
व्वा, मस्त
व्वा, मस्त झपाटलेली कथा. बाकीची प्रकरण ही टाका वेळ मिळेल तसा.
अप्रतिम
अप्रतिम लेखन..अंगावर काटा आला....
अभिनंदन..
शेवट काहि
शेवट काहि कळला नाहि....
>>>कुमार दिलप्याकडे वळला. पण तिथे कोणीच नव्हतं
>>>>तिला बोलण्याची संधीही न देता तिचा हात धरून तो दाराकडे वळला. ते तिघेही समोर दारात उभे होते.
तिघे कोण?
एक नंबर
एक नंबर वातावरण निर्मिती... अगदी सच्चा फिल देणारी! मस्त रे कौतुकभाऊ!
छान
छान जमलंय...
विष्णु.... एक जास्वंद!
*******************************************
माणसांच्या मध्यरात्रि हिंडणारा सूर्य मी... माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा...
.. अजून
.. अजून धडधडतयं.इम्पॅक्ट खूपच जबरदस्त आहे. तुझं कौतुक!!!
एक नंबर...
एक नंबर...
मस्त जमलीय
मस्त जमलीय कथा
जे बात!!!!
जे बात!!!! बहुत खूब!!
खूप खूप आवडली कथा...खरंच जबरी इम्पॅक्ट!!!!!
========================
बस एवढंच!!
कौतुक,
कौतुक, नारायण धारपांच्या तोडीस तोड जमलीय. आणि भितीचा प्रभाव हळूहळू गळा आवळल्यासारखा वाढत जातो. खानावळ येताच शेवट काय असेल याचा अंदाज येतो पण त्यामुळे अजूनच धडधड वाढत जाते. मला तरी शेवट आणि शेवटी दारातील पात्रे(तिघे) सहज कळलीत.
आतापर्यंत रहस्यकथाकार म्हणून प्रसिद्ध होतासच. आता भयकथाकार म्हणूनही ओळख निर्माण झालीय तुझी. टी व्ही वर हॉरर सिरीअलमधे मस्त होईल एखादा एपिसोड यावर. अभिनंदन.
..............................................................................
गावोगावी बापू झाले, बापूंचेही टापू झाले
भक्त आंधळे न्हाले न्हाले, देव बनूनी बापू आले!
वातावरणनि
वातावरणनिर्मिती मस्त झाली आहे. जाम टेन्शन आलं होतं वाचताना
बापरे....घरा
बापरे....घरात एकटी होते वाचताना. जाम भिती वाटत होती
व्वा
व्वा कौतुक...वाचुन झाल्यावर अजुनही भिती वाटतीये..त्यात रात्रीच्या वेळी वाचलीये कथा..काय खरं नाही आता...
*******************
सुमेधा पुनकर
*******************
कौतुक!
कौतुक! जबरी जमलिय कथा..
एक हॉरर
एक हॉरर सिरियल काढाच. अर्ध्या तासाची. सुरुवातीला आठवड्यातून एकदा, नंतर दररोज एक!!
आईग.. काय
आईग.. काय घाबरवताय! आत्ता एकटीच आहे आणि मी!
कसलं टरकायला झालं त्या खानावळीत आल्यावर.. लाल पाणी, मला खा, पाण्यात ते टाकलंय, उत्तरासाठी वर जा, इत्यादी संवाद भयंकर !!!
www.bhagyashree.co.cc
काही कळली
काही कळली नाही बॉ!
कौतुक,
कौतुक, भन्नाट, काटा आला वाचताना
चांगली आहे
चांगली आहे
कौतुक
कौतुक अशीची तशी तुझी! घाबरले ना मी! छे! अजुन धडधडतय. कथा एकदम झकास! कितीही अपेक्षित असलं तरी वाचतांना काटा आला अंगावर आणि हेच तुझं मोठ्ठं यश. लगे रहो|
_______________________________
"शापादपि शरादपि"
मी तर
मी तर पुर्ण वाचलीच नाही.. जाम घाबरले... सुरुवात वाचली ... शेवट वाचला ...
बास रे बाबा म्हणुन राहु दिले..
आता काही खरे नाहि...
तुझ्या कथा
तुझ्या कथा वाचायच्या राहुन जातात म्हणुन काल खर प्रींटआउट घेउन वाचली, पण शेवट फारच आटोपता घेतलास... तुझी शैली मला फार आवडते, कथा संपाविशी वाटतच नाही म्हणुन असेल कदाचित ..:)
सकाळी सक्काळी वाचली हि कथा
सकाळी सक्काळी वाचली हि कथा तरिही धडधडतय छातीत अजून. आजूबाजूला किमान २०० लोक आहेत सगळेच दिलप्या सारखे दिसायलेत..
इम्पॅक्ट जबरदस्त आहे हो....
कौतुके
कौतुके भन्नाट कथा !! खूप दिवसांनंतर असलं काहीतर वाचलं !
तुझी लेखनशैली ..........क्या कहे बॉस !
सत्याला मात्र अनुमोदन.....कथा संपावीशी वाटत नव्हती मलाही !
मस्त
मस्त लिहिलंय कौतुक... कथा आवडली.
कथा शेवट पर्यंत धरुन ठेवते...
कथा शेवट पर्यंत धरुन ठेवते...
Pages