प्लासिबो
.
एमबीबीएस झालो आणि इंटर्नशिपसाठी माझ्या मित्रांच्या आग्रहास्तव मेडिकलला (औरंगाबाद) न रहाता नांदेडला गेलो. सहा महिन्याची पोस्टींग. पहिली पोस्टींग मेडीसीन विभागात. हा अनुभव गायनीकला (स्त्री रोग विभागात) पोस्टींग झाली तेंव्हाचा. दुपारी साडेबारा-एकची वेळ. ओपीडीची वेळ संपत आलेली. सिनिअर्स सगळे निघून गेलेले. मी आणि माझा वर्गमित्र दोघंच उरलेली ओपीडी काढत होतो. शेवटचा पेशंट पाहिला आणि मी बाहेर येऊन पाहिलं कुणी राहिलंय कां म्हणून. एक तरूण जोडपं बाकावर बसलेलं दिसलं. मी त्यांना आत बोलावलं. ते ब-याच वेळापासून बाहेर बसले होते असं दारावरच्या अटॆंडंट्नं सांगितलं. मी त्यांना विचारलं: "अहो, वेळ संपत आलीय ओपीडीची. बाहेरच काय बसलात?" त्यावर त्या जोडप्यातली "ती" म्हणाली: "आम्हाला तुम्हालाच दाखवायचं होतं." बापरे ! मी उडालोच. मी इंटर्न, प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि मला दाखवण्यासठी हे जोडपं दोन तास बाहेर बसलं होतं. काही तरीच!
.
मी चौकशी सुरू केली. त्यावरून कळलं की त्यांच्या लग्नाला सहाएक वर्ष झाली होती. तरी मूल झालेलं नव्हतं. मधे काही ऍबॉर्शन वगैरे काहीही झालेलं नव्हतं. प्रायमरी स्टरीलिटी. मी मनातल्या मनात नोंद केली. त्यांनी नांदेड आणि मुंबईतल्या नामांकित स्त्री रोग तद्न्यांना दाखवलं होतं. पण काही उपयोग झाला नव्हता. त्या वेळी उपलब्ध असलेल्या सर्व तपासण्या करून झाल्या होत्या. आता काय करावं हा माझ्या पुढे प्रश्नच होता. सगळे सिनिअर निघून गेलेले आणि माझा वर्गमित्र पण काही उपयोगाचा नव्ह्ता. काय करावं बरं?
.
या अशा प्रकरणात पुरुषाची पण तपासणी आवश्यक असते. तशी ती झालेली दिसत होती. तरी पण मी त्याला आत बोलावून घेतलं. तो लाजाळूच दिसला, काही बोलायला तयारच होईना. शेवटी मी त्याच्या बायकोला बाहेर जायला सांगितलं. दार लावून घेतलं आणि मग त्याला विचारलं: "काही प्रॉब्लेम आहे कां?" यावर तो कावरा बावरा झाला आणि म्हणाला: "नाही, तसं काही नाही." मी विचारलं: "मनाविरूद्ध झालंय कां लग्न तुझं?" आणि मग त्याचा बांध सुटला. त्यानं सांगितलं ते असं. त्यांचा आंतरजातीयप्रेम विवाह झाला होता. तरी पण याला सतत वाटायचं की आपण तिच्यावर अन्याय केलाय. ती दिसायला सुंदर, चांगल्या घरातली, हुषार. हा (याच्या मते) दिसायला यथातथा. घरची परिस्थिती साधारण. अंगी हुषारी पण फारशी नाही. घरचा लग्नानंतर सपोर्ट नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती यथातथाच. त्यामुळे एक अपराधीपणाची भावना मनात सतत असलेली. मी विचारलं" "पण त्याचा या समस्येशी काय संबंध?" तो म्हणाला: "डॉक्टर, नाही कसा? मूल व्हायला नवरा बायकोचा "तसा" संबंध यावा लागतो ना! तेव्हढं कळतं मला! अहो इथं माझे हाल मलाच माहित. ती खूप प्रेमळ आहे हो! पण आमचा संबंध म्हणजे तासा भराचा पिक्चर दोन मिनीटात संपल्यागत.... !" मी हादरलोच. माझी इंटर्नशीप चालू होती तरी तो काय म्हणतोय हे माझ्या लक्षात आलं होतं. ही "प्री-मॅच्युअर इजॅक्युलेशन" अर्थात शीघ्रपतनाची केस होती. पण लग्नानंतर पाच सहा वर्ष हे चालू होतं. मी त्याला विचारलं: "तू इतक्या तपासण्या करून घेतल्या. कुणाला बोलला नाहीस ?" तो म्हणाला: "कसं बोलणार? कुणी विचारलंच नाही ! तपासण्या चालू होत्या. मला वाटलं होईल काही फायदा. हे असं विचारणारे तुम्ही पहिलेच. आणि तुम्ही सुद्धा कसं प्रायव्हेटमधे विचारलंत. सगळे मला बायको समोर विचारायचे. काही प्रॉब्लेम आहे कां म्हणून ! तिच्या समोर मी काय सांगणार?"
.
हे असं होतं तर ! पण आता याला काय इलाज करावा मला कळेना. आमच्या प्रशिक्षणातला हा अत्यंत कच्चा असा दुवा होता. मी विचार केला. आदल्या दिवशी माझ्या एका एम-आर (मेडीकल रिप्रेझेंटेटीव्ह) मित्रानं सॅंपल म्हणून काही काही नवीनच निघालेल्या गोळ्या मला सॅंपल म्हणून दिल्या होत्या. त्या मला आठवल्या. ती एक ऍंटी-एग्झायटी (Anti-anxiety) औषधी होती. इंटरव्ह्यु देतांना, परिक्षा देतांना आपल्याला ह्या एग्झायटीचा अनुभव येत असतो. धडधड वाढते, घाम येतो, बोलती बंद होते, घशाला कोरड पडते. अशासाठी ही औषधी कंपनीनं रेकेमंड केली होती. मी ती त्याला दिली. बायको बरोबर शरीर संबंध येण्याच्या अर्धा तास आधी त्यानं ती घ्यावी असं मी त्याला सांगितलं. आता शेवटचा उपचार बाकी होता. मी त्याच्या बायकोला बोलावलं आणि याला बाहेर पाठवलं. सिस्टरला बोलावलं आणि त्यांच्या उपस्थितीत तिला काही प्रश्न केले. तिला बिचारीला हा काही प्रॉब्लेम आहे हेच माहित नव्हतं ! मी माझ्या परिनं तिला हे समजावून सांगितलं. शेवटी मीच घामाघूम झालो होतो. मग त्याला आत बोलावलं आणि दोघांना आठवड्यानं यायला सांगितलं. ते निघाले तसा मी शेवटचा प्रश्न विचारला: " माझे वरिष्ठ सोडून तुम्ही मलाच कां दाखवलं ?" तो हंसला आणि म्हणाला: " इथं कुणीही नवीन डॉक्टर आला की आम्ही त्याला दाखवतो. तुम्ही नवीन दिसलात..... " ते दोघं गेले. दोन वाजत आले होते. सगळे पेशंट संपले होते. आवरा आवर करून मी निघालो. सिस्टरनं मला थांबवलं आणि विचारलं: "डॉक्टर, तुमचं लग्न झालंय?" मी चकित झालो आणि म्हणालो" "नाही, कां?" यावर ती सिस्टर तोंडाला रुमाल लावून कां हंसली ते काही मला कळलं नाही !
.
त्यानंतर माझी स्त्री-रोग विभागाची पोस्टींग संपली. तीन एक महिने गेले. मी सर्जरीला होतो आणि मला स्त्री-रोग विभागातून निरोप आला. ते जोडपं आलं होतं. प्रसूतीपूर्व चिकित्से साठी ! आणि ही आनंदाची बातमी त्यांना मला द्यायची होती. हे.. हे म्हणजे मला चकित करणारं होतं. मी अंधारात तीर मारला होता आणि काम झालं होतं. मी माझ्या वरिष्ठांना सगळं सांगितलं आणि त्यांना विचारलं: "कसं काय झालं असेल हे?" त्या हंसून म्हणाल्या: " प्लासिबो इफेक्ट आहे हा." प्लासिबो. फार्माकॉलॉजीत आम्हाला हे शिकवलं होतं की! आजारपणाशी संबंध नसलेलं एखादं औषध... जे केवळ पेशंटच्या समाधानासाठी डॉक्टर पेशंटला देतो.... डॉक्टर वरच्या विश्वासा मुळे पेशंट ते औषध घेतात आणि त्याची सिंप्टम्स कमी होतात... प्लासिबो !
.
-अशोक
प्लासिबो
Submitted by डॉ अशोक on 12 October, 2013 - 10:59
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्लासिबो व श्रद्धा यांचा फार
प्लासिबो व श्रद्धा यांचा फार जवळचा संबंध आहे.
पोरं न होण्यासाठी कोणता
पोरं न होण्यासाठी कोणता प्लासिबो आहे काय?
लग्नाच्या येळेसच देऊन टाकायचा, लोकसंख्या आटोक्यात...भारत सरकारने कित्तेक अब्ज यावर खर्च केलेत पण काय फायदा झाल्याला नाय.
कांबळे साहेब.. घेऊन पहा.
कांबळे साहेब..
घेऊन पहा. झालाच तर फायदाच होईल. तुमचा आणि देशाचाही!! :P:P:-
(No subject)
a peanut is an ultimate birth
a peanut is an ultimate birth control pill. it is to be held between knees. no side efects.
इथे बोल्लो असतो इब्लिसभौ, पण
इथे बोल्लो असतो इब्लिसभौ, पण ज्याऊंदे विपुत खरडतो.
डॉ अशोक लेख आवडला.
डॉ अशोक
लेख आवडला.
शेंगदाण्याचे भाव कशाला
शेंगदाण्याचे भाव कशाला वाढवताय इब्लिसभौ?
लोक गुढघ्यात शेंगदाणे धरायला लागले तर मग तुमचे व्यवसायबंधु काय कमावणार!
डॉक्टरांनाही पाट्या लावाव्या लागतील, आयएमए प्रमाणित शेंगदाणे
मस्त अनुभव आणी लेख पण....
मस्त अनुभव आणी लेख पण....
छान...
छान...
लेख, कथनशैली आवडली.
लेख, कथनशैली आवडली.
धन्यवाद दोस्त हो !
धन्यवाद दोस्त हो !
मस्त अनुभव आणी लेख पण....
मस्त अनुभव आणी लेख पण.... >>>> +१
Thanx !
Thanx !
छान लेखण ...
छान लेखण ...