शाळा-शाळा

Submitted by Arnika on 2 October, 2013 - 06:33

शाळा! बहुतेकांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. काहींना आवडली म्हणून, काहींना नावडली म्हणून. काहींनी नेमाने हजेरी लावली म्हणून, काहींनी नेटाने बुडवली म्हणून. काही हुशार होते म्हणून, काही शिक्षकांचे लाडके म्हणून, काही खोडकर होते म्हणून. काहींना आपण शाळेत घडलो असं वाटतं म्हणून, आणि काहींना बिघडलो असं वाटत असेल म्हणून. कुठल्याही कारणासाठी असेल, पण विषय मात्र जिव्हाळ्याचा!

माझ्यासाठीही लिहिता-बोलताना हमखास डोकं वर काढणारा विषय. पुस्तक खिळखिळीत झालं तरी मधलं पान उघडून उरल्यासुरल्या कोऱ्या वासाच्या खुणा शोधाव्याशा वाटतात; तसा फिरून फिरून कोऱ्या मोहात पाडणारा विषय. भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांतल्या शाळेत शिकायची संधी मिळाली तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून ‘कुठली शाळा जास्त आवडते, इथली की तिथली?’ या सतत घोंगावणाऱ्या प्रश्नाची चीड यायला लागली. खरं तर वैताग त्या प्रश्नाचा नव्हता, पण माझ्याकडे कधीच त्याचं तडफदार ‘एका वाक्यात उत्तर’ नव्हतं याचा होता.

हळुहळू लक्षात आलं की या प्रश्नाला साधं-सरळ उत्तर नसणं हीच दोन्हीकडच्या शाळांची गंमत आहे! ‘श्रीगणेशा’पासून सुरुवात करून देणाऱ्या शाळेने तिच्या वेशीबाहेर येणाऱ्या कित्येक अनुभवांसाठी झोळी बळकट केली, आणि सुरुवातीला कुवतीच्या वेशीबाहेर वाटणाऱ्या परदेशातल्या शाळांनी ‘श्रीगणेशा’ शिकवणाऱ्या शाळेचीही सय ठेवायला भाग पाडलं. ज्या कौतुकाने ठाण्याच्या शाळेबद्दल लंडनमधे बोलले त्याच उत्साहाने ठाण्याच्या बाईंना लंडनची सबंध शाळा दाखवावीशी वाटली. ज्या कळवळ्याने एकीकडच्या ‘partiality’ बद्दल तक्रार केली त्याच कळवळ्याने दुसरीकडच्या अलिप्तपणाबद्दल! जितकी कटकट एकीकडचा नागरीकशास्त्राचा पेपर देताना केली तितकीच चिडचिड दुसरीकडचा Religious Educationचा अभ्यास करतानाही. ‘ती’ शाळा सोडायच्या विचाराने जसं डोळ्यात मळभ दाटलं तसंच ‘ही’ सोडतानाही गायी पाण्यावर आल्या...

कुठल्याशा तागडीतल्या एकेका पारड्यात दोन्हीकडच्या शाळा तोलून बघत होते आणि ‘कुठली शाळा जास्त आवडते’ पेक्षा ‘कुठल्या शाळेतलं काय आवडतं’ याचं उत्तर सापडायला लागलं! ‘शाळा-शाळा’ हे याच तुलेचं प्रतिबिंब आहे... लिहिताना सतत जाणवतं की शाळेने प्रत्येक माणसावर उमटवलेला अदृश्य ठसा एकसारखा नसतो. शिवाय दोन देशांतील आर्थिक सुबत्ता, अभ्यासक्रमातला फरक, विद्यार्थ्यांची संख्या या अगदी ठळक तफावतींप्रमाणे प्रत्येकाच्या अनुभवांतील फरक, शिक्षका-शिक्षकातील फरक, आणि दर नियमाचं शेपूट असलेल्या दहा अपवादांची जाणीव ठेवणं ओघाने आलंच. या आभाळभर विषयामधली माझ्या मुठीत मावणारी बाजू म्हणजे मी जिथे शिकले त्या शाळा, जिथे किंचित शिकवायला मिळालं त्या शाळा, मी बघितलेल्या, आणि मी ऐकलेल्या शाळा! भारतात आणि इंग्लंडमधे शाळेतला प्रत्येक विषय शिकायच्या प्रयत्नात आणि त्या वातावरणात काय भावलं न् कसं निभावलं, काय सललं न् कुठे अडलं याबद्दल ही मालिका सुरू करते आहे.

एकूणच शाळेबद्दल इतका राग-लोभ, अभिमान, आठवणी, मतं, आणि विचार ‘साकार’च्या छताखाली एकत्र करायला कदाचित माझी एकटीची नजर धाकटी असेल. शिवाय शाळेची खरी मजा तिथे एकत्र जाण्यातच आहे! म्हणून ‘शाळा-शाळा’च्या सोबतीने आपापल्या शाळेचा डबा वाटून खायला सगळ्यांना ‘साकार’वर आग्रहाचं निमंत्रण!
----------
भाग१, गणित:

शाळा भारतातली काय किंवा इंग्लंडमधली काय... गणिताची समीकरणं तीच, त्रिकोनाचे कोन तीनच, दोन अधिक दोन कायम चारच! ज्या विषयांची चौकट इतकी स्पष्ट आखलेली असते ते विषय कुठल्याही शाळेत शिकलो तरी कितीसा फरक पडणार आहे? असं वाटलं खरं, पण दोन देशांतल्या शिक्षणपद्धतीतले फरक पहिल्यांदा गणितानेच माझ्यासमोर ठळक केले.

एकीकडे ‘तिमाहीत अपूर्णांकाच्या उदाहरणात तुझा अर्धा मार्कं गेला ना?’ आणि दुसरीकडे ‘एकोणतीसचा पाढा शिकून तुला आयुष्यात करायचंय तरी काय?’ ही माझ्या दोन शाळांची दोन टोकं होती. एका शाळेत चौथीत तोंडी हिशोब लिहिताना ‘तेरा साती एक्याण्णव’ पर्यंत पोहोचायला एक सेकंद लागल्यामुळे बाईंनी कान धरणं... आणि दुसऱ्या शाळेत नववीत मी हेच उत्तर calculator शिवाय दिल्यामुळे पुढची दोन वर्ष माझं ‘human calculator’ असं नाव पडणं; हा तो फरक होता.

इंग्लंडच्या शाळेत आल्यावर परीक्षा द्याव्या लागतील आणि त्यानुसार योग्य त्या तुकडीत घालतील असं समजावून आईने शाळेत पाठवलं होतं. भारतात नुकत्याच आठवीच्या वार्षिक परीक्षा देऊन आल्यामुळे कुरकुरत मी तयार झाले होते. पहिले दोन दिवस (बाईंच्या भाषेत) मला ‘मानसिक ताण’ नको म्हणून त्यांनी त्या परीक्षा लांबणीवर टाकल्या होत्या. लढाईपूर्वी ढाल-तलवारी चाचपून पहाव्यात तसं आदल्या दिवशी पाढे, निमकी, औटकी सगळं म्हणून पाहिलं. प्रतलापासून ते समांतरभुज चौकोनापर्यंत सगळ्या व्याख्या ढवळून काढल्या आणि ‘मानसिक ताण’ सांभाळत एका वर्गाबाहेर गणिताचा पेपर लिहायला बसले...

पहिली पाच पानं धडाधड सोडवली. पुन्हा पुन्हा पहिलं पान तपासायला लागले. ‘हा नववीचा पेपर असूच शकत नाही’ या विचाराने अडीच मिनिटं सर वर्गाबाहेर यायची वाट बघत राहिले. आयताची परिमिती, कुठल्याशा हौदाचं क्षेत्रफळ, 3x=15 (find x), असे सोपे प्रश्न बघून भीतीने मी कागद-पेन बाजूला सारलं. सर बाहेर आले...
“Any problem Arnika? Is it too difficult?”
मला सहावीचा पेपर नाही ना दिलात चुकून? असं विचारावंसं वाटत होतं. सव्वा तास शिल्लक असल्याचं सांगून ते परत वर्ग शिकवायला निघून गेले. आता माझा आत्मविश्वास चांगलाच गुटगुटीत झाला होता. पुढचा प्रश्न सोडवायला मी पान उलटलं... आणि मी कधीही न पाहिलेले प्रश्न पाहून चरकले!

Moving averages? Pie charts and Probability? Describe the trends and patterns from the following graph? हे काय होतं? प्रश्नच वेगळ्या भाषेत होते! स्वत:वर चरफडत तो पेपर सोडवला. दुसऱ्या दिवशी तपासलेला पेपर हातात ठेवत सर म्हणाले, “शाबास! उत्तम लिहिला आहेस पेपर, you’re a star!” मला त्यांचं इंग्लिश समजलं, आणि गणितात मला कोणीतरी स्टार वगैरे म्हणालं याच्या मला झालेल्या आनंदावर लगेच विरजण पडलं. १०० पैकी ७५ मार्क मिळाले म्हणून आजुबाजूच्या अनोळखी मुलींनी मला मिठ्या मारल्या. तोच आकडा बघून Statistics च्या नावाने मी मात्र अक्षरश: टाहो फोडला!.

तो सबंध दिवस म्हणजे येणाऱ्या चार वर्षांची झलक होती. अनोळखी असल्याने नकोसं वाटणारं Statistics, ७५ मार्कांना मिळणारी शाबासकी, त्याचबद्दल माझी रडारड, ‘इतके मार्कं मिळूनही रडते, जरा शिष्टच आहे’ अशी काही मुलींमधे झालेली ख्याती आणि घरी होणारी, ‘गणितात पैकीच्या पैकी मिळायला हवेत’ अशी हलकीशी सूचना!

पुढच्या चार वर्षांत समजलं की इंग्लंडच्या शाळांचा भर वेगळ्या प्रकारच्या गणितावर असतो. अंदाज बांधणे, टक्केवारी अशा व्यवहाराच्या गोष्टी आधी शिकवल्या जातात. एक्याऐंशी भागिले नऊ येण्याआधी त्यांना graph बघून वार्षिक पावसाची सरासरी सांगणं जमतं. शंभरपर्यंत मोजता येण्याआधी टक्केवारीची भाषा करणारी मुलं शिशुवर्गात भेटतात... ज्या देशातलं हवामान इतकं लहरी असतं तिथे ‘आज पावसाची शक्यता किती?’ या प्रश्नाला ‘छत्रीच्या परिघापेक्षा’ जास्त महत्त्व असण्यात नवल नाही म्हणा! तिसरी-चौथीतली मुलंही ‘नदीच्या पाण्याचा वेग अंदाजे किती?’, किंवा ‘विहिरीची साधारण खोली ५० मीटर असं धरू’ ही वाक्य सहज बोलून जातात तेव्हा गणिताचं अचूक उत्तर फक्त कागदावर असतं ही त्यांची समज मला फार कौतुकास्पद वाटते!

दोन हजार वर्षांपूर्वी ग्रीक राजांना अंकगणित आणि भूमितीत तरबेज तज्ञ दरबारी असण्यात भूषण वाटत असे. रोमन पुस्तकांचा भर मात्र ‘शत्रू पलिकडच्या किनाऱ्यावर असताना नदीच्या पात्राची रुंदी कशी जोखावी’ यावर असे(१). हाच फरक माझ्या मते भारतीय आणि इंग्लिश गणितातला. Academic आणि practical या दोन वृत्तींमधला!

अंकगणिताच्या बाबतीत इंग्लिश शाळा फार सैल. हे असं ‘गरजेपुरतं गणित’ का? हा प्रश्न मी सरांना विचारला तर ते म्हणाले, “ज्यांना खरंच शिकायचं आहे ते अकरावीपासून पुढे शिकतील. Compulsory विषय असताना सगळ्यांना यात रस नसतो, त्यांना इतपत पुरेसं आहे!”
बाकी देशांतून जबरदस्त तयारीने येणाऱ्या मुलांसमोर कॉलेजमधे इंग्लंडच्या शाळेतल्या मुलांची तयारी पहिलं वर्षभर तरी कमी पडते हे मात्र फार कमी जणांच्या लक्षात येतं.

एका प्राथमिक शाळेत मी महिनाभर शिकवत होते. तिसरीच्या मुलांना साधा गुणाकार शिकवत असताना दोन चुणचुणीत मुलांनी हात वर केलेले पाहिले. खुर्चीच्या पाठीवर रेलत त्यांनी विचारलं, “Miss Paranjape, why do we have to learn to multiply? Where would we be using it?” मी गार! गुणाकाराचे उपयोग सांगणं कठीण म्हणून नव्हे, पण हा प्रश्न कोणाच्या डोक्यात येऊ शकतो हेच मला झेपत नव्हतं.

भारतातील शाळेत पाढे पाठ करताना आणि दोन अंकी भागाकार शिकताना आम्ही लाख कटकट केली असेल... पण गणित सोडवा म्हंटलं की सोडवायचं ही एक सवय होती. ‘का?’ हा प्रश्न डोक्यात आलाच नाही. फार वेळा चुकलं तर ओरडा खायला लागणार, सगळा वर्ग हसणार हे ठरलेलं होतं... त्यात काही वावगं वाटायचं नाही. शिक्षकांच्या आणि इतर मुलांच्या वेगाने बीजगणित, अंकगणित, भूमिती, हे विषय शिकणं व्हायचं. वर्गातल्या हुशार मुलांशी स्पर्धा करण्यात नेहमी त्याचं रुपांतर होत नसलं तरी ते विषय कानावर पडत रहायचे. अर्ध्या-पाऊण मार्कासाठी चढाओढ नकोशी वाटली तरी ७५% मिळाले म्हणजे आभाळाला हात टेकले नाहीत हे समजत होतं.

आपल्या शाळेत कोणी गुणाकाराचे फायदे न् भागाकाराचे तोटे विचारत नाही. गणित हा शिस्तीचा आणि शिक्षणाचा पाया मानला जातो. त्याचा वैताग येवो न येवो, मार्कं मिळोत न मिळोत... एकाग्रता नकळत वाढत जाते. आपल्याकडे शालेय पातळीवर ज्या जोमाने गणिताची तयारी करून घेतात, तशी मी आजवर बाकी कुठेही पाहिली नाही! व्यवहार आणि Statistics च्या बाबतीत मात्र इंग्लंड देश समजुतीनेच वरचढ वाटतो. दरबारात आलेल्या इंग्लिश ऑफिसरला शिवाजी महाराजांनी, “तुम्ही तराजूच्या सहाय्यानेच जगायच्या लायकीची माणसं आहात” असं म्हंटल्याची नोंद आठवून हसू येतं!

गणिताचा निरोप घेता घेता एवढ्या सगळ्या फरकांमधून डोकावणारं दोन्हीकडचं तिळाएवढं साम्यसुद्धा मला सांगायलाच हवं! भारतातल्या गणिताच्या पुस्तकात ‘रतन, जोसेफ आणि फ़ातिमा’ फळं विकत घ्यायला जात असंत. प्रत्येक प्रश्नात कोंबलेल्या ‘राष्ट्रीय एकात्मतेची’ मला फार गंमत वाटायची. इंग्लंडला गणिताचं पुस्तक उघडलं, पहिल्यांदा स्वाध्याय सोडवायला घेतला आणि पहिली ओळ वाचून चक्क हसत सुटले- ‘Mary, Ibrahim and Shobha bought a cake for £ 5.60’
“Any problem, Arnika?” सर गोंधळून म्हणाले
“No sir, just saw a question I think I’ve seen before...”

-------------------------------------------------------------

संदर्भ (१): Leonard Mlodinow. The Drunkard’s Walk. Pages 27-31, Penguin Books;2009

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्निका....खुप आवड्ल लिखाण्....मनःपुर्वक आभार ..मला या लेखांमधुन खुप माहीती मिळालिये...पण शाळेच्या वातावरणातील नकारात्मक गोष्टी वाचायला पण आवडतील..सगळीकडेच + / - असतेच पण देशादेशातील फरक कळेल्...किती आव्हानात्म्क होत शाळेमधे जुळवुन घेन हेही माहीत करुन घ्यायला आवडेल्...बाकि सगळे ब्लॉगवरचे लेख वाचले मी खुप छान लिहिलय्..येउ द्यात अजुन ..मी इथे मास्टर्स केलय पण शाळांबाबतची माहीति काहीच नव्हती...धन्यवाद ती दिल्याबद्द्ल...

ओह गॉड, मला हा लेख किती आवडलाय सांगता येणं मुश्किल आहे!! विषय, तुझी शैली, कित्येक वाक्यं, दोन्हीकडची साम्यस्थळं, फरक .. सगळं प्रचंड आवडलं!! (आणि ते पण माझा आणि गणिताचा ३६चा आकडा असताना!) Happy

सोडवा म्हंटलं की सोडवायचं ही एक सवय होती. ‘का?’ हा प्रश्न डोक्यात आलाच नाही. >>> अगदी खरंय.

Pages