तुलाही पाहिजे आहे स्वतःचा वेगळा रस्ता

Submitted by बेफ़िकीर on 24 September, 2013 - 11:18

तुलाही पाहिजे आहे स्वतःचा वेगळा रस्ता
मलाही पाहिजे आहे जरासा मोकळा रस्ता

पिकांची वाढती गर्दी सुरीले हॉर्न पक्ष्यांचे
कधी होईल आधीसारखा हिरवा मळा रस्ता

सुरू होवो कुठेही शेवटी जातो तुझ्यापाशी
प्रवासी आंधळे आहेत नाही आंधळा रस्ता

कुठे जाईल याची शाश्वती नाही कुणालाही
कधीचा शोधतो आहे असा मी वेंधळा रस्ता

पहाटे भाळण्यावरती तिन्हीसांजेस चिडलो मी
गुलाबी वाटला होता निघाला जांभळा रस्ता

किती वळणे किती खड्डे किती सिग्नल किती गर्दी
तुला माझ्याकडे आणेचना हा पांगळा रस्ता

भिकारी पोर गाडीखालती आल्यामुळे मेले
कडेला थांबला आणून खोटा कळवळा रस्ता

नशीबी पावसाळ्याने दडी मारूनही सोसे
हिवाळ्याचा कडाका अन् उन्हाळ्याच्या झळा रस्ता

इथे कित्येक लोकांना जरी वाटेल मृत्यूचा
असावा 'बेफिकिर'च्या जीवनाचा सापळा रस्ता

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतल्यातच गार !!!

मळा हटके !

किती वळणे किती खड्डे किती सिग्नल किती गर्दी
तुला माझ्याकडे आणेचना हा पांगळा रस्ता.................अप्रतिम शेर !

कळवळाही लाजवाब !

"रस्ता" मस्त निभावलीय रदीफ . वा वा !

धन्यवाद !

उकाका मला एक प्रश्न पडतो ; कुणाचीही कोणतीही गझल असो अख्ख्या गझलेत तुम्हाला नेहमी २ च शेर कसे हो विशेष वाटतात Happy

अवांतराबद्दल क्षमस्व !!!

जराश्या कमी अवडलेल्या ओळीत सवयीनुसार असा बदल करून वाचत आहे .............

हव्याश्या पावसाळ्याची न्यहाळत वाटुली सोसे
हिवाळ्याचा कडाका अन् उन्हाळ्याच्या झळा रस्ता

सर्वच शेर आवडले.

मतला अप्रतिम.

आंधळा हा शेर अंतर्मुख करायला लावतो आहे.

पहाट, तिन्हीसांज, गुलाबी आणि जांभळा ह्या शब्दांच्या योजनेतली गंमत अनुभवून मजा आली.

बर्‍याच दिवसांनी एक 'बेफिकीरां'ची गझल आली, धन्यवाद!

हव्याश्या पावसाळ्याची न्यहाळत वाटुली सोसे
हिवाळ्याचा कडाका अन् उन्हाळ्याच्या झळा रस्ता

वैभव, काय ही वाट त्या शेराची? Sad

सर्वच शेर अप्रतिम................
रा
किती वळणे किती खड्डे किती सिग्नल किती गर्दी ( किती या शब्दाची जरा गर्दी वाटते)

"उकाका मला एक प्रश्न पडतो ; कुणाचीही कोणतीही गझल असो अख्ख्या गझलेत तुम्हाला नेहमी २ च शेर कसे हो विशेष वाटतात " >>> वैवकु, तुम्हाला असा प्रश्न का पडावा हे (मला तरी) अनाकलनीय आहे.
संबंधित गझलकाराला किंवा मला स्वतःला कधीच पडला नाही. असो.... हा प्रश्न आणि त्याबाबत चर्चा खरं तर इथे करणं योग्य वाटत नाही. (अशा चर्चेकरता विपू हा उत्तम पर्याय आहे.)

रस्ता .. खरंच अप्रतिम प्रतिमा.मस्त सुरुवात, नीट निभावलेला विषय .

कुठे जाईल याची शाश्वती नाही कुणालाही
कधीचा शोधतो आहे असा मी वेंधळा रस्ता

पहाटे भाळण्यावरती तिन्हीसांजेस चिडलो मी
गुलाबी वाटला होता निघाला जांभळा रस्ता

हरवून गेले या रस्त्यावर.रस्ते याच विषयावरच्या एका पूर्ण विस्मरणात गेलेल्या माझ्याच कवितेची फक्त शेवटची ओळ आठवली म्हणून अस्वस्थही झाले ..
''रस्त्यांनी काही आठवावे अस्पर्श भूमीवर गढूळ गजबज नेताना ..''