"बांड हाय का घरात?" ओटीवर बसता बसता धुमाळणीने गोपीच्या आईला विचारले.
बाळा धुमाळाची बायको आणि मुलगी मालती दोघी दुपार्च्यालाच गोपीच्या घरी आल्या होत्या.
"जेवायला बसलाय." गोपीची आई.
अख्खी बंडलवाडी गोपीला 'बांड' म्हणून ओळखत होती. त्याला कारणही तसंच होतं..
गावाबाहेर असलेल्या शंकराच्या देवळातील घंटा चोरीला गेली होती. वाडीतल्या म्हातार्या बायांनी भगवान शंकराकडून कोप उधार घेवून त्या अज्ञात घंटाचोराला निरनिराळ्या पद्धतीने मृत्यु दिला होता. अभ्यासात बर्यापैकी हुशार असलेल्या आणि डीडीवनवरच्या करमचंद वा व्योमकेश बक्षी असल्या हेरमालिकांचा प्रचंड प्रभाव असलेल्या गोपीला दोन दिवसांत ती घंटा त्याच देवळातल्या पुजार्याच्या घरी सापडली. बंडलवाडीच्या सरपंचांनी सबंध गावासमोर गोपीचा भव्य सत्कार केला आणि आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले, "गोपी या बंडलवाडीची शान आहे. असला तल्लख बुद्धीचा मुलगा देवानं बंडलवाडीत जन्माला घातला त्याअर्थी गावाची पुण्याई थोर असली पायजे. परवाच मी आमदार सायबांसोबत एक इंग्रजी पिच्चर बघितला. आता इंग्रजी म्हटल्यावर आपलं घोडं काय येस नो च्या पुढं जात नाय. पण त्यातलं बाँड नावाचं पात्र ज्या काय करामती करतो त्याच गोपी आज इथं करतोय. गोपी म्हणजे बंडलवाडीचा बाँड." असं म्हणून सरपंचांनी त्याला 'बाँड' हा खिताब दिला.
तेव्हापासून गावात काही चोरीला गेलं की चला गोपीकडे ! हा शिरस्ता सुरू झाला. मग गोपीही स्वत:ला बाँडचा एकमेव वारस समजून लोकांच्या चोरीला गेलेल्या गोष्टी शोधून देई. त्याबदल्यात लोकं त्याला आपापल्या ऐपतीनुसार बक्षिशी देत. लोकांनी गोपीच्या अंगातील हे गुण 'हेर'ले.
महीनाभरापुर्वीच गोपीनं रोटकराची म्हैस शोधून दिली होती.
गोपीचा बाप मात्र गोपीला "हा कसला बांड ! हा तर बांडगुळ !" असं म्हणून हिणवत असे. तसं तर त्याच्या आईलादेखील त्याचे हे उद्योग पसंत नव्हते, पण रोटकराची म्हैस शोधून दिली तेव्हा रोटकराने त्याला पाचशेची नोट काढून दिली होती.
"घरी गटारी केली का नाय?" गोपीच्या आईने धुमाळणीला विचारले.
"शेकटाच्या शेंगा खाऊन कुनी गटारी केली होती !" धुमाळीण कपाळाला हात लावून बोलत होती.
इतक्यात गोपी टॉवेलानं हात पुशीत बाहेर आला. गोपीची आई खरकटी ताटं उचलायला आत गेली. गोपीचं लक्ष मालतीकडे गेलं. मालतीने आपल्या दोन्ही वेण्यांची शेपटं पुढे घेतली आणि ती त्यांच्या रिबीनीशी लडिवाळपणे खेळत बसली.
गोपीच्या घरासमोर रस्त्याच्यापलिकडे भाऊचं किराणा मालाचं दुकान होतं. मालती नदीवर कपडे धुवायला निघाली म्हणजे रस्त्यात लागणार्या भाऊच्या दुकानात साबणाची वडी घ्यायला थांबे आणि गोपीच्या घराकडे पाहत राही. मालतीची नदीवर कपडे धुवायला जायची वेळ गोपीला ठाऊक असल्यामुळे गोपीदेखील केसांना मस्तपैकी भांगबिंग पाडून ओटीवर येवून उभा राही आणि बराच उशीर मालतीकडे पाहत राही.
"बोला काय काम होतं?" गोपी ढेकर देत बोलला.
"माजी सोन्यासारखी कोंबडी चोरीला गेली." एवढं बोलून धुमाळीण तोंडात पदराचा बोळा खुपसून हमसू लागली.
"कधी गेली?"
"कालच सकाळी तिला किरकिंड्यातनं बाहेर सोडली तिथनं अजुन तिचा पत्ता नाय." आपली आई शोक आवरत नाहीसं पाहून मालती बोलली.
"हम्म. तिचा फोटो आहे का एखादा?"
"आत्ता ! कोंबड्या-मांजरांचा फोटू काडून कुनी भितीवर टांगतं की काय?" नाकाकडून ओठांकडे सरकू पाहणारं शॅम्पुच्या रंगाचं द्रव पदराने पुशीत धुमाळीण.
"वर्णन सांगा."
"म्हंजे?"
"म्हणजे दिसायला कशी आहे?"
"कशी म्हंजे लोकांच्या कोंबड्या दिसतात तशीच दिसते. पन उरफाट्या पिसांची हाये."
"तिला किनई तांबडी-काळी पिसे आहेत." हे वाक्य मालती असं काय बोलली की ज्यामुळे गोपीला चेहर्यावर क्षणभर मोरपिस फिरल्याचा भास झाला.
"पण काहीतरी निशाणी असेलच की तिची." गोपीमधला डिटेक्टीव्ह पुन्हा जागेवर आला.
"आंडी हाईत. चार दिवसापास्नं आंडी घालायला लागलेली. धा-बारा आंडी झाली असती म्हंजे रवनावर बसवली असती." अंड्यातून कोंबडीची पिल्लं बाहेर येताना पाहण्याचं धुमाळणीचं स्वप्नं आता अंड्यातच राहीलं होतं.
"त्यातलं एखादं अंडं मिळेल का?" गोपीच्या या प्रश्नावर धुमाळणीनं त्याच्याकडे अशा काय घुश्शात बघितलं, जणू गोपीनं धुमाळणीची किडनीच मागितली असावी.
"ते आनि कशाला?"
"तपासासाठी उपयोगी पडेल. रोटकरांची म्हैस मी नुसत्या शेणावरून शोधली."
"अय्या ! आई बघितलसं गोपी कित्ती हुश्शार आहे !" डोळ्यांच्या पापण्या फडफडवीत मालती म्हणाली.
आईसमोर ती गोपीला हिरो करू पाहत होती. धुमाळणीला ते आवडलं नसावं, शेणात पाय भरल्यासारखा चेहरा करून ती मालतीकडे पाहू लागली.
"संध्याकाळी मालतीसोबत पाठवून द्या अंडं."
"त्याची काय गरज नाय. मीच येत्ये घेऊन." पोरगी आपल्या तोंडात शेण घालणार हे पुरतं ओळखून धुमाळीण मालतीचे हात धरून ओढतच तिला घराकडे नेऊ लागली.
संध्याकाळी धुमाळीण मिसिंग कोंबडीचं अंडं गोपीकडे देऊन गेली. गोपीने एकवार आपल्याकडील जाड भिंगाच्या दुर्बिणीतून अंड्याला बहुबाजूंनी (अंडं चौकोनाकृती वा आयताकृती नसल्यामुळे चहुबाजूंनी पाहण्याचा प्रश्नच येत नव्हता.) निरखून पाहीलं.
गोपीने रात्री कोंबडी या पक्ष्याविषयी अभ्यास केला. कोंबडीची मान लवचिक असते कारण तिच्या मानेमध्ये मणक्यांची माळ असते. कोंबडीला दात नसतात, परंतू माजा/गिझार्ड या पोटाच्या भागात वाळूसारखे तुकडे असतात त्यांच्या मदतीने खाद्याचे बारीक दळण होते. कोंबडीच्या जिभेला चव कळत नाही. इत्यादी...इत्यादी..
या सखोल अभ्यासाअंतीदेखील धुमाळाची कोंबडी शोधायची कशी? हा प्रश्न अनुत्तरीतच राहत होता.
*
गोपीनं अंगात काळ्या रंगाचं जॅकेट आणि डोक्यावर काळ्याच रंगाची फेल्ट हॅट चढवली आणि तो ऐटीत पावले टाकीत मुश्ताकभाईकडे आला. मुंबईत सर्विस करणार्या त्याच्या मामाने त्याच्यासाठी ही हॅट आणि जॅकेट दिलं होतं. मुश्ताकभाईचं मासळी बाजाराच्या कडेला मटणाचं दुकान होतं. दुकानात एक-दोन ग्राहक होते.
"बोला जासुससाब. काय खबर?" ग्राहकांना मटण वाटून झाल्यावर पाण्यात सुरा धुता धुता मुश्ताकभाईनी विचारले.
"मला सांगा मुश्ताकभाय, इथं कुणी उरफाट्या पिसांची कोंबडी विकायला आला होता काय?"
"कसम से नाय !" मुश्ताकभाई आपला गळा चिमटीत पकडीत म्हणाला. "त्या थवरच्या ब्रॉयलर कोंबर्याच खपत नाय.. बगल्यास. तर नवी कोंबरी विकत घ्यायला मना काय येर लागलाय."
"ठिक आहे." असं म्हणून गोपीनं मघा काढून ठेवलेली फेल्ट हॅल्ट डोक्यावर चढवली.
"नवी केस आयलीय काय?"
गोपीने नुसतीच होकारार्थी मान हलवली आणि तो गावाकडे चालू लागला.
सबंध बंडलवाडीत उरफाट्या पिसांच्या कोंबड्या किती असतील काय सांगता येत नाही. पण त्यातही तांबड्या-काळ्या पिसांच्या कोंबड्यांचीच निरीक्षणे करायची होती.
अनंता भायदेनं अशा वर्णनाची एक कोंबडी जगन कांबळे दारात पाहील्याचं सांगितलं. मुळात अनंता भायदे हा इसम गावात थापाड्या म्हणून सर्वज्ञात आहे.
एकदा 'आशुक कुंबार दगडूच्या आडात जीव द्यायला गेलाय' अशी बोंब मारत तो गावात आला.
"का बिच्चार्याच्या जीवावर उठालाएस !" असं म्हणून लोकांनी त्याला वेड्यात काढलं होतं.
पण दोनच दिवसांनी त्या आडातल्या पाण्यावर तरंगणारं अशोक कुंभाराचं टम्म फुगलेलं प्रेत पाहून लोकांचा त्यावर विश्वास बसला.
पण अशी खरी ठरणारी बातमी शंभरातून एखादीच.. नाहीतर नुसत्याच थापा.
गोपीने अनंतावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो जगन कांबळ्याचा घराकडे निघाला.
तांबड्या-काळ्या रंगाच्या उरफाट्या पिसांची कोंबडी जगनच्या घराभोवतीने बांधलेल्या किटाळावर उभी होती. गोपीने जॅकेटच्या एका खिशातून तांदळाच्या कण्या काढल्या आणि त्या जमीनीवर अंथरल्या. हवेत पंख फडफडवीत कोंबडीने जमीनीवर झेप घेतली आणि ती कण्या टिपू लागली. कोंबडीला कण्या टिपण्यात मग्न झालेली पाहून गोपीने जॅकेटच्या दुसर्या खिशातून अंडं काढून हळूच तिच्यासमोर ठेवलं. कोंबडीने एकवार अंड्याकडे पाहीलं. दोन-तीन वेळा आपली चोच त्यावर आपटून घेतली. मग ती त्या अंड्याला आपल्या पोटाखाली घेत शांत बसली. हे दृश्य पाहून गोपीला हर्षातिरेक झाला.
आपल्या केसचा निकाल लागला. कोंबडीने आपले अंडे ओळखले.
त्याने आपली हॅट काढून कोंबडीला कुर्निसात केला. तोच घरातून जगन बाहेर आला.
"काय रे बांड? इकडं कुनीकडं?"
"धुमाळाची कोंबडी चोरीला गेलीय. तीला शोधायला आलो होतो."
"मग सापडली का?"
"हो. ही काय." समोर निपचित बसलेल्या कोंबडीकडे बोट दाखवत गोपी म्हणाला.
"ही !" जगन जवळजवळ गोपीच्या अंगावर धावूनच गेला. "भो*** हात तर लावून दाखव. माजी कोंबडी हाय ती."
"तुम्ही कोंबड्या पाळता?" मुश्ताकभाईनं त्या तारांच्या खुराड्यातून एखादी ब्रॉयलर कोंबडी काढल्यावर इतर कोंबड्यांची जशी घाबरगुंडी उडते तशी गोपीचीही उडाली.
"मग आमी काय फक्त श्रावणच पाळायचा !" स्वत:च्याच विनोदावर जगन इतका भयानक हसला की कोंबडी घाबरून किटाळापलीकडे पळाली.
"कोंबडीनं आंडं दिलं." असं म्हणून जगननं अंडं उचललं.
"पण ते अंडं माझं आहे." गोपीच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर आले.
"असेल. घरी बसून दुसरं तरी काय देनार तू !" अंडं घेऊन जगन घरात गेला.
कोंबडीही गेली आणि अंडंही गेलं.
हिरमुसल्या मनानं पावलं ओढीत गोपी जेव्हा घरी आला तेव्हा रात्रीची जेवणाची वेळ झाली होती. गोपीच्या आईने गोपीसाठी ताट वाढलं.
"काय रे काय झालं? कसला विचार करतोएस?" गोपी नीट जेवत नाहीसा पाहून गोपीच्या आईने विचारले.
"धुमाळाची कोंबडी चोरीला गेलीय. आज दिवसभर शोध घेतला पण नाय सापडली."
"कोंबडी ! कशी होती ती? उरफाट्या पिसांची तर नव्हती !"
"हो. हो. तशीच होती. तांबडी-काळी पिसं होती. तू कुठं पाहीलीस?"
"काल सकाळी भरपूर पाऊस पडत होता. आपल्या घराच्या वळचणीला भिजून गपगार पडली होती. गारठून गेलेली बिच्चारी. आणखी थोडा वेळ तिथंच पडून राहती तर तशीच कुडकुडत मेली असती."
"मग आता कुठे आहे ती?"
"काल गटारीला जे मटण खाल्लसं ते तिचंच होतं की ! म्हटलं अशीही ती मरायचीच त्यापरीस आपल्या पोटात गेली तर बिघडलं कुठं ! गटारीचाच मुहुर्त सापडला बघ बयेला......"
गोपीची आई आणखी कितीतरी वेळ बोलत होती. गोपीच्या हातातला घास हातातच राहीला. गोपीच्या डोळ्यांतील अश्रुंनी ताटातील भाजी आणखीनच खारट झाली.
*
"ही घ्या तुमची कोंबडी." ओंजळीतील पांढूरकी हाडे आणि तांबडी-काळी पिसे धुमाळणीला दाखवत गोपी म्हणाला.
"बाकीची कोंबडी कुठाय?" असं म्हणून धुमाळीण हमसू लागली.
"मुंगसानं खाल्ली." चेहरा जमेल तितका निर्विकार ठेवीत गोपी बोलला.
वास्तविक धुमाळणीची सोन्यासारखी कोंबडी फस्त करणारा तो निर्दयी मुंगूस साक्षात धुमाळणीसमोर उभा होता.
"नाय. हे काम मुंगसाचं नाय. हे काम मानसाचं हाय. पन लक्षात ठेव मी त्याला माजी कोंबडी सहजी पचू देनार नाय. जाखमातेला अजून एक कोंबडी देईन पन मेल्याच्या बो*तून अख्खी कोंबडी भाईर काडीन. हगवन लागेल मेल्याला. वाटोळं होइल त्याचं...."
धुमाळीण तळतळाट करीत आपल्या घरात गेली.
गोपीच्या पोटात एकाएकी संडासची कळ आली. धुमाळणीचा तळतळाट इतक्या लवकर भोवेल याची त्याला कल्पना नव्हती.
केस निकालात निघाली होती.
* * *
भारीच !!!
भारीच !!!
(No subject)
बंबाँ एकदम भारी.
बंबाँ एकदम भारी.
समस्त बाँडप्रेमींचे आभार
समस्त बाँडप्रेमींचे आभार
एकदम झक्कास...!
एकदम झक्कास...!
हा कसला बांड ! हा तर बांडगुळ
हा कसला बांड ! हा तर बांडगुळ >>>>
मराठीत शिणेमा निघू शकतो. करमचंदला गाजर खाताना दाखवायचे तसं या बांडला गूळ खाताना दाखवता येईल.
(No subject)
(No subject)
मस्त !!! झकास!
मस्त !!!
झकास!
(No subject)
लैच भारी
लैच भारी
मस्तच
मस्तच आहे..................... आवडली कथा
भन्नाट....
भन्नाट....
उशिरा वाचनात आलेली छोटीशी,
उशिरा वाचनात आलेली छोटीशी, गमतीशीर कथा आवडली.
Pages