क्विक मँगो कलाकंद-गोड-सीमा

Submitted by सीमा on 19 September, 2013 - 00:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मिल्क पावडर : १/२ ते ३/४ कप
साखर १/२ कप
आंब्याचा रस काढून घ्यावा किवा मॅगो पल्प : १/२ कप
वेलदोडे,केशर्,ड्रायफ्रुट वगैरे
पनीर १ कप किंवा
(पनीर बनविण्याचे साहित्यः
४ कप दुध
१/२ कप दही)

क्रमवार पाककृती: 

दुध उकळून घ्यावे. त्यात दही घालून आणखी एकदा उकळी आणावी. गाळुन घ्यावे. थोडस पाणी राहिल तरी हरकत नाही. तयार झालेले पनीर नॉन स्टिक पॅनमध्ये घालून परतून घ्यावे.
पनीर विकतचे असेल तर कुस्करून पॅन मध्ये परतून घ्यावे.
त्यात मिल्क पावडर घालून २/३ मिनिटे परतावे. साखर घालावी व साधारण कडेचे बुडबुडे जावू पर्यंत परतावे. आंब्याचा पल्प घालून घ्यावा. केशर,वेलदोडे कुटून घालावेत. साधारण १ मिनिट परतावे.
गॅस बंद करुन तुप लावलेल्या भांड्यात काढून फ्रीज मध्ये ठेवावे. थोड थंड झाल कि ड्रायफ्रुट टाकून वड्या पाडाव्यात. मँगो कलाकंद तयार.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

मॅगो पल्प ऐवजी इतर फळांचा पल्प घालून पण छान लागेल.उदा. पायनॅपल किंवा ऑरेंज.
गॅसवर करायचे नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये पण होतो. वेळेच प्रमाण मात्र मी नंतर बघून लिहिन.

माहितीचा स्रोत: 
नई नवेली दुल्हन कि रेसीपीज :P अर्थात नविन लग्न झाल्यावर ज्या रेसीपीज लिहून घेतलेल्या ती वही भारतातून येताना आणलीये. त्यातली रेसीपी आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण या स्पर्धेमधे भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.
पण स्पर्धेच्या नियमानुसार दिलेल्या वेळेत प्रवेशिका न आल्याने स्पर्धेसाठी ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.

प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून,९ सप्टेंबर २०१३ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १८ सप्टेंबर २०१३ (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) स्वीकारण्यात येतील.

पल्प वापरण्याविषयी हे सांगितले होते.
फळं मात्र ताज्या स्वरुपातच वापरली जावी. फळांचा ताजा रस चालेल पण डब्बाबंद पल्प, मुरांबे, मोरावळा ईत्यादी चालणार नाही.

रवेशिका गणेश चतुर्थीपासून,९ सप्टेंबर २०१३ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १८ सप्टेंबर २०१३ (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) स्वीकारण्यात येतील.>>>>
अहो संयोजक , असं काय करताय बरं. मी अमेरिका सेंट्रल टाईम १२ च्या आत प्रवेशिका पाठविली आहे. म्हणजे पश्चिम किनार्‍यावर अजुन दोन तास स्पर्धेला उरलेले असताना. वरती टाईम स्टँप आहेच.
तुम्हीच नियम बनविलेत . आणि ते नियम तुम्हीच बदलताय. Happy

पल्प वापरण्याविषयी हे सांगितले होते.
फळं मात्र ताज्या स्वरुपातच वापरली जावी. फळांचा ताजा रस चालेल पण डब्बाबंद पल्प, मुरांबे, मोरावळा ईत्यादी चालणार नाही.>>>>>
परत तेच. आंब्याचा रस काढून घ्या. किंवा पल्प वापरा असं म्हटलयं. तसच इतर फळांचाही रस काढून घेवून वापरलं तरी चालेल. अस स्पष्ट लिहिलय ना मी.

तुम्ही नीट वाचत नाही का?
आता एवढं लिहिल्यावर सांगते कि माझी प्रवेशिका तुम्ही स्वीकारुच नका. मीच भाग घ्यायच नाही अस ठरवलयं.

सीमा, वेळेनुसार झालेल्या गोंधळाबद्दल दिलगीर आहोत.
परंतू तुम्ही स्पर्धेसाठी दिलेल्या पाककृतीमध्ये पल्प वापरलेला आहे जो नियमात बसत नाही. फळाचा रस चालेल ही इतरांकरिता झालेली टीप. पण स्पर्धेच्या मुळ जिन्नसांमध्ये तुम्ही पल्पच वापरलेला आहे.

आयला

असा करातात हो कलाकंद

मी आपला अजून दूध आटवून कलाकंद करतो.

बाकी हे पनीर वापरून कलाकंद करायची कल्पना लय भारी......

ज्याला वेळ वाचवायचा आहे त्याला ठीक आहे पण असली खवय्या मुळचेच (ते दुध आटवलेले) कलाकंद खाणार.. .

सीमा, तोंपासू फोटो.

सीमाने तयार पल्प वापरला असं कुठे म्हटलंय? उगाच काय खोड्या काढायच्या!

सीमा, जबरी रेसिपी आहे. फोटो अफाट सुंदर! नक्की करून बघण्यात येईल.

>>उगाच काय खोड्या काढायच्या!
+१

कातील फोटो आहे! कलाकंदाचं टेक्स्चर काय आलंय!!
मला पनीर फारसं आवडत नाही पण घरातल्या गोड्खाऊ व्यक्तींकरिता नक्की करणार.

आंब्याचा रस काढून घ्यावा किवा मॅगो पल्प : १/२ कप >>>> सुरूवातीला आंब्याचा रस काढून घ्यावा असं लिहिलंय की स्पष्ट.

स्पर्धेत असो किंवा नसो. माझ्यासाठी विनिंग रेसिपी आहे. कारण हे खरच आवाक्यातलं वाटत आहे. सोपं आहे. काहितरी एक्झॉटिक फक्त वाचण्यापुरतं न राहता खरोखरच घरात बनेल असं आहे.

सीमे, फोटो लै भारी आहे. मी रिकोटा चीझ वापरुन कलाकंद ट्राय मारला होता पण हे प्रकरण जास्ती चविष्ट असणार ह्यात शंका नाही. दिवाळीत नक्की करणार!

मस्त आहे रेसिपी. मी रेडीमेड पनीर, मिल्क्मेड वापरते. आंबा वापरुन कधी केला नाही. अननस, संत्र वापरण्याची आयडीया मस्त आहे.

संयोजक,

तांत्रिक कारणांवरुन ही कृती बाद करता आहात असे वाटते. कृती मध्ये ( सुरुवातीला लिहीलेले आंबे पिळून काढलेला) पल्प असं लिहीलं तर ते चालेल ना ?

सही. एकदम कातील फोटो.
घरी दूध नासले की आई नेहमी त्याचे कलाकंद करते. आता मुद्दाम करायला सांगेन आंबा घालून.

सीमा, तू कशाला काय म्हणतीयेस. तू रहा स्पर्धेत. त्यांनी काढल तरी बरच आहे की तुला. दिवाळी कालनिर्णय ला पाठव. घरा-घरात भिंतीवर पोहोचशील Happy

सॉलिड आलाय फोटो! क्विक म्हंटलय तरी वरिजिनल कलाकंदासारखेच दिसत आहे. भारी! Happy

इथे चर्चा सुरु आहे म्हणून, सुरवातीला फळांचा रस किंवा पल्प घ्या लिहिलय हे बरोबर आहे पण पुढे पल्प हा शब्द वापरल्यामुळे वर बनवलेला पदार्थ पल्प वापरुन केलाय असं वाटतं. तो पल्प हा शब्द आंब्याचा गर ह्या अर्थानी वापरला असेल तर ठीक आहे पण खरच पल्प वापरला असेल तर नियमात त्या विषयी स्पष्ट लिहिलय. अगदी ह्याच रेसिपीनी आंब्याचा गर वापरुनही एंड प्रॉडक्ट अगदी तसच होईल हे ही खरय पण जर ह्या स्पर्धेकरता हा पदार्थ बनवताना पल्प वापरला असेल तर टेकनिकली संयोजकांचे बरोबर आहे.

मुद्दाम कोणाची रेसिपी बाद करण्यात कोणी संयोजकांना रस असेल असं आजिबत वाटत नाही.

>> पण पुढे पल्प हा शब्द वापरल्यामुळे वर बनवलेला पदार्थ पल्प वापरुन केलाय असं वाटतं.
'असं वाटतं' ना? खात्री नाही ना? मग स्पर्धकाला विचारून खातरजमा करून घेता येत नाही का?

Pages