बोल बैला बोल : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 17 September, 2013 - 23:48

बोल बैला बोल : नागपुरी तडका

        बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
        बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!

नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!

        थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस
        वादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस
        तेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई
        तरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई?
        लुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे...!

इच्छाधारी गायवासरे राजबिंडे नवी
खुर्चीसाठी त्यांना तुझी हाडंकुडं हवी
तुझे कष्ट त्यांचे लेखी भिक्षापात्रतेचे
ऐद्यांना देणार 'अभय' अन्न सुरक्षेचे
जागा हो बैलोबा तू जागलंच पाह्यजे...!

                               - गंगाधर मुटे 'अभय'
-----------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह सर मुटेशैली !!

फार फार आवडली सर कविता सांग सांग भोलानाथ च्या चालीत म्हणून बघीतली अतीशय परिणामकारक झाली आहे

@शिरीन,
कोणतेही काव्य हे त्यासंदर्भाशी निगडीत कोणत्याही समसदृष्य व्यक्तीला किंवा प्रसंगाला लागू पडतच असते.
प्रामणिक tax payer हे बैलांच्या उपमेशी/प्रतिमेशी मिळतेजुळतेच असते असे तुम्हास वाटत असेल तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे.

पण जेथपर्यंत "अन्नसुरक्षा" विधेयकाचा प्रश्न आहे, माझ्या आकलनानुसार या विधेयकाचा मार प्रामणिक tax payer वर पडणार नाही कारण सरकार प्रामणिक tax payer कडून कितीही टॅक्स उकळो, तो कशावर खर्च करायचा यावर प्रामणिक tax payer चा काही आक्षेप असतो, असे मला तरी आढळून आलेले नाही. अब्जावधी रुपयाचे घोटाळे झाले तो पैसा प्रामणिक tax payer चाच होता ना? मग प्रामणिक tax payer नी कधी निषेध किंवा कुरबूर तरी केली काय? मग या प्रामणिक tax payer चा सरकारी तिजोरीत जमा होणारा पैसा घोट्याळ्यात, भ्रष्टाचारात किंवा अनाठायी खर्च होत असेल तर त्यापेक्षा अन्नदानावर खर्च होणार असेल तर तुलनेने ही प्रामणिक tax payer साठी समाधानाचीच गोष्ट नाही काय? tax मधून गोळा होणारी रक्कम अन्नदानासाठी सत्कारणी लागली, असे समजावे.

मात्र या विधेयकाचा मार शेतकरीवर्गावर नक्कीच पडणार आहे. कदाचित अन्नधान्य उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

अन्नधान्य उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाल्यावर सरकारचे आणि पगारी अर्थतज्ज्ञांचे टाळके ठिकाणावर येईलही कदाचित. पण; तोवर वेळ निघून गेलेली असेल.

अन्नाला पर्याय केवळ आणि केवळ अन्नच असते. हे ज्या दिवशी सर्वांना कळेल तो दिवस सोन्याचा मानावा लागेल. Sad