लेयर्ड हांडवो - तिखट - भरत मयेकर (पनीर+ मका)

Submitted by भरत. on 18 September, 2013 - 00:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मुख्य पदार्थ : पनीर १/२ वाटी बारीक तुकडे करून किंवा किसून
मक्याचे दाणे : अर्धी वाटी : भरड वाटून, थोडे अख्खे दाणे सजावटीसाठी
अन्य पदार्थ :
तांदूळ २ वाट्या
उडीद डाळ : १ वाटी
चणा डाळ १/२ वाटी
मूग डाळ १/२ वाटी
दही : पाव वाटी
दुधी: साल काढून किसून पिळून १/२ वाटी
हळद : १/२ च.
कोथिंबीर दोन मूठभर
आले, जिरे, लिंबाचा रस
हिरव्या मिरच्या ४-५
भाजलेले शेंगदाणे
तेल
फोडणीचे साहित्य : मोहरी, हिंग, पांढरे तीळ
मीठ, साखर
गाजर : लांब किसून

क्रमवार पाककृती: 

१) तांदूळ व एकत्र केलेल्या डाळी वेगवेगळे भिजत घालणे.
२) पाचसहा तासांनी गरजेपुरते पाणी ठेवून वाटून घेणे
३) दोन्ही वाटणे एकत्र करून त्याचे तीन समान भाग करून प्रत्येक भागात दीड-दोन टेस्पू दही घालून आठ-दहा तास ठेवावे.
४) हांडवा करताना एकेका भागात दुधीचा कीस, पनीरचा कीस, भरड वाटलेले मक्याचे दाणे मिसळावेत.
प्रत्येक भागात मीठ, किंचित साखर व हळद ,बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेले आले (किंवा दोन्हीची एकत्र वाटून केलेली पेस्ट) आपापल्या जिभेला आणि पोटाला रुचेल/पचेल इतक्या प्रमाणात घालावे, मिरच्या घालताना हांडव्याच्या थरांमध्ये आपण तिखट चटणी लावणार आहोत हे लक्षात ठेवावे.
५) कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले, जिरे यांची चटणी वाटून घ्यावी. तीत लिंबाचा रस, साखर, मीठ घालावे. यातच भाजलेल्या दाण्यांचा कूट + पाणी घालून चटणीला पसरता येण्याजोगी कन्सिस्टन्सी तरीही तिचा स्वतंत्र थर दिसेल असा जाडपणा आणावा.
६) गॅसवर पाव वाटी तेलात मोहरी, हिंग आणि भरपूर तीळ यांची फोडणी करावी.
६) मायक्रोवेव्ह- प्रूफ लोफ-डिशमध्ये फोडणी पसरावी. त्यावर दुधी घातलेल्या मिश्रणाचा थर पसरावा. त्यावर चटणी पसरावी. मग मका असलेल्या मिश्रणाचा दुसरा थर देऊन त्यावरही चटणी पसरावी.शेवटचा थर पनीरच्या मिश्रणाचा द्यावा. (थरांची उंची दीड-ते दोन सेमी ठेवलेली आहे)
६) वरून गाजराचे ज्युलियन्स, मक्याचे अख्खे दाणे वापरून आवडणार्‍या आकृत्या रचाव्यात. (माझा आवडता विषय गणित आणि भूमिती आहे, हे चित्र पाहून कळेलच. त्याला फुल्लीगोळा समजू नये.)
आता लोफ डिशला मायक्रोवेव्हच्या सुपूर्द करावे. दहा ते बारा मिनिटांनी हांडव्यात प्रेमाने सुरी खुपसून टेस्ट करून पाहावे. कडा कुरकुरीत होऊ घातल्या असाव्यात आणि मधला भाग शिजलेला हवा. आपल्या आवडीवर आणखी कुरकुरीत करता येईल.
७) किंचित गार झाल्यावर घनाकृती तुकडे करून खाण्यासाठी तयार लेयर हांडवो.
IMG0170A.jpgIMG0174A.jpg

अधिक टिपा: 

१) दोन वेगवेगळ्या चवीच्या चटण्या वापरता येतील.
२) नेहमी हांडवा लोफ डिश उलट करून अख्खा बाहेर काढून खालची तीळ माखलेली बाजू वर येईल असा सर्व्ह केला जातो. पण या हांडव्याला वरच्या बाजूने सजावट केलेली असल्याने लोफ डिशमध्येच तुकडे करून ते बाहेत काढावेत.

माहितीचा स्रोत: 
सँडविच ढोकळा+ माबो स्पर्धा यांचा संकर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा !
अशीच रेसिपी शोधत होते Happy थोड्या वेळापूर्वीच पाकृ माहीत आहे का वर विचारले होते.
आत्ता तयारीला लागते...
धन्यवाद मयेकर Happy

भरत,
मस्त !! या तिहेरी चवीच्या हांडव्याची चव लय भारी असेल ना ? कल्लाकारी साजेशी आहे.लिहीलेही छान आहे..

फोटो छान आहे. भरपूर रीकामा वेळ असेल तेव्हा व्यवस्थित प्लॅनिंग करून साहित्य आणून करून बघायला हवा हा हांडवो.

भरत, हा हांडवो ... झक्कास लिहिलाय. ते, गणिताचं प्रेम अन प्रेमानं भोसकणं वगैरे.... Happy
मी तरी आता केक-बिक, हांडवो वगैरेंना प्रेमानंच भोसकून बघणार .. आत्ता आत्ता पर्यंत माझं त्यांना भोसकणं माझ्या तब्येतीला चांगलं होतं... आता प्रेमानं करेन म्हणजे त्यांच्याही मना-बिनाचा विचार-बिचार.
व्वा...
ह्यापुढे कुणालाही... आय मीन कशालाही भोसकताना तुमची आठवण येणारच येणार...

छान दिसतेय पण हांडवो वैगरेसारखे जास्त तयारी लागणारे पदार्थ आम्ही स्वैपाक करण्याच्या सिलॅबस मध्ये ऑप्शनलला टाकलेले असतात नेहेमीसाठी.
खायला आवडेल. Happy

छान!

इन्टरेस्टिंग! Happy
लेयर्स छान दिसतायत.

सुरी प्रेमाने नाही खुपसली तर चवीत फरक पडेल का? इतक्या भानगडीत ते प्रेमाबिमाचं लक्षात राहील असं नाही. Proud

भारी दिसतंय
( लेयर्ड हांडवो - तिखट - भरत मयेकर (पनीर+ मका) एव्हढं नाव लक्षात ठेवून ऑर्डर द्यायला लागेल का ? Wink )

वा भारी रेसिपी आहे. योगायोगाने आजच सकाळी पनीर, मका आणि हांडवो रेडी मिक्स वापरून एक पाककृती लिहायचा विचार मनात आला होता.

सुरी मी खुपसली तर चालेल का? त्या एका स्टेपसाठी प्रेमा कशाला (आणि कुठून आणायची)?

मस्त रेसिपी. वाचायला तरी सोपी वाटली. तयारी बरीच करावी लागत असली तरी शेवटी एकदाचं मायक्रोवेव्हच्या सुपूर्द करणं प्रकरण हा भाग आवडला.

आता तुम्ही अन्य पदार्थ अस टायटल दिल तरी अन्य पदार्थ हे प्रमाणावरून ठरल पाहिजे नाही का?? तांदूळ २ वाट्या असेल तर तो प्रमुख पदार्थ!! संयोजक ह्यावर विस्तार करतील. पण पदार्थ म्हणून हे आवडल. हेल्दी आहे!!!

चला, यापुढे कशातही सुरी खुपसताना अनेक जण क्षणभर थांबतील.
स्पर्धेसाठी रेसिपी करायची म्हणून तीन थर, मध्ये चटणी इ.इ. षोडशोपचार. नाहीतर सगळ्या जिन्नसांचा एकच काला करूनही करता येईलच. तसेच दुधी, गाजर इ.चा कीस फुडप्रोसेसर करून देतो. दुधीची सालही आपसूक वर राहते. गाजराचे ज्युलियन्सही फुप्रोनेच केलेत.
गेल्या शनिवारी दुपारी हा हांडवा केला आणि उरलेल्या सामग्रीपासून रात्री हांडवा शिजायला ठेवला तेव्हा मायक्रोवेव्हने असहकार पुकारला. मायक्रोवेव्हच्या रेडियेटरने राम म्हटला. तो कालच बदलून घेतला. (हे त्या...एकदा ना ...धाग्यावर लिहिले तर चालेल का?) तेव्हा कढईत भ र पू र तेलाची फोडणी करून लोफ डिशमधला ऐवज कढईत ओतला आणि खरपूस हांडवा तयार झाला.

छानच आहे. इतरांनी लिहिल्याप्रमाणे चांगलेच कष्ट आहेत की हे बनवायला. फोटो छान.

Pages

Back to top