"पत्र सांगते गूज मनीचे" : जागू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 September, 2013 - 03:40

पत्र क्र. १

प्रिय बोंबिल

मेहेंदी रंग लाती है सुख जाने के बाद ह्या ओळींप्रमाणे श्रावणांत झालेल्या तुझ्या विरहामुळे तुझ्याबद्दल दाटून आलेल्या भावना आज पत्राद्वारे व्यक्त करत आहे.

तसा तू आणि तुझे इतर फ्रेंडसर्कल म्हणजे कोलंबी, पापलेट, बांगडा, रावस, मांदेली आणि इतर बरेच बालपणापासूनचेच सोबती. सोबती म्हणण्यापेक्षा फॅमिली मेंबरच. बुधवार, शुक्रवार, रविवार ह्या दिवशी तर तुमचे येणे हक्काचेच असते. तुम्ही घरच्यांचे सगळ्यांचेच लाडके असल्याने जेव्हा जेव्हा तुम्ही घरी असता तेंव्हा घरी गोकुळ नांदत. म्हणजे सगळे खुप खुष असतात. लहान मुलांपासुन वृद्धांपर्यंत सगळ्यांना जरा दोन घास जास्त जातात.

बोंबिल अरे तू तर घरात सगळ्यांचाच सगळ्यात जास्त फेव्हरेट. माझ्या मोठ्या श्रावणीला पण आवडतोस. १ वर्षाच्या राधाने तर तुझ्याच पहिल्या घासाने मासे खाणे चालू केले.

आठवड्यात जेंव्हा वरच्या तिन दिवशी व्रत किंवा उपवास येतो न तेंव्हा तुम्ही न येण्याची खुप रुखरुख लागते रे. करमत नाही तुमच्या सगळ्यांशिवाय. इतके कसे रे तुम्ही प्रचंड टेस्टी? बर ताजेच नाही तर सुकवूनही तुम्ही चविष्टच लागता.

खर तर मला तुमचे आभार मानायचे आहेत. तुमच्या रेसिपीज लिहून लिहून मी मायबोलीवर मासेविषयावर प्रसिद्ध झाले आहे. सुरुवातीला तर माबोकरांना तळ्यात, हॉटेलमध्ये कुठेही मासे किंवा माश्यांची डिश दिसली की मी आठवायचे. तसे त्यांच्या लिखाणात, फोनवरील संभाषणात ते बोलतातही.

तुला एक गुपित सांगू का काही शाकाहारी मायबोलीकर तुझ्या चमचमीत रुपावर फिदा होऊन मांसाहारी बनलेत. फोनवर विचारतात ना मला रेसिपी.

तुझ्या खमंगपणामुळे, फोटोजनीक रुपामुळे आणि माबोवरच्या चिनुक्स आयडी मुळे तुझ्या रेसिपीज माहेर अंकात छापून आल्या तेंव्हा खुप आनंद झाला. सगळ्या मायबोलीकरांच्या प्रोत्साहनामुळेच मी तुझ्या ४४ मित्र-मैत्रीणींच्या रेसिपीज आत्तापर्यंत लिहू शकले. मला हा आकडा ५० वर न्यायचा आहे आणि मग तुमच्या सुंदर सुंदर पोझेस घेउन, तुमच्या रेसिपीज लिहून एक पुस्तकही छापायचे आहे. असे होईल हा विचार मी कधी स्वप्नातही केला नव्हता.

पण एक खंत ही मनात राहीली आहे. अरे काहीमाबोकरांना वाटत की मला माश्यांशिवाय काही येत नाही. मी रोज मासेच खात असेन. पण मी फक्त बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच तुमचा आस्वाद घेते ना रे. बाकीच्या दिवशी अगदी प्युअर व्हेज. त्यात कधी कधी मंगळवारी अगदीच इच्छा झाली आणि घरातील अर्धी माणसे खातात म्हणून आणते. Lol काहिंना वाटत की मी फक्त माश्यांच्याच रेसिपीज बनवते पण रोज घरी सकाळी माझ्या दोन मुलींसाठी मी वेगवेगळे शुद्ध शाकाहारी नाश्ता करते Happy

माबोवर हल्ली माश्यांच्या विरोधात वगैरे काही लिहीले ना की मला वाटते हे मलाच टोचताहेत Lol आता हेच बघ ना गणेशोत्सवाच्या पाकस्पर्धेच्या प्रस्तावनेत अगदी ठळक अक्षरात लिहील आहे - पदार्थ शाकाहारीच असावा.. अंडं, मांस, मासे आणि इतर सीफूड यापैकी काही वापरू नका. हे वाक्य खास माझ्यासाठीच लिहीलेय की काय असेच मला वाटले म्हणून मी तिथून क्षणात धुम ठोकून दुसर्‍या धाग्यावर गेले. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस हा. मला माझ्या मनातल तुझ्यापुढे व्यक्त करायच होत म्हणून लिहीतेय. तुला दुखवायचा मला आजीबात विचार नाही. तू माझा एक सच्चा सोबती आहेस. आणिबाणिच्या प्रसंगातही तू मला साथ देतोस. अगदी ओला नाही मिळालास तरी सुका तरी माझ्या वाळवणीच्या डब्यात कायम साथीला असतोस. आपली ही सोबत कायमच राहणार ह्यात शंकाच नाही कारण कुठल्याही कारणाने तुमच्यावर पाणी सोडणे हे माझ्यासाठी अशक्य आहे.

तुमची खुप भरभराट होवो, खुप मासेसंख्या वाढो ही मनापासून सदिच्छा.

तुझीच
जागू
_________________________________________________________________________

पत्र क्र. २

प्रिय जागू

मलाही तुझ्या श्रावणातल्या विरहाने तुझी खुप आठवण येत होती. पहिला म्हणजे तुझ अभिनंदन आणि माझ्याकडूनही आभार की तू आम्हाला मायबोलीवर, मासिकात झळकवलस. माझ्या वेगवेगळ्या मित्र-मैत्रीणींची तू नेटवर ओळख करून दिलीस. तू बोलतेस ते बरोबर आहे मी ऐकतो ना. मायबोलीकरांनी आम्हाला पाहीले की तुझी आठवण काढतात ते.

तुझे गुपित वाचून मला गंमत वाटली आणि आमचे फॅन वाढल्याचे ऐकून आनंदही झाला. त्याच श्रेय तुलाही आहे कारण तू तशी आमची चविष्ट रंगरंगोटी करून आमचे फोटो काढून त्यांच्यापुढे सादर करतेस.

फक्त मी एक माझ्यापुरते सांगतो हा, तू ना माझे कालवण करून फोटो नको टाकू त्यामुळे मी आळसटलेला, थकला-भागलेला वाटतो. तू ना मला तळतेस तेंव्हा मी अगदी रुबाबदार, ताठ, सुट-बुट घातल्याप्रमाणे वाटतो.

मी ते मासे न खाणे वगैरेचे दु:ख नाही ग मानत कारण तुम्हा समुद्र किनारी लोकांचे मुख्य अन्नच मासे आहे हे जाणतो आम्ही. आमची मासे संख्या वाढावी म्हणून श्रावणात आमच्या प्रजननाच्या वेळी तुम्ही आम्हाला मुक्त सोडता. तुम्ही सगळी व्रत-वैकल्य, उपास-तपास करून मधल्य वारी आम्हाला जीवनदान देता याचीही जाणीव आहे आम्हाला. देवाने आम्हाला तुमचे अन्न म्हणूनच नेमले आहे आणि शेवटी त्याच्या मर्जीनेच आमच्या मासेजीवनाचे सार्थक होणार हे मी मानतो.

आमचे पाण्यातील जगही फार सुंदर आहे. आत शंख, शिंपले, समुद्री वनस्पती, आमच्याच रंगीबिरंगी जाती ह्या सगळ्यात फिरताना फार मजा वाटते. फक्त हल्ली जे समुद्रात प्रदुषण झाले आहे ना त्यामुळे खुप कोंडमारा होतो ग आम्हा सगळ्या माश्यांचा. नुसती माणसेच आमचे भक्षण नाही करत. समुद्रातले मोठे मोठे मासेही आम्हाला कच्चे गिळून टाकतात. तुम्ही निदान शिजवून छानस रुप देऊन आमची स्तुती तरी करता.

अग तू नको खंत करू आणि मलाही काही वाईट वगैरे नाही वाटले. शेवटी तू म्हटल्याप्रमाणे आपण दोघे घनिष्ट सोबती आहोत. मी तर तुझ्या घरातल्यांचा सगळ्यांचाच प्रिय. छोटीला मी आवडतो हे वाचून मी तिला खेळवतोय असेच छान वाटले.

चल आता कोळीमामा येतील मला न्यायला. सगळ्या माबोकरांना माझ्याकडून आणि माझ्या मित्रपरीवाराकडून धन्यवाद सांग आणि तुझ्या ५० रेसिपीज पूर्ण होऊन लवकरच तू आम्हाला पुस्तकात स्थान देशील अशी सदिच्छा. तुझ्या घरच्यांना नमस्कार आणि मुलांना आशिर्वाद.

तुझाच आवडीचा
बोंबिल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू सेम माझ्याच मनातल लिहिलयस ग><<<<<आठवड्यात जेंव्हा वरच्या तिन दिवशी व्रत किंवा उपवास येतो न तेंव्हा तुम्ही न येण्याची खुप रुखरुख लागते रे. करमत नाही तुमच्या सगळ्यांशिवाय. इतके कसे रे तुम्ही प्रचंड टेस्टी? बर ताजेच नाही तर सुकवूनही तुम्ही चविष्टच लागता.>>>>>+१११११११११:स्मित:

जागु, बोंबीलावर दिनेशदादांचे संस्कार झाल्यासारखे वाटत आहे. Happy
एकदम सुरेख पत्र, तु निसर्ग, समुद्र, घरातल्या व्यक्ती आणि मायबोली या सर्वांबरोबर किती एकरुप झाली आहेस, याचे हे उत्तम उदाहरण.
खुप शुभेच्छा Happy

<एकदम सुरेख पत्र, तु निसर्ग, समुद्र, घरातल्या व्यक्ती आणि मायबोली या सर्वांबरोबर किती एकरुप झाली आहेस,<> +१००००००
मासे खात नसले तरी, पत्र आवडले.

बोंबिलाला पत्र - भारी कल्पना (आयडिया):) दोन्ही पत्रे आवडली. शुध्द शाकाहारी असले तरी तुझा तो प्रॉन्स पुलाव मत्सप्रेमी बहिणीला करुन खाऊ घातला होता बरं!

जागू, खोटं वाटेल, आताच तळलेले बोंबिल अन मांदेळ्या खाऊन तृप्त मनाने हा लेख वाचला.जागूडी तूच असं लिहू शकतेस बघ. आय्य्म प्राउड ऑफ यू Happy
>>देवाने आम्हाला तुमचे अन्न म्हणूनच नेमले आहे आणि शेवटी त्याच्या मर्जीनेच आमच्या मासेजीवनाचे सार्थक होणार हे मी मानतो>>>>
बोंबलाचे असे उच्च विचार वाचून मला मध्येमध्ये येणारे अपराधभावनेचे झटके बंद होतील Happy
फक्त मुंबईच्या किनार्‍यावर मिळतं हे गुणी मासोळं असं ऐकून आहे.

हे सर्व वाचल्यावर असं वाटलं:
जलबिना मछली या म्हणी सारखे 'जागूबिना बोंबिल..' अशी म्हण आता अधिकृत करायला हरकत नाही..?

छानच लिहीलय... शुध्द शाकाहारी आहोत तरी लेखातल्या भावना पोचल्या. Happy

मत्स्यमय पत्र! Biggrin

जागुने काहीतरी फुला/पाना/झाडाला पत्र लिहीले असेल असा विचार करुन क्लिक केले तर ....

पण एक आहे जागु. मी मासे/नॉनव्हेज प्रेमी नसले तरी तुझ्या सगळ्या रेसिप्या मन लावुन वाचते/ डोळे भरुन बघते. तुझी स्टेप बाय स्टेप फोटो देण्याची पद्धत मला आवडते!

मस्त पत्र! आता आपल्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्याचा जीव घ्यायचा म्हणजे किती क्रूर आहे असे कुणी म्हणणार नाही!

जागू, धन्य आहे बाई तुझी! बोंबलाला पत्र! असा कुणी तुझ्याशिवाय विचारच करु शकत नाही. यावरुन तुझे मासे( बोंबील) प्रेम दिसुन येते. भन्नाट कल्पना आहे.
खुप आवडले पत्र आणि बोंबलाने पाठवलेले उत्तरही. तुझे पुस्तक लवकर निघु दे, अशी मनापासुन सदिच्छा!
माझी ईमेल मिळाली का?

ह्हाआई!!!!!!!! यम्मी पत्रं... बोंबिल आणी जागुमधला प्रेमळ संवाद अतिशय रुचकर झालाय...

जियो बोंबिल्,आपलं,,,जागु .... Lol

जागू, बोंबिल धन्य झाला गं. मस्त लिहिले आहेस. ( तू सगळ्या माश्यांना वेगवेगळी पत्रे लिहू शकशील. )

Pages