वासोटा- माणूसपणा हरवलेला आणि गवसलेला

Submitted by सूनटून्या on 16 September, 2013 - 07:34

वासोटा- माणूसपणा हरवलेला आणि गवसलेला

कामाच्या धबडग्यात आणि पोटापाणाच्या उद्योगात एव्हढा गुंतून गेलो होतो की मलापण गड किल्ल्यांचा विसर पडायला लागला होता. डोंबिवलीहून कल्याणला राहायला गेल्यामुळे तर मित्र परिवाराचे दर्शन सुद्धा दुर्लभ झाले होते. अक्षरश ७ वर्षे सर्वांपासून दूर कुठेतरी राहायला गेल्यासारखं वाटत होत. रोजचा कल्याण ते अंधेरी प्रवास म्हणजे एक दिव्यचं. रात्री बारा एक वाजायचे घरी यायला. पण मनात कुठेतरी डोंबिवली प्रेम जागृत होत. परत सगळ्या मित्रांना भेटायला उत्सुक झालो होतो आणि त्यातच डोंबिवलीमध्ये परतण्याचे माझे प्रयत्न चालू होते आणि एक दिवस आपल्या घरट्यात परतलो. बराचश्या मित्रांची लग्न झाली होती आणि सगळे जण आपापल्या संसारात रमले होते. सुटलेली पोट तेच सुचवत होती.

अशातच डोंबिवलीला परत आल्यामुळे माझ्या ट्रेकींगच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. लगेच सगळ्या मित्रांच्या गाठीभेटी सुरु झाल्या, पण सगळ्यांनी जणू माझ्या आनंदावर विरजण घालण्याचा विडाच उचलला होता. जवळपास सगळ्यांनीच ट्रेकींग सोडून दिल होत. तशातच एकदा थोबाडपुस्तकावर एक ''मित्र विनंती'' दिसली. नाव वाचले संजय गवळी. खूप वर्षानंतर भेटला तोही थोबाडपुस्तकावर. मग एक दिवस प्रत्यक्ष भेटलो आणि बोलता बोलता अस कळल कि त्यालासुध्दा ट्रेकींगची आवड आहे आणि त्याने जवळच्या मित्रांबरोबर २-३ ट्रेक केले आहेत. माझ्या आशा पल्लवित झाल्या. लागलीच ट्रेक सुद्धा ठरवला हरिश्चंद्रगड. त्यानंतर राजमाची २ वेळेस (लोणावळा आणि कर्जत दोन्ही बाजूने), राजगड असे ट्रेक सुरु झाले.

पण एक गड मात्र खूप वर्षांपासून मनात घर करून राहिला होता ''वासोटा''. आता मात्र वासोटा करायचाच हे मी आणि संजयने नक्की केल. आमच्या सोबत आता नवीन मित्र मंडळी जमा झाली होती. त्यातच माझे गिरीविराज हायकर्स मधले सहकारी दर्शन एडेकर व वासू दळवी हे दोघे हि येण्यास तयार झाले. दर्शन आणि वासू सर्पमित्र असल्याकारणाने जंगलाचे सुद्धा चांगले ज्ञान होते त्यामुळे माझे आणि संजयवरचा ताण थोडा कमी झाला होता कारण बाकी सगळे सवंगडी नवीनच होते. आमचे नवीन साथीदार प्रमोद तायडे, जंगबहादूर, श्रीनिवास गवळी हे सुद्धा येण्यास तयार झाले.

आंतरजालावर माहिती काढण्यास सुरुवात केली पण कुठेच वासोट्या विषयी संपूर्ण माहिती मिळाली नाही. काही ब्लोग्समध्ये नागेश्वर गुहेमध्ये राहू शकतो अस वाचल होत, पण ती माहिती सुद्धा जुनी आणि अपूर्ण होती त्यामुळे त्या माहितीविषयी संपूर्ण खात्री नव्हतीच. शेवटी तिथे गेल्यावरच पाहू अस ठरलं. श्रीनिवासने आमदार कोट्यातून त्याच्या ओळखीने, जाताना कल्याणवरून महालक्ष्मी एक्सप्रेस आणि येताना चिपळूण वरून राज्यराणी एक्सप्रेसचे आगावू तिकीट काढले. कारण आमचा मार्ग ठरला होता तो असा-

कल्याण-सातारा-बामणोली-वासोटा-नागेश्वर गुहा (रात्री गुहेत मुक्काम)-चोरवणे-चिपळूण-ठाणे-डोंबिवली.

खूप वर्षापासूनचे स्वप्न खरे होणार म्हणून मला तर अक्षरशः पोटामध्ये गुदगुल्या होत होत्या. ७ फेब्रुवारी २०१३ च्या रात्री मी, संजय, जंग, आणि प्रमोद डोंबिवलीहून निघालो. श्रीनिवास अंबरनाथ वरून कल्याणला येणार होता. वासू आणि दर्शन कल्याणमधेच होते. सर्वजण कल्याणला फलाट क्र. ५-६ वर गोळा झालों. बरोबर ९.२५ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी सुटली. आम्ही आगावू बुकिंग केल्यामुळे आणि सातही तिकीट confirm झाल्यामुळे प्रत्येकाला बर्थ मिळाला होता. त्यामुळे प्रवासाची दगदग होणार नव्हतीच. पण कोणाच्याही मनात झोपण्याचा विषयच नव्हता. आम्ही सगळे खालच्या २ बर्थ वर बसून गप्पा गोष्टी करत होतो. आणि उरलेले बर्थ आम्ही TC च्या मागे भटकणाऱ्या लोकांना देवून टाकले होते तेही फुकट.

DSC015066.jpg

सकाळी ३.४० ला सातारा रेल्वे स्थानकात उतरून चहा घेतला जेणे करून अंगामध्ये तरतरी येईल. आता बामणोलीला जाण्यासाठी सातारा एस टी स्थानक गाठायचे होते. सातारा स्थानकातून २ रिक्षा पकडून ४.२० ला एस टी स्थानकात उतरलो. अर्थात पैसे जास्त घेतले रिक्षावाल्याने. या ट्रेक मध्ये सातारा बाजूस काही वाईट अनुभव आले त्याची हि छोटीशी झलक मिळाली होती. बामणोली गाडी सकाळी ६ वाजता होती. बाकीचे आपापल्या पाठ्पिशाव्या व्यवस्थित लावण्यात गर्क झाले पण मला आणि प्रमोदला सातारा एस टी स्थानकात प्रदूषण कमी आहे अस वाटल्यामुळे धुराची वर्तुळ काढत बसलो होतो.

बरोबर ६ वाजता बामणोली गाडी लागली आणि सकाळी ७ वाजता एकदाचे बामणोलीला उतरलो. बामणोलीला उतरून पोटपूजा केली आणि बोटीसाठी शोधाशोध सुरु झाली. पण बामणोलीकराना कुठे घाई होती. बोट १० वाजता निघणार होती आणि त्याची बुकिंग ९.३० ला सुरु होणार होती. त्या नंतर परत जंगल विभागाची परवानगी आवश्यक होती. त्याचं कार्यालय ९.३० ला उघडणार होत. तो पर्यंत आम्ही आमची पक्षी निरीक्षणाची हौस भागवून घेत होतो. दर्शन आणि वासू कुठे काही वळवळतय का ते पाहत होते. आम्हाला बुकिंग कार्यालयाच्या उजव्या हाताला एका उंच झाडावर एक घारीसारखाच पक्षी दिसला, संजय ने त्याची ओळख करून दिलि- ब्राह्मणी घार.

बरोबर ९.३० ला बुकिंग कार्यालय उघडले आणि बोटचे दरपत्रक पाहून आमचे डोळेच दिपले. १२ जणाच्या ग्रुप साठी एक बोट आणि तिचे भाडे रु. ३२००/-. (मी कुठल्यातरी ब्लोग मध्ये रु. ७००/- वाचले होते.) आमचा ७ जणांचा ग्रुप होता. आम्ही एक बोट बुक केली. तिथले दरपत्रक पाहून थोड्या वेळाने एक ४ जणांचा ग्रुप आमच्याकडे आला कारण आम्ही फक्त ७ जण आहोत याची त्यांना माहिती मिळाली होती. आमच्या बोट मध्ये ५ जागा शिल्लक होत्याच, त्यांना सुद्धा आमच्या बोट मध्ये सामावून घेण्याची विनंती केली. आम्हाला सुद्धा हा व्यवहार चांगला वाटला, कारण भाडे आता आम्हा ११ जणांमध्ये विभागणार होते, त्यामुळे आम्ही सुद्धा खुश होतो. लागलीच आम्ही आमचा निर्णय बोट मालकाला सांगितला. पण बोट मालकाला आणि एकंदर तिथल्या संपूर्ण व्यवस्थेला आमचा व्यवहार मान्य नव्हता. तिथल्या व्यवस्थापनाने त्या ४ जणांना वेगळी बोट करण्यास भाग पाडले. त्यांना मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली आणि जंगल विभागाकडे मोर्चा वळवला कारण आता पुढची पायरी म्हणजे त्यांची परवानगी आवश्यक होती. वासोटा जंगल अभयारण्य म्हणून घोषित झालेले आहे.

बाकी मंडळी तो पर्यंत जंगल विभागाच्या कार्यालयात ठाण मांडून बसली होती. त्यांची परवानगी घेतली, तिथे सुद्धा प्रवेश फी रु. ४००/- भरले + गाईड चे रु. २००/- भरले + साहेबांचे हात ओले करावे लागतात, त्याचे रु. २००/- द्यावे लागले. म्हणजे जवळपास ७ जणांसाठी रु. ४०००/- इथेच खर्च झाले होते. बामणोलीकरांनी खिशावर चांगलाच डल्ला मारला होता. गाईड घ्यावाच लागतो, कारण वासोट्यावर राहण्यास परवानगी नाही. हा गाईड म्हणजे बोट चालक, तोच तुम्हाला वासोटा फिरवून परत बोटीने बामणोलीला आणून सोडतो. आमची नागेश्वर गुहेमध्ये राहण्याची आशा मावळली होती. थोडे हिरमुसले होवून बाहेर एक चिंतन शिबीर भरवलं. सर्वानुमते अस ठरवण्यात आले कि आजच वासोटा करून लगेच नागेश्वरच्या बाजूने खाली चोरवणेकडे उतरायचे.

जंगल विभागतर्फे चौकशी दरम्यान आम्ही आमचा चोरवणेला उतरण्याचा निर्णय सांगितला. तिथे बसलेल्या अधिकाऱ्याने प्रथम नकार घंटा वाजवली. तो काही एकतच नव्हता. त्याला वाटत होत आम्ही चोरवणेला न उतरता नागेश्वर गुहेत मुक्काम करू. पण आम्हाला मात्र कोणत्याही परिस्थितीत चोरवणेला जायचेच होते कारण आम्ही ट्रेनचे आगाऊ आरक्षण चिपळूण वरून केले होते. सरते शेवटी खूप विनंती केल्यावर त्याने एका अटीवर परवानगी दिली आणि दम भरला. नागेश्वर गुहेत अजिबात मुक्काम करायचा नाही, कितीही थकलात, पाय अगदी गळ्यात आले तरी, धड्पडलात, पडलात, मोडलात तरीही कोणत्याही सबबीशिवाय खाली चोरवणे उतरून जायचे, अन्यथा मुक्काम करतेवेळी पकडले गेल्यास कैद किंवा आर्थिक दंड रु. २००००/- प्रत्येकी भरावा लागेल. आमच्याकडून एक प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात आले, कि आम्ही स्वताच्या जबाबदारीवर पुढची वाटचाल करू.
हुश्श… अखेर परवानगी मिळाली.

आमचा भरपूर वेळ म्हणजे जवळपास ३ तास बामणोली मध्ये फुकट गेले होते. त्यामुळे आता आम्हाला पुढे काय वाढून ठेवलय याची काळजी वाटायला लागली. बरोबर सकाळी १० वाजता बोट चालकाने आमच्या पाठपिशव्या तपासल्यावर बोट चालू केली. इथे फक्त आमचीच तपासणी केली गेली, अन्य कोणत्याही ग्रुपची नाही, कारण बाकीचे सगळे ग्रुप परत येणार होते. बोटी मध्येच आम्ही रात्री घरातून घेतलेल्या पोळी भाजी आणि मटणाचा फडशा पाडला. कधी एकदा वासोटा पाहतोय अस झाल होतो, पण तो काही अजूनही दर्शन देत नव्हता, जवळपास अर्ध्या तासाने बोट एका डोंगराला वळसा घालून पलीकडे गेल्यावर ज्यासाठी आलेलो त्या वासोट्याने दर्शन दिले. थोडा वेळ सगळे पाहतच राहिलो आणि बोटी मध्येच फोटोसेशन उरकलं.

DSC015444.jpg

बरोबर ११.३० वाजता मेट इंदवली म्हणजे वासोट्याच्या पायथ्याशी उतरलो. आता आम्हाला घाई करायची होती, तेव्हढ्यात वासोट्याच्या प्रवेश द्वारावर परत एक सुरक्षा चौकी होती, हिला सुरक्षा चौकी न म्हणता तिथल्या आडगावातल्या गावकऱ्यानी आपल्या पोटपाण्यासाठी केलेली स्वयंघोषित व्यवस्था म्हणा हव तर. यांच काम म्हणजे कोणी प्लास्टिक पिशव्या किती आणल्या आहेत ते पाहणे, जेणे करून येते वेळी तेव्हढ्याच पिशव्या परत आणल्या आहेत कि नाही हे ते लोक तपासतात. अस त्याचं म्हणण होत. आणि कोण किती पिशव्या नेतात याची मोजदाद एका वहीत ठेवताना आम्ही पाहत होतो. पण त्यात सुद्धा सातत्य अस नव्हत. ४ जणामध्ये एकाची पिशवी तपासात होते. वर साहेबांशी बोलाव लागेल अशी हूल देवून फोन वर बोलण्याच नाटक चालू होत. कारण त्यांना आमच्या कडून काहीतरी मिळण्याची अपेक्षा होती. त्यांना रु. १००/- देवून पुढे निघून गेलो. त्यांचाही काही दोष नव्हता त्यामध्ये कारण त्यांच्याकडे उत्पन्नाच कोणतच साधन नाही, या लोकांची जमीन धरणाच्या पाण्यात बुडिताखाली आली आहे.

शेवटी सगळे अडथळे पार करून एकदाचे वासोट्याच्या मार्गाला लागलो. ठळक वाट आहे, कुठे हि चुकण्याचा संभव नाही, नाहीतरी वाटाड्या आपल्या सोबत असतोच. वाटेत सुरवातीलाच एका पडक्या मंदिरापाशी एक ओढा लागला, त्यात पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. काही वेळेस आपण नमुने गिरी करतो. एव्हढा अथांग जलाशय पाठी मागे टाकून आलो होतो, पण बाटल्या भरण्याची आठवण राहिली नव्हती. आणि इथे आता ओढ्यामध्ये पाणी साफ करून भरत होतो. हि अशी नमुने गिरी करणारे आम्ही एकटेच नव्हतो, दुसरा एक ग्रुप सुद्धा आम्हाला पाहून तेच करत होता.

DSCN8169.jpg

मध्ये मध्ये इथल्या जंगलात आढळणाऱ्या प्राण्याविषयी माहिती फलक लावले होते. प्राणी पाहायचे हेतूने आलात तर आपला रसभंग होण्याचा संभव आहे, त्यामुळे या माहिती फलकावरच समाधान मानावे लागेल. या वाटेवर माणसांचा राबता असल्याकारणाने प्राणी जवळपास फिरकण्याची शक्यता शुन्य. मध्येमध्ये झाडांवर अस्वलांनी आपल्या नखांनी ओरखडे काढल्याच दिसत होत. तीच काय ती जंगली प्राण्याच्या अस्तित्वाची खुण.

त्यात काही काही नग असे येतात कि त्यांना जंगल, प्राणी या विषयी काडीचाही गंध नसतो, ते फक्त पिकनिकसाठी आलेले असतात, मस्त पैकी फोन वर गाणी लावून जंगल ट्रेक करतात. अशाच एका नगाला गाणी बंद करायला लावली.

सगळ्यात पुढे श्रीनिवास (वजन ८५ किलो) होता, जवळपास पळतच होता. मस्त पैकी १५-२० किलो वजन होत त्याच्या पाठपिशवीच, काय काय घेवून आला होता देव जाणे. त्याला पळताना पाहून आम्हाला हसू आवरत नव्हत. कारण ट्रेक च्या सुरवातीला पळणाऱ्यांची काय अवस्था होते ते आम्हाला चांगलच माहिती होत. आम्ही मात्र मजल दरमजल करत चालत होतो. प्रमोद जो वजनाने जवळपास ९० किलो होता, त्याच्या बरोबर राहणे क्रम प्राप्त होत, त्याचा हा दुसराच ट्रेक. शेवटी श्रीनिवास पहिल्यांदा वासोट्यावर पोहोचला आणि आमची वाट पाहत तिथेच थांबला. आम्ही सुद्धा रमत गमत सरते शेवटी बरोबर ३.३० वाजता वासोट्याच्या माथ्यावर पाय ठेवला, खर तर उशीरच झाला होता, पण माझे लक्ष फक्त घड्याळाकडे लागले होते, कारण आम्हाला नुसताच वासोटा करून परत फिरायचे नव्हते, तर नागेश्वर करून चोरवण्याला उतरायचे होते आणि सूर्यास्त व्हायला फक्त २.३० तास उरले होते. गाईडला विचारले तर तो म्हणाला नागेश्वरला जायला २ तास तरी लागणार आणि तिथून चोरवणे जवळपास ४ तास. म्हणजे आम्हाला आता संपूर्ण काळोखातच ट्रेक करावा लागणार होता आणि तो हि या जंगलातून. आता मात्र आमचे धाबे दणाणले होते, ट्रेकची जी मजा असते ती निघून त्याची जागा आता काळजीने घेतली होती.

प्रमोद, जंग आणि श्रीनिवास पूर्ण थकलेले होते पण आता आम्हाला आराम करायला अजिबात वेळ नव्हता. धावत पळत वासोटा माथा फिरलो, आणि ज्या ठिकाणी उतरायचे त्या चोरवणे गावाचा कानोसा घेतला. डोंगरांच्या घड्यांवर घड्या पडल्या होत्या, आणि शेवटच्या घडीच्या मागे चोरवणे गाव दिसत होता. आम्ही वरूनच वाटेचा अंदाज बांधला, कारण खाली उतरल्यानंतर चोरवणे गाव दिसणार नव्हते. दूर डोंगरांच्या पलीकडे ते दिसत होते, लक्षपूर्वक डोंगररांगा पाहिल्या आणि वासोट्यावरून निघालो. वासोट्यावरून खाली उतरताना १५-२० मिनिटानंतर एक वाट डावीकडे वळते. तीच वाट नागेश्वरकडे जाते, तिथे एक बोर्ड सुद्धा लावलेला आहे. वाटसुद्धा मळलेली असल्याकारणाने चुकण्याचा संभव नव्हता, प्रश्न होता तो फक्त वेळेचा आणि पायात गोळे आलेल्या सवंगड्यांचा. श्रीनिवासने धावत पळत वासोटा माथा गाठला होता पण आता उतरताना मात्र त्याची हवा निघाली होती. वजनाने जास्त असल्यामुळे त्याच्या पायावर खूप दाब येत होता. त्याची ती वजनदार पाठ्पिशावी आता मी घेतली होती. आम्ही सुद्धा थकलेलो होतो पण तोंडावर आणि देहबोलीतून दाखवून देत नव्हतो, नाहीतर पहिल्यांदाच एव्हढ्या मोठ्या ट्रेकला आलेल्या सवंगड्याचा आत्मविश्वास डळमळला असता.
DSC01567.jpg

या तिठ्यावर थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी थांबलो. तेव्हढ्यात घू-घू चा आवाज येत होता. सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागलो, तर तो आवाज आणखी जवळ यायला लागला. आता मात्र घाबरगुंडी उडाली होती, कारण तो आवाज मधमाशांचा होता, त्यांचा एक मोठा थवा बरोबर आमच्या डोक्यावरून दुसरीकडे स्थलांतर करीत होता. ताबडतोब पाठ्पिशवी उघडली आणि त्यातून चादरी काढून सर्वांनी आपापल्या अंगावर घेतल्या. कारण नुकतीच डांग्या सुळक्यावर मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या संदीपची आठवण झाली आणि अंगावर एक शहारा आला. मधमाशा निघून गेल्या होत्या. आम्हीसुद्धा पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी तयार झालो. आता यापुढे एकांमेकांमध्ये थोडेसे सुद्धा अंतर ठेवायचे नाही अशा सूचना सगळ्यांना दिल्या कारण आता पुढची वाटचाल घनदाट जंगलातून करायची होती.

प्रोस्ताहन देत एकमेकाला धीर देत होतो. सगळ्यात पुढे वासू आणि दर्शन, सगळ्यात मागे मी असा क्रम ठेवला होता. चालताना सारखा मागे वळून पाहत होतो, न जाणो एखाद्या बिबळ्याला आवडायचो आणि घेवून जायचा मागच्या मागे. जवळपास तासाभरात जंगलातून बाहेर पडून एका कड्याच्या टोकाशी पोचलो, आता वासोटा आमच्या डाव्या बाजूला होता आणि आम्ही वासोटा माथ्याच्या पायथ्याशी होतो.
DSCN8260.jpgDSCN8262.jpg

इथे थोडीशी विश्रांती घेवून पुढच्या वाटेचा अंदाज घेतला. ती वाट आता कड्याच्याच कडे कडे ने नागेश्वरकडे जात होती. थोडा जरी पाय घसरला तर सरळ २००० फुट खाली दरीमध्ये. आम्हाला काळजी होती ती प्रमोद, जंग आणि श्रीनिवासची, कारण तिघांचेही पाय लटपटायला लागले होते. तिघानाही धीर दिला आणि पुढे वाटचाल सुरु ठेवली. वाट ठीक ठिकाणी कोसळली होती, आणि मातीची घसरगुंडी तयार झाली होती. तरीही कसरत करत करत, प्रमोदला आधार देत देत नागेश्वर-चोरवणे-वासोटा यांच्या तिठ्यावर पोचलो होतो. घड्याळात पाहिले तर ५ वाजत आले होते. आता प्रमोद पूर्ण थकल्यामुळे त्याला विश्रांतीची गरज होती, त्याच्या बरोबर मी सुद्धा तिथेच थांबलो आणि बाकीचे पाचही जण नागेश्वर ला गेले. नागेश्वर आता फक्त २००-२५० फुटावर होत. बाटल्या सुद्धा रिकाम्या झाल्या होत्या, त्या पण भरून घ्यायच्या होत्या, कारण आता वाटे मध्ये चोरवणे शिवाय कुठेही पाणी नव्हते आणि आम्हाला जवळपास आणखी ४ तास चालायचे होत.

मी आणि प्रमोद त्या तिठ्यावर बसलेलो असताना सातारकरांचा ५-६ जणांचा स्थानिक ग्रुप तिथे आला होता. त्या लोकांनी आमची विचारपूस चालू केली, कारण संध्याकाळी या वेळेस त्या ठिकाणी कोणी असेल याची त्यांना कल्पना नव्हती. आम्ही त्यांना चोरवणे ला जात असल्याच सांगितलं, त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आम्हाला दरडावून, आमची तक्रार जंगल विभागाकडे करण्याचा दम भरायला लागले. आम्हीही त्यांना खुशाल तक्रार करा म्हणून सांगितलं. आम्ही एकत नाही असे पाहिल्यावर आवाज थोडा मावळ झाला आणि एक दुसराच प्रस्ताव आमच्या पुढे मांडला. ते एका बोटीमधून तापोळ्याहून आले होते आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या बोटी मधून तापोळ्यास नेण्यास तयार होते. त्यातील एकाचे तापोळ्याला हॉटेल होते आणि तो तिथे आमची रात्री राहण्याची सोय करणार होता. माझ्या मनात शंका उत्पन्न झाली, कारण बामणोली ते तापोळा बोटीचे भाडे रु. ४५००/- होते. त्याच्या वागण्यात शुद्ध धंदेवाईकपणा आला होता. त्यांच्या तावडीत अडलेली गिऱ्हाईक सापडलेली होती. म्हणजे आम्हाला ७-८ हजारांचा फटका पडणार होता. ताबडतोब त्याला उडवून लावले, त्यासरशी त्यांना सुद्धा कळून चुकलं, त्यामुळे आमच्या नादाला न लागता नागेश्वरगुहे कडे निघून गेले. तिकडे त्यांना आमची बाकीची मंडळी भेटली, त्यांना सुद्धा तेच सांगायला लागले, आमच्या मंडळीनी सुद्धा त्यांना झिडकारून लावले. बिचारे गप्प झाले.

त्या वेळेत पुढच्या वाटेचा अंदाज घेण्यासाठी मी प्रमोदला तिथेच बसवून पाहणी करायला गेलो. पुढे एक तुटलेले रेलिंग दिसत होते, आणि त्या पुढे सरळसोट कडा. तिथल्या पायऱ्या सुद्धा तुटून गेल्या होत्या आणि फक्त भुसभुशीत सिमेंट तेव्हढे राहिले होते. मध्येच एक लाकडाचा ओंडका अडकून राहिला होता आणि तोच एक आधार होता त्या घसर गुंडीवर. मनाचा हिय्या करून खाली उतरलो, आणि थोडेसे पुढे गेल्यावर डाव्या हाताला ९० अंशाच्या कोनात परत कोरलेल्या पायऱ्या दिसल्या.
जवळपास १५०-२०० फुटाचा तो कडा होता आणि zigzag पद्धतीने त्या पायऱ्या खाली उतरत गेल्या होत्या, त्याच्या पुढे पायवाट पण दिसत होती. आता फक्त प्रश्न हा कडा उतरायचा होता आणि तो हि काळोख व्हायच्या आधी. ५ .३० वाजले होते, बाकीची मंडळी बाटल्या भरून परत आली होती आणि आम्हीही वेळ न दवडता खाली उतरण्याची तयारी केली. सगळ्यात पुढे दर्शन आणि वासू, मागे मी अशी क्रमवारी लावून, खालि उतरण्यास सज्ज झालो.

मध्ये संजय बाकीच्यांना सांभाळण्यासाठी राहिला होता. पण सुरुवातीलाच घसरगुंडी असल्याकारणाने मी पण माझी मागची जागा सोडून मध्ये आलो. मी प्रमोदचा हात धरून त्याला उतर ण्यासाठी मदत करत होतो, संजय जंग ला मदत करत होता आणि दर्शन श्रीनिवासला मदत करत होता. तिघांचेही पाय लटपटत होते. सुर्य आता समोरच्या डोंगराआड जाण्यासाठी धडपडत होता आणि आम्ही काळोख होण्याआधी या कड्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी धावपळ करत होतो. मला भीती वाटत होती ती प्रमोदची, आधीच त्याच वजन ९० किलोच्या आसपास आणि त्याचा हात माझ्या हातात होता, मनात आल हा खाली धडपडला तर याच्या बरोबर मी सुद्धा सरळ खाली जाणार होतो. पण धोका तर पत्कारायचाच होता. थकलेल्या तिघांना धीर देत देत शेवटी जवळपास पाऊण तासाने त्या कड्याच्या खाली उतरलो.

एक लढाई जिंकली होती, आता पुढे वाट थोडी रुंद झाली होती आणी स्पष्टपणे उजव्या हाताच्या डोंगरालगत जाताना दिसत होती. सुर्यसुद्धा त्या डोंगराच्या मागे गेला होता आणि अंधार पसरण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र आम्हाला घाई करणे जरुरी होते, कारण अजूनही आम्ही जंगलातच होतो. सकाळपासून फक्त चालत होतो त्यामुळे थकवा तर सगळ्यांनाच आला होता. थोडीशी विश्रांती घेवून परत पुढची वाटचाल सुरु केली, वाट डोंगराला लागुनच जात होती आणि आणखी रुंद झाली होती. जवळपास तासाभराने एका छोट्याशा पठारावर पोहोचलो. तिथूनच पुढे गावकऱ्यानी बांधून काढलेल्या पायऱ्या दिसत होत्या. याच पठारावर विश्रांती घेतली, जेवणाचा तर विसर पडला होता, फक्त बिस्कीट, फरसाण आणि लिंबू सरबत पिवून परत पुढच्या वाटचाली करिता सज्ज झालो. आता संपूर्ण काळोख पसरला होता, घड्याळात पहिले तर ७.१५ झाले होते.

पायऱ्या दिसल्या मुळे गाव जवळ आल्यासारखे वाटत होते आणि नवीन हुरूप आला अंगामध्ये. आता श्रीनिवासची ती २० किलोची पाठपिशवी घेवून माझे सुद्धा खांदे दुखायला लागले होते. पण इलाज नव्हता कारण तो स्वताच इतका गळ पटलेला होता कि त्याला स्वतालाच स्वताच वजन जास्त वाटत होत.

इथून परत आम्ही आमच्या पहिल्या formation मध्ये आलो. वासू पुढे आणि सर्वात मागे मी. पायऱ्या उतरताना सारखा टोर्च चा उजेड मागे टाकून बघत होतो, कारण आता माझी सुद्धा फाटलेली होती. मिट्ट काळोख पसरला होता, चांदण्याचा उजेड तर अजिबात नव्हता. सारख वाटत राहायचं माझ्या मागून कोणीतरी येतंय.

पायऱ्या सुद्धा संपायचा नाव घेत नव्हत्या. जवळपास ८.१५ च्या दरम्यान एका ओढ्या मध्ये उतरलो आणि इकडे आता पायऱ्या संपल्या होत्या. त्या ओढ्यातूनच समोर दोन वाटा फुटल्या होत्या, म्हणजे दोन्ही बाजूला कच्चा रस्ता होता. कपाळावर हात मारला आणि तिथेच बसलो. आता डोके चालेनासे झाले होते, पायांनी तर कधीच साथ सोडली होती, तरी पण ओढत ओढत इथ पर्यंत आलो होतो. आणि आता पुढे कोडे पडले होते, कोणता रस्ता पकडायचा? रानात एव्हढ्या रात्री तर कोणीच नसणार, शेवटी बाकीच्यांना तिथेच थांबवून मी, वासू आणि दर्शन ने समोरच्या डोंगराकडे उजव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने जावून शोध लावण्याचा निर्णय घेतला. मध्ये मध्ये प्राण्यांचे भयानक ओरडण्याचे आवाज येत होते, त्यामुळे काळोखाची भयानकता वाढली होती.

जवळ पास १० मिनिटे चालल्यानंतर तो रस्ता ९० अंशाच्या कोनात डोंगराला समांतर असा वळला होता. त्यामुळे खात्री पटली कि याच डोंगराच्या मागे चोरवणे गाव असावे. खरतर हा अंदाजच होता, आणि हा अंदाज चुकला असता तर रात्रीचे जंगलातच भरकटत राहिलो असतो. परत मागे येवून बाकीच्यांना तयार केल आणि जाण्यासाठी निघणार तोच संजयने शंका उपस्थित केली, दुसर्या बाजूच्या रस्त्याला लांबवर कुठे तरी त्याला दिवा पेटताना दिसला होता. कदाचित कुठल्या तरी गाडीचा असावा. पण त्याला त्यापासून परावृत्त करून उजव्या हात कडच्या रस्त्याला लागलो. आता रस्त्यावर शेण पडलेलं दिसत होत. त्यामुळे गाव याच रस्त्यावर असण्याचा आमचा अंदाज खरा ठरणार अस वाटत होत. वाटेत विन्चवांची शाळा भरली होती. जिकडे पाहावे तिकडे विंचू दिसत होते. त्यामुळे जपून चालावं लागत होत.

आणि अचानक काळोखातून काहीतरी चमकल्याचा भास झाला. भास नव्हता तो, कोणीतरी आमच्या दिशेने टोर्चचा उजेड पाडत होत. आता मात्र पायांनी express way पकडला होता. त्या उजेडाच्या दिशेने चालत गेलो आणि हाक मारली आणि आम्हाला समोरून प्रतिसाद सुद्धा मिळाला. तो माणूस चोरवणे गावातलाच होता आणि शिकारीच्या उद्देशाने जंगलात आला होता. त्याच्या कडून पुढच्या रस्त्याची माहिती करून घेतली आणि पुढे निघालो. आता गाव फक्त १५-२० मिनिटे लांब राहिला होता. बरोबर ९.30 वाजता गावात प्रवेश केला होता. खाली उतरल्या बरोबर रस्त्याच्याकडेला एक विठ्ठलाचे मंदिर लागते आणि त्याच्या विरुद्ध बाजूला शाळा होती. म्हणजे आमच्या मुक्कामाला योग्य ठिकाण. मंदिराच्या खालच्या अंगाला एक दुकान चालू होत, तसेच धावत त्या दुकानात जावून शाळेत राहण्याची परवानगी घेतली. शाळेत अंग टाकल आणि आजच्या दिवसाचा हिशोब केला, आम्ही जवळपास १२ तास फक्त चालत होतो.

आता जेवणाची सोय करायची होती. ती जबाबदारी मी, दर्शन आणि वासू ने उचलली. श्रीनिवास ने तर चक्क लोळणच घेतली होती. त्याच्या पाठ्पिशवी ने माझा कंबरड मोडल होत आणि लोळण मात्र त्याने घेतली होती. २ चूल मांडल्या, भात आणि दुकानातून घेतल्याला अंड्याची आमटी केली. झोपायला ११ वाजले होते. पण एव्हढ अंग दुखत असून सुद्धा सुखरूपपणे पोहोचल्याचा आनंद जास्त होता.

चोरवणे गावातून दिसणारा नागेश्वर आणि वासोटा परिसर. डाव्या हाताच टेकाड म्हणजे नागेश्वर,
त्याच्या उजव्या बाजूचे टेकाड म्हणजे ताई तेलनीचा किल्ला आणि एकदम उजव्या बाजूला वासोटा.
खाली चोरवणे गावातील डांगेवाडी.
DSC016133.jpg

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. पाहतो तर जंग आणि संजय ने आता चुलीचा ताबा घेतला होता. लवकर उठून चहा आणि रात्रीच्या उरलेल्या भाता मध्ये मटार टाकून मस्त पैकी फोडणीचा भात केला होता. चहा आणि नाश्ता करून आता सगळेच पक्षी निरीक्षणासाठी निघालो. संजय आणि दर्शन पक्षांची ओळख करून देत होते. चोरवणे गाव डोंगर पायथ्याशी आणि जंगलाच्या सीमेवर असल्याने इथे विपुल प्रमाणात वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. आम्ही जिथे उतरलो होतो ती चोरवणे गावातील डांगवाडी मधील शाळा होती. मुख्य गाव नदीच्या पलीकडे उजव्या बाजूला होते. शाळेमध्ये पाण्याची टाकी बसवली आहे आणि दररोज ती पम्पाद्वारे भरण्यात येते, त्यामुळे पाण्याची चांगली सोय आहे.

आज आमच्या कडे भरपूर वेळ होता, आम्ही रात्री ११ वाजता चिपळूण वरून सुटणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसची तिकीट काढली होती, आणि चोरवणे गावातून चिपळूणला जाण्यासाठी शेवटची बस संध्याकाळी ५ वाजता होती. त्यामुळे संध्याकाळ पर्यंत गावातच आराम करण्याचा निर्णय घेतला.
पक्षी निरीक्षणावरून परत आल्यावर, कोंबडी करण्याचा विचार केला. शाळे जवळच घर असलेल्या एका काकूंकडे कोंबडीची चौकशी केली. त्यांनी पुढे मुख्य गावात दुकान असल्याच सांगितलं आणि स्वतः भाकऱ्या करून द्यायची तयारी दाखवली.

दर्शन आणि वासू कोंबडी आणायला गेले आणि आम्ही बाकी मंडळी अंघोळ करण्यासाठी नदीवर निघून गेलो. श्रीनिवास अजूनही उठला नव्हता. आम्ही नदीवरून परत आलो तरी दर्शन आणि वासू चा काहीच पत्ता नव्हता. तोपर्यंत आम्ही भात लावून ठेवला आणि त्यांची वाट पाहत रस्त्याकडे डोळे लावून बसलो. जवळपास १२ वाजत आले होते, त्यांना जावून २ तास तरी होवून गेले होते, थोड्या वेळाने मुख्य गावातला रस्ता आणि डांगवाडीतून निघणारा रस्ता एकत्र मिळतात, तिथे हे दोघे येताना दिसले. त्यांना उशीर का झाला याची आणि चोरवणे ग्रामस्थांच्या माणुसकीची कथा सांगितली ती अशी:

हे दोघे कोंबडीचे दुकान शोधत शोधत मुख्य गावात पोहोचले, पण दुकान बंद होते, घरात ४ दिवसांपूर्वी कोणीतरी मयत झाल्या कारणाने मालकाने दुकान बंद ठेवले होते. त्याने दुसऱ्या दुकानाचा पत्ता सांगितला. हे दोघेहि त्या दुसऱ्या दुकानात गेले तर ते हि दुकान बंद. कारण हा दुकानदार (सुभाष) हि पहिल्या दुकानदाराच्या दुखात सहभागी होता, त्यामुळे तो सुद्धा कोंबडी देऊ शकत नव्हता. त्याने या दोघांची चौकशी केली, आणि आम्ही काल पासून कसे पळत पळत वासोट्या वरून इकडे आलो याची कथा एकून त्याला या दोघांची दया आली. त्याने सरळ आपल्या खिशात हात घातला आणि आपल्या बाईकची चावी वासूच्या हातात दिली. त्याने वासूला तिवरे गावात जावून (अंतर: ७-८ k.m.) कोंबडी अणायली सांगितली. कोणतीही ओळख देख नसताना त्याने आपली गाडी या दोघांच्या हवाली केली होती. पण आता वासू आणि दर्शनला त्याची गाडी घेवून जाणे प्रशस्त वाटले नाही म्हणून ते निराश होवून परत यायला निघाले. त्या दोघांची तोंड बघून त्या दुकानदाराला दया आली, त्याने सरळ बाईकला किक मारली आणि या दोघांना तिवरे गावात घेवून गेला आणि परत चोरवणे ला आणून सोडलं, तेही एकही रुपया न घेता. वर परत कधीतरी राहायलाच या यापेक्षा चांगला पाहुणचार करतो म्हणून सांगितला. हि कथा एकूण आम्हीहि त्या दुकानदाराला मनोमन धन्यवाद दिले.

आता चुलीची जबाबदारी सकाळपासून जंगने घेतली होती. आज पहिल्यांदाच U.P. पद्धतीची कोंबडी खाणार होतो. जंग ने सुद्धा मस्त पैकी फक्त कांद्यावर शिजवलेली (पाणी नाही) कोंबडी बनवली होती, मसाले आणि पाणी नंतर टाकले. एवढी मस्त झाली होती कि एक थेंब रस्सा किंवा एखाद हाडूक सुद्धा बाकी ठेवलं नव्हत. काकू नि दिलेल्या भाकरीचे पैसे द्यायला संजय गेला तर, त्या पैसे घ्यायला तयारच होत नव्हत्या. त्यांचा मुलगा मुंबईला होता आणि त्या एकट्याच गावी राहत होत्या. कदाचित त्या आपला मुलगा आमच्यामध्ये पाहत होत्या. शेवटी संजय ने जबरदस्ती पैसे ठेवले. चोरवणे गावात माणुसकीचे असे एकापेक्षा एक धक्के बसत होते कि, कालची बामणोली आणि वासोट्यावरचे वाईट अनुभव विसरूनच गेलो होतो.

चोरवणे गावाने आमच्यावर माणूसपणाचे थोर संस्कार केले होते आणि ते पुढील आयुष्यात कायम उपयोगी पडणार होते.

निघतेवेळी शाळे जवळच्या विलास जाधवांच्या दुकानात जावून गावकऱ्यानी केलेल्या मदतीसाठी आभार प्रदर्शन केले आणि ५ वाजताची एस टी पकडून ६.३० वाजता चिपळूण मध्ये पोचलो.
रात्री ११ वाजता चिपळूणवरून ट्रेन पकडून सकाळी ६ वाजता ठाण्याला उतरलो आणि तिथून अर्ध्या तासात डोंबिवली.

टीप:

या आधी वासोट्यावर जाण्यासाठी कोणतीही खात्रीशीर माहिती आंतरजालावर न सापडल्यामुळे इथे लिहिण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एव्हढ काहीतरी लिहिलंय. व्याकरणाच्या चुका असल्यास क्षमस्व.

वासोटा जंगल अभयारण्य असल्याचे भान ठेवून वागावे. जोरजोरात गाणी बजावणे टाळावे. आपण जंगली प्राण्यांच्या प्रदेशात वावरत आहोत याचे भान ठेवावे.

नागेश्वर गुहेत मुक्काम करणे बेकायदेशीर आहे, त्यामुळे आपणही कायद्याचा मान राखावा आणि प्राण्यांनासुद्धा त्यांची जागा द्यावी.

काही लोक हा ट्रेक चोरवणे गावातून नागेश्वर पर्यंत करतात, परंतु ते सुद्धा बेकायदेशीर आहे आणि नैतीकेला धरून नाही. भलेही नागेश्वर चिपळूण तालुक्यात येत असेल तरी नागेश्वर-वासोटा हा अभयारण्याचाच भाग आहे आणि तुम्ही जंगल विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय प्रबेश करत आहात, हे लक्षात ठेवावे. फक्त स्थानिकांना इथे मुक्त प्रवेश आहे????

आपले कपडे जंगल परिसराशी मिळते जुळते वापरा, आम्ही तर अक्षरशः रंगीबेरंगी कपडे घातले होते. वरच्या प्रची मध्ये दिसले असेलच तुम्हाला.

आम्ही केलेल्या चुका इतरांनी गिरवू नयेत म्हणून हा लेखप्रपंच. धन्यवाद!

सतीश कुडतरकर
डोंबिवली
DSCN8121.jpgDSCN8301.jpgDSCN8306.jpgDSCN8327.jpgDSCN8336.jpgDSCN8434.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या प्रची मध्ये दिसले असेलच तुम्हाला.
>>
प्रचि टाकायचे राहिले असावेत. Happy

वाटेत विन्चवांची शाळा भरली होती. जिकडे पाहावे तिकडे विंचू दिसत होते. त्यामुळे जपून चालावं लागत होत.
>>
बापरे!! भयानक वाट होती.

आम्हालाही याच धर्तीचा अनुभव आला होता. पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा वासोट्याचे कमर्शियलाझेशन इतके झाले नव्हते. पण चोरवणे गावात जे काही आदरातिथ्य मिळाले त्याची तोड नाही.

http://www.maayboli.com/node/13874

छान लिहीलय....बर्याच आठवणी जाग्या झाल्या Happy

आम्ही जानेवरी २००८ ला गेलो होतो तेव्हा वासोटा बेस कॅप मध्ये राहायची सोय होती ... वन्य विभागाच्या तंबूत मुक्काम केला होता.अंथरुण-पांघरुण स्वता:चं , वन्य विभागाचा फक्त तंबू.
tent.jpg

तंबूत राहायची सोय छान होती, त्यामूळे बॅक वॉटरचा अतिशय सुंदर परिसर बघता आला.
सूर्योदयापूर्वी पडलेलं धुकं ...
vasota Backwater.jpg

वन्य विभागाच्या देखरेखीसाठी असणार्या या मामांनी फारच आदरातिथ्य केले...न्याहारीसाठीचे मासे या फोटेत दिसत आहेत.
भल्या पहाटे मामांनी हे मासे पकडले, नंतर चूलीवर भाजले...त्यावर मीठ आणि त्याच्याकडे मसाला होता तो टाकला.... नंतर आम्ही सगळ्यानी चापले...आम्ही निघताना मामांना पैसे देउ केले पण त्यानी घेतले नाहीत.
Fish.jpg

फारच रोमांचकारी वर्णन, तुमच्याबरोबरच मी चालतोय असेच वाटत होते.... इतके प्रत्ययकारी....

हे जे शेवटी लिहिलेत ---
<<<<चोरवणे गावात माणुसकीचे असे एकापेक्षा एक धक्के बसत होते कि, कालची बामणोली आणि वासोट्यावरचे वाईट अनुभव विसरूनच गेलो होतो.
चोरवणे गावाने आमच्यावर माणूसपणाचे थोर संस्कार केले होते आणि ते पुढील आयुष्यात कायम उपयोगी पडणार होते. >>>>> ते वाचून केवळ अवाक झालो...

केवळ अप्रतिम वर्णन - तुम्हाला तर "लाईफ टाईम एक्सपिरियन्स" असणार ...

सविस्तर पण प्रत्ययकारी वर्णनाकरता मनापासून धन्स ....

वासोट्या बद्दल बरंच काही ऐकून आहे .
मागे एकदा योग जुळला होता जाण्यचा पण काही कारणास्तव राहून गेल ..ते गेलंच.
आता पुन्हा कधी योग येईल तो येईल . Happy

तुम्ही फार छान अन महत्वाची माहिती दिलीत ...,
वाचताना प्रत्यय आला तसा ...तिथे असल्याचा .!!

प्रचि मस्त!
ह्यातला 'बाल्ड इगल' सारखा दिसणारा पण बराच छोटा पक्षी कोणता आहे?
शिवाय पक्ष्यांच्या प्रचि क्र. ५ मधला पक्षी कोणता आहे?