सोडा ना... आपल्याला काय करायचंय?
तसा वर्तमानपत्राचा आणि माझा संबंध फक्त मुंबई मध्ये जमिनीचे भाव काय झाले हे जाणून घेण्याइतकाच. बाकी असतेच काय? २-३ बलात्कार, ५-१० चोऱ्या, एखाद्या नेत्याचा वाढदिवस, एखादा घोटाळा जनतेसमोर आणि बाकीच्या जाहिराती. पण त्या दिवशी दाभोळकरांच्या घटनेची बातमी वाचली. खरे सांगू, तर मलाही माहित नव्हते की ते नक्की होते कोण. नंतर थोडे वाचले, तेव्हा अंधश्रद्धा निर्मुलनासाठी त्यांनी केलेल्या कामाची माहिती मिळाली. अजूनही मला पूर्ण माहिती नाहीच पण म्हणून काय झाले? मला अंधश्रद्धा म्हणजे काय ते माहिती आहे. कारण तो माझ्या तुमच्या जीवनाचा एक भाग बनलाय.
अंधश्रद्धा. कुठे दिसते? घरात पहा ना स्वत:च्याच. घरात कशाला? आरश्यात पहा की! गळ्यातला काळा धागा दिसतोय का? हीच ती अंधश्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे निराळं कुठे काय असतं? दाभोळकरांची हत्या झाल्या झाल्या सगळे राजकारणी अचानक जागे कसे झाले? सगळे अचानक अंधश्रध्ये विरुध्द उठले कसे? मतं मिळवण्यासाठी माणूस कुठल्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो ह्याचं उदाहरण नाहीये का हे? हे राजकारणी एखाद्या संप्रदायाचा पक्षाला विरोध नको, त्या संप्रदायाची मते वगळली जाऊ नये म्हणून अंधश्रद्धेचा पाठ पुरावा करतात. आम्ही ही त्यांना सपोर्ट करतो. होय की नाही?
पण सोडा ना... आपल्याला काय करायचंय?
खरं पहायला गेलं तर देश राजकारणी किंवा जनता नाही चालवत. देशातली मिडिया तो देश चालवत असते. टिव्ही, एफ-एम, सोशल वेबसाईट यांचा लोकांवर जितका पगडा आहे, तितका पगडा कुणाचाच नसतो. ज्या देशाजी मिडिया कणखर, त्या देशाला पुढे जाण्यास तितकासा त्रास नाही होत.
एका News channel वर ऐकले त्यादिवशी, "देखिये इस गाव में अजिबो गरीब आवाजे सुनाई देती है| क्या है इसके पीछे का राझ? क्या ये भूत पिशाच्च है? जानने के लिये देखिये...."
अरे लाज नाही वाटत का अश्या बातम्या दाखवताना? टि.आर.पी. साठी काय काय करावं ह्यांनी?
शिक्षण घेऊन नक्की माणूस काय शिकतोय इथं हाच एक मोठा प्रश्न आहे.
पण सोडा ना... आपल्याला काय करायचंय?
रात्री ही शहरं झोपतात. माणसं डोळे मिटतात पण, विचारांच्या खुशीत मात्र जागीच राहतात. दिवसभर आपण जे काही केलं त्यातलं काय चांगलं होतं आणि काय वाईट होतं याची जाणीव माणसाला स्वत:ला असते. त्यासाठी जगाच्या सल्ल्याची गरज कधीच नसते.
आपण चुकलो असू तर, हे मन आपल्याला शांतीने जगूच देत नाही. मग माणसं ती पापं धुवून काढण्यासाठी मार्ग शोधू लागतात.
व्रत वैकल्प्य म्हणजे पाप धुण्याचा एक सोप्पा मार्ग अशी धारणा इतिहासाने करून दिलीच आहे. मग माणसं पूजापाठ करू लागतात. आपला जीव वाचवण्यासाठी एका प्राण्याचा बळी देण्याचा आपल्याला पूर्ण हक्क नक्कीच आहे अशी विचारसरणी आसपासची माणसं सहज देतात. पण त्या माणसांना दोष देण्यात काय अर्थ? आपलं स्वत:चं शिक्षण शेण चरायला जातं का तेव्हा?
पण सोडा ना... आपल्याला काय करायचंय?
माणसाच्या मनातून जोपर्यंत ही भीती जात नाही तो पर्यंत अंधश्रद्धेला कुणीच हटवू शकत नाही. भविष्याची चिंता वर्तमानाला बरबाद करत असेल तर आधी वर्तमान सुधारावा. भविष्य मागे धाऊ नये. पण हे कळतं कुणाला? धावतात सगळे हाताच्या रेषा समोर धरून.
समाजाच्या कमकुवत मुद्यांना ओळखलं की, समाजावर राज्य गाजवणं सोप्प असतं.
धर्माच्या नावाने एखादा नेता आरोळी देतो आणि आम्ही जमा होतो. आरोळी मागचं तथ्य किती हे कोण पडताळत बसतंय तिथं? जमाव वेगळा आणि गर्दी वेगळी. जमावाला ध्येय असतं पण गर्दीला कधीच स्वत:ची अक्कल नसते. कुठवर जायचं, का जायचं हे माहित नसतं आणि जाणून घ्यायची गर्दीची इच्छाही नसते. आम्ही स्वत:च स्वत:चा उपयोग दुसऱ्याला करू देतो.
पण सोडा ना... आपल्याला काय करायचंय?
पाचवीच्या मुलाला उपवास करू लावणाऱ्या पालकांना आता कुणी शिकवावं?
'देवीचा कोप झाला' हे शब्द ऐकून एका सुशिक्षिताला कोप येत नसेल तर त्याला 'सुशिक्षित' कसं म्हणावं?
नागपंचमीच्या दिवशी नागाला दुध पाजायला जाणाऱ्या मुर्खांची संख्या किती? त्यातले किती मूर्ख सुशिक्षित?
श्रद्धेच्या नावाखाली काय काय करणार आपण?
आता गणपती आलेत. नवसाच्या भल्या मोठ्या रांगा लागतील.
आमचा देव सगळीकडे आहे अशी मनात श्रद्धा असणाऱ्या माणसाला देव दर्शनासाठी एका ठराविक दिवसाची गरज का वाटावी? देव एखाद्या ठराविक काळातच प्रसन्न होतो की काय? आणि समजा तसे होत असेल तर ते त्याने कुणाच्या कानात येऊन सांगितले? एखाद्या ब्राम्हणाच्या? की एखाद्या महाराजाच्या? की थेट तुमच्या? "आमच्या देवाला अमुक तमुकचाच प्रसाद लागतो" याहून मोठा विनोद कोणता?
व्यासांनी महाभारत लिहिलं, वाल्मिकींनी रामायण लिहिलं. लिहिताना त्यांनी मानव जातीच्या स्वभावाचे वर्णन केले पण, लोकांनी ते स्वभाव, ती नीतीमुल्य सोडली आणि त्यातली माणसं धरून ठेवली. श्रीरामाची मंदिरं उभी राहिली. श्रद्धेपर्यंत ठीक होते पण, पुढे त्यावरही हिंसाचार झाला! हे कितपत योग्य?
पण सोडा ना... आपल्याला काय करायचंय?
बाळ जन्माला आल्या आल्या पहिले गळ्यात दोरे बांधले जातात. कित्येक जणांचे तर ठाम मत असते की, त्या बाळाचे भवितव्य त्या बाळाच्या हाती नसून कोण ना कोण बाबा महाराज्यांच्या हाती आहे. मंदिराबाहेर १००० दिवे पेटवा, दहा सोमवार उपवास ठेवा आणि उज्ज्वल भविष्य मिळवा.
अरे! इतकेच साधे सोप्पे असते सगळे तर त्या महाराजांनी स्वत:चे भविष्य उज्ज्वल नसते का केले?
परिस्थिती फार वाईट आहे. इथे पुस्तकांपेक्षा जास्त महाराज लोकांची आणि नेत्यांची पोस्टर छापली जातात.
पण सोडा ना... आपल्याला काय करायचंय?
झालेय असे की, इथे जुलूम सहन करणे हे पाप आहेच, पण त्या विरुद्ध आवाज उठवणे हे त्याहून मोठं पाप आहे. कै. दाभोळकरांच्या हत्येवरून हे सिद्धही झालंय. पण आज दाभोळकर जर मागे वळून पाहतील तर, समाजाच्या या निश्क्रीयतेने ते नक्की दुखावले जातील. ज्यांच्यासाठी आयुष्य पणाला लावावे त्यांना त्या आयुष्याची जराही किंमत नसावी! समाजाच्या नावाने बोंबा मारणारे आपण आरश्यात कधी पाहणार? देश मागे राहिलाय, राजकारणी वाईट आहेत, माझं घर, माझी माणसं म्हणता म्हणता देश विसरलोच ना आपण? 'भारत माझा देश आहे' हे फक्त बालभारतीच्या प्रतिज्ञेतच. बाकी इथे कुणालाही त्याची चिंता नाही आणि जर कुणाला चिंता वाटलीच तर जीव गमावणे हाच निकाल.
फेसबुकवर शेअर करून देश बदलतो का? बदल असा लवकर घडत नाहीच कधी. त्यासाठी वेळ लागतोच. पण बदल घडवून आणण्यासाठी आधी एक इच्छा लागते. ती कुठून आणणार आपण? माणसाचं आयुष्य धकाधकीचं बनलं आहे हे मान्य आहे. नक्कीच मान्य आहे. पण आपण या देशाचे, या समाजाचे काहीतरी देणं लागतो हे कसे नाकारू शकतो आपण? जर तसे नसेल तर, प्रत्येक निर्णय घेण्याआधी 'लोक काय म्हणतील?' असा विचार का करता तुम्ही? जर या छोट्यामोठ्या निर्णयांसाठी तुम्ही समाजाला बांधील असाल, तर समाजहिताच्या कार्यात शामिल होणं हे ही तुम्हाल बंधनकारक आहे. त्यासाठी कोणती तरी जागतिक पावलं उचला अशी अपेक्षा नाहीच, पण किमान स्वत:ला जितके शक्य आहे तितके तरी नक्कीच करू शकतो ना आपण?
जे मनाला नाही पटत, ते का करावे? शिक्षणाचा उपयोग करा. जुन्या प्रथांना विरोध करणे म्हणजे मग्रूरपणा नाही. जाब विचाराने हा हक्क आहे आपला. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला तेव्हा त्या गणेशोत्सवाला स्पर्धेचे रूप लाभावे अशी त्यांची इच्छा मुळीच नसेल. दहीहंडीला लाखो रुपयांचे जे थर लावले जातात, त्यामागे गोविंदा पथकाला आधार देणे हा स्पष्ट उद्देश असतो का? की स्वत:च्या पक्षाची जाहिरात करणे हा उद्देश असतो? पण नजर फिरवली की कळते, की सगळंच बरबटलंय आपण? आपले सण, आपली संस्कृती. उद्या 'आपलं' असं म्हणायला आपल्याकडे काहीच उरलेलं नसणार.
'समाज सुधारेल' असे म्हणून कसे चालेल? समाज म्हणजे कुणी दुसरा नसतो. आमचा तुमचा मिळून बनतो समाज. स्वत:चे घर सुधारा. प्रत्येकजण स्वत:चं घर सुधारेल तर आपला so called समाज नक्कीच सुधारेल.
वाचून एका तरी बाळाच्या गळ्यातला काळा दोरा बाजूला झाला तरी लिहिलेलं सार्थकी लागले असे मनात येईल. हे लिहीलेलं वाचल्यावर एखाद्याच्या बंदुकीतल्या गोळीवर माझेही नाव असेल. कोण जाणो. पण गोळी नका मारू रे मला अशी... जगा तुम्हाला हवे तसे.
आपल्याला काय करायचंय?
इथे पुस्तकांपेक्षा जास्त
इथे पुस्तकांपेक्षा जास्त महाराज लोकांची आणि नेत्यांची पोस्टर छापली जातात>>> कटू सत्य...!
खरंय
खरंय
धन्यवाद
धन्यवाद
समाज सुधारणं.... तसच त्याची
समाज सुधारणं.... तसच त्याची सुरुवात आपल्या पासुन करणं ह्या गोष्टी बोलायला सोप्या वाटतात.... पण कुती अवघड असते.... चांगले काम करणार्या माणसाचा आजुबाजुचे लोकच गैरफायदा घेतात.... म्हणजे जो योग्य रस्ता दाखवतो..आपला मतलब साधे पर्यंत त्याला साथ देतात... नंतर त्याचीच उचलबांगडी करतात.
खरंय
खरंय