सकल कलांचा तू अधिनायक - अर्थात..क्रोशाचा गणपतीबाप्पा (अवल)

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 09:20

मायबोलीकर अवल, म्हणजेच आरती खोपकर सादर करतेय तिने स्वतः क्रोशाने विणलेला गणपतीबाप्पा, त्याचा उंदीर आणि मोदक. सोबतच तिचा ह्या विणकामाला प्रेरणा देणारा रोचक प्रवासही तिने लेखस्वरुपात दिला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------

सकल कलांचा तू अधिनायक ...गणपतीचे किती समर्पक वर्णन ! या कलांच्या अभिनायकाला त्याच्याच रुपात साकार करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न .

८ ऑगस्ट, साती बरोबर व्हॉट्सप वर गप्पा मारत होते, तेव्हा तिने प्रेमळ आज्ञा केली. "मायबोली गणेशोत्सवासाठी, गणपती कर ना क्रोशाने." बापरे, मी घाबरलेच ! हे कसं शक्य होतं. आता पर्यंत मी कधीच अशा स्वरुपाचे काही केले नव्हते. वेगळेपणा म्हणून कपबशी, बूट, हातमोजे केले होते. पण गणपती अशक्यच होता. तिला तसे सांगितल्यावर तिने थोडी सूट दिली, म्हणाली मग "मोदक कर, उंदीर कर." हे माझ्या थोड्या आवाक्यातले होते.
मग काय लगेच मिशन मोदक सुरू केले. पहिली अडचण आली ती मोदकाला उभे करण्याची. पण मध्यंतरी एक बॅग केली होती, त्याला बेस करताना एक जुनी वीण वापरली होता. कपाच्या बेस साठीही ती खूप उपयोगाला आली होती - बिस्किट वीण. तिचा वापर केला अन मग मोदक न पडता बसू लागला.
मोदकाच्या पाकळ्या उठावदार होणे ही मोदकाची खरी ओळख. त्या क्रोशात करताना मात्र सोप्या गेल्या. माझ्या ख-या मोदकापेक्षा हा क्रोशाचा मोदक जास्ती रेखीव झाला
मग त्यावर रवाळ गाईचे तूपही विणले.
single modak-Aarti.jpg
हे मोदक मला तर मोदक वाटत होते पण इतरांना ते कसे वाटतात याची टेस्ट घेणे भाग होते. तशात १५ ऑगस्ट जवळच होता मग तीन रंगात मोदक केले. केशरी, पांढरा, हिरवा. पांढ-या मोदकावरती निळ्यारंगाचे तूप ओतले, आपलं विणले. अन १५ ऑगस्टला माझा तिरंगा झळकला.
tiranga-Aarti.jpg
माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना हे मोदक आवडले. मला हुश्श्य झाले..
आता उंदरावर प्रयोग करायचा होता. हे जरा कौशल्याचे होते. मग नेट वर थोडी शोधाशोध केली. तसा कॉम्प्युटर अन माऊसचा फार जवळचा संबंध असल्याने नेटवर बरेच उंदीर सापडले. काही चक्क क्रोशाचेही होते. पण एकात एक आवडत होते, दुस-यात दुसरे,... असे झाले.
मग त्याचे तंत्र माहिती करून घेतले अन स्वतःच नवीन डिझाईन केले. अन विणायला घेतले. तयार उंदीरमामाच आहे जेमेतेम २ इंचाचा. त्याचे इवलुसे तोंड, कान अन डोळे करताना माझी बोटे मला फारच जाड वाटू लागली. त्यातून त्याचा डार्क तपकिरी रंग मला रात्री काम करू देईना. शेवटी १८ ऑगस्टला हा उंदीरमामा माझ्या डोक्याच्या बिळातून हाताच्या मार्गाने सुईचे टोक पकडून बाहेर पडला एकदाचा...
4 - Aarti.jpg
त्याचे लालचुटुक डोळे मलाच भूरळ घालत होते.
3 - Aarti.jpg
मोदक जमले, उंदीरमामाही तयार झाला. आता साती मागे लागली, "अजून काही कर, बाप्पा मोरया!" वंदना, अंजली, अर्चना, शोभना, निखिल सगळे म्हणू लागले "कर ग जमेल तुला गणपती." पण मला माहिती होते, हे शिवधनुष्य आहे. नीट नाही जमले तर? मांडी घातलेले पाय, वेगेवेगळ्या दिशेला असणारे हात आणि सर्वात अवघड सोंड. हे काही सोपे नव्हते. त्यातून प्रत्यक्षात मातीचा गणपती केलेला असल्याने हात, पाय, सोंड यांना आकार देणे किती क्लिष्ट आहे याची जाणीव होती. त्यातून क्रोशा हे विणकाम सहसा सरळ रेषेत- दोन डायमेंशनचे. तीन डायमेन्शन्स मध्ये क्रोशा करणे फक्त छोट्या आकारात ( Amigurumi ) केलेले नेटवर पाहिले होते. पण गणपती थोडा मोठाच करावा असा विचार होता. नेटवरही शोधाशोध केली. पण क्रोशाचा गणपती काही सापडला नाही. मग स्वतःचे डोके चालवायचे ठरवले. प्रयत्न तर करू, मग बघू, नाही जमले तर नाही करायचा. पण एक प्रयत्न करायचाच असे ठरवले.
अन मग २० ऑगस्टला श्री गणेशा केला. जे अवघड आहे ते आधी करायचे ठरवले. जर तोंड आणि सोंड जमली तरच पुढे जायचे ठरवले. तोंड करणे तसे सोपे होते. दुस-या दिवशी सोंड करायला घेतली. अन २-३ दा उसवूनही मनाजोगते वळण मिळेना. शेवटी हे आपल्या आवाक्यातले नाही म्हणून ठेऊन दिले. तिसरा दिवस उजाडला. दुपारी लेकाने विचारले, "काय ग, नुसती का बसली आहेस? कर ना गणपती." मग उठले. पुन्हा प्रयत्न केला. अन या वेळेस कोडे उलगडले. सोंड वळू लागली. सुरुवातीला थोडी जाड झाली पण मग तसेच पुढे करत गेले. शेवटही जमला. माझी मीच खुष झाले. वर बघितले तर, लेक हसून बघत होता.
मग काय अजून उत्साहाने कामाला लागले. सोंड विणतानाच हात, पाय कसे वळवायचे याचा अंदाज आला होता. हळूहळू गणपती आकार घेऊ लागला.
मग आत मध्ये थर्माकोलचे गोळे भरले.
इटुकले महिरपीच्या आकारातले कान तयार झाले.
मुकुट सजला.
हातातले, गळ्यातले अलंकार घडले.
विणलेले रेशमी उपरणे पांघरले.
रेखीव डोळे रेखले.
अन मग २१ ऑगस्ट्ला बाप्पा मस्त रेलून बसले.
मग त्यांच्या डाव्या हातावरती मोदक ठेवला.
पायाशी गुलाबाचे फूल वाहिले.
सोंडेमध्ये दुर्वा ठेवल्या.
अन मग लांब उभे राहून बघितले. अरे वा जमलाय की दोन मिनिटं मीही बघत बसले. खूप खूप आनंद झाला. लेक, नवरा दोघेही खूष झाले.
मग या कलेच्या अधिनायकचा फोटो काढून साती, सुधा, अंजली, वंदनाला पाठवले. सातीने अ‍ॅप्रुव्हल दिले.
ganapati_aproval-Aarti.jpg
अंजली, वंदना खूष झाल्या.
सुधाने माथ्यावरचा तिलक राहिल्याचे सुचवले. लगेच लालचुटुक गंध रेखले.
अंजलीला विचारल्यावर तिने उजव्या हाताचा अंगठा बोटांना जोडून घ्यायला सुचवले. खरच की नीट बघितल्यावर कळले, बाप्पा आशिर्वाद द्यायच्या ऐवजी मला फटका देत होता की मग तीही दुरुस्ती केली.
सातीने सुचवल्याप्रमाणे अजून ५ मोदक केले.
modaks-Aarti.jpg
खाली घालायला पांढरा स्वच्छ रुमाल केला.
बाप्पांना बसायला हिरवेगार आसन केले.
मागे चक्र तयार केले.
मोदक ठेवायला छोटी गोल ताटली केली.
अन मग सातीने सुचवल्याप्रमाणे या सर्व विणकामाची नीट रचना केली अन फोटो काढले.
1 - Aarti.jpg
मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीसाठी मी क्रोशाने विणलेले लोकरीचे छोटे तबला डग्गा तयार केले होते. ते तिला दिल्यामुळे त्यांच्यासह मला गणपतीचा फोटो काढता आला नाही. पण तबल्याडग्ग्याचा फोटो माझ्याकडे होता. मग माझे फोटोशॉपचे कौशल्य वापरून ते तबला डग्गा गणपती समोर ठेवले. अन हा कलाकार गणपतीही तयार झाला.
6 - Aarti.jpg
या सर्व गोष्टी ९९.९९९ टक्के क्रोशाने अन लोकरीने केल्या आहेत. ०.००१ टक्का आहे तो भरतकामाच्या सुईचा. उजव्या हाताचा अंगठा बोटांना जोडणे अन रेशमी उपरणे खांद्यावर टाचण्यासाठी फक्त तिचा वापर केला. बाकी सर्व गोष्टी क्रोशाच्या सुईनेच केल्या आहेत.
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. माझ्या सर्व मैत्रिणी अन विद्यार्थिनी, लेक अन नवरा यांच्या प्रोत्साहनातूनच हे धाडस माझ्याच्याने केले गेले. या सर्वांच्या ऋणातच राहणे पसंत आहे मला
बाप्पा मोरया !

5 - Aarti.jpg

- अवल (आरती खोपकर)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक, एक विनंती! उपक्रम सार्वजनिक केल्यानंतर प्रतिसादात एखादी स्मायली टाकून धागा वर आणावा.

मायबोली गणेशोत्सव २०१३ मधे मला अजून दोन धागे दिसताहेत जे सार्वजनिक केले आहेत पण वर आणलेले नाहीत.

वा!

बापरे!!! (की बाप्पा रे?)

अवल ताई, तू म्हणजे ना, एकदम हिट्ट आहेस बरं का!

हे असं काही क्रोशाने करता येतं हे ही मला माहिती नव्हतं! (मला क्रोशा चं स्पेलिंगही धड येत नाही!)

अ. प्र. ती. म!!!!

Happy धन्यवाद सर्वांना !
प्रथमतः संयोजकांचे, साती, सानी यांचे आभार. इतकी छान कल्पना मांडल्याबद्दल अन अगदी पहिल्याच दिवशी हे प्रसारित केल्याबद्दल Happy
शुगोल, भानुप्रिया Happy

NivvaL apratim. Aval dhanya aahe tuzi. Bappa, undirmama, modak, asan, magachi aras ani aikuN sagala ekatra.... sagalach dekhana zalay. ____/\____

Mazya aai babanni tula shabbasaki diliye.

_/\_
काय एकेकाच्या हातात कला असतात! धन्य आहेस तू आरती!
आरती, खूपच छान झालाय बाप्पा आणि एकूण प्रवासही मस्त उलगडून सांगितला आहेस....तुझ्या मागे लागून करवून घेणार्‍या संबंधित सर्वांना खूप धन्यवाद आणि तुझेही हार्दिक अभिनंदन!

मस्त

बाप्पा छान आणि प्रक्रीयाहि आनंददायी.आता बापा तुला खुप खुप लिहायची आणि त्याच्यासाठी गायचीहि प्रेरंणा देंणार.

लेख नाही वाचला अजून फोटोच पाहिले.. मात्र अप्रतिम कलाकारी.. जेवढं क्रेडिट तुम्हाला तेवढेच बाप्पांच्या विलोभनीय रुपालाही.. Happy

Pages

Back to top