विषय क्रमांक २:- बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित झालेल्या कोसबाडच्या मुलांच्या "आई" - सिंधुताई अंबिके

Submitted by कविन on 21 August, 2013 - 08:09

प्राथमिक शाळेत शिकलेलं गणित - "गणू कडे १० आंबे होते. त्यातले ६ नासके निघाले तर गणूला किती आंबे चांगले मिळाले?" आणि मग १०-६ करुन उत्तर लिहीलं जातं "गणूला ४ चांगले आंबे मिळाले." आपल्या आजुबाजुला भ्रष्टाचारी, फक्त आणि फक्त स्व:हिताचाच विचार करणारी, स्वार्थी, सत्तांध अशी प्रत्येक क्षेत्रातली माणसं नासक्या आंब्यांप्रमाणे दिसत असताना, चांगुलपणाचा वसा घेतलेल्या माणसांमुळे मग ती भलेही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी का असेनात असल्यामुळेच केवळ संपुर्ण समाज वजा भ्रष्टाचारी ह्या वजाबाकीने अजून तरी समाजात "शुन्य" अवस्था आलेली नाहीये.

आमटे परिवार, बंग परिवार, शाम मानव, नरेंद्र दाभोळकर, कोसबाडच्या शाळेसाठी अवघ जिवन समर्पित करणाऱ्या ताराताई, अनुताई आणि सिंधुताई ते अगदी आपण मायबोली परिवारा तर्फे ज्या संस्थांना आत्ता पर्यंत देणगी दिली त्या सर्व संस्था आणि हो आपल्या मनात अजून कुठेतरी रुजून असलेला सद्भावनेचा कोंब ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे वरच्या गणिताच्या उदाहरणातले चांगले आंबे आहेत.

ह्याच मुळे आपली वजाबाकी अजून तरी "शुन्य" नाही आणि म्हणुनच "अजून तरी सगळं संपलय असे काही वाटत नाही, कुठेतरी आशेचा किरण आहे" हे ही केवळ ह्याच निवडक चांगल्या माणसांच्या भरवश्यावर. ह्या प्रत्येकाची कार्यक्षेत्र वेगळी पण समर्पण वृत्ती एकच, प्रामाणिक पणाही तोच आणि तळमळही तशीच.

अर्थात बऱ्याच वेळा चांगुलपणा झाकोळून जावा अशी घटना घडते जशी नुकतीच दाभोळकरांच्या हत्येने मनाला असंख्य सुया टोचल्याची वेदना झाली आणि समाजाच्या प्रत्येक थरातून ह्या घटनेच्या निषेधाच्या जोडीनेच आपण ह्या गणिती वजाबाकीत चांगली माणसं गमवत चालल्याची भावना व्यक्त झाली आणि कुठेतरी ही वजाबाकिची "शुन्याकडे" वाटचाल तर नाही ना चालू अशी भितीही उमटली.

ह्या भितीवर माझ्यापाशीही पुर्णपणे उतारा हा नाहीच आहे तरीही मी माझ्यापरीने शोधलेला मार्ग म्हणजे ह्या आणि अशा सारख्या सर्वांच्याच योगदानाविषयी जाणुन घेणं, त्यातून स्वत:च्या कच्च्या मडक्याला पक्क करता आलं तर करत आपण आपल्या परीने ह्यात काय योगदान देऊ शकतो ह्याचा विचार करुन तशी कृती करणं.

अर्थात म्हणून आपण प्रत्येकच जण अशा आदर्शवत व्यक्तींच्या पावलावर पाऊल ठेवून दरवेळी त्यांच्या इतक्याच ताकदीने नाही चालू शकत. पण आपली व्यवधान सांभाळत खारीचा वाटा उचलून आपल्या परीने ही वजाबाकी शुन्य न होऊ देण्याची खबरदारी नक्कीच घेऊ शकतो.

नमनाला घडाभर तेल वाहुन झालय खरतर कारण अशा प्रत्येका विषयीच भरभरुन लिहावं असं ह्या सर्वांच त्यांच्या क्षेत्रातलं योगदान आहे.

मी आज इथे ज्या व्यक्ती विषयी लिहायचा प्रयत्न करणार आहे त्यांचा माझा परिचय त्यांनी लिहीलेल्या आत्मचरित्रातून, त्यांनी लिहीलेल्या इतर पुस्तकां मधुन आणि कधी तरी अवचित इपत्रातून त्यांच्या विषयी वाचायला मिळालेल्या लेखातून झालाय. माझ्या आणि माझ्या लेकीच्या शिकण्याच्या प्रयोगां मधे त्यांचे अनुभव एक उत्तम दिशादर्शक ठरलेत.

मी आई झाले आणि मग माझ्या कच्च्या मडक्याला पक्क करण्याच्या प्रयोगांमधला एक प्रयोग म्हणून "बालसंगोपन" ह्या विषयावर वाचन मनन सुरु झालं. अर्थात ते शिकणं अजूनही चालूच आहे.

पण ह्या माहिती मिळवण्याच्या नादात एका खुप सुंदर शाळेविषयी, तिथे चालणाऱ्या प्रयोगां विषयी आणि तिथे हे प्रयोग करुन पहाणाऱ्या ह्या शिक्षिके विषयी कळलं.

ही शाळा म्हणजे ताराबाई मोडक आणि अनुताई वाघांच्या प्रयत्नांनी कोसबाड येथे सुरु झालेली आदिवासी मुलांची शाळा आणि इथल्या शिक्षिका ज्यांच्या विषयी मला खरतर भरभरुन लिहायचय पण तरी शब्द तोकडे पडतील असं वाटतय त्या "सिंधुताई अंबिके", ज्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणुन "सावित्रीबाई पुरस्कार" आणि "बाया कर्वे पुरस्कार" मिळाला आहे. आज वयाच्या ८१ व्या वर्षी देखील तरुणांना देखील लाजवेल इतक्या उत्साहाने काम करत रहाणाऱ्या कोसबाडच्या मुलांच्या "आई".

वयाच्या बावीस वर्षा पर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्या काळातल्या इतर चारचौघींसारखाच.. वयाच्या सतराव्या वर्षी लग्न मग दोन मुलांचा जन्म आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी पतीच्या निधनाने ह्या संसाराची सांगता. पण मोठ्या भावाच्या द्रष्टेपणामुळे त्या व्यक्तीगत आयुष्यातील ह्या दु:खात खितपत न पडता स्वत:चा आणि मुलांचा आधार होण्यासाठी "हिंगण्याच्या स्त्री शिक्षण संस्थेत" दाखल होतात आणि तिथेच आजच्या सिंधुताई घडण्याची सुरुवात होते.

कोसबाडची शाळा ही आदिवासी मुलांसाठीची शाळा. सुरवातीला त्या मुलांना पाड्यावर जाऊन बोलावून आणण्यापासून ते कसं रहावं, कसं खावं ह्या सगळ्याचा परिपाठ देऊन त्यांच्यातलं आणि आपल्यातलं अंतर कमी करताना दोन्ही कडील चांगल्याच आदान प्रदान करत कसं शिकवाव आणि शिकवताना कसं शिकत स्वत:ला घडवावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून सिंधुताईंचं नाव घेता येईल.

नोकरीची सुरुवात कोसबाडला झाली तरी त्यांना चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीची संधीही चालून आली होती पण कोसबाड ह्या कर्मभुमीवर त्यांचा जीव जडला असल्याने आणि त्यांच्या स्वत:च्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अनुताई आणि ताराताईंनी उचलण्याचं आश्वासन दिल्याने त्या कायमच्या इथल्याच होऊन राहिल्या.

बालसंगोपन म्हणजे नेमकं काय? मुलांना शिकवताना नेमकं कसं शिकवाव? ह्या माझ्या घरात माझ्या लेकीला शिकवताना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत मिळालं.

आज आपण म्हणतो शिक्षण हे मुलांच्या अनुभव विश्वाशी निगडीत असावं.मुल्याधारित शिक्षण पद्धती, कन्टेक्च्युअलायझेशन ऑफ लर्निंग इत्यादी वरती आजकाल फार ऐकायला वाचायला मिळतं. हेच सारं त्या फार आधीपासून तिथल्या मातीत तिथल्या मुलांसाठी करत आल्या आहेत.

आदिवासी मुलांना शाळेत आणायचे, बसवायचे म्हणजे वारा मुठीत धरण्याचा प्रकार. निसर्गाच्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या ह्या मुलांना शिकण्यासाठी मुळात चार भिंतीत बसायला लावणे हेच मोठे कठीण काम. त्यावर सिंधुताईंनी शोधलेला उपाय पण एकदम मस्त. मुलांची नाव जर पाठात घातली तर मुलांना त्याची गम्मत वाटते हे ओळखून त्यांनी तसा प्रयोग शिकवताना केला.

गणित शिकवताना "एका रुपयाला अमुक इतक्या गोळ्या तर तमुक रुपयांना किती गोळ्या?" असा पुस्तकी सरधोपटपणा न दाखवता त्यांच्या वातावरणातली त्यांच्या माहितीतली उदाहरणं देत त्यांना शिकवलं. त्यामुळेच त्या मुलांचा उत्साह टिकून राहिला आणि शिकवण्याचा उद्देशही सफल झाला.

मुलांचा उत्साह टिकून रहावा आणि शिक्षण हे सहज हसत खेळत व्हाव म्हणून जे काही उपक्रम त्यांनी राबवले त्यामधल्या काहींचा उल्लखे इथे करायलाच हवा.

गणितातली विविध परिमाणे शिकवताना त्या वजनाचे दगड तयार करुन घेतले, नाण्याचे शिक्के देऊन पातळ पुठ्ठे वापरुन नाणी नोटा तयार केल्या आणि शंख, शिंपले, वडाची फळे, चिंचोके अशा वस्तुंनी "दुकान" भरुन, गिऱ्हाईक बनलेल्या मुलांच्या हातात पोष्टाच्या कार्ड वर पांढरा कागद चिकटवून बेरिज वजाबाकीची गणित घालून दुकान नावाचा खेळ खेळत मुलांना हिशोब करायला शिकवले.

शिवाजी महाराजांचा काळ शिकवताना त्यांनी मुलांबरोबरीने किल्ला तयार करुन, नाट्य रुपाने तो तो भाग समजावला आणि ईतिहास त्यांच्या पुढे जिवंत केला.

परिसरातील वस्तुंचा वापर करुन शैक्षणिक साधन बनवून त्यांनी ह्या मुलांचं शिकणं आनंददायी केलं.

आज जे आपल्या पाल्यांना विविध प्रोजेक्टस पुर्ण करायचे असतात शाळांमधून हे तेच तर आहेत. फरक इतकाच की बर्‍याचदा हे प्रोजेक्ट्स मुलांपेक्षा जास्त पालकांचेच असतात निदान माझ्या आजुबाजुला जे बघते त्यातून तरी हेच दिसतं जास्त प्रमाणात. मुलांचा सहभाग अत्यल्प असतो बर्‍याचवेळा किंवा त्यांच्या अवाक्या बाहेरचे तरी प्रोजेक्ट्स असल्याने पालकांना जास्त प्रमाणात सहभाग नोंदवावा लागतो. पण तिथे तर सिंधुताईंनी असली काही मोठी नाव न वापरता हेच सारे प्रयोग मुलांकडून करुन घेतलेले दिसतात.

आदिवासी मुलांसाठी होळीचा सण म्हणजे शाळा बुडवण्यासाठीची संधीच. मुलांची शाळा बुडू नये म्हणुन सिंधुताईंनी शाळेतच होळी करायची ठरवली. त्यासाठी त्यांनी स्वत: आदिवासी पद्धतीने लुगडे नेसून तिथल्या मुलींबरोबर त्यांच्या संस्कृती प्रमाणे गाणी गायली. होळीसाठी जमलेल्या पैशाचाच वापर करुन गणितं घातली. आणायच्या वस्तूंची यादी करुन मुलांना वाचायला दिली. त्यावरच आधारीत पाठ तयार केले. आणलेल्या जिन्नसामधल्या काही गोष्टी जसे रताळे, शेंगदाणा ह्या वर गप्पा गोष्टी करता करता माहिती देऊन झाली. असं एक उदाहरण त्यांच्या आत्मचरित्रात वाचायला मिळालं. "हसत खेळत शिक्षण" ह्याच हे उत्तम उदाहरणच नव्हे काय?

मुलांचे वाढदिवस साजरे करण्याची अनोखी पद्धत त्यांनी तिथल्या शाळेत सुरु केली. मुलांना औक्षण करुन इतर मुलांनी स्वत: तयार केलेल्या वस्तू भेटी दाखल द्याव्यात आणि मग सर्वांनी मिळून सकस पोषक आहार योजनेमधे अंतर्भुत असलेला पदार्थ खाऊ म्हणून वाटून खावा. वाढदिवस असलेल्या मुला/मुलीचे नाव फळ्यावर लिहून त्याच्या पालकांना देखील त्या दिवशी शाळेत बोलवून तो सोहळा अनुभवायला द्यावा. अशा स्वरुपाच्या कार्यक्रमां मुळे नकळत पालकांशी बंध जुळायचे काम होते, प्रत्येक मुल कल्पकतेचा वापर करुन भेटवस्तु बनवते व शाळेतली उपस्थिती देखील वाढते आणि नकळत का होईना पोषक आहाराचे महत्व देखील ठसते. शाळा सजावटी साठी देखील त्या मुलांकडून आजुबाजुला उपलब्ध असलेल्या गोष्टीं मधूनच सजावट करुन घेत. शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक साधनांची कमतरता त्यांनी अशी सहज उपलब्ध होणाऱ्या साधनांच्या मदतीने सोडवली.

त्याकाळी आदिवासी लोकं शहरी लोकांशी अंतर ठेवून रहात. म्हणजे त्यांची दुनिया वेगळी आणि शहरी लोकांची वेगळी अशा भावनेने रहात. मुलांना शाळेत पाठवा असे सांगुनही शाळेतला हजेरी पट कधीच पुर्ण भरत नसे. त्यात आदिवासी समाजाचा दोष होता अस म्हणता येणार नाही पण ही शाळा आपल्यासाठी आहे अशी भावना निर्माण होण्यासाठी सिंधुताईंनी ह्या नि अशाच प्रकारच्या इतरही काही गोष्टी सुरु केल्या ज्यामुळे त्यांचे जग आणि शहरी जग ह्यातले अंतर कमी होऊन आदिवासींना ही शाळा आपली वाटू लागली.

अध्यापनाच्या अभ्यासक्रमात अभ्यास कसा घ्यावा ह्याचे शिक्षण जरुर दिलेले असते. तो अभ्यासक्रम एक मार्गदर्शक म्हणून नक्कीच उपयोगी असतो. पण शिक्षकत्व जे असतं ते असं आतूनच याव लागतं. शिकण्याने हिऱ्याला पैलू नक्की पडतात पण पैलू पडण्यासाठीही तो "हिरा" असावा लागतो, तसच काहीस.

आदिवासी समाजाने त्यांना आपलसं केलं कारण त्या कधी "शहरी संस्कृती वरच्या दर्जाची, शहरी भाषाच उच्च" आणि आपण ह्या आदिवासींना सुधारायला आलोय म्हणजे त्यांना आपल्यासारखे करायला आलोय अशा कल्पना घेऊन वावरल्या नाहीत. उलट इतकी वर्ष तिथे राहून त्यांचा वारली भाषा आणि संस्कुतीवर इतका सुंदर अभ्यास झालाय की त्यांनी काही गीतं देखील लिहीली आहेत त्या भाषेत.

चल गं शांती उठ ग कांती
हाक मार गं तायाला, शिकायला चला

असं स्वत:च्या रात्रशाळेतल्या मुलींची नाव गुंफ़ुन त्यांनी गाणं रचलं. आदिवासी लोकसाहित्यात अशी आजुबाजुच्या लोकांची नाव गुंफ़ुन गीता रचण्याची पद्धत दिसते. त्याच पद्धतीचा वापर त्यांनी मुलींना शाळेत येण्याचं आवाहन करण्यासाठी केल्यामुळेच कदाचित त्या मुलींना ते गाणं आणि ते गाणं रचणाऱ्या सिंधूताई आपल्याश्या वाटल्या.

त्यांनी कोसबाडला कार्य सुरु केलं १९५८ मधे. आज २०१३ मधे तिथल्या मुलांमधे खुपच प्रगती दिसुन येतेय. आज तिथे काम करणाऱ्यांना अडचणींवर मात करावी लागत नाहीये अजिबातच असं नाही म्हणता येणार पण त्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा पायवाटही धुसर असलेल्या जागेवर त्यांनी स्वकष्टाने आणि स्वकल्पकतेने नुसता रस्ताच तयार केलाय असं नाही तर त्या रस्त्यावर नंदनवन फुलवलय असच म्हणाव लागेल.

हाडाचा शिक्षक म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी फ़क्त शैक्षणिक साधनांची गरज असते का? कल्पकता आणि तळमळ ह्या दोन खणखणीत नाण्यांच्या जोरावर एखादा शिक्षक.. ..एखादी व्यक्ती, सकारात्मक बदल घडवू शकते का? ह्या सर्वच प्रश्नांचं उत्तर म्हणजे कोसबाड मधलं त्यांचं कार्य होय.

त्यांचा इथे उल्लेख मला दोन कारणांसाठी करावासा वाटला.

एक म्हणजे आदिवासी समाजाला शिक्षणाची दारं उघडून देऊन त्यांचा विकास करण्याच्या कामी सिंधूताईंचं योगदान खुप महत्वाच आहे. मुलांची शिक्षिका ह्या भुमिकेच्या जोडीने त्यांनी तिथल्या समाजा बरोबर जे बंध जोडले त्यातून अनौपचारिक रित्या तिथे दारुबंदी, सामुदायिक विवाह उपक्रम, आरोग्य तपासणीचे महत्व पटवून देणे, बुवाबाजीचा पगडा कमी करणे अशा सारख्या अनेक गोष्टीवर काम केलय.

बालसंगोपन हा त्यांच्या साठी वेगळा विषय नसुन तो त्यांच्या जगण्याचा भाग आहे. अनुताई, ताराबाई मोडक आणि सिंधुताईंनी शाळेमधे राबवलेले उपक्रम जर आपल्या शिक्षण पद्धतीचा भाग बनले तर "शिक्षणाच्या आईचा घो- भाग २" आपल्या समाजात बघायची वेळ आपल्यावर नक्कीच येणार नाही.

अर्थात त्यांच्या शिक्षण पद्दतीचा जसाच्या तसा वापर इथे नक्कीच अपेक्षित नाही आहे मला. पण त्याचा जो गाभा आहे - सहजगत्या शिक्षण आणि शिक्षणाला मुलांच्या भावविश्वाशी दिलेली जोड त्याचा जर आपल्या शिक्षण पद्धतीत वापर झाला तर खुप सकारात्मक बदल दिसून येईल हे नक्की.

शिक्षण पद्धतीत बदल हे काही माझ्यासारख्या एकट्या दुकट्या व्यक्तीच काम नाही नक्कीच. पण हा लेख लिहीण्याचं दुसरं कारण आहे ते हे की जर आजुबाजुची परिस्थीती बदलत नसेल आणि ते माझ्या हातात पुर्णपणे नसेल तर मी एक व्यक्ती म्हणून माझ्यापुरते काय बदल करु शकते हे तपासणे. त्यांचे बालसंगोपनाचे धडे आपल्या पद्धतीने आपल्या कार्यक्षेत्रात पालकांनी आपापल्या मुलांना शिकवताना किंवा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावताना वापरले तरी आपल्या वर्तुळापुरता सकारात्मक बदल शक्य आहे. आणि हे आपल्या आवाक्यात नक्कीच आहे.

"माझी लेक आणि आमचा अभ्यास" ह्या गोष्टीवर काय करता येईल ज्या योगे हे शिकणं तिला आनंददायी तर होईलच पण मलाही आनंद देईल ह्याचा शोध घेत असताना मला सिंधुताईंच्या "बालसंगोपना" विषयी माहिती मिळाली.

सगळच अजून ह्या माझ्या कच्या मडक्यात पण झिरपलय असं नाही. पण कुठेतरी माझ्या मनातल्या सहजशिक्षण धारणेला पुष्टी मिळाली आणि अजून जोमाने ह्या विषयावर काम करायचा उत्साह मात्र वाढला.

त्यांचं हे कार्य नुसतं प्रेरणा देणार नाही तर नक्कीच काही तरी प्रत्येकालाच शिकवून जाणार आहे. त्याच हेतूने हा लेख तुमच्या समोर ठेवतेय. काही उणं झालं असेल तर तो माझ्या कच्या मडक्याचा दोष मानावा हि विनंती.

------------------

संदर्भ :- "वटवृक्षाच्या सावलीत" हे सिंधुताईंचे आत्मचरित्र, त्यांच्या, फॉरवर्डेड इपत्रातून माझ्यापर्यंत पोहोचलेल्या बालकविता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख वरवरच वाचला, छान लिहिलंयस, नीट सावकाशीने वाचणार आहे पण आपली व्यवधान सांभाळून खारीचा वाटा उचलण्याबद्दल तू म्हटलंयसना ते मला प्रचंड भावले आणि म्हणून पहिली त्याबद्दल प्रतिक्रिया देते, नंतर पूर्ण लेख वाचून काय वाटले ते लिहीन.

संपादक, संदर्भात लिहीलेल्या ओळीत त्यांच्या ह्या शब्दानंतर स्वल्प विराम द्यायचा राहिला आहे. कृपया ती चूक सुधारण्याची सवलत द्यावी. कारण त्यांच्या काही कवितांची माहिती इपत्रामधून फॉरवर्डेड इमेल द्वारे माझ्या पर्यंत पोहोचली आहे.

तसेच एका ठिकाणी टायपिंग करताना चूक झाली आहे "आणायच्या" लिहायचे होते तिथे ण चा न झालाय. तो टायपो सुधारायची देखील सवलत द्यावी ही विनंती

छान. अगदी तळमळीनं लिहिलंय.
सिंधूताईंच्या कार्याबद्दल जाणून घेतल्यावर तुझ्यावर त्यांचा किती आणि कसा खोलवर प्रभाव पडला हे लख्ख कळून येतंय वाचताना Happy

ओघवती भाषा आणि लेखनविषयाबाबतची समरसता यामुळे लेख सहज सुंदर.आणि मडक तर पक्क वाटतय.

खूप छान कविता ! खूप समरसून लिहिलय्स. तुझी तळमळ अगदी जाणवतेय.
एका चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद !>+१

कविन, छान लिहीलं आहे. खूप पूर्वी मामा-मामींबरोबर ती शाळा बघितली होती. अनुताई वाघ हे नाव लक्षात राहिलं होतं. त्यांच्याच सहकारी, सिंधुताईंबद्दल आज तुझ्यामुळे माहित झालं. अगदी समरसून लिहीलं आहेस.

कविता, खूपच सुंदर लिहिलेयस. धन्यवाद सिंधुताईसारख्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल, त्यांच्या हाताखाली शिकलेली मुलेपण नशिबवान किती practicle knowledge मिळाले त्यांना.

वंदन त्यांना. आता त्यांचे आत्मचरित्र वाचेन.